दिवस चौथा:
* अथेन्स ते सँटोरिनी
सकाळी ४.३० लाच हॉस्टेल सोडले, टॅक्सीचा संप अजुन चालुच असल्यामुळे, मेट्रो स्टेशन गाठले. फलाटावर उभे राहुन पिराउसकडे जाणार्या मेट्रोची वाट पहात बसलो. इतक्या पहाटे देखिल प्रवाशांनी ते मेट्रो स्टेशन गजबजले होते, बहुतेक सर्व पिराउसकडे जाणार्या मेट्रोची वाट पहात होते. मेट्रो येताच फलाटावरची गर्दी डब्यात. आमच्या सारखेच सर्वांकडे बॅगा, कॅमेरे, ईत्यादि.. गर्दी जरी असली तरी त्याला एक शिस्त होती. कुठे धक्काबुक्की नाही कि कसला आरडाओरडा नाही. सर्व एकदम शिस्तीत. पिराउसस्थानक येताच गर्दी पांगली. आम्ही आमच्या “embarkement stop” वर पोहोचलो. समोर अवाढव्य जहाज. मुख्य दारावर २ जलसुंदर्या (विमानात हवाई सुंदर्या असतात तश्या ;) ). सर्व प्रवाशांचे स्वागत करायला सज्ज. त्यांच्या बरोबर टिकिट चेक करणारे सुटाबुटातले २ तरुण. हा झाला प्रवाशांसाठीचा एक दरवाजा. दुसर्या बाजुला जहाजाने व्हेल माशाप्रमाणे आपला मोठा जबडा उघडला होता आणि त्यात खेळण्यातल्या गाड्यांप्रमाणे, दुचाकी, चारचाकी, ATV, Quadbikes एकएक करुन आत चालल्या होत्या. आत प्रवेश करताच समोर येतो तो निमुळता जिना लाल कार्पेटनी सजवलेला, तो पार करताच समोर एक प्रसन्न चेहर्याची जलसुंदरी आपल्याला मार्ग दाखवायला उभीच. तिला टिकेट दाखवताच तिने आम्हाला आमच्या नियोजीत आसनाकडे जाण्याचा रस्ता दाखवला. आम्ही आंतरजालावरुन बुक केलेल्या या फेरी कंपनीचे नाव "ब्लु स्टार फेरी". आंतरजाला वरील माहिती नुसार या कंपनी बद्दल लोकांचे मत फार चांगले होते. त्यामुळे आम्ही पण ह्याच कंपनीला प्राधान्य दिले. निळ्या-पांढर्या रंगाची फेरी. यात प्रवाशांना लागणार्या सर्व सोयी उपलब्ध होत्या.
* फेरी
जवळच्या प्रवासासाठी (८ तासापर्यंत) एअर-सिट्स चांगल्या असे कुठे तरी वाचले होते, म्हणुन त्याच बुक केल्या होत्या. त्याच बरोबर - इकोनोमी, स्पेशल इकोनोमी, बिजनेस, केबिन स्विटचा देखिल पर्याय होताच!
"लाउंज बार" बरोबरच सर्व आसने जहाजाच्या मधल्या भागात. तर वरती होता तो "अप्पर डेक", "ओपन एयर बार" आणि "viewing gallery". पिराउस ते सँटोरिनी हे २३० किमीचे समुद्री अंतर पार करायला आमच्या जहाजाला एकुण साडे सात तास लागणार होते. तसेच ती सँटोरिनीला सरळ न जाता - 'पिराउस-पारोस-नाक्सोस-आयोस-सँटोरिनी' असा प्रवास करणार होती. सकाळी ८ च्या सुमारास जहाजानी पिराउस बंदर सोडले आणि आम्ही खिडकीतुनच अथेन्सला निरोप दिला, आता इथे परतायचे होते ते फक्त घरी जाताना, विमान पकडायच्या औपचारीकते पुरतेच.
जसजसे जहाज गती पकडु लागले तसतसे मन सँटोरिनीकडे धाव घेउ लागले. कॉलेजात असताना वाचलेल्या मीना प्रभुंच्या "ग्रीकायन" पुस्तकाची आठवण झाली. त्यात त्यांनी सँटोरिनीचे केलेले वर्णन मोहुन टाकणारे होते. काही तासातच मी त्या बेटावर पाउल ठेवणार होतो. मन जहाजाबरोबर उडणार्या समुद्रिपक्शांन प्रमाणे भरारी घेत होते, कधी ते परत मागे अथेन्स कडे झेप घेई तर कधी दुरवर दिसणार्या इवल्याश्या बेटाकडे!
समुद्री वारा, गडद निळे पाणी, अगदी चित्रार काढतो तसे, दुरवर दिसणारी लहान बेटे आणि जहाजाच्या वरच्या डेक वरुन या नजार्याला केमेर्यात टिपण्याची माझी चाललेलि केविलवाणि धडपड! संपुर्ण प्रवासात मला डेक वरुन खाली यायची अजिबात इच्छा झाली नाह!. युरोपात आणि भारतातही अनेक समुद्र पाहिले पण ग्रीसच्या ह्या एगियन समुद्राची निळाई काही औरच होती!
* Agean समुद्र
एगियन समुद्रात एकुण ६००० ग्रीक बेटं पसरली आहेत. एका लहानश्या खडका एवढ्या पासुन ते 'क्रेत' सारखे मोठाला भुभाग असलेले. समुद्रातुन वर आलेल्या प्रत्येक खडकाला बेट म्हणायची इथली प्रथा जरा चमत्कारीकच वाटली! पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली ७ बेटे म्हणजे - मायकोन्स, क्रेत, र्होड्स, कोर्फू, स्कियातोस, सामोस आणि सँटोरिनी.
काही वेळातच पारोस बेटाच्या किनार्यावर आमची फेरी लागली, लागोलाग पुन्हा एकदा आमच्या जहाजानी व्हेल माशाप्रमाणे आपला जबडा उघडला आणि प्रवासी आपल्या गाड्या चालवत फेरीतुन बाहेर पडु लागले. तसेच आता नविन प्रवासीही आत चढत होते.
* Upper deck
* Open air bar
'Upper deck' च्या 'Open air bar' मधेच आम्ही आमची सकाळची न्याहारी उकरुन घेतली. 'पारोस' बेटा पाठोपाठच 'नाक्सोस' आणि 'आयोस' हि येउन गेले. आता थोड्याच वेळात आम्ही सँटोरिनीला पोहोचणार होतो.
* Agean समुद्र
सामान हातात घेउन मुख्य दारावर आम्ही इतर सहप्रवाशां बरोबर उभे होतो. जहाजाचा दरवाजा उघडताच सर्व प्रथम वाहनांना बाहेर पडण्याची घोषणा झाली आणि मग त्या पाठोपाठ आम्ही सर्व प्रवाशांबरोबर बाहेर आलो आणि सँटोरिनीवर आमचे पहिले पाउल पडले...
अथेन्सच्या दक्षिणेस एगियन समुद्रातील सायक्लेड्स (Cyclades) समुहातील बेटांमधले सँटोरिनी, हे सर्वात मोठे बेट. याचे एकुण क्षेत्रफळ फक्त ७३ किमी! राजधानी - "फिरा". सँटोरिनीलाच स्थानिक भाषेत "थिरा" म्हटले जाते. ताम्रयुगात (Bronze age) झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात, एकेकाळी अखंड असलेले हे बेट, आता ४ भागात विभागले गेले आणि सँटोरिनीचे ३ छोटे भाऊ निर्माण झाले - थेरासिया, निया कामेनि आणि पालेया कामेनि.
फेरीतुन बाहेर पडताच आमची नजर आम्हाला हॉटेल मधुन घ्यायला आलेल्या टॅक्सी वाल्यावर पडली. सामान गाडीत ठेवुन आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेने. सँटोरिनी पुर्ण पणे ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलेले बेट आहे, त्यामुळे सर्वत्र दिसतो तो काळा दगड आणि सरळ समुद्रात उतरणारे उभे कडे. गाडी अवघड अशा वळणावळणाच्या घाट रस्त्यानी चालली होती. प्रत्येक वळण एक नविन दृश्य आमच्या समोर सादर करत होते.
मेसारीया भागातले आमचे हॉटेल, समोर बाग आणि मागे जलतरण तलाव आणि त्याकाठी दुपारचे ऊन खात बसलेले हॉटेल मधले गोरे पाहुणे. खोलीत जाऊन सामान टाकले आणि जराही वेळ न दडवता हॉटेलच्या बाहेर पडलो. हॉटेलच्या जवळच असलेल्या बस थांबावर राजधानी फिराला जाणार्या बसची वाट पाहत उभे राहिलो. सँटोरिनीमधे प्रवाशांकरीता खास आरामदायक अशा बसेसची सोय केली आहे. बसचे तिकिट अगदिच वाजवी दरात बस कंडक्टर कडुन घेता येते. खचाखच प्रवाशांनी भरलेली बस येताच आम्ही त्यात चढलो आणि खिडकितुन समुद्राची खारी हवा खात फिराकडे निघालो.
* फिरा
फिराच्या मुख्य बस स्थानकावरुन चालतच आम्ही ही छोटीशी राजधानी हुंदडायला सुरवात केली. अरुंद, निमुळत्या गल्ल्या, दोन्ही बाजुला गिर्हाइकांनी गजबजलेली निळ्या, पांढर्या, नारंगी, हिरव्या अशा गडद रंगानी रंगवलेली छोटी-छोटी दुकाने आणि हॉटेल. हॉटेलातुन येणारा ताज्या माश्यांचा वास (की सुंगध?? ;) ) आणि पोटात कोकलणारे काव़ळे! पटकन एका हॉटेलात शिरलो आणि त्याच्या गच्चीवर मांडलेल्या एका टेबलवर बसलो. समोर दिसत होता क्षितीजा पर्यंत पसरलेला निळा समुद्र आणि आजुबाजुच्या घरांचे रंगीबेरंगी दरवाजे आणि खिडक्या. कितीही फोटो काढले तरी ते कमीच!
वेटरला अगदी आपण उडपी हॉटेलमधे विचारतो त्या ढंगातच "आज स्पेशल काय?" (अर्थात इंग्रजीत ;) ) असे विचारले आणि तो पण मोठ्या उत्साहाने मेनु सांगत होता. त्यात त्याने सुचवलेले खास असे, लसणाची फोडणी दिलेले आणि ऑलिव्ह ऑईल मधे भिजवलेले, असे सुकवलेले टोमॅटो. सँटोरिनी स्पेशल - वाफवुन भाजलेले मटण चॉप्स, तळलेला कोडं मासा आणि सर्वात शेवटी गोड "कडाइफ". असे सगळे साग्रसंगीत ऑर्डर देउन आम्ही पुन्हा त्या शांत समुद्राला न्याहाळु लागलो. गच्चीतुन खाली पर्यटकांची रेलचेल दिसत होती. निरनिराळ्या धर्माचे, देशांचे, वर्णाचे लोक एकत्र एका छोट्याश्या बेटावर. जरी भाषा, संस्कृती भिन्न असल्या तरी इथे येण्याचे कारण मात्र सारखेच - धकाधकीच्या शहरी जीवना पासुन लांब, काही दिवस का होईना, स्वच्छ हवेत श्वास घेणे, मनमुराद आनंद लुटणे आणि अश्या ह्या एकाकी बेटावरच्या सुंदर क्षणांच्या आठवणी आयुष्यभरा साठी साठवणे!
* फिरा
समोर आलेले रसरशीत लालेलाल टोमॅटो बघुनच भुक दुणावली होती. चमच्या काट्याचा खडाखडा आवाज करत सगळे जेवण काही वेळातच फस्त! आमच्या खवय्येपणाला दाद देउन, वेटरने आणली, खास सँटोरिनी मधे बनवली जाणारी "Santorini sweet red wine". हिचा स्वाद इतका आवडला, कि हॉटेल मधुन बाहेर पडताच बाजुच्या दुकानातुन घरी न्यायल्या हिच्या २ बाटल्या विकत घेउन टाकल्या.
* Sundried tomato
* मटन चॉप्स
* Cod fish fry
* kadaif
* Sanotorini red wine
चढ-उतार असलेल्या, वळणदार फरसबंदी रस्त्यावरुन चालत पोहोचलो ते फिराच्या पश्चिमे कडील कड्यावर आणि... आमच्या समोर दिसणार्या दृश्याचे वर्णन शब्दात करणे कठीण होऊन बसले!
डावीकडे आम्ही पार करुन आलेलो फिरा, समुद्राकडे कलंडलेल्या सुर्यकिरणांनी न्हाउन निघाले होते. निळ्या रंगाचे आकाश, करड्या रंगाचा तिरका कडा आणि त्या वरती बांधलेली पांढर्या, पिवळ्या रंगाची घरे. जणु निसर्गाच्या कॅनव्हासवर ग्रीकांनी काढलेले एक सुंदर चित्रच!
सरळ खाली बघावे तर उभा कडा, निळ्या समुद्राला भिडलेला आणि त्या निळ्या समुद्रात तरंगणार्या वेगवेगळ्या आकाराच्या बोटी.
उजव्या बाजुला मान वर करुन पहावे, तर दिसत होते सँटोरिनी चे सर्वात लाडके (Oia) 'इया'. आत्ता पर्यंत टिव्ही, इंटरनेट, पोस्टकार्ड वर पाहिलेली पांढर्या आणि निळ्या रंगाचे घुमट असलेली पंचतारांकीत हॉटेल आणि घर! सँटोरिनीला जगातील सर्वात सुंदर बेट का म्हणत असावे याचे उत्तर आता हळुहळु सापडु लागले होते. आजचा सुर्यास्त आम्ही फिरा वरुनच बघायचे ठरवले.
आपल्या सोनेरी किरणांची उधळण करत सुर्यदेव हळुहळु विश्रामाला जात होते. आजचे त्यांचे कार्य त्यांनी नेहमी प्रमाणे चोख पार पाडले होते. बाजुलाच एक स्थानिक आपल्या गिटारच्या तारा छेडत बसला होता. स्वर्ग म्हणावा तर तो हाच! काही अनुभवांचे शब्दात वर्णन करणे कठिण होऊन बसते!
* डावीकडील Fira
* समुद्र
* Oia (इया)
* Oia (इया)
* गिटार वादक
सुर्य मावळतीला गेला तसे जड पावलांनी आम्ही माघारी परतलो आणि फिराच्या बस स्थानका जवळच असलेल्या हॉटेलात पुन्हा एकदा भाजलेल्या माश्यावर ताव मारला! हॉटेल मधे पोचताच दिवाणावर आडवा झालो आणि डोळे बंद करताच फिराचा सुर्यास्त पुन्हा एकदा, एखाद्या चित्रपटाप्रमाणे दिसु लागला. आजचा दिवस खासच ठरला होता. समुद्रातुन केलेला बोटीचा पहिला प्रवास आणि स्वप्नवत वाटणारा सुर्यास्त. उद्या हा स्वर्ग अजुन कोणते रंग दाखवतोय, याचा विचार करता-करता कधी झोप लागली समजले देखिल नाही...
* Fira चा सुर्यास्त
क्रमशः
प्रतिक्रिया
28 Feb 2013 - 5:09 am | सानिकास्वप्निल
आता ग्रीस बघणे आलेच :)
छान फोटो आणी माहीती
28 Feb 2013 - 2:54 pm | स्मिता.
प्रत्येक भागातल्या फोटोतून समुद्राची निळाई वेड लावते आहे.
28 Feb 2013 - 5:37 am | रेवती
ग्रेट, ग्रेट, आणि ग्रेट!
सुखद निळाई, उबदार सूर्य, पदार्थ, काय काय बघावे आणि कश्याचा आस्वाद घ्यावा हा प्रश्न पडलाय.
मांसाहारी पदार्थ तर समजले पण तुम्ही शाकाहारी काही खाल्लेत की नाही?
फोटूतील गोड पदार्थ हा आपल्याकडील सुतरफेणीची मावसबहिण वाटतो.
या चित्रांमधील बरीच चित्रे तुम्ही ग्रिटींग कार्ड म्हणून वापरू शकाल.
वर्णनही अगदी आवश्यक तेवढेच केलेत.
धन्यवाद!
28 Feb 2013 - 1:34 pm | nishant
नाही... सहसा आम्ही शाकाहारीच्या वाटेला जात नाही. खास करुन समुद्र किनारी असल्यावर ;) तरी मागच्या भागात ते वांगे खाल्ले होते. त्याचा फोटो टाकला होता. :D
28 Feb 2013 - 1:44 pm | Mrunalini
ते कडाइफ, साधारण बकलावा आणि सुतरफेणीच्या फ्युजन सारखे लागते ;) पाक्रु मात्र भारीच वेळ्खाउ असल्याने, कधि केलि नाही ;)
28 Feb 2013 - 7:46 pm | रेवती
हो, काही पदार्थ बाहेरच खायचे, सगळे घरी करत बसायचे नाही. ;)
28 Feb 2013 - 7:33 am | ५० फक्त
खुप छान फोटो आणि खुप छान आणि हवं तेवढंच वर्णन... धन्यवाद.
28 Feb 2013 - 9:42 am | यशोधरा
लैच भारी :)
28 Feb 2013 - 2:00 pm | बॅटमॅन
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!!!!!!!!!
28 Feb 2013 - 2:14 pm | अधिराज
मस्त फोटो आणि माहिती.
28 Feb 2013 - 4:04 pm | लॉरी टांगटूंगकर
शेवटचा फोटो प्रचन्ड कातिल,अन् बाकीचे पण अप्रतिम....
सुंदर चाललंय
1 Mar 2013 - 2:30 am | जुइ
फोटो खुप सुंदर आहेत!!
1 Mar 2013 - 3:31 am | nishant
@सानिकास्वप्निल, स्मिता, रेवती, ५० फक्त, यशोधरा, बॅटमॅन, अधिराज, मन्द्या, जुइ...
या भागातले प्रवास वर्णन आणि फोटो आवडल्याब्द्द्ल खुप-खुप धन्यवाद... :) तुमच्या comments वाचुन, पुढचा भाग लिहिताना मला देखिल अता आनंद होत आहे..
वाचत रहा.....
1 Mar 2013 - 4:06 am | शुचि
वा!!!! अप्रतिम.
सर्व भाग एकदम वाचून काढले. फार सुंदर वर्णन केले आहेत आपण.
2 Mar 2013 - 9:05 pm | nishant
धन्यवाद शुचि. :)
3 Mar 2013 - 12:37 pm | दिपक.कुवेत
काय फोटो आलेत रे! सुमुद्राची नीळाई खरच वेड लावतेय. तुझे भाग आणि प्रवासवर्णन वाचुन तिथे जायची आणि ते सगळ अनुभवयाची ईच्छा फार प्रबळ होतेय. आता पुढचे भाग जास्त लांबवु नकोस :)
3 Mar 2013 - 5:34 pm | nishant
ध्न्यवाद दिपक्.कुवेत :)
पुढ्चा भाग लवक्ररच टाकत आहे .. वाचत रहा ...