मला याची जाणीव नव्हती, पण माझ्या आसपासचा आसमंत अतिशय कनवाळू, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण अन सदैव पर-मदतीस तत्पर अशा सज्जन सल्लागारांनी प्रथमपासून परिपूर्ण असत आला आहे. ‘पर-मदत’ अशासाठी, की यांना स्वत:ला अनादी अनंत काळापासून कोणत्याच मदतीची कधी गरज पडली नसावी, अशी शंका येण्याइतपत स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण असे हे महाभाग होत. पुन्हा, हे विद्वान लोक सर्वव्यापी होत. याचा पुरावा म्हणजे वर्तमानपत्रे अन मासिके यातून झालेला ‘ताईचा सल्ला ’, ‘माईचा सल्ला’, ‘काकांचा सल्ला’, इत्यादिंचा झालेला बोलबाला !
तसे तर आयुष्यात असंख्य प्रसंगी या सल्लावंतांनी मला तारून नेले आहे. ठायी ठायी हे ‘बोलते जे अर्णव सल्ला-मसलतीचे’ , मला नेहमीच भेटत आले आहेत अन आपले बहुमोल सल्ले विनाशुल्क देत आले आहेत. त्यातले काही ठळक प्रसंग आठवले की अजुनी मला गहिवरून आल्याशिवाय राहवत नाही !
आठवणीतला पहिला सल्ला मिळाला तेव्हा मी पाचेक वर्षाची असेन. मावसभाऊ बबलू चार वर्षाचा. आई अन मावशांनी मस्त पुरणपोळी मसालेभात वांग्याची भाजी अन कांदाभजी असा बेत आखला होता अन सगळ्या त्या तयारीला लागलेल्या. मी अन बबलू, मोठ्या मुलांनी खेळात न घेतल्यामुळे आईच्या आजूबाजूला लुडबुडत होतो. मावशी कांदाभजीचे मिश्रण तयार करत होती अन आईने कढईत तेल तापत ठेवले होते. त्या गप्पांत गुंग असल्यामुळे मी अन बबलू ओट्यावर ठेवलेल्या तेलाची किटली नामक रोचक प्रकाराला हाताळण्याची फारा दिवसांची इच्छा पूर्ण करीत होतो. बबलूच्या मौलिक सल्ल्यावरून मी हातातल्या ग्लासमधले पाणी किटलीच्या निमुळत्या तोटीतून मोठ्या कौशल्याने आत ओतले. इतक्यात आईने तापलेल्या तेलाचा अंदाज घेऊन आणखी थोडे तेल किटलीतून कढईत ओतले. उकळत्या तेलात पाणीमिश्रित तेल पडल्याबरोबर जो भडका उडाला, त्याची तुलना साधारण भारत-पाक बाउन्ड्रीवर बॉम्ब पडल्यानंतर झालेल्या स्फोटाशी करता येईल. गरम तेलाचा स्वयंपाकघरभर वर्षाव झाला . आई, मावशी, मी अन बबलू किंचाळ्या फोडून रणांगणाच्या बाहेर पळत सुटलो. बाहेरची बाबा-काका मंडळी आत धावत सुटली अन अर्धा एक तास प्रचंड गोंधळ उडाला. नंतर बबलूने आमचा पराक्रम निरागसपणे सांगितल्यानंतर जो भडका उडाला त्याचा प्रसाद अजून पाठ जाळत आहे.
बालवाडीत असताना कधीमधी बाबांनी दिलेले दहा पैशाचे नाणे मुठीत धरून मी शाळेजवळच्या किराणावाल्याच्या दुकानातील बरण्याकडे संभ्रमपूर्ण नजरेने पाहत असताना माझ्या सल्लागार शाळाभगिनी तातडीने येऊन, लकडी चॉकलेट घ्यावे की लिमलेट गोळ्या, हा प्रश्न चुटकीसरशी सोडवत. प्राथमिक शाळेत, नाचाच्या सिलेक्शनला लाल लेसचा फ्रॉक घालावा की पिवळा घेरदार अम्ब्रेला याचाही निकाल त्या त्वरित देत. पुढे दहावीत गेल्यावर, आपोझीट ग्रुपच्या मुलींच्या खवट टोमण्यांना तोडीसतोड प्रत्युत्तरे कशी द्यावीत इथपासून ते पलीकडच्या गल्लीतील मुलांच्या शाळेतील मजनुंची पिडा कशी टाळावी, इथपर्यंत सांगोपांग सल्ले हे सल्लागार मंडळ पुरवीत असे.
एकदा सुट्टीत आम्ही मामे-मावसभावंडे आजोळी आलो असताना धाकट्या मावशीला मुराळी (माहेरचे आमंत्रण ) म्हणून गेलो होतो. तिची एक लग्न न झालेली नणंद होती. या आत्याची माडीवरची रूम खूप झकपक असायची अन ती कॉलेजात गेल्यावर तिथे जाऊन उचकपाचक करायची आम्हाला दांडगी हौस. मावशीचा पुतण्या दिप्या आमच्यात सर्वात मोठा अन थोराड. असल्या आगाऊ उपक्रमात तो नेहमी पुढे असायचा. त्या दिवशी आत्याबाई कॉलेजात गेलेल्या पाहून दिप्याने सल्ला दिला.
‘आत्याच्या रूममध्ये पत्ते खेळुयात का ?’
सगळे उड्या मारत जिना चढून आत्याच्या रूममध्ये गेले अन आतून कडीबिडी लावून ऐसपैस पसरले. पत्ते मांडले. दोन डाव झाले अन कॉलेजात पिरीयड नसल्यामुळे आत्या परत आली. बाहेरून दारावर दणके देत ती संतापून हाका मारू लागली. आमचे धाबे दणाणले. सगळे गडबडून गेले. एकटा दिप्या शांत. त्याने सर्वांना खुणावून दार उघडते त्या बाजूला भिंतीच्या कडेला ओळीने उभे राहायला सांगितले अन स्वत: दाराच्या मुठीला धरून उभा राहिला. आम्ही सर्व धडधडत्या छातीने तसे उभे राहिल्यावर दिप्याने कडी काढून दरवाजा उघडला अन स्वत: उघडलेल्या दरवाज्याबरोबर दाराआड गेला. आत्याबाई दणादण पावले टाकीत आत आल्याबरोबर दिप्या तिच्या पाठीकडून बाहेर पळाला अन आम्ही तिच्या समोर सापडलो ! मग प्रत्येकी दोन दोन रट्टे खाल्ल्यावरच आत्याबाईच्या तावडीतून आमची सुटका झाली !
शालेय जगातच नव्हे तर माझ्या नातेवाइकांमधेही हे चाणाक्ष सल्लादाते ठासून भरले आहेत. मावशा, आत्या, चुलते, मामे (अनेकवचन ?) मावसबहिणी, आतेबहिणी, मामेभाऊ, चुलतभाऊ, या सर्वांचे (अनुक्रमे) नवरे अन बायका इतकेच नव्हे, तर मैत्रिणी, शेजारणी, ऑफिसातील सहकारी हा सगळा ताफा पेचसमयी माझे प्रबोधन करण्यासाठी सदैव तयार असतो.
आता बघा हं, मी सुपरमार्केटमध्ये खोयी खोयीसी उभी आहे. समोरच्या उंच रॅक मधील बालखाद्याचे असंख्य नमुने पाहून माझे डोके हापिसातल्या फायली पाहून नसेल इतके चक्रावले आहे. इतक्यात एक सखी सल्लादात्री मैत्रीण धावून येते.
‘अगं, काय करतेयस ?’
‘बरं झालं आलीस ते. या सगळ्या नमुन्यातून माझ्या पिल्लूसाठी कोणतं बेबीफूड चांगलं ते सांग बरं जरा ?’
‘हात तिच्या ! अगं सेरेलॅक घे. बाकीची बेकार आहेत. फोपशी होतात गं मुलं त्यांनी. आमच्या प्रणवला ना, मी तेच देत होते. काही काही म्हणून तक्रार नव्हती गं त्याच्या तब्बेतीची ! एकदम दणकट !’
हे मात्र मला पटलं कारण प्रणव आमच्या घरी आला होता तेव्हा नुकत्याच घेतलेल्या काचेच्या टीपॉयवर त्यानं बैठक मारताच ते काड्कन फुटलं होतं याची दु:खद आठवण मला अजून कधीतरी छळते.
मग मी पिल्लूसाठी सेरेलॅक च घेतलं.
दुसरा प्रसंग. वास्तुशांतीचं कार्य मांडलेलं. नणंदबाईंची चोखंदळ (दुसऱ्या बाजूने खवचट) वृत्ती माहिती असल्यामुळे तिला आहेर म्हणून कोणती साडी द्यावी हा पेच माझ्यापुढे उभा ठाकलेला. तिच्या आवडीचे सर्व कलर्स अगोदरच तिच्या वॉर्डरोबमध्ये हजर असल्याने अन तिला नेमके कोणते डिझाईन पसंत पडेल त्याचा अंदाज येत नसल्यामुळे मी पेचात . अशा वेळी मामेबहिणीसारखा उपयुक्त सल्लागार माझ्या मदतीला आला नसता तर केवढा समरप्रसंग उभा राहिला असता ?
‘अगं, त्यात काय विशेष ? तू कितीपण छान साडी दिलीस तरी तुझ्या नणंदेचे तोंड वाकडे व्हायचे थोडेच राहणार आहे ? मग सर्वांसाठी निवडून झाल्यावर जी साडी शिल्लक राहील तीच दे तिला. ‘
हे मात्र मला ताबडतोब पटले. कारण माझी नणंद भलतीच चोखंदळ होती. दहा दुकाने पहिल्याशिवाय तिला साडीच पसंत पडत नसे. ती माझ्या एक-दुकानी साडीला थोडीच दाद देणार ?
अन मामेबहिणीचा अंदाज एकदम खरा निघाला. साडी बघितल्यावर नणंदबाई ज्या फुरंगटून बसल्या, ते दुकानात जाऊन ती साडी बदलून त्यांच्या पसंतीची आणल्यावर मग कुठे त्यांच्या गालावरच्या सुरकुत्या सरळ झाल्या.
एकदा असंच, हपिसात आणीबाणीची वेळ आली. उद्या जिल्हापरिषद मिटिंग तिला बॉसच्या वतीने हजर रहायचे होते अन मुलाच्या शाळेतही त्याचवेळी पालक-शिक्षक मिटिंग होती. काय करावे ?
मी ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सल्ला मागितला.
‘अहो, झेडपी ची मिटिंग म्हणजे खा-पीची मिटिंग हो ! तिथं जायचं, सही मारायची, वडा खायचा, अन जायचं आपल्या कामाला ! टेन्शन नका घेऊ मॅडम .’
अन तसंच झालं. आमच्या हापिसचा विषयच कुणी काढला नाही झेडपी मिटिंगला.
बघा ! अचूक सल्ला मिळाला की नाही ?
एकूण काय, मुलाला हगीज घ्यावे की पॅम्पर्स इथपासून ते त्याला मराठी मिडियमला घालावे की इंग्रजी , सासू-संकटाशी सामना कसा करावा, स्कुटी बरी की अॅक्टिव्हा, बागेत गुलाब लावावेत की नारळ, वास्तुशास्त्रीय तोडगे कसे करावे, धान्ये कशी टिकवावी, घराला अन खोल्यांना रंग कोणते द्यावेत, बॉसकडून सीएल विनासायास कशी मिळवावी, आगाऊ सहकाऱ्यांना जिथल्यातिथे कसे ठेचावे अशा अनंत भानगडीत मला अचूक मार्ग दाखवण्याचे सत्कार्य माझ्या सल्लागारांनी तत्परतेने केल्यामुळेच माझा जीवनमार्ग सुकर झाला आहे, अशी माझी बालंबाल खात्री आहे.
.... पण इतके सल्ले घेऊन घेऊन त्यापैकी एकही मला कुणाला देता येत नाही . म्हणजे सल्ला देणे ही कला मला अजुनी जमलीच नाही. आयुष्यात काही न जमले तर चालेल पण सल्ला देणे जमले पाहिजे, असा मी कृतनिश्चय केला अन त्या तयारीला लागले.
माझ्या परिचयाच्या एक (वक्तृत्वाने अन आकारानेही ) थोर महिला वक्त्या ‘डाएट’ या विषयावर इतके हुकुमी सल्ले इतर सर्व महिलांना देत, आणि तेही जाहीर व्याख्याने देऊन, की मी त्यांची पंखा (की पंखी ?) च झाले. विशेषत: ‘फ्रेंच डाएट’ या विषयात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. करीना स्टाईल झीरो फिगर हवी असेल तर ‘फ्रेंच डाएट’ ला पर्याय नाही हे त्यांचे मत कसे परफेक्ट आहे हे त्यांच्या व्याख्यानांना होणाऱ्या गर्दीवरून सिद्ध झाले होते. ‘फ्रेंच डाएट’ चा तपशील ऐकल्यावर मी थक्कच झाले. यामध्ये तुम्ही दर अर्ध्या तासाने काहीतरी खाल्ले पाहिजे अशी अट आहे. त्या यादीमध्ये फळे, त्यांचा रस, सुकामेवा, अंडी इ. पौष्टिक पदार्थांची रेलचेल होती. इतके पदार्थ एकसारखे खात राहूनही झीरो फिगर अचीव्ह करता येते हे ऐकून माझा त्यांच्याविषयीचा आदर दुप्पट झाला !
मला फ्रेंचच काय, कसलंच डाएट करायची जन्मात गरज पडली नाही कारण प्रयत्न करूनही माझं वजन वाढत नाही. आणि करीनाशी स्पर्धा करण्यापे’क्षा तिच्या झीरो फिगरचे कौतुक करणे अन पडद्यावर तिला पाहणे मला जास्त सुखावह वाटते, ही वस्तुस्थिती असूनही मी थोर विदुषी बाईंना भेटायला गेले. कारण एकच, मला त्या सल्ला देतात कशा हे जवळून निरखून त्याचा अभ्यास करायचा होता !
तर, विदुषी बाईंचा, सल्ला देण्याबाबत सल्ला घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले. दार उघडणाऱ्या छोट्याशा हत्तीच्या पिल्लाने ‘आई, तुझ्याकडे कुणीतरी आले आहे गं.’ असे आत वळून सांगितले. विदुषीबाई बाहेर येऊन माझे बौध्दिक घेत असताना दारातून त्यांचे यजमान आले. त्यांचे तौलनिक मान किमान शंभरीच्या पुढे असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांच्या मागून दुचाकीच्या चाव्या फिरवीत त्यांच्या सुमारे दीडपट आकारमानाचा चिरंजीव आत आला. हे पाहून माझे ‘फ्रेंच डाएट’ अन झीरो फिगर याबद्दलचे सर्व संशय तर फिटलेच, पण सल्ला देणे ही किती चातुर्यपूर्ण कला आहे, हे मला पूर्णपणे कळून चुकले !
यानंतर ‘मुलांच्या अंतरंगात कसे शिरावे’ या विषयावर सल्ला देण्यात माहीर असलेल्या एका प्रोफेसरांच्या घरी मी गेले होते. तेव्हा प्रोफेसरमहोदय घरी येण्यास काही मिनिटांचा अवधी असल्याने मला बसण्याची विनंती करण्यात आली. बैठकीच्या खोलीत मी बसले असताना लँडलाईन फोन वाजला. वय वर्षे सोळाच्या दरम्यानची त्यांची कन्यका फोन घेऊन दबक्या आवाजात बोलू लागली. तिच्या आईचा फोन असावा. मनात नसतानाही माझ्या कानावर काही शब्द पडले. ‘
‘अगं, पण बाबांना कोण सांगणार ?’
‘त्यांना पटेल तर ना !...’
‘मला नाही जायचं सायन्सला....’
‘पण दादाची हिम्मत नाही त्यांना सांगायची..’
अशासारख्या संभाषणावरून प्रोफेसरमहोदय पोटच्या पोरांच्या अंतरंगात किती खोलवर शिरले आहेत ते मला समजल्याशिवाय राहिले नाही !
यानंतर माझा सल्ला देणे ही कला शिकण्याचा वेग झपाट्याने वाढला. जसजशी मी या सल्लागारांच्या अंतरंगात शिरू लागले, तसतसे मला ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान ‘ या उक्तीचा खोल प्रत्यय येऊ लागला. . आणखीही बऱ्याच गोष्टी मी अभ्यासाअंती आत्मसात केल्या....
...सल्ला देण्यासाठी सल्ल्याचा विषय आपण अनुभवला / पडताळला असावा असे मुळीच नाही.
...देणाऱ्याने देत जावा, घेणाऱ्याने घेत जावा, सल्ला द्यावा अन घ्यावा. तो आचरणात आणण्याची फालतू औपचारिकता, देणाऱ्याने अन घेणाऱ्यानेही पाळण्याची गरज नसते.
...सल्ला देताना, आपल्याला त्या विषयाचे सखोलच काय, चमचाभरही ज्ञान असणे आवश्यक नसते. उलट जितके अज्ञान घोर, तितका सल्ला प्रभावी, असे माझे निरिक्षण आहे !
.... अशा रीतीने अभ्यास वाढवत वाढवत आता मी सल्लादानशास्त्रात इतकी पारंगत झाले आहे, की, एक मिनिटात सुईत दोरा कसा ओवावा यापासून ते साबणापासून बॉम्ब कसा बनवावा, आणि बायकोला कसे चकवावे इथपासून ते नवऱ्याचा मामा कसा करावा, इथपर्यंत कोणताही सल्ला, मी आता डोळे झाकून देऊ शकते !
आता बोला !! विचारता का मला सल्ला ...?
प्रतिक्रिया
22 Feb 2014 - 1:45 pm | आतिवास
सल्ला घेणे-देणे हे ठीकय.
पण कुणीही कितीही दिला सल्ला, तरी तो कसा टाळायचा, त्याच्याकडं कसं दुर्लक्ष करायचं याविषयी काय सल्ला आहे तुमचा? ;-)
22 Feb 2014 - 9:22 pm | सस्नेह
माझा सल्ला हा राहील की
१. सल्लागार समोर दिसताच १८० अंशातून वळून सुंबाल्या करा
२. किंवा एकदा तरी त्यांचा सल्ला ऐका अन खड्ड्यात जा. मग पुन्हा न ऐकून घ्यायला सबळ कारण मिळेल
22 Feb 2014 - 3:31 pm | निलरंजन
मस्त
22 Feb 2014 - 3:32 pm | यशोधरा
मस्त लिहितेस! :)
22 Feb 2014 - 4:06 pm | कवितानागेश
खुस्खुशीत लेखन कसे करावे? :)
22 Feb 2014 - 9:24 pm | सस्नेह
एक जिल्बी घ्या. तिला चार छिद्रे पाडा. या छिद्रातून थोडे चटकदार संवाद, मसालेदार घटना, तिरकस मल्लीनाथी अन उपरोधिक वाग्बाण आत सोडा. मग वर विनोदाची खमंग फोडणी द्या, की झाले खुसखुशीत लेखन तयार !
22 Feb 2014 - 4:15 pm | सानिकास्वप्निल
+१११११
22 Feb 2014 - 6:34 pm | अनन्न्या
अगदी अगदी! सल्ले देणारे काळवेळही पाहत नाहीत!
माझे सासरे नुकतेच हॉस्पीटलमधून घरी आले होते, आणि कोणाशीतरी फोनवर बोलत होते. त्यांना पहायला आलेल्या एक बाई म्हणाल्या, "त्याना बोलायला देऊ नका जास्त, माझ्या नात्यातले एकजण असेच घरी आल्यावर भरपूर बोलले आणि रात्री गेले. असं होतं बोलल्यामुळे!" शेजारी बसलेल्या सासूबाई आ वासून बघत बसल्या त्यांच्याकडे, मी लगेच त्यांना तिथून बाहेर कटवले. पण सा.बा. ना समजावताना सगळ्यांचीच भंबेरी उडाली.
असे हे सल्ले!
23 Feb 2014 - 9:09 am | स्पंदना
परवा माझी सखी शेजारीण अशीच गप्प मारत बसली होती. अर्थात माझ्याच टेबलावर आणि वर माझा एक गुलाबजामुनसुद्धा हडपला होता. मी सहज माझा एक दात (जो हल्लीच काढलेला आहे) तो अजुनही दुखतोय म्हणुन सांगितल. झालं बाईसाहेबांनी त्यांची पुरानी आठवण काढुन सांगितल त्यांचा घराचा एजंट असाच माझ्या वयाचा (????) ती चेक द्यायला गेलेली. ह्याचा दात काढलेला. डेंटीस्ट बाहेर सुट्टीला गेलेला. मग वाट पहात चार दिवस...चौथ्या दिवशी खलास. डोन्ट ठिंक दॅट यु कान्ट डाय ऑफ टुथ एक. अस अन वर!
मी माझा हात तिच्या घशात घातला अन गुलाबजामुन बाहेर काढाय्चा प्रय्त्न केला तर बाईसाहेब कितपत चावतील असा विचार करत होते.
22 Feb 2014 - 10:30 pm | अजया
आवडेश!
22 Feb 2014 - 4:15 pm | मुक्त विहारि
झक्कास
22 Feb 2014 - 6:34 pm | Pearl
खूप छान लिहिलं आहेसं. एकदम खुसखुशीत :)
22 Feb 2014 - 7:34 pm | आदूबाळ
मस्तच लिहिलं आहे. मंगला गोडबोलेंसारखं.
22 Feb 2014 - 9:49 pm | इनिगोय
असेच म्हणते! :)
22 Feb 2014 - 7:49 pm | सुहास..
हा हा हा हा हा हा हा
22 Feb 2014 - 10:38 pm | मनीषा
+१ सहमत
मलाही आजवर अनेक सल्ले मिळाले आहेत / मिळत असतात. पण अजून कुणाला सल्ला देण्याचा योग आला नाहीये. न जाणो भविष्यात तसा प्रसंग उद्भवलाच तर, (आजवर मिळालेल्या सल्ल्यांच्या शिदोरीतून :) ) एखादा सल्ला देऊ शकेन असा विश्वास वाटतो. *yes3* *YES*
23 Feb 2014 - 9:11 am | स्पंदना
मॅडम तुमच अनुभव विश्व समृद्ध करणार्या लोकांबद्दल तुअम्च अस मत असेल हे माहीत नव्हत. :)
24 Feb 2014 - 10:12 am | सस्नेह
ओ म्याडम, पहिला पॅरा नीट वाचा म्हणजे माझी कृतज्ञता आपल्या लक्षात येईल !
25 Feb 2014 - 3:32 am | स्पंदना
:))
24 Feb 2014 - 1:20 pm | पिलीयन रायडर
मस्त लिहीतेस ग तू!!!! फार आवडलं!
25 Feb 2014 - 9:53 am | इन्दुसुता
मज्जेदार! :)
नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखन.
लेखाची लांबी, शुद्धलेखन, विषय हाताळ्ण्याची हातोटी यामुळे तुमचे लेखन नेहमीच वाचनीय असते.
मिपावर काही लेखकांचे लेखन आवर्जून वाचते, यात तुमचे एक नाव!
25 Feb 2014 - 10:03 am | पैसा
यकदम खुसखुशीत! काही झालं तरी सदस्य संपादकांच्या डोक्यावर खापर फोडतात. त्याला कसं तोंड द्यावं याबद्दल काय सल्ला देशील? ;)
25 Feb 2014 - 11:05 am | सविता००१
किती अप्रतिम लिहितेस ग तू.... मान गये. बेश्ट. :)
25 Feb 2014 - 12:56 pm | बॅटमॅन
=)) =)) =)) =)) =))
वरील लेख वाचून सल्लागार या शब्दाचि व्युत्पत्ती लक्षात आली. जो सल्ला देऊन समोरच्याला गार करतो तो सल्लागार =))
26 Feb 2014 - 10:10 pm | सस्नेह
'ह' न घेतल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे अगत्यपूर्ण आभार !
28 Feb 2014 - 4:54 am | ओसामा
तुमची फक्त सल्ल्याची देवाणघेवाण होते का देवाणघेवाणीचा पण सल्ला मिळतो?
28 Feb 2014 - 9:32 pm | सस्नेह
तुम्हाला नेमकी कशाची देवाणघेवाण करायची आहे यावर अवलंबून आहे..!
मनी-फंडा असेल तर देवाणघेवाणीचा सल्ला देण्यास आम्ही राजी नाही
7 Mar 2014 - 5:03 am | ओसामा
ज्याची त्याची मर्जी. मला सल्ला नको होता. मी चार वर्षे महानगर पालिकेत काढली नंतर देवाण घेवाण बघून सरळ उसगावाचा रस्ता धरला.
7 Mar 2014 - 7:59 am | प्रीत-मोहर
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त