याआधीचे भाग
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
आता पुढे -
घरातील वातावरण आता बदलत होत. रामदास ला देखील याची थोडीफार जाणीव झालेली होती, इतके वर्ष घरातील प्रत्येकाच्या सुख दुःखाची काळजी घेणाऱ्या आणि कुटुंबावर आलेले प्रत्येक संकट लिलया पेलणाऱ्या माउलीच्या विरोधात आता घरातील च काही लोकं छुपा मोर्चा उभारत होते. ज्या सुना माउलीने घरात वाजत गाजत आणल्या होत्या त्याच सुनांनी आता माऊलीच्या विरोधात आपल्या नवऱ्याचे कान भरले होते. गावाचे राजकारण संभाळत असताना माऊली विरोधात खूप लोकं तयार झाले होते, ते माऊली ला समोर काहीच बोलु शकत नव्हते पण त्यांनी तुकारामाचे कान भरणे चालू केले. शेती, व्यवसाय, घर यामध्ये माऊली ने कसा पक्षपात चालवला आहे हे पटवून देण्यात हि लोकं जीवाचे रान करत होते, कारण प्रत्येकाचे आपापले स्वार्थ दडले होते. तुकाराम आणि माऊली यांच्यातला छुपा संघर्ष आता दिवसेंदिवस वाढत चालला होता. माउलीने घराला एकसंघ ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नातून नवे गैरसमज तयार होत होते. या महिन्यात माऊलीच्या मुलीचे लग्न होते. माउलीने आजपर्यंत घरात जवळपास 7 लग्ने स्वतः पुढाकार घेऊन प्रसंगी कर्ज काढून थाटामाटात केली होती, पण आज त्याच्या स्वतःच्या मुलीच्या लग्नातच त्याचा पदोपदी अपमान होत होता. ज्या पुतण्याच्या लग्नात माउलीने स्वतःच्या प्रोविडेंट फंडावर कर्ज काढले होते, तोच पुतण्या माऊलीच्या मुलीच्या लग्नात छोट्या मोठ्या कामात देखील टाळाटाळ करत होता. काम केलेच तर दुप्पट पैसे घेऊन निम्मे पैसे स्वतःच्या खिशात घालायचा. ज्या भावासाठी माऊलीने जगाशी दोन हाथ केले तोच भाऊ आज लग्नमंडपात होणाऱ्या लाइटिंग कडे बघून पण माऊलीशी ईर्ष्या करत होता. त्याच्या डोळ्यात आनंद नव्हता तर द्वेष होता, कि हा स्वतः च्या मुलीच्या लग्नात इतका खर्च कसा करतोय?? या आणि अश्या अनेक गोष्टी समोर आल्यावर माऊली आतून तुटत होता, पण करणार काय, त्याच्या समोर फक्त त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न होता. कसेतरी करून एवढे कार्य एकत्र कुटुंबात आनंदाने व्हावे यासाठी तो झटत होता.
आणि शेवटी ते कार्य पार पडले आणि मुलीचे लग्न थाटामाटात झाले.
माऊलीच्या मुलीच्या लग्नानंतर थोड्याच दिवसात तुकारामाने भावकी मार्फत वाटणी चा प्रस्ताव ठेवला आणि वाटणी साठी मिटिंग बसली. तुकारामाने भाऊकी आणि आपल्या सर्व चेल्या चपाट्यांना वाटणीच्या मिटिंग मध्ये बोलवले होते. ह्यापैकी बरेच लोकं ते होते जे कधीकाळी माऊलीच्या विरोधात असायचे, पण माऊलीच्या ताकदीमुळे तोंडावर बोलू शकत नसायचे. आज ते तुकाराम च्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ साधायला तय्यार बसले होते. दिल्लीतले राजकारण करणे सोपे पण गल्लीतले राजकारण खूप अवघड हे माऊली जाणून होता. त्याला सर्व माहिती होते पण समोर सक्खा भाऊ आणि ते लोकं होते ज्यांच्यासाठी त्याने जीवाचे रान केले होते. कौरव आणि पांडव युद्धात अर्जुन देखील स्वतःच्या भावांवर कसा वार करू या चिंतेत होता तशीच काहीशी परिस्थिती आज माऊलीची होती. जे झाड आपण लावले, ज्याची काळजी घेतली, ज्याला मोठे केले त्याच झाडावर कुऱ्हाड कशी चालवायची? आजवर इतक्या लोकांशी झगडून हे घर पुढे आणले त्याच घरामध्ये असा दिवस येईल अशी पुसटशीदेखील कल्पना माउलीला नव्हती.
तुकाराम ने नियमापेक्षा जास्त आणि ती सुद्धा बागायती जमीन आपल्या पदरात पाडून घेतली. शहरात जी दुकानें माउलीने कष्टाने घेतली होती त्यात सुद्धा मोठ आणि चांगली दुकान स्वतः कडे ठेवले. सर्व काही चूक होतय हे माहिती असून सुद्धा माऊली शांतपणे सर्वाला संमती देत होता. कारण फक्त एकच कि सख्या भावाशी भांडायचे नाही, पण इतके असून सुद्धा तुकाराम शब्दांचे वार करत होता. शिव्या देत होता. माऊली च्या मुलांना निपुत्रिक राहण्याचे आणि वंशाची खांडोळी होण्याचे शाप देत होता.. पण माउलीने शांतपणे सर्व ऐकून घेतले कुठल्याही वाक्याला उत्तर दिले नाही..
रामदास हे सर्व पाहत होता. त्याला या घराबाबत सर्व काही माहिती होते, हे घर एके काळी कुठे होते आणि आज कुठे आले, कोणी आणले, कोणी किती कष्ट घेतले हे सर्व त्याने अगदी जवळून पहिले होते. घरातील प्रत्येक सुख आणि दुःखाच्या प्रसंगाचा रामदास साक्षीदार होता. पण त्याला सुद्धा आज निवड करायची होती, तुकाराम कि माऊली? एक तो होता ज्याच्या बरोबर शेतात काम केले, आणि एक तो होता ज्याच्यामुळे त्याच्या जीवनाला नवा अर्थ मिळाला होता. प्रश्न कुठे जायचा हा नव्हता, तर चूक आणि बरोबर यापैकी एकाला निवडण्याचा होता. सत्य आणि असत्य यापैकी निवडण्याचा होता. स्वतः ला कृतज्ञ किंवा कृतघ्न सिद्ध करण्याचा होता.
माऊली ने रामदासकडे पहिले. ज्याठिकाणी रक्ताचे नातेवाईक आपल्या विरुद्ध गेले तिथे हा परका माणूस ज्याच्यासाठी आपण इतके केले तो तरी आपल्या बाजूने दोन शब्द बोलेल असे माउलीला वाटले, पण तसे झाले नाही. रामदास उठला आणि सरळ गोठ्यामध्ये निघून गेला आणि जनावरांना घेऊन रानात जायला निघाला. वाटणीत सर्व जनावरे तुकाराम च्या वाट्याला आली होती, आणि त्यात आता आणखी एकाची भर पडली होती. रामदास ने त्याचा निर्णय उघड केला होता. तो तुकाराम कडे राहणार होता.
माउलीचा कंठ दाटून आला, सुखी रहा एवढेच दोन शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि वाटणीची मिटिंग संपली.
माउलीला एक दोन एकर जमीन कमी मिळाल्याचे दुःख नव्हते. दुःख फक्त एकाच गोष्टीचे होते ते म्हणजे या वाटणीत त्याने आपला भाऊ, पुतण्या, पुतणी, भावजय, घरातील मान सन्मान, आपला वचक आणि प्रतिष्ठा गमावली होती.
तुकाराम आज खुश होता, जमीन जास्त मिळाल्यामुळे नव्हे तर माऊलीची जिरवल्यामुळे. सरते शेवटी रामदास ला देखील आपल्या बाजूने वाळवल्यामुळे आता माऊलीची शेती पडीक पडेल या असुरी आनंदामुळे. त्या रात्री तुकाराम आणि त्याच्या साथीदाराचीं रंगीत संगीत पार्टी झाली. रामदास देखील होता, आपण आज एक चूक केलीये हे त्याला मनात आतमध्ये कुठेतरी खुपत होते पण चेहऱ्यावर तो दाखवत नव्हता.
दुसऱ्या दिवशी तुकाराम ने रामदास ला शेतात खत विस्कटायला पाठवले. वाटणीच्या आधी सर्व शेतांमध्ये कोंबडीचे खत टाकण्यात आले होते. आता त्यामध्ये काही जमीन ती देखील होती जी माऊलीच्या वाट्याला आली होती. तुकारामाने रामदास ला ते सर्व खत गोळा करून आणून आपल्या स्वतःच्या शेतात टाकायला लावले. रामदास इमाने इतबारे आता नवीन मालकाचे आदेश पाळत होता. खताची प्रत्येक गोणी उचलत असताना रामदास ला आपण चुकीचे वागतोय हे कळत होते, पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
दिवसभर काम करून तो दमला. आज वाटणी नंतर पहिल्याच दिवशी भावाला हिसका दाखवल्याच्या आनंदात तुकाराम खुश होता. संध्याकाळी रामदास ला बक्षिसी देऊन तुकाराम घरी आला.
रामदास ने पैसे मुकाट्याने घेतले आणि आपल्या जोडीदाराला म्हणजेच किसन्याला घेऊन तो गुत्त्याकडे निघाला. डोक्यात चाललेल्या विचार चक्राला थांबवण्यासाठी आता तेच त्याचे औषध होते. आपण काल आणि आज सत्याने वागलो कि असत्याने हा प्रश्न त्याला आतून पोखरत होता, डोक्यात भुंगभूंगणाऱ्या या विचारांना शांत करण्यासाठी आता दारू हाच पर्याय होता.
आपले काहीतरी चुकतेय, मनात घोळणाऱ्या या वाक्यापासून तो दूर जाऊ इच्छित होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
खंनननननदिशी कोणीतरी जोरात खानाखाली वाजवावी आणि खाली पडावे तसा रामदास जमिनीवर कोसळला. हात आणि पाय साखळदंडाने कोणीतरी बांधलेत असे त्याला वाटू लागले. शरीरातील सर्व संवेदना हळू हळू निघून जाऊ लागल्या. हातपाय थर थर कापू लागले डोळे पांढरे झाले.
क्रमश :
प्रतिक्रिया
5 Mar 2020 - 5:28 am | विजुभाऊ
गुड गोइंग
5 Mar 2020 - 11:30 am | विनिता००२
असे का करावे रामदासने? काहीतरी कारण असेलच त्यामागे!
5 Mar 2020 - 12:17 pm | बाप्पू
वाटणी च्या दिवशी, तुकाराम आणि भाऊकी च्या बाजूने सगळे निर्णय होत होते. आजपर्यंत तुकाराम सोबत काम केले यापुढेही त्याच्यासोबत च काम करता येईल हा उद्देश.
शिवाय गावात राहून तुकारामशी आणि भाऊकिची नाराजी ओढवून घ्यायची नव्हती.
9 Mar 2020 - 2:59 pm | योगी९००
छान..मस्त रंगलेली कथा.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक..
10 Mar 2020 - 12:23 am | बाप्पू
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.
प्रत्येक भागावर फक्त मोजकेच प्रतिसाद येत आहेत, त्यामुळे पुढे लिहायचे कि नाही असा प्रश्न कधीतरी पडतो.
पण तुमच्यासारख्यांच्या प्रतिक्रियांमुळे हुरूप वाढतो.
खूप धन्यवाद. !
10 Mar 2020 - 12:35 am | बाप्पू
भाग 4 :
https://www.misalpav.com/node/46203