ओ सजना बरखा बहार आणि एक कुंद दुपार..! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
2 May 2013 - 1:02 pm

तिचं नांव..? ते जाऊ दे...!.

ती वर्गात होती माझ्या. वाणिज्य शाखा तृतीय वर्ष..

आमची वयं असतील विशीच्या घरातली..

वय वर्ष १९-२०..!

सालं काय वर्णन करावं त्या वयातल्या तारुण्याचं..? शब्दशः: मंतरलेली वर्ष..! त्या वयात कुठल्या जादुई दुनियेत मन वावरत असतं काय समजत नाय बा..

अशातच ती आली माझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत.. स्वप्नांचं त्या वयातलं ते बेधुंद राज्य अन मी त्याचा अभिषिक्त सम्राट..! पण त्या राज्याच्या राणीचं सिंहासन मोकळंच होतं.. वर्गातल्या वर्गात आमच्या नजरा जुळल्या.. 'दिल में कुछ कुछ होता है.. झालं आणि राणीच्या त्या रित्या सिंहासनावर ती अवचित येऊन बसली..

आता ध्यानीमनी फक्त तीच दिसू लागली.. कुठेही काही मंगल-शुभ-सुंदर दिसलं की त्यातही तीच दिसू लागली.. कुठे चांगलं गाणं ऐकलं, कुठे काही चांगलंचुंगलं खाल्लं, कधी एखादा उत्तम चित्रपट पाहण्यात आला.. की तीच दिसायची. जे जे उत्तम-उदात्त-उन्नत-महन्मधुर ते ते.. त्या सर्वात फक्त ती आणि तीच दिसू लागली..

"मला Amalgamation of companies शिकवशील का रे? त्याच्या एंट्रीज मला जमतच नाहीत.. तू सांगशील समजावून..? "

आहाहा.. किती सुरेख आणि सुरेल स्वर तिचा.. चेहऱ्यावरचे ते भाबडे भाव..

"घरी येशील का रे आज दुपारी माझ्या..? "

ठरल्याप्रमाणे पोहोचलो तिच्या घरी.. वाजले असतील दुपारचे काहीतरी दोन-अडीच.. ती अंधारलेली कुंद पावसाळी दुपार..!

तिची आईही तिच्याइतकीच सुरेख आणि गोड.. मुलीला शिकवायला दुसरा-तिसरा कुणी नसून आपला भावी जावईच खुद्द आला आहे असेच भाव होते हो त्या माउलीच्या चेहऱ्यावर.. म्हणजे मला तरी तेव्हा ते तसेच वाटले.. - : )

छान, सुंदर, सुरेख, नीटनेटकं आवरलेलं तिचं घर.. त्या घरातली टापटीप, स्वच्छता सारी तिचीच असेल का हो? अगदी हवेशीर घर.. या खिडकीतून त्या खिडकीत वाहणारी वाऱ्याची मंद झुळूक केवळ तिच्याकरताच वाहते आहे का..? हा फ्लॉवरपॉट तिनेच या विवक्षित ठिकाणी ठेवला असेल का..? ते सुंदर पडदे.. त्यांचं सिलेक्शन तिचंच असेल का..?

osajna

छ्या..!

पिरेमात पडल्यावर प्रत्येक गोष्ट सुरेख, सुंदरच का दिसते हो त्या वयात..? त्या वयातली जादू न कळणारी आहे, अगम्य आहे, पण अतीव सुंदर आहे..

निसर्ग..! दुसरं काय? त्या त्या वयाची गणितं तोच बांधून देतो झालं..!

तिनं वह्या-पुस्तकं काढली.. प्राध्यापक अभ्यंकर तिला Amalgamation of companies शिकवणार होते.. - : )

"तुम्ही बसा हं.. मी जात्ये केळकरमावशींकडे भिशीला.. " - भावी सासूबाई म्हणाल्या..

जय हो त्या केळकरमावशींचा.. कधीही न पाहिलेल्या त्या केळकरमावशीला मी मनातल्या मनात एक फ्लाइंग किस देऊन टाकला.. - : )

आता घरात आम्ही दोघंच.. बाहेर सुरेखसा पाऊस लागला आहे.. आणि त्या कुंद वातावरणातली ती रम्य दुपार.. आणि माझ्यासमोर ती बसली होती... पुस्तकाची दोन-चार पानं उलटली गेली असतील-नसतील,

दुरून कुठूनतरी रेडियोचे स्वर ऐकू आले.. 'ओ सजना.. बरखा बहार आयी.. ' - सलीलदा आणि दीदीचं एक अतीव सुंदर गाणं.. ताजी टवटवीत चाल आणि जीव ओवाळून टाकावा अशी दीदीची गायकी...!

"ए रेडियो लाव ना.. काय सुंदर गाणं लागलंय बघ.. "

लगेच रेडियो लावतानाची तिची ती मोहक लगबग..

त्या गाण्यातही फार सुंदर पाऊस दाखवला आहे.. मनमुराद कोसळणारा.. त्या अंधारलेल्या दुपारीही अगदी तसाच पाऊस पडत होता.. आणि माझी साधना, माझी वहिदा, माझी मधुबाला.. माझ्यासमोर बसली होती.. - : )

छे हो.. आता कसली अकाउंटन्सी आणि कसलं ते Amalgamation of companies..? सब साले बहाने थे..!

ती मला आवडली होती इतकंच खरं होतं..

आता पाऊसही थोडा वाढला होता.. तिथे केळकरमावशीकडची भिशीही एव्हाना रंगली होती.. रेडियोवर दीदीचं 'ओ सजना.. ' सुरू होतं..

पुन्हा एक वाऱ्याची झुळूक आली.. आणि काही क्षण..

अगदी काही क्षणच---- अकाउंटन्सीच्या पुस्तकांनी आपली पानं स्वतःहून मिटून घेतली..!!

'ओ सजना बरखा बहार आई..! '

गाणं असं ऐकावं, असं अनुभवावं, आणि आयुष्यभराकरता मर्मबंधात जतन करून ठेवावं..!

आज ती कुठे आहे हे मला माहीत नाही.. खरंच माहीत नाही.. पण हा छोटेखानी लेख खास तिच्याकरता..

God Bless You Dear.. Cheers..!

-- प्राध्यापक अभ्यंकर. - : )

संगीतवाङ्मयशिक्षणमौजमजाअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

2 May 2013 - 1:14 pm | चाणक्य

तलत च्या आवाजासारखं तरल लिखाण....तात्या हे वाचल्यावर सहजच ह्या ओळी सुचल्या-
सांगूच का सखे तेव्हा काय मनी दाटले होते
पाऊस होता अंगणी अन् धुके मनात दाटले होते

मन१'s picture

2 May 2013 - 1:15 pm | मन१

हल्ली मनाने पुन्हा "वय कोवळे उन्हाचे" अनुभवताय असं दिसतं.
चांगलय.

दिपक.कुवेत's picture

2 May 2013 - 1:38 pm | दिपक.कुवेत

निव्वळ निशब्दः.....खुपच छान जमलय लिखाण. एनी वे कालच हे सुंदर गाणं घरी जाता जाता गाडित एकलय त्यामुळे अजुन टवटवीत आहे. योगायोगाने काल ईथे पण अवचीत पाउस पडला त्यामुळे वातावरण अगदि कुंद नसलं तरी बेधुंद होतं.

जळ्ळं मेलं आमचं नशीबच फुटकं....आमचं कधीच कुणाबरोबर Amalgamation झालं नाहि...नाहितर आमच पण वय होतं म्ह्टलं...अगदि तसच उत्तम-उदात्त-उन्नत-महन्मधुर वगैरे...

तात्या हेवा वाटतो हो तुमचा तुम्हि असं काहि लिहलं कि.....

दिपक.कुवेत's picture

2 May 2013 - 1:41 pm | दिपक.कुवेत

मला एक गाण हवय....आज अवेळिच कशी सांज झाली मावळला सुर्य नाहि लांबल्या न सावल्याहि...जालावर शोधलं पण मिळालं नाहि...तुमच्याकडे आहे का?

जेनी...'s picture

2 May 2013 - 6:59 pm | जेनी...

०.९९$ ला आहे ... :(
फुकट नैका मिळ्णार कुठे ?? :-/

सुमीत भातखंडे's picture

2 May 2013 - 2:35 pm | सुमीत भातखंडे

.

तात्या, अतीव सुंदर लेख …

आजानुकर्ण's picture

2 May 2013 - 5:11 pm | आजानुकर्ण

आपली तरुण मुलगी कुंद पावसाळी घरात एका तरुणासोबत एकटी असताना तिला सोडून मनमुराद पावसात भिशीसाठी जाणाऱ्या कर्तव्यपरायण आईसाहेबांचे अत्यंत कौतुक वाटते.

सामान्य वाचक's picture

2 May 2013 - 5:23 pm | सामान्य वाचक

बाकी लेख छान आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2013 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार

अहो, तो तरुण म्हणजे कोणी ऐरा गैरा नव्हता; खुद्द शेखर अभ्यंकर होता.

ढालगज भवानी's picture

2 May 2013 - 6:18 pm | ढालगज भवानी

अगदी हेच!!!

ढालगज भवानी's picture

2 May 2013 - 6:19 pm | ढालगज भवानी

आवडला

तिमा's picture

2 May 2013 - 6:26 pm | तिमा

शेवटी 'अमालगमेशन' झाले की नाही ?

आदिजोशी's picture

2 May 2013 - 6:53 pm | आदिजोशी

सुंदर कल्पनाविलास. आवडलं एकदम. असं आपल्या बाबतीत घडावं असं प्रत्येकाला वाटतंच असतं.

प्यारे१'s picture

2 May 2013 - 7:12 pm | प्यारे१

असं नाय ब्वा करायचं आदि....!
आजानुकर्ण पण चीटिंग करतात राव. :(
श्या.....!
- दिवास्वप्नात वेन्ट्री करता करता दरवाजात धडपडून जाग आलेला ;) प्यारे

सुबोध खरे's picture

2 May 2013 - 6:57 pm | सुबोध खरे

दुर्दैवाने आमच्या आयुष्यात अशी कोणी आलीच नाही.(इच्छा फार होती हो पण फक्त राँग नम्बरच लागले)
असो काही लोकांच्या आयुष्यात अशी कोणी आली असेल तरी आता लग्न झाल्यामुळे असे काही लिहायची त्यांची कदाचित हिम्मत होणार नाही.( बायकांचे कान नाक डोळे अशा बाबतीत फार तिखट असतात.)

भडकमकर मास्तर's picture

2 May 2013 - 10:29 pm | भडकमकर मास्तर

बालाजींच्या मते " ओ सजना बरखा बहार आयी " हे गाणं पोट साफ होण्यासाठी सकाळी ऐकावे ..
.. जय बालाजी...

मैत्र's picture

4 May 2013 - 6:00 pm | मैत्र

जय बालाजी!

श्रावण मोडक's picture

5 May 2013 - 1:01 am | श्रावण मोडक

'जय बालाजी' असे म्हणता याचा अर्थ अलिकडे प्रस्तुत लेखकाने हे गाणे ऐकले असावे, आणि बालाजी म्हणतात तो परिणाम झाला असा तर नाही ना? एकुण लेखनाचे प्रमाण आणि त्यातील मजकूर पाहता ही शंका आली हो! ;-)

श्रीरंग_जोशी's picture

2 May 2013 - 10:35 pm | श्रीरंग_जोशी

तात्या - ऑंप आयें, बहार आयी!!

खूप आवडलं.

मुरलेल्या जिलेबी सारखा ;-)

साऊ's picture

3 May 2013 - 6:45 am | साऊ

माझ अतिशय आवडत गाण.

अद्द्या's picture

3 May 2013 - 9:57 am | अद्द्या

तात्या
सक्कळ सक्कळ बच्यास्नी कायला सप्नात पाठीवता उगीच
तरास व्हत्तो

महेश नामजोशि's picture

3 May 2013 - 3:56 pm | महेश नामजोशि

अतिशय तरल अशी शब्दरचना. इतकी नाजूकता आली आहे, उत्तम भावूक, अंगावर मोराचे पीस फिरावे अन पटकन लकेर यावि.

धन्यवाद

महेश नामजोशी

चौकटराजा's picture

3 May 2013 - 4:14 pm | चौकटराजा

ओली कुंद दुपार
बंद आतून दार
"ती " वाजवते
प्रोफेच्या दिलाची सतार

सर बाहेर कोसळली
मने एकांतात चळली
"फक्त मनेच" मित्रहो
दुपार कोरडीच टळली

ती कोठे असेल म्हणत
प्रोफे हळह्ळतो
अन साला इतकेही
नाही आपल्या नशीबात
म्हणत चौरा
अंतर्यामी जळतो ....

तुमचा अभिषेक's picture

4 May 2013 - 5:44 pm | तुमचा अभिषेक

चाळीत वासरांत लंगडी गाय शहाणी या नात्याने माझे गणित चांगले होते, त्यामुळे बर्‍याच मुला-मुलींच्या आया गणित शिकवण्यासाठी म्हणून मला बोलवायच्या. त्यातील दोनतीन मला आवडायच्याही.. अर्थात, सुंदर दिसणारी प्रत्येक मुलगी आवडायचे वय ते... पण चाळीत कितीही चांगली इमेज असली तरी आजवर कोणा माऊलीने आपल्या लेकराला माझ्या तावडीत असे दिले नाही हीच काय ती खंत... :(

आदूबाळ's picture

4 May 2013 - 10:44 pm | आदूबाळ

त्यामुळे बर्‍याच मुला-मुलींच्या आया गणित शिकवण्यासाठी म्हणून मला बोलवायच्या. त्यातील दोनतीन मला आवडायच्याही..

कोण? आया?

(ह. घ्या. बर्का!)

तुमचा अभिषेक's picture

4 May 2013 - 11:11 pm | तुमचा अभिषेक

हा हा ... नाही नाही.. वरच्या उदाहरणात तरी आयांच्या मुलीच.. ;)

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2017 - 1:16 pm | धर्मराजमुटके

आजच्या वातावरणात हा लेख वाचला. मजा आली !

विजुभाऊ's picture

6 Aug 2020 - 5:23 pm | विजुभाऊ

तात्याचे लेखन

चित्रगुप्त's picture

14 Jun 2023 - 7:07 am | चित्रगुप्त

आज हे पहिल्यांदाच वाचले. सुंदर.

विजुभाऊ's picture

14 Jun 2023 - 11:58 am | विजुभाऊ

धन्यवाद चित्रगुप्त.
पावसाळ्याच्या सुरवातीलाच हा लेख वर आणला.