दिवस दुसरा:
सकाळी लवकरच जाग आली. नाश्ता उरकुन १० च्य सुमारास बाहेर पडलो आणि Acroplois च्या पायथ्याशी पोचलो. टेकडी खाली तिकिटघरात २ तिकिटे घेतली आणि चढायला सुरवात केली. वर चढायला चांगला रस्ता आहे, त्यामुळे चढाई सोपी असली तरी ऊन प्रचंड जाणवत होते. जागोजागी दिसत होत्या उत्खननात सापडलेल्या वस्तु, कुठे मातीची भांडी, कुठे दगडावर केलेले नक्षीकाम, कुठे मार्बलच्या कमानी. या सर्वांमधील उठुन दिसणारे म्हणजे, Dionysus Eleuthereus चा रंगमंच. ग्रीक पुराणात Dionysus ला द्राक्ष्या पासुन बनवलेल्या वाईनचा देव असे म्हटले जाते!
* Acroplois ची चढाई
* Acroplois ची चढाई
* Acroplois ची चढाई
* Dionysus Eleuthereus चा रंगमंच
"Acroplois" म्हणजे मुळ शहरापासुन वरती अशी बांधलेली वसाहत, मुख्यतः संरक्षणासाठी. इतिहासपुर्व काळात असे Acroplois किंवा किल्ले बांधले जात, ज्यात एक किंवा अनेक इमारतींचे समुह असत. रोम, जेरुसेलम, ब्रातिस्लावा अशा अनेक ठिकाणी Acroplois बघायला मिळत असले तरी, ग्रीस मधले हे Acroplois, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व Acroplois पैकी श्रेष्ठ मानले जाते. म्हणुनच ह्याला Acroplois of Athens असे थेट नाव देण्यात आले आहे.
३०-४० मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही Acroplois of Athens वर पोचलो. वर पोचताच समोर दिसतो तो Propylaea चा दरवाजा. मोठाले जीने आणि खांब असलेली हि इमारत म्हणजे Acroplis चे मुख्यद्वार. चुनखडी, पांढरा मार्बल आणि लोखंडापासुन बनलेला हा दरवाजा. ४३७ BCE साली सुरु झालेले ह्याचे बांधकाम पुढल्या ५ वर्षात पुर्ण झाले. त्या काळात, गुलाम आणि खालच्या जातीच्या लोकांना या द्वारा पलीकडे प्रवेश नसे. आत्ता मात्र या पायर्यांवर दमलेले पर्यटक जातपात, रंग, धर्म विसरुन आराम करताना दिसतात.
* Propylaea चा दरवाजा
* Propylaea चा दरवाजा
जिने चढुन आत शिरताच डाव्या बाजुला दिसते ते Erechtheion चे देऊळ. Erechtheion हा ग्रीक पुरातणातला धरणीमाते पासुन जन्म घेतलेला देव आणि देव जरी असला तरी हा पांगळा होता! काही पुराण कथेनुसार ह्याचे अर्धे शरीर माण्साचे तर अर्धे सर्पाचे होते. देवी अथीनानी ह्याचा लहानपणी सांभाळ केला. मोठा होउन याने ग्रीसवर बराच काळ राज्य केले. Erechtheion हा ४ घोडे असलेला रथ (Quadriga) चालवण्यात पारंगत होता. त्याचे हे कोशल्य पाहुन Zeus देवाने त्याला आकाशात एक अढळ स्थान करुन दिले. रात्रीच्या निरभ्र आकाशात दिसणारे “Auriga constellation” म्हणजेच हा राजा Erichthonius!
* Erechtheion चे देऊळ
* Erechtheion चे देऊळ
त्याच्या समोरच दिसते ते अथीना देवीच्या देवळाचे पडलेले दगड. या देवळाला Pre-Parthenon देऊळ देखिल म्हणतात. (अर्थात इथे आता देऊळ म्हणावे असे काही नाही). ग्रीक पुराणातील सर्वात शक्तिशाली देवी अथीना जीला “Godess of Athena Nike” म्हणजे विजयाची देवी देखिल समजले जाते. अथेन्स शहराचे नाव हिच्याच नावावरुन पडले आहे!
या पडलेल्या दगडापासुन उजवीकडे बघितल्यास नजर पडते ती भव्य अशा Parthenon वर. अथीना देवी बद्द्ल असलेला भितीयुक्त आदर यामुळेच ४३२ BC साली ग्रीक साम्राज्यातील लोकांनी अथीनाच्या जुन्या छोट्या देवळा नंतर तिचे हे भव्य देऊळ बांधले. देवळाचा विस्तार प्रचंड होता. पाचव्या शतकात झालेल्या ख्रिश्चन आक्रमणा नंतर या देवळाचे चर्च करण्यात आले आणि त्या नंतर १४६० साली मुसलामानांनी अथेन्स अर मिळवलेल्या विजया नंतर हिचे मशिदीत रुपांतर झाले! पुढे १६८७ साली झालेल्या स्फोटात देवळाची बरीच पडझड झाली. असे हे हजारो वर्षांपासुन उभे असलेले मंदिर म्हणजे ग्रीक संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. सतत डागडुजीचे काम चालु ठेवुन या मंदिराला आता अभय देण्यात आले आहे.
Acropolis वरुन खालचा परिसर फारच छान दिसत होता. चारी बाजुंनी डोंगर आणि मधे अथेन्स शहर. काल रात्री पाहिलेले "Temple of Olympian Zeus" चे भग्नावशेष आता वरुन व्यवस्थित दिसत होते.
* Parthenon
* Parthenon
* Parthenon
* Acropolis
* अथेन्स शहर
* अथेन्स शहर
* "Temple of Olympian Zeus" चे भग्नावशेष
Acropolis बघताना २-३ तास कसे निघुन गेले हे समजले देखिल नाही. टेकडी खाली येई पर्यंत दुपारचा १ वाजुन गेला होता. जवळ असलेले पाणी संपल्यामुळे तहानेने जीव अगदी व्याकुळ झाला होता. जवळच्याच एका restaurant मधे जाउन थंडगार लेमोनेड पिउन तहान भागवली. कडाक्याच्या उन्हात थंडगार लेमोनेड प्यायची मजा वेगळीच!
पेटपुजे साठी आम्ही ह्या वेळी ग्रीक souvalaki (सुवलाकी) वर ताव मारला. पिटा ब्रेड मध्ये चटणी सोबत गुंडाळलेले चिकनचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे आणि तळलेले बटाटे. खाऊन एकदम त्रुप्त झालो आणि निघालो Plaka (प्लाका) ला शॉपिंग करायला.
* लोमोनड
* ग्रीक souvalaki (सुवलाकी)
अनेक उपहारगृह, भेट्वस्तुंची दुकाने, ग्रीक हस्त्कला तसेच ऑलिव्ह ऑईलची खास दुकाने ह्याने नटलेला आणि संपुर्ण पणे टुरिस्ट साठी समर्पित केलेला हा शॉपिंग साठीचा परिसर. प्लाका हा फक्त एक रस्ता नसुन, अनेक छोट्या गल्ली बोळांनी नटलेला परिसर आहे. शॉपिंग करण्याच्या नादात, तुम्ही एका गल्लीतुन आत शिरता आणि भलत्याच बाजुन बाहेर पडता! असे हे भुलभुलैयावाले प्लाका.
प्रत्येक दुकानात नजर टाकत खास ग्रीक दिसणार्या वस्तु खरेदी करत होतो. असेच एका दुकानात शिरताच त्या काउंटर वरच्या पोरीने आमच्याकडे स्मित करत प्रश्न विचारला "तुम्ही भारतीय का?" आम्ही होकारार्थी मान हलवताच ती भलतीच खुश झाली आणि लगेच तिच्या शोकेस मधला राजा अलेक्झांडरचा छोटा पुतळा काढुन दाखव्त आम्हाला म्हणाली, "हा आमचा सर्वशक्तिमान अलेक्झांडर, याने जगाला जिंकले पण शेवटी भारतात पाउल ठेवले आणि पोरस राजा समोर नतमस्त्क झाला, तुम्ही भारतीय असल्याने तुमच्या साठी मी खास हा पुतळा सवलतीच्या दरात देते!" अस म्हणत तिने तो पुतळा पॅक सुद्धा केला, आम्ही देखिल तिच्या या हजरजबाबीपणा आणि salesmenship ला सलाम करत तो पुतळा विकत घेतला आणि बाकिचा बाजर भटकु लागलो.
* प्लाका
* प्लाका
* प्लाका
* प्लाका
* प्लाका
* प्लाका
* प्लाका
थोडे पुढे एका आर्ट गॅलरी सओर येताच, तिथल्या मुलीने हसत आम्हाला अभिवादन करत विचारले "तुम्ही कालच अथेन्सला आला आहात, एअरपोर्ट वरुन येणार्या बस मधे मी देखिल होते. तुम्ही भारतीय आहात का?" पुन्हा एकदा होकारार्थी मान हलवत आम्ही उत्तर दिले. "मला भारत देश आणि भारतीय फार आवडतात. नुकतीच मी तुमच्या देशाला भेट देउन आली आहे, माझ्या आर्ट गॅलरी मधल्या वस्तु मी दुनियाभर मांडत फिरत असते. तुम्ही माझी आर्ट गॅलरी जरुर बघा - विनामुल्य!" आश्चर्यचकीत चेहरा करत आम्ही तिची आर्ट गॅलरी बघुन घेतली., जरी फुकट असली तरी फोटो काढण्यास तिने मनाई केली. या गॅलरीतील खासियत होता, एका काचेच्या पेटीत ठेवलेला अस्सल सोन्याचा Tieara (मुकुट). ग्रीस मध्ये मुख्यतः २ प्रकारचे मुकुट प्रचलि होते. Laurel या झादाच्या पानापासुन बनलेला tieara, ऑलिंपीक विजेत्या खेळाडुच्या डोक्यावर मुकुटासारखा सजवला जात असे तर ग्रीस मध्ये दैवी स्थान प्राप्त झालेल्या ऑलिव्ह झाडाच्या पानापासुन बनलेला tieara हा फक्त ग्रीक देव व देवळातील पुजार्यां पुरताच मर्यादीत ठेवला जात असे.
प्लाका मध्ये भटकतांना वेगवेगळ्या देशातील लोक मुक्तपणे फिरताना दिसत होते, कुठेही मागच्या आठवड्यात झालेल्या दंगलीचे दडपण जाणवत नव्हते. इथले वातावरण उत्साही होते.
प्लाका मधे फिरता फिरता संध्याकाळ झाली होती आणि ठरल्या प्रमाणे आमच्या मैत्रिणीचा फोन आला. "जेवायला येताय ना? आमची तयारी झाली आहे. तुम्हाला तुमच्या हॉस्टेलवर घ्यायला आम्ही येतोय लगेच. तयात रहा" मग काय तर, भराभर पाउले उचलली आणि निघालो हॉस्टेलकडे तयार व्हायला. एका ग्रीक घरात प्रवेश मिळणार होता, ते पण जेवायला, त्यामुळे उत्साही झालो होतो.
ठरल्या प्रमाणे दोघेही आम्हाला घ्यायला हॉस्टेलवर आले आणि आम्ही निघालो चालतच... संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यात बरीच गर्दी होती. अथेन्स आणि मुंबईची ट्रॅफिक यात मला उगिच साम्य वाटु लागले. युरोप मधल्या इतर देशात कितीही ट्रॅफिक झाली तरी कोणिही गाडिचा हॉर्न वाजवत नाही, सगळे निमुटपणे एका लेन मधुन आपल्या गाड्या हळुहळु चालवर राहतात. इथे मात्र त्या उलट - हॉर्न मारत, चुकिच्या बाजुने overtake करत, कामावरुन घरी परतणारे अथेन्स्कर या बाबतीत अगदी मुंबईकरां प्रमाणे वागत होते!!
कोरिन आणि यॉनिचे घर म्हणजे २ रुम किचनचे साधे अपार्टमेंट जरी असले तरी निट्निटके आणि टापटिप होते. त्यांनी त्यांच्या एका ग्रीक मैत्रिणीला - एफ्तियाला देखिल आंमत्रण दिले होते. तिला भारतीयांना भेटायची फारच इच्छा होती. अत्यंत बडबडी अशा ह्या मुलीबरोबर आमचे गट्टी जमली आणि गप्पांना रंग चढत गेला. युरोप मध्ये अनेक वर्ष राहिल्यावर असे ध्यानात आले होते की, युरोपियन माणुस सहसा परकीय लोकांबरोबर पहिल्याच भेटित मनमोकळे पणे बोलत नाही.. पण आम्हाला ह्या संपुर्ण प्रवासात भेटलेली ग्रीक मंडळी मात्र ह्याला अपवाद ठेरली!
जेवायला खास ग्रीक पद्धतीचे मटन चॉप्स केले होते. त्या बरोबर पिटा ब्रेड, ग्रीक सॅलॅड आणि शेवटी थंडगार icecream सोबत बकलावा!
ग्रीक धर्मात गाईला हिंदु धर्माप्रमाणे दैवी स्थान प्राप्त आहे. ग्रीक देवता Hathor हिला गाय अत्यंत प्रिय होती तसेच Io(आयो) या ग्रीक देवीने वेळोवेळी पृथ्वीवर अवतरताना गाईचे रुप धारण केले असल्याचे ग्रीक पुराणातुन सांगितले गेले आहे! त्यामुळेच ग्रीक जेवणातला मुख्य मांसाहारी पदार्थ म्हणजे मटण व मासे. त्या बरोबर जगप्रसिद्ध ग्रीक सॅलॅड, फेटा चिज आणि सगळ्या बरोबर सोबतीला ऑलिव्ह ऑईल.
"ग्रीसला आल्यापासुन आम्हाला काही त्रास तर नाही ना? कसला ही त्रास झाल्यास लगेच आम्हाला कळवा" कोरिन अगदी जुन्या मैत्रिणी प्रमाणे आमची विचारपुस करत होती. तसेच आम्ही जाणर असलेले Santorini बेट किती सुंदर आहे, याचे
गुणगाण ते तिघेही गात होते. अथेन्स मध्ये वारंवार होणार्या दंगली आणि संप यावर बोलताना योनी चिंताजनक सुरात म्हणाला, "२०१० साली सुरु झालेल्या या दंगलींचे मुख्य कारण म्हणजे, युरोपियन युनियन कडुन देशाने प्रगतीच्या नावाखाली घेतलेले कर्ज. या कर्जाची रक्क्म हळुहळु अवास्तव होत गेली. देशाला या कर्जबाजारातुन मुक्त करण्यासाठी ग्रीक सरकारने अचानकपणे प्रत्येक गोष्टीवरचे कर वाढवले, तसेच निव्रुत्ती नंतर मिळणारे पेन्शन देखिल बर्याच ट़क्क्यांनी कमी केले. भ्रष्टाचार बळावला, अस्तित्वात असलेल्या नोकर्या अचानक नाहिश्या होउ लागल्या ग्रीक तरुन बेरोजगार तर म्हतारे विना पेन्शन निराधार झाले. या सगळ्याचा उलट परिणाम आता सरक्रार तसेच सामान्य ग्रीक माणुस या दंगली आणि संपाच्या रुपात भोगत आहे. एकुणच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आता हा येवढ्या मोठ्या देशाच्या कमाईचे मुख्य साधन, म्हणजे इथे भेट देणारे तुमच्या सारखे पर्यटक. दरवर्षी १६ लाख पर्यटक ग्रीसला भेट देतात. देशाच्या उत्पन्नात पर्यटनाचा वाटा १५% च्या आसपास आहे! परंतु वारंवार होणार्या दंगलींमुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. त्यातच प्रसारमाध्यमे त्याला अजुन खतपाणी घालायचे काम चोख बजावत आहेत. त्यामुळे ह्या वर्षी इथे नेहमी पेक्षा कमी पर्यटक आले आहेत. एकेकाळी जगावर राज्य करणार्या ह्या बलाढ्य देशाला आज सार्या जगाची मदत कमी पडत आहे, हेच खरे!"
शेवटी निरोप घ्यायची वेळ झाली. आम्हाला हॉस्टेल पर्यंत सोडायला ती सर्व मंडळी गाडी घेऊन आली. आता आमची भेट परत केव्हा होणार हे त्या ग्रीक देवांनाच माहित!
* बकलावा
* Ice-cream
परक्या देशात अशी माया लावणारी माणसे भेटली कि डोळे कधी पाणावतात हे कळतच नाही!
दुसर्या दिवशी सकाळी अथेन्सच्या मुख्य शहरापासुन १२ किमी वर असलेले Piraeus बंदर बघायचे होते. इथुनच आमची ४ थ्या दिवशी पहाटे santorini ला जाणारी फेरी निघणार होती आणि दुपारी आम्हाला पोहोचायचे होते ते अथेन्स पासुन ७० किमी लांब असलेल्या Cape Sounion च्या “Temple of Poseidon” ला.
दिवसभराच्या धावपळीने आणि रात्री उशिराने झालेल्या स्वादिश्ट आणि भरपेट जेवण ह्या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे दिवाणावर आडवे होताच लगेच झोप लागली.
क्रमशः
प्रतिक्रिया
12 Feb 2013 - 5:45 am | श्रीरंग_जोशी
सुरेख चित्रे व ओघवते वर्णन पण तरीही थोडक्यात आटपल्यासारखे वाटले.
पु.भा.प्र.
12 Feb 2013 - 6:41 am | यशोधरा
छान झाला आहे हाही भाग.
12 Feb 2013 - 8:21 am | ५० फक्त
मस्त ओ, लई लई पैसे वाचवले तुम्ही माझे, धन्यवाद.
12 Feb 2013 - 8:42 am | नानबा
सगळे फोटु आणि माहिती लय भारी... पण विशेष आवडलेले फोटु- क्र. १६,१७,२१ आणि २२... (सगळे उदरभरणाच्या सामानाचे) :)
12 Feb 2013 - 5:23 pm | nishant
अजुन सफर बारीच बाकि आहे आणि त्याबरोबरच आणखि थोड्या ग्रीक पदार्थांचि ओळख सुद्दा :) त्यामुळे पुढिल भाग वाचत रहाल हिच अपेक्शा :)
12 Feb 2013 - 9:17 am | तर्री
फोटो मुळे वर्णन अधिक भावले.
( लेखाचे शीर्षक चुकून - आठवणीतले "किस" असे वाचले )
12 Feb 2013 - 5:15 pm | nishant
प्रतिसादाब्द्द्ल धन्यवाद :)
"ग्रीस चा किस" असे देखिल होऊ शकले असते शीर्षक ;)
12 Feb 2013 - 11:24 am | बॅटमॅन
अप्रतिम!!!!!!!!
कधी एकदा ग्रीसला जातो असे झालेय आता. बादवे ग्रीक भाषा येत नसल्याने काही कुठे त्रास झाला का? म्हंजे अथेन्समध्ये नाही पण अन्य कुठे?
12 Feb 2013 - 5:11 pm | nishant
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद :)
ग्रीस मध्ये सर्वत्र इन्ग्रजि व्यवस्थित बोलले जाते आणी सगळा कारभार ग्रीक व इन्ग्रजि या दोन्हि भाषेत होत अस्ल्याने, कुठेही कसला त्रास झाला नाही.
12 Feb 2013 - 11:39 am | संजय क्षीरसागर
सक्काळीसकाळी दिलखुष झाला ग्रिसला जाऊन!
13 Feb 2013 - 11:25 pm | अशोक सळ्वी
प्रवसाची मजा आणि ग्रीसची माहिति छान वाट्ल.पुढ्चा भाग लवकर टाका!
13 Feb 2013 - 11:36 pm | पैसा
सोबतचे फोटो पण अगदी छान रंगीबेरंगी आहेत! प्रसन्न वाटलं.
15 Mar 2013 - 4:37 pm | nishant
प्रतिसादा बद्द्ल सर्वांचे धन्यवाद :)