चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली.
पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले.
फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.
आफ्रिकेतील एका विशिष्ट आदिवासी जमातीच्या तावडीत एक तथाकथित, सुसंस्कृत शहरी तरूण सापडतो. दुर्दैवाने त्याच दिवशी त्या जमातीतील एक व्यक्ती मृत झालेली असते. सहज कुतूहल म्हणून एक आदिवासी तरूण त्या शहरी तरूणाला सुसंस्कृत समाजातील अंत्यसंस्कारांबद्दल विचारतो. शहरी तरूण मोठ्या अभिमानाने दहनविधी, दशक्रिया, दशक्रियेची बुंदी, वरण भात व श्राद्ध, पितृपंधरवडा वगैरे सांगतो. मात्र दहनविधीबद्दल ऐकल्यावर आदिवासी तरूण संतापून म्हणतो, मोठेच कृतघ्न लोक आहात तुम्ही. संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला साथसंगत करणार्या व्यक्तीला तुम्ही निर्दयपणे जाळून टाकता. आम्ही पहा, मृत झालेल्या व्यक्तीचे मांस आम्ही पुरवून पुरवून खातो. जेणे करून त्याच्या शरीरातील सर्व मूलद्रव्ये आमच्याच शरीरात सामावून जातील. शहरी तरूणाला ढवळूनच आले.
पुढची कथा आठवत नाही पण कथेचा एकंदर आशय संस्कृतींमधील, विचारांमधील फरकांबाबत होता.
आता एक वैयक्तिक अनुभव. गोष्ट बर्याच दिवसांपूर्वीची आहे. काही सुटीनिमित्त मी गावाकडून माझ्या एका नातेवाईकाकडे पुण्यात आलो होतो. "ज्युरासिक पार्क" चित्रपट बघण्याचे ठरले. चित्रपटाला गेलो तर गोर्या, घार्या मुली बघून खूप बुजून गेलो. गावाकडून आलो असल्याने उच्चारांची, स्वत:च्या गबाळेपणाची लाज वाटत होती. थेटरात गार गार बसल्यावर अंधार झाला तेव्हा बरे वाटले. चित्रपटात एक दृश्य आहे, एका आजारी डायनासोरच्या रोगाचे निदान करण्यासाठी आलेली चित्रपट नायिका विष्ठेच्या एका ढिगार्यात सरळ हात खुपसते. ते दृश्य सुरु असतानाच थेटरातून शी... ई... वगैरे तीव्र किचाळ्या सुरू झाल्या. मला मात्र फारसे वाईट वाटले नाही. तरीही लाजेकाजेस्तव मी देखील तोंड वाकडे केले.
मला वाईट वाटले नाही याचे कारण खरे तर वेगळेच होते. लहानपणी माझे घर कुंभारवाड्याच्या जवळ होते. घराच्या परिसरात गाढवे, कुत्री मुक्तपणाने तथाकथित घाण करत फिरत असत. आम्ही तेथेच खेळत असू. बर्याच मित्रांची शेतीवाडी होती. त्यांच्या घरातली बायामाणसे शेणाच्या गोवर्या थापत असत. त्यामुळे मलमूत्राविषयी शहरी लोकांना वाटणारी घृणा मनातून मला तितकीशी वाटत नसली तरी स्वत:ची मते ठाम व्यक्त करण्याइतके धैर्य व आत्मविश्वास तेव्हा नव्हता. मात्र माझे थोडेसे वाचन झाले. आयुष्यात काही चांगली पुस्तके वाचनात आली नसती तर मीदेखील अशी घृणा व्यक्त केली असती कदाचित.
अभय बंगांचे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, "माझा साक्षात्कारी हृदयरोग". बहुतेकांनी ते वाचले असेलच. वाचले नसेल तर अवश्य वाचा हा एक अनाहूत सल्ला. पुस्तकात आहाराविषयी माहिती देताना, "फायबर" ऊर्फ तंतूमय पदार्थांविषयी त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. मानवी जीवनशैलीतील बदल, सभ्यतांमधील फरक, अन्नपदार्थांमध्ये झालेली क्रांती आणि मानवावर या सर्वांचा झालेला परिणाम याचा सर्वात मोठा आरसा म्हणजे विष्ठा. विनोबांनी तर उत्तम आरोग्यासाठी एक महत्त्वाचा मंत्र दिला आहे. "प्रभाते मलदर्शनम". सकाळी उठून शौचाला जावं आणि आपल्या मलाचे नीट निरीक्षण करावं. तुमचे आरोग्य कसे आहे हे तुमचे तुम्हालाच समजेल.
अनिल अवचटांच्या घरात नवीन जन्म झाल्यानंतर बाळाची शी कुणी धुवायची असा प्रश्न आला तर अवचटांनी चुटकीसरशी तो प्रश्न सोडून टाकला. शी म्हणजे काय, तर तो एक पदार्थ आहे, त्याला रंग आहे, वास आहे. पण हात धुवून टाकले की आपण पुन्हा स्वच्छ होतो.
इतके कशाला इथल्या सर्वांच्या प्रात:स्मरणीय भाईकाकांनीही "संडास" आणि संस्कार यांचे संबंध स्पष्ट करण्यासाठी वेगळा लेखच लिहिला आहे.
अगदी संस्कृती संस्कृती म्हणून आपण जो गळा काढतो त्यातही सडासंमार्जन करताना घर-अंगण शेणाने सारवण्याची पद्धत आहे. तुम्ही म्हणाल गोमूत्र, गोमय या तर पवित्र गोष्टी. पण कुंभारवाड्याजवळच्या माझ्या वास्तव्यातून आठवलं. माठातलं गार पाणी, मडक्यातलं घट्ट दही म्हणून जे आपण गदगदून भावशिंकरतो, ते मडके भाजताना त्याला योग्य छिद्रे पडावीत म्हणून मातीमध्ये गाढवाची लीद मिसळणे आवश्यक असते. गाव सोडून दहा वर्षे होत आली पण कधी ट्रेकला वगैरे गेलो की भिंतींसकट जमीन सारवलेली एखादी झोपडी किंवा मंदिर मिळाले की खूप छान झोप लागते याचे कारण कदाचित माझे बालपणच असावे.
एक प्रश्न असाही मनात येतो की आपल्याला एखादी गोष्ट ओंगळ वाटते म्हणजे नक्की काय? जगभरात सर्वत्र मलमूत्र, रक्तमांस, मृतदेह यांच्याशी व्यवसायानिमित्त संबंध येणार्या समाजाच्या उतरंडीतील खालच्या श्रेणीच्या लोकांनाही ओंगळ समजण्याची प्रथा या स्वच्छतेच्या कल्पनांनीच झाली असावी का?. सध्या एक पुस्तक वाचत आहे. त्यात जपानमधील दलितांविषयी लिहिले आहे. जपानमधील समाजव्यवस्था आणि भारतीय समाजव्यवस्था यातील साम्य अगदीच धक्कादायक नाही कारण भारतात जन्मलेला बौद्ध धर्मच जपानमध्ये लोकप्रिय आहे. मात्र याच बौद्धधर्माने जिथे भारतात दलितांना ताठ कण्याने उभे राहण्याची संधी दिली तिथे जपानमध्ये जातींना एका व्यवस्थेचे स्वरूप मिळवून दिले हे मात्र अचंबित करणारे आहे.
पण एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ असा हा सगळा प्रकार तिथेही आहे. मग अशा लोकांनी मंदिरात प्रवेश केला की त्याचा विटाळ होतो आणि ते पवित्र करण्यासाठी गोमूत्र व शेण वापरले जाते!
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल.
प्रतिक्रिया
14 Dec 2007 - 10:56 pm | विसोबा खेचर
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल.
खरं आहे! मलमूत्रासारख्या नैसर्गिक मानवोत्सर्जित पदर्थांमुळे संस्कृती, शिष्टाचार, सभ्यता इत्यादी गोष्टी बर्या की वाईट हे ठरूच नये!
सत्यनारायनाच्या पूजेच्या दिवशीही दारावर आंब्याच्या टाळ्याऐवजी स्वत:चंच किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहातून आणलेलं मानवी मलमूत्र फासलं तरी चालेल! ते शुभचिन्ह मानायला हरकत नाही/नसावी!:))
अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद वाटला! :)
तात्या.
14 Dec 2007 - 11:02 pm | आजानुकर्ण
सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा सणासुदीच्या दिवशी सारवायला गायीचे मलमूत्र चालते मग मानवी मलमूत्राने काय घोडे मारले आहे?
आमची मनोवृत्ती चंचल असल्याच्या संशयावरून मागे आमची ग्रहशांती केली तेव्हा टम्म ढेरी फुगलेल्या एका भटोबाने आम्हाला गोमय व गोमूत्र (अमृताचा अंश हो!...( अमृता नाही अमृत!))खायला लावले होते. मात्र आमच्या मनोवृत्तीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. गाय बिचारी अस्थिर व चंचल झाली.
विनोदाचा भाग सोडा. पण लेखाचा मूळ हेतू आपल्या बंदिस्त विचारसरणीमुळे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा होता. कदाचित तो सफलही झाला नसावा.
>>
अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद.....
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ तत्त्वांना मुरड घालणे हा नाही.
(तत्त्वनिष्ठ) आजानुकर्ण
14 Dec 2007 - 11:09 pm | विसोबा खेचर
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे.
ती राहतीलच! त्याची काळजी तुम्ही नाही केलीत तरी चालेल!
तात्या.
14 Dec 2007 - 11:26 pm | धनंजय
मला वाटते की त्या विनोदाचे उद्दिष्ट या पुढील वैचित्र्यपूर्ण तर्काने हसू उत्पन्न करणे असे होते : पातळ मळ हा पातळ वांतीसारखा भासत असेल, तर द्रवाचे स्रोत कुल्ले हे ओठांसारखे भासावेत.
थोडीतरी किळस वाटल्याशिवाय तो विनोद आहे हे समजूच येत नाही.
उदा:
झणझणीत मिसळ आठवून खवैय्याने तोंड गच्च मिटले तरी पाणी गळू लागले.
झणझणीत मिसळ खाऊन लेचापेचाने डोळे गच्च मिटले तरी पाणी गळू लागले.
इथे किळस वाटली नसल्यामुळे "विनोद" असा काहीच वाटत नाही. अगदी फिकट कोटी म्हणा.
पाणी गळण्याबाबतच, "बुधवार येताच तिच्या संगतीने" आणि "गुरुवार येताच तिच्या गरमीने" म्हटले तर लगेच ओंगळ विनोद होतो. विनोद समजण्यासाठी इथे मुळात किळस असणे मानसशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे. रोज पछाडलेली इंद्रिये बघणारा डॉक्टर तुम्हाला सांगेल की त्यात ओंगळ असे काही नाही, पण त्या डॉक्टराला त्यात विनोदीसुद्धा काही दिसणार नाही, केवळ फिकट कोटीच दिसेल.
गोवर्या थापणारीला, आपले घर सारवणार्या आमच्या जुन्या लोकांना शेणात किळस वाटत नव्हती पण विनोदही वाटत नव्हता. तस्मात् तसल्या प्रकारचे किस्से विनोदी वाटण्यासाठी किळस वाटणे हे गृहीतक. तुम्हीही विचार करा. तुमच्या ओळखीचा कुंभार "गाढवाची लीद" ऐकल्यावर हसायचा का? (बहुतेक नाही, असे मला वाटते.)
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते.
संस्कृतीविषयीचा तुमचा मुद्दा कुठल्यातरी विशाल संदर्भात खराच आहे हे पटले. पण या संदर्भात गैरलागू आहे असे वाटते.
14 Dec 2007 - 11:31 pm | आजानुकर्ण
सारासार विचार न करता मनात आलेले विचार येथे टंकले आहेत. तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत.
मला वेगळ्या दृष्टीकोणातून या विषयावर चर्चा करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत असे वाटत होते.
एकंदर मलमूत्राला ओंगळ समजण्याची सुरुवात केव्हापासून झाली याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे का?
शरीरातून बाहेर पडणारे सर्व उत्सर्जन यांना श्रेणीवार ओंगळ समजले जाते असे वाटते. घाम आला तर तितका ओंगळ नाही मात्र विष्ठा आली तर ती ओंगळ असे असण्याचे कारण काय असावे?
14 Dec 2007 - 11:59 pm | मनोज
फार पुर्वीची गोष्ट आहे . गुरू आपल्या शिष्याला म्हणतात - "या जागत सगळ्यात घान गोष्ट काय आहे?" शिष्य खुप विचर करतो पण त्याला काही सुचत नाही. मग सकली प्रतःविधिला गेल्यावर त्याच्या लक्षात येते - आरे आपली विष्ठा हिच ती गोष्ट आहे .
तो गुरु काडे आपले उत्तर घेउन जातो. गुरु म्हणतात - आरे पण ही विष्ठा तर काल परियन्ता छान सुन्दर अन्न होते? मग त्याचे असे रुपांतर कसे झाले?
मग शिष्याला बोध होतो - हा मनुष्य देह सगळ्यात घान गोष्ट आहे !!!
ह्.भ्.प. मनोज महाराज
15 Dec 2007 - 5:32 am | धनंजय
साधारणपणे जे प्राणी आपल्यासारखे खाद्य खातात, ज्यांची आतडी आपल्यासारखी असतात, त्यांच्या विष्ठेचा आपल्याला दुर्गंध सहन होत नाही, असे माझे (अभ्यास नसलेले) निरीक्षण आहे.
म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, माकड यांच्या विष्ठेचा दुर्गंध फार वाटतो. आपल्याकडच्या मोकाट चरायला सोडलेली गुरे मात्र मनुष्यविष्ठा सहज खातात, त्यामुळे त्यांना त्याचे वावडे नसावे.
गवत खाणार्या गुराच्या शेणाचा वास आपल्याला दुर्गंधी वाटत नाही, तीच बाब घोडे, गाढव यांबाबत, हा थोडा घाण वाटतो पण फार नव्हे. (मका आणि मांस खायला दिलेल्या गुरांच्या शेणाला मात्र भयंकर दुर्गंध येतो.) माशांचे आतडे, पक्ष्यांची शीट, (झिंगी) सुंगटातला काळा धागा यांचा "विष्ठेसारखा दुर्गंध" कोणाला वाटल्याचे ऐकिवात नाही. (माशाच्या पोटातला कडवटपणा, उग्र वास त्याच्या पित्ताचा असतो, "विष्ठेचा" नव्हे.) प्राणीसृष्टीत दूर जावे, तर मधमाशांचा मध हा तर बहुतेक सर्व संस्कृतीत खातात (हा माशीच्या पोटातून पुन्हा तोंडात येतो, माशीची ही विष्ठा नव्हे - पण ते असो...) - दुर्गंधाऐवजी आपण त्याला सुगंधच मानतो.
बहुतेक प्राण्यांना स्वतःच्या विष्ठेचा तिटकारा असतो. हे मांजराबाबत प्रसिद्धच आहे. पण गुरेदेखील शेण खात नाहीत. डुकरे निसर्गतः स्वतःची विष्ठा खात नाहीत. म्हशी शेणाच्या डबक्यात बसून राहातात, ही बाब माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे, पण हे अपवादात्मकच.
आईच्या दुधावरच असलेल्या बाळाच्या लंगोटीला तितका दुर्गंध येत नाही, पण त्याला नेहमीचे अन्न देऊ लागल्यानंतर घाण येऊ लागते.
मी असा तर्क करतो आहे, की आपल्यासारखे पदार्थ खाणार्या प्राण्याची विष्ठा ही आपल्या आरोग्याला हानीकारक असण्याची शक्यता जास्त असावी, कारण त्यातले जंतू आपल्या पोटातही तगू शकतील. त्यामुळे त्या वासाचा तिटकारा प्राण्यांना नैसर्गिकच असावा. पण खूपच वेगळ्या प्राण्याच्या विष्ठेतील/पोटातील/आतड्यातील जंतू आपल्याला बहुतेक हानीकारक नसतात. अगदी घ्यायचा तर मधच घ्या! (तरी अगदी लहान बाळाला मध देऊ नये. त्यात कधीकधी बॉट्युलिझमचे जंतू असतात, ज्यांचा मुलांना/मोठ्यांना काही त्रास होत नाही, पण लहान बाळांना होऊ शकतो!)
असो. या विषयावर हा माझा केवळ कल्पनाविलास आहे... (दिलेली बारीक सारीक माहिती ठोस आहे. तर्क मात्र कोणी सिद्ध केलेला नाही.)
15 Dec 2007 - 7:50 am | सहज
सारासार विचार न करता मनात आलेले विचार टंकले गेले व टंकतच राहीले की वादळे उत्पन्न होऊ शकतात.
जरा ह्यावर विचार करावा.
15 Dec 2007 - 1:15 am | विकास
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते.
आपला सर्वच प्रतिसाद पटला, पण त्यातले वरील वाक्य मह्त्वाचे वाटले. मिपावर सध्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना घेउन कधी कधी ओंगळपणा वाटेल असे लिहीलेले दिसते. (मी अजानुकर्णांच्या लेखा बाबत म्हणत नाही, त्यानी त्याची भुमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे आहे ते कळले).
विनोद हा मॅचुरीटीप्रमाणे बदलला पाहीजे असे वाटते. उ.दा. - मुंगीचे विनोद जर येथे परत कोणी लिहू लागले तर बालीश वाटेल तसेच पौंगाडावस्थेत जे काही बोलले जाते त्याचा पुनरूच्चार हा पण येथे पोरकटपणा वाटू शकेल.
15 Dec 2007 - 8:13 am | सर्किट (not verified)
मॅच्युरिटी असती, तर ह्या स्वातंत्र्याला मातेसमान वागवले गेले असते. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा वाट्टेल तसा उपयोग करणे, म्हणजे आईने आपले स्तन चोखायला दिले म्हणून त्यांची चित्रे प्रकाशित करून आपल्या इतर चित्रप्रेक्षक मित्रांचा आंबटशौक पूर्ण करण्यासारखे झाले.
- सर्किट
15 Dec 2007 - 10:18 am | आजानुकर्ण
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असणे महत्त्वाचे. तीव्र शब्दात आपण हेच सांगितले आहे.
15 Dec 2007 - 10:17 am | आजानुकर्ण
स्वातंत्र्याच्या कल्पना चुकीच्या घेणे चुकीचे तर आहेच. पण स्वतःच्या कल्पना दुसर्यांवर लादणेही चुकीचे आहे. किंबहुना मिसळपावावर ठिकाणी (मला ओंगळ वाटलेले) लेखन चालले मग इथे दुसर्यांना ओंगळ वाटलेले लेखन का काढले हा महत्त्वाचा प्रश्न होता. मला व्यनिद्वारे अनेकांनी विचारणा केल्याने मी माझ्या भाषेत स्पष्टीकरण दिले. वाचकांची म्यॅच्युरिटी वाढली पाहिजे हे तर अत्त्यावश्यक आहे.
19 Dec 2007 - 3:44 pm | विजय पाटील
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असणे महत्त्वाचे.
सहमत.
19 Dec 2007 - 7:34 pm | प्रकाश घाटपांडे
आजानुकर्ण शी सहमत आहे.
१) घरी अंगणात व ओट्यावर सडा, माड्या ओसरी स्वयंपाकघर वगैरे ठीकाणी मात्र सारवणे यात कधी घाण वाटली नाही. वर्गात प्रत्येक जण आपापला पट्टा सारवत असे. शेण घमेल्यातून गोळा करुन आणण्यात कधिच घाण वाटली नाही.
२) गोमुत्र शिंपडताना घाण वाटली नाही पण पिताना मात्र तोंड कडू वाटे , श्रावणीत पंचगव्य खावेच लागे.
३) शेणात पाय भरला तर घाण वाटायची नाही, पण माणसाच्या विष्टेत पाय पडला तर घाण वाटे. "आरारा ग्वॉत पाय भरला जा धुन ये. " असे म्हटले जायचे.
४) शेतात, विशेषतः केळीत माणसाच्या विष्टेला "सोनखत" म्हटले जायचे.
(चविष्ट)
प्रकाश घाटपांडे
22 Jul 2010 - 10:15 pm | क्रेमर
रोचक व सद्यपरिस्थितीवर नेमके भाष्य (काय हा द्रष्टेपणा!) करणारा लेख.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
30 Jul 2010 - 8:35 pm | प्रकाश घाटपांडे
वारकर्यांसाठी वैद्यकीय पथकात काम करणार्या एकाने किस्सा सांगितला. वारकर्यांचे मलमूत्र विसर्जनासाठी एका शेतकरी कुटुंबाने शेतात चर खांडुन व्यवस्था करुन ठेवली होती. यातुन वारकर्यांची सोय तर झाली पण त्याचे धान्योत्पादन खुप वाढले. एवढ उत्तम खत फुकट मिळाले होते.
शहरातल्या सगळ्या लोकांच्या मलमुत्राचे सोनखत झाले तर काय होईल असा विचार डोकावुन गेला.
30 Jul 2010 - 10:51 pm | utkarsh shah
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ
ओंगलपना हा आपल्या संस्कारावर पन अवलंबून असतो. चिंचेच अथवा लिंबाच नाव घेताच अनेकांच्या तोन्डाला पाणी सुटते.
जे आपल्या मनात घट्ट रुजुन बसले आहे ते एवढ्या सहज टाळता येने शक्य नाही....