आठवणीतले ग्रीस - भाग २

nishant's picture
nishant in भटकंती
5 Feb 2013 - 4:32 am

आठवणीतले ग्रीस - भाग १

दिवस पहिला:

दक्षिण पुर्व युरोपमधे स्थित, आधुनिक ऑलिम्पिक्सचा जनक, Aristotel, Plato, Alexander अशा दिग्गज व्यक्तिमत्वांनी गाजवलेला देश. एकि कडे पुर्वेला “Agean “, पश्चिमेला “Ionian” तर दक्षिणेला भुमध्य समुद्र (Mediterranean sea). उत्तरेला अल्बेनिया, Republic of Macidonia आणि बल्गेरिया तर उत्तर-पुर्व दिशेला तुर्की हा देश.या देशाने जगाला अनेक गोष्टी दिल्या. लोकशाहीची पाळेमुळे इथे हजारो वर्षांपुर्वी रोवली गेली. तसेच गणित व साहित्याची सुरवातही इथुनच झाली. एकुण १३,००० किमीचा लाभलेला समुद्र किनारा आणि असंख्य बेटे (साधारण ६०००!!). त्यात फक्त २०० च्या आसपास वसवली गेली आहेत आणि त्या २०० पैकी फक्त ७८ बेटांची लोकसंख्या १०० हुन आधिक!! क्रेत हे सर्वात मोठे तर सँतोरिनी जगातले सर्वात सुंदर बेट.
विमान अथेन्स्च्या Venizelos विमानतळावर उतरण्यास सज्ज झाले. खिडकीतुन खाली दिसत होत्या, अथांग पसरलेल्या निळ्या समुद्रावर तरंगणार्‍या छोट्या छोट्या होड्या आणि किनार्‍यावरील पांढरी-निळी घरे.
विमानातुन बाहेर पडताच तापमानात फरक जाणवला. व्हिएन्नाला विमानात चढताना सकाळची वेळ असल्याने हवेत बर्‍या पैकी गारवा होता, इथे मात्र चटके देणारे ऊन. सरकत्या पट्टीवर फिरणार्‍या आमच्या बॅगा हुडकुन बाहेर पडलो आणि एअरपोर्ट टॅक्सी काउंटरवर पोचलो. "टॅक्सिचा संप चालु आहे, अजुन इतक्यात मिटण्याची शक्यता नाही, तुम्ही एअरपोर्ट बाहेरच्या बस थांबावर जा. तिकडुन तुम्हाला Sintagama square ( Athens city center ) ला जाणरी X95 हि बस मिळेल" टॅक्सीच्या काउंटरवर असलेल्या ग्रीक पोराकडुन हि माहिती मिळाली आणि आम्ही मुकाट निघालो बस स्थानकाकडे. बाहेर स्टॉपवर बघावे तर तोबा गर्दी.! जवळ जवळ अर्धा मैल लांब रांग, आम्ही आपले तिकिट घेतले आणि रांगेत उभे राहुन बसची वाट पाहु लागलो.
साधरण ३०-४० मिनिटांत, ५-६ बस खचाखच भरुन गेल्यावर आम्ही एकदाचे बस मध्ये चढलो. संपुर्ण बस प्रवाशांनी भरली होती. बसच्या दारात आम्ही आमचे सामान घेउन, आपला तोल सांभाळत उभे, त्यात बस मधला AC बंद!. अथेन्स मधली दुपार म्हणजे एकदम कडक ऊन!! तापमान ३५-४० सेल्सियसच्या घरात असते. घामाच्या धारा पुसत आम्ही अथेन्स शहर येण्याची वाट पाहु लागलो. एअरपोर्ट ते Athens city center हा प्रवास साधारण ४०-५० मिनिटांचा होता.
सेंट्रल युरोप मधुन आल्यामुळे इथे संस्कृतीचा फरक लगेच जाणवला. युरोप मध्ये बहुतांशा दिसतात ती कौलारु घरे. इथे दिसत होत्या, सिमेंटनी बांधलेल्या, टेरेस असलेल्या, पांढर्‍या शुभ्र २-३ मजली इमारती. तसेच गोल घुमट असलेली बैठी घरे. युरोपियन आणि एशियन अशा दोन्ही संस्क्रुतींचा प्रभाव इथे जाणवत होता. त्यात एक अक्षरही न वाचता येणार्‍या ग्रीक भाषेतील, दुकाने, इमारती आणि रस्त्यांवरील पाट्या. त्या खाली इंग्रजी भाषांतर बघितल्यावर जिवात जीव आला!
बस Sintagama square वर पोहोचली. बस मधुन उतरलो तर समोर Sintagama square मध्ये एक वेगळेच द्रुष्य होते! आमच्या दोन्ही बाजुला छावण्या! डाविकडे पोलिसांच्या तर उजवीकडे निदर्शनकर्त्यांच्या. त्यात त्या पोलिसांच्या हातातील बंदुका बघुन तर डोके चालेनासे झाले.. मनाचा धीर करुन नकाशा उघडला आणि हॉस्टेल कडे जाण्याची वाट पकडली. १५ मिनिटांत हॉस्टेलवर पोचलो.. रुम फारच छान होती. युरोप मधे फिरताना मी हॉटेल पेक्षा हॉस्टेलाच जास्त प्राधान्य देतो. स्वच्छ खोल्या, किंमत अगदी वाजवी आणि मुख्य म्हणजे इतर देशांच्या लोकांबरोबर होणार्‍या ओळखी! तेवढीच आपली सांस्कृतीक देवाण घेवाण!! ;)
हॉस्टेल्च्या खिडकीतुन डोकावुन पाहिले तर रस्त्याच्या दुतर्फा संत्र्यांची झाडे, मस्त रसरशीत संत्री लागली होती. तोडायचा मोह आवरता घेतला आणि ठरल्या प्रमाणे मैत्रिणीला फोन लावुन तिला आमची अथेन्सला आल्याची वार्ता दिली. उन्हाळा प्रचंड असल्यामुळे पाणी पिउनच पोट भरले होते, तरी घरुन आणलेले मेथीचे ठेपले लसणाच्या झणझणीत चटणी बरोबर फस्त केले आणि हॉस्टेलच्या रिसेप्शनला पोचलो. आमच्या आधीच आमची मैत्रिण कोरिन तिच्या इस्रायिली मित्र 'यॉनी' ला घेउन हजर झाली होती.

s2
* हॉस्टेल समोरील संत्र्याची झाडे

सोनेरी कुरळे केस, हसरा चेहरा आणि बोलके डोळे असलेली हि Canadian मुलगी, जणु काही आमची फार जुनी ओळख असल्या प्रमाणे आमच्या बरोबर हसत खिदळत होती. त्या उलट यॉनी गंभीर आणि शांत स्वभावाचा वाटला.
कोरीन अथेन्स मधल्याच एका शाळेत लहान मुलांना इंग्रजी शिकवत आणि फावल्या वेळात Athens zoo मधल्या प्राण्यांची देखभाल करत, तर यॉनी Tel Aviv वरुन इथे कामा निमित्त स्थायिक झाला होता. दोघांची भेट इथलीच. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे, आमची लगेचच गट्टी जमली.
योनीच्या बोलण्यावरुन त्याला अथेन्सची खडांखडा माहिती असल्याचे जाणवले. त्याच्या म्हणण्या प्रमाणे, मग आम्ही अथेन्सचे “The New Acropolis Museume” बघायचे ठरवले. संग्रहालय, अ‍ॅक्रोपोलिसच्या अगदी पायथ्याशी आहे. तिथुनच अ‍ॅक्रोपोलिसची चढाई सुरु होते. संग्रहालयाच्या तिकिट काउंटर वर समजले कि आत कॅमेरा न्यायची परवानगी नाही, त्यामुळे नाखुशीनेच कॅमेरा लॉकर मधे ठेवुन आत गेलो. ग्रीसच्या हजारो वर्षांपुर्वीचा इतिहास तिथे होताच, त्याच बरोबर Egyptian संस्कृतीशी ओळख करुन देणार्‍या बर्‍याच गोष्टी होत्या. या संग्रहालयाचे वैशिष्ठ्य म्हणजे विजयाची प्रतिक असलेली देवी “The Nike”, “The Hippeis” (घोडस्वार) यांचे पुतळे आणि “slopes of the Acropolis”. अ‍ॅक्रोपोलिसचे उत्खनन करताना तिथे सापडलेली प्रत्येक गोष्ट ह्या संग्रहालयात ठेवली आहे. त्या व्यतरीक्त, संग्रहालयाचे बांधकाम करताना, जमिनीखाली सापडलेल्या जुन्या अथेन्सचा भाग पुर्ण पणे काचेने बंदिस्त करण्यात आला आहे. संग्रहालयाच्या viewing gallery मधुन आपण हे सर्व व्यवस्थित बघु शकतो. तेथीलच उपहारगॄहात थंडगार ग्रीक फ्रॅपेचा आनंद लुटला आणि निघालो Sintagama sqaure कडे.

dffd
* The New Acropolis Museume

sd
* ग्रीक फ्रॅपे

ग्रीक शब्द "Sintagama" याचा सरळ अर्थ "राज्यघटना". ३ सप्टेंबर १८४३, साली राजा ऑटोने मान्यता दिलेली ग्रीक राज्यघटना, म्हणजेच Sintagama. यावरुन यास हे नाव देण्यात आले आहे. square च्या चारी बाजुने पक्के रस्ते बांधण्यात आले आहेत. Sintagama चा पुर्व भाग हा पश्चिमभागा पेक्षा जास्त उंच असल्यामुळे, पश्चिमेकडे उअतरण्यास, पांढर्‍या मार्बलच्या पायर्‍या बांधल्या आहेत, ज्या उतरल्यावर आपण Sintagama मेट्रो स्टेशन समोर पोचतो, पण आज मात्र ह्या स्टेशन समोर निदर्शनकर्ते आणि पोलिस एकमेकां विरुद्ध उभे दिसत होते. मेट्रो स्टेशन कडे पाठ करत पायर्‍या वर चढुन आलात कि समोर दिसते ते "Tomb of the Unkonw Soildire" - (हुतात्मा स्मारक) आणि त्या मागे ग्रीक पार्लिमेंट ज्याला ग्रीक भाषेत "वोउली" म्हणतात. इथे दर तासाला "Change of Guards" चा कार्यक्रम पार पडतो.

fkh
* Sintagama square

klglj
* Sintagama square

ffgkh
* ग्रीक पार्लिमेंट

२ उंच पुरे guards, ज्यांना Evzones असे म्हटले जाते. तठस्थ पणे उभे, अंगात खाकी सदरा आनि पांढर्‍या रंगाची घट्ट विजार, डोक्यावर लाल रंगाची हॅट, हातात मोठ्याल्या बंदुका आणि पायात खास चामड्याचे, सोल खाली प्रत्येकी ६० खिळे ठोकलेले "tsarouchi". या बुटांच्या पुढच्या बाजुस काळ्या रंगाचे गोंडे लावुन सजवलेले असते. ह्यांनाच "ग्रीक पॉम पॉम्स" असेही म्हटले जाते. त्या नुसत्या बुटांचेच वजन १.५ किलो भरते!
असे हे २ बाजुने २ Evzones तालबद्ध हलचाली करत दर तासाला आपली जागा, दुसर्‍या २ नविन Evzones बरोबर बदलत असतात. हा कार्यक्रम दर तासाला अगदी नियमित पार पडत असतो.

kjsd
* Evzones

dkfj
* पॉम-पॉम शुज

Evizone हे ग्रीक सैन्यातिल सर्वात मानाचे सैनिक मानले जातात. एकदाका एखादा सैनिक Evizone झाला कि त्याला पुन्हा लढाईत भाग घ्यायची गरज भासत नाही. सरकार त्याला सर्व सुखसोयी आणि खास सोरंक्षण प्रदान करते. पुतळ्यां सारखे उभे राहणार्‍या Evizone चे रक्षण करण्यासाथी अजुन २ सैनिक त्या हुतात्मा स्मारकाजवळ बंदुका घेउन करड्या नजरेने प्रत्येक येणार्‍या जाणार्‍यांवर लक्ष ठेवुन असतात. आज त्यांचे खास लक्ष जीन्याच्या खालच्या बाजुला, हातात फलक घेउन, आरोळ्या ठोकत असलेल्या निदर्शकांकडे होते!

oeitu
* निदर्शनकर्ते

jkdfklil
* निदर्शनकर्ते

typo
* निदर्शनकर्ते

आमचा मित्र, यॉनिच्या म्हणण्या प्रमाणे मग कॅमेरा बाहेर काढला आणि जरा भितभितच फोटो काढायला सुरवात केली. जसा guards च्या पॉम-पॉमचा आवाज वाढु लागला, तसेच बरोबर विरुद्ध दिशेला निदर्शन कर्त्यांची अगम्य ग्रीक भाषेतील घोषणांचा आवाज चढु लागला. आम्ही आपले बरोबर कात्रीत सापडलो होतो. सुदैवाने काहिच झाले नाही. कार्यक्रम संपल्यावर आम्ही जवळच असलेल्या मिठाईच्या दुकानात शिरलो. भारतात जशी हलवायांची दुकाने असतात, तशीच अथेन्स मध्ये मिठाईची दुकाने रस्त्याला लागुन होती, लगेचच ग्रीक बकलावा वर ताव मारला. स्वादिष्ट आणि खुसखुषित असा बकलावा फस्त केल्यावर आमच्या मित्रांनी आम्चा निरोप घेतला ते उद्या संध्याकाळी त्यांच्या कडे जेवायचे निमंत्रण देउनच. आम्ही सुद्धा निमंत्रण उत्साहाने स्विकारले. जाता-जाता, यॉनिने सांगितले की, सरकारने निदर्शनकर्त्यां कडुन १ आठवड्याची मुदत मागितली आहे, या एका आठवड्यात त्यांच्या मागण्यांवर विचार होणार होता. सद्ध्या परिस्थिती "stale mate" प्रमाणे होती, म्हणुनच पार्लिमेंट समोरील जमाव शांत होता. नाहीतर आपण असे इथे फिरु शकलो नसतो. हे ऐकुन आमच्या जिवात जिव आला होता... कारण याचाच अर्थ असा, कि आता आमचा हा ग्रीक मधला आठवडा शांततेत जाणार होता!
रात्रीचे ९ वाजले होते. सहज रस्त्याने चालताना एका बस स्थानकाकडे नजर गेली. बस स्टॉपमागे, चारी बाजुनी बांधुन काढलेला मोठा खड्डा आणि त्यात उत्खननात सापडलेल्या जुन्या अथेन्स शहराचे अवशेश. ग्रीस मध्ये फिरताना असे भग्नावशेश जागोजागी आपल्या सोनेरी इतिहासाची आठवण लोकांना सतत करुन देत असतात.

kgjld
* मिठाईचे दुकान

gj
* बकलावा

jkfdh
* बसस्टॉप मागे सापडलेले भग्नावशेश

ऑलिम्पिकची सुरवात झाली ग्रीस मधुन आणि हे खेळ पहिले ज्या स्टेडियम वर खेळले गेले, ते ३२९ BC मध्ये बांधलेले " Panathinaiko" किंवा "Kallimarmaro" stadium. संपुर्णपणे पांढर्‍या मार्बलनि बांधलेले हे जगातील एकमेव स्टेडियम आहे. रात्रीच्या अंधारात, दिव्यांच्या प्रकाशात झळाळत असलेले हे स्टेडियम, फारच आकर्शक भासत होते, स्टेडियम वरुन मुख्य रस्त्याने पुढे चालत गेल्यावर नजरेस पडले ते "Arch of Hadrian" - मार्बलनि बांधलेला हा आर्क, रोमन राजा Hadrian ह्याच्या सन्मानार्थ १३२ AD मध्ये बांधण्यात आला. एके काळी रोमन साम्राज्याचा झालेला विस्तार, याची प्रचिती देणारा हा दरवाजा होता. त्याच्याच मागे होते ते, "Temple of Olympian Zeus" चे भग्नावशेश. तिसर्‍या शतकात ह्या मंदिराची पडझड झाली, तेव्हापासुन याचे भग्नावशेश जपण्याची पराकाश्ठा चालु आहे. हे मंदिर त्यामुळे फक्त बाहेरुनच बघता येते व लाइटिंग सुद्धा निट केली नसल्याने याचे रात्री फोटो काढणे अशक्य होते.

kdsjf
* Panathinaiko" / "Kallimarmaro" stadium

uoi
* Arch of Hadrian

फिरता फिरता वेळ कसा गेला समजलेच नाही, घडाळ्यात बघितले तर रात्रीचे १२:३० वाजुन गेले होते. प्रचंड भुक लागली होती, पण काळजी करायची काही गरज नव्हती. अथेन्स मधली हॉटेल रात्री २-३ वाजे पर्यंत उघडी असतात आणि ताजे जेवण सतत पुरवत असतात अशी माहिती आम्हाला आधीच आमच्या मित्रांकडुन मिळाली होती. पोटात कावळे कोकलु लागले, तशी आम्ही पावले उचलली आणि पोचलो ते हॉस्टेल जवळच असलेल्या एका रेस्टॉरंट मधे. बाहेर खुर्च्या टाकल्या होत्या. रात्री १ ला सुद्धा हॉटेल फुल्ल!!
थोड्याच वेळात मेजवाणी समोर हजर होती - मटण चॉप्स, फिश फ्राय, भात अणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा आईसक्रिम सोबत बकलावा. ग्रीस जेवणात देखिल भारतीय जेवणा प्रमाणे मसाल्यांचा उपयोग होते असल्याणे इथे खाण्याची चंगळ होणार, हे आम्ही पहिल्या दिवशीच ताडले होते!

oup
* मटण चॉप्स

grjhor
* फिश फ्राय

opiu
* आईसक्रिम सोबत बकलावा

जेवण संपवुन थेट हॉस्टेल गाठले. हॉस्टेल समोर उभे राहिलो आणि अ‍ॅक्रोपोलिस कडे पाहिले. विजेच्या प्रकाशात अ‍ॅक्रोपोलिस वरचे Parthenon खुणावत होते. उद्या सकाळी अ‍ॅक्रोपोलिस सर करायचे होते!
खोलित गेल्या गेल्या बिछाना गाठला आणि कधी झोपी गेलो समजले देखिल नाही...

uopip
* अ‍ॅक्रोपोलिस

क्रमशः

भाग ३

प्रतिक्रिया

रेवती's picture

5 Feb 2013 - 7:06 am | रेवती

सुरेख वर्णन आणि फोटू. बसस्टॉपमागे सापडलेले भग्नावशेष हे सुरक्षित कसे राहतात? बकलावा आवडत नसलेला मनुष्य विरळाच! आता मलाही ट्रेडर जोज् मध्ये जाऊन बकलावा आणावासा वाटतोय.

अनेकवेळा भग्नावशेष चोरी झल्यचे ऐक्ण्यात व वाचण्यात आले आहे..परंतु अता एथेन्समधे नविन म्युझियम बांधायला जागा उरली नाही असे सरकारचे म्हणने आहे..असो :)

श्रीरंग_जोशी's picture

5 Feb 2013 - 7:42 am | श्रीरंग_जोशी

अरे वा, छान लिहिले आहे व चित्रेही सुंदर आहेत.

ग्रीक जेवण पाहून माझे आवडते डायनोज ग्रीक रेस्टॉरंट आठवले.

पु. भा. प्र.

तिमा's picture

5 Feb 2013 - 11:47 am | तिमा

हा पदार्थ कधीच खाल्ला नाही. आता शोध घेण्यात येईल. फोटो फारच आवडले. तुमचा कॅमेरा भारी असला पाहिजे.

धन्यवाद... बकलावाची पाकॄ तुम्हाला येथे मिळेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2013 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

ग्रीस सहलीच्या यादीत आहेच... आता त्याचे वर्णन आणि फोटो ने होणारी ओळख मजेदार वाटली. बकलावा तर माझ्या आवडत्या गोड पदार्थांपैकी एक. आता आणायलाच लागेल :)

पुभाप्र.

मालोजीराव's picture

5 Feb 2013 - 2:26 pm | मालोजीराव

मटण चॉप्स,फिश फ्राय एकदम कल्ला ....कोणी याची ग्रीक स्टाईल पाक्रु टाकेल काय ?

आम्ही कोरीनला त्याची पाकॄ विचारली होती. तिने सांगितलेली पाकॄ अशी होती.

मटण चॉप्सला मिठ, काळि मिरी पावडर, बेसिल व लिंबु लावुन ४-५ तास marinate करतात. ४-५ तासांनी ते चॉप्स भाजले जातात. ते चॉप्स भाजायला तिच्यकडे एक वेगळे भांडे होते. मी पण ते पहिल्यांदाच बघितले होते. भांडे नसल्यास barbequee वर देखिल भाजु शकता.

५० फक्त's picture

5 Feb 2013 - 5:14 pm | ५० फक्त

पुढच्या ग्रीस भेटीत तसलं भांडं तुम्हाला भेट मिळो ही शुभेच्छा.

बाकी फोटो बिटो लई भारीच, जो माणुस लाळ गाळायला लावणा-या खाण्याच्या गोष्टींचे फोटो थेंब मध्ये न येउ देता काढु शकतो, त्याला बाकीचे फोटो नक्कीच भारी येणार.

तर्री's picture

5 Feb 2013 - 5:07 pm | तर्री

वर्णन आणि फोटो आवडले. लिहिण्याची शैलीही आवडली.
पु.भा.प्र.

ऋषिकेश's picture

5 Feb 2013 - 5:19 pm | ऋषिकेश

सुरेख

फोटो आणि लिहायची शैली आवडली.ग्रीसची ओळख आवडतेय.
निदर्शने कशाबद्दल होती? आर्थिक मंदीविषयी?

पुढ्चा भाग वाचत रहा. काहि प्रश्नांचि उत्तरे देण्याचा प्रय्त्न केला आहे..
हा भाग आवड्ल्याब्द्द्ल धन्यवाद :)

बॅटमॅन's picture

5 Feb 2013 - 6:22 pm | बॅटमॅन

व्वॉव, ओरेऽऑस!!!! पॉल्ला ओरेऽऑस!!!!!!एफ्खारिस्तॉ, कीरिऑस निशांत!!!!

(ग्रीसला कधी जायला मिळेल या विचाराने अं.ह. झालेला) बॅटमॅन.

हा भाग आवड्ल्याब्द्द्ल सग्ळ्यांचे धन्यवाद :)