चीनला जायचे तर सिंगापुरला लेकराला भेटुनच जावे असा विचार करुन आस्थापनेच्या पर्यटन संस्थेला सिंगापुर मार्गे प्रवासाची व्यवस्था करायला सांगितली तर त्यांनी नकारघंटा वाजवली. म्हणे सिंगापुर एअरलाईन्सने पर्यटन संस्थांना अडत देणे बंद केल्याने सर्व पर्यटन व्यावसायिक संस्थांचा सिंगापुर एअरलाईन्सवर सध्या बहिष्कार आहे. त्यांनी शिताफीने हॉंग कॉंग, कुआला लुंपुर, बॅंकॉक अशा तीन रुपरेषा आखुन दिल्या. पण जाणार तर पोराला भेटुनच जाऊ यावर मी ठाम होतो. मग मी सिंगापुर एअरलाईन्सच्या संस्थळावर गेलो आणि चार दोन वेळा मागे पुढे होता करता अखेर हव्या त्या तारखांची तिकिटे जमवली. आता एक गोची होती; आमच्या आस्थापनेचा नियम आहे की आस्थापनेने निश्चित केलेल्या पर्यटन संस्थे व्यतिरिक्त कुणीही अन्यत्र तिकिटे विकत घेऊ नयेत आणि या नियमाला बगल द्यायची असेल वित्त - लेखा वगैरे मंडळी काड्या करतात. मग अखेरचा मार्ग - व्यवस्थापकिय संचालकांची परवानगी. नेमके साहेब त्या दिवशी बाहेर होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या स्विय सहायिकेला लग्गा लावुन सकाळीच त्यांची भेट घेतली. ’हात्तीच्या, इतकेच ना? तुझे तिकिट काढ तुच आणि जा, कामाबरोबर मुलाची भेट होत असेल तर अवश्य जा, आल्यावर देयक माझ्याकडे पाठवुन दे" असे म्हणत त्यांनी परवानगी दिली. पण पुन्हा लोचा. मुंबई सिंगापुर तिकिटे सर्व तारखांसाठी उपलब्ध असली तरी सोमवारी सकाळी सिंगापुर - ग्वांग्ज्झौ चे उड्डाण ओसंडुन जात असल्याचे शुभवर्तमान समजले. आता एकच पर्याय होता, शनिवारी रात्री सिंगापुर आणि रविवारी सकाळी पुढे चीन; परतीच्या प्रवासात सुदैवाने हवी ती तिकिटे उपलब्ध होती म्हणजे येताना भेट नक्की.
तिकिटे काढली खरी, पण रविवारी दुपारी एक नाही वाजला तर चीनला पोचुन करणार काय? सोमवारी सकाळी कामाला सुरुवात करता येईल हे सोयीचे असले तरी रविवारी काय? ताबडतोब चिंग वनला निरोप धाडला, ती रविवारी इथेच आहे का आणि तिला वेळ आहे का? उलट टपाली निरोप आला की ती इथेच आहे आणि तिला दुसरे काही लष्टक नसल्याने ती मोकळीच आहे. तिने आग्रहच केला की अनायसे तिचे आई बाबा सध्या इथेच आहे तर त्यांची माझी गाठभेट होईल. तिने तिच्या आईचा आग्रहाचा निरोप दिला की सामान हॉटेलात टाक आणि घरीच ये, च्याव ज्झ खायला. च्याव ज्झ? माझ्या प्रश्नाला तिने उत्तर दिले, ’ते इथे आल्यावर समजेल, आत्ता नाही सांगत’ बरे झाले, रविवारी जरा वेळ काढुन मित्रांच्यात जायचे तर नेमका रविवार एकट्याने पकायची वेळ आली होती, ते टळले. शिवाय चीनमध्ये आत्तापर्यंत अनेक गावच्या अनेक हॉटेलात अनेक प्रकारचे जेवण झाले असले तरी अजुन चीनी घरात घरगुती जेवण जेवायचा योग आला नव्हता. शेवटी घरचे जेवण वेगळे. आपल्या कडे नाही का, मराठी पदार्थ देणारी उपाहारगृहे असली तरी बाहेरचे थालिपिठ वेगळे, घरच्या थालिपीठाची चव त्याला नाही. चिंग वन मला घ्यायला थेट विमानतळावरच येणार होती, पण मला तिथुन घेऊन इथे फोशानमध्ये हॉटेलवर उतरवण्याची व्यवस्था झाल्याचे मी तिला सांगितले. रविवारचा आराम सोडुन तिला उगाच तीन तासाचा प्रवास कशाला? मी हॉटेलवर आलो, की कळवतो मग आपण भेटु असे मी सुचवले.
दुपारी हॉटेलवर पोचलो. मस्त गरमागरम चहा मारु, आंघोळ करु आणि मग चिंग वनला बोलावु असा विचार केला, मात्र चहा घेता घेताच तिची साद आली ’कुठे आहेस?’ ’अठ्ठेचाळीसाच्या मजल्यावर’ मी तिला गमतीने उत्तरलो. ’मग लगेच सावरले, 'हन आन र्री स' - म्हणजे स्विस्सोटेल. चीनमच्ये हॉटेलचे नाव चीनी भाषेत वेगळे असते आणि अनेक चीन्यांना मूळ इंग्रजी नाव माहित नसते हा शोध मागे मला चिंग वनमुळेच लागला होता. तेव्हा मी फोशानला न येता बाईयुन विमानतळावरील नोवोटेल मध्ये मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच्या उड्डाणाने परस्परच चावझ्झौ ला जाणार होतो. मग संध्याकाळी ती विमानतळावर आली आणि तिने मला दूरधवनीवरुन विचारले की या हॉटेलचे चीनी नाव काय? कारण तिने विमानतळावर दोघा तिघांना विचारले तर हे हॉटेल कुणालाच माहित नव्हते! मी चक्रावलो, इतके मोठे अगदी समोर असलेले हॉटेल कुणालाच माहित नसावे? मग मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता शोध लागला की नोवोटेल ला चीनी भाषेत 'लु फु ते' म्हणतात. हे नविनच होते. भाषा कुठलीही असली तरी नाव कसे बदलेले? ताज ला एखादा भैया ताजवा म्हणेल तर एखादा मद्रदेशिय थाज म्हणेल, बस इतकेच. पण चीन मध्ये स्थानिक भाषेत हॉटेलचे नाव वेगळे असते हे ऐकुन मी चकित झालो होतो. तेव्हापासुन कुठल्याही हॉटेलात उतरताना त्याचे स्थानिक नाव आवर्जुन विचारुन ठेवतो.
अर्ध्या तासातच स्वागतकक्षातुन चिंग वन आली असल्याचा निरोप आला आणि मी खाली उतरलो. साधारणत: चिंग वन नववर्ष साजरे करायला सुट्टीत तिच्या हुबै प्रांतात जाते पण यंदा तिचे आई बाबाच इथे राहायला आले होते. त्यांची सचित्र ओळख असली तरी तरी प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता. मीही त्यांना भेटायला उत्सुक होते. बरेच दिवसांनी भेट होत असल्याने आम्ही निवांतपणे गप्पा मारत बसलो. अचानक तिच्या लक्षात आले की घरी आई बाबा वाट पाहत असतील. आज काही नेहेमी सारखी गप्पा मारुन व जेवण करुन ती तिच्या घरी आणि मी माझ्या खोलिवर असा प्रकार नव्हता. आम्ही तिच्या घरी पोचलो. तिच्या आई बाबांनी आनंदाने स्वागत केले.
नि हाव म्हणत नमस्कार चमत्कार वगैरे होऊन आम्ही गप्पा मारु लागलो. खरे तर त्यांना इंग्रजी अजिबात येत नाही, पण दुभाषाचे काम करायला चिंग वन होती आणि त्याही पलिकडे सांगायचे तर दोन माणसांना मनापासुन बोलायची इच्छा असेल तर भाषेचा अडसर येत नाही. लवकरचे ते माझे शाग शेंग काका आणि वु झन छिन काकु झाले. मला चिंग वनने सांगितले की छिन या शब्दाचा एक अर्थ पियानो असा होतो. अरे वा! चिंग वन म्हणजे वाऱ्याच्या सळसळीचा नाजुक आवाज. एकंदरीत घराणे सुरेल असावे. मी इंदु म्हणजे नक्की कुठला? गाव कुठले मग मुंबई भारतात कुठल्या दिशेला वगैरे चौकशा करता करता कौटुंबिक गप्पांना सुरुवात झाली. शाग शेंग काकांनी आपल्या नातवाची म्हणजे चिंग वनच्या मोठ्या बहिणीच्या मुलाची - युआनची छबी आणुन दाखवली. आजी आजोबा आपल्या नातवाचे कौतुक करण्यात रंगुन गेले. एव्हाना सहा वाजुन गेले होते. काकु तुम्ही बसा असे म्हणत स्वयंपाकघराच्या दिशेने निघाल्या. पाठोपाठ त्यांच्या मदतीला काकाही गेले. ते साध पण प्रसन्न घर आणि मनमोकळी माणसे मला खुप आवडली. बाहेर एकुण तयारी पाहताच मी चिंग वनला विचारले की बेत साधाच आहे ना, उगाच जास्त करत राहु नका. मी काय खाणार आहे मोठा? पुन्हा एकदा सुगंधी फुलांच्या चहाची फेरी झाली. मग आम्ही सध्याची व्यावसायिक परिस्थिती, बाजार, घटलेली निर्यात असे काही बोलत बसलो.
आतुन हाक आली, चला गप्पा पानावर होऊद्यात, जेवण गरम आहे तोवर पानावर बसा. टेबलावर चीनी मातीचे कुंडे, बशा मांडल्या होत्या. पटापट एकेक पदार्थ बाहेर आले. शाग शेंग काका चुरचुरणारा तवा घेऊन बाहेर येताच चिंग वनने तव्याकडे बोट दाखवित सांगितले की हेच ते च्याव ज्झ!
च्याव ज्झ म्हणजे मोदकासारख्या पाकळ्यांची कड अस्ललेया उकडीच्या करंज्या. माझ्यासाठी आज संपुर्ण फंग कुटुंबाचा शाकाहार होता. त्यामुळे सारणात कोबी व अन्य भाज्याच घातल्या होत्या, एरवी यात गोमांस वा डुकराचे मांस वापरतात. थोडक्यात हे डंपलिंग. च्याव ज्झ दोन प्रकारचे. उकडलेले आणि खमंग परतलेले. आज दोन्ही प्रकार होते.
चीनी जेवण म्हणजे निदान दक्षिण पूर्व चीनमध्ये जेवणात फारसे तिखट वा जळजळीत मसाले वापरत नाहीत. सर्व पदार्थ सौम्य. माशांच्या पदार्थातही रस्सा अगदी पाण्यासारखा पातळ आणि बराचसा पारदर्शक. मला जरा चमचमीत लागते हे चिंग वनला माहित होते. बाहेर जेवताना ती माझ्यासाठी लाज्या म्हणजे लाल मिरचीचा ताजा ओला ठेचा मागवायची. ते तिने छिन काकु सांगितले असावे, कारण काकुंनी च्याव ज्झ बरोबर एका वाडग्यात मस्त लाल मिरच्यांचा विनेगार व मसाला घालुन केलेला ओला ठेचा आणुन ठेवला, त्यात सोयाबिनचे कोवळे शिजवलेले दाणेही घात्ले होते. मला वऱ्हाडी ठेच्याची आठवण झाली. त्याला म्हणतात तौ पन च्यांग. या तौ पन च्यांगने जेवणाला चांगलीच झणझणीत चव आणली. बरोबरीला तु दो (परतेले उकडलेल्या बटाट्याचे काप), शि लान व्हा (किंचित तेल व हलकासा मसाला घालुन मध्यम शिजवलेली ब्रॉकोली), ह्ह लान दौ (वाफवुन तेल व मिठ लावलेल्या पापडीच्या शेंगा), छिन त्साई चाव-श्यांग कान (सेलेरी व के प्रकारच्या तोफुची परतेली भाजी) व शेवटी मी फान (गचका उकडलेला भात.
बहुधा काडीने खायला सोयीचा म्हणुन भात गचका करत असावेत). बेत तर मस्त जमला होता. मी आपला माझ्या मानाने खात होतो. पण मी काटा चमचा न मागता काड्यांनी खात होतो हे काका काकुंना एकदम आवडलेले दिसले. ते माझ्या जुजबी चीनी भाषेचे उगाच कौतुक करत होते, उच्चार चांगले जमतात म्हणाले. मला कुठे काय फार येतात, आपले किरकोळ काही शब्द, काही वाक्ये येतात इतकेच. आपले जेवण पाहुण्याला आवडेल का अशी शंका मनात असताना पाहुण्याने बशी साफ केली याचा त्यांना आनंद झाला. छिन काकुंचा आग्रह झाला की मी उजव्या हाताने काड्या उंचावत व डावा हात पोटावर फिरवत पाव ला असे म्हणायचो. पाव ला म्हणजे ’अगदी पोट तुडुंब भरले’ म्हणजे आपण भरुन पावलो म्हणतो तसे ते करुन पाव ला आणि मी खाऊन पाव ला.
जेवण झाले. आता जेवण झाल्यावर जवळच्या उद्यानात जरा शतपावली करु असे म्हणत सगळेच निघाले. मात्र निघण्यापूर्वी त्यांनी मला स्वहस्ते बनविलेले शुभेच्छापत्र दिले आणि मी अवाक झालो.
इतक्या मोठ्या शुभेच्छा मी यापूर्वी फक्त राजकारण्यांच्या शहर विद्रुप करणाऱ्या फलकांवरच पाहिल्या होत्या. त्यांचे आभार मानुन त्यांच्या पाया पडत मीही चिंग वन साठी नेलेले चिमुकले कानातले दिले. हा कार्यक्रम अगदी अचानक ठरल्याने मला काका काकुंसाठी काही नेले नाही याची रुखरुख लागली. निघताना काका काकुंनी आग्रहाने संगितले की यापुढे ते असताना जर मी फोशानला आलो तर जेवायला घरीच यायचे.
च्याव ज्झ हे एक निमित्त झालं, त्या निमित्ताने मला परक्या देशात घर मिळाल.
प्रतिक्रिया
15 Feb 2009 - 9:31 pm | विसोबा खेचर
च्याव ज्झ हे एक निमित्त झालं, त्या निमित्ताने मला परक्या देशात घर मिळाल.
सुरेख प्रकटन..!
साक्षीदेवा, अरे लेका तू जातोस केव्हा, येतोस केव्हा ते ठाण्यात असूनदेखील माहितीच नाय पडत!
सर्वच फोटू सुंदर! विशेषत: खादाडीचे! :)
अवांतर -
मुखपृष्ठावर च्याव ज्झ हे शीर्षक वाचून मला क्षणभर ती शिवीच वाटली होती! :)
तात्या.
15 Feb 2009 - 9:40 pm | प्राजु
आणि चित्रेही सुंदर.
त्या पदार्थाची रेसिपी विचारलीत का?
काका-काकू आवडले. लेख आवड्ला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Feb 2009 - 9:42 pm | नूतन
लेख आणि चित्रे आवडली. शुभेच्छापत्र ही वेगळेच
15 Feb 2009 - 9:45 pm | कलंत्री
हा लेख अतिशय अप्रतिम असा झालेला आहे. मूख्यत्त्वे मराठी शब्दांचा ओघ आणि वापर हवाहवासा वाटत होता.
मिपाच्या इतरही सदस्यांना मराठीसाठी प्रेरणा मिळेल याची मला हमी वाटते.
अवांतर : तात्याने ही कोणती नवी शिवी म्हणून लेख उघडला असावा, तर मी आता कश्या तलवारी चालवायच्या, हा कोणता नवा क्रांतिकारक असा विचार करतच लेख उघडला. सर्वसाक्षीनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे हे निश्चितच.
15 Feb 2009 - 9:48 pm | यशोधरा
मस्त लेख! आवडला.
15 Feb 2009 - 10:21 pm | साती
लेख आवडला. खरंच लेखातील सगळे मराठी शब्द ओढून ताणुन आलेले न वाटता अगदी ओघवते आले आहेत.
चिनी पदार्थांचे फोटो मस्तच आहेत.
आम्हीही भरून पाव -लो.
साती
15 Feb 2009 - 10:22 pm | पक्या
सुरेख वर्णन, छान झालाय लेख. धन्यवाद सर्वसाक्षीजी.
मला ही आधी असेच वाटले की च्याव ज्झ हे कोण्या चिनी क्रांतिकारकाचे चरित्र लिहीले असावे.
15 Feb 2009 - 10:36 pm | रेवती
चांगला अनुभव आहे. परक्या देशात चांगली माणसे भेटली की भाषेमुळे फार काही अडत नाही.
उकडीच्या करंज्या छान दिसतायत.
रेवती
15 Feb 2009 - 10:45 pm | मीनल
ते आहे jiao zi . ज्याव झ.(च्याव ज्)
ज्याव म्हणजे देणे =ऑफर.
झ -चीनी मॅंडरिन मधे वस्तूंच्या नावाच्या पुढे zi म्हणजे उच्चार झ/ज् लावतात.
ऊदा: `दंग झ` म्हणजे स्टिल फोटो कॅमेरा.
`अर झ` कानातले डूल किंवा मुलगा(son) .
उच्च्चारानुसार अर्थ बदलतो हे महत्वाचे.
jiao zi चा आकार पाहिलात तर तो आहे आपल्या करंजी सारखा.पण चीनी jiao zi ला थोडा बेस असतो.
![](http://rising-dragon.co.uk/catalog/images/gold-ingot.jpg)
चीनी पूर्वज ही आपल्या सारखे धातूच्या रूपात currency वापरत असत.अधिक किंमतीसाठी सोने, चांदीचा वापर करत.
कधी नुसती पट्टी त्यावर नाव/ किंमत कोरलेली, तर कधी करंजीच्या आकाराचे विविध वजनाचे ,आकाराची असे.त्याला ingots म्हणतात. चीनी ingots असे दिसत.
त्या आकाराचेच अन्न म्हणजे ज्याव झ.
प्रत्येक चीनी सणाला ज्याव झ असायलाच पहिजे.
चीन मधे भाजी मार्केट मधे तांदळाच्या पिठाच्या पातळ पु-या मिळतात.फ्रिज मधे २-३ दिवस टिकतात. त्या आणायच्या ,त्यात आपल्याला हवे ते सरण भारायच (मुख्यत्वे मांस, मासे घालून करतात.)आणि फोल्ड करून त्या बाजू पाण्याने चिकटवायच्या आणि दुमड घालायची.म्हणजे करंजी तयार होते.पण कव्हार फार नाजूक पातळ असते. लगेच फुटण्याची शक्यता असते.
शक्यतोवर ताजे खावे नाहीतर तयार करून डिप फिज मधे ठेवावेत. हवे तेव्हा डिफ्रॉस्ट करून पाण्यात उकडून, तळून, शॅलो फ्राय करून खायच.लाल मिरच्या चटणी बरोबर(ला ज्याव= तिखट मिरची ) मस्त लागतात ज्याव झ.
अजून एक आकारबद्दल. त्याचा आकार बुटासारखा दिसतो.
चीनी स्त्रीयांच्या बुटाबद्दल सर्वांना माहित आहे की त्या काळी चीनी लोक लहान पाऊल म्हणजे सुंदरतेच लक्षण समजत. त्या करता जन्मा नंतर मुलीची पाऊले बांधून ठेवली जात. त्यामुळे अनेक स्त्रीया अत्यंत गंभीर आजारी असत. पाठीचे अनेक विकार त्यांन जडत. चालणे मुश्किल होऊन बसे.पण तरीही बेहत्तर! सुंदरता आणि ते जिवघेणी परंपरा. स्त्रीया नुमट पणे सर्व सहन करीत. ती बांधून विद्रूप दिसणारी बोट/पाऊल झाकाण्यासाठी सुंदर बुट तयार करित. विणकाम ,भरतकाम, सिल्क, मोती काम वगैरे ची करामती करत . चीनी राण्यांच्या बुटीज म्युझिअम मधे पहायला मिळतात.त्या आकर्षक बुटांच आणि अनुशंघाने (सुंदर?)पाउलांच प्रतिक म्हणून ही तसा आकार केला जाऊ लागला.
अजून असाच चीनी प्रकार बाव ज्.
![](http://www.chinatownconnection.com/images/xiaolongbao33.jpg)
बाव म्हणजे बांधणे. तो प्रकार मोदकांसारखा (पोटली सारखा)दिसतो.
मी चीन मधे रहात होते तेव्हा माझी चीनी मेड पु-या घरीच करायची आणि भाज्यांच्या सारणाचे ज्याव ज करायची आणि आम्ही मस्त हादडयचो.
कोणी भारतीय पाहुणे आली की मी हमखास करून घेत असे. सर्वांनाच आवडायची असे नाही.
चीन माझ्यासाठी `आपल` वाटल नाही पण `परक` तर नक्कीच नाही.
खूप दिवस राहिल्यावर तिथल्या जागेशी जवळीक तयार होतेच की.
आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
इथे २००५,२००६ मधे लिहिलेली चीनची अधिक माहिती वाचायला मिळेल.
मीनल.
15 Feb 2009 - 10:57 pm | प्राजु
माहिती सुरेख..
हा लेख वाचल्यावर मला वाटलंच होतं की तू आणखी थोडी माहिती लिहिशील. मस्त माहिती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Feb 2009 - 10:51 pm | प्रभाकर पेठकर
वा वा सर्वसाक्षी. मस्त लेख. ही सर्व चिनी नांवे वैद्यकिय परिभाषेसारखीच लक्षात राहायला कठीण. पण तुम्ही बरी लक्षात ठेवू शकता.
अवांतरः ते काड्यांनी जेवायला शिकवा बुवा आम्हाला. मला आवडेल प्रयत्न करायला.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
16 Feb 2009 - 4:42 am | मृण्मयी
सर्वसाक्षी, आपला लेख, चिनी काक काकी, आणि फोटो सगळंच खूप छान!
मुख्य म्हणजे मला खास तुमच्यासाठी म्हणून तयार झालेल्या शाकाहारी जेवणाचं जास्त जौतुक वाटलं. वर्ष दीड वर्ष चिनी कुटुंबाबरोबर राहील्यामुळे त्यांच्या खाण्यापीण्याच्या सवयी चांगल्या अवगत झाल्यात. मांस न घालता स्वयंपाक करता येतो हेच माझ्या शेजारणीला आधी पटायचं नाही. (इथे तर तुम्हाला अगदी चारी ठाव जेवायला मिळालं.) :) तीचा नवरा शेझान (शेचुआन?) म्हणजे आपल्या भाषेत शेझवानी असल्यामुळे वर्हाडी ठेचा मात्र अगदी श्रीखंडासारखा बोटं बुडवून, चाटून खायचा. :)
16 Feb 2009 - 4:49 am | सहज
साक्षीजी छान वर्णन. तुम्ही चिनी पदार्थांची नावे देखील चांगली लक्षात ठेवुन लिहलीत :-)
शाकाहारी जेवण म्हणजे चिंग वनच्या कुटूंबीयांना जेवण काहीतरीच अर्धवटच झाले असे वाटत असेल :-)
मीनलताईंचा प्रतिसाद देखील आवडला.
पेठकरकाका तुम्ही हा युट्युबचा दुवा पहा. चॉपस्टीक्स ग्रीप व खाणे तसे फारच सोपे आहे.
16 Feb 2009 - 5:37 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद सहजराव.
प्रात्यक्षित दिसते आहे तरी अगदी सोप्प्प्पे. प्रयत्न करून पाहतो.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
16 Feb 2009 - 6:30 am | अनिल हटेला
साक्षीजी !!!
काय सहजसुंदर लिहीता राव !!
एकदम तब्येत खुष झाली !!चीनी लोकांची सवयच आहे आदरातीथ्य असे करणार की अगदी भारावुन टाकतात ,आणी भारतीय लोकाबद्दल जरा जास्तच आपूलकी असावी (असा आमचा अंदाज)
आजपर्यंत फक्त आणी फक्त चांगले अनुभव आलेत !! एकही कडवट पणाचा ,वाईट अनुभव आलेला नाही!!
शिवाय चायनीज फूड म्हनजे काय आणी किती लिहावे ? असो !!
आपले प्रकटन आवडले !!
सोबत मीनल ताईचा प्रतीसाद म्हणजे एकदम सोनेपे सुहागा !!!
अवांतर :-वेळ असेल तर निंग्बो मध्ये येताये ना ?२-३ दिवस मी सुद्धा एकदम मो़कळा आहे !! पहीला मिपा-चायना कट्टा खूणावतोये !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Feb 2009 - 7:08 am | सुनील
सुरेख वर्णन आणि फोटो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Feb 2009 - 6:53 pm | बुद्ध
सहमत. :)
16 Feb 2009 - 5:32 pm | सर्वसाक्षी
सर्व मिपाकरांचे आभार.
तात्या, शिव्या नको देउ रे त्यापेक्षा मीच 'एकेरी' चे बघतो:)
द्वारकानाथजी, मी इथे ज्यांना इंग्रजी येत नाही फक्त चीनीच येते त्यांच्याशी मराठीत बोलतो. नाही तरी समजणार नाहीच, मग मराठीत का नको:)
पेठकरसाहेब, आता पुण्यात चीनी भोजन कट्टा करुया तुमच्या आशीर्वादाने
सहजराव, काड्या करण्यापेक्षा धरणे शिकवणे अधिक चांगले, मानले तुम्हाला
अनिलशेठ, सध्या फोशानमध्ये पडलोय. परवा पासुन तीन दिवस चावज्झौला. मग ग्वांग्ज्झौ एक दिवस. मग परत. या की राव तुम्हीच ग्वांगज्झौला मजा करु दोन घटका
16 Feb 2009 - 5:55 pm | आनंद
साक्षीजी त्या चिनी शुभेच्छाचा अर्थ काय?
16 Feb 2009 - 6:05 pm | सर्वसाक्षी
अशा आहेत की 'आपल्याला आयुरारोग्य, सदबुद्धी, संपत्ती लाभो व आपले जीवन सुखी होवो'
16 Feb 2009 - 6:39 pm | शाल्मली
एकदम मस्त वर्णन.
बापरे !! ही नावं कशी काय लक्षात रहातात तुमच्या !!?
प्रकटन आवडले.
--शाल्मली.
16 Feb 2009 - 7:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बापरे !! ही नावं कशी काय लक्षात रहातात तुमच्या !!?
मीपण हाच विचार करत होते.
ओघवत्या भाषेत, मस्त लिहिलं आहेत.
अदिती
16 Feb 2009 - 7:32 pm | सर्वसाक्षी
नावे लक्षात ठेवावी लागतात. खिशात छोटी टिपण वहीसुद्धा ठेवतो. जोडीला खाणाखुणा असतातच.नाहितर भुके मरावे लागेल. सामिंज म्हणजे सँडविच मिळमिळीत असले तर न लजता 'लाज्या' ची फर्माईश करावी लागते. भूक लागली असेल तेव्हा काड्यांची कसरत करण्यापेक्षा दोन हातांनी खुणा करत ताओ छा (काटे चमचे ) मागावावे लागतात, पाणी थंड नको असे सांगितले तर चक्क गरम पाणी देतात मग वन स्युई सांगावे लागते. नव्या यजमाना बरोबर गेल्यावर शाकाहारी आहे हे सांगण्यापेक्षा म्मेईई रो, म्मेईई चि, म्मेईई चितान, म्मेईई व्य्व्यु हा मंत्र बरा पडतो (म्हणजे मांस नको, कोंबडी नको, अंडे नको, मासे नकोत). शाकाहारी साठी जो शब्द आहे त्याचे सुथ्हा, शुत्थाय, सुत्साई वगैरे इतके विचित्र उच्चार आहेत की त्यापेक्षा मंत्र बरा. स्थानिक उड्डाणात बाई चित्रविचित्र पदार्थ फिरवु लागल्या की 'म्यान पाव, चंज्झ' असे म्हणत तबक हातानेच नको असे सांगितले की पाव, लोणी व संत्र्याचा रस विनासायास मिळतो.
16 Feb 2009 - 10:19 pm | प्रभाकर पेठकर
मेथीचे ठेपले १५ दिवस टिकतात. खाकरा महिनाभर टिकतो. बाकरवडीही महिनाभर टिकते.
एक बॅग अशा पदार्थांनी भरुऽऽऽन घ्यायची. लफडा नाऽऽय.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?