सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
19 Apr 2009 - 8:47 pm

सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण

दोन - चार दिवसांपुर्वीच 'सनई-चौघडे' हा चित्रपट पाहिला. खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले. 'कांदेपोहे' या नावाने मी हा चित्रपट पाहण्या अगोदर एक लेख येथे लिहिला होता. या चित्रपटाला इतके महत्व देणे अवास्तव नव्हते हे या चित्रपटाने सप्रमाण सिध्द केले. उत्कृष्ट संवाद, उत्तम अभिनय या सर्वांनी हा चित्रपट उत्तम झाला आहे. मराठी चित्रपटातील संवाद प्रभाव पाडत नाही हा समज ''सगळे पुरूष सारखे असतात, पण एकसारखे नसतात'' अशा संवादानीं खोटा ठरवलेला आहे. उत्कृष्ट संगीत, मांडणी यामुळे गेल्या वर्षातील काही चांगल्या चित्रपटांमध्ये याचा समावेश होईल हे नक्की.
पण, विशेष अभिनंदन करावेसे वाटते ते मुक्ता आर्ट्सचे .आपल्या पहिल्याच प्रयत्नात 'कुमारी माता' हा नवा, वेगळा आणि विद्रोही विषय हाताळणे हे सोपे काम नाही. त्यामुळे, मध्यमवर्गीय प्रेक्षकांची गोची झाली. चित्रपट चांगला आहे, पण तो आपल्या समजांना, कल्पनांना सरळ- सरळ उभा छेद देतो. त्यामुळे उघडपणे त्याला चांगले म्हणता येत नाही आणि उत्क्रुष्ठ मांडणीमुळे त्याला वाईटही म्हणवत नाही. खरेतर, हा चित्रपट मी माझ्या पालकांबरोबर बघितला. माझ्या अनेक मित्रांनीही तो सहकुटुंब पाहिला. कांदेपोहे या सोज्वळ नावासारखाच तो सोज्वळ असावा असे लोकांना वाटत होते. पण ''कुमारी माता'' हा विषय आणि काही सर्वसामान्य जीवनात निषिध्द असणा-या शब्दांचा वापर यामुळे त्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार खावा लागला. खरे तर असे विषय आल्यावर घरातील ज्येष्ठ लोक तो चित्रपट बंद करून टाकतात (इथे सातच्या आत घरात या चित्रपटाचे उदाहरण देता येईल) पण कांदेपाहेच्यावेळी तसे घडत नाही. आणि हेच या चित्रपटाचे यश आहे. अनेक पालक आणि त्यांची नवतरूण मुले यांच्यात या विषयावर अव्यक्त संवाद साधायचे काम हा चित्रपट करतो त्याला तोड नाही.
हे झाले चित्रपटाबद्दल, पण खरा मुद्दा वेगळाच आहे. पहिल्यांदाच, एका मराठी चित्रपटाने समाजाला, संस्कृतीला खुले आव्हान दिले. सहसा, समाज काही अलिखीत नियमांच्या आधारे चालू असतो. काही वेळेला त्यात त्रुटी आढळतात. त्या नियमांचे अवडंबर होते. काही नियम वापरता येत नाहीत अशी स्थिती येते. या स्थितींवर भाष्य करण्याचा प्रयत्न अनेक चित्रपट करतात. खरी रचना, खरा विचार काय आहे, असायला हवा ते सांगायचा प्रयत्न करतात. उदा. द्यायचे झाले तर गांधींचे विचार लोकांना माहित आहेत, पण ते त्यांच्या भाषेत सांगितल्यावर चुकीचे, जुनाट वाटतात. पण, 'लगे रहो मुन्नाभाई' सारखा चित्रपट ते विचार पटतील, रूचतील असे सांगतो आणि गांधीगिरी या नावावर जे काही चालायचे यावर बोट ठेवतो. 'सनई चौघडे' सुध्दा असाच बोट ठेवायचे काम करतो.
पण या दोघांत एक वेगळा आणि महत्त्वाचा फरक आहे. सूक्ष्म विचार केल्यावर असे समजते की, 'लगे रहो' सारखे चित्रपट झालेल्या चुकांवर बोट ठेवतात. म्हणजे काय, समाजात गांधीगिरी या बेसवर काही व्यक्ती जगत होत्या. त्यावर जो डोलारा उभा राहिला, त्यातील चुका तो एक प्रकारे दाखवतो.इथे ते गांधेगीरीवर बोट ठेवत नव्हते. पण 'सनई चौघडे' या बेसवरच हल्ला करतो. लग्नसंस्था, त्यातले दोष वेगवेगळया प्रमाणे सांगितले गेले. पण 'लग्नसंस्था म्हणजे काय?' या बेसीक व्याख्येवरच जेव्हा प्रश्न विचारले जातात. तेव्हा तो प्रयत्न स्पृहनीय असतो. या चित्रपटातून 'कुमारी माता' हा विषय तर हाताळला गेला आहेच. पण, विविध प्रसंगातून 'लग्न, लग्न म्हणजे असते तरी काय?' असा प्रश्न विचारला गेला आहे. जे महत्त्वाचे आहे.
हा चित्रपट पाहिल्यावर मला एका व्यक्तीची लगेच आठवण झाली. शाम मनोहर त्यांचं नाव. 5 फुटी व्यक्तीमत्त्व; पण त्यांचे लिखाणही असेच असते. म्हणूनच त्यांना 'डोक्याला त्रास देणारा लेखक', असे संबोधले जाते. ते समाजाचा, माणसांचा उफराटा विचार करतात. उदाहरण द्यायचे झाले तर एक काम करायला आम्ही एक मशीन तयार केले आहे. ते जेंव्हा लोकांना दाखविले जाते तेंव्हा काही लोक त्याचे गुणगान गातात तर काही दोष काढतात पण हे मात्र ''या कामाला हेच मशीन का?'' असा सवाल करतात? मग ते मशीन प्रुव्हन असले तरीही. असे झाले की मग अनेक प्रश्न तयार होतात. साहजिकच त्याचे दोन परिणाम होतात. पहिला म्हणजे त्या लिखाणाला एकटे पाडणे तो प्रश्न दाबुन टाकणे आणि दुसरा मार्ग म्हणजे त्यावर सांगोपांग विचार करणे यातला पहिला मार्ग चुकीचा तर दुसरा धोक्याचा असतो. पण यातला एकतरी मार्ग पत्करावाच लागतो. निगडीत समाजघटक कोणता मार्ग निवडतात यावर त्यांची प्रगती अवलंबून असते.
साधारणत: व्यक्ती, त्याची अभिव्यक्ती, आचार, विचार यातूनच सामाजिक चौकट निर्माण होते. ती वेळोवेळी दुरूस्त करायचा त्याला चांगले रूप द्यायचा प्रयत्न खूप लोक करतात. पण सनई चौघडे सारखा चित्रपट किंवा शाम मनोहरासारख्यांचे लिखाण ती चौकटच मोडतात. नविन चौकट निर्माण करतात तेंव्हा साहजिकच काही लोक चौकटीबाहेर फेकले जातात तर काही नव्याने सामावले जातात आणि एक योग्य सामाजिक अभिसरण घडून येते.
हे सगळे लिहायचे कारण इतकेच की, आज असे प्रश्न विचारण-यांची समाजाला गरज आहे. खरे तर पृथ्वीवर राहणारी सगळी माणसे एकसारखीच म्हणजे प्रत्येकाला दोन पाय, दोन हात, डोळे, कान आणि मेंदू असतो, पण तरीसुध्दा प्रत्येक ठिकाणी ही चौकट मात्र वेगळी असते. एखाद्या संस्कृतीत जे योग्य मानले जाते अगदी तेच संस्कृतीत मात्र निषीध्द मानले जाते. कदाचित त्यावेळी त्याठिकाणी ते योग्य असेलही पण काळ जसाजसा पुढे जातो तशातशा त्या चौकटी एकमेकांत गुंतत जातात. आपण ज्या बेसीक्सवर जगतो ते योग्य आहे की नाही हेच कळत नाही. मग काही छोटया मोठया प्रश्नातून हे मोठे प्रश्न वारंवार पुढे येत राहतात. आणि समाज द्विधा अवस्थेत सापडतो. अशा वेळी या चौकटींची पुर्नबांधणी करणे गरजेचे असते. आणि त्यासाठी हे कलाक्षेत्र कामास येते.
या सर्वातला महत्वाचा घटक म्हणजे आपण सारे. या प्रश्नांना आपण कसे रिऍक्ट होतो ते महत्वाचे असते. आमच्या देवल क्लबने जेंव्हा शाम मनोहरांचाच ''अंधारात मठ्ठ काळा बैल'' हा दीर्घांक सादर केला. तेंव्हा असेच काहीसे घडले. तो दीर्घांक पाहिल्यामुळे एका उमेदवाराने काही अयोग्य कामे करण्याचे टाळले आणि सहज विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकणारा तो पडला. सनई चौघडेच्या वेळी माझया काही मित्रांनी मला सांगितले की, घरी आल्यावर देखील एक दोन तास आमच्या पालकांशी संवादच खुंटला होता. हे दोन अनुभव ही गोष्ट सांगतात की आपण अशा अनुभवांना पचवू शकत नाही. शाम मनोहरांना इतक्या उशीरा साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो हे त्याचेच द्योतक आहे.
पण मला असे वाटते की आपण त्या प्रश्नांना स्विकारणे गरजेचे आहे. कारण अशा काही अवघड जागा, गोष्टी असतात की त्या आपण बोलू शकत नाही. पण ते व्यक्त करायचे काम हे माणसे चोख करतात. तेंव्हा आपण निदान त्याला प्रतिसाद तरी दिला पाहिजे. कला हे अशा बदलांचे माध्यम झाले पाहिजे. त्याचे काय आहे की जग बदलत असल्यामुळे आपल्यालाही बदलावे लागणार हे नक्की. त्यामुळे अशा कला जेंव्हा आपल्याला त्या बदलांचे आमंत्रण देतात तेंव्हा आपण ते नाकारू नये. पटले नाही तर स्विकारू नका पण विचार मात्र जरूर करा. बदल घडेल की नाही हा भाग अलहिदा पण त्या कलेचे तरी सार्थक होईल.
बस्स इतकेच!....
विनायक पाचलग

तळटीप-मिपावरील वावर बंद करायचा निर्णय घेतल्यावर काही जणानी महिन्याला एक दोन लेख टाक असे सांगेतले होते,आणि आज वेळही होता म्हणुन हे लिखाण केले.

कलाधोरणमांडणीसंस्कृतीवावरप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

19 Apr 2009 - 9:26 pm | मराठमोळा

सनई-चौघडे हा चित्रपट अद्याप मी पाहिलेला नाही पण तुम्हाला जे म्हणायचे आहे ते लेखामधुन कळत आहे.
आपण ज्या बेसीक्सवर जगतो ते योग्य आहे की नाही हेच कळत नाही. मग काही छोटया मोठया प्रश्नातून हे मोठे प्रश्न वारंवार पुढे येत राहतात. आणि समाज द्विधा अवस्थेत सापडतो. अशा वेळी या चौकटींची पुर्नबांधणी करणे गरजेचे असते. आणि त्यासाठी हे कलाक्षेत्र कामास येते.
समाजाच्या चौकटी बदलण्यास कलाक्षेत्र किती कामास येते याबद्दल मी जरा साशंक आहे. असो..
माझ्या मते कोणत्याही समाजाची, देशाची अथवा ठराविक भागाची संस्कृती ही तिथल्या भौगोलिक जडण्-घडण, खाणं-पिणं आणी इतिहास यावर अवलंबुन असते. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा फार अभिमान असतो आणी तिच्यात बदल करणे फारसे कुणाला आवडत नाही. उदा. तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटते ती तुमच्या पालकांना पुर्णपणे अयोग्य वाटते आणी तुमच्या मुलांना तुमची तत्वे कदाचित पटणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी की माझी संस्कृतीच सर्वात चांगली आहे आणी दुसर्‍याची वाईट (Ethnocentric) अशी एक भावना प्रत्येकाच्या मनात असते. (उदा. च्यायला साऊथ ईंडियाचे लोकं काय मुर्ख आहेत, दोन्ही वेळेस भातच खातात असे आपल्याला वाटणे, तसेच रस्त्यावर चुंबन घेणे आपल्याकडे योग्य समजले जात नाही तर काही पाश्चात्य संस्कृतीत त्यास कोणताही आक्षेप नाही). तसेच संस्कृतीच्या बांधणी मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत की नाहीत हे तपासले पाहिजे. (बर्‍याचशा गोष्टी लोप पावलेल्या आहेत.)
आजकाल जागतिकिकरणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अवलंबन केले जाते. या गोष्टी चांगल्या किवा वाईट ते काळच ठरवेल.
पण काही गोष्टी आपल्या हातात आहेत हे नक्कीच खरे आहे. जसे एखाद्या पाश्चात्य संस्कृतीचा भाग आपलासा करताना तो आपणास योग्य तो फायदा देइल (दुसर्‍याना त्रास न होता) की नाही हे तपासायला पाहिजे. बदल हे होतात आणी होणारच पण ते आपण आत्मसात करायचे का नाही हे आपणच ठरवायचे असते. समाजाची सुरुवात आपल्यापसुनच होत असते.
उदा. ईंग्रजी भाषेत एक प्रकारचा सभ्यपणा आहे. जसे छोट्या चुकीवर सुद्धा खेद प्रकट करणे. दुसर्‍याची माफी/परवानगी मागणे. या गोष्टी मला आवडतात. (I am sorry, please, excuse me, thank you, pardon या शब्दांचा योग्य ठिकाणी आणी वारंवार वापर).

टीपः विषयांतर झाले असेल तर क्षमस्व.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!