तुका म्हणे बरवे जाण...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
30 Jun 2008 - 7:36 pm

Get this widget | Track details | eSnips Social DNA

"लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा...!"

चिपळ्या-एकतारीच्या साथीने तुकोबा गात बसले आहेत. 'जगत्गुरू संत तुकाराम महाराज!' या पदवीला पोहोचलेले तुकोबा. ज्यांच्या ओव्या म्हणजे केवळ अमृतसंचय! ज्यांची एकेक ओवी अभ्यासताना आयुष्य कमी पडावं असे तुकोबा. ज्यांच्या ओव्यांवर भल्याभल्यांनी बी ए, एम ए, डॉक्टरेट करावी असे तुकोबा. पण एवढं होऊनदेखील शेवटी तुकोबा देवाकडे मागतात काय? तर लहानपण, बालपण!

आहाहा.. कुमारांनी किती हळवेपणाने हे गाणं गायलं आहे! कुमारांसारखा एक दिग्गज गवई, भल्याभल्यांनी ज्यांच्याकडून सूर शिकावा, लय शिकावी असे कुमार! कबीर-मिराबाई-सूरदासाची भजनं-विराण्या गाऊन लोकांना गाण्याच्या निर्गुणतेचे दर्शन घडवणारे कुमार! धनबसंती, सहेली तोडी, सोहनी-भटियार यासारख्या सकस निर्मिती करून श्रोत्यांना स्वत:च्या विलक्षण प्रतिभेने थक्क करून सोडणारे कुमार! परंतु हेच कुमार 'लहानपण देगा देवा..' किती हळवेपणाने गाताहेत पाहा. त्यांचा तो स्वर ऐकून असं वाटतं की कुमारांची गाण्यातली सगळी विद्वत्ता गळून पडली आहे आणि तेही तुकोबांसारखेच देवाकडे लहानपण मागताहेत. अगदी लहान होऊन! ही जादू आहे तुकोबांच्या शब्दांची!

वास्तविक देवाने तुकोबांना काय, कुमारांना काय, किंवा तुम्हाआम्हाला काय, बरंच काही दिलं आहे. यपुढेही देईल. नांव देईल, पैसा देईल, विद्वत्ता देईल, मानसन्मान देईल. पण बालपणीच्या त्या निरागसतेची सर कशालाच नाही. उद्या मी भले भारतभर, जगभर प्रवास करून एकापेक्षा एक अश्या उत्तमोत्तम पाकृ खाईन पण आईने ताटात कालवलेल्या वरणभाताच्या काऊच्या अन् चिऊच्या घासाची सर कशालाच नाही!

"ऐरावती रत्ब थोर
त्यासी अंकुशाचा मार!"

बोला, तुम्हाला काय परवडणार आहे? इंद्राच्या ऐरावतासारखा थाटमाट हवा आहे का तुम्हाला? :)

अहो काय तो ऐरावत अन् काय त्याच्या त्या अंबारीचा थाट! तुमचेआमचे तर डोळेच दिपतात. एखादा सार्वभौम राजा अंबारीत बसून रस्त्याच्या दुतर्फा माणिकमोती उधळीत चालला आहे हे वाक्य कसं वाटतं वाचायला? :)

हो, पण त्या ऐरावताच्या अंकुश्याच्या टोचणीचं काय? 'ती सहन करायची तयारी आहे का तुमची?' असंच तुकोबा विचारताहेत!

'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण!'

अंकुशाच्या टोचणीच्या त्या यातना किती समर्थ शब्दात तुकोबांनी मांडल्या आहेत!

आणि ऐरावताच्या अंकुशाचं रुपक वाचताना दुसराही एक अवांतर विचार मनात येतो की त्यांच्या नजरेला ऐरावताची ती झगमगती अंबारी दिसली नाही, तो अंकुश मात्र बरोब्बर दिसला. अहो साहजिकच आहे, साक्षात तुकोबांची दृष्टी ती! थोरल्या आबासाहेबांनी सोन्यानाण्याची अन् माणिकमोत्याची भरभरून ताटं पाठवली होती तेव्हादेखील माणिकमोत्यांचा तो चमचमाट त्यांना भुरळ घालू शकला नाही. 'हे आम्हास मृत्तिकेसमान..' असं म्हणून सगळा माल महाराजांकडे साभार परत!

तुम्हीआम्ही असतो तर 'हा सगळा माल कुठे लपवू', 'ह्यातलं कुणाला किती देऊ', सालं वील करून ठेवलंय ते आता बदललं पाहिजे!', 'ह्यातले काही दागिने बँकेच्या लॉकरात ठेवावेत की काय?', 'आयटीवाल्यांची धाड पडली तर कशी काय मांडवली करायची?' हाच सगळा विचार करत बसलो असतो. पण तुकोबांनी 'हे सर्व आम्हा विषसमान!' असं म्हणून पुढच्या सर्व संभावित प्रश्नांची क्षणात बोळवण केली होती! हां हां मंडळी, थांबा जरा, लगेच मनातल्या मनात मांडे रचायला लागू नका. महाराजांची सोन्यानाण्याच्या ताटांची ती ऑफर तुकोबांना होती, तुम्हाआम्हाला नाही! :)

असो, हे जरा काही अवांतर विचार झाले, फारसे सिरियसली घेऊ नका बरं! सोन्याचांदीचा भाव खाली येणारे म्हणे, खरेदी करायचा विचार करून ठेवा! :)

"तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानाहून लहान"

आहाहा! या ओळी ऐकतांना काय वाटतात हो! मन भरून येतं अगदी! 'बरवे जाण' मधील शुद्ध गंधारावरचा न्यास किती हळवा आहे! आणि हो, तसाही आमचा शुद्ध गंधार म्हणजे देखील अगदी बरवा सूर बरं का! अत्यंत शहाणा, चौकस परंतु तेवढाच हळवादेखील! :)

'जाण' या शब्दावरची कुमारांनी घेतलेली जागा ऐका. जीव एवढासा होतो!

'व्हावे ल्हानाहून ल्हान!'

खल्लास ओळ! तुकोबांना ल्हानाहून ल्हान व्हायची इच्छा आहे! हा थोर संतकवी किती साधं परंतु जिवाला चटका लावणारं लिहून गेला आहे! त्यांना नको आहे तो मोठेपणा, नको आहे ते जाणतेपण, काही काही नको आहे त्यांना! अहो तुकोबांनी देवाकडे तुमच्याआमच्या मनातलंच मागणं मागितलं आहे. अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं हे बडबडगीत, तो मऊ गुरगुट्या वरणभात, आज्जीने हातावर ठेवलेली बेसनाची वडी, सर्दीपडसं झाल्यावर सुंठ उगाळून त्याचा अंमळ कढत लेप नाका-कपाळावर थापणारी ती प्रेमळ आई!, आज्जी, आत्या, काकू, मावशी, आईने घेतलेला तो गोड पापा! हेच सगळं हवं आहे ना आपल्याला?

मंडळी, एखाद्या वरवर अगदी साध्या वाटणार्‍या गाण्यातदेखील काय विलक्षण ताकद असू शकते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. भलामोठ्ठा वाद्यवृंद नाही, रॉप-झाझ-पॉपचा थाट नाही, आयटम नंबरचा नागवेपणा नाही, की आमच्या दरबारी-मुलतानीचा रुबाब नाही! परंतु तरीही हे गाणं ऐकताना मन बेचैन होतं, हातातली सगळी कामं टाकून अगदी ऐकत रहावसं वाटतं, आणि मन पुन्हा एकदा आज्जीने दुधाच्या पातेल्यातील काढलेल्या सायसाखरेच्या खरवडीत बुडतं!

आणि आपण पुन्हा पुन्हा गुणगुणू लागतो,

लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतसंस्कृतीकवितावाङ्मयविचारआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

मानस's picture

30 Jun 2008 - 7:46 pm | मानस

तात्या,

खुप दिवसांनी कुमारजींचा हा अभंग ऐकला. मजा आया. क्या केहेने!!

महापूरे झाडे जाती ह्यात "जाती" खास कुमारजीच म्हणू शकतात.

जीव ओवाळून टाकावा. तूम्ही म्हण्टल्याप्रमाणे खरोखरच हातातली सगळी कामं बाजूला टाकली आणि ही चीज ऐकली.

धन्यवाद

प्राजु's picture

30 Jun 2008 - 7:50 pm | प्राजु

किती सुंदर रसग्रहण केलं आहे.
खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं आणि त्याच्या मधाळ रचनेमध्ये मी अडकून पडले.

अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं हे बडबडगीत, तो मऊ गुरगुट्या वरणभात, आज्जीने हातावर ठेवलेली बेसनाची वडी, सर्दीपडसं झाल्यावर सुंठ उगाळून त्याचा अंमळ कढत लेप नाका-कपाळावर थापणारी ती प्रेमळ आई!, आज्जी, आत्या, काकू, मावशी, आईने घेतलेला तो गोड पापा! हेच सगळं हवं आहे ना आपल्याला?

अगदी खरंय. माझ्या लेकाला पहाते तेव्हा असं वाटतं की आपलं बालपण खूप लवकर संपलं. त्याच्या खेळण्यात मी स्वतःचं बालपण शोधते.

हातातली सगळी कामं टाकून अगदी ऐकत रहावसं वाटतं, आणि मन पुन्हा एकदा आज्जीने दुधाच्या पातलेल्यातील काढलेल्या सायसाखरेच्या खरवडीत बुडतं!

या तुमच्या वाक्यावर जीव ओवाळून टाकावा वाटतो...(मला साय अजिबात आवडत नाही तरीही)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

30 Jun 2008 - 7:52 pm | छोटा डॉन

आजच माझ्या मनात एकंदरीत वारकरी संप्रदाय व तुकोबामाउली विषयी थोडी उर्मी दाटून आली होती ...
कालच "पालख्यांनी" पुणे सोडून पंढरीच्या दिशेने कुच केले व त्याच मुहुर्तावर तुमचा लेख आला ....

मस्त निरुपण केले आहे.
मला तर एकदम लहानपणाची आठवण आली. मी लहानपणी [ पंढरपुरी] असताना वारीच्या वेळी "विठ्ठलमय" झालेल्या "अवघ्या पंढरीत" किर्तनांची चांगलीच रेलचेल असायची. सारखे कानावर "विठुनाम" यायचे व रात्री हा "किर्तनांचा व प्रवचनाचा फड" रंगायचा. ते ऐकताना अगदी त्यात एकरुप होऊन जायचो ...
त्यात असेच "तुकोबा व माउलींच्या अभंगाचे निरुपण" केले असायचे व ते सांगणारे बाबा/महाराज अगदी सर्वसामान्यांच्या भाषेत त्याची उकल करायचे. आज अगदी तसेच वाटले तुमचा लेख वाचुन.

अजुन काही आवडणारे व भावणारे अभंग म्हणजे ...
" हेची दान देगा देवा,
तुझा विसर न व्हावा "

" याची साठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा ..."

कुठल्याही अभंगाच्या निरुपणानंतर किर्तनाच्या वेळी "टाळ व मॄदुंग" घेऊन उभारलेले "विठुभक्त" शेवटी जो सुरात व तालात "विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल" हा जयघोष करीत त्याची आठवण आल्यावर आत्तासुद्धा अंगावर काटा आला....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण's picture

30 Jun 2008 - 8:00 pm | मदनबाण

तात्यानु धन्यवाद,,,, हे गाणं ऐकत ऐकतच हा लेख वाचला फारच प्रसन्न वाटले..

(कुमार प्रेमी)
मदनबाण.....

प्रमोद देव's picture

30 Jun 2008 - 8:19 pm | प्रमोद देव

तात्या निरुपण आवडले. कुमार गंधर्व हे माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहेत;तरीही हे गाणे कुमारांनी गायलेलं मला कधीच आवडलेले नाही. इथे नेहमीचे कुमार गंधर्व न वाटता उगाचच 'कुमार'(बाल) वाटावे म्हणून त्यांनी जो चोरटा आवाज लावलाय तो कानाला खटकतो. गाण्यात तुकोबारायांचे अर्थपूर्ण शब्द आहेत म्हणूनच ऐकणे सुसह्य वाटते इतकेच.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jun 2008 - 8:33 pm | llपुण्याचे पेशवेll

अर्थातच मूळ अभंग पण छान आहे व आवडतो पण कुमारजींनी गायलेला हा अभंग देखील फार आवडतो.
माझ्या मते हे येथे तुकाराम महाराजाना अभिप्रेत लहानपण म्हणजे बालपण नव्हे तर अहंकार सोडणे आहे असे मला वाटते.
त्यात्याचा लेख उत्तम. कुमारजीनी गायलेले 'कोणा कशी कळावी' हे पण गाणे एकदम छान मला फार आवडते.

पुण्याचे पेशवे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2008 - 9:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या तुक्याचा कोणताही अभंग देहभान विसरायला लावणारा असाच आहे. आपले निरुपण आवडले मात्र कुमारांनी गायलेले आवडले नाही. ( संगीतातले काही कळत नाही म्हणुन तसे असेल, पण लैच धीम्या सुरात गाताहेत असे वाटते. संगिताच्या जाणकारांनो क्षमा करा , पण जे वाटले ते लिहिले. )

संत तुकारामांची रचना आणि श्रीनिवास खळ्यांचे स्वर...'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ......... चा आनंदही घ्याच.....इथे आमचे देहभान हरपते !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा's picture

1 Jul 2008 - 5:37 am | चित्रा

आमच्या तुक्याचा कोणताही अभंग देहभान विसरायला लावणारा असाच आहे.

असेच म्हणते.

तात्यांसाठी -
गाण्याच्या निरूपणात यावेळी गंधार आणि न्यास खेरीज जास्त माहिती नाही - असे का बरे?

संदीप चित्रे's picture

30 Jun 2008 - 9:15 pm | संदीप चित्रे

खूपच सुरेल रसग्रहण तात्या .. जियो !!
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------

यशोधरा's picture

30 Jun 2008 - 10:14 pm | यशोधरा

सहीच!! तात्या, अभंगाच्या दुव्याबद्दल खूप धन्यवाद.

नंदन's picture

1 Jul 2008 - 12:33 am | नंदन

लेख, अतिशय आवडला.

>>> किती हळवेपणाने गाताहेत पाहा. त्यांचा तो स्वर ऐकून असं वाटतं की कुमारांची गाण्यातली सगळी विद्वत्ता गळून पडली आहे आणि तेही तुकोबांसारखेच देवाकडे लहानपण मागताहेत. अगदी लहान होऊन! ही जादू आहे तुकोबांच्या शब्दांची!

-- सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

1 Jul 2008 - 1:50 am | बेसनलाडू

बालपण देगा देवा!
(बालक)बेसनलाडू

चतुरंग's picture

1 Jul 2008 - 1:29 am | चतुरंग

गाणंही छान म्हटले आहे. (हे रेकॉर्डिंग कुमारांच्या बर्‍याच आधीच्या काळातले आहे का? आवाज खूप तरुण वाटतोय.)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jul 2008 - 1:50 am | बिपिन कार्यकर्ते

उच्च....

कुमारजी आणि तात्या .... दोघेही....

बिपिन.

अरुण मनोहर's picture

1 Jul 2008 - 3:58 am | अरुण मनोहर

तुकोबा म्हणजे रसाळता. तुकोबा म्हणजे परम ज्ञान. असे विविध आयाम असणार्‍या तुकोबांच्या अभंगावर खूप सखोल निरूपण केले तात्या तुम्ही. मानलं तुम्हाला.

जरा ते विजेट कसे चिकटावयचे ते सांगाल का?

पिवळा डांबिस's picture

1 Jul 2008 - 4:06 am | पिवळा डांबिस

एकदम बेष्ट!!
आम्हाला कुमारांच्या अभंगापेक्षा तुमचं निरूपण जास्त आवडलं. कुमारांच्या या अभंगाबाबत आम्ही प्रमोदकाकांशी सहमत आहोत.

माझ्या मते हे येथे तुकाराम महाराजाना अभिप्रेत लहानपण म्हणजे बालपण नव्हे तर अहंकार सोडणे आहे असे मला वाटते.
सहमत! इथे लहानपण म्हणजे शारिरीक अवस्था नसून अंगी लहानपण, स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती अभिप्रेत असावी असेच मलाही वाटते.

तात्याराव, या सरपंचगिरीच्या लफड्यात तुमच्यातला लेखक हरवत चाललाय की काय असं वाटायला लागलं होत....
आम्हाला बुवा लेखक तात्याच जास्त आवडतो!!!
स्पष्टोक्तिबद्द्ल क्षमस्व!

सहज's picture

1 Jul 2008 - 6:12 am | सहज

गाणे व लेख केवळ अगग!!

तात्यानी वर लिहल्याप्रमाणे, हे गाणे म्हणजे साजुक तुपातील शीरा व रसग्रहण हे तात्याचे आपल्याला ममतेने भरवणे. अक्षरशः एकेक वाक्य घेउन खरच मस्त भरवले.

अवांतर - कुमारांचा आवाज नेहमीपेक्षा जास्त कोमल वाटतोय का? तुकारामांना अपेक्षीत भक्तीरस ओतप्रोत भरल्यासारखे?

मुक्तसुनीत's picture

1 Jul 2008 - 6:31 am | मुक्तसुनीत

काय तात्या, तुम्ही जितक्या मार्मिकतेने लिहीलेय तितके मिपाकरांनी रसिकतेने वाचून , विचक्षणपणे प्रश्नसुद्धा विचारलेत की नाही ! :-)

धनंजय's picture

1 Jul 2008 - 6:57 am | धनंजय

अभंग तर फारच अर्थपूर्ण आहे.
प्रथम ऐकताना प्रमोदकाकांसारखेच वाटले - की हा एका प्रकारे लहान मुलाचा आवाज आहे. पण कुमार गंधर्वांनी मार्दवासाठी तसा आवाज मुद्दामून लावला असेल.
"ल्हानाहून ल्हान" असे म्हटल्यामुळे मात्र वयाचे लहानपण आणि त्याची गोडी जास्त अधोरेखित होते. (काळ्यावर पांढरे शब्द वाचताना अहंभाव लहान करावा हा अर्थ जास्त जाणवतो.) चाल मधुर आहे. ऐकून छान वाटले.

सुचेल तसं's picture

1 Jul 2008 - 8:53 am | सुचेल तसं

तात्या,

खुप छान लिहिले आहे. विशेषत: मला लेखातील खालील वाक्य फार सुंदर वाटले.

उद्या मी भले भारतभर, जगभर प्रवास करून एकापेक्षा एक अश्या उत्तमोत्तम पाकृ खाईन पण आईने ताटात कालवलेल्या वरणभाताच्या काऊच्या अन् चिऊच्या घासाची सर कशालाच नाही!

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!!

http://sucheltas.blogspot.com

अमोल केळकर's picture

1 Jul 2008 - 9:16 am | अमोल केळकर

वाचनाचा आनंद घेत आहे.
बस ! आणखी काही लिहु शकत नाही

धोंडोपंत's picture

1 Jul 2008 - 9:42 am | धोंडोपंत

वा वा तात्या,

सुंदर लेख आणि अभंग यांचा अजोड मिलाफ.

फार छान लिहिले आहे. आणि गाण तर काय? लाजवाब.

तुका आकाशाएवढा| हे खरेच.

आपला,
(वारकरी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

साती's picture

1 Jul 2008 - 1:51 pm | साती

सुंदर लेख आणि अभंग यांचा अजोड मिलाफ.

साती

अविनाश ओगले's picture

1 Jul 2008 - 8:20 pm | अविनाश ओगले

हे लईच भारी... आता उड जायेगा हंस अकेला ऐकवा आणि त्याबद्दल ही काही लिहा.

लिखाळ's picture

1 Jul 2008 - 8:36 pm | लिखाळ

वा तात्या ! छान लेख आणि छान गाण्याची आठवण.
मी हे गाणे वारंवार ऐकत असतो. मला कुमारांचा आवाज फार आवडतो. आणि या गाण्याला ठेका फारच उत्तम आहे. सुरुवातीचा तबला एकताच मन त्यात अडकून पडते.

अवांतर : यातील लहानपण हे वयाचे नसून वृत्तीचे असावे या मताशी सहमत आहे.
-- लिखाळ.

हेरंब's picture

1 Jul 2008 - 10:23 pm | हेरंब

वा, तात्या, लेख सुंदर.

विसोबा खेचर's picture

3 Jul 2008 - 6:08 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे मनापासून आभार...

छोटा डॉन,

" याची साठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा ..."

कालनिर्णयकार जयंत साळगावकरांच्या घरी एकदा अण्णांच्या गाण्याचे मैफल होती तेव्हा मी अण्णांना हा अभंग म्हणायची विनंतीवजा फर्माईश केली होती. अण्णांनी कुठलेही आढेवेढे न घेता माझी फर्माईश मान्य केली आणि अतिशय सुरेख गायले. अगदी रंगून, देहभान हरपून अण्णांनी हा अभंग गायला होता त्याची आठवण आजही ताजी आहे. साक्षात विठोबाही तेथे अवतरला असेल आणि त्यानेही अगदी तल्लीनतेने कर कटावरी ठेवून अण्णांचं ते गाणं ऐकलं असेल!

गणपती उत्सवातली ही घटना. गणपतीच्या दिवसात साळगावकरांकडच्या गणपतीत त्यांच्या घरी अण्णांचं गाणं हा गेला कित्येक वर्षांचा पायंडा! त्यामुळे दरवर्षी गणपतीत आम्हालाही मेजवानी! गणपती आले की आम्ही दरवर्षी अण्णांना फोन करायचा आणि "अण्णा, साळगावकरांकडे गाण्याला येतो आहे!" असं म्हणायचं. त्यावर अण्णाचंही, "अरे ये ये. अगदी अवश्य ये" हे ठरलेलं उत्तर! :)

गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र अण्णांची प्रकृती बरी नसल्यामुळे यात खंड पडला आहे! असो..

देवकाका,

इथे नेहमीचे कुमार गंधर्व न वाटता उगाचच 'कुमार'(बाल) वाटावे म्हणून त्यांनी जो चोरटा आवाज लावलाय तो कानाला खटकतो.

आपल्याला कुमारांचा त्या गाण्यातील आवज आवडला नसेल हे मान्य, परंतु कृपया त्याला 'चोरटा आवाज' असं म्हणू नका, ते माझ्या मते योग्य होणार नाही!

व्हॉईस मॉड्युलेशन या विषयावर प्रभूत्व असलेला कुमारांसारखा गवई चोरटा आवाज लावेल असं वाटत नाही! व्हॉईस कल्चरच्या परिभाषेत याला काही वेळा फॉल्स व्हॉईस असंही म्हटलं जातं. परंतु इथे फॉल्स व्हॉईसचा अर्थ 'चोरटा आवाज' असा नव्हे हे लक्षात घ्या. फॉल्स व्हॉईस लावण्याकरता स्वरांची अन् श्रुतींची बरीच जाण लागते, जी कुमारांकडे होती. चोरटा आवाज हा गाण्यातला चक्क दोष मानला गेलेला आहे आणि तो बरोबर आहे!

किराणा गायकीतले रहिमतखासाहेब, अब्दुल करीमखासाहेब या मंड़ळींचीदेखील फॉल्स व्हॉईस वर खूप प्रभूत्व होते. कुमारांचा अर्थातच किराणा गायकीचा बराच अभ्यास असल्यामुळे, तसेच स्वरांवर, श्रुतींवर प्तभूत्व असल्यामुळे कुमारांनी या गाण्यात अगदी जाणीवपूर्वक फॉल्स व्हॉईसचा उपयोग केला आहे, ही गोष्ट मला तरी खूप प्रशंसनीय वाटते!

असो, तरीही कुमारांनी चोरटा आवाज लावलाय असंच जर तुम्हाला म्हणायचं असेल तर त्याचा मी आदर करतो. प्रत्येकाची मतं!

पुण्याचे पेशवे,

माझ्या मते हे येथे तुकाराम महाराजाना अभिप्रेत लहानपण म्हणजे बालपण नव्हे तर अहंकार सोडणे आहे असे मला वाटते.

शक्य आहे. तुकोबांच्या अभंगाला अनेक पैलू असतात. मला मात्र त्या अभंगातले लहानपण, बालपणच अधिक दिसले.

चित्रा,

गाण्याच्या निरूपणात यावेळी गंधार आणि न्यास खेरीज जास्त माहिती नाही - असे का बरे?

खास असं कारण नाही, परंतु त्या बाबतीत मुद्दामूनच थोडे कमी लिहिले. असो, आता लवकरच या गाण्याच्या सांगितिक बाजूवरदेखील इथेच वेगळा प्रतिसाद टाकून लिहिण्याचा प्रयत्न करेन! :)

डांबिसराव,

सहमत! इथे लहानपण म्हणजे शारिरीक अवस्था नसून अंगी लहानपण, स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती अभिप्रेत असावी असेच मलाही वाटते.

हम्म! मला मात्र त्यात काऊचिऊवालं बालपणंच अधिक दिसलं! असो, प्रत्येकाची इंटरप्रिटेशन्स वेगळी!

तात्याराव, या सरपंचगिरीच्या लफड्यात तुमच्यातला लेखक हरवत चाललाय की काय असं वाटायला लागलं होत....

अरे नाही रे, अजून तरी तात्यातल्या लेखकाला जपायचा प्रयत्न मी करतो आहे! :)

आम्हाला बुवा लेखक तात्याच जास्त आवडतो!!!

धन्यवाद रे डांबिसा! :)
पण काय करणार, आता संस्थळ काढलंय त्यामुळे मध्येमध्ये थोडीशी सरपंचगिरीही करावी लागते रे! :)

मुक्तराव,

काय तात्या, तुम्ही जितक्या मार्मिकतेने लिहीलेय तितके मिपाकरांनी रसिकतेने वाचून , विचक्षणपणे प्रश्नसुद्धा विचारलेत की नाही !

खरं आहे रे बाबा! मिपावाल्यांसमोर खूप सांभाळून लिहावे लागते! :)

धन्याशेठ,

पण कुमार गंधर्वांनी मार्दवासाठी तसा आवाज मुद्दामून लावला असेल.

अगदी सहमत आहे...

"ल्हानाहून ल्हान" असे म्हटल्यामुळे मात्र वयाचे लहानपण आणि त्याची गोडी जास्त अधोरेखित होते.

मलाही ह्याच अर्थाने हा अभंग दिसला!

ओगलेसाहेब,

हे लईच भारी... आता उड जायेगा हंस अकेला ऐकवा आणि त्याबद्दल ही काही लिहा

कधितरी नक्की प्रयत्न करीन. पण मूड लागायला हवा, ह्या अभंगाची तार लागायला हवी तरच ते जमेल. जबर्‍या आहे हे निर्गुणीभजन!

असो, आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे पुनश्च एकदा आभार....

आपला,
(तुकोबाप्रेमी) तात्या.