मसाज
...विजय तेंडुलकरांचं हे नाटक.. रूढार्थानं हे नाटक नाही, किंवा एकपात्री प्रयोग म्हणावं तर तसाही नाही हा...
( याला एकपात्री शब्दखेळ असे नाव दिले आहे)
हे नाटक पहायचा योग नाही आला, पण पुस्तक सापडलं म्हणून घेऊन आलो....
ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले.... या माणसाच्या आयुष्यात अनेक दु:खाचे प्रसंग आले तरी हा सतत हसरा चेहरा ठेवूनच बोलायचा...हे हसू विसंगत होते आणि तरी होते......
हा माणूस कोणी कर्तबगार नाही, हुशार नाही, रूढार्थाने यशस्वी नाही त्यामुळे या बिनमहत्त्वाच्या आयुष्याचं वेगळेपण प्रेक्षकांपर्यंत तेंडुलकरांनी या मसाज नावाच्या प्रथम पुरुषी लिहिलेल्या लेखनाद्वारे पोचवले आहे.
समन्वयने याचे प्रयोगही केले बरेच...
निखिल रत्नपारखीने काम केले आणि संदेश कुलकर्णीचे दिग्दर्शन आहे.
या लेखनाचे मला जाणवलेले वेगळेपण म्हणजे या माणसाच्या या गोष्टीला कुठेही मोजून मापून बेतलेल्या गोष्टीचे स्वरूप दिलेले नाही... हा माणूस प्रेक्षकांना एकामागून एक किस्से सांगत राहतो, त्यात त्याची बयाचदा वाट लागते, संधी हुकते पण चेहरा हसरा राहतो..... हे सारे प्रसंग अधिक ड्रामॅटिक, नाट्यमय , संघर्षपूर्ण करता आले असतेही कदाचित असे जाणवत राहते
हा सिनेमात हीरो बनायला निघालेला पण डायरेक्टरचा चौथा असिस्टंट बनून इमाने इतबारे त्याची कामं करणारा, ( त्यात हिरॊईनच्या मातेला एंगेज ठेवणं , डायरेक्टरचं डोकं रगडून देणं, डायरेक्टरच्या घरी जाऊन त्याची कामं करणं असली कामंही करावी लागतात.) एकदा तर डायरेक्टरपत्नीलाही मसाज करून द्यावा लागतो... यानं मसाज अजिबात शिकलेला नाही, जे काही येतं ते चुकत माकत अंदाज घेत घेत तरी डायरेक्टर याच्या मसाजवर जाम फ़िदा..... पण हीरोचं काम मिळत नाही, नुसतं मसाजचं कौतुक ....
वैतागून हा नोकरी सोडून जिममध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून चिकटतो... तिथल्या काही ललनांचे विचित्र अनुभव, जिममध्ये एका पाठीत उसण भरलेल्या पेशंटला अंदाज घेत घेत मसाज देण्याचा प्रसंग मस्त....
मध्यंतरीच्या काळात गुंडांच्या तावडीतून याने सोडवलेली / चुकून सुटलेली बाई याच्याकडेच राहायला येते. याच्या एका खोलीच्या घराला घरपण देते...हा तिला तिचं पूर्वायुष्य विचारत नाही, ती सांगत नाही. ... आता याच्या घरावर मसाजिस्ट म्हणून पाटी लागलीय,जुने काँटॅक्ट्स वापरून हा काम मिळवतोय, थोडं नावही झालंय, त्यामुळे एकदा एक हीरॊईनच्या घरी मसाजसाठी याला आमंत्रण येतं...तो किस्सा भन्नाट आहे.
मग रात्री एका उत्तर भारतीय केंद्रीय मंत्र्याच्या मुंबईतल्या घरी चमच्यांचा सगळा दरबार जमला असताना केलेल्या मसाजचे वर्णन मस्त ..... एके रात्री त्याला पोलीस स्टेशनात बोलावणे येते , तिथे लॊक-अपमध्ये एका कैद्याचा मृत्यू झालेला असतो, ( आत्महत्या ? ) ...याला तिथे पंच म्हणून बोलावलेले असते.... ते वर्णन एकदम भयानक आहे.... नंतर बसस्टॉपवर त्याला एक वकील भेटतो आणि सांगतो की तुमच्याबरोबर राहणारी बाई ही माझ्या अशीलाची पत्नी आहे, तिला सोडा नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाईचा प्रसंग ओढवेल...... याची द्विधा मनस्थिती होते आणि हा मनाचा हिय्या करून तिला हे सांगणार त्याच दिवशी ती त्याचे घर सोडून जाते... हा उध्वस्त वगैरे होतो , शेवटी वृद्धाश्रमात राहायला येतो असे सूचित केले आहे...
अशी ही एका जन्मसिद्ध चौथ्या असिस्टंटच्या आयुष्याची मजा. विषय होता मसाज. शेवटी तो म्हणतो, " हे असं कोणी आपल्याला न विचारता आपल्याबद्दल सांगणं हाही मसाजच, नव्हे का? आपणच आपल्याला करून घेतलेला .... वेळ बरा गेला... आपल्याला हलकं वाटलं , संपलं.."
सुरुवातीचे तेंडुलकरांचे मनोगत...
या पुस्तकात शेवटी संदेश कुलकर्णीचा ( दिग्दर्शक) मसाजचा अनुभव असा दीर्घ लेख आहे....
एकपात्री दिग्दर्शनाचा अवघड गेलेला प्रयत्न, विविध अडचणी आणि त्यावर केलेली मात असा मस्त जमलाय.
हे पुस्तक वाचताना मजा येते... प्रयोगात मला जरा कमी मजा येईल असं वाटतं, काही अंदाज नाही..
( यातले किस्से वेगवेगळे म्हणून मस्त आहेतच, पण नुसते एकामागोमाग किस्से कितीकाळ ऐकायचे ? तेही नाटक म्हणून त्यांना जोडणारे एकसंध काही सापडत नाही असे वाटते ... ) कदाचित लेखक किश्श्यांच्या सत्यतेला खूप चिकटून राहिले असतील असेही असेल...
इथे कोणी पाहिले आहे का हे नाटक?
प्रतिक्रिया
27 Aug 2008 - 5:16 pm | मनिष
बघितले नाही....पुस्तक चाळले होते पण वाचले नाही, वाचेन आता नक्की! :)
27 Aug 2008 - 5:21 pm | ऋषिकेश
हं वाचायला हवे! खरे तर अशी पुस्तके मी फारशी वाचत नाहि पण तुमचे समीक्षण वाचून वाचून बघावेसे वाटत आहे.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
27 Aug 2008 - 5:51 pm | सुनील
लेख आवडला.
तेंडुलकरांच्या ह्या पुस्तकाविषयी कधी ऐकले-वाच्ले नव्हते. आता तुम्ही परिचय करून दिल्यावर उत्सुकता थोडी वाढली आहे. वाचून बघायला हवे...
परिचय वाचून काही विचार मनात आले ते अशे -
हा माणूस कोणी कर्तबगार नाही, हुशार नाही, रूढार्थाने यशस्वी नाही त्यामुळे या बिनमहत्त्वाच्या आयुष्याचं वेगळेपण प्रेक्षकांपर्यंत तेंडुलकरांनी या मसाज नावाच्या प्रथम पुरुषी लिहिलेल्या लेखनाद्वारे पोचवले आहे.
खरे म्हणजे, सर्वसामान्य माणसाचे आत्मचरीत्र हे कुठल्याही प्रतिथयश माणसाच्या आत्मचरीत्राइतकेच सुरस असते. फक्त त्याला ते व्यवस्थित मांडता येत नाही म्हणून ते लोकांपर्यंत पोचत नाही, इतकेच.
हे पुस्तक वाचताना मजा येते... प्रयोगात मला जरा कमी मजा येईल असं वाटतं, काही अंदाज नाही..
नाटक हे "पर्फॉर्मिंग आर्ट" आहे हे खरेच. पण ते तसे असायलाच हवे का? असे नाटक लिहिता येणार नाही का की जे "प्रयोगक्षम" नाही पण नुसतेच वाचनीय आहे (एखाद्या कथा, कादंबरी प्रमाणे)? कुठल्या नाटककाराने असा प्रयत्न कधी केला आहे काय?
हे असं कोणी आपल्याला न विचारता आपल्याबद्दल सांगणं हाही मसाजच, नव्हे का? आपणच आपल्याला करून घेतलेला ...
हे वाक्य आवडलं.
(तेंडुलकरांचा चाहता) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Aug 2008 - 11:29 pm | भडकमकर मास्तर
असे नाटक लिहिता येणार नाही का की जे "प्रयोगक्षम" नाही पण नुसतेच वाचनीय आहे (एखाद्या कथा, कादंबरी प्रमाणे)? कुठल्या नाटककाराने असा प्रयत्न कधी केला आहे काय?
प्रश्न थोडा मजेशीर आहे...
म्हणजे जर ते नुसतेच वाचनीय असेल तर ती कादंबरीच होईल, ते नाटक कसे?
असो.. आपल्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आला...
मसाज वाचताना ती एक दीर्घकथा किंवा लघुकादंबरीच वाटते....
त्याचे मंचन करायचे ठरवणे आणि ते नाटक म्हणून यशस्वीरित्या पेलून दाखवणे हे अवघड....
वैयक्तिक मत :
प्रयोगक्षम नसणारे नाटक करायचे म्हणजे कौशल्य नसून एक मर्यादा ( लिमिटेशन ) आहे...जे नाटकात मंचावरती घडूच शकत नाही, असे लिहिणे म्हणजे प्रयोगक्षम नसणे...
पाऊस पडून बराच वेळ होऊन गेला होता...
हीरो बोट फुटून पाण्यात फेकला जातो आणि गटांगळ्या खाऊ लागतो... असले काहीबाही....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
27 Aug 2008 - 10:06 pm | मेघना भुस्कुटे
धन्यवाद मास्तर.
येत्या पखालफेरीत 'मसाज' नक्की. ते अजून वाचलं नाहीय मी.
27 Aug 2008 - 10:59 pm | प्रभाकर पेठकर
नाटक पाहिलेलं नाही. पण पाहणयची जबरदस्त ईच्छा होती. ह्याचे मुख्य कारण त्यावर्षात आलेल्या सर्व नाटकांना मागे टाकून फक्त 'मसाजने' आणि पर्यायाने 'निखिल रत्नपारखीने' कौतुकाची शाबासकी मिळविली होती.
ह्याचे हिंन्दी प्रयोगही खूप झाले. पण तो कलाकार वेगळा. ओळखिचाच आहे पण आत्ता ह्या क्षणी नांव आठवत नाहिए. (सई परांजपेंच्या 'चश्मेबद्दूर' मधला...अं अं ...राकेश बेदी? हं. तोच तो.).
27 Aug 2008 - 11:20 pm | भडकमकर मास्तर
अरेच्या... हे माहितच नव्हतं मला...
मस्त माणूस .हिन्दी प्रयोगसुद्धा छानच होत असणार...
माहितीबद्दल धन्यवाद काका...
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Sep 2008 - 10:57 pm | भडकमकर मास्तर
सई परांजपेंच्या 'चश्मेबद्दूर' मधला...अं अं ...राकेश बेदी? हं. तोच तो.).
चष्मेबद्दूरमध्ये फारूख शेख होता...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Sep 2008 - 11:00 pm | मेघना भुस्कुटे
फारुख शेखचे दोन मित्र होते ना, त्यातला गब्दुल मित्र म्हणजे राकेश बेदी.
19 Sep 2008 - 11:00 pm | मुक्तसुनीत
>> चष्मेबद्दूरमध्ये फारूख शेख होता...
आणि राकेश बेदी व रवि वासवानी सुद्धा ! :-)
19 Sep 2008 - 11:03 pm | भडकमकर मास्तर
अरे हो की...
पण हिंदीतून मसाजचा प्रयोग कोण करतं?
राकेश की फारूख?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 Sep 2008 - 12:26 pm | प्रभाकर पेठकर
राकेश बेदी.
27 Aug 2008 - 11:15 pm | डॉ.प्रसाद दाढे
मास्तरा॑ची नेहमीसारखीच छान पुस्तक/ नाट्य ओळख. औत्सूक्य निर्माण करणारी. कधी न ऐकलेल॑ नाटक, पण (मास्तरा॑मुळे) वाचल॑ / पाहिल॑ पाहीजे
19 Sep 2008 - 11:06 pm | प्राजु
मास्तरांची पुन्हा एकदा चौकार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Aug 2008 - 11:59 pm | विसोबा खेचर
मुंबईत कधी होणार आहे या नाटकाचा प्रयोग? जाहिरातींकडे लक्ष ठेवले पाहिजे!
28 Aug 2008 - 11:05 am | प्रकाश घाटपांडे
मसाज च्या निमित्ताने समाजाचे होणारे चित्रण आवडले. नाटक बघायला आवडेल. लागल सुदर्शनला तर मास्तरांच्या नावाने पुकारा करु :H
प्रकाश घाटपांडे
19 Sep 2008 - 6:52 pm | मुक्तसुनीत
काल रात्रीच हे पुस्तक वाचून संपविले. म्हण्टले , अजून मनावरचा ठसा नवा आहे तोवर मास्तरांच्या थ्रेडवर जाऊन आपले २ आणे टाकून यावेत.
पुस्तक अगदी लहानसे आहे - एका वाचनात संपावावे असेच. संहितेबद्दलच मला बोलता येईल. प्रयोग पाहण्याचे भाग्य आम्हाला कुठे ?
तेंडुलकरांच्या लिखाणाचा एकूण आवाका पाहता, २००८ साली त्यांचे निधन होईपर्यंतच्या , उण्यापुर्या सुमारे ५५ वर्षांच्या कालवधीत त्यांनी केलेल्या लिखाणाचे प्रमाण प्रचंड म्हणावे इतपत मोठे आहे. बाप रे ! ५५ वर्षे तुमच्यातला किडा मरत नाही. त्यावर तुम्ही गुजराण करता ! रात्रंदिवस तेच लिहिता. कल्पना करणे सोपे नाही. तर आपल्या शेवटच्या वर्षांमधे - जेव्हा इतर लेखकांचा रस आटून संपलेला असतो - तेव्हापावेतो हा लेखक काही ना काही प्रयोग करत राहिला. शेवटी शेवटी दोन कादंबर्याही लिहील्या. २००४ साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची गणना या प्रयोगांतलीच.
नेहमीप्रमाणेच मास्तरांनी आपल्या नेहमीच्या शैलीत परिचय करून दिला आहेच ! (स्पॉईलर अलर्ट मात्र मास्तर टाकत नाहीत. हे अंमळ चूकच.) तर , तेंडुलकरांच्या एकंदर साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे ढोबळ मानाने दोन भाग करता येतील. विधिनिषेधशून्य सत्ताकारण/हिंसा/जमातवाद/भ्रष्टाचार यांच्यावर कठोर, मर्मभेदक भाष्य करणारे लिखाण - यात घाशीराम, बायंडर, गिधाडे, अर्धसत्यची पटकथा इ. इ. गोष्टी येतील. आणि दुसरे म्हणजे , समाजातल्या कडेकडल्या , अंधारलेले आयुष्य जगणार्या माणसांचे दर्शन घडविणारे - त्यांच्या प्रश्नाना काडेचिराईती किंवा धंदेवाईक पत्रकारितेचे किंवा दया दाखविण्याचे स्वरूप न देता. "मसाज" सरळसरळ दुसर्या श्रेणीतले.
करंदीकर का कुणाची अशा अर्थाची ओळ आहे की "सामन्य माणूस मरत नाही - कितीही मारला तरी". "मसाज" सारख्या लिखाणातून हेच दिसते. सगळीकडून धुत्कारल्या गेलेल्या माणसालाही आपले आयुष्य उभे करता येतेच- मग अशा आयुष्यात कितीही मानहानी , फसवणूक असेना. आयुष्य नावाच्या जनावराशी प्रत्येक जण जमेल तितपत झगडत रहातो. ज्या व्यक्तिचे हे आत्मकथन आहे ती व्यक्ती लेखकाला जवळून माहिती होती असे त्यानी प्रस्तावनेतच म्हण्टले आहे. तर अशा या "सर्व्हायवल"च्या कहाणीत अनेक सामजिक विसंगती आणि वेगवेगळ्या स्तरातील माणसांचे बुरखे तेंडुलकर ओढतात.
मसाज मधले काहीकाही उल्लेख सरळसरळ वास्तव व्यक्तींबद्दल - नावे बदलून अर्थात. स्मिता पाटीलबाबतचा उल्लेख असाच उघडउघड आहे. वर्णिलेला प्रसंग बदनामीकारक नसला तरी कुतुहल चाळवणारा.
असो. हे पुस्तक मला माहित झाले मास्तरांमुळे . मास्तर भेटले मिपा मुळे. आणि माझे दोन आणे ऐकून घेतात मिपाकरच :-) पुन्हा एकदा आभारी आहे.
19 Sep 2008 - 11:02 pm | भडकमकर मास्तर
स्पॉईलर अलर्ट मात्र मास्तर टाकत नाहीत. हे अंमळ चूकच.)
यावेळी जरा जास्तच स्टोरी लिहिली ...
पुढे लक्षात ठेवीन..
वर्णिलेला प्रसंग बदनामीकारक नसला तरी कुतुहल चाळवणारा
खरंय... तेंडुलकरांना त्यांनी पाहिलेल्या पात्रांची खरी नावंच नाटकात ठेवायची सवय होती.... त्याशिवाय त्यांची पात्रे नीट उभी राहत नाहीत असे त्यांनी स्वतःच कार्यशाळेत म्हटले होते, असे आठवते...... इथे त्यांनी नाव तरी बदलले नशीब...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/