संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
8 Sep 2024 - 8:08 am

दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे.

महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे :
योगश्चित्तवृत्तिनिरोध:
('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे).
अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध:
( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय)
आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते. माझा संयमित आहाराचा प्रयोग म्हणजे वर लिहिल्याप्रमाणे 'वैराग्य' आणि 'अभ्यास' यांचाच प्रयत्न आहे.

पार्श्वभूमी :
सुमारे १० वर्षांपूर्वी. या लेखात लिहिल्याप्रमाणे रसाहारातून मी व्याधीमुक्त झालो होतो. त्यानंतरच्या काळात भाज्या-फळांचा ताजा रस अधून मधून घेत असलो, तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले आणि पोट सुटणे, गुडघे दुखू लागणे, अशक्तपणा वगैरे जाणवू लागले. गेले काही महिने पाय दुखत होते आणि जिने चढणे-उतरणे कठीण वाटू लागले होते.
त्यातच ८ जुलैला रात्री छातीत भयंकर कळा येऊ लागल्या. त्यापूर्वीचे चार-पाच दिवस प्रवासामुळे पोट बिघडले असल्याने गॅसेसमुळे कळा येत असाव्यात असे वाटून सहन करत राहिलो. सकाळी कळा थांबल्या पण खोल श्वास घेतला की छातीत कळ उठत होती.
दुपारी इथल्या (अमेरिकेतल्या ) दवाखान्यात इमर्जन्सी मध्ये गेल्यावर तिथे ताबडतोब ईसीजी, सिटीस्कॅन, अल्ट्रासाउंड वगैरे केले गेले आणि दोन्ही फुफ्फुसातलया रक्तवाहिन्यांत गुठळ्या (blood clots) झालेल्या असल्याचे समजले. मग चोवीस तास रक्तात Heparin नामक द्रावण चढवण्यात आल्यावर कळा आणि श्वासाचा त्रास थांबला. दुसरे दिवशी संध्याकाळी इस्पितळातून सुट्टी मिळाली आणि पुढले सहा महिने Eliquis (5 mg) या गोळ्या घ्यायला सांगितले गेले. याशिवाय अल्ट्रासाऊंडमधून मला 'फॅटी लिव्हर' देखील असल्याचे उघड झाले.

एक वेगळाच नवीन अनुभव : दवाखान्यात एक वेगळीच गोष्ट घडली. ती म्हणजे मला औषध चढवत असताना पूर्ण वेळ रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण (९३ - ९८ टक्के होते) नाडी (५७ - ६४ होती) समोर स्क्रीनवर दिसत होते. याशिवाय मशीनच्या स्क्रीनवर कसलातरी एक ग्राफ सतत खाली-वर होत होता (तो कसला हे मला समजले नाही, नर्सला पण ठाऊक नव्हते) त्यावेळी मला एकदम आठवले की १९९७ साली माझ्यावर काही संकट आलेले असताना एका ज्ञानी व्यक्तीने "ओम नम:शिवाय" मनातल्या मनात उच्चारात रहा, असे सांगितले होते, त्याप्रमाणे मी फार क्वचितच केले असेल, पण आता इतक्या वर्षांनंतर अचानक आठवण येऊन मी मनातल्या मनात ते सुरु करताच तो ग्राफ खूप खाली-वर न जाता अगदी शिस्तशीरपणे एकसारखा, एका विशिष्ट आकृतिबंधात येऊ लागला. मी अजिबात उच्चार करत नसून फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते. असो.

मोठा धक्का आणि विमनस्क अवस्था : आजवरच्या ७३ वर्षाच्या आयुष्यात प्रथमच इस्पितळाची पायरी चढावी लागणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. शिवाय बराच काळ औषधही घ्यावे लागणार होते. मला रक्तशर्करा, रक्तदाब वगैरे काहीही नसल्याने आपल्याला अगदी शेवटपर्यंत काही होणार नाही ही माझी समजूत खोटी ठरली होती. (कोविडची लस घेतल्याच्या परिणामी रक्तात गुठळ्या होतात, असेही एक मत प्रचलित आहे. इथली नर्स म्हणाली की पूर्वी बहुशः पासष्ठीच्या वरचे लोक इथे यासाठी यायचे, पण आता अगदी तरूणही येतात, आणि काही दगावतात सुद्धा)
– मग त्यानंतरचा एक - दीड महिना काहीश्या विमनस्क अवस्थेतच मी होतो. शारीरिक शक्ती आणि उत्साह खूप कमी झाल्याचे जाणवत होते. पेंटिंग, लेखन - वाचन यातला उत्साह मावळला होता. अमेरिकेतून भारतात परत जाण्याला आता एक महिनाच उरलेला असल्याने आपल्याला तो प्रवास झेपेल का याची शंका वाटत होती. मग मुलगा म्हणाला की पूर्वी केला होता तसा रसाहाराचा प्रयोग पुन्हा एकदा करून निघण्यापूर्वी ठणठणीत तब्ब्येत करून घा.

संयमित आहाराचा प्रयोग :
मग मुलाने सुचवल्याप्रमाणे आहाराविषयक प्रयोग करण्याचे ठरवून २७ जुलै पासून सुरुवात केली. काय करावे हे मी आपल्याच मनाने ठरवले.

कोणते पदार्थ घेणे बंद केले:
चहा - कॉफी - दूध, फोडणीचे आणि तळकट पदार्थ, पोळी आणि भात, मैद्याचे घरगुती आणि बाजारचे पदार्थ, पॅकबंद पदार्थ, साखर आणि गोड पदार्थ - मिठाई, आईसक्रीम वगैरे सगळे बंद केले.

कोणकोणते पदार्थ घेणे चालू केले:

१. सकाळी गरम काढा ( आले, दालचिनी + अर्जुनसाल + शोपेची पूड, चिमूटभर हळद, चिमूटभर मिरपूड, गूळ वगैरे पाण्यात उकळून केलेला. (दहाव्या ते बाराव्या दिवशी थोडेसे दूध पण घातले)

२. भाज्या आणि फळे यांचा ताजा काढलेला रस (हिरवा आणि लाल)
( हिरवा रस: कोहळा, काकडी, सेलरी, हिरवे सफरचंद, आले, लिंबू.)
( लाल रस: चुकंदर (बीटरूट), सफरचंद, संत्रे, गाजर, आले, लिंबू)

३. पौष्टिक लस्सी : दही, केळे, खजूर - आणि अन्य पदार्थ मिसळून केलेली लस्सी.
(अन्य पदार्थ म्हणजे हिरवी भाजी, फळे, सुखामेवा, चियाबिया - Chia seeds)

४. पौष्टिक भेळ : फुटाणे, भाजलेले शेंगदाणे, मनुका, भिजवलेले बदाम, आक्रोड, काजू, लसणाची एक पाकळी, काळे मीठ आणि गूळ/खजूर. (यातले सर्व किंवा काही पदार्थ)

५. दही घालून केलेली कोशिंबीर किंवा नुसती फळे.

६. घरी झालेल्या स्वयंपाकापैकी थोडेसे वरण किंवा भाजी. (क्वचित कधीतरी)

परिणाम:
१. शरीराची शक्ती आणि उत्साह वाढून खूप छान वाटू लागले.
२. जिना उतरताना कठडा धरून एक एक पाऊल टाकत उतरण्याऐवजी सरळ ताठ उतरू - चालू लागलो.
३. खाली वाकून उभे राहिल्यावर भोवळ येणे बंद झाले.
४. हाताला सुटणारी खाज बंद झाली.
५ वजन पाच पौंड कमी झाले.
६. पोटाचा घेर जरा कमी झाला.
७. लांब पायी फिरणे पुन्हा सुरु करता आले.

बारा दिवस आज पूर्ण होत आहेत. आणखी काही दिवस हा उपक्रम चालू ठेवणार आहे. त्याबद्दल पुन्हा लिहीन.
—---------------------------------------------
– खरेतर हा लेख इथे संपतो आहे. तरी जिज्ञासूंसाठी या बारा दिवसातील आहाराचे तपशील खाली देतो आहे.

१. पहिला दिवस. – वजन 156 पौंड.

07:30 – रस: कोथिंबीर, कोहळा आणि गाजर.
09:30 – रस : सेलरी, कोथिंबीर, काकडी, हिरवे सफरचंद, आले लिंबू.
11: 40 – Apple cider Vinegar एक कप पाण्यातून)
12: 40 – ताक (+ आले, जिरपूड, काळे मीठ)
13 : 40 – जूस : 3 संत्री, 1 पीच, 2 लहान सफरचंदे, 1 गाजर.
(संध्याकाळी मित्राकडे गेल्यामुळे तिथे ढोकळा, शंकरपाळी खाणे झाले).
-—------------------
२. दुसरा दिवस.

05:30 – काढा
07: 20 – हिरवा रस.
09:30 – हिरवा रस आणि सुखामेवा.
11.30 – लाल रस
13.30 – लस्सी (केळे - खजूर- दही- स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, पाणी)
19.30.-- लस्सी. (केळे + दही)
--------------------
३. तिसरा दिवस. — वजन १५२ पौंड.
07.30 – हिरवा रस.
10.20 – लस्सी, केळीचे चिप्स.
13.30. – लाल रस.
16.00 – सुखामेवा पूड + तूप + मध + काकवी.
19.00 – लस्सी : (दही, केळे, प्लम, द्राक्षे, खजूर).
--------------------
४. चवथा दिवस.
04.30 – गरम काढा
07. 30 – हिरवा रस.
09.30 – लस्सी, केळीचे चिप्स.
11.00 – सुखा मेवा, काकवी, फुटाणे, लसणाची 1 कळी.
—-- (यानंतरचे लिहून ठेवायचे राहिले)
—------------------
५. पाचवा दिवस.

05.30 – काढा.
10.00 – लस्सी (दही, आवोकाडो, खजूर, केळे, प्लम).
10.20 – फुटाणे. शेंगदाणे. सुखामेवा पूड, गूळ, काकवी.
14.00 – संत्र्याचा रस 300 ml.
14.40 – काजू, पीकॅन, ५ खजूर
17.30 – लस्सी.
18 50. लाल रस (बीट, केल, सेलरी, गाजर).
20.00 लस्सी.
—--------------------
६. सहावा दिवस.
07.30 – काढा.
08.30 – फुटाणे, दाणे, काजू, काळी मनुका, गूळ.
11.30 – फुटाणे गूळ. लसूण पाकळी. मनुका.
13.15 – मिश्र रस (सेलरी, काकडी, बीटरुट, आले, लिंबू. हिरवे सफरचंद).
संध्याकाळी लस्सी, आमटी, कांद्याच्या पातीची थोडी भाजी.
----------------------
७. सातवा दिवस.
04 :00 – काढा
09: 30 – फळे दही. फुटाणे दाणे चियाबिया.
14: 30 – लाल रस ( बीट, काकडी, सेलरी, आले, लिंबू)
15.15 – फुटाणे. काजू. गूळ. मनुका, लसूण पाकळी.
19:30 – लस्सी (दही, केळे, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, खजूर, फुटाणे, काजू, चियाबिया, मीठ -मसाला).
—-----------------------
८. आठवा दिवस.
(कित्येक महिन्यानंतर पूर्ण झोप लागली: 22 : 30 ते 05.20. शौच्य 5.30 वाजता.
07.30 – लस्सी. (आव्हाकाडो, केळे. सुखामेवा पूड. पाणी)
10.15 – लाल जूस.... फुटाणे दाणे. मनुका. काजू.
12.30 – 1 केळे. 1पीच. 3 खजूर. भाजलेले शेंगदाणे.
15:30 – Apple cider Vinegar एक कप पाण्यातून)
19:00 – लाल भोपळ्याचा गुळातला शिरा. फुटाणे + लसूण. अमूल चीज 1/2 लहान तुकडा.
—---------------------------
९. नववा दिवस.
07:30 – स्मूदी. (दही, केळे, आव्हाकाडो, द्राक्षे, सुखामेवा पूड)
09:30 – फुटाणे, शेंगदाणे, खजूर, काजू.
12:00 – स्मूदी. दोडक्याची भाजी.
16:00 – एक केळे, थोडे फुटाणे.
19: 45 गरम सूप (टमाटो, सेलरी, रताळे, मीठ, मिरे)
—------------------------------
१०. दहावा दिवस.
07:30 - - काढा.
10:30 - - हिरवा रस. फुटाणे.
11:15 - - 1 अंड्याचे आम्लेट.
13:45 - - उसळ, कोशिंबीर, 3 खजूर.
19:00 - - 1 पोळी आणि चहा.
20: 00 - - सूप.
—-----------------------------
11 अकरावा दिवस
05:30 - - काढा
07:30 - - लस्सी. मूदी.
10:00 - - लस्सी स्मूदी.
11:15 -- एक बिस्कुट. तूप-मध.
16:45 -- केळे द्राक्षे पीच.
—-------------------------------
12. बारावा दिवस. ............... वजन १५१ पौंड.
07: 30 – काढा
10: 30 – हिरवा रस + एक मोदक.
13: 30 – अर्धा पराठा + लस्सी
17: 30 – हिरवा रस. (+Apple cider Vinegar)
21: 00 – लस्सी.

याप्रमाणे बारा दिवस मजेत पार पडले. जे खाणे सोडले आहे, त्याविषयी इच्छा निर्माण झाली नाही. काहीही त्रास झाला नाही. अशक्तपणा नाहीसा झाला आहे.
--- आता यापुढे अजून किती दिवस हा उपक्रम चालवायचा, यात काही बदल करायचे का, वगैरे अजून ठरवले नाही.
(क्रमशः)

पाकक्रियाजीवनमानआरोग्यराहणीशाकाहारीप्रकटनलेखअनुभवमाहितीआरोग्य

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

8 Sep 2024 - 9:20 am | प्रसाद गोडबोले

वाह ! उत्तम लेखन !

चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले.
आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले !

मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)

फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.

मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति !
ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले !

बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे !

पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !

आणि हो ,

जीवेत "शरदः" शतम !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2024 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन.
वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं.
आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

श्रीगणेशा's picture

8 Sep 2024 - 11:04 am | श्रीगणेशा

अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित.
तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा!
या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

कर्नलतपस्वी's picture

8 Sep 2024 - 12:05 pm | कर्नलतपस्वी

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत.
या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा.

सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच.

आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.

वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल.
माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील.

स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा.

आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे.

वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो.

आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच.

कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले.

आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना.....

संदीप खरे यांच्या कवितेत सारखं,

अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा....

बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते.

काळ देहासी आला खाऊ
आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.

-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे)
बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते.
त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते.
-- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे.
--- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

कर्नलतपस्वी's picture

8 Sep 2024 - 12:36 pm | कर्नलतपस्वी

टिकटिकतेकिंवा कसे.....
झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे.

'बाकीबाब' , यांचा भक्त.

आयुष्याची आता झाली उजवणी
येतो तो क्षण अमृताचा

जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे

सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे

पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Sep 2024 - 4:10 am | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला.

खिलजि's picture

10 Sep 2024 - 11:49 pm | खिलजि
खिलजि's picture

10 Sep 2024 - 11:49 pm | खिलजि
खिलजि's picture

10 Sep 2024 - 11:49 pm | खिलजि
खिलजि's picture

10 Sep 2024 - 11:51 pm | खिलजि
खिलजि's picture

10 Sep 2024 - 11:51 pm | खिलजि

काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

खिलजि's picture

10 Sep 2024 - 11:53 pm | खिलजि

माझ्या जेवणाच्या ताणामुळे, मोबाईल पण रुसला आहे असे वाटते

अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले.

माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

कर्नलतपस्वी's picture

11 Sep 2024 - 7:20 am | कर्नलतपस्वी

वेळेवर केले तर चांगले रिटर्न मिळते. अन्यथा,देर आये दुरुस्त आये वाली गोष्ट होते.

तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले

इथे बरोब्बर सगळी मेख आहे.

आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे.

फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे.

काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही.

पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

कर्नलतपस्वी's picture

11 Sep 2024 - 9:12 am | कर्नलतपस्वी

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल.
तशीच शरीराला पण सवय लागेल.
Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

गवि's picture

11 Sep 2024 - 9:23 am | गवि

+++ अगदी.

रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात.

ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते.
-- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते.
-- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे.

मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_

तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही

-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग.
हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti's picture

11 Sep 2024 - 10:33 am | Bhakti

हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

सुरुवात आणि सातत्य दोन्ही

हे अगदी योग्यच.

पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

सतत प्रतिसाद उडत असल्यामुळे कंटाळलेली नूतनमा.आता प्रतिसाद‌ लिहिणे बंद.

हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे.
थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे.
-- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे.
आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.