मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥
-ग्रेस
मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या.
"खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".
'मला भेटलेला कार्व्हर,'प्रभाते चारियासी जाये', 'पावगढ-चंपानेर 'असे तीन लेख अर्धवट लिहीले आहेत पण याच कारणास्तव पुर्ण होत नव्हते. काहीही करावेसे वाटत नव्हते.गाडी जवळ जवळ थांबल्यासारखीच म्हणायचे. आशा परिस्थितीत बाहेरून मदत मिळणे दुरापास्त आणी जरी मिळाली तरी मला ती पिचलेल्या पोकळ बांबू सारखी, कुचकामी वाटते.मी सहजासहजी कुणा जवळ व्यक्त होत नाही.अशावेळी मी पुस्तकं जवळं करतो. वाचताना अचानक मनाची मरगळ दुर करण्याचा उपाय मीळतो.गद्य पेक्षा पद्य जास्त भावते एक एक कवीता म्हणजे एक पुर्ण गद्य पुस्तक.कधी चार ओळी, कधी दोन शब्द असे काही सुचवून जातात की एक हजार वॅटचा बल्ब लावल्या सारखा डोक्यात प्रकाश पडतो. अगदी या कवीते सारखे....आयुष्य असेच आहे.
पाण्यात ओंजळीच्या चुकून मीन यावा
चमकूनही तसाच गाण्यात अर्थ जावा
केंव्हा चुकून हात, तारांवरी पडावा
विस्तीर्ण पोकळीचा गांधार सापडावा”
-आरती प्रभू
आयुष्य जर सुरात असेल तेव्हां नकळत विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडतो पण जेव्हां सुर बेताला होतात तेव्हां खोल दरीतला अंधार नशीबी येतो.असेच काहीसे, एक अशी घटना घडली की काही काळ निराशेच्या गर्तेत गेलो होतो.हळुहळू मन थार्यावर येवू लागले आहे.
अगले कुछ रोज
मै और मेरी लेखनी होगी
कुछ कहानियां,कुछ किस्से
कुछ मेरे तो कुछ आपके हिस्से
कुछ मन से, कुछ आपसे बाते होंगी
दिन तो दिन रातें भी साथ होंगी
तर.....
सोसायटीत, स्टिल्ट पार्किंग स्लाॅटमधे गाडी पार्क करत होतो अचानक एक पक्षी उडून गेल्याचा भास झाला. नात बरोबर होती तीने पण पुष्टी केली. गाडीतून उतरून समोरच्या खांबाजवळ जाऊन बघीतले तर एकाच पातळ सुकलेल्या काडीचे सुबक गोल कडे (रिंग) दिसले.अंधारात निट दिसले नाही पण डोक्यात प्रकाश पडला,नक्कीच कोणीतरी पक्षी आशियाना बनवत आहे.....
व्यायाम करताना काही दिवसांपासून शिपाई बुलबुल (Red Whiskered Bulbul) जोडपं इमारतीच्या शेजारील झाडावर बसलेले दिसत होते. हे त्यांचेच काम असावे...
बरेच वरीष्ठ नागरिक,महिला स्टिल्ट पार्किंग मधे सकाळ- संध्याकाळ चालण्याचा व्यायाम करतात. मी सुद्धा बरेच वेळा बाहेर फिरायला जाण्यापेक्षा इथेच व्यायाम करायला प्राधान्य देतो.इमारतीच्या चारही बाजूस भरपूर मोकळी जागा,थंड खेळती हवा, मोठमोठे वृक्ष,त्यावर पक्षांची किलबिल,नैसर्गिक संगीत, व्यायामासाठी पुरक वातावरण.या उलट खाली सोसायटीत सकाळी पालकांचा, शाळकरी मुलांचा गोंधळ, स्कुल बसेस,व्यावसायिक, व्यक्तिगत वाहने पायी चालण्यात व्यत्यय आणतात.आणी, हो, चालत असताना काही अवांच्छीत भेटणारे लोक सुद्धा.
अगदी मच्छी बझार म्हणालात तरी चालेल. या सर्व गोंगाटात सुर्यवंशी,विवीध प्रकारचे पक्षी बिनधास्त विहरतअसतात.पक्षी बघायला मिळतात.याचे मुख्य कारण भरपूर हिरवळ, पाण्याचा स्रोत आणी प्रचूर मात्रेत उपलब्ध असलेले पक्षांचे आवडते खाद्य. सिमेंटच्या जंगलामुळे पक्षी आपले नैसर्गिक अधिवास सोडून मानव वस्तीत आलेत का?तर होय कारण मानवाने त्यांच्या भागाचे अधिग्रहण केले म्हणून. असो, विषयांतर नको.
दुसर्याच दिवशी त्यांच्या मागावर लागलो.सर्व छोट्या मोठ्या हालचाली टिपत होतो. दिवस, दिवस गाडीत बसून लक्ष ठेवत गेलो. शिपाई बुलबुलचेच जोडपे होते ते.अंदाज खरा ठरला.
सकाळी,सकाळी जेव्हां घरट्याकडे नजर गेली तेव्हां आश्चर्याचा धक्काच बसला.प्लॅस्टिकचा कागद खाली अंथरलेला दिसला आणी त्यावर घरटे बनवायला सुरुवात केली होती.
एव्हढ्यात घरट्यासाठी कच्चा माल आणताना दोघांना बघितले,पटकन खांबाआड दडलो. चोचीत बारीक पातळ विजेच्या तारां सारखी झुडपांची मुळं होती. एकदम घरट्यात न घुसता इकडे तिकडे बघत टप्याटप्याने झाडावर,रेलिंगवर रेगांळत ती पुढे सरकत होती.कुणी बघत नाही खात्री पटल्यावर चटकन घरट्यात जाऊन बसली.सौ बुलबुल घरटे विणण्यात मग्न झाल्या तर श्रीमान सुरक्षारक्षक बनून तीला कव्हर फायर देत होते.मुळं,फांद्या,तांबडी पिवळी पानं इ.आणायला दोघेही फेऱ्या मारत होते. सकाळच्या फिरण्या व्यतिरिक्त नाष्टा,दुपारचे जेवण, वामकुक्षी ते रात्री झोपण्याच्या आगोदर अशा माझ्याही फेऱ्या घर ते पार्किंग अशा चालू होत्या. त्यांची प्रगती,कलाकौशल्य,सहकार्य कौतुकाने बघत होतो.
सृजन मग ते कुठलेही असो आनंदच देते.नवरा बायको मधली सहकार्याची भावना, समन्वय आणी एकतानता मला भावविभोर करत होती. श्री बुलबुल कधी फांदीवर कधी रेलिंगवर तर कधी आजुबाजूच्या दोन चाकी,चारचाकी वर उड्या मारत,"जणू काय आपण त्या गावचेच नाही", या अविर्भावात तीच्या कडे लक्ष ठेवत होता. जराशी धोक्याची संभावना दिसताच तीला आवाज देत होता. दोघेही तात्पुरते दुरवर निघून जात.त्याचे लक्ष मात्र घरट्याकडेच.धोका दुर होताच पुन्हा कामाला लागायचे.झाडावर कावळे, कोकीळ,भारद्वाज कवडी रामगंगा,नाचण,चष्मेवाला, सुभग,दयाळ, सुर्यपक्षी,मैना,राखी वटवट्या असे अनेक प्रकारचे पक्षी येत जात होते,त्यांच्यावर पण लक्ष ठेवून होता.
तीन दिवस हाच कार्यक्रम चालू होता. एखादा कुशल बुरूड सुबक, सुंदर वेताची टोपली विणतो त्याच प्रमाणे एक पाय आणी चोचीचा सहाय्पयाने पक्षिणीने आपले घरटे बनवले. तांबूस हिरव्या पानांनी बिछाना बनवला. तो कौतुकाने दुर बसून तीचे कौशल्य बघत होता. गेल्या तीन दिवसांपासून तीची लगबग चालू होती बरोबर तो सुद्धा तेव्हढ्याच उत्साहात तीची साथ देत होता. तीची घरटे विणण्याची पद्धत,जशी गर्भार स्त्री लोकरीचे पायमोजे विणते अगदी तशीच, मी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन तासंतास गाडीत बसून बघत होतो. (चित्रफित आहे पण तकनिकी अज्ञाना मुळे डकवता येत नाही.).
सुरवातीला हे दांपत्य रस्त्यावरच्या गोंगाटाला बिचकत आपले काम करायचे. सोसायटीत सदस्यांना कल्पना दिली आणी त्या भागात येणे जाणे शक्यतो कमी करण्याची विनंती केली.हळुहळू आम्हां दोघांनाही एकमेकाची सवय झाली. त्यांनीपण आमच्याकडे दुर्लक्ष करत झपाट्याने काम सुरू ठेवले.
२३ एप्रिल पासून बुलबुल दांपत्य आणी मी, आमचा एकत्र प्रवास सुरू झाला.२२-२३-२४ एप्रिल, सौ बुलबुल यांनी तीन दिवस अविश्रांत श्रम घेत घरटे विणले.मजबूतीची खात्री करत, येणाऱ्या नवजात पिल्लांसाठी आरामदायक कसे होईल ते बघत होती.घरटे पुर्ण झाल्यावर श्री बुलबुल यांनी एकदा येवून सर्व ठिक आहे याची खात्री करून घेतली. अद्भुत अनुभव, या सर्वात मानवी भावनांचे प्रतिबिंब मला दिसत होते.
दांपत्याची लगबग पाहून,आम्हीं पहिले घर घेतले त्याचीच आठवण झाली.केव्हढे कौतुक. एकदा घर कुठे घ्यायचे नक्की झाले की मग पैशाची जुळवा जुळव,दिवसातून अगणित वेळा तोच तोच हिशोब मांडणे,कंत्राटदाराने दिलेले नकाशे सारखे उघडून भविष्य काळात फेर- फटका मारून येणे नित्याचेच झाले होते.त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा एकमेकाला सांगणे, समजावणे इत्यादी.आम्हीं जसे अडचणींना तोड दिले तसेच बुलबुल दांपत्यही अडचणींना सामोरं जात होतं. खऱ्या अडचणी घरटे बनल्यानंतर सुरू होणार होत्या.घरटे बनवण्यासाठी निसर्ग सर्व काही फुकट देत होता पण मुख्य मुद्दा सुरक्षेचा होता.
बुलबुल दांपत्याला,अर्थात मानवेतर पशूपक्षांना सुरक्षेची जरा जास्तच खबरदारी घ्यावी लागते. शिकारी पक्षी नेहमी घात लावून बसलेले, टपलेले, "सुरक्षा हटी ,दुर्घटना घटी",ट्रकच्या मागील घोषवाक्य इथे देखील तंतोतंत लागू पडते.शिकारी पक्षी,मांजर यांच्या कडून मुख्य धोका.घरट्यासाठी जागेची निवड ही अतिशय महत्वाची.
इमारतीच्या स्टिल्टचा खांबावर उभ्या आडव्या पि व्ही सी पाईप आणी छत मिळून बनलेला एक कोनाडा, बुलबुल दांपत्याला सुरक्षित वाटला असावा.माझ्या दृष्टीकोनातून विचार केला तर,घरटे पुर्व,पश्चीम ,उत्तर तिन्ही दिशांनी कुणालाच दिसत नव्हते.फक्त दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे तोंड केले तरच दिसत होते. साधारण दहा फुट उंचीवर पाच-सहा सें.मी.व्यासाचे टोपलीवजा घरटे पाईपलाईन मुळे तिन्हीबाजूंनी जास्त सुरक्षित वाटत होते. सुरक्षिततेचे भान, ज्ञान पक्षांना जास्तच असते. सुर्यपक्षी, माळमुनिया,वेडा राघू,चिरक या पक्षांची घरटी सुद्धा सहजा सहजी दृष्टीस पडत नाहीत.या उलट शिक्रा,घार यांची घरटी अत्यंत असुरक्षित सहज दिसतील अशा ठिकाणी पण यांच्याशी पंगा कोण घेणार.हा जरी माझा विचार असला तरी पक्षांचे जग निराळेच,निसर्ग संतुलन ठेवण्यास सक्षम आहे. चोर पोलीसा पेक्षा दोन पावले पुढे तसाच काहीसा प्रकार शिकार आणी शिकारीचा.
बाहेरच्या बाजुने घरट्यासाठी निवडलेली जागा.
आतल्या बाजुने घरटे.
थोडे बुलबुल पक्षाबद्दल माहीती...
शिपाई बुलबुल (Red Whiskered Bulbul) एक सुंदर, मनमोहक,गोड आवाज असलेला पक्षी.आकार साधारण २० सें. मी.पाठीकडून तपकिरी-बदामी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, त्यावर मोठा टोकदार, काळा तुरा, डोळ्यांजवळ लाल कल्ले, तसेच गालावर पांढरा पट्टा आणि लाल रंगाचे बूड.नर-मादी दिसायला सारखेच. डोक्यावरील मोठा तुरा आणि डोळ्यांजवळ असलेले ठळक लाल आणि पांढरे भाग या पक्षाला राजस सौंदर्य प्रदान करते.
फेब्रुवारी ते ऑगस्ट हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ असून घरटे द्रोणाच्या आकाराचे असते.घरटे बहुधा एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या वनात असते. तसेच ते कडेकपारीत किंवा एखाद्या ओसाड घराच्या छताला लागून असलेलेही दिसून येते. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. पिलांचे संगोपन वगैरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
पक्षीमित्रां बरोबर मी माझे अनुभव शेअर करत होतो.एखाद्या लहान मुलासारखा उत्साह होता पुढे काय होणार याची उत्सुकता,झोप उडाली होती. तेवीस तारीख,दुसरा दिवस,चित्रफित बघून पक्षीमित्र म्हणाला,
"या व्हिडिओ मध्ये घरटे पूर्ण झालेले नाही,ती बसून बघते आहे,पण पूर्ण होण्यावर आहे,ती सकाळ संध्याकाळ सतत तिथे बसेल तेव्हा समजते की त्यात अंडी आहेत,3,ते 4 अंडी असतात,रोज एक या प्रमाणे देतात,12 ते 15 दिवसात पिले निघतात,15 दिवसात पूर्ण वाढ होऊन उडून जातात".
चोवीस तारीख पण संपली. संध्याकाळ झाली,सौ व श्री बुलबुल निघून गेले. रात्री साडेदहा वाजता पुन्हा एकदा खाली जाऊन बघीतले. सामसूम होती, म्हणजे अजून स्थिती जैसे थी....
पंचवीस तारीख उजाडली. सकाळी सकाळी सौ बुलबुल घरट्यात ठाण मांडून बसलेल्या दिसल्या. आज मला बाहेर जायचे होते.किती वाजता परत येणार हे नक्की नव्हते. दुपारी परत आलो तेंव्हा सौ बुलबुल घरट्यात होती. तीचे पंख भिंतीवर नव्वद अंशात उभे होते व डोके घरट्याच्या वर होते. खड्ड्यात बसल्या सारखी दिसत होती. दाट शंका आली.नक्कीच गुड न्युज असणार. श्री बुलबुल झाडावर फुदकत होता. संध्याकाळपर्यंत दोन तीन वेळा चक्कर मारली, ती ठाण मांडूनबसली होती. शेवटी रात्री दहा वाजता पुन्हा एक चक्कर मारली.सौ बुलबुल उठून गेल्या होत्या. झाडावर एक नजर टाकली. सर्व पक्षी नदारद होते. कुणी बघत नाही याची खात्री करून सेल्फी स्टीकने पटकन फोटो काढला.अंदाज बरोबर निघाला. घरट्यात एक अंडे दिसले.
सर्व सुरळीत चालू होते.मला आनंद झाला. बिल्डिंग वासीयांना पण आनंद झाला. आता जबाबदारी वाढली होती.वाह्यात कावळे,दुष्ट कोकीळ यांच्या पासून वाचवायचे होते.पक्षी मित्र म्हणाले तू ढवळा ढवळ करू नकोस, निसर्गाचे आपले नियम असतात, नियोजन असते.
जेव्हां मी निरीक्षण करत असे तेव्हां ते जोडपे माझ्यावर नजर ठेवून असत.माझी एक नजर घरट्याकडे तर दुसरी कावळ्यांकडे.२६ ता.ला सकाळी दोघे पतीपत्नी एकाच फांदीवर बसून बोलत होते.कावळे जवळपास नव्हते. मला पाहाताच ती भुर्रकन उडून घरट्यात जाऊन बसली.दोघांच्यात काही संवाद झाला व तो ही ऊडून गेला. मला काही कळाले नाही पण काय म्हणाले असतील, कदाचित तीने माझी तक्रार केली असेल काय? कदाचित असावा,माझा अपला तर्क....
ती-"दोन दुष्ट कावळे आणी एक छायाचित्रकार सतत माझ्या डोक्यावर बसलेले असतात, मला भिती वाटते रे....."
तो-"अगं घाबरू नकोस,एकाक्षांना मी बघून घेईन,छायाचित्रकार गरीब आहे, तू मात्र छान छान फोटो काढून घे......."
तारीख सव्वीस एप्रिल,सकाळी चारला जाग आली. पटकन खाली पळालो. अंधारात दोन डोळे चकाकले. हायसे वाटले.दिवसभर माझ्या फेऱ्या चालू राहील्या. तीने मात्र आपली जागा सोडली नाही. कावळ्यांचा राबता वाढला होता. श्रीमान बुलबुल एक दोन वेळा दिसले बाकी कुठे होते त्यांनाच माहीत.आता जवळ जवळ वीसेक तास झाले होते,ती जाग्यावरुन हालली सुद्धा नव्हती.तो सुद्धा आसपासच असावा. बुलबुल दांपत्याचा तो त्रास बघून मन क्षणभर अंतर्मुख झाले. संत नामदेव महाराजांचा अभंग आठवला.
क्रिया कर्म धर्म तुज काय चाड । जवळी असतां गोड प्रेमसुख ॥१॥
संकल्प विकल्प सांडीं तूं समूळ । राहेंरे निश्चळ क्षणभरी ॥२॥
आपुलें निजहित जाण तूं त्वरित । वासनारहित होईं वेगीं ॥३॥
नामा ह्मणे तुज ठायींचें कळतें । सोसणें कां लागतें गर्भवास ॥४॥
पक्षीमित्रांच्या अनुभव प्रमाणे आज आणखीन एक अंडे घातले असावे. ती दिवसभर घरट्यात बसून असल्याने कळायला मार्ग नव्हता. रात्री दहा वाजता शेवटची फेरी मारली.सगळीकडे Pin drop शांतता होती. सूर्यास्ता नंतर सारे पक्षी कुठेतरी निघून गेले होते,अगदी कावळे सुद्धा. घरट्याकडे बघीतले.ती पण नव्हती. सेल्फी स्टिक तयार होतीच,पटकन एक चित्र काढले. पुन्हा अंदाज खरा ठरला आणी दुसरे अंडे पहिल्याच्या शेजारी पहुडले होते.
तारीख सत्तावीस एप्रिल, कालचाच ॲक्शन रिप्ले. रात्री दहा वाजता तिसऱ्याचं आगमन झाल्याचे निदर्शनास आले. सेल्फीस्टीकचे काम सध्या तरी संपले होते.
निकाॅन कुलपिक्स ५१०,४२X auto zoom कॅमेरा,दुर्बीण,से.स्टी.,ट्रायपॉड इ. सर्व सामान कार मधेच ठेवले होते.
आता उष्मायन काळ,अंडी उबवणी काळ सुरू झाला होता. उष्मायन म्हणजे ,"ज्या प्रक्रियेत पक्षी इ. आपली अंडी पिल्ले बाहेर येईपर्यंत उबदार ठेवतात, किंवा ज्या प्रक्रियेत अंडी विकसित होते ती पिल्ले बाहेर येईपर्यंत. हा उष्मायन काळ प्रत्येक पक्षांसाठी वेगळा असतो. ".-गुगलबुवांचे आभार.
घरटे बांधणी,अंडी घालणे,अंडी उबवणे, पिलांना खाऊ पिऊ घालणे,स्वच्छता,प्रशिक्षण आणी पिलांना आत्मनिर्भर होईपर्यंत सुरक्षा देणे या आईवडीलांच्या जीवनातील प्रमुख जबाबदार्या....
ता. अठ्ठावीस एप्रिल,कायप्पाद्वारे बातमी सगळीकडे पोहचवली. नातेवाईक, इष्टमित्रांना आनंदात सामील करून घेतले.....
एकोणतीस एप्रिल पासून पुढे सौ बुलबुल क्वचितच घरट्याच्या बाहेर पडत होती. कधी पुर्व,कधी पश्चिम तर कधी दक्षिणेकडे तोंड करून, टुकूर टुकूर इकडे तीकडे बघत सतत बसलेली दिसायची. तीचा भैरव जवळच्या झाडावर निगराणी करत होता. सर्व काही सुरळीत पार पडेल अशी आशा होती. क्वचित ती घरटे मोकळे सोडत होती. दिवसा मागून दिवस चालले होते.
तीन मे पर्यंत बारा दिवस झाले,सर्व सुरळीत चालले होते.आपण माणसं,नवजात अर्भकाचे आगमन झाल्यावर भेटायला जातो.त्यांच्या आनंदात सहभागी होतो.काही जेन्डर बायस नाक मुरडतात,पण पक्षांच्या बाबतीत तसे काही नसते,कुणी भेटायला येणं म्हणजे धोकाच असतो.
कवी म्हणतो ,
"घार हिंडते आकाशी लक्ष तीचे पिलापाशी...",
पण पक्षीदर्शन सुरू केल्यानंतर मला तर काही वेगळेच अनुभव आले.
"घार हिंडते आकाशी लक्ष तीचे दुसर्याच्यां अंड्यापाशी.", यात इतर शिकारी पक्षी सुद्धा आले.
तारीख तीन मे,सकाळ पासूनच हुरहुर लागली होती. कावळे,कोकीळ यांचा राबता वाढला होता.एक घार पण चक्कर मारून गेली.कधी नव्हे तो छोटा शिक्रा, लांब शेपटीवाला शिक्रा येवून गेला.कावळे तर डे वन पासूनच ठिय्या देऊन बसले होते. बुलबुल पक्षांच्या हालचाली सहज वाटत नव्हत्या. दिवसभर दोघानाही असुरक्षित वाटत असावे. दोन्ही पक्ष अग्रेसिव्ह वाटत होते. असुरक्षिततेची भावना माझ्याही मनात मुळ धरू लागली होती. काहीच करू शकत नव्हतो.रात्रीचे अपडेट घेतले,पाय निघत नव्हता. जोपर्यंत ती बसली होती तोपर्यंत धोका नव्हता.तीला घरट्यात सोडून जड मनाने मी घराकडे परतलो.
चार मे, तेरावा दिवस. सकाळी साडेचार वाजताच खाली आलो. से.स्टी.ने फोटो घेतला सर्व जसेच्या तसेच होतो.थोडे हायसे वाटले. सकाळपासून मी सुद्धा ठिय्या देऊन बसलो. धटिंगण कावळे वारंवार रेलिंगवर येवून बसत होते.
पक्षीमित्रांनी वर्तवलेल्या अंदाजा प्रमाणे आज किवां उद्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतील. दोन अंडी जरी एक एक दिवसांच्या अंतराने घातली असली तरी तिघांची जन्मतारीख एकच असणार होती.उत्सुकता शिगेला पोहचली होती. दुपारी बारा साडे बारा पर्यंत बसून राहीलो.ती पण बसूनच होती.फारसे काही घडले नाही.अंदाज घेतला सर्वच्या सर्व पक्षी नदारद होते.तरीदेखील"बाई,दिवस वैर्याचा आहे. लक्ष दे", असे म्हणून दुपारच्या जेवणासाठी निघून गेलो.माहीत नव्हते त्याच झाडावर बसून नियती खदाखदा हसत होती.
संध्याकाळी चहा पिऊन खाली आलो. दोघेही बुलबुल पक्षी दुर फांदीवर बसून एक टक घरट्या कडे बघत होते. थोड्या अंतरावर दोन्ही कावळे निर्लज्जपणे झाडाच्या फांदीवर चोच घासून धार लावत मानखाली घालून बसले होते.त्या एकाक्षांच्या डोळ्यात तृप्तीचे भाव दिसत होते. काळजात धस्स झाले.
विमनस्क अवस्थेतील बुलबुल दांपत्य बघून मला भडभडून आले. लक्षात आले सर्व काही संपले आहे.
शांताबाईंच्या "वाळूत मांडला खेळं" या कवितेतील काही ओळी आठवल्या.
वाळूत मांडला खेळं,घरकुले केली
पाण्याने सारी अलगद धुवुन नेली
क्षितिजावर उमटले अज्ञाताचे लेख
कुणी पुसून टाकले एकामागून एक
-शांताबाई शेळके
अजुनही, सकाळी वाॅकिंग करताना कदाचित ती घरट्यात बसलेली दिसेल असा वेडा विचार मनात येतो आणी मन उद्विग्न होते.
कालाय तस्मै नम:.....
आवांतर- साधारण नोव्हेंबर ते जुन विवीध पक्षांचा विणीचा हंगाम. या हंगामात खालील पक्षांची प्रजनन प्रक्रिया बघावयास मिळाली.
सुर्यपक्षी (Purple Sunbird).
कोतवाल (Black Drongo).
शिपाई आणी लाल बुड्या (Red Whiskered and Vented Bulbul ).
नाचण,न्हावी (Spot Breasted fantail).
शिक्रा (Shikra ).
कावळा (House Crow).
टिटवी (Red Wattled Lapwings ).
वेडा राघू (Asian Green Flycatcher).
या वर्षी टिटवीने चार अंडी आणी ती सुद्धा उभी घातलेली दिसली.हवामान खाते अस्तित्वात नव्हते तेव्हां पासुन टिटवी,चातक आणी पावशा पक्षी पावसाचा अंदाज काढण्या साठी बळीराजाला मदत करतात.
पावशा(Common Hawk Cuckoo) आणी चातक पक्षांचे साक्षात दर्शन या जन्मात पहिल्यांदाच झाले.
त.टी.- क्षमस्व, तकनिकी मागासवर्गीय असल्याने छायाचित्रे डकवू शकलो नाही. आमच्या कायप्पा समूहातील सदस्यांनी मात्र यांचा आनंद वेळोवेळी घेतला.
प्रतिक्रिया
19 Jun 2024 - 8:40 pm | अनन्त्_यात्री
"Hope” is the thing with feathers -
That perches in the soul -
And sings the tune without the words -
And never stops - at all -
- Emily Dickinson
19 Jun 2024 - 8:52 pm | चित्रगुप्त
लेख खूप आवडला. तुम्ही टिपलेली चित्रफीत यूट्युबवर चढवा आणि लिंक इथे द्या.
यूट्युबवर लॉगिन गूगल किंवा फेसबुक द्वारेपण करता येईल.
20 Jun 2024 - 8:57 am | कर्नलतपस्वी
एकदम सोप्प पण नंतर त्याचे संकलन करणे फार कठीण. एका जागेवर बसण्याची प्रकृती नसल्याने मनात असून ही जमत नाही. पुन्हा तकनिकी लोचा आहेच ना....
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
19 Jun 2024 - 9:20 pm | टर्मीनेटर
अगदी... अगदी. आणि
ह्या वाक्यातून 'आधुनिकतेचा ध्यास' सुद्धा त्यांना असल्याचे जाणवले!
छान झालाय लेख. आवडला 👍
20 Jun 2024 - 3:58 pm | भागो
सरजी कडक सल्युट!
20 Jun 2024 - 6:36 pm | कंजूस
पक्षी निरीक्षण लेख फारच आवडला.
पुणे आणि ठाण्यात पक्षी फार आहेत.
एकदा माथेरानला पोस्ट ऑफिस समोरच्या अगदी तीन टेबलाच्या टपरीत चहा प्यायला बसलो होतो चार वाजता. अगदी छान आवाज आला म्हणून वर पाहिले तर अगदी डोक्यावरच्या ट्यूबलाइटच्या( हात लावता येईल इतक्या जवळ)चोकच्यावर इवल्याशा जागेत या लाल गाल्या बुलबुलचे चिमुकले घरटे होते. चोक तापतो त्याची धगही मिळत असेल. मालक बोलले इथेच राहतात हे पक्षी.
(( फोटो Imgur site वर टाका, त्यातून पटकन छोटीशी लिंक मिळते ती वापरा. काम सोपे आहे. शिवाय Imgur वरचे सभासद ही प्रतिक्रिया देतात. ))
20 Jun 2024 - 8:40 pm | कर्नलतपस्वी
धन्यवाद.
आइ एम गुरु वर खाता कसे काढावे जरा व्य नी कराल काय.....
20 Jun 2024 - 9:46 pm | कंजूस
Imgur registration सोपं आहे.
इतर साईट प्रमाणेच
Signup
इमेल
आणि
Password
मग नाव आणि जन्मतारीख.
नंतर
इमेलला आलेली लिंक verify करणे.
खाते तयार.
एक फोटो टाका, त्याला एक ओळ नाव आणि दुसऱ्या चौकोनात विवरण द्या आणि view to all publish.
मग view all my images मधून सिलेक्ट - share - विविध लिंका दिसतील त्यातली 'direct image link' घ्या.
20 Jun 2024 - 9:48 pm | कंजूस
इमेल, password and सोपे username टाका.
20 Jun 2024 - 8:47 pm | प्रचेतस
जबरदस्त लेख. शेवट मात्र दुःखांत झाला.
अशा निरीक्षणांसाठी प्रचंड संयम, चिकाटी लागते. आपण ते साध्य केलेत.
20 Jun 2024 - 9:28 pm | Bhakti
शेवट वाचून वाटलं, खरं आयुष्य किती क्रूर असतं...ते पक्षी जगायला पाहिजे होते.पण छंदाचे रुपांतर अभ्यासपूर्ण निरीक्षणात आणि ते लेखणीतून सर्वांसाठी सादर करणे एकदम आनंदाची गोष्ट आहे.खुपच छान लेख!
21 Jun 2024 - 5:25 pm | कर्नलतपस्वी
भाऊनी छायाचित्रे कशी डकवायाची हे न कन्टाळता शिकवले. बुल्बुल दम्पत्याचा चित्ररूपी प्रवास कलादालनात डकवत आहे.
21 Jun 2024 - 6:25 pm | कंजूस
सुंदर!
21 Jun 2024 - 6:34 pm | पॅट्रीक जेड
लेख आवडला.
23 Jun 2024 - 8:13 am | कर्नलतपस्वी
एक कडक सॅल्युट आणी मनापासून आभार.
योग्य जागी योग्य छायाचित्र डकवून माझे चार शब्द सोन्याहून पिवळे केलेत ते सुद्धा स्वेच्छेने....
23 Jun 2024 - 10:41 am | कंजूस
वा!
छान फोटो आहेत.
( postimages dot com वरून फोटो पटकन फोटो शेअर होतात. खरडफळ्यासाठी बरी आहे. 100 kB ची साईज मिळते. Imgur वर फुल साईज मिळते. स्टोरेजला चांगली. )
25 Jun 2024 - 8:03 am | चित्रगुप्त
एका आयटीवाल्याने सांगितले की जालावर खूप ठिकाणी तुमचा ईमेल आयडी, नाव, फोन नंबर वगैरे देऊ नका. अगदी निवडक खात्रीलायक जागीच काय करायचे ते करा.
25 Jun 2024 - 10:57 am | पॅट्रीक जेड
डुप्लिकेट मेल आयडी ने फेक नंबर द्यायचा.
18 Aug 2024 - 8:14 pm | कर्नलतपस्वी
अजुनही, सकाळी वाॅकिंग करताना कदाचित ती घरट्यात बसलेली दिसेल असा वेडा विचार मनात येतो आणी मन उद्विग्न होते..
.कालाय तस्मै नम:.....
For though the clouds may seem so grey,
And darkness threaten throughout the day,
I know that there is hope in store,
A brighter future to be explored.
So, I will wait and hold on tight,
For the sun that will break the night,
I will look up with a heart of faith,
And let hope fill up my empty space.
And when the sun shines once more,
I'll dance with joy, and my heart will soar,
For the clouds may come and go,
But hope and faith will always glow.
Dr Shamim Ali
म्हणतात ना "उम्मीद पर दुनिया कायम है",
तेरा ऑगस्ट पासून लाल गाल्या बुलबुल दापंत्यानी(Red Whiskered Bulbul) त्याच जागेवर पुन्हा घरटे बनवायला सुरुवात केली. आज आठरा ऑगस्ट दोन अंडी दिली आहेत. भरपुर पाऊ पडत असल्याने कावळे भारद्वाज शिकारी पक्षी नदारद आहेत.
देवा कडे प्रार्थना आहे की यावेळेस तरी या दांपत्याची इच्छा पुर्ण कर.