इंटरनेटचे जनक - प्रो. लिओनार्ड क्लाईनरॉक
मॉडर्न इंटरनेटचे जनक म्हणून ज्यांचा सगळ्यात आधी उल्लेख करता येईल अशी व्यक्ति म्हणजे प्रोफ़ेसर लिओनार्ड क्लाईनरॉक. जगाला ही अद्वितीय देणगी देणा-या क्लाईनरॉक यांचा जन्म १३ जून, १९३४ रोजी न्यूयॉर्क शहरात एका ज्यू कुटूंबात झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे त्यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतं. लहानपणापासूनच सायन्स विषयात त्यांना रस. ६ वर्षांचे असताना आपल्या घरात सुपरमॅनचं कॉमिक्स वाचताना अचानक त्यांना Crystal radio बनवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी लागलेलं सामान म्हणजे वडिलांचं वापरलेलं रेझर, पेन्सिलीतल्या शिशाचा तुकडा, टॉयलेट पेपरचा रिकामा रोल, थोड्याफ़ार वायरी, आणि जुन्या सार्वजनिक टेलिफ़ोन बूथ मधून मिळवलेला एक स्पीकर. शिवाय रेडिओच्या दुकानातून घेतलेला Variable capacitor. या सगळ्या गोष्टी वापरून त्यांनी फ़ुकटात गाणी ऐकण्यासाठी कुठल्याही बॅटरीशिवाय चालणारा crystal radio बनवला, तेव्हाच त्यांच्यातल्या इंजिनीयरचा जन्म झाला होता.
पुढे १९५१ मध्ये The Bronx High School of Science मधून आपलं शालेय शिक्षण संपवून ते बाहेर पडले. १९५७ मध्ये City college of New York मधून Electrical Engineering मध्ये Bachelors तर पुढे १९५९ आणि १९६३ मध्ये Massachusseets Institute of Technology मधून अनुक्रमे Electrical मध्ये Masters तर Computer Science मध्ये Ph.D या डिग्री मिळवल्या आणि University of California at Los Angeles (UCLA) मध्ये Computer Science चे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. Ph.D करत असताना त्यांनी "Information Flow in Large Communication Nets" या विषयावर आपला प्रबंध सादर केला, ज्यात त्यांनी Data Networks बद्दल आपलं संशोधन मांडलं होतं. हाच प्रबंध पुढे जाऊन Packet Switching theory चा गाभा बनला.
UCLA मध्ये रुजू झाल्यानंतर काही वर्षं अध्यापनासोबतच या क्षेत्रात त्यांनी संशोधनही सुरू ठेवलं होतं. १९६० च्या दशकाच्या मध्यात अमेरिकन सरकारने स्पुटनिक या त्यांच्या उपग्रहावर नजर ठेवण्यासाठी १९५८ साली स्थापन केलेल्या the Advance Research Project Agency (ARPA) ला नेटवर्क्स मध्ये रस वाटू लागला. क्लाईनरॉक यांच्या या क्षेत्रातल्या अभ्यासामुळे सरकारने त्यांना वॉशिंग्टनला बोलावून सरकार संचालित डेटा नेटवर्क ARPANET बनवण्यात मुख्य वाटा उचलण्याची विनंती केली. क्लाईनरॉक यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि जगातल्या पहिल्या डेटा नेटवर्कचा शुभारंभ झाला.
क्लाईनरॉक यांच्या संशोधनातील योगदानामुळे ARPANET च्या जोडणीसाठी पहिला नोड बनण्याचा मान मिळाला तो UCLA लाच. या जोडणीसाठी दिवस ठरला १९६९ चा कामगार दिवस, २ सप्टेंबर. या दिवशी जगातला पहिला इंटरनेट स्विच (Interface Message Processor - IMP) आणि क्लाईनरॉक यांची Laboratory यांच्यात जोडला जाणार होता. हा स्विच बनवला होता इंग्लंडमधील केंब्रिजस्थित संगणक बनवणारी कंपनी Bolt, Beranek and Newman (BBN) यांनी. अशा प्रकारे संगणक जोडणीचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे त्याच्याशी संबंधित जवळपास सगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी त्या दिवशी UCLA मध्ये उपस्थित होते. त्यांच्यात मुख्यत्वे होते ते क्लाईनरॉक आणि त्यांचा चमू, BBN चे अभियंते, Honeywell minicomputers चे अभियंते (IMP जोडण्यासाठी वापरलेला संगणक यांचा होता), Scientific Data Systems चे अभियंते (UCLA चा host यांच्या संगणकावर होता), AT&T चे अभियंते, GTE चे अभियंते (UCLA मधल्या टेलिफ़ोन लाईन्स GTE च्या होत्या), ARPA चे अभियंते, UCLA च्या Computer Science विभागाचे इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी, UCLA चं व्यवस्थापन मंडळ असे जवळपास ३५०-४०० लोक त्या वेळी हजर होते. प्रत्येकजण या चिंतेत होता की आपला भाग फ़सता कामा नये. सुदैवाने कोणताही अडथळा न येता UCLA संगणक आणि IMP मध्ये बिट्सचं वहन यशस्वीरित्या पार पडलं आणि इंटरनेटने जगात पहिला श्वास घेतला.
एक महिन्यानंतर या नेटवर्क मध्ये दुसरा नोड आला, तो स्टॅनफ़र्ड रिसर्च इंस्टिट्यूटचा. आता पुढचा टप्पा होता एका नोडपासून दुस-या नोडपर्यंत संदेशवहन करण्याचा. प्रथम UCLA होस्ट वरून त्यांच्याच दुस-या SRI होस्टवर लॉगिन करण्यात क्लाईनरॉक यांना यश आलं. त्यामुळे log टाईप केल्यानंतर पुढची in ही अक्षरं SRI स्वत:हून घेणार आणि login हा शब्द ट्रान्समिट होणार असा क्लाईनरॉक यांचा कयास होता.
या नोड ते नोड संदेश प्रक्षेपणाचा दिवस ठरला २९ ऑक्टोबर, १९६९. ठरल्याप्रमाणे UCLA नोडवरून l आणि o यशस्वीपणे प्रक्षेपित झाले. नंतर g टाईप केला आणि अचानक सगळी यंत्रणा ठप्प झाली. (SRI होस्ट वर memory overflow झाली). त्यामुळे जगातला पहिला इंटरनेटवरून पाठवलेला संदेश ठरला "lo". याचं वर्णन करताना क्लाईनरॉक म्हणतात, "२९ ऑक्टोबर, १९६९ या दिवशी इंटरनेट नामक बाळाने तोंडातून पहिलं अक्षर काढलं" (October 29, 1969, as the day the infant Internet uttered its first words.)
क्लाईनरॉक यांनी इंटरनेटच्या पायाभरणीपासून त्याच्या विकासापर्यंत मोलाचा हातभार लावला आहे. UCLA मध्ये प्राध्यापक असताना त्यांच्या हाताखालून Ph.D करून गेलेले बरेच विद्यार्थी आज नेटवर्किंग क्षेत्रातल्या अनेक मोठमोठ्या कंपन्या आणि रिसर्च लॅबोरेटरीज मध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि अभियंते आहेत. अजूनही नेटवर्किंगमध्ये त्यांचं अध्यापनाचं कार्य अविरत सुरू आहे. ते म्हणतात, " मी घडवलेली नेटवर्किंग टेक्नॉलॉजी समाजाच्या, देशाच्या आणि जगाच्या भल्यासाठी पुढे आणण्यासाठी काम करणा-या व्यक्तींना मदत करणं एवढंच माझं ध्येय आहे."
त्यांच्या संशोधनाचं आजच्या काळातलं महत्त्व आपण जाणतोच. आपलं आयुष्य अंतर्बाह्य बदलून टाकणा-या शोधांमध्ये इंटरनेटचं नाव अग्रस्थानी घेतलं तर त्यात वावगं काहीच नाही. आज जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान ४०-५०% लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. या इंटरनेटचं स्वप्न बघून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी क्लाईनरॉक यांचं कार्य मोठं आहे.
एक कॉमिक वाचक ते सायबरस्पेस चा प्रणेता, हा प्रवास निश्चीतच रंजक आहे, नाही का?
तरूणपणीचे प्रो. क्लाईनरॉक
प्रो. क्लाईनरॉक आणि त्यांचं Interface Message Processor
प्रो. क्लाईनरॉक आणि इंटरनेटची पहिली आवृत्ती
UCLA मधल्या आपल्या दालनात प्रो. क्लाईनरॉक
(चित्रे आंतरजालावरून साभार.)
-क्रमशः
प्रतिक्रिया
3 Oct 2013 - 12:59 pm | अनिरुद्ध प
तसेच सचित्र माहिती पुभाप्र.
3 Oct 2013 - 1:15 pm | मुक्त विहारि
मस्त..
लगे रहो..
3 Oct 2013 - 1:17 pm | अभ्या..
मस्त रे नाना. एकदम माहीतीपूर्ण लिहितोयस.
एकतर आम्हाला काय कळत नाय यातले त्यामुळे लै लै धन्यवाद.
4 Oct 2013 - 3:14 am | प्यारे१
प्रथम तुला वंदितो.
मस्त लिहीत आहात.
3 Oct 2013 - 3:51 pm | सस्नेह
छान सचित्र माहिती.
4 Oct 2013 - 12:24 pm | लॉरी टांगटूंगकर
आवडतंय,लिहीत रहा, पु. भा. वाट पहातोय.
5 Oct 2013 - 6:04 pm | पैसा
अजिबात काहीही माहिती नसलेल्या गोष्टीबद्दल लिहितो आहेस. इंटरनेट नसलं तर जिवाचा तडफडाट होतो. पण ते कोणी आणि कसं सुरू केलं ते आजच कळतंय!
7 Oct 2013 - 7:48 pm | यशोधन वाळिंबे
7 Oct 2013 - 8:25 pm | भ ट क्या खे ड वा ला
छान माहिती पूर्ण लेख
लिहित रहा
8 Oct 2013 - 4:28 pm | मंदार कात्रे
उद्बोधक माहिति, पुलेशु
9 Oct 2013 - 4:19 am | स्पंदना
मी स्वतः भारतातले पहिलेवहिले नाही म्हणता येणार पण अवजड असे डेस्कटोप्स वापरुन झालेत. त्यामुळे त्यामानाने आजची टेक्नॉलॉजी किती भरमसाट वेगवान वाटते. पहिला नोकियाचा पावकिलो वजनाचा मोबाईल अन आजचा स्लिम स्लिक सेल. जर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे जाणवत असेल तर प्रो. क्लाईनरॉक ज्यांनी याची सुरवात केली, जे इंटरनेटला infant म्हणुन संबोधायचा हक्क ठेवतात, त्यांना किती जाणवत असेल नाही सगळ? म्हणजे त्या माग किती कष्ट असायचे तेंव्हा अन transistors च्या शोधानंतर सगळ कस छोट छोट अन अगदी छोट होत गेलं.
फार छान अन विस्तारित माहिती प्रथमसाहेब! येउ दे!
9 Oct 2013 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिला नोकियाचा पावकिलो वजनाचा मोबाईल
आणि त्याच्या आधिचा अनेक किलो वजनाचा कार-फोन ! :)