"तौबा तुम्हारे ये इशारे.." युट्युब वर चलते-चलते सिनेमातले गाणे चालु होते आणि बायकोने फर्माईश केली.. ह्या गाण्याचे शुटिंग जिथे कुठे झाले आहे, तिथे एकदा जायला पाहिजे, काय मस्त दिसतात ती मागची पांढरी-निळी घरे!!
मग काय! गुगलवर शोध करायला सुरवात झाली आणि समोर नाव आले ग्रीस आणि त्याचे जगातील सर्वात सुंदर समजले जाणरे बेट - सँटोरिनी. मग ठरलेच, येत्या ऊन्हाळ्यात ग्रीसचा दौरा करायचा!!
२०११ हे साल युरोपियन युनियन वर अनेक प्रश्नचिन्हे उभी करतच सुरु झाले.. युरोपियन युनियन टिकणार का? टिकले तर किती काळ? आणि नक्की या युनियनचा फायदा काय आणि कोणाला? असे एकना अनेक प्रश्नांवर चर्चासत्र टिव्ही वर चालु.. CNN, BBC पासुन अगदी आपल्या आजतक चॅनल पर्यंत.. सगळीकडे एकच आणि या सर्वांचा रोख तो मात्र एक देशावर - डबघाईला आलेले ग्रीस!
एप्रिल २०११ - ग्रीस मध्ये वारंवार होत असलेल्या दंगलींच्या बातम्या कानावर पडत होत्या. बेकारी, सरकारवर संतापलेले ग्रीक नागरीक. ग्रीसवर माहिती काढायला जावे, तर सगळी कडे हि एकच बातमी.
"अरे तुम्ही ग्रीसला कुठे चाललात, तिथलेच लोक देश सोडुन पळतायत. दंगली चालु आहेत. बेकारीनी ग्रीक ग्रासले आहेत, नका जाउ तिकडे, उगाच तुम्हाला कसला त्रास नको". माझे स्लोवाकियन मित्र मला वारंवार एकच गोष्ट सांगत होते. बॉसकडे सुट्टी मागायला अर्ज टाकला, तर त्याचे पण तेच! ग्रीस नको, दुसरीकडे जा.. स्विर्झलँड, इटली, जर्मनी.. अनेक देश आहेत... पण मला मात्र आता ग्रीसने झपाटलेच होते..! काहि झाले तरी आता ग्रीसला जायचेच, बघुया तरी काय होते ते!
जुलै २०११ ला ग्रीसला जायचे ठरले. लगेच edreams.com वरुन विमानाची २ तिकिटे बुक केली. hostelbookers.com वरुन अथेन्स आणि सँटोरिनी बेटावरचे होस्टेल आणि हॉटेल बुक केले. अथेन्स ते सँटोरिनी साठी Bluestar Ferryचे बुकिंग झाले. १ आठवड्याचा प्लॅन ठरला. त्यातच lonelyplanet.com वर माहिती वाचली कि सँटोरिनीला सलग तिसर्या वर्षी जगातील सर्वात सुंदर बेटाचा दर्जा मिळाला. तिकडे जाण्याची उत्कंठता आता शिगेला पोचली होती.
जुन २०११ संपता-संपता माझ्या एका स्लोवाकियन मैत्रिणीने एक सल्ला दिला, "ग्रीसला चाललाच आहात, तर अथेन्स मधे एकटे फिरु नका. माझी एक कॅनॅडियन मैत्रिण आहे. ती ग्रीसला २ वर्षापुर्वी स्थायिक झाली आहे. तिला मी तुमच्या बरोबर रहावयास सांगते, कमीतकमी अथेन्स मधे तरी तुम्हाला सोबत!" तिचे म्हणणे पटले, लगेच फेसबुकच्या सहाय्याने ओळखी झाल्या. एक भारतीय जोडपे तिला भेटायला येणार, हे ऐकुन तिला देखिल आनंद झाला.
जुलैच्या पहिल्याच आठवड्यात बातमी आली.. अथेन्स मध्ये पुन्हा एकदा दंगल उसळली. टॅक्सिवाले बेमुदत संपावर गेले, बेटांवर पोचवणार्या सर्व फेर्या बंदराला लागल्या. संतप्त पर्यटक आणि स्थानिक लोकांच्या मुलाखती टिव्ही वर चालु होत्या. टिव्ही चॅनलवाले लोकांना ग्रीसला येण्यापासुन परावृत्त करत होते. आमची तर तंतरलीच होती. ह्र्दयाची धकधक वाढली होती.. पण आता सर्व बुकिंग झाले होते. ट्रिप रद्द केली असती तर बरेच नुकसान झाले असते. आमची ट्रिप सुरु होण्यास अजुन १५ दिवसांचा अवधी होता... म्हटले बघु काय होते ते..
शेवटी एकदाची २० जुलैची पहाट उजाडली. व्हिएन्ना वरुन अथेन्सचे विमान होते. स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा आणि ऑस्ट्रियाची व्हिएन्ना, या दोन्ही राजधान्या 'Twin cities' म्हणुन ओळखल्या जातात. एकमेकांमधले अंतर जेमतेम ५५ किमी (स्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रिया बद्दल पुन्हा कधीतरी ;) )
४० मिनिटात आम्ही ब्रातिस्लाव्हा वरुन व्हिएन्ना विमानतळावर बसने पोचलो. चेक-इन करुन निर्धारित गेट्वर विमानाची वाट बघत बसलो. उन्हाळा असल्यामुळे सकाळी ४ लाच सुर्योदय झाला होता. पहाटे ४ ला असा लख्ख सुर्यप्रकाश बघितला कि मला गंमतच वाटते.. कधी नव्हे ते सुर्योदय बघितला होता. दिवसाची सुरवात छानच झाली होती. विचार केला आता हा आठवडा सुद्धा ग्रीसमधे असाच मस्त जावा, कसलाहि त्रास न होता!
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Jan 2013 - 5:12 am | श्रीरंग_जोशी
पण प्रथम भाग फारच थोडक्यात आटपल्यासारखा वाटला...
पुढील भाग विस्ताराने लिहावा हि विनंती...
30 Jan 2013 - 12:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
असेच म्हणतो..
30 Jan 2013 - 8:47 am | मुक्त विहारि
मस्तच..
30 Jan 2013 - 9:11 am | किसन शिंदे
थोडक्यात आटोपलं आणि हे काय? फोटो कुठेयंत??
30 Jan 2013 - 10:59 am | चौकटराजा
सांतोरिनी ला गेला होतात ऑ ? मग मी आता इनो घेऊन बसलो म्हणून समजा ! ग्रीसचा सूर्यप्रकाश हा सर्व जगात प्रसिद्ध आहे. उतारावरील पांढरी घरे.निळी दारे, दगडी फरसबंद बोळ व समोर निळाशार सागर असे आहे का सांतोरिनी ?
30 Jan 2013 - 11:15 am | बॅटमॅन
धिस इज़ स्पार्टा!!!!! आंदो भाई लौकरात लौकर.
30 Jan 2013 - 12:07 pm | सुहास झेले
मस्त... पण फटूंशिवाय भटकंती धाग्यात मज्जा नाय बौ, आम्ही लेखासोबत कसे फिरणार :) :)
30 Jan 2013 - 12:19 pm | दिपक.कुवेत
जरा कुठे उत्सुकता वाढत होती तर लगेच क्रमशः....असो पुढचे भाग आता पटापट येउद्यात.
30 Jan 2013 - 1:43 pm | nishant
आत्ता कुठे विमान व्हिएन्ना वरुन उडाले आहे.. लवकरच अथेन्सला पोहचेल, तेव्हा भरपुर फोटोंसाठी तयार रहा. ;) प्रतिसांदा बद्दल धन्यवाद!! :)
30 Jan 2013 - 7:26 pm | रेवती
वाचतीये. तुम्हा सगळ्या फिरणार्या लोकांचं स्थलदर्शनाचं प्रेम लिहिण्यातून जाणवतं. मला फिरायला अज्याबात आवडत नाही आणि स्थलदर्शनही झालं पाहिजे, असं शक्य नाही. तुमचे हे धागे मला वरदान आहेत. :)
30 Jan 2013 - 9:13 pm | nishant
जे पाहिल, अनुभल तेच येथे श्ब्दांच्या आणि फोटॉच्या सहायांने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न क्ररणार आहे...तुम्हाला दे़खिल या लेखाच्या माध्यमातुन घरबसल्या ग्रीस भ्रमंति क्ररता यावि अशि आशा करतो.
पुढचा भाग लॉक्ररच. :)
30 Jan 2013 - 7:35 pm | प्रभाकर पेठकर
खरंच, सुरुवात इतकी उत्कंठावर्धक झाली की अधाशा सारखा वाचत गेलो पण अचानक ठेच लागून तोंडघशी पडावं तसे 'क्रमशः' आले. असो.
पुढील भाग जरा जास्त विस्ताराने, सुंदर सुंदर छायाचित्रांनी सजलेले येतील अशी अपेक्षा आहे.
30 Jan 2013 - 8:52 pm | nishant
७ दिवसांचि सफर. एका दिवसाचा १ भाग अशि विभागणी करणार असल्याने पुढ्चा भाग सविस्तर फोटोंसहित लवकरच टाकणार आहे. तुम्हा सर्वांना आवडेल हिच आशा.
30 Jan 2013 - 7:53 pm | अग्निकोल्हा
सुरुवात बघुन Far Cry 3 या अॅक्शन गेमची स्टोरी ऐकतोय की काय असचं वाटलं....
30 Jan 2013 - 8:47 pm | nishant
Far Cry 3 - हा सिनेमा अजुन पाहण्यात आलेला नाही :) या विकांताला बघतोच !
30 Jan 2013 - 8:52 pm | पैसा
पुढच्या भागाची वाट पहात आहे.
31 Jan 2013 - 10:43 pm | अशोक सळ्वी
लेखाची सुरवात छान झालीय्..पण फोटो शिवाय अळणी वाटतोय!
4 Feb 2013 - 10:44 pm | सूनिल
जाहीरात आहे का ही?