सन १९८१ साली या देशात २ क्रांतिकारी घटना घडल्या. एक माझा जन्म झाला दूसरी एक दुजे के लिये रिलीज झाला. रातोरात वासू - सपना ही जोडी हीर - रांझा, सोनी-महिवाल, सलीम - अनारकली यांच्या पंक्तीत जाउन बसली. पण वासू - सपना या जोडीचा वारसा इतर सर्व जोड्यांपेक्षा अविनाशी ठरला. हा वारसा होता जिथे जागा मिळेल तिथे आपली स्वतःची "वासू - सपना" जोडी कोरण्याचा. दगड बघ नका, झाडे बघु नका, सार्वजनिक शौचालयाच्या भिंती बघु नका, वर्गातली बाके बघु नका, रुग्णालयाच्या भिंती बघु नका, मोटारींच्या धुळीने भरलेल्या काचा बघु नका की पुरातन वास्तुंची स्मारके बघु नका जिथे तिथे या प्रत्येकाच्या आपापल्या वासू सपनांच्या जोडीने गेली ३० - ३५ वर्षे उच्छाद मांडला आहे. इतक्या अनवट जागी या जोड्या कोरलेल्या बघितल्या आहेत की आताशा या उच्छादाकडे कानाडोळा करायला शिकलो आहे. अर्थात रायगडावर गेल्यावर एखाद्या दगडावर जय शिवाजीच्या मागे हळूच "तुच माझी लैला" वगैरे असले काही वाचायला मिळायले की चिडचिड होते. पण या सर्वांवर कडी करेल असला प्रकार मी नुकताच याचि देही याचि डोळा बघितला.
हे ब्रह्मांड जिथे सुरु होते आणि जिथे संपते अश्या पावन पुण्यनगरीत म्या पामराने गेल्या २ दशकात इतके नानाविध नमुने बघितले आहेत की अजुन काही नाविन्यपुर्ण नमुने कुठे बघता येतील याबाबतची आशा मावळत चालली होती. पण पुणे तिथे काय उणे. तर त्याच पुण्यनगरीत तानाजी मालुसरे यांनी जिथे देह ठेवला आणि शेलारमामाने जिथे उदयभानुला आडवा केला त्या सिंहगडावरील तानाजी मालुसरे समाधीच्या आसपासच मला काही नररत्नांनी त्यांचे प्रताप कोरुन ठेवलेले बघण्याचे भाग्य लाभले. यातील नाविन्य हे की आजवरच्या इतिहासात कोणी आपली नावे कॅक्टसच्या पानांवर कोरुन ठेवलेली बघितली नव्हती. याखेपी ते भाग्यदेखील लाभले.
यातला हा जो कोण शेखर आहे आणि जी कोण "Wating for you Forever" तिला पहिल्यांदा कोणीतरी पहिल्यांदा इंग्रजी शिकवा रे. तरी नशीब तिने "Wating" लिहिले. चुकुन a च्या ऐवजी e पडला असता तर पुण्यातल्या संस्कृतीरक्षकांनी आख्खा सिंहगड धुउन काढला असता.
या दुहेरी पात्यांवर ज्यांना आपली नावे कोरण्याचा विचार सुचला असेल त्यांना सलाम. पण बाबांनो जरा बरे अक्षर काढा. ती प्राची आहे ते कळाले पण तो नक्की कोण आहे? ते बेडकाने हागल्यासारखे जे काही लिहिले आहे ते माझ्या प्रेयसीने लिहिले असते तर मी ताबडतोब काडीमोड घेतला असता (लग्नाआधीच).
या मानवाचे त्याच्या मानसीवर जरा जास्तच प्रेम असावे बहुधा. एकदा लिहुन भागले नाही म्हणुन ३-३ दा लिहुन काढले उभे आडवे तिरपे जसे जमेल तसे त्या मानसीला कोरले आहे पठ्ठ्याने. नशीब एका पानात काम भागले नाहितर सिंहगडाचे नाव बदलुन मानसीगड ठेवायला लागले असते. त्याच्याबाजुच्या पानावर इ लोवे योउ कोरणार्या त्या म्हाभागाला जागेचा अंदाजच आला नाही. प्रेमाचा इकरार करुन झाल्यावर प्रेमवीरांचे नाव लिहायला जागाच न उरल्याने त्याचे (किंवा तिचे) प्रेम अजरामर होता होता थोडक्यात वाचले. सो सॅड ना?
अखिल सिंहगडावर सुवाच्य अक्षराचा पुरस्कार द्यायचा झाल्यास मी तो या जोडप्याला दिला असता. रोहन - नमिता. दोन्ही कसे स्पष्टपणे वाचता येते. ते दोघे (किमान लिहिणारा) डॉक्टर नाहित हे त्यांचे हस्ताक्षर दुनियेला ओरडुन ओरडुन सांगत आहे.
हा जो कोण असेल, बहुधा आदेश असावा. (इथे स्वतःचेच स्पेलिंग चुकवले माठाने) पण त्या आदेशची कल्पकता भावली आपल्याला. ----. हाण्ण तिच्यायला. जेव्हा कळेल तेव्हा लिहिन नाव तोपर्यंत आपली जागा तर अडवुन ठेवली. कदाचित काही गोंधळ असावा की नक्की कोणाचे नाव लिहावे. पण तेवढ्यासाठी इतिहासात अमर व्हायची संधी कोण चुकवणार? तर म्हणुन Adesh बदाम ----. जिसकी किस्मत मे होगा (थोडक्यात किस्मत खराब होगी) उसका नाम वहा लिखेगा.
इथे लेखकाची हुषारी बघा. तुषार - कजोल काय हजारोने आहेत. जितेंद्रने पण त्याच्या मुलाचे नाव तुषार ठेवले आहे आणि तनुजाने पण तिच्या मुलीचे नाव काजोल ठेवले आहे. किती ते कन्फ्युजन. कोण निस्तरणार नंतर? म्हणुन मग दोघा कुकुचकुंनी कंसात आपापली गोंडुश नावे पण लिहुन ठेवली. तो पिल्लु आणि ती बेबी. पिल्लु आणि बेबी वा. अजुन डायपरमधुन बाहेर नाही पडले हे पण नावे लिहुन ठेवायचा किती तो सोस. बालविवाह करायचा विचार असावा कदाचित. त्यातही ती बेबी हे ठीकच. पण तो पिल्लु? अंगावर काटा आला हो सर्रकन. विचार करा तुमची बायको किंवा प्रेयसी लाडाने तुम्हाला पिल्लु म्हणते आहे. पिल्लुल्लुल्लु. पिल्लु. मी त्या देवटाक्यात जीव दिला असता किंवा तानाजीने घोरपड चढवली ती जाग शोधुन काढुन खाली उडी मारली असती. असे असताना या महाभागाची हिंमत बघा. त्याने आधी ०३.१२.२०१४ ला स्वतःच्या उपनामाची कबुली दिली आणी वर पुढच्या बुधवारी येउन परत एकदा त्यावर मोहोर उमटवली. आशा करुयात की दुसर्या वारीत स्वतःची चुक उमजुन पिल्लुने ती घोरपडीची जागा शोधुन काढली असावी. आशा करायला वाव आहे कारण १० डिसेंबर नंतरची नोंद त्या पानावर सापडली नाही. बाकी त्या पानावरचे तीन बदाम बघुन मी तीन फुल्या शोधत होतो. सापडल्या नाहित. बेबी पुढच्या भेटीत करेल बहुधा. तेव्हा तिच्याबरोबर कदाचित बच्चु असेल.
हे त्रिकुट बघा आता. इसमे हिरो है, हिरोइन हय आणी व्हिलन भी हय. आधी निखिल आणि पी आले. मग त्यांनी स्वतःच्या इष्काचा यल्गार केला. निखिल ने पी वरचे प्रेम जगजाहीर केले (इथेही त्याने चलाखी केली आहे. फक्त पी लिहिले आहे. बरेच ऑप्शन ओपन ठेवलेत म्हणजे. प्राची, प्राजक्ता, प्रार्थना, पूजा, पल्लवी. घे तिच्यामायला. पायजेल ती असू देत.). पण इथे एक लव्ह ट्र्यांगल हाये. नंतर तो एके का कोण त्याने येउन पी पुढे स्वतःचा मालकी हक्क देखील बजावला आहे. आता तो मालकी हक्क पी वर बजावला आहे की निखिल वर देव जाणे? की तिघांनी आपापली नावे लिहुन ठेवली आणि यथावकाश निर्णय घेणार आहेत कुणास ठाउक. मी ती पी असतो तर त्या एकेला नक्की निवडला नसता. किती गचाळ अक्षर आहे.
हा एक कलंदर गडी बघा. काजल, पूनम, कोमल, श्वेता, सगळे ऑप्शन लिहुन काढले. एक फायनल झाली की बाकिच्यांची नावे कापता येतील. खाली तारीखही लिहिली आहे. ३०.०१.२०१५. बहुधा त्याने टार्गेट ठेवले असावे स्वतःसाठी. २ आठ्वड्यात (१४ फेब्रुवारी पर्यंत) नाव फायनल आणि मग १४ नोव्हेंबर पर्यंत ----. कळेलच ६ - ७ महिन्यात पुढची एंट्री पडली तर. तोपर्यंत स्टे ट्युन्ड.
ये उन हैवानो की दरिंदगी का सबसे मासूम शिकार. नाम है प्रीति. याच्याहुन छोट्या कॅक्टसवर उपकार केले होते आधुनिक वासु सपनांनी.
गडावरचा जवळपास प्रत्येक कॅक्टस असाच फुलला होता. असंख्य वेगवेगळ्या नावांची नक्षी आणि रेघोट्या. जगभरची नावे ओतली होती तिथे प्रेमवीरांनी.
या सगळ्याला वैतागुन कोणीतरी अस्सल पुणेकराने खालील मेसेज लिहिला असावा:
"येथे नावे लिहु नये नाहितर----". इथे बहुधा या बहाद्दुराला लिहायचे असावे "येथे नावे लिहु नये नाहितर कॅ़क्टस .........". प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार गाळलेल्या जागा भरुन घेणे. त्या नाहितरला घाबरुन असेल कदाचित पण तो बेंच या अत्याचारातुन बचावला.
नशीब त्या तानाजीने आणि शेलारमामांनी देह त्याग करुन शतके उलटली नाहितर आज त्यांनी परत एकदा प्राण ठेवला असता. काही नाही तर किमान शेलारमामांनी खालचा बॉर्ड वाचुन प्राणत्याग केला असता:
अर्रे का त्या शेलारमामांचे क्रेडिट काढुन घेताय? त्यांनी मारला ना त्या उदय भानु ला? तानाजी मालुसरेच्या समाधीवर, सिंहगडावरच त्या इतिहासाचे इतके जाहीर धिंडवडे?
असो. सिंहगडाची सध्या जी क्रुर चेष्टा चालु आहे ती बघता लवकरच गडाला भेट देउन या. सिंहगडाचा लव्करच लव्हर्स पॉइंट होणार बहुधा.
प्रतिक्रिया
13 May 2015 - 8:30 pm | एस
झालाय कधीच. :-(
13 May 2015 - 8:34 pm | यसवायजी
लैच घाण करुन ठेवतात !@#$%^.
मागे या धाग्यावर पॅडलॉक्सचा पर्याय (माहिती) दिला होता म्या. तो त्यातल्या त्यात बरा वाटतो. :D
८. पूल टू धमाल.. पूल आणी कुलपे-
याच नदीवर असणार्या Hohenzollern Bridge वर रेल्वे धावतात. जवळपास अर्धा किलोमिटर लांबी असेल. इथे एक इंटरेस्टींग गोष्ट पहायला मिळते. या संपुर्ण पुलावर आतल्या बाजुने तारांची एक जाळी आहे. याला असंख्य रंगी-बेरंगी, आकर्षक कुलपं लावली आहेत. चौकशी केल्यावर समजले की, प्रेमात पडलेली आणी नुकतच लग्न झालेली जोडपी इथे येतात आणी या कुलपांवर आपले नाव, बदाम, तारीख वगैरे कोरुन ती इथे अडकवतात. हो.. इथे-तिथे माणसं सारखीच की.. आपले वासु-सपना किल्याच्या भिंतीवर विटांनी नावे कोरतात अगदी तस्सेच. फकस्त फर्क इतनाइच है के, कोल्श लोक्स थोडे इस्टाईलसे करतात. कुलुपात अडकल्यावर किल्ल्या र्हाईनला अर्पण केल्या जातात.
पण आजकाल मुळात कुलपांवर विश्वास कितपत ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे.. :(
हे प्रकार बर्याच ठिकाणी पहायाला मिळातात. या कुलपांना 'पॅडलॉक्स' म्हणतात.
13 May 2015 - 9:26 pm | शब्दबम्बाळ
पॅरिसमधल्या प्रसिद्ध 'लव्ह लॉक' ब्रिज ची हालत फारच वाईट होती त्या कुलुपांमुळे… जाळीला कुलूप अडकवायला जागा शिल्लक नसल्यामुळे आधीच्या कुलुपालाच नवीन कुलूप लावली गेली होती आणि त्याची एक भिंतच झाली होती. त्यामुळे या कुलुपांविरोधात आंदोलन हि सुरु झालं.
![locks](https://lh5.googleusercontent.com/-1N9ZDloTxYA/VVNuDdVDZII/AAAAAAAACW4/0Jqvc1hAkmw/w825-h619-no/DSC_0987.jpg)
"The locks strapped onto the rails caused part of the bridge to collapse into the River Seine"
हि पहा लिंक.
हे पाहून शरम वाटली, तुम्ही फक्त सिंहगड म्हणताय इकडे पॅरिसपर्यंत मजल आहे लोकांची!
![pyaar](https://lh5.googleusercontent.com/-Dk3QUF-bKXI/VVNt664vnzI/AAAAAAAACWs/TTqvpKsRTmU/w825-h619-no/DSC_0981.jpg)
13 May 2015 - 10:11 pm | रेवती
आईग्ग! खरच की! प्यारभरा संदेश पाहून मन द्रवले. लिहू द्या त्यांना! ;)
13 May 2015 - 10:33 pm | यसवायजी
हायला!! "प्यार" ने दिल पे मार दी गोली, ले ली मेरी जाण.
13 May 2015 - 10:35 pm | सूड
ही असली कुलपं लावून काय होतं?
13 May 2015 - 11:25 pm | आदूबाळ
नंतर कडी लावावी लागत नाही.
13 May 2015 - 11:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
टु बी ऑन सेफर साईड कडी लावावी ;)
13 May 2015 - 11:40 pm | सूड
मी तेच म्हणणार होतो. पण म्हटलं आत आपण आहोत हे सांगायला कडी लावण्याऐवजी गाणी गाण्याची, शिट्ट्या वाजवण्याची पद्धत असावी.
13 May 2015 - 11:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कुठुन? =))
13 May 2015 - 11:45 pm | सूड
करत असतील आपापल्या आवड, निवड, वकुबानुसार!! आता लोकाचं काय ते आपण कसं सांगावं, नै का?
(निरागस)सूड
2 Jun 2015 - 1:48 am | श्रीरंग_जोशी
Paris Bridge’s Love Locks Are Taken Down
बिचारा पुल अखेर प्रेमपाशांतून मुक्त झाला :-) .
2 Jun 2015 - 9:43 am | निनाद मुक्काम प...
मी पण कुलूप लावले आहे
आणि चावी फेकून दिली कुलपावर स्टेनलेस स्टील च्या डब्यांवर जसे नाव लिहितात तसे लिहिले आहे ,
पण आता जाऊन त्या कुलपांच्या जंगलातून आमचे कुलूप शोधणे म्हणजे ....
असो
13 May 2015 - 8:37 pm | सूड
कधीच झालाय तो! तानाजीच्या समाधीपाशी पोवाडे गाणारा एक बुवा असतो. आपण कौतुकाने ऐकत थांबलो की पैसे मागतो.
13 May 2015 - 8:41 pm | टवाळ कार्टा
आपण बोलून लिहून शष्प फरक पडत नाही...त्यामुळे आता बोलणे सोडले आहे
13 May 2015 - 9:15 pm | आदूबाळ
बेकार हसतोय! पिल्लु आणि बेबी वरची टिप्पणी वाचून त्वरित काढता पाय घेतला आणि बाहेर जाऊन पोटभर हसून आलो.
कॅक्टसच्या पानावर लिहायची आयड्याच खतरनाक आहे!
13 May 2015 - 10:13 pm | रेवती
काहीही करतात लोक्स! धाग्याचा विषय वेगळा आहे. काय बोलणार? धन्य आहे जनता!
13 May 2015 - 10:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बाकी प्रेमाची वाट काटेरी असते हे समजलं. ;)
13 May 2015 - 11:15 pm | यशोधरा
मस्त लिहितोस तू. जरा नियमित लिहायचे मनावर घ्या.
गडाची दशा - दुर्दैवी पण हे निवडुंगी प्रेम पाहून ROFL!
13 May 2015 - 11:42 pm | आदूबाळ
+१ एकदम सहमत
14 May 2015 - 5:30 pm | असंका
+१
13 May 2015 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा
हे सगळे पर्णालेख आधीपासून आहेतच. पण सिंव्हगडावर दारु(आणि नॉनव्हेज)बंदी व्हायच्या आधी त्याच झाडीत जे चालायच ते........ असो!
13 May 2015 - 11:49 pm | रुपी
दुर्दैवी .. पण छान लिहिले आहे.
13 May 2015 - 11:50 pm | प्यारे१
खंगरी लेख.
बाकी दगडी बांधकामांवर 'कोरीव' काम करण्यापेक्षा पानांवर केलेलं बरं असा पुरातत्व खात्याच्या मदतीपोटी केलेला विचार म्हणून सोडून द्यावं.
इथून पुढे वृक्षारोपण करण्यासाठी निवडूंगाची ऑर्डर देण्यात यावी अशी सत्कार समितीकडे विनंती.
14 May 2015 - 12:15 am | श्रीरंग_जोशी
भन्नाट आहे, निरिक्षण, छायाचित्रण, लेखन अन भाष्य.
यावरून आठवले -
कशेळे महाकट्टयाच्या वृत्तांतामध्ये काही फोटो पाहिले होते. तिथल्या अभिप्रायवहीत प्रेमीजनांनी स्वतःच्या प्रेमाबद्दल जे काही खरडले होते त्या मजकुराचे होते. मी शोधायचा बराच प्रयत्न केला पण यश मिळाले नाही.
14 May 2015 - 9:16 am | नाखु
जबरदस्त चिरफाड. ह्या झुडुपांवार नावे लिहून ठेवली तर नंतर एक्मेकांचे काटे टोचायचे कमी होतात काय यावर एक संशोधन समीती नेमावी.
ल़क्ष्मी रोड वरील सार्वजनीक+सरकारी ग्रंथालयाचे अभिप्रायवहीतही प्रेम संदेश वाचलेला.
एक अनुभवी वाचक नाखु
14 May 2015 - 12:46 pm | एक एकटा एकटाच
आपापल्या लाईनची ही अशी नाव लिहण्याच्या ह्या फोटोज वरून
बालक पालक सिनेमातला एक सीन आठवला
ज्यात प्रथमेश परब (विशू) त्याच्या लाईनच (संपदा) नाव स्वत: च्या हातावर करकटकने लिहित असतो.
आणि स्पेलिंग मिस्टेकमुळे संपदाच "सानपाडा" होत.
14 May 2015 - 1:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
सिंहगडा सारखीच सारसबाग आणि पर्वती देखील प्रेमी जीवांनी फुललेली असते.
एकंदरीत मज्जा आहे सगळी
पैजारबुवा,
14 May 2015 - 1:46 pm | मदनबाण
आज मी हसुन हसुन वेडा झालोय... एकदम ढिनच्याक लिहलं आहेस ! डोळ्यातुन पाणी आले...
आजचा दिवस तुझाच... काश्मीर टू सिंहगड व्हाया उटी प्रवास झाला माझा... जबराट ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व
Why on earth is Narendra Modi going to Mongolia?
Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China
Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li
India’s foreign policy must continue to move past the parochial
Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns
14 May 2015 - 4:04 pm | इशा१२३
मस्त निरिक्षण!ऐतिहासिक भिंतीवर असले अमर प्रेम अनेक ठिकाणी पाहिले आहे.वास्तुचे कोरिवकाम बघायचे सोडुन ते असे कुरूप करण्यार्यांचा अत्यंत संताप येतो. हे वनस्पती कोरिवकाम मात्र पहिल्यांदाच बघतेय.असोच.नवयुवकांचे प्रेमहि या पानांएवढेच टिकत असावे.त्याहुनहि कमी टिकले तर ते पान तोडून नविन पानावर नवे नाव लिहायला मोकळेच.
14 May 2015 - 5:33 pm | असंका
खतरनाक लिवलंय राव!!
त्यामागची खंतही जाणवली...पोचली!!
लिहित रहा हो!!
14 May 2015 - 6:15 pm | बॅटमॅन
इतिहासाचे हेही एक नवीन साधनच! कोण म्हणतं की भारतीयांना डोक्युमेंटेशेनचे वावडे आहे म्हणून?
बाकी शेलारमामांनी नाही तर तानाजीनेच उदेभानास मारल्याचे वाचलेय. दोघेही एकमेकांच्या वाराने गतप्राण झाले इ.इ. पुन्हा एकदा नीट पाहिले पाहिजे.
15 May 2015 - 12:15 pm | बेकार तरुण
भन्नाट निरिक्षण शक्ती
15 May 2015 - 1:19 pm | झकासराव
भन्नाट लेख. :)
प्रेमाचा रस्ता निवडुन्गासारखा काटेरी आहे अस प्रतिक शोधणार्यास दन्डवत. लोळुन हसणारी स्मायली इमॅजिनावी.
2 Jun 2015 - 8:44 am | अजया
अरे!हा जबराट लेख वाचायचा सुटलेला!काटेरी निवडुंग ज्यांच्या प्रेमाच्या इजहाराने पावन झालाय,त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला!
बेबी आणि पिल्लुचे पान लक्षात ठेवल्या गेले आहे=))शोध घ्यावा लागणार या नव्या ऐतिहासिक खुणांचा!!
2 Jun 2015 - 9:21 am | मुक्त विहारि
आणि छान लिहीले आहे.
2 Jun 2015 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
2 Jun 2015 - 12:23 pm | मधुरा देशपांडे
काय भन्नाट लिहिलंय. या महान निसर्गप्रेमवीरांना काय समजावणार..अवघड आहे.
2 Jun 2015 - 1:31 pm | मोहनराव
दगडावर, झाडांवर नावे लिहून काय मिळते कोणास ठाऊक! गड किल्ले सगळे घाण केलेत या लोकानी.