दिवस ५
आजचा पहिला ट्प्पा, कामारी समुद्रकिनारा पाहणे आणि तेथे पोचवणारी बस हॉटेल समोरील थांबावर येताच आम्ही त्यात सावर होऊन निघालो..
सँटोरिनी बेटावर टेक्सि व बस सेवा उपलब्ध असली तरी आपल्या सोयीप्रमाणे फिरावायाचे असेल तर एखादी ATV किव्वा 4x4 भाड्याने घेणे उत्तम. कामारी समुद्रकिनाऱ्या जवळिल “Car Rental” दुकान गाठले आणि लगेच एक लाल रंगाची सुझुकी 4x4 भाड्याने घेतली. इथे कोणत्याही देशाचा गाडी चालवायचा परवाना (driving license) चालतो.मी माझे भारतीय driving license दुकानाच्या कॅश डेस्क वर जमा केले, गाडीची अगाऊ फी भरली आणि गाडी ताब्यात घेतली. माझे license मला गाडी परत केल्यावर मिळणार होत. इथे license जमा करा आणि गाडी चालवा असा हिशोब आहे. कारण का तर, कोणी पर्यटक गाडी आवडली म्हणून बोटीतून पळवून घेऊन जावू नये म्हणून, असे त्या दुकानदाराचे मत ! दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, इथे गाडी जरा जपवून चलवणेच उत्तम. ग्रीस वर आलेली मंदी बघता ग्रीक सरकारने वाहतुकीचे नियम मोडल्यावर भराव्या लागणाऱ्या जुर्मान्याची रक्कम अवास्तव फुगवून ठेवली आहे आणि हीच रक्कम पर्यटकांना सुद्धा लागू पडते.
सुझुकी 4x4, सँटोरिनीच्या अरुंद आणि घाट रस्त्यासाठी योग्य अशी गाडी आहे. कामारी समुद्रकिनाऱ्या जवळच्या प्रशस्त पार्किंग मध्ये गडी उभी केली अणि समुद्रकिनारा बघायला निघालो.संपुर्ण काळ्या गोट्यंचा हा लांबच लांब किनारा. समुद्राच्या निळ्या लाट, काळ्या गोट्यंवर आणि मोठाल्या खडकांवर येउन विसावत होत्या. उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता त्यात नेहमीप्रमाणे गोरे पर्यटक ऊन खात बसले होते. आमच्या भारतीय त्वचेला मात्र उन्हाची इतकी तळप कधिच जाणवत नसल्याने, एका छत्री खाली मांडलेल्या बिछान्यावर आडवे झालो आणि आजू-बाजूची गम्मत पाहू लागलो.
*कामारी समुद्रकिनारा
कुणी मालीशवाला आपले खास ओलीव्हचे तेल दाखवून मालिश करवून घेण्यासाठी विनवण्या करून जाई तर कधी, इतके सुंदर ऊन पडलेले असताना छत्री खाली असे झोपणारे हे येडपट लोक कोण? असा चेहरा करत एखादा अगाऊ उघडाबंब गोरा आमच्या छत्री खाली डोकावून जाई!
राजधानी फिरापासून ८ कि.मी. वर असणारा हा समुद्र किनारा. बोटीने समुद्रात थोडेसे आत गेले कि दिसते पोसायडोनच्या मंन्दिरचे भग्नावशेष. केप सुनिनी वरील पोसायडोनचे भव्य मंदिर आधीच बघितले असल्याने आता पुन्हा एकदा या समुद्र देवाला साकडे घालयची गरज भासली नाही! किनारार्यावरुनच छायाचित्र काढून निघालो, पेट पूजेसाठी चांगले हॉटेल शोधायला. किनार्या लागतची अनेक छान restaurants आम्हाला खुणवत होती. प्रत्येक हॉटेलवाला गिराहिक आकर्षित करण्यासाठी हर तर्हेचे प्रयत्न करत होता.
आमच्या समोरही एक हसतमुख ग्रीक तरुण आला आणि समुद्रातून ताजा पकडून आणलेला लोब्सटर करून देतो म्हणला. लोब्सटर म्हणजे माझा जीव कि प्राण, हे या पाठ्याला कसे समजले कुणास ठाउक !
वेळ न घालवता प्रथम थंड मॉकटेल्सची ऑर्डर देत, बाहेर मांडलेल्या टेबल-खुर्च्यावर बसलो. समुद्राचा वारा अलगद गुदगुल्या करत वाहत होता. डावी कडे दिसणार्या समुद्राकडे बघताना तंद्रि कधि लागली समजलेच नाही...
आमची तंद्री भंग करायला मगासचा तरुण त्याच्या साथिदारा सोबत हजर. त्याच्या हातात आम्ही मागवलेले मॉकटेल आणि दुसर्याकडे होता भला थोरला जीवंत लॉबस्टर! असला मोठा लॉबस्टर मी आयुष्यात पुर्वी कधीही बघितला नव्ह्ता. कदाचित आमचा चेहरा बघुन असेल, पण त्याला खात्री पटली असावी कि गिर्हाइक् आता कुठे जाउ शकत नाही. मग लगेच त्याने शेफ स्पेशल म्हणुन "Spicy lobster with sphagetti" व तळलेली कालामारी, असा बेत सुचवला आणि आणि झपा झपा पाउले उचलत हॉटेलच्या आत दिसेनासा झाला.
*कामारी समुद्रकिनारा
*कामारी समुद्रकिनारा
*कामारी समुद्रकिनारा
*कामारी समुद्रकिनारा
*स्पगेटि सोबत लोब्स्टर
*तळलेली कालामारी
जेवणावर ताव मारुन (व बिलाचे पैसे चुकते करुन!) गाडी कडे वळलो. आमचे पुढचे ठिकाण होते, सँटोरिनीच्या दक्षिणेचे शेवटचे टोक - फारोस दिपस्थंभ (Faors Lighthouse). गाडी आता घाटाच्या रस्त्यानी या दिपस्थंभाच्या दिशेने निघाली होती. काही वळणे आपल्या माथेरानच्या घाटवळणांची आठवण करुन देत होती. सावकाश गाडी हाकत आम्ही एका डोंगर माथ्यावर पोहोचलो. समोर होते एक पांढरे-निळे चर्च आणि त्या मागे निळा शांत समुद्र.चर्चच्या निळ्या घुमटाचा रंग समुद्राच्या रंगाशी एकरुप झाला होता. एक अविस्मरणीय नजारा! त्या जवळच अजुन दुसर्या काही सुंदर इमारती. गाडी थांबवुन फोटो काढुन घेतले. गाडी पुन्हा एकदा फारोस दिपस्थंभच्या दिशेने पळु लागली.दिपस्थंभाकडे जाताना वाटेत अनेक वाळुचे किनारे, wineries व चर्च लागतात. पण आता वेळ निघुन जात असल्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबायचे नाखुशीनेच टाळले.
*पांढरे-निळे चर्च आणि त्या मागे निळा शांत समुद्र
*सुझुकि ४x४
१८९२ साली एका फ्रेंच कंपनी कडे कॉन्ट्रॅक्ट देउन हे दिपस्थंभ बांधण्यात आले होते. एगियन समुद्राचे इथे आपले शक्ती प्रदर्शन चालु होते. दिपस्थंभाच्या खडकावर आदळणार्या उंच लाटा अंगावर रोमांच उभा करत होता. सँटोरिनी आमच्या समोर तिचा हा नवा पैलु उघडत होती. इथुन जवळच असलेल्या viewing point कडे गाडी वळली आणि पुन्हा एकदा पाहतो तर समुद्र शांत! निसर्गाच्या अजब तर्हा! समुद्राच्या या देखाव्याचा मनमुराद आनंद घेत दुपारी चार साडेचारच्या सुमारास तिथुन निघालो आणि वाटेत लागणार्या एका winery मधे पोहोचलो. दुर्दैवाने winery बंद असल्याने आम्हाला फक्त बाहेरुनच चक्कर मारुन समाधान मानावे लागले.
*फारोस दिपस्थंभ
*winery
सँटोरिनी, समजा एक रत्नजडीत मुकुट असेल तर त्या मुकुटातला शिरोमणी ठरेल तिच्या उत्तरेतील शेवटचे टोक असलेले इया (Oia). पहिल्याच दिवशी या इया चे दर्शन आम्हाला फिराचा सुर्यास्त बघताना झाले होते. आज संध्याकाळी तिथे पोहोचायचे होते. इयाचा सुर्यास्त हा जगातील सर्वात सुंदर सुर्यास्त समजला जातो. त्यामुळे आता कुतुहल वाढले होते. आमच्या हॉटेल मालकाच्या मताप्रमाणे इयाला सुर्यास्तावेळी गाडी पार्क करणे हे महाकठिण काम असते. त्यामुळे आम्ही गाडी परत केली, लायसेन ताब्यात घेतले आणि बसनेच इयाच्या स्थानकावर पोहोचलो.
एका ग्रीक पुराणकथेनुसार, इयालाच समुद्राखाली गेलेल्या "Atlantis" ह्या काल्पनिक खंडाचा शेवटचा उरलेला भाग असे ही म्हणतात. काही ग्रीक इतिहास तज्ञांच्या मते एकेकाळी अस्तिवात असलेला सर्व-समृद्ध Atlantis खंड, हा काप्लनिक मुळी नाहिच! उलट हा खंड सँटोरिनीच्या उत्तरे कडील इयाच्या टोकाला जोडला गेला होता, परंतु कालांतराने Atlantis बुडाले आणि उरले ते फक्त त्याचे टोक - म्हणजेच इया. असो. इतिहासात जास्त खोलावर न डोकावता, आम्ही हळुहळु बस स्थानका समोरच्या पायर्या चढत इयाच्या वरच्या भागाकडे चढु लागलो.
राजधानी फिरा प्रमाणे इथे देखिल दुतर्फा दुकाने आणि पर्यटकांची रेलेचेल चालु होती. जीने चढत आम्ही इयाच्या टोकावर पोहोचलो - पाढरा-निळा रंग असलेल्या त्या पंचतारांकीत हॉटेलं आणि घरांजवळ. आम्ही सँटोरिनीच्या अगदी वर येउन ठेपलो होतो. समोर क्षितीजा पर्यंत पसरलेला समुद्र. हळुहळु अस्ताला जाणार्या सुर्याने आपले तेज आता मालवले होते. त्याची सोनेरी किरणे समुद्रावर पडल्यामुळे, एगियन समुद्रावर कोणी सोनेरी झालर परवल्याचा भास होत होता. हळुहळु लोकांची गर्दी वाढु लागली. अम्ही पटकन फोटो काढण्यासाठी मोक्याची जागा पटकावली आणि कॅमेर tripod वर लावुन सज्ज झालो. काही क्षणातच इयाचा सुर्यास्त बघायला पर्यटकांची जत्रा भरली! कोणी घराच्या भिंतींवर तर कोणी घुमटावर तर कोणी अजुन भलतीकडेच लटकलेला! प्रत्येकाला त्या मावळत्या सुर्यनारायणाचे दर्शन विना अडथळा घेण्याचा मोह अनावर झाला होता. सुर्यास्त समुद्रातुन बघायचा असल्यास इथे खास sunset स्पेशल बोटींचे तिकिट मिळु शकते आणि ह्या बोटी पर्यटकांना सुर्यास्त होइ पर्यंत समुद्रातच थांबवतात. त्या सुर्यदेवाला मावळताना पाहण्यासाठी, पृथ्वीवर एवढे सगळे उपद्व्याप चालु असले तरी स्व्तः सुर्यदेव मात्र गंभीर पणे त्यांच्या कार्यापासुन जराही विचलीत न होता, आपल्या संथ गतीने समुद्राच्या दिशेनी अलगद वाटचाल करत होते. क्षणाक्षणाला एक नवीन रंग आसमंतात उधळीत होते..
*इया मधले एक चर्च
*sunset स्पेशल बोट
*sunset
इतक्या वेळ निळ्या दिसणार्या त्या आकाशात आता रंग भरु लागले होते. कुठे जांभळा, तर कुठे गडद निळा तर कुठे लाल... आणि या सर्व रंगाचे प्रतिबिंब उमटत होते ते, इयातल्या घरांच्या निळ्या घुमटावर. अशावेळीस कितीही आधुनिक, महागडा कॅमेरा असला तरी ते सर्व रंग त्यात बंदिस्त करणे हे जवळ जवळ अशक्यच! तरीही मी माझ्या परीने, माझे फोटोग्राफीचे असलेले थोडेबहुत ज्ञान पणाला लावुन आठवणी कैद करायची केविलवाणी धडपड करत होतो. मानवाने कितीही प्रगती केली तरीही निसर्गासमोर तो सदैव नतमस्तकच होणार याची शाश्वती, इयाचा सुर्यास्त देत होता...
sunset
sunset
अलगद पणे सुर्य समुद्रात विलिन झाला आणि एखाद्या नाट्यगृहातले लोकप्रिय नाटक संपवुन, पडदा पडताच टाळ्यांचा जो कडकडात होतो, तशाच टाळ्या वाजवत लोक जागेवरुन उभे राहिले. निसर्गाचा शतकानुशतके नियमीत चालणारा हा खेळ आजच्या पुरता संपला होता. मी जीवंत पणे स्वर्ग पाहिला होता!
इया
अंधारात इयाची टेकडी उतरताना, खाली चमचमणारे फिरा दिसु लागले. रात्रीचे फोटो काढत आम्ही संथ पणे एकएक दुकान पाहत पुढे सरकत होतो. वेळ पुढे जाणार आणि सँटोरिनी मधला आमचा अजुन एक दिवस कमी होणार, हे जणु मनाला पटवुन घ्यायचेच नव्हते. पोटात पुन्हा एकदा कावळे कोकलु लागले, तसे आम्ही हॉटेलच्या दिशेने वळलो. पुन्हा एकदा खमंग चमचमीत ग्रीक जेवण संपवुन, हॉटेलच्या दिशेने निघालो.
इयातुन दिसणारे फिरा
आजचा दिवस संपावा असे वाटत नसतानाही तो संपला होता. सँटोरिनीतली आता फक्त एक रात्र उरली होती. शेवटच्या दिवसाचा पुरेपुर फायदा घेत हे बेट फिरावे आणि जमल्यास पुन्हा हा सुर्यास्त बघावा असा मनाशी निश्चय करत दिवाणावर डोळे मिटले.
क्रमशः
प्रतिक्रिया
5 Mar 2013 - 6:22 am | श्रीरंग_जोशी
नेहमीप्रमाणेच बहारदार वर्णन व चित्रे.
5 Mar 2013 - 7:09 am | यशोधरा
भारी फोटो! वर्णन नंतर सावकाशीने वाचणार.
5 Mar 2013 - 8:33 am | ५० फक्त
धन्यवाद, लई पैसे वाचवले तुम्ही आमचे.
5 Mar 2013 - 9:13 am | रेवती
सगळे फोटू आणि वर्णन आवडले. सुर्यास्ताचे फोटू तर मस्तच! या भागात सगळ्यात आवडले ते इयातून दिसणारे रात्रीचे फिरा! भारतात प्रवास करताना, घाटातून जाताना रात्रीच्यावेळी डोंगराच्या उतरणीवर कधीकधी अशी गावे दिसतात. फिराइतका चमचमाट नसतो पण साधारण असेच असते. निळे पांढरे चर्च दिसतेय तिथेच बहुतेक तुम्ही म्हणाला होता ते गाणे चित्रित झाले असावे.
5 Mar 2013 - 9:31 am | यशोधरा
मस्त लिहिले आहे गावांबद्दल. रात्रीचे एकदा बामणोलीला नक्षत्रांनी भरलेले आकाश पहात राहिलो होतो, ते आठवले.
5 Mar 2013 - 3:13 pm | nishant
बरोब्बर! शेवटि एकदाचे सापडले ते चर्च आम्हाला! :D
5 Mar 2013 - 11:47 am | बॅटमॅन
सगळेच भारी!! विशेषतः तो सूर्यास्त अन ते निळ्याशार रंगाचा घुमट असलेले चर्च.
5 Mar 2013 - 11:56 am | नानबा
फोटु जाम म्हणजे जामच मस्त. नेहमीप्रमाणे विशेष आवडलेले फोटु - स्पॅगेटी आणि कालामारी. इकडे मुंबईत ग्रँड हयात मध्ये स्पॅगेटी पोर्सिनी चिकनसोबत खाल्ली होती, आणि कालामारी रिंगसुद्धा.
(चांगल्या खाण्याची आठवण आली तरी पुन्हा भूक लागते.) :)
5 Mar 2013 - 12:01 pm | स्पा
शब्द संपले
खल्लास फोटो
5 Mar 2013 - 3:21 pm | nishant
@श्रीरंग_जोशी, यशोधरा, ५० फक्त,रेवती, बॅटमॅन, प्रथम फडणीस, स्पा
तुम्च्या उत्स्फुर्त प्रतिक्रियांब्द्द्ल अनेक धन्यवाद.. :)
5 Mar 2013 - 3:26 pm | स्मिता.
हा भाग माझा आतापर्यंतचा सगळ्यात फेवरेट म्हणून घोषित करते ;)
सगळे फोटो निळाईने आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाने भरभरून होते. शेवटून तिसरा, सूर्यास्ताचा फोटो क्लासच!
आम्हाला फोटो बघून एवढे भारावल्यासारखे झाले तर तुम्हाला तिथे प्रत्यक्ष असताना काय वाटले असेल याची फक्त कल्पनाच करू शकते.
5 Mar 2013 - 3:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
बहारदार वर्णन आणि फोटो ! सुर्यास्ताचा शेवटचा फोटो म्हणजे कळस आहे !
5 Mar 2013 - 4:56 pm | दिपक.कुवेत
फोटो नेहमीप्रमानेच छान. त्या आशाळभुत माउचा फोटो छान टिपलाय!
6 Mar 2013 - 12:34 am | अशोक सळ्वी
सर्व भाग वाचून काढले. ऊत्तम वर्णन व अप्रतिम फोटो...पुढचे भाग लवकर येवुद्यात.
6 Mar 2013 - 2:28 am | nishant
@ स्मिता, इस्पीकचा एक्का, दिपक्.कुवेत, अशोक सळ्वी
तुम्च्या उत्स्फुर्त प्रतिक्रियांब्द्द्ल अनेक धन्यवाद..
6 Mar 2013 - 10:38 pm | मदनबाण
झकास ! फोटो फारच आवडले !
*कामारी समुद्रकिनारा
च्यामारी, इथे एकदा तरी जावे असे दिसते ! ;)
6 Mar 2013 - 11:41 pm | nishant
19 Apr 2013 - 1:14 am | सुफी
पांढरे-निळे चर्च आणि सुर्यास्ताचे फोटो भन्नाट. लोब्स्टर आणि कालामारी पाहुन गोव्याची आठवण आली.
19 Apr 2013 - 1:18 am | शुचि
पैलवान दिसतोय तो लॉब्स्टर!! ती माऊ कशी टुकतीये :) फोटो व वर्णन फार सुरेख.
21 Apr 2013 - 12:58 am | nishant
तुम्च्या उत्स्फुर्त प्रतिक्रियांब्द्द्ल अनेक धन्यवाद.