सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनुभवलेली ही घटना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडतेयं. वय वर्षे २० असलेली आदिवासी समाजातील मंजुळा फार दूर नाही, नाशिकपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरल्या एका गावात राहणारी. दुस-या बाळंतपणा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ना पेपरात बातमी छापून आली, ना कुठे त्यावर चर्चा झाली. पण या प्रातिनिधीक घटनेमागे बरचं काही घडलेलं आहे.
शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर माहेर असलेल्या मंजुळाचं वयाच्या १४व्या वर्षी लग्न झालं. अक्षर ओळख नसण्याइतपत शिकलेली मंजुळा सासरी आल्यावर दोन वर्षात पहिल्यांदा गरोदर राहिली. प्रथेनुसार पहिल्या बाळंतपणासाठी माहेराला दूर्गम गावी रवाना झाली. कमी वय, कमी वजन असं धोक्याचं बाळंतपण असल्यानं जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सिजेरीयन झाले. मुलगा झाला, पण बाळाची वाढ अपुर्ण होती. नवजात बाळाच्या अतिदक्षता विभागात १५ दिवस बाळ ठेवले. दुर्दैवानं बाळाची मानसिक वाढ खुंटल्यामुळे मतीमंदत्व पदरी आलं. परिणामी दूर्लक्षित मूल, कुपोषण हे दुष्टचक्र सुरु झालं. दरम्यान कौटुंबिक कारणांमुळे या पतीपत्नीला घरातून वेगळं निघावं लागलं. शेतीबरोबर मोलमजुरीची कामे करावी लागली. अशा परिस्थितीत मुल ३ वर्षाचं होता होता मंजुळा दुस-यांदा गरोदर राहिली. गावातल्या आशाताईने चौथ्या महिन्यात तिची नोंदणी करुन गरोदरपणाविषयी आरोग्य शिक्षण दिलं. लसिकरण सत्राला सोबत नेऊण नर्सबाईकडून धनुर्वाताचं इंजेक्शन आणि मातृत्व अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला.
गावामध्ये पोटापुरतं उत्पन्न मिळत नसल्याने शेवटी दोघांनीही मंजुळाच्या माहेरी, ठाणे जिल्ह्यात जाण्याचे ठरविले. सातव्या महिन्यात माहेरी नेल्यानंतर जवळच्या गावात खाजगी डॉक्टरकडे दाखवून आणले, डॉक्टरसाहेबांनी सुचविल्याप्रमाणे रक्तवाढीसाठी लोहाच्या गोळ्या महिनाभर नियमित घेतल्या. दुस-या जिल्ह्यातून स्थलांतरीत असल्यानं माहेरी नर्सबाईकडून तपासणी व इतर सुविधांची उपलब्धता झाली नाही.
गरोदरपणात मंजुळाची तब्येत नाजुकच होती. घरी सतत ती डोकं दुखते, कंबर दुखते अशा तक्रारी करत होती. बाळंतपण जवळ आल्यावर नव-याने अत्यायीक परिस्थितीसाठी पैशांची सोय करुन ठेवली. एक दिवशी सकाळी मंजुळाने घरी पोटात दुखते म्हणून सांगितले. नेहमीचीच तक्रार समजुन घरच्यांनी विशेष लक्ष दिले नाही. दुपारी तीन वाजता दुखणं असह्य झाल्यानं शेवटी घरच्यांनी शेजारच्या गावातून खाजगी वाहनाची व्यवस्था केली व पहिले मोखाडा गाठलं, तिथे व्यवस्था न होवू शकल्याने जव्हारला ग्रामीण रुग्णालयात नेले, तिथल्या वैद्यकीय अधिका-यांनी पुरेश्या सोयीअभावी रुग्णास जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे हलविण्याच्या सुचना केल्या आणी रुग्णवाहिका, परिचारकांच्या सोबतीने मंजुळाची नाशिककडे रवानगी केली.
प्रवासादरम्यान मंजुळा बाळंत होवून मृत मूल जन्माला आले. पण वार न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवू लागला. नाशिकला पोहोचेपर्यंत रात्र झाली. मंजुळा बेशुद्धावस्थेत गेली. तातडीने तिच्यावर इलाज सुरु करुन रक्त देण्यात आले. पण शेवटी सर्व प्रयत्न अयशस्वी होवून रात्री एकच्या सुमारास मंजुळाची प्राणज्योत मावळली.
वरील घटनेत मंजुळा नावाव्यतिरीक्त एकही शब्द काल्पनिक नाही. एक प्रश्नमालिकाच समोर उभी राहतेयं
मंजुळाला प्रवासादरम्यान तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली असती तर?
मंजुळाचा अत्यायीक स्थितीतल्या प्रवासाचा कालावधी कमी असता तर?
रुग्णाला कुठल्या परिस्थितीत कुठे पाठवायचे याविषयी माहिती देणारी दूरसंपर्क यंत्रणा सक्रिय असती तर?
तालुक्याच्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर व अत्यावश्यक सेवा (EmOC) उपलब्ध असत्या तर?
खाजगी डॉक्टरकडे योग्य सल्ला मिळाला असता तर?
मंजुळा व तिच्या पतीला गावातच उत्पन्न वाढीची संधी उपलब्ध असती तर?
मंजुळाचं कौटुंबिक स्वास्थ्य व्यवस्थित असते तर?
मंजुळाचं लग्न योग्य वयात झालेलं असतं तर?
मंजुळा शिकलेली असती तर?
यापैकी एकाही शक्यतेचे जर सकारात्मक निराकरण होते तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. एक मातामृत्यु टाळण्याच्या कितीतरी संधी नाकारण्यात आल्या. सर्व घटनेकडे केवळ वैद्यकीय नजरेतुन न पाहता वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवर प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळ्या पर्यायाने उत्तर शोधावी लागतील.
अजुनही बरेच तांत्रिक प्रश्न आहेतचं, ज्याप्रमाणे आरोग्यसेवा पुरविताना जिल्हा बदली हा प्रश्न आला तसाच आता मातामृत्युची नोंद होतानाही येईल का? १०८ - १०४ - १०२ असा बहूपर्यायी घोळाएैवजी सेवा पुरवठादारांकडे समन्वयाची यंत्रणा का नाही? त्या कुटुंबाच्या पहिल्या मतीमंद मुलाचे काय होईल? अत्यावश्यक सुविधा नसताना प्रत्येक बाळंतपण दवाखान्यातच झाले पाहीजे हा सरकारी अट्टहास कशासाठी? स्त्री आरोग्याकडे पाहण्याचा सकारात्मक सामाजिक दृष्टीकोण कधी निर्माण होईल?
सामाजिक क्षेत्रात समाजाच्या शेवटच्या घटकांसोबत काम करत असताना, कदाचित प्रत्येकाला असे अनुभव येत असतील. या प्रत्येक टप्प्यावर बदल आवश्यक आहे, असं मनापासुन वाटते ......
प्रतिक्रिया
29 Aug 2016 - 9:33 pm | अमितदादा
ज्याची उत्तरे मिळणे अवघड आहे असे प्रश्न विचारून तुम्ही अस्वस्थ केलत...
29 Aug 2016 - 10:56 pm | अशोक पतिल
अतिशय वेदनादायक ! कधी कधी सरकारी खाक्या कसा असतो याचे हे उदाहरण !