रविवारचा दिवस हा साहित्यसृष्टीतीलच काही काळया दिवसांपैकी एक होता. का ते तुम्ही जाणताच! ज्येष्ठ साहित्यीक, वक्ते, राम शेवाळकर काल अनंतात विलीन झाले. माझे भाग्य की, दोन वर्षापूर्वी आणि 2-3 महिन्यापुर्वी असे दोनदा या सारस्वातातीलच हि-याचे शब्द मला कानात साठवण्याचा योग आला. मला काल का कुणास ठाऊक, अचानक मनात आलं की काही दिवसांनी, वर्षांनी मी माझ्या मित्रांना जस हे सांगीन की, ''मी प्रभाकर पणशीकरांनी स्वत: केलेलं 'तो मी नव्हेच' बघितलाय'' ,''शिवाजीराव भोसल्यांना ऐकताना प्रत्यक्ष पाहिलय'' तसं हेही सांगीन की,''मी राम शेवाळकरांना प्रत्यक्ष ऐकलयं'' खरचं, ती व्यक्ती फार मोठी होती. खरतरं राम शेवाळकर हे नाव पूर्वी फक्त आजोबांकडून एक-दोनदा ऐकलं होत. पण, साधारण 2 वर्षापूर्वी पूण्यात 25 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आणि त्या भाग्यवंतांच्यात मी होतो. त्यावेळी साधारण दीड-दोन तास त्यांचे भाषण ऐकायला मिळाले, आणि त्या भाषणाने मला वेड लावले. मग काय, कोल्हापूरात आल्यावर माझ्या ज्येष्ठ शिक्षकाकडून जे कोल्हापूरातील एका नामवंत व्याख्यानमालेचे आयोजक आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या सर्व ध्वनिफिती दोन-दोनदा ऐकल्या. तेंव्हापासून मी काही प्रमाणात त्यांचा भक्त झालो. त्यानंतर, अगदी मागल्या आठवडयापर्र्यंत विविध लेखातून विशेषत: 'लोकसत्ता' आणि ''म.टा.'' मधून त्यांची लेखणी अनुभवायला मिळाली. एका सामान्य वाचकाला जो वाचनानंद मिळायला हवा असतो तो हाच!
खरं तरं, ही व्यक्ती Undefined आहे. माझयासारख्या तरूणाला तर त्या व्यक्तीमत्वाचा एक कण ही समजणार नाही. खरं तर, अनवधानाने म्हणा वा काहीही असो, पण त्यांची पुस्तके मी वाचू शकलो नाही पण, काल-आज जे वाचलं, ऐकलं, पाहिलं त्यामुळे त्या सागरासारख्या व्यक्तिमत्वाबद्दल नितांत माहिती मिळाली. ते उत्तम वक्ते होते, हे तर आख्खा महाराष्ट्र जाणतो त्यांच लिखाणही उत्तम होतं. विशेष म्हणजे प्रासंगिक लेखणातूनदेखील ते असा काही तत्वज्ञानाचा शिडकावा करीत, की बास मन प्रसन्न व्हावं. पण, त्याना एवढयाशा मर्यादेत बांधणे योग्य होणार नाही. ते श्रेष्ठ होते, ते त्यांच्या प्रचंड अभ्यासामुळे, अध्यात्म ते सामाजिकप्रश्न असा विस्तृत व्यासंग फार कमी लोकाजवळ आढळतो. दुसरं म्हणजे, त्यांची झोकून द्यायची वृत्ती. जी आपल्याला विनोबा भावेंबरोबरच्या त्यांच्या कामातून दिसते. आणि, तिसरा गुण म्हणजे स्वच्छ, सत्शील व्यक्तिमत्व. साहित्य संमेलनाच्या एवढया गदारोळात एकमुखाने अध्यक्ष म्हणून वावरणे व त्याने नव्या साहित्यकांना चालना देणे ही काय खायची गोष्ट नव्हे. आणि, म्हणूनच कदाचित ते आपला स्पष्टवक्तेपणा कायम ठेवून यावेळच्या साहित्यसंमेलनावर आपले मत व्यक्त करू शकले. शेवाळकर हे एकमेव लेखक ,ज्यांनी परिणामांची तमा न बाळगता आपले मत व्यक्त केले. साहित्य विश्वात सध्यातरी त्यांचाच शब्द अंतिम मानला जात असे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
खरेतरं, गेल्या दोन-तीन वर्षात मराठी सारस्वताची, संस्कृतीची मोठी हानी झाली. साधारण वर्षापूर्वी विजय तेंडुलकर अनंतात विलीन झाले. त्यांच्या रूपाने एक उत्तम नाटककार, लेखक, समाजाला शिकविणारा आणि गरज पडल्यास चौकटी बदलणारा लेखक आपल्यातून निघून गेला. त्यानंतर प्रा. लक्ष्मणराव देशपांडे गेले. एक उत्तम कलाकार, लेखक, मराठी संस्कृती सातासमुद्रापार नेणारी व्यक्ती हारपली. आणि, आता 'राम शेवाळकर', सरस्वती ज्यांच्या मुखात वसते अशी आसामी . या तिघात साम्य म्हणजे ही तिघे उत्तम माणसे होती. जीवनाचा आनंद घेणारी माणसे. याशिवाय अनेक लहान मोठे धक्के बसले. या धक्यांचा सारस्वतावर, समाजमनावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे, समाजात जी प्रवाहिता आलेली असते, ती थांबुन जाते .विशेष म्हणजे हे तिघेही आजदेखील कार्यरत होते. त्यामुळे, त्यांचे कार्य तर थांबतेच शिवाय, त्यंच्याशी निगडीत इतर क्षेत्रांनाही मर्यादा येते. एकूण काय तर ही हानी न भरून येणारी असते. त्यातही, त्या व्यक्तीचा आवाका जितका जास्त, तितकी हानी मोठी. थोडक्यात काय, तर गेल्या दोन-तीन वर्षात कलाक्षेत्राला बरेच धक्के बसले आहेत
आज जरा साकल्याने विचार केला तर असे दिसते की, आज जी सारस्वतातील पहिली फळी आहे ती फारच तोकडी झाली आहे. लेखन क्षेत्रात पु.ल. नाहीत, तेंडुलकर नाहीत, व.पु. नाहीत, आता मधु मंगेश कर्णीक आहेत, बाबा कदम आहेत, पण सध्या त्यांच्या लेखण्या म्यान आहेत. त्यामुळे अनुवादीत पुस्तकांचाच मारा मोठया प्रमाणावर होत आहेत. ललित लेखकांची संख्याही रोडावली आहे. मंगला गोडबोले, शिरीष कणेकर, प्रविण दवणे, संजय जोशी असे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकच सतत ललित लेखन करीत आहेत. बाकीचे लेखन हे विनोदी प्रकारात मोडत आहेत. कविता क्षेत्र जरा समृध्द आहे. मंगेश पाडगांवकर, ग्रेस नंतर गॅप बरीच आहे. पण, प्रविण दवणे, संदीप खरे यांच्यामुळे कवितेचे भविष्य उज्वल आहे. पण, सर्वात कमजोर क्षेत्र आहे ते वक्त्यांचे शिवाजीराव भोसले सोडल्यास वक्त्यांचे क्षेत्र तसे रिकामेच आहे. विविध व्याख्यानमाला ही बंद पडत आहेत.
खरी गोची अशी झाली आहे की, लेखक, कवी आहेत पण त्यांनी स्वत:ला विशिष्ट भागापुरते, लेखन प्रकारापुरते मर्यादित करून घेतले आहे. राजन गवस, बाबा भांड, सतिश काळसेकर, अजीम नवाज राही, ही काही उदाहरणे आहेत. त्यामुळे साहित्य क्षेत्र हे प्रवाही न होता ते बेट स्वरूप आहे. ज्ञानेश्वर मुळे, विश्वास पाटील उत्तम लिहीत आहेत. मात्र, ते पूर्ण वेळ लेखक नाहीत. त्यामुळे त्यांचे लेखन मर्यादित होते. माधव आपटे, अच्युत गोडबोले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम लिहीतात. कवींचे देखील तसेच होते, परवा स्नेहसंमेलनाला श्रेणी एक कवी आले होते. कोल्हापूरातल्या कोणाला त्यांचे नाव देखील माहित नव्हते. आणि त्यांची माहिती असणारा लेखक मी मुंबईच्या एका वृत्तपत्रात वाचला. ही एवढी तफावत का? तेच वक्त्यांचे बाबतीत. अविनाश धर्माधिकारी, आ. हं. साळुंखे, निरंजन खिचडी, नितीन बाणुगडे, सुरेश शिंदे, असे अनेक वक्ते आहेत पण त्यांची क्षेत्रे मर्यादित आहेत. यापैकी, कोणाचेही व्याख्यानदौरे झाल्याचे माझ्या स्मरणात नाही. वृत्तपत्राच्या संपादकांना काही व्याख्याते म्हणता येत नाही. या सर्वांमुळे सांस्कृतीक क्षेत्र विस्कळीत झालेले आहे. आणि त्यामुळे या क्षेत्राचा -हास होत चालला आहे. साहित्य संमेलनातील गोंधळ त्याचेच प्रतीक मानायचे का?
साहजिकच, ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. लेखकांनी आपल्या कोषातून बाहेर पडणे गरजेचे आहे. नंतर वाचकांनी आपल्या वाचनात विविध प्रकार हाताळणे गरजेचे आहे. कवितेबाबत बोलायचे तर ती विविधांगी असते. त्यामुळे त्यासाठी काव्य वाचनाचे कार्यक्रम करणे हा एकमेव पर्याय दिसतो. आणि हो, महाजालीय लेखकही यात भर घालू शकतात. कितीही झाले तरी महाजालीय वाचकसंख्या मर्यादित आहे. तेंव्हा या लेखकांनी आपले लेखन विविध दैनिके साप्ताहिके, दिवाळी अंक यामध्ये दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
थोडक्यात काय, तर नव्या युगात जेंव्हा महाराष्ट्र 50 वर्षाचा होणार आहे तेंव्हा मराठी संस्कृती रक्षणासाठी, संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आणि तसे पाहायला गेले तर हीच त्या सरस्वती उपसकांना खरी श्रध्दांजली ठरेल.
(सुचना- या लेखातील विविध लेखकांची नावे मी माझ्या माहितीप्रमाणे लिहिली आहेत.एखादे नाव राहिले असल्यास ,वा चुकले असल्यास माफ करावे ही विनंती)
प्रतिक्रिया
5 May 2009 - 2:29 pm | अमोल केळकर
माझीही विनम्र श्रध्दांजली !!
अवांतर : बर्याच दिवसानंतर विनायक यांच्याकडुन लेखन पहायला मिळाले
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
5 May 2009 - 2:44 pm | अवलिया
शेवाळकरांना माझीही विनम्र श्रध्दांजली !!
बाकी लेख चांगला लिहिला आहेस रे विनायका!
--अवलिया
5 May 2009 - 2:53 pm | अनंता
शेवाळकरांना माझीही विनम्र श्रध्दांजली !!
6 May 2009 - 3:35 am | योगी९००
शेवाळकरांना माझीही विनम्र श्रध्दांजली !!
थोडक्यात काय, तर नव्या युगात जेंव्हा महाराष्ट्र 50 वर्षाचा होणार आहे तेंव्हा मराठी संस्कृती रक्षणासाठी, संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आणि तसे पाहायला गेले तर हीच त्या सरस्वती उपसकांना खरी श्रध्दांजली ठरेल.
एकदम बरोबर..!!! उत्तम लेख..!!
खादाडमाऊ
6 May 2009 - 8:26 am | प्राजु
असेच म्हणते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 May 2009 - 10:46 am | विनायक पाचलग
प्रतिसादाबद्दल आभार
फक्त श्रद्धांजली देण्यापेक्षा काहीतरी वेगळे लिहावे म्हणून हा प्रयत्न
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......
विनायक पाचलग
7 May 2009 - 12:39 pm | भाग्यश्री
लेख आवडला! बरीच नावं नव्याने कळली.. :)
www.bhagyashree.co.cc
7 May 2009 - 12:46 pm | सुमीत भातखंडे
चांगला झालाय लेख.
शेवाळकरांना माझीही विनम्र आदरांजली.