फडफड फडफड फडकतो.....

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
19 May 2009 - 3:35 am

माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते.

थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा. म्हणजे एकाने 'अमुक अमुक देश / गाव कुठे आहे' असं विचारायचं आणि मग दुसर्‍याने ते शोधून काढायचं. मग झेंड्यांचा खेळ. तसाच. एखादा झेंडा दाखवायचा आणि हा कुठल्या देशाचा असं विचारायचं. तेव्हा पासून वेगवेगळ्या देशांचे झेंडे आणि त्यातली विविधता, प्रतीकात्मकता इत्यादी प्रकार खूप छान वाटायचे. मन त्यात रमून जायचं. ते देश कसे असतील, संस्कृती कशी असेल असले विचार मनात यायचे. त्यातूनच हळूहळू वाचत गेलो आणि संपूर्ण जगभरातल्या बर्‍याचशा झेंड्यांबद्दल छान छान माहिती मिळाली.

मला वाटतं जेव्हापासून मानव टोळ्यांमधे किंवा समूहांमधे रहायला लागला तेव्हा पासून 'आपले' आणि 'परके' ही कल्पना वास्तवात आली असावी. मग आपले कोण आणि परके कोण हे पटकन कळावं म्हणून काही खुणा, संकेत, वेश इत्यादी प्रकार सुरू झाले. त्या बरोबरच मग आपल्या समूहाचे एक प्रतीक म्हणून किंवा खूण म्हणून काही निशाणं किंवा नुसतीच रंगीत कापडं इत्यादींचा वापर झाला असावा. आपल्याकडे रामायण / महाभारतात पण ध्वजाची संकल्पना आहेच. प्रत्येक वीराच्या शंखाचे जसे वर्णन आहे तसे ध्वजांचे पण वर्णन आहे. अर्जुनाच्या रथावरच्या ध्वजावर साक्षात मारूतराय वास्तव्यास होते.

जसजशी मानवसमूहांमधे उन्नती होत गेली तसतशी या निशाणांबद्दलच्या मान्यता / कल्पना याही उन्नत होत गेल्या असाव्यात. एखाद्या जातीचा / देशाचा / टोळीचा झेंडा म्हणजे अगदी सर्वस्व, जीव की प्राण इथपर्यंत गाडी आली. ध्वजावरून एखाद्या सरदाराची ओळखच नाही तर दर्जा पण कळायचा. त्या त्या सरदाराच्या सैन्या करता तो झेंडा म्हणजे सर्वस्व झाला. युध्दांमधे निशाण सर्वात महत्वाचे असायचे. निशाण शत्रूच्या हाती पडणे म्हणजे नामुष्की किंवा सपशेल पराभवच. शरणागतीचा ध्वज पांढरा.

तर असा हा ध्वज किंवा बोलीभाषेत झेंडा. लहानपणापासून कुतूहल वाटत असलेला. थोडाफार छंदच लावलेला म्हणा ना... मला आवडलेल्या आणि / किंवा लक्षात राहिलेल्या झेंड्यांबद्दल, त्यांच्याशी निगडीत असलेल्या कथांबद्दल थोडंसं लिहिणार आहे...

हिंदवी स्वराज्य

सुरूवात करूया एका अशा ध्वजापासून जो मीच काय पण कोणताही मराठी माणूस कधीच विसरणार नाही. थोरल्या महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज. केशरी रंगच खरंतर खूप सुंदर दिसतो. हाती अक्षरश: काहीही नसताना एक नव्हे अनेक शत्रूंशी लढत उभारलेल्या सुंदर स्वराज्यासाठी याहून चपखल असा रंग तो काय असणार. आज भग्नावस्थेत असलेल्या गडकिल्ल्यांवर तो किती डौलाने फडकत असेल, कल्पनाच करावी आपण आता फक्त. भगव्याला त्रिवार मुजरा!!!

भारतीय प्रजासत्ताक

भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर पासूनच भारताचा झेंडा कसा असावा याबद्दल चर्चा चालू होती. माझ्या माहिती प्रमाणे मादाम कामा यांनी तयार केलेला ध्वज हा या दिशेने पहिला प्रयत्न होता. पण स्वातंत्र्यानंतर मात्र काँग्रेसच्या ध्वजाशी अतिशय साम्य असलेला तिरंगा आपला राष्ट्रिय ध्वज म्हणून घोषित झाला.

मला आठवतंय, आमच्या शाळेत आपल्या तिरंग्यातल्या रंगांबद्दल "केशरी हा त्यागाचं, पांढरा हा शांतीचं आणि हिरवा हा समृद्धीचं प्रतीक आहे. मधले निळे चक्र हे प्रगतीचं प्रतीक" असं लिहिलं होतं. मी एकदा आमच्या शेजारच्या संघिष्ट काकांना असं सांगितलं तर ते मला हसले आणि त्या झेंड्याचा धर्माधिष्ठीत असा नवीनच अर्थ सांगितला. काहीही असो, मला आपला हा तिरंगा खरंच आवडतो, डौलदार दिसतो बेटा. (अर्थात हा संस्काराचा भाग आहेच).

नेपाळ

आत्ता आत्ता पर्यंत जगातील एकमेव सार्वभौम हिंदू राजा असलेला हा देश. नुकताच एका प्रजासत्ताकात परिवर्तित झालेला. या झेंड्याची वैशिष्ट्यं म्हणजे जगातला एकमेव असा झेंडा जो त्रिकोणाकृती आहे. या झेंड्यावर नेपाळच्या चांद्रवंशिय राजघराण्याची चंद्रिका आणि त्यांचे अनेक शतके पेशवे असलेल्या सूर्यवंशिय राणा घराण्याचा सूर्य विराजमान आहेत. हेही एक वैशिष्ट्यच. या चंद्रसूर्याचा असाही अर्थ लावला जातो की सूर्य-चंद्र असे पर्यंत हे राष्ट्र राहिल.

ग्रेट ब्रिटन

दिडशे वर्षं आपल्या आजोबा पणजोबांनी वगैरे ज्या झेंड्याला सलामी दिली तो हा युनियन जॅक. हा दोन पूर्वापार हाडवैरी असलेल्या दोन देशांच्या झेंड्यांचा मिळून बनलेला आहे. लाल रंगाचा जो क्रॉस आहे तो इंग्लंडचा आणि त्याखाली असलेला तिरपा पांढरा स्कॉटलंडचा. या दोन्ही राज्यांना एकत्र केलं गेलं तेव्हापासून हा अस्तित्वात आला आणि त्याला युनियन जॅक हे नावही तेव्हापासूनच मिळालं. त्यातही परत पांढर्‍या क्रॉसच्या मधोमध एक लाल क्रॉस आहेच, तो आयर्लंडचं प्रतीक. बरेच बदल होत होत आता तो आजच्या रूपात आला आहे. एके काळी जगातील सर्वात जास्त भागावर हा मोठ्या डौलाने फडकला. याचं अगदी वेगळं असं वैशिष्ट्य म्हणजे हा असा एकच ध्वज आहे की तो मूळ देशा व्यतिरिक्त इतरही देशांच्या ध्वजामधे सामवालेला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांच्या ध्वजांवर युनियन जॅक आहेच!!!

अमेरिका (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका)

आजच्या घडीला जगातील सर्वात प्रबळ राष्ट्राचा हा झेंडा. केवळ झेंडाच नव्हे तर कोणत्याही टीशर्ट किंवा कपड्यांवर पण दिसणारा. यातले ५० तारे हे आज घटक असलेल्या ५० राज्यांचं प्रतीक तर एकूण १३ असलेल्या लाल पांढर्‍या पट्ट्या म्हणजे ज्या १३ मूळ वसाहती एकत्र आल्यामुळे हे राष्ट्र अस्तित्वात आले त्यांचे प्रतीक. आज जगात सर्वात जास्त द्वेष केला जाणारा ध्वज असं पण याचं वर्णन करू शकतो. याचं अजून एक वैशिष्ट्य.... पृथ्वीच्या बाहेर उभारला गेलेला पहिला झेंडा!!!

सोविएत रशिया

एक काळ खूप गाजवलाय बेट्याने. जगातल्या पहिल्या कम्युनिस्ट सत्तेचा मानबिंदू. क्रांतीच्या रक्तवर्णात नखशिखांत भिजलेला आणि शेतकरी कामकरी वर्गाची आयुधं कोयता हातोडा अंगावर अभिमानाने मिरवणारा. एके काळी जगातली किमान ३०-४० टक्के राष्ट्रं याच्या प्रभावाखाली होती.

सौदी अरेबिया

एखाद्या देशाने आपल्याला काय वाटतं, काय भूमिका आहे इ. गोष्टी आपल्याध्वजाद्वारे दाखवायचे याहून उत्तम उदाहरण दुसरे नाही. बहुतेक देश हे एखाद्या रंग, आकृती, चिह्न वगैरेंच्या सहाय्याने आपली भूमिका मांडतात. इथे मात्र सगळा रोखठोक कारभार. हिरवा जर्द रंग, वाळवंटातच खरं हिरव्या रंगाचं महत्व कळतं, तोच रंग धर्माचा होऊन बसला, त्यावर 'ला इलाहा इल्लल्ला मुहंमद रसूल अल्लाह' हे इस्लामचे घोषवाक्य (अरबी मधे त्याला 'शहादा' म्हणतात). आणि त्याखाली धर्मासाठी काय वाट्टेल ते करायची तयारी... तलवार. जणू काही ती तलवार ते वाक्य अधोरेखितच करते आहे. बास्स्स... प्रतीकं वगैरे भानगडच नाही. कोणाला शंकाच नको रहायला.

नाझी जर्मनी

जगातील आत्तापर्यंतचा सगळ्यात नृशंस नरसंहार ज्याच्या नावे झाला तो हा झेंडा. नाझींचा स्वस्तिक ध्वज. आपल्याकडच्या स्वस्तिकापेक्षा उलटे असलेले आणि ४५ अंशात गोल फिरवलेले. पहिल्यांदा बघितलेला 'नाझी भस्मासूराचा उदयास्त' या पुस्तकात. तेव्हा पासून लक्षात राहिलेला.

आणि आता मला ज्यामागची प्रतीकात्मता / कथा सगळ्यात जास्त आवडली आहे असा....

ऑस्ट्रिया

मध्ययुगीन ऑस्ट्रियामधे लिओपोल्ड नावाचा एक योद्धा सरदार होऊन गेला. एका अतिशय महत्वाच्या आणि भयानक युद्धात तो लढत होता. त्याचा पोशाख पांढरा होता. पण लढता लढता तो पूर्णपणे रक्तात न्हाऊन निघाला. त्याचा पोशाख लाल झाला रक्तामुळे. युद्ध संपल्यावर त्याने जेव्हा कंबरेचा शेला काढला तेव्हा त्या भागापुरताच पोशाख पांढरा होता, बाकी पूर्ण लाल. त्या वीराच्या सन्मानार्थ तेव्हापासून ऑस्ट्रियाचा झेंडा असा लाल, पांढरा, लाल. मी पहिल्यांदा ही कथा ऐकली तेव्हा अक्षरशः शहारा आला होता अंगावर. साला, झेंड्यामागे कथा वगैरे असावी तर अशी.

तर असे हे झेंडे....

संस्कृतीइतिहाससमाजप्रकटनलेखमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

चंबा मुतनाळ's picture

19 May 2009 - 4:29 am | चंबा मुतनाळ

लेख आवडला.
लहानपणी आम्ही चिकलेट्च्या रॅपर्स जमा करायचो, त्यावर वेगवेगळ्या देशांचे झेंडे असायचे. आणी मग त्यांची मित्रांबरोबर देवाणघेवाण करायचो, त्याची आठवण झाली. असे झेंड्यांचे फोटो बघितले की नाकात चिंगम्च्या पेपरमिंट्चा वास भरतो आणी लहानपणच्या आठवणीत मन रमते!
- चंबा

बबलु's picture

19 May 2009 - 4:29 am | बबलु

मस्त लेख. लहानपणी वेगवेगळ्या देशांच्या ध्वजांची चित्रं काढून, ती रंगवून त्याचं हस्तलिखित करायचो, त्याची आठवण झाली.

(अवांतरः- नकाशात एखादं गाव शोधायचं म्हणजे एकाने 'अमुक अमुक देश / गाव कुठे आहे' असं विचारायचं आणि मग दुसर्याेने ते शोधून काढायचं
हा खेळ आम्ही तासनतास खेळत असू. घरात एक प्रचंड मोठा भारताचा आणि एक जगाचा नकाशा होता. आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद बिपिनजी ).

....बबलु

मीनल's picture

19 May 2009 - 4:45 am | मीनल

मला ही आपला हा तिरंगा खरंच आवडतो, डौलदार दिसतो बेटा.

क्रमश करून इतर देशांच्या बद्दल लिहिल असत तर बर झाल असत.

मीनल.

सहज's picture

19 May 2009 - 6:51 am | सहज

क्रमश: करुन लेखमाला करावी.

ऑस्ट्रीयाच्या झेंड्यामागची कथा भारी. :-)

सँडी's picture

19 May 2009 - 6:54 pm | सँडी

हेच म्हणतो!

खुप माहितीपुर्ण!

क्लिंटन's picture

19 May 2009 - 8:26 pm | क्लिंटन

छान लेख. आवडला.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

दिपक's picture

20 May 2009 - 10:41 am | दिपक

माहितीपुर्ण लेख आवडला.

अवलिया's picture

19 May 2009 - 6:58 am | अवलिया

झेंडारुपी प्रतिकांवरचा लेख आवडला.

--अवलिया

प्राजु's picture

19 May 2009 - 7:54 am | प्राजु

सर्वात प्रथम अभिनंदन!!
अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिल्याबद्दल!!
प्रत्येक झेंड्याची कहाणी किंवा पार्श्वभूमी छान सांगितली आहेस. रोचक आहे माहिती.
:)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

19 May 2009 - 8:20 am | विकास

लेख मस्त आहे. भारताच्या बाबतीत भगवा आणि स्वातंत्र्यानंतरचा तिरंगा, या मधे १९०७ साली मादाम कामांनी जर्मनीत उंचावलेला स्वतंत्र भारताचे प्रतिक असलेला ध्वजपण यामुळे आठवला...

मिसळभोक्ता's picture

19 May 2009 - 2:35 pm | मिसळभोक्ता

?????

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

क्रान्ति's picture

19 May 2009 - 8:37 am | क्रान्ति

वेगळ्याच विश्वात नेणारा अभ्यासपूर्ण लेख खूप आवडला. ऑस्ट्रियन ध्वजामागची कहाणी, नेपाळी ध्वजावरच्या चंद्रसूर्याचं महत्त्व खास. आणि विशेष उल्लेखनीयहिरवा जर्द रंग, वाळवंटातच खरं हिरव्या रंगाचं महत्व कळतं, तोच रंग धर्माचा होऊन बसला, मस्त माहिती.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

घाटावरचे भट's picture

19 May 2009 - 8:40 am | घाटावरचे भट

मस्तच!!

भडकमकर मास्तर's picture

19 May 2009 - 8:46 am | भडकमकर मास्तर

माहितीपूर्ण लेख..
नकाशा-खेळांचा उल्लेख्ही मस्त... लहानपणाच्या आठवणी आल्या... ( एक खजिन्याची लूट नावाचा एक नकाशा खेळ होता तेव्हा लोकप्रिय.. कोणाला आठवतोय का?)

ऑस्ट्रियाच्या झेंड्याची गोष्ट भारी :)
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

विसोबा खेचर's picture

19 May 2009 - 9:15 am | विसोबा खेचर

एक सुंदर, संग्राह्य लेख..

बिपिनभावजींचा विजय असो..

आपला,
(तिरंगाप्रेमी) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2009 - 9:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिपिन, मस्तच लिहिलं आहेस. माहिती द्यावी तर अशी, कंटाळा न येता,एका दमात आख्खा लेख वाचून होतो आणि मग वाटतं, "एवढंच?"

यशोधरा's picture

19 May 2009 - 9:30 am | यशोधरा

मस्त आहे लेख.

स्वाती दिनेश's picture

19 May 2009 - 11:51 am | स्वाती दिनेश

झेंड्यांच्या गोष्टी आवडल्या, ऑस्ट्रीयन ध्वजाबद्दल जेव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही तुझ्यासारखेच वाटले होते.
नकाशातून गावं शोधण्याचा खेळ ऑफ तासाला खेळत असू त्याची आठवण करुन दिलीस ,:)
आणि ते 'क्रमशः' लिहायला विसरलास का?
स्वाती

भाग्यश्री's picture

19 May 2009 - 11:51 am | भाग्यश्री

खूप आवडला लेख बरका! अगदी रंजक माहीती!
झेंड्यामागची कथा/इतिहास वाचणे हा एक मस्त प्रकार आहे! :)

www.bhagyashree.co.cc

परिकथेतील राजकुमार's picture

19 May 2009 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार

बिपिनदा सुंदर व माहितीपुर्ण लेख. तात्या म्हणतात तसा संग्रही ठेवाव असा.
खुपशी माहीती नव्याने कळाली त्याबद्दल धन्यवाद.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दिगम्भा's picture

19 May 2009 - 12:10 pm | दिगम्भा

मीही लहानपणी समजायचो की नाझी स्वस्तिक उलटे असते. पण नंतर अनेक ठिकाणी उलटे व सुलटे अशी दोन्ही जर्मन स्वस्तिके पाहून मनात गोंधळ माजला.
शेवटी या नाझ्यांना दोन्ही सारखीच वाटत असावीत अशी मनाची समजूत करून घेतली.
या वरील झेंड्यावर तरी ४५ अंशातून फिरवलेले असले तरी सुलटेच स्वस्तिक दिसते आहे.
आता हा फंडा स्वातीताई किंवा अन्य तज्ज्ञांनी स्पष्ट करून सांगितलेला बरा.
- दिगम्भा

धनंजय's picture

19 May 2009 - 8:26 pm | धनंजय

माझीही अशीच गैरसमजूत होती.

पण इथे खुद्द हिटलरचेच चित्र दिसते आहे, आणि स्वस्तिक सुलटाच आहे (तिरका मात्र आहे) - दुवा

हा लेखाच्या अनुषंगाने उगाच उपचर्चा नको म्हणून चित्राऐवजी दुवा दिला आहे.

नंदन's picture

19 May 2009 - 12:26 pm | नंदन

लेख बिपिनदा. समूहगीतांबद्दलही येऊ दे अजून. मळखाऊ गणवेषात कडक इस्त्रीच्या चेहर्‍याने म्हटलेली 'जगी दुमवा रे, दुमदुमवा रे भारतगौरवगान' सारखी गीते हा जतन करून ठेवण्याजोगा प्रकार आहे :)

ऑस्ट्रिया आणि ग्रेट ब्रिटनच्या झेंड्यांबद्दलची माहिती रोचक आहे. हे प्रांतीय संकेत झाले, तर तिरंग्याप्रमाणे झेंड्यातले धार्मिक संकेत हे अगदी मनसेच्या झेंड्यातही दिसतात (भगव्यासोबत निळा आणि हिरव्या रंगाचे पट्टे). लेखावरून या विषयात तज्ञ असणारे अजून एक गोरेगावकर आठवले :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सायली पानसे's picture

19 May 2009 - 12:41 pm | सायली पानसे

मस्त माहिति आहे बिपिनदादा. छान आहे लेख.

लिखाळ's picture

19 May 2009 - 2:16 pm | लिखाळ

वा ! मस्त लेख !
ऑस्ट्रिया, ग्रेट ब्रिटनच्या झेंड्यांची माहिती छानच.
लेख खरोखरंच सुंदर...

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

शाल्मली's picture

19 May 2009 - 2:27 pm | शाल्मली

निरनिराळ्या झेंड्यांची माहिती छान दिली आहे.
ऑस्ट्रियाच्या झेंड्याचा इतिहास अजबच आहे !

अजून कितीतरी झेंडे बाकी आहेत.. लेख असा संपवला का? त्याची नेहमीसारखी वाचनीय लेखमाला होऊदेत.

--शाल्मली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2009 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला !

अभिज्ञ's picture

19 May 2009 - 3:36 pm | अभिज्ञ

लेख आवडला.
अजून बरेच झेंडे बाकि आहेत,
त्यांच्या विषयी देखील येउ द्यात.

भारतातल्या कर्नाटक राज्यालाच फक्त स्वतःचा झेंडा आहे असे ऐकुन आहे.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

ऋषिकेश's picture

19 May 2009 - 5:18 pm | ऋषिकेश

वा बिपीनदा लेख आवडला..
संग्राह्य आहेच

जरा छिद्रान्वेशी पणा करतो

आपल्याकडच्या स्वस्तिकापेक्षा उलटे असलेले आणि ४५ अंशात गोल फिरवलेले.

इथे स्वस्तिक सरळच आहे फक्त ४५ अंशात गोल फिरवलेले आहे

बाकी ऑस्ट्रीयाच्या ध्वजाची कथा महित नव्हती.. रोमांचक कथा आहे..

अश्याच कथा अजून येऊ देत.. तु क्रमशः टाकायचं विसरला आहेस (हि जबरदस्ती झाली.. कारण आम्हाला पुढचा भाग हवा आहे :) )

(छिद्रान्वेशी)ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

लवंगी's picture

19 May 2009 - 5:54 pm | लवंगी

माझ्या छोट्याला ( वय वर्ष ७ - इयत्ता दुसरी ) वाचून दखवला.. त्याला खूप वेड आहे झेंड्यांच.. आता तो आतुरतेने वाट बघतोय पुढच्या भागाची.

हा मिशीगनचा झेंडा

भोचक's picture

19 May 2009 - 6:05 pm | भोचक

बिपिनदा. लेख अतिशय माहितीपूर्ण. आवडला. ब्रिटन, अमेरिकेच्या झेंड्याचे विश्लेषण पहिल्यांदाच वाचनात आले. ऑस्ट्रियाच्या ध्वजामागची कथा छानच.

अवांतर- आमच्या नाशकात एक म्हण आहे. डिझेड पी अर्थात दुसर्‍याच्या झेंड्यावर पंढरपूर. (अर्थ- आयत्या पिठावर रेघोट्या)

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

स्वप्नयोगी's picture

19 May 2009 - 6:46 pm | स्वप्नयोगी

लेख खरंच माहितीपूर्ण.
असं वाटतं की छोटा आहे.
म्हणजे संपूच नये असं वाटतं.
सुरेख माहीतीसाठी धन्यवाद.

पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.

संदीप चित्रे's picture

19 May 2009 - 7:10 pm | संदीप चित्रे

खूप आठवणी जाग्या झाल्या...
नकाशा काढणे हा प्रकार कधी फारसा झेपला नाही पण शाळेत रिकाम्या तासाला (किंवा एखादा तास चालू असतानाही ;) ) नकाशातला देश शोधायची मजा असायची.

प्रदीप's picture

19 May 2009 - 8:12 pm | प्रदीप

एका वेगळ्याच विषयावरील माहितीपूर्ण लेख आवडला. विशेषतः ऑस्ट्रियाच्या ध्वजामागील कहाणी आवडली.

ध्वजाचे चित्र नागरिकांना सहजपणे काढता यावे, असे मलातरी वाटते. पण श्रीलंकेचा ध्वज तेथील नागरिक कसा काढणार बुवा?

ह्या लेखाचे पुढील भाग येऊ देत.

रामदास's picture

19 May 2009 - 7:55 pm | रामदास

शिप ब्रेकींग करताना खूपसे झेंडे ध्वज मिळायचे.ब्रिजरूम मध्ये पिजन होल असलेलं एक कपाट असायचं त्यात एकेका देशाचे झेंडे ठेवलेले असायचे.रुमानीयाच्या एका जहाजाचे ब्रेकींग करताना एक पंधरा वीस फूट लांबीचा झेंडा मिळाला होता. माझ्या एका स्नेह्यांनी तो गणपतीच्या सजावटीत भिंत झाकण्यासाठी वापरला होता. ह्या झेंड्यांच्या दोरीला दोन्ही टोकांना पितळेचे सुंदर हूक असायचे.ह्या दोर्‍या नॉयलॉनच्या असायच्या.एका झेंड्यासोबत दहा विस फूट दोरी मिळायची.बरेचसे झेंडे ताज हॉटेलच्या मागे मोगल आर्टस नावाचं एक मरीन अँटीकचे दुकान आहे त्यात विकले जायचे.जे विकले जायचे नाहीत त्याची पायपुसणी व्हायची.
आज तुमचा लेख वाचला आणि आठवणींना उजाळा मिळाला.विषयांतर झाले .
लेख सुंदरच आहे. अभिनंदन.

रामदास's picture

19 May 2009 - 7:56 pm | रामदास

कंपूबाजांचा खेकड्यासहीत असलेला ध्वजही मला आवडतो.

सुनील's picture

19 May 2009 - 8:16 pm | सुनील

उत्तम माहिती. ऑस्ट्रियाच्या ध्वजाची कहाणी रोमांचकारक. युनियन जॅक हा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या ध्वजावर आहे हे खरेच परंतु, एकेकाळी कॅनडाच्या ध्वजावरदेखिल तो होता. नंतर कॅनडाने आपला ध्वज बदलला.

काहीही असो, तिरंगा सर्वाधिक डौलदार आहे, हे खरेच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धनंजय's picture

19 May 2009 - 8:31 pm | धनंजय

सचित्र माहिती असलेला लेख आवडला.

हल्लीच श्रीलंकेचा झेंडा नीट बघायची वेळ वेगवेगळ्या बातम्यांत आली. तलवार धरलेला सिंह आहे.

टिउ's picture

19 May 2009 - 11:12 pm | टिउ

काय गोड दिसतोय तो सिंह...तलवारीऐवजी आईसक्रिमचा कोन किंवा फुगा असता तर जास्त भारी वाटलं असतं!

भाग्यश्री's picture

20 May 2009 - 10:26 am | भाग्यश्री
चतुरंग's picture

19 May 2009 - 10:17 pm | चतुरंग

ऑस्ट्रियन ध्वजामागची कहाणी रोमांचक!
डौलात फडकणारा भगवा आणि आपला तिरंगा हे दोन्हीही ध्वज मला अभिमानाने मिरवावेसे वाटतात.
(माझ्या ऑफिसमधे माझ्या केबिनबाहेर मी तिरंगा लावून ठेवलेला आहे!)
पूर्वी युद्धात अग्रभागी ध्वज घेतेलेली हत्तीण असे तिला 'ढालगज' असे म्हणत!
(अवांतर - ह्यावरुनच सतत पुढे पुढे करणार्‍या बाईला 'ढालगज भवानी' असे म्हणतात! ;))

चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 May 2009 - 10:32 pm | डॉ.प्रसाद दाढे

मस्त लेख! आवडला..
बाकी हिटलरचे स्वस्तिक उलटे नव्हते बरं का..
आपला,
झन्डूबाम झेन्डे

अवांतर: लहानपणीच्या समूहगानांवर एक स्वतंत्र लेखमाला व्हायला हवी.

टिउ's picture

19 May 2009 - 11:14 pm | टिउ

पण अजुन येउ द्या...

ब्रिटिश टिंग्या's picture

20 May 2009 - 12:25 am | ब्रिटिश टिंग्या

बिपिनकाका, मस्त लेख!

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!

विनायक प्रभू's picture

20 May 2009 - 10:31 am | विनायक प्रभू

लय भारी

वेताळ's picture

20 May 2009 - 11:27 am | वेताळ

माहितीपुर्ण लेख...अजुन खुप देश बाकी आहेत तेव्हा इतर झेंड्याची माहिती पण येवु दे. माहिती अजुन जरा विस्तारपुर्वक येवु दे.खुप सुदंर व संग्राह्य लेख.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

जयवी's picture

20 May 2009 - 1:23 pm | जयवी

फारच सुरेख लेख !! सौदी अरेबिया, ऑस्ट्रियाच्या झेंड्यांची गोष्ट मस्तच !!
और भी आने दो :)