अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला.
राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले -
१. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना काय बोलायचे आहे तेही सुधारत नसल्याचे चिन्ह.
२. हे राम - ताजच्या पाहणी दौऱ्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासमवेत रामगोपाल वर्मा आणि त्यांचा अभिनेता मुलगा रीतेश होता यातून विलासरावांचे (कधीच नसणारे) गांभीर्य चव्हाट्यावर आले.
३. कुत्रंही फिरकलं नसतं - केरळचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांना एका हुतात्म्याच्या पित्याचा रास्त संतापही समजून घेता येत नव्हता. आणि एरवी पोपटपंची करणारे सीताराम येचुरींसारखे त्यावर भाष्य करण्यासही तयार नव्हते.
४. मिलिटरी ऑप्शन - परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांचे विधान 'नोबडी ईज टॉकिंग अबाऊट मिलिटरी ऑप्शन'. वास्तवात त्यांचे विधान वेगळेच होत म्हणे. तेदेखील का आणि कशासाठी केले हेच कळत नाही. पत्रकारांनी, त्यातही चॅनलवाल्यांनी, काहीही विचारावे आणि त्याला काहीही उत्तर यावे हे नेतृत्त्वाचे लक्षण?
५. नैतीक जबाबदारी - शिवराज पाटील आणि विलासरावांनी राजीनाम्याचे दिलेले कारण. त्यावर बहुदा जनतेने विश्वास ठेवावा अशी त्यांची अपेक्षा असणार. पण नैतीक जबाबदारीच होती, तर त्यासाठी आधी स्पष्टीकरणे करीत बसण्याची गरज येत नव्हती हे त्यांना समजेलच नसावे. जाता-जाता कारकीर्दीविषयी विलासराव तर समाधानही व्यक्त करून गेले.
६. हल्ल्याचा कट - रिसर्च अँड अनॅलिसिस विंगच्या विरोधात बातम्या आल्यानंतर याच यंत्रणेकडून हल्ल्याच्या दिवशीचे हल्लेखोरांचे दूरध्वनी संवाद आपण कसे टॅप केले होते हे सांगणारी 'सोर्सेस सेड' स्वरूपाची वृत्ते विशिष्ट प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध होतात म्हणजेच ही यंत्रणा कुणावर तरी शरसंधान करू पहात होती.
७. तटरक्षक दलाचे चुकले - नौदलप्रमुखांचे वक्तव्य. त्याला असलेली नौदलाच्या सफाईची झालर. त्यातून इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर केलेली (रास्त, पण येथे अनाठायी) टीका.
८. आयएसआय - या यंत्रणेच्या महासंचालकांना बोलावणे किंवा ते येणार असल्याचे जाहीर करणे, मग त्यातून पाकने माघार घेतल्यानंतर चूप राहणे.
९. ते वीस (की एकवीस) जण - ही यादी पाकिस्तानला नव्याने देण्याचा मूर्खपणा का केला असावा याचे काहीही सयुक्तिक उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. पण त्याचे कारण कोणालाही समजू शकते - जनतेच्या डोळ्यांत धूळफेक.
....
आकडाच गाठायचा म्हणून दहावे उदाहरण देत नाही. कारण आकडा तेथे थांबणार नाही. चार दिवस राज्याला नेतृत्त्वहीन ठेवून आज जे निर्णय राज्यकर्त्यां पक्षांनी घेतले तेथपर्यंत हा प्रवास येऊन पोचला आहे या घडीला. सुमारांच्या तावडीत सापडलेल्या या देशाचे, येथील व्यवस्थेचे यापुढे काय याचा एक भयावह अंदाज येण्यास हे दाखले पुरेसे असावेत.
----
काही गोष्टी मुद्दाम पाहू.
मुंबईवर झालेला हल्ला हा देशावरचाच हल्ल आहे याविषयी कोणाचेच दुमत नाही. असे असेल तर आजच्या घडीला महाराष्ट्रात आणि देशातही खऱ्या अर्थाने 'नेतृ्त्त्व' देऊ शकणाऱ्या किती जणांची नावे आपल्या पुढे येतात?
महाराष्ट्राच्या सर्व विधिमंडळ सदस्यांची यादी डोळ्यांपुढून घाला. काहींच्या आमदार म्हणूनच काम करण्याच्या कुवतीविषयी शंका येतील तो भाग बाजूला ठेवू. त्यांच्यात खऱ्या अर्थाने या युद्धप्रसंगी त्या-त्या खात्याला कार्यक्षमपणे नव्या परिस्थितीला तोंड देण्याजोगी दिशा देऊ शकतील असे किती निघतील? प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या मते सत्ताधारी, विरोधी आणि मधले असे सगळे गोळा केल्यानंतरही दोन्ही हाताच्या बोटांवर बसतील इतकी नावे पुढे आली नाहीत.
प्रश्न साधा-सरळ आहे. आज नेतृत्त्व कसे हवे आहे? नेता नुसताच कार्यक्षम मंत्री असून चालणार नाही. तो प्रेरणादायी असावा लागेल. काही ठळक खाती डोळ्यांपुढे घेऊ. गृह. या खात्याला आज जी दिशा द्यायची आहे त्यात याआधी कधीही विचारात न घेतलेला देशाच्या संरक्षणाशी निगडीत असा एक घटक समाविष्ट झाला आहे. तो विचार करू शकणारे किती लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले आहेत? अर्थ. काही बोलण्याची गरज आहे? जयंत पाटलांची आजवरची कामगिरी तुटीकडून शिलकीकडे आहे हे खरे, पण प्रेरणादायी? शंका आहे. नगरविकास. मुंबईच्या आणि इतरही महापालिकेशी संबंधित काही गोष्टी येथे असतात. त्या-त्या शहरांच्या सुरक्षेत तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांना भूमिका नसते, असे म्हटले तर ठीक. पण ती असते असे म्हटले तर भूखंडांच्या पलीकडे या खात्याच्या दिशेचा विचार करणारे कोणी आहे? हे केवळ दाखले आहेत. बंदरविकास यासारख्या खात्यांकडे जात नाही.
आज संध्याकाळी हा मजकूर लिहित असताना एका माहितगाराने सांगितले की, राज्याचे गृहमंत्रीपद स्वीकारण्यास कोणीच तयार नाही. कारण काय करावयाचे आणि कसे करावयाचे याची काही दिशा विचारांच्या स्तरावरही आलेली नाही. प्रत्येक जण समकालीन वास्तवात गर्क, मग्न. भविष्याचा थोडा वेध घेऊन आजवर विचार केलेलाच नाही. आता करणे म्हणजे आव्हानच. ते पेलण्याची ताकद कोणातच नाही? (माझ्या मते एक अपवाद निघेल, पण त्यांच्या याआधीच्या कारकीर्दीकडे पाहिले तर मात्र शंका येतातच).
केंद्रातही फारसे वेगळे काही नाही. मुंबईवरील हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला उद्देशून 'संदेश' दिला. त्यात काहीही ठोस नव्हते. त्यांच्यानंतर प्रणव मुखर्जी बोलले. त्यांची विधानेही नेहमीसारखीच भारत हे एक 'सॉफ्ट स्टेट' आहे अशा स्वरूपाची होती. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिझा राईस येऊन गेल्या. या दोन्ही नेत्यांनी किंवा राईस यांनी ज्यांची भेट घेतली त्या गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही त्यांना चार खडे बोल सुनावल्याचे कुठेही दिसले नाही. अमेरिकेच्या या मुद्यावरील धोरणात काही विसंगती आहेत हे जाहीरपणे खडसावण्याची गरज नव्हती? अमेरिकेच्या "संयम ठेवा"वर "तो आम्ही ठेवतोच आहोत, ठेवलेलाच आहे. तुम्ही तुमचा "संयम" केव्हा सोडणार आहात? पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरचे युद्धच या लढ्यात महत्त्वाचे आहे?" असा सवाल करणे आवश्यक नव्हते? अमेरिकेची विसंगती आजवर या नेत्यांनी दाखवून दिली असेल असे मानूया. पण जनतेला प्रेरणा देण्यासाठी एकदा तरी हे काम जाहीरपणे नको करायला? डावपेच नका उघड करू, पण डावपेचाची दिशा कशी असेल हे नको सांगायला जनतेला? सुमारपणा नेतृत्त्वाचा, दुसरे काय?
शिवराज यांनी राजीनामा दिल्यानंतर चिदंबरम यांची त्या पदावर नियुक्ती झाली. सूत्रे स्वीकारतानाच त्यांनी प्रांजलपणे कबूल केले की, आपण याला तयार नव्हतो. आज त्यांनी आणखी एक गोष्ट केली आहे. मुंबईवर हल्ला झाला, कारण गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्या असे त्यांनी कबूल करून टाकले. त्यांचा अपवाद करावा, असे म्हणायचे तर आजच्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी या कबुलीव्यतिरिक्त काहीही केले नाही. आता त्यांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावे लागेल. कारण अपयशाची कबुली दिल्यानंतर कारवाई काय होणार हे पहावेच लागते.
का असे घडते? महाराष्ट्राबाबत जी कसोटी लावली विधिमंडळ सदस्यांना, तीच केंद्रातही लावून पाहिली तर तशीच स्थिती समोर येते, हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रेरक नेतृत्त्व नाही. दूरवर पाहू शकणारे मंत्री नाहीत. हे सारे असे असूनही संताप-संताप करीत बसण्यापलीकडे या घडीला काहीही समोर न दिसणारी जनता (माझ्यासह).
ही अशी स्थिती येते, कारण आपण सारेच सुमार आहोत का?
ठाऊक नाही. विचार करावा लागेल इतके मात्र नक्की.
पण कसा करणार? आत्ताच केंद्राचा निर्णय आला आहे, लिटरमागे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल २ रुपयांनी स्वस्त. आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी. मला मिळालेला दिलासा. चला माझ्या दैनंदिन जगण्यात एक वेगळा तरी दिलासा दिला. तो आजच का दिला, हे मी आता विचारणार नाही. कारण माझा त्यात लाभ झालाच आहे. त्या निर्णयामागील कारणपरंपरा मला ठाऊक आहे. ती काही आजच निर्माण झालेली नाही हेही खरे आहे. हा निर्णय आणखी दहा दिवसांनी झाला असता तरी माझ्यावर तसा फरक पडला नसता, इतर अनेकांवरही पडला नसता हेही खरे. तरीही त्याने मला दिलासा आहे.
संताप ताणून भरलेल्या बाटलीवरील बुच्च सरकारने इतक्या खुबीने काढले आहे की, त्यातून फसफस केव्हा बाहेर पडली हे मलाही उमजेनासे होणार आहे.
फक्त पंधरवडाभर थांबूया. पाणी-पाणीच राहिलेले असेल हे नक्की!!!
ता. क. : नारायण राणे यांच्या बंडापाठोपाठ राड्याच्या भीतीने म्हणे 'वर्षा'वरचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 'वर्षा' हे तुमचे-माझे नव्हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे.
तरीही...
भारत माझा देश आहे(च)!!!
इतक्यात काही लिहिण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते. पण माझ्या एका मित्राने आठवण करून दिली की, महाराष्ट्राच्या या नव्या दोन्ही नेत्यांची नावे एका गाजलेल्या प्रकरणात होती. तेलगीचे प्रकरण. तो म्हणाला, हे तेलगीचे कॅबिनेट म्हणता येईल.
तेलगीला स्टँप व्हेंडरचा परवाना मिळाला तो चव्हाणांच्या कारकीर्दीतच. भुजबळांनी अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या केल्या ते सर्वश्रृतच आहे. हे दोघेही त्यात "दोषी" ठरलेले नाहीत.
माझे शब्द मागे! ही मंडळी सुमार नाहीत. खचितच नाहीत.
प्रतिक्रिया
5 Dec 2008 - 6:27 pm | आनंदयात्री
आम्हाला वाटले आमच्या प्रातःस्मरणीय परमपुजनीय सदगुरु केशवसुमारांबद्दल काही आहे की काय .. हुश्श .. बरे झाले काही नाही .. एक लढाई वाचली.
5 Dec 2008 - 6:48 pm | लिखाळ
अहो पेट्रोल स्वस्त झाले आहे.. आता विकेंडला थोडे बाहेर फिरुन येतो.... आणि सगळे राजकारणी सारखेच हो ! एकाला झाका दुसर्याला काढा... चालायचंच..
--(प्रातिनिधिक सुमार) लिखाळ.
5 Dec 2008 - 7:04 pm | विसुनाना
अनायसे परकीय प्रवाशांचा लोंढा थांबल्यामुळे भारतात पर्यटन स्वस्त झालेच आहे. आता तर काय? पेट्रोल,डिझेलही उतरले!
वा! चला, निवडणूकीच्या आसपास रजा टाकून केरळ किंवा थंडी नसेल तर कुलू,मनालीला जाऊन येऊ. नाहीतरी मी मतदान करून काय उजेड पडणार ते दिसतेच आहे!
----(बेसुमार सुमार) विसुनाना
5 Dec 2008 - 7:33 pm | सुवर्णमयी
मोडक, वेगळे काय घडले? काय करायचे कसे करायचे ते सर्व ठरलेले असते. त्यांना सुमार म्हणायला आधी आपण सुमार आहोत का असे प्रश्न मनात येतात आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हीच दिले आहे.
- स्वतःच्या हिताभोवतीच्या परीघात माणसे फिरत असतात. चार सुशि़क्षित माणसे काय फरक पडतो मतदान करून म्हणून करत नाही, किंवा अगदी जाऊन मतदान करतात पण सगळी चक्रे फिरवणारी मते वेगळीच आहेत आणि ती कशी मिळवायची ते उमेदवारांना माहिती आहे! त्यामुळे हे थांबणार कसे?
एकापाठोपाठ एक घटना तशाच घडत गेल्या की हळूहळू काही जण हे असेच असते आणि असेच होईल असे मान्य करतात.. तसे झाले माझे असे म्हणू.
दूर्घटना घडल्याचे वाईट नक्कीच वाटते पण त्यावर काही उपाययोजना करतील अशी आशा सुद्धा वाटत नाही..करावी अशी सदिच्छा. पण करू शकतील का? तेवढी पात्रता आहे का? इत्यादी प्रश्न फार गुंतागुंतीचे वाटतात.
सोनाली
5 Dec 2008 - 7:25 pm | विकास
मला वाटले लोकसत्तेत काहीतरी नेहमी प्रमाणे अग्रलेख आला की काय... ;) म्हणून वाचायला घेतले तर एक चांगला लेख वाचायला मिळाला. अधिक प्रतिसाद नंतर देतो.
6 Dec 2008 - 12:48 am | प्राजु
एक चांगला लेख वाचायला मिळाला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Dec 2008 - 1:13 am | विजय राणे
आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला सरकार मिळते, असे म्हणतात. आता राजकारणी सुमार आहेत हा त्यांचा दोष नाही. कारण आपणच सुमार आहोत. खरे की नाही? नसेल तर नाही म्हणा. आपल्या स्वार्थी वृत्तीमुळेच ते आपल्यावर राज्य करीत आहेत. वरील लेख लिहून तुम्ही स्वत: सुमार आहात, हे प्रांजळपणे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!
6 Dec 2008 - 8:06 am | अनिल हटेला
खरये.....
>>>एक चांगला लेख वाचायला मिळाला.
असेच म्हणतो.....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
6 Dec 2008 - 9:29 am | भडकमकर मास्तर
श्रावण, छान लेख होता....
... लेखाचा हताश शेवट सुद्धा अगदी अगदी प्रातिनिधिक आहे....मलाही असंच वाटलं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
6 Dec 2008 - 10:27 am | मैत्र
+१....
उत्तम लेख..
6 Dec 2008 - 11:33 am | विसोबा खेचर
लेख चांगला वाटला!
6 Dec 2008 - 12:35 pm | मुक्तसुनीत
मला वाटते, खुजेपणा आणि सुमारपणा या गोष्टींकरता आपल्या पुढार्यांनाच केवळ दोष देऊन चालणार नाही. वर श्री. राणे यांनी "आपण सुद्धा सुमारच आहोत" अशा अर्थाचे विधान केले आहे , ते मला पटते. आपल्या कक्षेच्या , वर्तुळाच्या पलिकडे जाण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते. कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे.
थोडे विषयांतर होईल , पण विषय राजकारणी लोकांचा चालला आहे, त्यामुळे मी जिथे आहे तिथल्या राजकारणाबद्दलच्या अत्यल्प अशा माहितीवरून मला असे दिसते की, ओबामा यांच्या निवडून येण्यामागे, त्यांच्या "ऑल्सो रॅन"पेक्षा वेगळे असण्याच्या प्रतिमेचाही भाग नि:संशय आहे. अर्थात हे म्हणजे अजून मैदानातच न उतरलेल्या खेळाडूबद्दल आधीच कौतुक वाटण्याजोगे आहे हे खरे , पण, सांगायची गोष्ट म्हणजे लोकांना सुमारपणापेक्षा काहीतरी वेगळे , असामान्यत्वाच्या निदान काही खाणाखुणा दाखवणारे काही हवे असते , त्याचे आकर्षण असते.
तर , या सुमारपणाचा निकष लावून पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारंणात आशा वाटेल असा कुणी माईचा लाल राजकारणी सध्याच्या स्थितीत अस्तित्त्वात नाही असे दिसते. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही ,(आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे ) काही एक समज असणारे , करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. राजकारणातून हे दोघेही निवृत्त झालेलेनसले तरी एकूण परतीचे वारे सुरू झाल्यागत स्थिती दिसते. पण त्यांची पोकळी भरून काढणारे नेतृत्त्व अजून तयार झालेले दिसत नाही. यशवंतराव चव्हाण , वसंतरराव नाईक , वसांतदादा पाटील यांनंतर त्यांच्या इतके मोठेपण ज्याप्रमाणे (काँग्रेस च्या संदर्भात ) पवारानी मिळवले तितपत कुणी इतर आजतरी दिसत नाही.
6 Dec 2008 - 1:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे.
सहमत.
शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही, (आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे) काही एक समज असणारे, करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे.
या दोघांमधे एक सूक्ष्म फरक करावा असं वाटतं. शरद पवार निवडणूका लढवून, कायदेशीर जबाबदारी घेऊनच राजकारण करत होते आणि करतात. बाळ ठाकरेंनी निवडणूक लढवल्याचे (भले ती राज्यसभेची असेल) माझ्यातरी माहितीत नाही.
श्रावणकाकांचा लेख आवडला. आणि शेवट तर जास्तच आवडला.
7 Dec 2008 - 4:14 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला. आणि शेवट तर जास्तच आवडला.
अदितीसारखेच म्हणते.
स्वाती
8 Dec 2008 - 4:53 am | मृदुला
नेते सार्यांचे नाही तर बहुसंख्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे सुमारांची बहुसंख्या आहे असे म्हणावे लागेल.
पण माझ्यामते, प्रश्न कुवतीचा नसून क्षमतेच्या वापराचा आहे. बहुसंख्यांना आवश्यक तेव्हढे शिक्षण, ज्ञान नसण्याचा आहे.
नेत्याचा मुलगा नेता ही सरंजामी मनोवृत्ती घासून काढता आली तरी प्रतिनिधित्वाचा दर्जा उंचावेल असे वाटते.