वर्षानंतरची देवदिवाळी, एसएमएस...
"हे तुला पेवलीचं आमंत्रण. नव्या गावठाणात कुदळ मारली जातेय. येत्या पावसाळ्यानंतर हे गाव असणार नाही..."
पेवली. डाकीण म्हणवल्या गेलेल्या बाईनं एकाकी पडल्यानंतर गावातून दोन बछड्यांसह पळून जाऊन उभं केलेलं गाव. हे गाव तर पहायचं होतंच शिवाय, पिंजारी या मर्दानीलाही तिच्या गावातच एकदा भेटायचं होतं. याआधी तिची भेट झाली होती ती मांडणगाव किंवा माझ्याकडंच. तिच्याच गावात तिला भेटून समजून घेणं वेगळंच.
पेवली काही दिवसांत उठणार होतं. त्यामुळं तिथं जाऊन मी गाव डोळे भरून पाहून घेतलं. गावकऱ्यांना भेटले, बोलले. पेवलीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. सारं काही भरभरून घेतलं, गावातील त्या झऱ्याच्या काठी बसून. संध्याकाळच्या सुमारास ढोल घुमत होते त्या सुरांच्या पार्श्वभूमीवर. पाव्याच्या सुरावटींवर मनाला स्वार होऊ देत.
पाऊस बरा झाला होता. त्यामुळं झऱ्यात पाणी टिकून होतं. गुलाबकाकांच्या घराच्या पाठच्या अंगाला झऱ्याच्या पात्रात आणि काठावरही कातळ होते. पाण्यात पाय सोडून त्यावर आम्ही बसलो होतो.
"चार वर्षं कशी गेली काही समजलंच नाही..." पिंजारीच्या बोलण्यात सफाई येऊ लागली होती थोडीथोडी.
चार वर्षं म्हणजे पेवलीत रजनीच्या संघटनेची शाखा सुरू होणं, धान्यबँक वगैरेचं काम उभं राहणं. त्यातून सावकारीच्या पाशातून काही कुटुंबांची झालेली मुक्ती, मग बंधाऱ्यासाठी संघर्ष, त्यातून पुढं धरण, पुनर्वसन वगैरे. पिंजारी भरभरून सांगायची. सगळ्या सांगण्यात असायचा तो मात्र भविष्याचा वेध. आपल्या पोरांकडं बोट करून म्हणायची, "त्यांच्यासाठी."
"खायची आजही मारामार आहे ताई. पण आता एक समाधान आहे. काही मिळण्याची शक्यता नक्की आहे. लोकांनी एकी टिकवून धरली तर खूप काही मिळेल...
"तिथं जगणं सोपं नाही, पण इथंही सोपं नव्हतंच... कारण आता इथंही जंगल राहिलं नव्हतंच. कष्ट तिथले वेगळे," हा सगळा संदर्भ पुनर्वसनाच्या गावठाणापाशी अद्याप आपलं जंगल नसण्याच्या मुद्याचा. आता सारं काही शेतात राबूनच करावं लागणार होतं. एकूण परस्वाधीनतचा तिच्या आणि तिच्या माणसांच्या लेखी. झालंच तर पुढच्या पिढीला शाळा वगैरे करावीच लागणार होती.
पिंजारी म्हणाली, "शाळा, दवाखाना आणि पाणी या तीन गोष्टी तिथं मिळाल्या की बास्स."
पुनर्वसनाचा आराखडा होता तसा. मांडणगावातील मोर्चावेळी झालेल्या धडपडीत पडून हाताच्या कोपराला झालेल्या जखमेचे व्रण दाखवत गप्पांच्या शेवटी पिंजारी म्हणाली, "लाठ्या खाल्ल्या, पण हक्क मिळवला आम्ही."
---
गाव उठलं. पुनर्वसनासाठी ते जिथं गेलं होतं, तिथून ते पुन्हा विखरून गेलं.
पुनर्वसन झालं त्यावेळी आश्वासन मिळालं होतं, शेतापर्यंत पाणी आणण्याचं. ते काही आलं नाही. झाडांचंही असंच काहीतरी झालं. कारण काही खास नाहीच. सरकारी अनास्था म्हणता येईल, लालफित म्हणता येईल किंवा एकूणच बेपर्वाईही म्हणता येईल. गावकऱ्यांच्या संघर्षाच्या ताकदीची मर्यादा हेही एक कारणच. मग गावाला रोजगारासाठी बाहेर पडावंच लागलं. असं म्हणतात की, त्यावेळी पिंजारी आणि जुवान्यानंही आपल्या दोन पोरांसह गाव सोडला. पुढं केव्हा तरी एकदा ते जवळच्या शहरात बांधकामांवर मजुरी करत असल्याची खबर आली. पण त्या खबरीला तसा अर्थ नव्हता. कारण ती ज्यांच्यापर्यंत पोचल्यानं काही झालं असतं, ती या गावाचा लढा चालवणारी संघटनाही तोवर अस्ताला गेली होती. गाव उठल्याचा तो परिणाम होता असंही म्हणता येतं किंवा रजनीला नव्या भागातील नव्या प्रकल्पांच्या वाटा खुणावू लागल्याचा परिणाम होता असंही म्हणता येतं. एकूण तिथून पुढं पिंजारीचा माग तसा राहिलाच नाही.
---
एका वर्षापूर्वी, एसएमएस...
"पिंजारी गेली. कॅन्सर. शेवटच्या स्टेजलाच समजलं. काही करता आलं नाही..."
पुनर्वसन वसाहतीतून बांधकामाच्या मजुरीवर गेली आणि तिथंच कर्करोगाची शिकार झाली पिंजारी. काही करणं ना जुवान्याला शक्य झालं, ना इतर कोणाला. पोट दुखतंय हे आणि इतकंच कारण, त्यावरचे जुजबी उपचार. गेल्यानंतरच तिच्या कर्करोगाचं निदान झालं.
पिंजारी. बापाचा आजार एकटीच्या जोरावर काढणारी. लग्न न करता जीवनसाथीसमवेत एकत्र राहण्याचं धाडस दाखवणारी. मग तेच लग्न करण्यासाठी तितकाच धाडसी निर्णय घेत एकटीनं शहर गाठून वर्षभर मजुरी करणारी. सार्वजनिक कामात पडल्यानंतर आपल्यातील उपजत गुणांच्या जोरावर पुढं येणारी. 'पुढच्या पिढीसाठी' असं म्हणत त्या कामात झोकून देणारी. संघर्षासाठी गावकऱ्यांना एकत्र बांधून ठेवणारी. उपमुख्यमंत्र्याच्या हातातले कागद काढून घेऊन आपल्या मुद्याचं महत्त्व त्यांच्यावर ठसवू पाहणारी.
पेवलीच्या जोडीनं पिंजारीचीही एक कहाणीच आता राहिली आहे. क्वचित कधी त्या गावातला कोणी वृद्ध असाच कुठं तरी भेटला तर त्याच्याकडून आवर्जून ऐकावी अशी.
(पूर्ण)
याआधी - पिंजारी - १, पिंजारी - २, पिंजारी - ३, पिंजारी - ४
प्रतिक्रिया
10 Feb 2009 - 6:52 pm | सहज
सुंदर लेखमाला
10 Feb 2009 - 9:25 pm | प्राजु
सुरूवात आहे असं वाटेपर्यंत शेवट आला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Feb 2009 - 10:27 pm | धनंजय
शेवट गोड केला नाही, हे वास्तववादी आहे. पण तरी पेवलीची व्यथा, पिंजारीने घेतलेला पुढाकार, तिला गावाकडून मिळालेली साथ - यश मिळाले नाही तरी यश तोंडाशी आले होते. "रंग दे बसंती"मध्ये शोकांत असूनही आशादायक होता, तसे थोडेसे वाटते आहे.
लोकशाही म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी भांडणे-तह करून, समेट करून, आपापले हित साधणे होय. लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाही म्हणजे घटनेला तुडवणारी नोकरशाही.
माझ्या सोयीसाठी येथे पाचही भागांचे दुवे देत आहे :
पिंजारी - १, पिंजारी - २, पिंजारी - ३, पिंजारी - ४, पिंजारी - ५
-
10 Feb 2009 - 11:10 pm | शेणगोळा
श्रावण,
छान लिहिले आहेस. आज प्रथमच या लेखमालेला प्रतिसाद देतो आहे.
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
11 Feb 2009 - 2:01 am | संदीप चित्रे
खूप ओघवतं असतं.
प्रामाणिकपणे सांगायचं तर शेवटाचा अंदाज आला होता पण आपल्या लोकशाहीची हीच खरी शोकांतिका आहे की शासनाविरूद्धच्या लढ्यातले सुखद अंत वाचकाला सुचतच नाहीत !
पुलेशु.
11 Feb 2009 - 3:47 pm | विसुनाना
पेवलीच्या स्थापनेपासून पूर्ण कथा पुन्हा वाचून काढली.
पिंजारी वेगळीही आवडली.
11 Feb 2009 - 9:41 pm | लिखाळ
सुंदर लेखमाला... आवडली...
गाव उठूनजाण्याची प्रक्रिया विलक्षणच आहे..तुमच्या मागल्या काही लेखांतसुद्धा नर्मदेच्या प्रक्ल्पातल्या गावांचे उठून जाणे वर्णन केले आहे ते आठवले..
पेवली कथा सुद्धा सुंदरच आहे.
धनंजयांनी प्रत्येक भागात दुवे दिल्यामुळे लेख शोधणे सोपे झाले..त्यांचेही आभार.
-- लिखाळ.
24 Feb 2009 - 6:21 pm | प्रकाश घाटपांडे
कहाणीचा शेवट चटका लाउन गेला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.