हांगचौमध्ये आपलं स्वागत!

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
21 Sep 2023 - 10:42 pm

Team India
हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक

कोरोनामुळं एक वर्ष लांबणीवर पडलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत चीनमधल्या हांगझाऊमध्ये (चिनी भाषेतील उच्चार - हांगचौ) पार पडत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचं आणि त्यांच्याबरोबरच इथं आलेल्या पर्यटकांचं स्वागत स्पर्धेचे शुभंकर (Mascots) करणार आहेत. यावेळी भारताचे 655 खेळाडू 39 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये आपलं कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यात नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधू, बजरंग पुनिया यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंकडून भारतीयांना आशा आहेत. या स्पर्धांचं उद्घाटन 23 सप्टेंबरला होणार असलं तरी क्रिकेट, बीच व्हॉलिबॉल, फुटबॉल, नौकानयन (sailing) आणि व्हॉलिबॉल यांचे सामने 19 सप्टेंबरपासूनच सुरू झालेले आहेत.

पूर्व चीनमधील हांगचौ शहर तिथली प्राचीन मंदिरं, कालवे, पुल यासाठी प्रसिद्ध आहे. अशा शहरामध्ये होत असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धांची मशाल (torch) 8 सप्टेंबरला प्रज्वलित करण्यात आली आहे. त्या प्रांतामधील 11 शहरांचा प्रवास करून ती मशाल हांगचौ ऑलिंपिक स्पोर्टस् सेंटर स्टेडियममध्ये 23 सप्टेंबरला उद्घाटन समारंभाच्यावेळी पोहचेल. त्यानंतर त्या स्टेडियममधील मुख्य ज्योत प्रज्वलित करण्यात येईल.

45 देशांमधून आलेले सुमारे 12,500 क्रीडापटू आणि क्रीडारसिक-पर्यटकांचं स्वागत या स्पर्धेचे शुभंकर करतील. यंदाच्या स्पर्धांसाठी शुभंकर म्हणून तीन रोबो प्रतिमांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांची नावं आहेत – कोंगकोंग, लिआनलिआन आणि चेनचेन (चिनी भाषेतील उच्चार अनुक्रमे – त्सोंगत्सोंग, लिएनलिएन आणि छनछन). या तिघांना एकत्रितपणे स्मार्ट त्रिकुट (Smart Triplet) म्हणूनही ओळखलं जातं. इंटरनेट क्षेत्रात हांगझाऊ शहर आणि ते स्थित असलेल्या झेज्यांग (चिनी भाषेतील उच्चार – चचिआंग) प्रांतानं केलेल्या प्रगतीचं प्रतिबिंब या शुभंकरांमध्ये दिसत असल्याचं सांगितलं जातं.

CongCong LienLien ChenChen

पिवळ्या रंगाचा कोंगकोंग 5000 वर्षांच्या चिनी संस्कृतीचंही प्रामुख्यानं प्राचीन लिआंगझू (चिनी भाषेतील उच्चार – लिआंगचू) शहराचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याचा रंग पृथ्वी आणि तिच्यावर येणारं भरपूर पिक दर्शवत आहे. निश्चयी, प्रामाणिक, सुस्वभावी, खेळकर असा कोंगकोंग अदम्य प्रेरणाशक्ती दर्शवत आहे आणि लोकांमधील धैर्य वाढवून चांगल्या जीवनासाठी त्यांना प्रेरित करत आहे.

लिएनलिएन हा त्या प्रांतातील जागतिक वारसास्थळ असलेल्या पश्चिम सरोवराचं (West Lake) प्रतिनिधित्व करत आहे. पश्चिम सरोवरात असलेल्या कमळाच्या पानांवरून लिएनलिएनला आरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळं त्याच्या डोक्याचा आकार कमळाच्या पानासारखा आहे. निसर्गाचा रंग दाखवणारा त्याचा रंग आहे. शुद्ध, दयाळू, चैतन्यशील, गोंडस आणि आदरतिथ्य करणारा लिएनलिएन मोहक वाटतो.

जागतिक वारसास्थळात समाविष्ट असलेल्या बीजिंग-हांगझाऊ ग्रँड कॅनॉलचं प्रतिनिधित्व करणारा तिसऱ्या यंत्रमानव (रोबो) शुभंकराचं नाव छनछन आहे. हांगझाऊमधील ग्रँड कॅनॉलवर सुमारे 400 वर्षांपूर्वी उभारलेल्या या पुलाच्या नावावरून याचं नाव देण्यात आलं आहे. तो ग्रँड कॅनॉल, किआनतांग (चिनी भाषेतील उच्चार - छिएनथांग) नदीवरून घेण्यात आलं आहे. या नदीला पूर्वी हागंचौ किंवा त्सिएनतांग नावांनी ओळखलं जात होतं. ग्रँड कॅनॉल, किंएनतांग नदी आणि समुद्रापलीकडील जगाचं छनछन प्रतिनिधित्व करतो. त्यामुळंच तो निळ्या रंगाचा असून तो विज्ञान-तंत्रज्ञानाला प्रतिध्वनीत करतो. त्याच्या डोक्याचा वरचा आकार किआनतांग नदीच्या लाटांप्रमाणे करण्यात आलेला असून कपाळावर गोंगचेन पुल (चिनी भाषेतील नाव - कोंगछनछिआओ) दाखवण्यात आलेला आहे. शूर, बुद्धिमान, आशावादी आणि उपक्रमशील ही या छनछनची वैशिष्ट्यं आहेत. असे हे वैशिष्ट्यपूर्ण शुभंकर संपूर्ण 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या काळामध्ये त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला आपलं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहणार आहेत. त्यामुळंच या शुभंकरांकडं उत्साह, शांतता आणि मैत्री या ऑलिंपिकच्या तत्त्वांचे प्रतिनिधी म्हणूनही पाहिलं जाईल.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 चं ब्रीद आहे – Heart to Heart @ Future, तर संकल्पना गीत आहे – The Love We Share.

हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांचा बोधचिन्ह (Emblem) किआनतांग नदीच्या प्रवाहावरून घेण्यात आलं आहे. या बोधचिन्हात किआनतांग नदी, चिनी पंखा, धावण्याच्या स्पर्धेचे ट्रॅक आणि Olympic Council of Asia चं बोधचिन्ह असलेला सूर्य यांचा समावेश आहे. या बोधचिन्हाला Surging Tides असं नाव देण्यात आलं आहे. बोधचिन्ह सूचवण्यासाठी जगभरातून आलेल्या 4000 प्रवेशिकांमधून या आरेखनाची निवड केली गेली आहे. निवड केलेलं आरेखन चायना ॲकॅडमी ऑफ आर्टस् मधील युआन याऊमिन यांचं आहे.

https://avateebhavatee.blogspot.com/2023/09/blog-post.html

मांडणीवावरक्रीडाप्रकटनलेखबातमीमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

निनाद's picture

22 Sep 2023 - 4:38 am | निनाद

खूपच वेगळी माहिती!

माहिती फारच सुरेख आणि अतिशय योग्य उच्चारांसह समजेल अशी..लेख पुन्हा एकदा सावकाश नक्की वाचावा असा झाला आहे.

पराग१२२६३'s picture

22 Sep 2023 - 12:25 pm | पराग१२२६३

धन्यवाद निनाद आणि निमी.

कर्नलतपस्वी's picture

22 Sep 2023 - 3:49 pm | कर्नलतपस्वी

जिमन्यास्टीक टीम

कर्नलतपस्वी's picture

22 Sep 2023 - 3:52 pm | कर्नलतपस्वी

विवेक देशपांडे,औरंगाबाद यांची या खेळासाठी पंच म्हणून नेमणूक झाली आहे.तो स्वता: अंतर राष्ट्रीय खेळाडू आहे.

माझ्या मेव्हण्याचा मुलगा. वयाच्या चार वर्षांपासून खेळत आहे. आई वडिलांकडून सतत प्रोत्साहन मिळत गेले.

पराग१२२६३'s picture

22 Sep 2023 - 10:40 pm | पराग१२२६३

अभिनंदन आणि शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2023 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण. धन्यवाद. भारतीय संघास पदकांसाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

वामन देशमुख's picture

23 Sep 2023 - 5:20 pm | वामन देशमुख

तुमचे वेगळ्या विषयांवरचे लेख नेहमीच आवडतात.

आशियाई स्पर्धा खेळाडू चाहते व प्रेक्षक यांना शुभेच्छा.

---

यासंदर्भातील ही बातमी वाचण्यात आली.

चीनने अरुणाचलमधील 3 खेळाडूंना हँगझोऊ येथे आशियाई खेळांसाठी प्रवेश नाकारल्याने भारताने तीव्र निषेध नोंदवला, क्रीडामंत्र्यांनी भेट रद्द केली

पराग१२२६३'s picture

23 Sep 2023 - 11:46 pm | पराग१२२६३

धन्यवाद बिरुटे जी आणि देशमुख जी