मोहिम-ए-संपादक

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
22 Sep 2016 - 11:51 am

तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला
झेपेनासे झाले.

अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो. त्याचा फायदा घेऊन आमच्या चौकोनी ऑफिस कुटूंबाच्या एका कोपऱ्यानी मान न वळवता नुसते डोळे फिरवून कानावरचे हेडफोन सरळ केले. दुसरा कोपरा गॉन केस असा तुच्छ कटाक्ष टाकून पाय मोकळे करायला गेला. हा कोपरा सदोदित पाय मोकळे करायची संधी शोधत असतो हे निरिक्षण आम्ही नुकतेच मॅनेजरला झाकली मूठ सव्वा लाखाची या अभिनिवेशात बोलून दाखिवले असल्याने येणाऱ्या प्रसंगाच्या कल्पनेने अंमळ गुदगुल्या झाल्या. तिसऱ्या कोपऱ्याच लक्ष व्हाट्स ऍप वर आलेले नवीन फॉरवर्ड वाचण्यात असले कारणाने आमचा चित्कार ज्याप्रमाणे उदबत्तीचा धूर आता आपल्या नाकात जाणार जाणार असे आपल्याला वाटत असतानाच अलगद कुठेतरी विरून जातो आणि आपले डोळे उगाच त्या धुराचा मागोवा घेतात त्याच प्रमाणे बहुदा कोपऱ्याच्या कानाच्या पडद्या वर आदळण्यापूर्वीच त्या ध्वनीलहरी हवेतच विरून गेल्या. असो. आमच्या ऑफिसचं चौकोनी कुटूंब हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

तर झालं असं की हा सर्व उपद्व्याप करताना आमच्या लक्षात आलं की काही मिपाकर हे चांगलं साहित्य वाचण्यास आसुसले आहेत. इथे आम्ही मिपा वाचकांना चातकाची उपमा देणार होतो परंतु मागे एका कवितेत पेरलेल्या उपमा वाचून श्री (वाचा दु) श्री (दु) अभ्या यांनी काय खमंग उपमा झालाय अशा अर्थाची प्रतिक्रिया नोंदवली असल्याने आम्ही मोह आवरता घेत आहोत. तर मनात आलं नाही नाही मिपाकरांचे असे हाल पहावत नाहीत. कुठे ते ट्रोल धाग्यांवर खबरदार जर बिनकामाचे काढाल धागे, चपला घेऊनी व्हा चालते असे म्हणणारे साहसी शूर मिपाकर आणि कुठे .... असोच.

तर सांगायचा मुद्दा हा आहे की उत्तम कार्याची सुरवात नेहमी स्वतःपासून करावी असा आदर्श बालपणीच घालून दिला असले कारणाने आम्ही तातडीने आता काहीतरी लिहिलेच पाहिजे असा ध्यास घेतला. एवढ्या सगळ्या गदारोळात दोन मिपाकर लक्षणीय वाटावी अशा प्रकारे मला संपादक करा ही मागणी करत होते. त्यापैकी एक त्यांची संन्यास घेण्याची वेळ झाल्याने घाई घाईत फक्त घोषणा देऊन मंचावरून निघून गेले. परंतु एक आयडी मात्र व्यवस्थेशी लढत होता. जनतेच्या प्रश्नांना तोंड देत होता. जेव्हा उत्तर नसेल तेव्हा स्त्रीद्वेश्टा या त्यांच्या सर्व सुखसोयींनी समृद्ध क्लबची जाहिरात करत होता. कुणी लक्षच देईना म्हणता त्या बापड्याने कळवळून मला फक्त पंधरा मिनिटे चार्ज द्या असे वक्तव्य केले आणि आमच्या डोक्यात अनेक घंटा वाजू लागल्या.

आठवा आठवा, कपूरांचा अनिल आणि मुखर्जीच्या राणीचा नायक आठवा. एक दिवसाचा मुख्यमंत्री झालेला हा नायक कशाप्रकारे चांगलं कामही करता येतं हे दाखवून देतो, इथे तशाच नाट्याचा संभव आहे हे लक्षात आले आणि आम्ही गहिवरून जाऊन आम्हाला उम्मीदपे दुनिया कायम है हे नुकतेच वाचलेले सुवचन आठवले. तर उत्सुकतेपोटी आम्ही या आयडीची म्हणजेच श्री(वाचा ल्लूऊ) श्री (ल्लूऊ) टका यांची एक छोटीशी मुलाखत घेतली. सर्व त्रस्त वाचकांनी जरूर आस्वाद घ्यावा. आता त्यांना संपादकच जर पंधरा मिनिट व्हायचं असेल तर मुलाखत त्याहून मोठी कशी असेल म्हणून आम्ही उदार मनाने काही कठीण प्रश्न या मंचावर उपस्थित केले नाहीत. परंतु वाचकांनी बिलकुल हयगय करू नये. आम्हास खात्री आहे श्री(ल्लूऊ) श्री(ल्लूऊ) टका निश्चितच आपल्या सर्व शंकांचे समाधान करतील.

प्रश्नकर्ता : पंधरा मिनिटांचा संपादक ही कल्पनाच जबरदस्त आहे. कसं काय सुचलं तुम्हाला हे?

उ: सगळं चांगलं काय तुम्हालाच सुचत का? कसं आहे तुम्हाला कधी झळ लागली नाही त्यामुळे तुम्ही निवांत असता.पण मी झळ भोगली आहे. विनाकारण बॅन होण्याचं दुःख काय असतं ते तुम्हाला कधी समजेल असं मला वाटत नाही. ते दुःख मी भोगलं आहे झालंच तर बॅटमॅननी भोगलं आहे. प्रगो प्यारे येत जात असतात. त्यांच काय नाय एवढं. मी,बॅटमॅन, बोकाशेट असे कित्येक निष्पाप बळी आहेत या सिस्टीमचे. प्रत्येकवेळेला आम्हीच का सहन करायचं? सांगा ना का? अरे काय जोक आहे का? कुणीही येतो डू आयडी घेऊन, मिपाचं वातावरण गढूळ करतो, आम्हाला चिडवून जातो आणि ते आयडी तरीही शाबूत? नाही नाही हे सगळं थांबलंच पाहिजे. परा असता तर हा दिवसच आला नसता.

प्र: (पहिल्याच उत्तराला आलेला आक्रमक पवित्रा पाहून गांगरून) तुमचं म्हणणं बरोबर आहे सर पण एक अशीही भूमिका आहे जी तुमच्याबाबतीत वारंवार निदर्शनास आणून दिली जाते ती म्हणजे आधी तुम्ही स्वतः चांगले प्रतिसाद देऊन आदर्श आचरण केलं पाहिजे. ते तांब्यासंस्थान वगैरे जरा अती होतं असं नाही वाटतं का? तुमचे आचरण पाहून आलंच मालकांच्या मनात तर तुम्हाला झाडू देण्यात येईल. पण त्याआधी तुमच्याचं धाग्याना तो झाडू पुरा पडणार नाही, नाही का?

उ: चांगले प्रतिसाद चांगले प्रतिसाद म्हणजे काय असतं ओ? तुमच्या कानांना बरं वाटेल असं बोललं की झालं का? एवढंच वाईट वाटत असेल तर माझे कित्येक धागे जे टाइमपास म्हणून काढले आहेत ते उडवले तरी चालतील पण आता माघार घेणे नाही. आणि तांब्यासंस्थानाचा मी अनभिशिक्त का काय असत तसा वारस आहे. सगळ्यांनीचं सिरेस होऊन कसं चालेल?

प्र: हं बरं मग?

उ: बरं मग काय बर मग? पुढचा प्रश्न विचारा की?

प्र: नाही पण ते आधीच्या प्रश्नाच उत्तर पूर्ण दिलंय असं वाटत नाही?आदर्श आचरण वगैरे....?

उ: ल्लूऊऊऊऊऊउ.....

प्र: असो. विचारते पुढचा प्रश्न. संपादक झाल्यावर तुम्ही सर्वात आधी काय कराल?

उ: हे काय विचारणं झालं. सर्वात आधी खरडफळ्यावर जाऊन घोषणा करेन "मी संपादक झालोय, बघतोच आता!" त्यानंतर माझा इथला जो मित्रपरिवार आहे त्यांना सगळ्यांना हीच घोषणा खरड म्हणून कॉपीपेस्ट करेन. त्यावर आमच्या दु दु मित्रमंडळींची जी काही प्रतिक्रिया असेल ती वाचून समजून उमजून मग त्यांना उत्तरं देईन. एक धागा काढीन नवा त्यात माझ्या संपादक झाल्याची घोषणा मीच करेन आणि ज्यांना ज्यांना मला दम द्यायचाय त्यांचे धागे उदाहरणार्थ म्हणून चिटकवून या पुढे असे लिखाण खपवून घेतले जाणार नाही असे सांगेन. झालंच तर बरेच दिवसांपासून एक लंडनवारीच्या फोटोंचा धागा काढायचा राहून गेला होता. लागलीच चार फोटो तिथेच टाकून मोकळा होईन. नंतर मात्र मी शांतपणे जरा कॉफी वगैरे पिऊन येईन. ऑफिसमधले काम करीन. काही झालं तरी संपादक हा माणूसच आहे. त्यालाही विश्रांती हवीच ना!

प्र: अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. काश सर्वच मिपाकर असेच प्रगल्भ झाले तर!

उ: होतील हो. एकदा मी आलो ना संपादक पदावर सगळ्यांची नीट विल्हेवाट लावतो बघा.

प्र: (घाबरून) सगळ्यांची म्हणजे जरा अति होईल नाही? अहो लिहायला आणि वाचायला कुणी शिल्लक नको का?

उ: सगळ्यांची म्हणजे सगळ्या डू आयडीची हो. तुम्ही लगेच एक बोललं की दुसरा अर्थ काढून मोकळ्या होता.

प्र: माफ करा तुम्ही एक महत्वाचा शब्द वगळल्यामुळे गैरसमज झाला जरा.

उ: हेच हेच ना मला पटत नाही. जरा म्हणून धीर नसतो. नीट विचारलं असतं तर मी सांगितलं नसतं का मला काय म्हणायचं आहे ते? एक तर स्वतःच गैरसमज करून घ्यायचे. समोरचा काय म्हणतोय काय सांगायचा प्रयत्न करतोय ते पाहायचं नाही. आणि वर चूक माझीच हे जाहीर करायचं!

प्र: (वारंवार होणाऱ्या आक्रमक हल्ल्यानी गोंधळून) मी काय म्हणते तुम्ही वर जो काही पंधरा मिनिटांचा अजेंडा सांगितला त्यात विधायक कार्य काही होईलस वाटत नाही. तर अजेंडा जरा बदलायला हवा नाही का?

उ: काही नाही वेळ लागत. माझ्याकडे सर्व डेटा आहे. त्याला फक्त योग्य न्याय देणे बाकी आहे. हिटलिस्टचं आहे. फक्त गोळीबार करायची संधी मिळत नाहीये.

असं म्हणून टकासरांनी त्यांचा लॅपटॉप आमच्यासमोर धरला. त्यात एका फोल्डरमध्ये बरेच स्क्रीनशॉट होते. सगळे त्यांच्या त्यांच्या जन्मस्थानाप्रमाणे व्यवस्थित नामकरण करून ठेवले होते. म्हणजे माननीय मिपाकर सदस्याचे नाव आणि त्यांनतर त्याने गोंधळ केलेले ठिकाण अशा प्रकारे. जसं की अबक_खरडफळा, डइफ_xxxx, क्षयझी_xxx. व्यक्तिगत हल्ले टाळायचे असे मिपा धोरण असल्याने आम्ही मूळ आयडीनाम आणि धागे सांगू शकत नाही. पण असं म्हणूया की सर्वांचीच कुंडली दिसली. एक वर्ड फाईल दिसली त्यात काय असेल ह्या उत्सुकतेने आम्ही त्यावर क्लिक केले असता अनेक तयार मसुदे सापडले. कौतुकाने आम्ही ते वाचन करत होतो तेव्हा लॅपटॉप अक्षरश: ओढून घेऊन त्यांनी खरडवहीत कॉपीपेस्ट करेन तेव्हा वाचा असे दटावले. एकूणच काहीशा भयग्रस्त वातावरणात ही मुलाखत पार पडली. तरीही मूळचा खोडकर स्वभाव काही जात नसल्याने आम्ही जाता जाता शेवटी एक आम्हाला छळणारा प्रश्न विचारलाच.

प्र: मिपावर एका खास महाकंपूचे समर्थन असल्याशिवाय तुम्ही संपादक होणे अवघड आहे असं नाही वाटत का तुम्हाला?

उ: नाही झालो संपादक तर काय? लाडोबा तर आहे की नाही? ल्ल्लूउउउउ

प्र: (कपाळावर हात मारून घेत) अगदी अगदी! प्रश्नच नाही!

तर मित्रानो अशा प्रकारे ही मुलाखत आपल्यासमोर सादर करण्यास आम्हास अत्यानंद होत आहे. आमच्या अपुऱ्या अभ्यासामुळे जर काही प्रश्न राहून गेले असतील तर आपण ते जरूर विचारावेत. संन्यास घेऊन गेलेले तरुणांचे बलस्थान कायमचे भावी संपादक जेपी यांचीही मुलाखत घेऊन तिला शब्दरूप देण्याचा आमचा मानस आहे. श्री(ल्लूऊ) श्री(ल्लूऊ) टका यांनी ह्या लेखाचा प्रिंट आउट काढून आपल्या हापिसात सतत नजरेसमोर ठेवावा अशी आम्ही विनंती करतो. आणि आदर्श मिपाकर (संपादक) होऊनच दाखवावे!

जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र! जय मिपा! जय सगळे!

विनोदमौजमजासद्भावनाशुभेच्छामाहितीप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2016 - 9:37 am | टवाळ कार्टा

याला टिपिकल भारतीय मनोवृत्ती म्हणतात, काही नवीन करायला द्यायचे नाही आणि वर म्हणायचे जमणार नाही

अरे बाबा, काही कुवत, पात्रता वगैरे असते की नाही?
का उगी मला, मला असे मागून मिळणारे ते पद तुला?

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2016 - 12:27 pm | टवाळ कार्टा

मग काय कुवत पात्रता लागते ते लिही इथे

धागा यायलाय एक माझा त्यावर.
तोपर्यंत तुझे कुणी असेल तर विचार की बिनधास्त.

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2016 - 1:10 pm | टवाळ कार्टा

खि खि खि....धाग्याच्या प्रतिक्षेत

भाग्यश्री कुलकर्णी's picture

30 Sep 2016 - 9:25 am | भाग्यश्री कुलकर्णी

:)

हेमंत लाटकर's picture

30 Sep 2016 - 12:22 pm | हेमंत लाटकर

रातराणी, मस्त कुरकुरित आणी खुसखुशीत धागा!