काल रात्री ऑफिस संपवुन घरी जायला निघालो. एक मित्र सोबत होता नेहमी प्रमाणे जेव्हा दोन एकाच टिम चे लोक सोबत भेटतात तेव्हा जश्या गप्पा चलु असतात त्याच चालु होत्या. थोडासा पाउस पडत होता. ऑफिस मधुन बाहेर पडताना मी मित्राला म्हणालो "कंटाळा आला यार उद्या शनिवार असुन पण ऑफिल यायचे". मित्राने त्या नंतर मस्त पैकि एक पाच दहा मिनिटे सगळ्यांना शिव्या घातल्या. ऑफिसच्या गेटच्या बाहेरच पोलिसांची नाकाबंदी होती. मी म्हणालो " हे लोक रोज नाकाबंदी करतात, कश्यासाठी दोन चार दुचाकीस्वारांना अडवुन त्यांचा कडुन पैसे काढण्यासाठी??? ह्यावर तो म्हणाला " यार याच मुंबई पोलिसांनीच अश्याच एका नाकाबंदीत कसाबला सुद्धा पकडले आहे हे विसरुन चालणार नाही". असेच चालत चालत कांजुरमार्ग स्टेशनावर आलो. आसनगाव लोकल इंडीकेटर वर दाखवत होती. "ह्या नंतर दोन ठाणे आहेत ह्यातच चढु" मित्राला डोंबिवली पर्यंत जायचे होते म्हणुन तो म्हणाला.
लोकल स्टेशनात आली, नेहमी प्रमाणेच गर्दीने भरलेली. कसे बसे आम्हीही चढलो. मधे उभे रहायची जागा मिळाली.बाहेर पाउस पडत असला तरी लोकल मधले वातावरण नेहमी प्रमाणे कोंदलेलेच होते. भांडुप आणि नाहुर च्या मधे कोणीतरी ओरडले मोबाईल गेला. माझा आणि मित्राचा हात लगेचच मोबाईल आहे का नाही तपासण्यासाठी खिश्याकडे गेला. माझा मोबाईल खिश्यात होता म्हणुन हुश्श्य करत प्रश्नार्थक नजरेने मित्राकडे पाहिले त्याच्या कडे पाहाताच लक्षात आले. त्याचा मोबाईल गेलेलाच होता. असेच ईकडे तिकडे पाहिले तर डब्याचा दाराजवळ अजुन दोन जणांचे फोन गेले होते. माझा मित्र व मी लोकांना सरकवत कसे बसे दरवाज्याजवळ पोहचलो. एकुण चार लोक होते ज्यांचे मोबाईल चोरीला गेले होते. त्यातल्या एकाने सांगितले , त्याचा मोबाईल चोरणारा त्याने पाहिला आहे. गुलाबी शर्ट घातलेला आहे आताच नाहुर ला उतरुन मागच्या दरवाज्यात चढला आहे. डब्यात तो पर्यंत सगळी कडे मोबाईल चोराचीच चर्चा होती. एकटा माणुस चार मोबाईल चोरुच शकणार नाही नक्की टोळी असेल. असे एक ना अनेक तर्क मांडणे चालु होते. त्यात आता मुख्य प्रश्न होता ते त्याला पकडायचे कसे?? कारण मुलुंडला तो उतरुन पळुन जाउ शकला असता. ज्याने मोबाईल चोराला बघितले होते तो म्हणाला गाडी प्लॅट्फॉर्म ला लागली की उडी मारुन मागच्या दरवाज्याकडे पळणार.
गाडी मुलुंड स्टेशनात शिरत होती दरवाजाच्या समोरच्या बाजुला आम्हाला चार पाच जणांना जागा लोकांनी स्वता:हुन करुन दिली होती. गाडी चा वेग थोडा मंदावताच मी आणि मित्रा ने गाडीतुन उड्या मारल्या पाठोपाठ मागच्या दोघा तिघांनेही उड्या मारल्या. सावरुन ट्रेन कडे बघुस तर डब्बा थोडासा पुढे गेला होता. त्यामुळे आम्ही तसेच पळायला लागलो. बाकीच्या दारातल्या लोकांना आणि प्लॅट्फोर्म वरच्या लोकांना काही तरी लफडा आहे लक्षात आले. त्यामुळे लोक कधी नव्हे तर पळणार्या लोकांना जागा करुन देत होते. अजुन ट्रेण पुर्ण थांबायची होती तेव्हाच माझा मित्र आणि त्या चोराला ओळखणारा ईसम (त्याला आपाण आता य म्हणुया ) डब्य्यात चढले. मी जेव्हा दाराजवळ पोहचलो तर पाह मित्राने एका माणसाला कॉलरने धरले होते आणि पब्लिक ने त्याला मारायला सुरवात केली होती. मित्र जेव्हा बाहेर त्याला घेउन आला तेव्हा बरीच गर्दी जमली होती. चोराला बघितल्यावर खरे तर वाटते नव्हते तो चोर असेल. आता आजुबाजुची गर्दी चोरावर हात चालवायच्या तयारीत होती. मित्राने त्याला धरुन ठेवले होते व समोर मी, "य" आणि मोबाईल चोरीला गेलेले दोन लोक होते.
"य" ने त्याला विचारले "माझा मोबाईल कुठेय??"
चोर म्हणाल " माझ्या कडे नाहिये माझ्या साथीदारा कडे आहे"
"य" ने एक जोरदार अशी त्याचा कानाखाली काढली. बघ्यांची गर्दी वाढतच चालली होती. तितक्यात य चा मोबाईल चोराच्या पायाजवळ सापडला. मोबाईल उचलताच य ने व ईतर दोन लोकांनी त्याला मारायला सुरवात केली. मित्राने त्याला कसे तरी धरुन ठेवले होते. माझ्या आजवरच्या गेलेल्या मोबाईल्ची आठवण काढुन मी पण एक दोन त्याला ठेवुन दिल्या. पण अचानक गर्दी ईतकी वाढली जो उठेल तो त्याला मारायला लागला. त्याला वाचवणे सुद्धा आमच्या हाताबाहेर होवु लागले. काही लोक तर ट्रेन पकडायही सोडुन ह्या सगळ्या प्रकाराकडे पाहात होते. काही लोक मारतही होते. नेहमी मुंबईच्या लोकांचे वर्णन करताना ट्रेन मधुन उतरतान कोणी पडला तर त्याचावर पाय ठेवुन जायला कमी करणार नाहीत असे केले जाते. इकडे तर वेगळाच अनुभव येत होता. लोक ट्रेन सोडुन चोराला मारत होते. ह्या सगळ्या गोंधळात आमच्या मित्राने व "य" ने मिळुन त्याला पोलिसात द्यायचे ठरवले. पोलिसांकडे घेउन जायचे म्हणाले की अर्ध्या गर्दीचा उत्साह ओसरला आणि गर्दी पांगायला सुरवात झाली.
आमचा मोर्चा (म्हणजे मी, मित्र, य, दोन जण ज्यांचे मोबाईल चोरी गेले होते आणि चोर) ह्यांचा मोर्चा निघाला पोलिस स्टेशना कडे. सर्व प्रथम कोणाएका वाटाड्याने आम्हाला एका चौकी कडे नेले. तिथे एक हवालदार साहेब खुर्चीत आरामात बसले होते. त्यांना आमची कहाणी थोडक्यात सांगताच ते जागेवरुन उठले व सगळ्यात आधी त्यांनी चोरच्या कानाखाली एक ठेवुन दिली. मस्त पाच एक मिनिट आरामात त्याचावर हात साफ करुन घेतल्यावर आम्हाला म्हणाले "पुढे जी आर पि एफ" ची चौकी आहे तिकडे घेउन जा ह्याला". आमचा मोर्चा आता त्या नव्या चौकी कडे निघाला. तेवढ्या वेळात चोराने कबुली दिली होतिच की त्याची एक टोळी होती आणि त्याचा साथीदारांनी चोरी केली आहे. जि आर पि अफ च्या चौकित आम्हि पोहचलो तर तिकडे एक फौजदार बाई आमच्या समोर आल्या. परत एकदा त्यांना पुर्ण कहानी सांगण्यात आली. मग त्यांनी एका शिपायाला बोलावुन चोराची झडती घ्यायला सांगितले. तो हवालदार चोराला एका कोपर्यात घेउन गेला आणि बेदम मारायला सुअरवात केली. थोडावेळाने शिपाई एका हातात काही सामान आणि दुसर्या हातात चोर अश्या अवस्थेत बाहेर आला. चोराच्या चेहर्यावर मार खाल्ल्याचा चांगल्याच खुणा दिसत होत्या. चोराला बाई समोर उभे करण्यात आले. त्यापुढील नाट्य काही देत आहे.
बाई:- " काय रे तु हिंदु आहेस की मुसलमान?"
(४४० वोल्ट्स चा झटका मला ह्या वाक्याचा वेळेस बसला)
चोरः "हिंदु"
बाई: " चोरी तु केलिस का??"
चोर: "नाही माझ्या सोबतच्या लोकांनी."
बाई: " शिपाई, काय काय निघाले ह्याचा कडे"
शिपाई: " एक मोबाईल, काही कागदे व ३०२ रुपये"
बाई: "आण ते ईकडे"
शिपायाने ते सामान बाईंसमोर ठेवले. बाईंनी त्यातले ३०२ रुपये उचलुन आपल्या खिश्यात टाकले.
बाई (चोराला): " काय रे हा मोबाईल कुठे चोरलास??"
चोरः "नाही हा माझाच आहे"
बाई : "नंबर काय मग तुझा?"
चोर आपला नं सांगतो. बाई त्यांचा टेबलावरील फोन वरुन तो नं फिरवतात तो नंबर लागत नाही.
बाई: " हा पण चोरिचाच असेल, नंबर लागत नाहिये"
चोर: " नाही हो हा माझाच आहे"
बाई: "चुप बैस जास्त आवाज नको करु"
बाई (आमच्या कडे पाहुन) : " तुमच्या पैकी कोणा कोणाचे मोबाईल गेले आहेत?? कोण कोण तक्रार करणार आहेत??"
यः "आमचे चार जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत त्यातला माझा ह्याचा कडे सापडला."
बाई: " ठीक आहे तक्रारी सोबत पुरावा म्हणुन तुमचा मोबाईल जमा करावा लागेल.
आमच्या नशिबाने य त्याचा मोबाईल जमा करायला तयार झाला. पुढचा गोळा आमच्यावर फेकला गेला तो तुम्हाला तक्रार नोंदवायला कुर्ल्याला जावे लागेल. त्यासाठी कुर्ल्याचे दोन हवालदार ईकडे येतिल त्यांचा सोबत आम्ही चोराला पाठवु. कुर्ल्याचे हवालदार ईतर काही कामासाठी इकडे यायला निघाले आहेतच त्यांचाच बरोबर ह्याला पाठवु.मग सुरु झाल्या ते पोलिस खात्याचा बढाया. त्याचा एक एक शौर्यकथा आम्ही ऐकतच होतो. त्या चोराला परत मधल्या खोलित नेण्यात आले. त्याला तिकडे नेतानाच नागडा करायची तयारी सुरु होती. बाई इकडे आम्हाला त्यांचा शौर्यकथा सांगत होत्या आणि आत मधुन चोराचे प्रत्येक फटक्या गणित चोराच्या व्हिवळण्याचे आवाज येत होते. त्यातच एका शिपायाला अजुनच जोर आला. कुठुन तरी तो एक मोठ पट्टा घेउन आला. पट्ट्याची जाडी पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा जादी पेक्षा जास्त होती. आता पुढे एक हवालदार चोराच्या गुढघ्यावर उभा होता आणि दुसर्या ने त्याचा पायावर जोर जोरात फटके मारायला सुरवात केली. तिसर्या फटक्या नंतर चोर रडायलाच लागला. तो रडत रडत ओरडला मारु नका साहेब मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. बाईने ईकडुन ओरडुन शिपायाला चोराला बाहेर घेउन यायला सांगितले. तितक्यात कुर्ल्याचे दोन हवालदार तिकडे पोहचलेच.
त्याच वेळेस चोराने एक एक कबुली जवाब द्यायला सुरवात केली. त्याच्या सोबत चार लोक होते चारही लोक मुंब्र्याला रहाणारे होते त्यातल्या एकाचे नाव अफजल होते. ह्या अफजल चे नाव घेताच सगळ्या पोलिसांच्या चेहर्यावर आनंदाची एक लकेर उमटली. कुर्ल्याचा पहिल्या हवालदाराने अफजल बद्दल माहिती द्यायला सुरु केली. अफजल कुठे राहतो, त्याचे आई वडिल काय करतात??? त्याचे मामा मामी काय करतात??? हे सगळे आम्हाला पुढच्या पाच दहा मिनिटे ऐकवले. दुसर्या हवालदाराने बाईच्या परवाणगिने मुब्र्याला कोणाला तरी फोन लावला. अफजल समोरच फिरत आहे आताच आला आहे हे पलिकडच्या माणसाने सांगितले. ह्यानंतर त्या चोराला कुर्ल्याला न्यायचे ठरले त्यावेळेस हवालदार क्रमांक एक ने बाईंना विचारले चोरा जवळ काय काय मिळाले??? बाईंनी त्यांचा समोर काही कागदे व तो मोबाईल ठेवला.त्यानंतर कुर्ल्याचा हवालदाराने सगळ्यांना कुर्ल्याचा चौकिवर यायला सांगितले. पोलिसांची एकुणच वागण्याची पद्धत बघुन मी तर परेशान झालो होतो.
त्याच वेळेस मित्राने आणि मी कुर्ल्याला जायचे आधी काही तरी खायचे ठरवले. स्टेशन बाहेर पडुन एका ठीकाणी खायला बसलेले असताना सहजच मित्राला विचारले
"तुझा ईतका मोबाईल चोरिला गेला पण तु एकदाही चोरावर हात नाही उचललास" ह्यावर मित्र उत्तरला
"कुठल्या चोराला मारायचे मोबाईल चोरणार्याला का त्याचेही ३०२ रुपये चोरणार्याला???"
ह्या लेखात मला कुठेही पोलिसांबद्दल किंवा पोलिसखात्याबद्दल काही वाईट लिहायचे नाही. त्यांचे वागणे जसे माझ्या समोर आले तसे मांडायचा प्रयत्न करतोय. हे लिहिण्याचे कारण काय असा बर्याच जणांना प्रश्न पडेल त्यावर मी इतकेच सांगु शकतो लिहायचे कारण माझ्या मित्राचे शेवटचे वाक्य. बर्याच वेळा आपल्याला पोलिसांसोबत वेगवेगळे अनुभव येतात त्यात पोलिस लोक विचित्र वागतात. साधे दुचाकिवरुन जाताना पकडलेले असो किंवा पोलिसात तक्रार करायला गेलेले असो. कधी आपण जाणुन घ्यायचा प्रयत्नच करत नाही हे लोक असे का वागतात?? आता त्या फौजदार बाईंनी ते ३०२ रुपये परत का नाही केले ह्याचे कारण काय असु शकेल. कदाचित त्यांचा पगार त्यांना पुरत नसेल किंवा अजुन काहीतरी असेल. आपल्या मिपा वर पोलिसखात्यातिल किंवा पोलिसखात्याचा संबधातिल अनेक लोक आहेत तसेस काही पत्रकार मंडळी आहेत ज्यांना जवळुन पोलिस खात्याचा अनुभव आहे त्यांनी पोलिसांच्या मानसिकते बद्दल काही तरी प्रकाश टाकावा अशी विनंती मी त्यांना करतो. लहानपणी कधी तरी ऐकलेले समुहगीत आज आठवत आहे त्याचा ओळी "पोलिसांतिल माणुस तुम्ही जाणुन घ्या हो जरा" अश्या काहीतरी होत्या. बाकी तो पर्यंत चोराला आधी हिंदु का मुसलमान असे विचारण्यामागे काय कारणे असतिल ह्याचा मी विचार करतो.
प्रतिक्रिया
18 Jul 2009 - 6:01 pm | बहुगुणी
मित्राची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. तुमचं नेमकेपणाने मर्मावर बोट ठेवणंही आवडलं (आधी प्रवाशांचं आणि मग पोलिसांचं क्रौर्य. नंतर पोलिसांनी चोराला आधी हिंदु का मुसलमान असे विचारणं, वगैरे). उत्तम वर्णन केलंत मानवी स्वभावाचं, रोजच्या आयुष्यात आपण किती सहजपणे भष्टाचार आणि stereotypes सहन करतो (आणि कधी कधी मान्यही करतो) त्याचं टोकदार उदाहरण.
लेखनशैलीबद्दल बोलायचं तर हा लेख कोणत्याही अग्रगण्य दैनिकात सरावलेल्या लेखकाने लिहावा इतका छान जमलेला आहे. अर्थात्, याचा असाही अर्थ होतो की मिपा केवळ हौशी लेखकांचं व्यासपीठ नव्हे तर उत्तम, कसदार लिखाणाचंही 'घर' झालंय. (याची बरीच इतर उदाहरणं आधीही दिसली आहेत.)
18 Jul 2009 - 11:32 pm | दशानन
>>>लेखनशैलीबद्दल बोलायचं तर हा लेख कोणत्याही अग्रगण्य दैनिकात सरावलेल्या लेखकाने लिहावा इतका छान जमलेला आहे.
१००%
सहमत.
19 Jul 2009 - 9:17 am | अवलिया
१०० % सहमत.
निखिल ! मस्त लेखन रे ! सुरेख !!
--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
19 Jul 2009 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निखिल ! मस्त लेखन रे ! सुरेख !!
-दिलीप बिरुटे
18 Jul 2009 - 11:47 pm | बिपिन कार्यकर्ते
अगदी वेगळाच अनुभव. काहीसा विषण्ण करणाराही. खरं तर पोलिसांची अवस्था, त्यांचा भ्रष्टाचार वगैरे विषय म्हणजे कोंबडी आधी की अंडं आधी असला प्रकार आहे. पण शेवटी समाज किडतोय एवढं मात्र नक्की.
बिपिन कार्यकर्ते
19 Jul 2009 - 3:09 am | कालिन्दि मुधोळ्कर
अगदी सरळ शैलीतला, खूप परिणामकारक लेख.
माझ्यामते ३०२ रुपये चोरणारे अधिक खतरनाक आहेत.
19 Jul 2009 - 7:39 am | ज्ञानेश...
कठीण आहे यावरून काही निष्कर्ष काढणे! प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर (किंवा चूक) असतो.
वस्तुस्थिती आहे, म्हणून सोडून द्यावे.
"Great Power Comes With Great Responssibilities"
19 Jul 2009 - 9:10 am | शाहरुख
छान लिहिला आहे अनुभव..
जो लाच घेतो तो चोर.
जो लाच देतो तो चोर. (घेणार्यापेक्षा मोठा)
जो आपल्या स्वार्थासाठी,फायद्यासाठी कायदा-नियम तोडतो तो चोर.
जो पायरेटेड चित्रपट बघतो, गाणी डाउनलोड करतो,सॉफ्टवेअर वापरतो तो चोर.
आपण या गोष्टींचा जेंव्हा स्वतःला त्रास तेंव्हाच समोरचा चोर अशी बोंब ठोकतो कृपया हे वाक्य वैयक्तिक घेऊ नये.
मी इथे जेंव्हा "समाज कसा सुधारावा, कीड कशी नष्ट करावी" असल्या "गप्पा" वाचतो तेंव्हा मला मनापासून प्रश्न पडतो की यातले किती जण वरील पैकी एकही गोष्ट करत नसतील..जर कुणी तसा / तशी असेल तर माझा त्याला / तिला _/\_ . ही फक्त स्माईली नाही,मी त्याच्या / तिच्या घरी येऊन साष्टांग दंडवत घालायला देखील तयार आहे.
एकदा अविनाष धर्माधिकारी (माजी आय. ए. एस. अधिकारी) यांना एकाने भाषणानंतर प्रश्न विचारला की " तुम्ही चाणक्य मंडळ मधे शिकणार्यांच्या कॅरॅक्टर-बिल्डींग साठी काय प्रयत्न करता". त्यांनी काय उत्तर दिले आत्ता आठवत नाहीय (मला तेंव्हा ते न आवडल्याने), पण जो पर्यंत सगळ्यांचे असे कॅरॅक्टर बिल्डींग होत नाही तो पर्यंत अशा गोष्टी होतच राहणार.अर्थात ज्याच्यापुढे पोटात काय ढकलायचे हा प्रश्न आहे त्याला असे काही सांगितले तर तो म्हणेल 'कॅरॅक्टर गेले गाढवाच्या **त'. (गरीब म्हणजे कॅरॅक्टरलेस असा अर्थ कृपया घेऊ नये)
मला स्वतःला गांधीजींचे "बी द चेंज यु वाँट टु सी" हे वाक्य फार आवडते आणि मी ते आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो..अर्थात ते खूप अवघड असल्याचे मला कळुन चुकले आहे.
18 Jul 2010 - 11:27 pm | Pain
१) जो लाच देतो तो चोर. (घेणार्यापेक्षा मोठा)
चूक.
प्रत्येक वेळी लाच न दिल्याचे परिणाम भोगणे किंवा लढा उभारणे सामान्य माणसाला शक्य नसते आणि अपेक्षितही नाही. त्याची जबाबदारी लाच घेणार्याला शिक्षा न करणार्यांची आहे.
२) जो पायरेटेड चित्रपट बघतो तो चोर.
चूक.
बॉलीवूडमध्ये १०० पैकी ९५-९९ चित्रपट बकवास असतात. ते बनवणारे बहुतांश लोक कर चुकविणे, अमली पदार्थ, देशाच्या शत्रूंना थारा देणे, असंघटीत/ गरजू लोकांचे शोषण इ. करत असतात ज्यांना आपली सडलेली न्यायव्यवस्था काहीही करत नाही. पण पायरसीच्या माध्यमातून आपण त्यांना थोडासा का होइना त्रास देउ शकतो.
मी इथे जेंव्हा "समाज कसा सुधारावा, कीड कशी नष्ट करावी" असल्या "गप्पा" वाचतो तेंव्हा मला मनापासून प्रश्न पडतो की यातले किती जण वरील पैकी एकही गोष्ट करत नसतील..जर कुणी तसा / तशी असेल तर माझा त्याला / तिला _/\_ . ही फक्त स्माईली नाही,मी त्याच्या / तिच्या घरी येऊन साष्टांग दंडवत घालायला देखील तयार आहे.
योग्य/ चांगल्या कामाला/वर्तणुकीला बक्षीस आणि चूका/ गुन्ह्यांना शिक्षा अशी व्यवस्था जोपर्यंत नाहीये तोपर्यंत सामान्य लोक नियम पाळण्याचे मनावर घेत नाहीत/ घेणार नाहीत.
19 Jul 2009 - 10:40 am | विसोबा खेचर
छान कथा! :)
अहो तश्या चोर्यामार्या चालायच्याच. प्रत्येकाला पोट आहे अन् जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे कामं करत असतो..
आता शिर्षकाचे उत्तर -
जो पकडला जातो त्याला! :)
आपला,
(चोर) तात्या.
19 Jul 2009 - 3:55 pm | विनायक प्रभू
ह्याला म्हणतात प्रतिक्रियात्मक
१असेच बोल्तो.
19 Jul 2009 - 11:18 am | योगी९००
चांगलाच अनुभव..यामुळे आपण पुढे होऊन समाजकार्य (पोलिसांना मदत) करावे की नाही अशी शंका मनात येते..
माझा एक मित्र चोरी झाली म्हणून पोलिस स्टेशनला गेला होता. तेथे पोलिसांनी पहिल्यांदा त्याचीच व्यवस्थित माहिती घेतली. आणि नंतर "च्यायला लाख लाख रुपये जातात तर लोकं गप्प बसतात आणि फालतू ५-१० हजाराची चोरीची तक्रार काय करता" असे म्हणून अक्षरशः हाकलवले..आता बोला..
खादाडमाऊ
20 Jul 2009 - 3:35 pm | चिरोटा
एकदा मित्राचा मोबाइल चोरी झाला म्हणून त्याच्यासमवेत पोलिस स्टेशनला गेलो(मित्राला एकटे जायला भिती वाटत होती म्हणून त्याने मलाही बोलावले होते!!). FIR नोंदवायचा असेल तर कॉफीसाठी(इकडे चहा पित नाहीत जास्त!) १०० रुपये द्यावे लागतील अशी मागणी स्टेशनवरच्या साहेबानी केली.! वर एवढ्या नोकर्या करता पण साध्या वस्तु सांभाळता येत नाहीत असाही शेरा मारला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
20 Jul 2009 - 10:08 am | निखिल देशपांडे
लेखनशैलीबद्दल बोलायचं तर हा लेख कोणत्याही अग्रगण्य दैनिकात सरावलेल्या लेखकाने लिहावा इतका छान जमलेला आहे.
नाही हो आम्ही आपले हौशी लेखकच.....
चोर कुणाला म्हणावे?
जो पकडला जातो त्याला!
तात्या मस्त उत्तर, खरोकर जो पकडला जातो तोच चोर ठरतो
==निखिल
20 Jul 2009 - 3:39 pm | धमाल मुलगा
"तुम जैसे छोटे लोगों की यहीं प्रॉब्लेम है| कितनी बार कहा है, चोरी करना जुर्म नहीं, पकडे जाना जुर्म है| "
:(
>>बाई:- " काय रे तु हिंदु आहेस की मुसलमान?"
:? चला, म्हणजे धर्माधारीत आरक्षणं गुन्हेगारीतही यायला लागलेली दिस्ताहेत.
असो,
ह्या गोष्टीला बुध्दीवादी दृष्टीकोनातून अनेक छटा आहेत, 'चोर चोरी का करतो?', 'चोर सुधारावा म्हणुन काय करावे?', 'पोलीस लाच का घेतात?', 'पोलीसांची वैयक्तिक आयुष्याची कुतरओढ' वगैरे वगैरे!!!!
आता ह्या मुद्द्यांवर ते-ते जग जवळून पाहिलेले लोक आपापल्या अनुभवविश्वाच्या कसोट्यांवर घासून पडताळून निरनिरळी उत्तरं देऊ शकतील..
पण एक सर्वसामान्य माणूस म्हणुन माझं वैयक्तिक मत तर इतकंच असेल 'काही सन्माननीय अपवाद वगळता, ही पोलीसयंत्रणा म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी' !!!! ह्या वाक्याला वैयक्तिक अनुभवही कारणीभूत आहेत. अगदी, वाक्याच्या उत्तरार्धाचा अनुभव कित्येकांना आलेला असेलच, पण पुर्वार्ध (सन्माननीय अपवाद वगळता..)ह्याचाही अनुभव काहींना नक्कीच असेल!
असो,
बा देशपांड्या, ह्या निमित्ताने का होईना, पण खरडवहीतून बाहेर पडून आपण मुख्य धाग्यावर बर्याच दिवसांनी धागा प्रवर्तकाच्या भुमिकेत दिसलात ह्याबद्दल अंमळ बरे वाटले :)