दिलखुलास

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
19 Nov 2008 - 12:46 am

आज झी मराठी च्या लिट्ल चॅम्प्स चा कार्यक्रम पाहिला आणि शंकर महादेवनला मानला!

शंकर महादेवन आजचा पाहुणा परिक्षक होता आणि शंकर महादेवनने आपल्या दिलखुलासपणाने सर्वांना जिंकुन घेतले. एका प्रथितयश कलाकाराने उमलत्या कलाकारांना ज्या उस्फुर्तपणे, ज्या उत्साहाने आणि ज्या पद्धतिने दाद दिली त्याला तोड नाही. परिक्षक हे बहुधा स्पर्धकांचे कौतुकच करतात, काही सल्ल्ला वा सुचना देतात आणि प्रोत्साहनही देतात, कधी सौम्यपणे त्रुटी नजरेस आणुन देतात. मात्र 'मी' पण विसरुन सर्व बालस्पर्धकांचे कौतुक शंकर महादेवनने केले त्याला दाद दिलीच पाहिजे.

अगदी पहिली फेरी हिंदी गाण्यांची होती. यात सर्वप्रथम गाणे सादर केले ते शमिका भिडे हिने व तिला सा ते नी या पट्टीत दोन्ही परिक्षकांनी ध दिला. मात्र नंतर प्रत्येकच स्पर्धकाला शंकरने आग्रह करुन दोन्ही परिक्षकांना नी देणे भाग पाडले. शमिका पहिली न येता नंतर आली असती तर तिलाही नी मिळाले असते असे आम्ही म्हणत असतानाच फेरी अखेर शंकर महादेवनने स्वतः उभे राहुन जाहिर केले की सुरुवातीला गाण्याचे परिक्षण, गुणांकन या विषयी त्याला काहीच माहित नसल्याने पहिल्या स्पर्धकावर अन्याय झाला आहे आणि त्याने परिक्षकांना शमिकाला देखिल दोन नी देण्याची विनंती केली.

शंकरने प्रत्येक बाल कलाकाराला गाणे संपल्यावर उठुन उभे राहत दाद दिली, दुसर्‍या फेरीत तर थेट मंचावर जात त्याने प्रत्येकाची गळाभेट घेतली. प्रत्येक गाण्यातले काय आवडले हे सांगत त्याने कुणाला 'पुन्हा एकदा' ची फर्माईश दिली, कुणाला एखादी आवडलेली जागा पुन्हा घ्यायला सांगितली तर कुणाच्या बरोबर तो स्वतः गायला.

पाहुणा परिक्षक असावा तर असा. घरी शिस्त लावायला आई वडील असतातच, पाहुण्याने केवळ घरातल्या मुलांचे कौतुक करायचे असते. तदवत या गुणी कलावंताने स्वतः ला विसरुन स्पर्धकांचे जे काही दणदणीत कौतुक केले ते खरोखरच उल्लेखनिय आहे. दुसर्‍याला नावे ठेवणे वा दुसर्‍याच्या चुका काढणे सोपे असते पण उमलत्या कलाकारांचा आत्मविश्वास वाढावा म्हणुन त्यांचे असे दिलखुलास कौतुक करणे फार क्वचितच कुणाला जमते.

कलासंगीतसंस्कृतीसमाजसद्भावनाप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

19 Nov 2008 - 1:35 am | आजानुकर्ण

आता कोणती फेरी चालू आहे? मी असे ऐकले की शाल्मली सुखटणकर बाहेर गेली म्हणून, आणि रोहित फडके अजूनही आहे?

(शाल्मली चांगली होती असे वाटते.)

प्रथमेश, केतकी, राजश्री ही मंडळी आहेत का?

आपला,
(प्रेक्षक) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 2:16 am | विसोबा खेचर

महादेवनसाहेबाने लहान मुलांचं भरभरून कौतुक केल्याचा मुद्दा वाचला. मुलं निश्चितच गुणी आणि चांगलं आहेत..परंतु हे वाचत असतांना,

पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या कुंदगोळातल्या भर उन्हाळ्यात अक्षरश: तीनशे फूट खोल गेलेल्या विहिरीतून एका वेळेस दोन मोठ्या कावड्या आणि अश्या सहा-सात फेर्‍या मारणार्‍या, वयाने पोरसवदा असणार्‍या आमच्या अण्णांकरता त्यावेळेस गुरुगृही कुणाकडूनही कौतुकाचा एक शब्दही नव्हता,

याची आठवण झाली!

त्यात पुन्हा पहिले दीड वर्ष अण्णांना काहीही शिक्षण मिळालं नाही. फक्त अक्षरश: पडेल ते घरकाम करणं आणि गुरुजी केव्हा गाणं शिकवतील याची वाट पहाणं! एवढंच अण्णांनी केलं! एवढंच नव्हे, तर सवाईगंधर्वांनी पाणी भरण्याकरता एक नवा गडी ठेवला आहे अशीही चर्चा त्या काळी कुंदगोळात होती ही वस्तुस्थिती आहे!

असो,

आता जमाना बदलला आहे.. आता प्रत्येक मुलाच्या प्रत्येक गाण्यानंतर कौतुकाचा वर्षाव, तू फार छान गायलास, तू फार सुरेख गायलीस, अशी वैशाली आणि अवधुतने केलेली टिप्पणी, बक्षिसांचा, एसेमेसचा वर्षाव..आईबापांच्या डोळ्यात आनंदाश्रू वगैरे वगैरेचा जमाना आला आहे..! शॉर्ट टर्मकरता म्हणा किंवा तात्कालिक म्हणा या सर्व गोष्टी ठीकच आहेत परंतु लॉगटर्मचा विचार करता या सर्व गोष्टी कलेला अत्यंत घातक आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे..

असो..

कालाय तस्मै नम:..!

आपला,
(ऑर्थोडॉक्स!) तात्या.

आजानुकर्ण's picture

19 Nov 2008 - 2:28 am | आजानुकर्ण

अलिबाग, आळंदी, लातूर, माझगण, संगमेश्वर अशा खेड्यापाड्यातून , छोट्या ठिकाणांवरून आलेल्या या मुलांचं मनमोकळं कौतुक करावं. अशा गावांत कितपत मार्गदर्शन मिळत असेल याचाही विचार करावा. ही मुलं खूप गुणी आहेत.

अण्णांच्या आठवणीत मीही रमतो. पण यातलाच एखादा ज्युनिअर अण्णा होणार नाही हे कशावरून.

आपला,
(मनमोकळा) आजानुकर्ण

यानिमित्तानं पुण्यामुंबईची मक्तेदारीही मोडून निघत आहे. ;)

आपला,
(गावाकडचा) आजानुकर्ण

चतुरंग's picture

19 Nov 2008 - 2:45 am | चतुरंग

हा कार्यक्रम मी स्वतः नियमित पाहतो. मुलं खरंच खूप मेहनत घेतात.
पाहुण्या परीक्षकात आत्तापर्यंत शृती सडोलीकर, संजीव अभ्यंकर, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, उषा मंगेशकर, महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन अशा नामवंतांनी हजेरी लावली आहे!
त्या सर्वांनी कौतुकाबरोबरच शास्त्रीय संगीताचा रियाज करा, मेहेनत करा, नम्र रहा, मोठेपणाच्या मागे लागू नका, एकदम स्टेज शोज करुन आवाजाला बाधा आणू नका; शब्द, सूर , लय्-ताल हे सांभाळून गाण्यासाठी पूर्वीच्या गायक-गायिकांनी कायकाय करुन ठेवले आहे त्याची उजळणी करा. असे अनेक मोलाचे सल्ले दिलेले मी स्वतः ऐकलेत. ही मुलं-मुली आणि त्यांचे आई-बाप, पालक हे डोक्यात हवा गेलेले नक्कीच वाटत नाहीत! त्यामुळे ह्यातून काही नामवंत गायक-गायिका पुढे येतील हे नक्की!
(अण्णांनी, बाबूजींनी, लता-आशाने आणि इतरही महान लोकांना अनेक शरीर कष्ट पडले, ते त्यांनी समर्थपणे पेलले, म्हणून आज ही मुलं इथे आहेत हे विसरले नाही म्हणजे झाले. वारसा हा नम्रतेने आणि कृतज्ञतेने पुढे चालू रहातो आणि प्रगती ही आधुनिकतेची योग्य कास धरल्याने होते ह्यातले तारतम्य गमावता कामा नये!)

चतुरंग

सर्किट's picture

19 Nov 2008 - 3:46 am | सर्किट (not verified)

प्रगती ही आधुनिकतेची योग्य कास धरल्याने होते ह्यातले तारतम्य गमावता कामा नये!

वा वा वा ! आज सर्व आजी आणि माजी संपादक मालकांच्या विरोधात विचारप्रदर्शनात गुंग झालेले पाहून अंमळ गंमत वाटली.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आणि माझ्यापुरते बोलायचे झाले तर योग्य वाटणार्‍या मुद्यात मी कोणाविरुद्धही बोलू शकतो, त्यात कोणी मालक आहे किंवा कसे ह्याला महत्त्व नाही!
उगीच भांडायचे म्हणून भांडायचे असे नाही.

चतुरंग

आजानुकर्ण's picture

19 Nov 2008 - 5:47 am | आजानुकर्ण

चतुरंगांशी सहमत आहे

आपला,
(तात्त्विक) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 7:18 am | विसोबा खेचर

वा वा वा ! आज सर्व आजी आणि माजी संपादक मालकांच्या विरोधात विचारप्रदर्शनात गुंग झालेले पाहून अंमळ गंमत वाटली.

हा हा हा! कोई बात नही, हम संभाल लेंगे...! :)

साली पोरांना तात्यामामाच्या अंगाखांद्यावर खेळून त्याच्या दाढीमिशा ओढायला जाम मजा वाटते! :)

तात्या.

सर्किट's picture

19 Nov 2008 - 9:19 am | सर्किट (not verified)

साली पोरांना तात्यामामाच्या अंगाखांद्यावर खेळून त्याच्या दाढीमिशा ओढायला जाम मजा वाटते!

चालायचेच.

आजवर तात्यामामाने आपल्या भाच्यांना संपादक नेमले, मग ते थोडे मोठे झाल्यावर मामाच्या मिशा ओढणारच !

मग मामा "चालायचेच" शिवाय आणखी काय म्हणणार ? काहीही झाले तरी भाच्यांशी अंमळ प्रेमळ संबंध असणारच मामाचे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 7:14 am | विसोबा खेचर

मुलं-मुली आणि त्यांचे आई-बाप, पालक हे डोक्यात हवा गेलेले नक्कीच वाटत नाहीत!

आणि जाऊही नयेत एवढीच इच्छा...

त्यामुळे ह्यातून काही नामवंत गायक-गायिका पुढे येतील हे नक्की!

अवश्य यावेत...

तात्या.

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 7:25 am | विसोबा खेचर

ही मुलं खूप गुणी आहेत.

नक्कीच आहेत...

पण यातलाच एखादा ज्युनिअर अण्णा होणार नाही हे कशावरून.

झाला तर उत्तम आहे...!

यानिमित्तानं पुण्यामुंबईची मक्तेदारीही मोडून निघत आहे.

गाण्याच्या बाबतीत एखाद्या गावाची मक्तेदारी, या मुद्द्याला माझ्या मते तसा काहीही अर्थ नाही..!

अर्थात, अद्याप तरी एक भारतरत्न पुण्यात आणि एक भारतरत्न मुंबईत रहात आहे ह भाग वेगळा... :)

असो,

तात्या.

कपिल काळे's picture

19 Nov 2008 - 4:09 am | कपिल काळे

ह्या कार्यक्रमाचे स्वरुप , सादरीकरण चांगले आहे.

अवांतर : पण सुंदर तरुणीच्या गालावरचच्या तीळाप्रमाणे पल्लवी जोशीचे मराठी मात्र खुपते.

१. बाबुजींच्या आठवणीमध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
२. आपण इकडे आलात त्याबद्दल आभार.
३. आपण आपल्या वादयवॄंदाचे धन्यवाद देउया.
४. तुझ्या ह्या परफॉरमन्स नंतर तुझे फिलींग्ज कसे आहेत.
५. शेवटी कंपीटीशन आहे. कुणाला तरी बाहेर जावच लागणार. तुझा इथपर्यन्तचा जर्नी किती एक्सायटींग होता.
६. लिटील चॅम्पमुळे तुला किती रेकगनीशन मिळाली नाही.
७. तुला ही सिंगिंग बरोबर डान्सिंग कंपीटीशन वाटत होती का? आफ्फ्टरऑल म्युसिक ही एक परफॉरमिंग आर्ट आहे.
८. तुझ्या वरच्या नोट्स काही लागत नव्हत्या का? गळ्यात खराश होती का? की तू इमोशनली चोक-अप झाला?
९. आता घरी गेलीस आणि लोक तुझ्यावर हसले तर?
१०. एसेमेस करुन लोक किती मदत करतात ना इंडियन म्युझिकची?
११. आता बाहेर गेलीस म्हणून रडून नकोस, तुला तुझी टार्गेट्स अचीव्ह करण्या पासून कुणी रोखू शकत नाही.
१२. आणि तुला केवढा प्लॅट्फॉर्म मिळाला, हो ना?

http://kalekapil.blogspot.com/

बेसनलाडू's picture

19 Nov 2008 - 7:17 am | बेसनलाडू

पण सुंदर तरुणीच्या गालावरचच्या तीळाप्रमाणे पल्लवी जोशीचे मराठी मात्र खुपते.
मराठी खुपते ठीक;पण तीळ सौंदर्यवर्धक असावा. बरेच जणांनी त्याला सौंदर्याचा पहारेकरीही म्हटले आहे.असो.
(सौंदर्यप्रेमी)बेसनलाडू

कपिल काळे's picture

19 Nov 2008 - 9:31 am | कपिल काळे

अरे हो की, मी चुकुन तीळ म्हटले बरें

हा तीळ नसून मस आहे.

http://kalekapil.blogspot.com/

वर्षा's picture

19 Nov 2008 - 4:34 am | वर्षा

हाहाहा अगदी अगदी!
शिवाय 'खूप गोड झालं गाणं' हे वाक्य ती प्र-त्ये-का-ला म्हणते न चुकता. :)
प्रत्येक वेळेस 'गोड'च काय? दुसरी कुठलीही विशेषणं तिला सुचू नयेत?!

भाग्यश्री's picture

19 Nov 2008 - 4:57 am | भाग्यश्री

पल्लवीचं मराठी तितकं छान नाही आहे हे खरं..
मात्र परवा एका पेपर मधे वाचलं तिचं वाक्य, ते पटलं..
ती म्हणाली, " ही मुलं ज्या कॉन्फीडन्सने समोर येऊन गातात,ते गाणं, त्यांच्या मनासारखं कदाचित झालं नसेल.. पण ज्या तयारीचं गातात त्याला दाद ही दिलीच पाहीजे.. मी २ मिनिटांसाठी त्यांचे आई बाबा होते.. आणि त्यांचं कौतुक करते..
भले त्यांचं ते गाणं चांगलं झालं नसेल.. बाकीच्या गोष्टी परिक्षक सांगतातच.. त्यामुळे माझी भुमिका आई बाबा होऊन कौतुकाची थाप ठोकणं.. "

मी पूर्ण नाही बघितला हा कार्यक्रम.. पण खूप ऐकलं आई कडून.. ही मुलं फारच छान आणि वयापेक्शाशी जास्त समजुतदार गातात..आजचा एपिसोडही फार सुंदर झाला म्हणे.. पाहीन आता..

http://bhagyashreee.blogspot.com/

आनंदयात्री's picture

19 Nov 2008 - 5:44 pm | आनंदयात्री

सहमत आहे.

दिपक's picture

19 Nov 2008 - 9:13 am | दिपक

सवाईगंधर्वांनी पाणी भरण्याकरता एक नवा गडी ठेवला आहे अशीही चर्चा त्या काळी कुंदगोळात होती ही वस्तुस्थिती आहे

ह्याचा उल्ले़ख पु.लं. नी घेतलेल्या पं. भिमसेन जोशी यांच्या ह्या मुला़खतीत आहे.

दिपक

मराठी_माणूस's picture

19 Nov 2008 - 9:38 am | मराठी_माणूस

शंकर महादेवनचा दिलखुलासपणा खरेच वाखाणण्याजोगा होता. त्या बद्दल वादच नाही.

एकच गोष्ट खटकली ती म्हणजे , त्याचे मराठी न बोलणे. मराठी वातावरणात वाढलेला आहे, खळेंचे मार्गदर्शन त्याला मिळालेले आहे, मराठी संगीत आवडते असेही तो म्हणतो , मराठी अजीबात येत नाही असे ही नाही , मग मराठी सलग बोलणे का टाळतो.
कालच्या ही कार्यक्रमात मुग्धा चे गाणे झाल्यावर त्याने तीचे कौतुक केले आणि तीला ईंग्लिश मधे काही प्रश्न विचारले , तीने त्यावर 'मला ईंग्लिश समजत' नाही' असे सांगीतले, तीचे ते उत्तर देणे ही खुप गोड वाटले , पण हे सर्व टाळता आले नसते का ?
मागच्या पर्वात जेंव्हा शंकर महादेवनला पहील्यांदा बोलावले होते , त्याच वेळेस त्याने सांगीतले होते की 'मला नीट मराटी येत नाही, मी हींदीत बोलेन' ते पल्लवीने मान्य केले, त्याच वेळेस असे सांगता आले असते की 'तुला जसे येते तसे बोल पण मराठीच बोल, ते आम्हला अन्य कुठल्याही भाषे पेक्षा खुप आवडेल' . ह्यात कोणताही दुराग्रह आहे असे मल वाटत नाहे, कारण हा कर्यक्रमच मुळात मराठी आहे.
आपण जेंव्हा अन्य भाषीकाना त्यांचे कलागुण ओळखुन , मोठ्या मनाने , त्याना आपल्यात सामावुन घेण्यासाठी त्याना आवर्जुन आपल्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून बोलावतो , तेन्व्हा त्यांच्या कडून एव्हाढी अपेक्षा ठेवणे गैर आहे का ?

मराठी माणुस तुम्ही अगदी मनातले बोललात.
कालचा लिटिल चॅम्प्स चा भाग खरच खुप छान झाला.शंकर महादेवननी खरच येत असेल त्या तोडक्यामोडक्या मराठीत का होइना बोलायला हरकत नव्हती. मागे त्याच्या तोंडुन खळेकाकांचे "बगळ्यांची माळ फुले "हे गाणे ऐकल्याचे लक्षात आहे .कार्यक्रम अप्रतिम झाला या बद्दल वादच नाही.
दुसरे मागील आठवड्यात महागुरू मान्यवरांच्या खुर्चीत विराजमान झाले असताना श्री अरुण दाते हे देखिल प्रेक्षकांत हजर होते पण त्यांची जितकी घ्यायला हवी होती तितकी दखल कार्यक्रमाच्या संयोजकानी घेतली नाहि ते खरच खटकले.
बा़की ही सगळी मुले या मिळणार्‍या यशाने आणि कौतुकाने भारावुन अथवा शेफारुन जावु नयेत इतकीच अपेक्षां
निदान त्यांच्या पालकांकडे बघुन तरी ते स्वतः आपल्या गुणी पाल्यांच्या बाबतीत दक्ष आहेत हे जाणवते.
या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा!
"अनामिका"

स्वाती दिनेश's picture

19 Nov 2008 - 5:45 pm | स्वाती दिनेश

यु ट्यूब वर आज ह्या कार्यक्रमातले तुकडे पाहिले. शंकर महादेवन आहे ते पाहून जेवढे तुकडे मिळाले ते सारे पाहिले. त्याने मुलांना जी पॉझिटिव्ह एनर्जी दिली त्याचे खरच कौतुक वाटले.
स्वाती

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 6:13 am | आजानुकर्ण

प्रथमेशला
तर तारसप्तकातलाच `ग' द्यायला हवा - पं. हृदयनाथ

मुंबई,
२१ नोव्हेंबर / प्रतिनिधी
सारेगमपधनीसा हे सप्तक संपल्यानंतर त्याहीपुढे जावून तारसप्तकात येणारा पुढचा ग म्हणजेच सारेगमपधनीसारेग यातील ग द्यावा, एवढं तू अप्रतिम गायलास...
मी तुझा आभारी आहे. प्रथमेश म्हणजे गणपती आणि आता तू गायल्यानंतर मी त्या ठिकाणी येऊन गाणे गायचे म्हणजे गणपतीचाच अपमान असेल... अशा शब्दांत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी झी मराठीवरील आयडीया सारेगम लिटिल चॅम्प्समधील प्रसिद्ध `मोदक' अर्थात प्रथमेश लघाटे याचे कौतूक केले. एवढेच नव्हे तर सर्वच्या सर्व सहा लिटिल चॅम्प्सचे त्यांनी `महान' या एकाच शब्दात वर्णन केले!
येत्या मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होणाऱ्या या भागाचे चित्रिकरण काल महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओमध्ये पार पडले. या भागातील आकर्षण ठरला तो कोकणातील रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावचा प्रथमेश लघाटे. आÆलबागची मुग्धा वैशंपायन आणि रत्नागिरीची शमिका भिडे हेदेखील या भागाचे आकर्षण होते. या सर्व लिटील चॅम्प्समध्ये प्रत्येकाचे वेगळे वर्णन करणे शक्य नाही. गुलाबाचा ताटवा पाहताना जो आनंद होतो, तसाच आनंद या मुलांचे गाणे ऐकताना होतो, अशा शब्दात पंडितजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाटयसंगीत गाण्यासाठी सर्वत्र कौतूक होत असलेल्या प्रथमेश लघाटे याचे त्यांनी विशेष कौतूक केले. लतादीदींना भेटण्यासाठी लिटिलचॅम्प्स त्यांच्या घरी गेले होते, त्यावेळेस देखील दीदींनी प्रथमेशकडे पाहून नाटयसंगीत गाणारा तो तूच का? अशी विचारणा करत त्याच्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली होती. सारेगमच्या आजवरच्या अनेक भागांमध्ये प्रथमेशवर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. आजवर अनेकदा विक्रमी `नी' मिळविणारा म्हणूनही त्याचे कौतूक अनेकदा झाले आहे. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने व त्यांनी रंगवलेल्या गप्पांच्या मैफलीमुळे सारेगमचा हा भाग आÆतशय आÆवस्मरणीय ठरला. गळ्यात गाणे येणे ही ईश्वराची देणगी आहे. त्यामुळे प्रत्येक सूर हा तोलून लावण्याची प्रगल्भता तुमच्यात यायला हवी, असा वडीलकीचा सल्ला पंडीतजींनी या मुलांना दिला. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आरती प्रभू व सुरेश भट यांच्या आठवणी जागवल्या आणि अनेक गमतीदार किस्से सांगितले.

भाग्यश्री's picture

22 Nov 2008 - 6:55 am | भाग्यश्री

मी कालच हा शंकर महादेवन असलेला भाग पाहीला.. अप्रतिम एव्हढेच शब्द येत आहेत!
खूप सुंदर गायली सगळी मुलं!
शंकरचे खास कौतुक.. त्यानी खूप छान 'दिलखुलास' दाद दिली सर्वांना! :)
आता हा, हृदयनाथ मंगेशकर असलेला भागही बघितला पाहीजे!

http://bhagyashreee.blogspot.com/