सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
1 Dec 2007 - 8:24 pm

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते. त्यात प्रा.केशव मेश्रामांचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे. कवी, कादंबरीकार, आणि समीक्षक म्हणून त्यांची ओळख साहित्य वाचकांना नवी नाही.'अस्मितादर्श' या नियतकालिकाच्या मेळाव्यापासून चळवळीचे  आणि साहित्यामधून  उपेक्षीतांच्या जीवनाचे चित्रण आपल्या लेखनातून त्यांनी मांडले. 'उत्खनन' 'जुगलबंदी' 'अकस्मात'' चरित' हे त्यांचे काव्यसंग्रह.  'पोखरण' 'हकीकत आणि जटायु 'या कादंब-या.  नंतर 'खरवड' 'कोळीष्टके' 'मरणमाळा 'आणि असे बरेचसे लेखन आहे.  मला आवडते ते त्यांचे 'अक्षर भाकिते' हे पुस्तक.  फारच सुंदर आणि वेगळ्या विषयांचे विवेचन त्यात आहे. काही विषयाचे केलेले विवेचन संशोधनाच्या दृष्टीने केवळ दलित नव्हे, तर अगदी दलितेतर  विषयाकडे खूल्यापणाने पाहण्याचा त्यांचा  स्वभाव सहीच होता, ते या पुस्तकातुन दिसून येते.  ग्रामीण आणि शहरी दलितांची गुंतागुंत, साहित्याची वैचारिक स्थिंत्यंतरे, गुन्हेगारीकडे झुकलेल्या पिढीचे चित्रण,  असे विविध विषय त्यांनी हाताळले
                 साहित्य ललित असते, पण ते दलित कधी असते का ? साहित्य उत्तम किंवा सामान्य असते पण ते 'दलित' कसे असेल ? साहित्य वैचारिक, राजकीय, धार्मिक किंवा पंथीय असेल, पण, ते 'दलित' असणार नाही. असतच नाही.  या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे देतांना- "दलित साहित्य ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तूत्वाने जागरूक झालेल्या, अस्मितेच्या शोधाने सर्व घातक धर्म, विचार, रुढी, संकल्पना, उक्ती, ग्रंथ आणि रुढी  यांना नकार देणा-या आणि नवसंस्क्रुतीच्या निर्माणाची, समतायुक्त सम्यक वाटचाल करणा-यांच्या संघर्षाची अस्तित्वात आलेली राजरस्ता होऊ पाहणारी ठळक पायवाट असेच म्हणावे लागेल" १                   दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले. आपल्या मानसिकतेत  'अध्यात्म ' अतिशय प्रभावी आहे, त्याचे समाज व समाजाच्या दुखण्याशी असलेले नाते व फलश्रुती हे आजच्या काळात पडताळून पाहणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. साहित्यप्रवाहातील आणि प्रकारातील स्वीकारलेल्या तत्वाचा अखंडपणे पुरस्कार करणा-या,  उपेक्षितांच्या दु;खांना आणि वेदनांना मांडणारा एक भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, विद्रोह हा विंध्वंसक नसून तो संयमीही राहू शकतो हे त्यांनी आपल्या साहित्यकृतीतून सिद्ध केले............!
               मराठी साहित्यातील  सिद्धहस्त कवी, लेखक, समीक्षक व विचारवंत प्रा. केशव मेश्राम यांना मिसळपाव परिवाराच्या वतीने विनम्र श्रद्धांजली !!!
१) अक्षर भाकिते - केशव मेश्राम- स्वरुप प्रकाशन औरंगाबाद. पृ. क्र. १६

कलासंस्कृतीवाङ्मयसाहित्यिकलेखमतबातमी

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

1 Dec 2007 - 9:32 pm | आजानुकर्ण

आक्रस्ताळेपणा न करता संयमित भाषेत लेखन करणारे लेखक. त्यांचे एक पुस्तक वाचले आहे. (नाव आठवत नाही.) शिवाय शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडाही होता.

विनम्र श्रद्धांजली.

- आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

2 Dec 2007 - 12:30 am | विसोबा खेचर

बिरुटेसाहेब,

प्रा केशव मेश्राम यांच्या साहित्यिक वाटचालीचा आपण मोजक्या शब्दात परंतु अत्यंत योग्य असा मागोवा घेतला आहे.

मेश्रामसाहेबांच्या स्मृतीस माझीही विनम्र आदरांजली....

तात्या.

धोंडोपंत's picture

2 Dec 2007 - 3:34 pm | धोंडोपंत

प्राध्यापक साहेब,

सरांना आमची भावपूर्ण आदरांजली.

एक निगर्वी, सात्विक आणि संयम ठेऊन लेखन करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला.

आपला,
(खिन्न) धोंडोपंत

आपला लेख उत्तम झाला आहे.

आपला,
(वाचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत's picture

2 Dec 2007 - 3:39 pm | धोंडोपंत

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल.

ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते खुलून बोलत. त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा होता.

आपला,
(वारकरी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2007 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल.

धोंडोपंत,
वाचकांची अभिरुची संकुचीत स्वरुपाची असु नये या मताचे आम्ही. त्यामुळेच हा विषय आम्ही येथे टंकीला.
ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते जसे खूलुन बोलत तसे ते तुकारामाचा विषय निघाला की, तब्येतीने बोलत. त्यांचा एक लेख आहे, 'तुकारामः समुहाचा वाटाड्या, आणि 'गाथा तुकारामांची' या शिर्षकाचा. ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल.

पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!!

आपला.
साहित्याचा वारकरी
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

अवलिया's picture

19 Jul 2010 - 5:58 pm | अवलिया

पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!!

या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. यापरते गोमटे निमित्त मिळणार नाही. वाट पाहात आहे....

विठठल ...विठठल.. !!

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

प्रमोद देव's picture

2 Dec 2007 - 9:19 pm | प्रमोद देव

प्राध्यापक केशव मेश्राम ह्यांना माझीही श्रद्धांजली.
मराठीतील माझे साहित्यवाचन अतिशय तुटपुंजे असल्यामुळे(आणि मराठी व्यतिरिक्त मी दुसर्‍या कोणत्याही भाषेतले काही वाचत नाही. का? अहो इथे समजतंय कुणाला?) मला स्वतःला प्रा.केशव मेश्राम सरांबद्दल विशेष माहिती नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते इतपतच त्यांची माहिती आहे.
तेव्हा बिरुटेसाहेब आपल्यासारख्यांच्या लेखनातून आमच्यासारख्या अल्पवाचन असणार्‍या लोकांना अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो अशी विनंती करतो.

धोंडोपंत's picture

3 Dec 2007 - 10:33 am | धोंडोपंत

ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल.

वा वा प्राध्यापक साहेब,

आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे.

दादांचा शेर आठवला

ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे......

ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखोबा, सेनामहाराज, निळोबा, मुक्ताई,जनाई यांच्याबद्दल जेवढे लिहाल तेवढा आम्हाला आनंद आहे, कारण ही आमची वंशावळ आहे असे आम्ही मानतो.

झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग| उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू
अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधना बुडविली
पिटू भक्तिचा डांगोरा | कळीकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंद

हे आमचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळेच दूरदर्शन वरील एखाद्या "पंचतारांकित" स्वामींपेक्षा -

"ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा ?"

हे म्हणणारा आमचा चोखोबा आम्हाला "आपला" वाटतो.

आपला,
(संतचरणरज) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मितभाषी's picture

19 Jul 2010 - 5:11 pm | मितभाषी

दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले.

हम्म्म..
मेश्रामसरांना नाशिकच्या साहित्यसंमेलनात पाहीले होते. एका पुस्तकाच्या स्टॉलवर बसलेले होते. एकदम साधा माणुस. विद्वत्तेचा, मोठेपणाचा कुठलाही आव नाही.
नंदा मेश्रामांची 'मी नंदा' आताच वाचले. छान लिहिले आहे. मेश्रामसरांचे ही साहित्य वाचायचे आहे.