एलियनायटीसेलिया - भाग ८, भाग ७, भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १
ती स्वयंपाकघरात उभी राहून, हातवारे करत, तावातावानी कुणाशीतरी बोलत होती पण कुणाशी ते बाहेरून दिसत नाव्हती. कोणीतरी डायनिंग टेबलवर होतं एवढंच कळलं, पण कोण होती ती व्यक्ती आणि लिसा एवढी का तापली होती?
आत्तापर्यंत धीट, मैत्रीपूर्ण वाटणारे हे तीन "चेंडू" थोडे घाबरले आहेत असं त्यांचे चेहरे बघून वाटलं. खरंतर लिसा खूप शांत आवाजात बोलायची, पण तिचा आवाज खरंच खूप मोठा होता, नाहीतर कसा एवढ्या बंदीस्त घरातून बाहेर येणार? "ती काल रात्री खूप शिव्या देत ओरडत होती आणि पृथ्वीबाहेरचे लोक येऊन काय फायदा वगैरे बोलत होती, म्हणून आम्हाला तिचा थोडा राग आणि थोडी भीतीही वाटली!", लीला हळू आवाजात हिंदीतून बोलली. "तिला हिंदी कळत नाही ना!" "हो, बरोबर आहे तुझं, तिला हिंदी कळत नाही, पण ती काल रात्री काय करत होती मला माहित नाही. मीच दारू पिऊन 'समाधिस्थ' झाले होते. एक काम करा, तुम्ही तिघं इथेच गोठ्यात जरा थांबा, नाहीतर त्या बाजूला बागेत प्लास्टीकच्या खुर्च्या आहेत तिथे बसा. आम्ही बघून येतो काय सुरू आहे ते. घाबरू नका, आम्ही दोघं बघतो आत काय सुरु आहे ते!", मी त्यांना आश्वासन दिलं. मी आणि माईक किल्ल्या काढून दारं उघडतच होतो, तेवढ्यात जेनीनी दार उघडलं. "कुठे गेला होतात एवढ्या सकाळीसकाळी, एवढ्या थंडीत? लवकर आत या आणि दार बंद करा, बाहेर खूपच थंड आहे." बूट, कोट वगैरे काढेपर्यंत लिसाचा आवाज काही कमी झाला नव्हता.
बूट काढता काढता जेनीला विचारलं, "काय गं ही का एवढी तापल्ये?". "नाही, हा राग नाही आहे, हा सात्विक संताप आहे!", जेनी हसू दाबत हळूच सांगत होती आम्हाला! "काल रात्री आपण सगळे झोपल्यावर म्हणे ही आणि डेव्ह दोघंजण पीत होते. पहाटेपर्यंत आवाज येत होते दोघांचे खिदळण्याचे. आणि सकाळी ही उठली असणार तिच्या सवयीप्रमाणे, आता काही समजत नाही आहे नीट, त्यामुळे सुरू आहे जोरजोरात 'प्रवचन आणि प्रश्न विचारणं'!". "पण सकाळी लवकर उठायची सवय आणि हिला?", मी विचारलं. "हो, मगाशीच जोरजोरात बोलत होती, ही सकाळी लवकर उठते, मग सकाळ-सकाळी नवीन काय रीसर्च प्रसिद्ध झालं आहे ते आणि वर्तमानपत्र वाचते आणि मग येते ऑफिसात", जेनीचं वाक्य जवळजवळ तोडूनच माईक म्हणाला, " आणि हो तिथे चहा पिताना आपल्याला तुझं "टोनी ब्लेअरच्यापेक्षा जास्त काळ कोणीही पंतप्रधान होऊ शकेल का यावर तुझं मत काय?", "यासर अराफात नंतर पॅलेस्टाईनला कोणी चांगला नेता मिळेल का?", "फलाण्या बेटावरच्या तमक्या गोष्टीचा जगाला काही फायदा होईल का?" असले भाकड प्रश्न विचारत बसते. माझा तिच्यावर विशेष राग आहे, एकदा काय म्हणे "फुटबॉल खेळाडूंचा जागतिक हवामानवाढींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपयोग करता येईल का?" ही कोण लागून गेली लोकांचा उपयोग करवून घेणारी? काहीही फुटकळ बातम्या वाचते आणि तुझं मत काय, तुला काय वाटतं असले प्रश्न सुरू!", माईक वैतागला होता. "बरं ते ठीक आहे. आधी बाहेर काय आहे ते सांगू या का जेनीला?", मी म्हटल्यावर माईकला पुन्हा आठवण झाली. "हो, ऐक जेनी, जाऊ दे, तू बाहेर चल; त्या बेवडीमुळे सगळा घोळ व्हायचा. जा तू, तुझा कोट वगैरे घेऊन ये." जेनी वर गेली आणि तेवढा वेळ आम्हाला लिसाचं जोरजोरात बोलणं कानावर येतच होतं. "... काही फायदा असला पाहिजे ना असल्या हीन गोष्टींचा? मला तर हे सगळं अतिकृत्रिम आणि पुस्तकी वाटतं. शब्दबंबाळपणे आपलं मत मांडलं की लगेच आपण त्यावर पूर्णपणे विसंबून रहावं का सद्सद्विवेकबुद्धीही वापरुन विचारही करावा? तू सांग मला मिंग तुला काय वाटतं? आणि डेव्ह तू रे? तू तर एवढा वेळ काही बोलतच नाही आहेस...." त्यापुढचं बोलणं मी काही ऐकलं नाही. कायतरी भारी शब्द वापरुन एकतर लोकांना तसंच करण्याबद्दल बोल लावायचा, वर "तुझं याबद्दल मत काय?"चं पालुपद होतंच जोडीला! जेनीने काही फार वेळ घेतला नाही, "फारच कौलारू आहे ही", असा एकदम ब्रिटीश शेरा मारला आणि आम्ही बाहेर पडलो. माईकनी तिला थोडक्यात बाहेत आम्ही काय पाहिलं, कोणाला भेटलो ते सांगितलं. तिचाही अपेक्षेप्रमाणे विश्वास बसलाच नाही; त्यातून माझी आणि माईकची प्रतिमाच अशी की आम्ही असं काही सांगितलं की कोणी त्यावर विश्वास ठेवणं शक्यच नव्हतं. "बरं चल तिथे त्या पडीक गोठ्यात, तिथे थांबले आहेत ते तिघं. ए, आपण डानडानलाही बोलवून आणायचं का?", "तुला हवं तर जा, मला आधी त्या लोकांना भेटायचंय. एक काम कर तू तिला घेऊन ये पण लिसाला टाळ; मी आणि माईक तिकडे जातो, ठीक आहे?"
हो म्हणून मी घराकडे पुन्हा वळले; हळूच डानडानलाही घेऊन बाहेर आले आणि तिला आधी गप्प बस आणि मी काय बोलते ते नीट ऐक असं बजावलं. नाहीतर ही जोरात बोलायची आणि लिसा नावाची पीडा पुन्हा आमच्या राशीला लागायची! घराबाहेर पडल्यावर मी डानडानलाही काय तो प्रकार सांगितला. आतातर माझी खात्रीच होती की ही नेहेमीप्रमाणे मी मस्करी करत आहे असं समजणार आणि तसंच झालं. "ह्यॅ, तू नेहेमीप्रमाणे माझी टांग खेचत आहेस ना? असे परग्रहवासी असतील का, आणि असले तरी ते तंत्रज्ञानात आपल्यापेक्षा पुढे असायला पाहिजेत नाहीतर ते इथपर्यंत कसे येतील? आणि आपण इथेच आहोत ते त्यांना कसं कळलं?" डानडानमधला शंकासूर जागा झाला होता. "हे बघ, तू म्हणतेस ते सगळं मलाही मान्य आहे. मलाही अजूनपर्यंत संपूर्ण खात्री पटली नाही आहे की ते खरंच बाहेरचे आहेत. विश्वास ठेवायला मलाही कठीण आहेच, पण तू एकदा बघ त्यांना, ते खूप नाही तरी आपल्यापेक्षा खूपच वेगळे दिसतात." "आता तू आहेस भारतीय आणि मी आहे चीनची, आणि आपणही खूप वेगळ्या दिसतोच ना?", तशी तिची शंका रास्तच होती. "मान्य आपणही खूप वेगळ्या दिसतो, युरोपियन लोकं आपल्यापेक्षाही वेगळी दिसतात; पण तू या लोकांना बघच मग तुला समजेल मी काय म्हणते ते! हे तिघंजण आपल्यापेक्षा खूपच बुटके आहेत, जेमतेम चार-सव्वाचार फुटाचे आहेत आणि एकदम लठ्ठ-गोटोळे आहेत; माईकपण जेवढा जाडा नाही तेवढे हे लोक जाडे आहेत. आणि त्यांचे चेहरे ...मी असं वर्णन नाही करु शकत पण वेगळे दिसतात हे नक्की!" पण या गोष्टीवर तिचा प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास बसणं कठीणच होतं, माझी प्रतिमापण अशीच ना, सतत काहीतरी खोड्या काढण्याची!
आम्ही दोघीही त्या घोळक्यात सामील झालो, डानडानचीही ओळख परेड झाली. तिला मँडरीन येत असल्यामुळे क्वेडनी तिच्याशी मँडरीनमधून बोलणं पसंत केलं. आम्ही तिघं माणसं, माईक, जेनी आणि मी, लीला आणि मिहीरशी गप्पा मारायला लागलो. लीला तशी थोडी शांतच होती कारण तिला इंग्लीश बोलताना त्रास होत होता; मधूनच ती हिंदीत काही बोलली की मी इंग्लिशमधे ते भाषांतर करून सांगायचे आणि मग संवाद पुढे जात होता. "तुम्हाला लोकांना आमची भाषा तर येते ना, मग हे कानात का घातलं आहेत?" मला कधीपासून हे विचारायचंच होतं. "आम्हाला नवीन भाषा बोलण्यापेक्षा समजायला थोडा जास्त त्रास होतो आणि तुम्ही काय म्हणता आहात तेच आणि तेवढंच आम्हाला समजणं गरजेचं आहे. नाहीतर घोटाळा व्हायचा म्हणून आम्ही यंत्रांची थोडी जास्तच मदत घेत आहोत." "हं, मेक्स सेन्स! पण कशावरून तुम्ही म्हणता तसं ही भाषांतराची यंत्र आहेत?"
"ठीक आहे आपण एक प्रयोग करु या. तुला हिंदी आणि इंग्लिश येतं ना? मला हिंदी अजिबातच येत नाही, तू काहीतरी बोल हिंदीतून आणि मग मी त्याचं इंग्लिश भाषांतर सांगेन. पण दुर्दैवाने यात फक्त आमच्याच भाषेत भाषांतर होतं त्यामुळे तुम्हाला कोणालाही हे देऊन फार फायदा होणार नाही, या प्रयोगात!", मिहीर म्हणाला. "ते काही फार महत्त्वाचं नाही आहे. पण तुम्ही लोक फारच बुटके आहात आणि तुमचे चेहेरेही थोडे वेगळे दिसतात, तुम्ही नक्की कुठले आहात?", मी प्रश्न विचारताना माझ्या 'नास्तिक'पणामुळे काही अपमान होणार नाही, अविश्वास दिसणार नाही याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. "मला माहित आहे, तुमचा लोकांचा आम्ही परग्रहावरून आलो आहोत यावर विश्वास बसणं कठीण आहे. पण आम्ही खरंच बाहेरच्या तार्यावरून आलो आहोत. आमच्या शरीरात आम्ही तुम्ही ज्याला क्लोरोफिल म्हणता, झाडांमधलं हिरवं द्रव्य, ते आहे; त्यामुळे आता आमच्या शरीरातही अन्न बनवता येतं, त्यामुळे आम्हाला खाण्याची गरज नाही, आम्ही आमचं अन्न शरीरातच बनवू शकतो. आणि आम्ही शरीरातच क्लोरोफिलही बनवू शकतो." "मग तुम्ही एवढे जाडे कसे काय?" मला आणि जेनीला सगळी काळजी अनावश्यक चरबी आणि आकाराचीच! थोडंसं हसून लीला म्हणाली, " मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय ते, तुमच्या दृष्टीनी आम्ही लोकं जाडे आहोत पण आमच्या ग्रहावर आम्ही तिघंही खूपच फिट आहोत. म्हणूनच आमची इथे येण्यासाठी निवड होऊ शकली. आमचा तारा तुमच्या तार्यापेक्षा बराच मोठा आहे आणि जुनाही आहे. त्यामुळे तो आता लवकरच मरणार आहे, पण आम्ही त्यावर आधीच उपाय शोधला आहे. तुमच्या सूर्याच्या पलिकडे एक छोटा तारा आहे, त्याच्याभोवतीचे ग्रह बहुतेक तुम्हालाही सापडले आहेत, तुम्ही त्या तार्याला ५१ पेगासी असं नाव दिलं आहेत. त्यातला एक ग्रह आम्ही सध्या रहाण्यालायक बनवत आहोतच. आम्ही म्हणजे, आमच्यातलेच काही इंजिनियर्स आणि वैज्ञानिक मिळून. आणि मग आम्ही एकेक करुन तिथे जाणार आहोत. तर आमचा जो ग्रह आहे तो आकाराने फार मोठा आहे आणि त्याचंवस्तूमान अर्थातच जास्त आहे. काल रात्री आम्ही जे प्रयोग केले त्यावरुन आम्हाला असं म्हणता येईल की आमच्या ग्रहाची घनता तुमच्या पृथ्वीपेक्षा २.७१पट जास्त आहे. पृथ्वीची घनता पाण्याच्या साडेपाचपट जास्त आहे ना? आमच्या ग्रहाची घनता जवळजवळ पाण्याच्या पंधरापट आहे. त्याचं कारण आमच्या तार्याच्या जवळ आमचा तारा जन्माला येण्याआधी खूपच सूपरनोव्हाचे स्फोट झाले, जड तारे मरताना असा स्फोट होतो, आणि त्यात लोखंडापेक्षा जड मूलद्रव्य तयार होतात, जसं तांबं, सोनं, चांदी, निकल, झिंक इत्यादी! आमचा तारा आपल्या आकाशगंगेच्या केंद्राच्या दिशेला आहे त्यामुळे आणि आमच्या जवळच एक बंदीस्त तारकागुच्छ होता. तो आता भरकटत लांब गेला आहे, पण त्यामुळे आमच्या ग्रहात खूपच जड मूलद्रव्य आहेत. त्यामुळे माईक, तुझं वजन
आत्ता इथे एकशे पंधरा किलो असेल तर तिकडे तीनशेचौदा किलो भरेल. वजनाचं सोडा, पण या वजनदार ग्रहामुळे आमच्याकडे सगळ्या सजीवांची उंची तुमच्या तुलनेत कमीच आहे आणि त्यांचे आकार असे फुगीर आहेत. अर्थात आमच्याकडची सजीव-सृष्टीसुद्धा अशीच, तुमच्यासारखी कार्बन-आधारित आहे. जसं तुमच्या शरीरांमधेही कार्बनच्या मोठमोठ्या साखळ्या तयार होऊन मोठे रेणू तयार होतात तसंच आमच्याहीकडे आहे आणि आम्हालाही पाणीच लागतं. तुमच्याकडेही जसं सजीव-सृष्टीला जगण्यासाठी पाणी लागतं तसंच आमचंही आहे. आमच्याकडे पूर्वी सिलिकन-आधारीत जीवसृष्टीही होती.कार्बनचा जसा गुणधर्म आहे, कार्बनच्या मोठ्या साखळ्या बनून त्यापासून मोठे रेणू बनतात तसंच सिलिकनचंही तसंच आहे, सिलिकनचेही मोठे आणि गुंतागुंत असलेले रेणू बनू शकतात. आमच्याकडे या दोन प्रकारचे प्राणी होते, कार्बन-आधारीत आणि सिलिकन-आधारीत! आम्ही आता असलेले सगळे मात्र कार्बन-आधारीतच आहोत."
आमचं आश्चर्य प्रत्येक वाक्याला वाढतच होतं. "आता असलेले सगळे कार्बन-आधारीत आहात म्हणजे, ते सिलिकन-आधारीत लोक किंवा सजीव कुठे गेले?", डानडाननी इंग्लिशमधून क्वेडला विचारलेला प्रश्न आम्हालाही ऐकायला आला.
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Oct 2008 - 6:07 pm | विजुभाऊ
गुड ! कथा अजून तिएहेच थाम्बली आहे. थोडे पुढे ढकला ना बै कथेला
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
30 Oct 2008 - 7:57 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
30 Oct 2008 - 6:14 pm | अभिरत भिरभि-या
मोठी कलाटणी मिळण्याची पार्श्व्भूमी तयार होतेय.. मला माहित्येय ते सिलिकॉन आधारीत सजीव कुठे गेले ते.
---
अवांतरः
यांच्या प्ल्यानेट वर बिहार्यांचा त्रास आहे काय ?
30 Oct 2008 - 8:25 pm | सुनील
आता थोडे वैज्ञानिक स्पष्टीकरण येऊ लागले. छान.
एक विचार - आपणही आपलं अन्न बनवू शकलो तर भूक बळींची समस्या उरणारच नाही. पण मग विविध पाककृतींचे काय? असो, हा भागही चांगला झालाय.
सिलिकॉन आधारीत लोक गेले कुठे हा भाग मात्र खुबीने क्रमशःमध्ये टाकलाय!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Oct 2008 - 8:28 pm | शितल
आदिती,
मस्त लिहिले आहेस ग :)
>>>सिलिकॉन आधारीत लोक गेले कुठे हा भाग मात्र खुबीने क्रमशःमध्ये टाकलाय!
हेच म्हणते.
:)
2 Nov 2008 - 2:13 am | आनंदयात्री
मजा आली !!
पुढचा भाग या आठवड्यात येईल अशी आशा करायला हरकत नाही !!
30 Oct 2008 - 8:45 pm | रेवती
पुढच्या भागात काहीतरी घडेल अशी अपेक्षा.
रेवती
30 Oct 2008 - 9:23 pm | ऋषिकेश
सुरवात कन्फ्युझिंग वाटली...पण पुढे आलेली माहिती मस्तच
कथा जैसे थे असली तरी आधीच्या चित्रात रंग भरले गेले आहेत
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
-(वाचक) ऋषिकेश
1 Nov 2008 - 11:12 am | अवलिया
ह्म्म
वाचत आहे. हा भाग पण छान आहे.
पण फार वेळ लावता बुवा तुम्ही.... पुढचा भाग यायच्या आधी गचकलो तर भुत होवुन जाम त्रास देईल. मग बोंबलु नका.....
(प्रतिक्षेत) नाना
8 Nov 2008 - 11:42 am | जैनाचं कार्ट (not verified)
>>>पण फार वेळ लावता बुवा तुम्ही.... पुढचा भाग यायच्या आधी गचकलो तर भुत होवुन जाम त्रास देईल. मग बोंबलु नका.....
अगदी १००% हेच म्हणतो !
दोन दोन भुतं त्रास देतील ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
8 Nov 2008 - 4:33 am | मृदुला
बरं झालं आज हा भाग सापडला. पुढचा भाग आलाय का या नंतर?
सिलिकनजीवांचे वर्णन वाचायला उत्सुक.
8 Nov 2008 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं झालं आज हा भाग सापडला. पुढचा भाग आलाय का या नंतर?
नाही, आज/उद्यामधे ही गोष्ट संपवते ... आणि मृदुला, तुझी प्रतिक्रिया नाही दिसली तर लिंक पाठवते.
लोक्स, माफ करा थोडा वेळ लागला पुढचा भाग टाकायला, पण कभी कभी अदिती काम भी करती है। ;-)