“काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.
“ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्यावर आणत.
“हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला. सहस्त्रकातील सर्वात वाईट घटना असेच म्हणावे लागेल.”, घारुअण्णा एकदम सुतकी चेहेर्याने.
“घारुअण्णा, तुमच्या भावना समजताहेत, अतिशय वाईट घटना, शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठीसुद्धा!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.
“चला, ह्या निमित्ताने तरी घारुअण्णा आणि बहुजनह्रदयसम्राटांचे एकमत झाले! मला वाटले आता 'सहस्त्रकातील सर्वात वाईट घटना' वरून जुंपते की काय... खीs खीss खीsss”, नारुतात्या पांचट विनोद करत.
“नारुतात्या, तुम्हाला कसला पोचच नाही, कुठे काय बरळावे ह्याचा काही अंदाज?”, इति चिंतोपंत.
असो, आम्ही गेलो होतो फिरायला पण तो दिवस हॉटेलातच बसून काढला, अंत्यदर्शनासाठी जमलेली गर्दी बघून आपली तर छातीच दडपून गेली ब्वॉ.”, घारुअण्णा एकदम भावुक होत.
“हो! २० लाख लोक जमले होते म्हणे शिवाजी पार्कात. साहेबांचा हिंदूहृदयसम्राट असण्याचा ह्याहून भरभक्कम पुरावा तो काय असेल दुसरा”, इति चिंतोपंत.
“अहो चिंतोपंत, तो २० लाख म्हणे उगाच फुगवलेला आकडा आहे. एवढी माणसे जमायला तिथे जागाच नाहीयेय म्हणे”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.
“बरंsssबरंsss, तुमच्या सकाळ समूहानेच लावला असेल हा असला जावईशोध, नाही का?”, घारुअण्णा रागाने.
“घारुअण्णा, तुम्हाला असे बोलवतेच हो कसे? त्या २० लाखाच्या आकड्यांवर बर्याच जणांचा आक्षेप आहे इतकेच मला म्हणायचे होते.”, इति बारामतीकर.
“अहो, आकडा कसा काय महत्त्वाचा असेल? तो अंत्यविधीसाठी आपणहून जमलेला जमाव होता, कोणाचे शक्तिप्रदर्शन नव्हते आकड्यात मोजायला.”, घारुअण्णा रागाने लाल होत.
“जाऊ द्या हो घारुअण्णा, ह्याचा इश्यू करून काही फायदा नाहीयेय. सोडून द्या, २० लाख काय किंवा २ लाख काय, संपूर्ण अंत्ययात्रा आणि अंत्यविधी शांततेत पार पडला हे महत्त्वाचे!”, इति भुजबळकाका.
“अहो, मला कुठे इश्यू करायचाय ह्याचा, ह्या सेक्युलरवाद्यांचेच हे नेहमीचे अवलक्षण असते.”, घारुअण्णा रागात घुमसत.
“तो २० लाखांचा आकडा जाऊद्या, पण बाळासाहेबांचे स्मारक तर शिवाजी पार्कात व्हायलाच हवे! त्यावरही काही सेक्युलरवाद्यांचा आक्षेप आहे, आता बोला ”, चिंतोपंत.
“भले शाबास! हिंदूंसाठी ह्या भारतात काहीही करायचे झाले तर प्रत्येक वेळी ह्यांची परवानगी मागायची, हे म्हणजे हिंदू अस्मितेवर हल्ला आहे! हे होणे नाही! हम स्मारक वहीं बनायेंगे!”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.
“अहो घारुअण्णा का उगाच 'हिंदूंवर अन्याय' हा प्रपोगंडा करताय, शिवाजी पार्क खेळाचे मैदान आहे. तिथे कसले स्मारक उभारताय?”, भुजबळकाका शांतपणे.
“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, ज्या शिवतीर्थावर या महानेत्यानं साडेचार दशकं अधिराज्य गाजवलं, ज्या ठिकाणी चिरनिद्रा घेतली, त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभे राहणे उचित आहे.”, चिंतोपंत जरा तडकून.
“मान्य, बाळासाहेब हे देशातील एक महान नेते होते त्यामुळे त्यांचं स्मारक उभारायलाच हवं. या भावनेशी मी असहमत नाही. फक्त, शिवाजी पार्क मैदानात हे स्मारक बांधणं योग्य होणार नाही.”, भुजबळकाका ठामपणे .
“बरं मग, इंदू मिलच्या जागेवर हे स्मारक बांधण्यावर आपले काय मत आहे बहुजनह्रदयसम्राट?”, घारुअण्णा घुश्शात.
“त्यापेक्षा, कोहिनूर मिलच्या जागेवर हे स्मारक बांधले तर?”, नारुतात्या काडी सारत.
“इथे तर मराठी माणसालाच काही पडले नाहीयेय तर बाकीच्यांना दोष देऊन काय उपयोग?”, घारुअण्णा हताश होत.
“अहो डोंबलाचे मराठी माणसाचे मत! भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच!”, भुजबळकाका ठामपणे.
“अहो भुजबळकाका, मनोहरपंत जोशीसरांनीसुद्धा स्मारक शिवाजी पार्कात व्हायला हवे असेच म्हटले आहे.”, चिंतोपंत.
“नाही चिंतोपंत, त्यांना तसे बोलायला काय जातेय? तसेही जोशीसरांचे राजकारण राजकारण खेळून झाले असले तरीही, पीळ काही जात नाही हेच खरे आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.
“हो, अहो आचरटपणा आहे हा सगळा. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार करण्याची मागणी आधीच झाली आहे आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुन्हा इंदू मिलचे नाव सुचवणे हा शुद्ध आचरटपणा आहे. त्यानंतर कोहिनूर मिलच्या जागेचे नाव निघताच जोशीसर कासावीस झाले आहेत आणि त्यामुळेच शिवाजी पार्काचा त्यांनी हट्ट धरला आहे. वेळ आल्यास शिवसैनिकांनी कायदा हातात घ्यावा असेही त्यांनी सुचवले आहे.”, सोकाजीनाना कठोर चेहेर्याने.
“सोकाजीनाना, ह्यातही राजकारण?”, नारुतात्या बुचकळ्यात पडून.
“तर काय! हे सगळे गलिच्छ राजकारण आहे. जोशीसरांकडून ह्यावेळी तरी ही अपेक्षा नव्हती.”, सोकाजीनाना काहीसे हळवे होत.
“अहो, 'शिवसेनाप्रमुख हे सच्चे क्रीडाप्रेमी होते. त्यामुळे मैदानांवर खेळणारी पावले थांबवून, खेळाचा श्वास कोंडून तिथे आपले स्मारक उभारणे, हे बाळासाहेबांनाही पटले नसते' असे मत मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत यांनी व्यक्त केले आहे. स्मारक बांधण्याबद्दल काही हरकत नाही हो कोणाची. पण त्यातही राजकारण केले जावे ह्यात खुद्द बाळासाहेबांचा अवमान आहे हेही लक्षात घेत नाहीयेय कोणी.”, सोकाजीनाना शांतपणे, “शिवसेना भवन किंवा बाळासाहेबांचे घर, निवासस्थान, ह्या दोन्ही वास्तू बाळासाहेबांचे स्मारक म्हणून उचित स्थानं असू शकतात. ह्या दोन्ही जागांचे पावित्र्य आणि स्थानमाहात्म्य तेवढे थोर नक्कीच आहे. बाळासाहेबांच्या हस्तस्पर्शाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या वास्तू खरेतर त्यांची अस्तित्वात असलेली स्मारकेच आहेत. ही दोन्ही ठिकाणे शिवसैनिकांना आणि मराठी तरुणांना नेहमीच स्फूर्ती देत राहतील ह्यात कोणाला शंका असण्याचे काही कारणच नाही. त्यामुळे नवीनं जागा शोधून त्यावर स्मारक बांधण्याचे राजकारण करत बसण्यापेक्षा ते स्मारक नेमके कसे असावे त्याचे स्वरूप कसे असावे ह्याबद्दल चर्चा केली जाणे महत्त्वाचे आहे.”
“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.
सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.
प्रतिक्रिया
29 Nov 2012 - 6:24 pm | वपाडाव
सोत्रि, फुल्लटॉस एकदम!
29 Nov 2012 - 6:29 pm | अमित
उद्धव ठाकरेंनीच आता हस्तक्षेप करावा
29 Nov 2012 - 7:24 pm | प्रकाश घाटपांडे
गप्पांचे शेवटी चहाचे ऐवजी दुसरे पेय सुचले नाही का?
30 Nov 2012 - 4:54 am | स्पंदना
चहा का नको?
2 Dec 2012 - 11:07 pm | आनंदी गोपाळ
पालक सूप?
गोमूत्र?
गव्हांकुरांचा रस?
वारेवा! त्यांना दुसरे पेय हवे आहे. चहाचाच आग्रह का?
29 Nov 2012 - 9:15 pm | माम्लेदारचा पन्खा
शिवसेनेचं कसं काय होणार आहे ते देवच जाणे......
दिशाहीन वक्तव्य करतायत सगळे.....
त्या क्यामेरयान सगळी वाट लावली...फोटो काढा आता एकेकाचे...
29 Nov 2012 - 9:20 pm | पैसा
सोकाजीनानांची जोरदार फटकेबाजी!
29 Nov 2012 - 9:50 pm | शिद
पटले बरं...आवडेश.
29 Nov 2012 - 11:43 pm | अभ्या..
स्मारक कसे असावे अशी स्पर्धा घेण्यात येईल.
विजेत्यांचा बक्षीस समारंभ पार पड्ल्यानंतर शिवसैनिकांच्या मनाने हवे तसे स्मारक उभारण्यात येईल.
या उप्पर चर्चा नाही.
जय हिंद जय महाराष्ट्र
30 Nov 2012 - 1:48 am | पिवळा डांबिस
सोकाजीनाना कठोर चेहेर्याने जेंव्हा बोलतात तेंव्हा अगदी लाख मुद्द्याचं बोलतात हो!!!
माजी लोकसभापतीनीच लोकांना कायदा हातात घ्यायला सुचवण्यासारखा लोकशाहीचा दुसरा दैवदुर्विलास नाही!!!
म्हणजे बघा, भडकू म्हणून लेबल लावले गेलेले लाखो शिवसैनिक बाळासाहेबांचं अंत्यदर्शन घेऊन अश्रूभरल्या डोळ्यांनी का होईना पण चुपचाप काही दंगा न करता आपापल्या घरी गेले. आणि हे आता बघा काय बोलतायत!!
ते "वन बी" लिहिलं ते काय जाळायचंय?
30 Nov 2012 - 4:55 am | स्पंदना
हळु हळु तुमच्या चावडीची चटक लागायला लागली हं सोकाजीनाना.
30 Nov 2012 - 12:37 pm | स्पा
+१
30 Nov 2012 - 1:25 pm | मूकवाचक
+१
30 Nov 2012 - 11:38 pm | जेनी...
+२
30 Nov 2012 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोकाजीनानाचं मत पटलं. बाकी, चावडी फेमस व्हायला लागली बरं का सोकाजीनाना...!
-दिलीप बिरुटे
30 Nov 2012 - 11:57 am | बॅटमॅन
सोकाजींशी सहमत-नेहमीप्रमाणेच. चावडी आता फेमस होऊ लागलीये आणि त्यामुळे एक विनंतीवजा सूचना अशी की दिवाळी अंकात या घारुअण्णा, बारामतीकर, इ.इ. ची जी चित्रे काढलेली होती, ती इथे अधूनमधून लावल्यास अजून मजा़ येईल वाचायला, काय म्हणता सोत्रिअण्णा?
30 Nov 2012 - 12:26 pm | हंस
बॅटमॅनशी सहमत!
30 Nov 2012 - 7:23 pm | सोत्रि
बॅटमॅन,
विनंतीवजा सूचनेची अंमलबजावणी केली आहे :)
- (आज्ञाधारक) सोकाजी
30 Nov 2012 - 7:37 pm | अभ्या..
आता कशी शोभुन दिसतायत सगळी मंडळी.
सोत्रीनाना ब्येस्ट ब्येस्ट.
(पैजेचा विडा पूर्ण करणारा) अभिजीत ;)
30 Nov 2012 - 11:41 pm | जेनी...
सोकुनाना .....च्या ला माझा भी दुजोरा :D
(पैजेच्या विड्यात भागिदारी करणारी) पूजा ;)
1 Dec 2012 - 1:43 am | बॅटमॅन
वा वा वा वा आक्षी ब्येस दिसायला लागली बरं चावडी सोत्रिअण्णा!!!!!!!!
(इणंतीला मान देऊन बदल केल्याबद्दल पुर्ता आभारी) बॅटमॅन.
30 Nov 2012 - 12:03 pm | सुहास..
चावडी मस्तच
30 Nov 2012 - 1:50 pm | मन१
चावडी भारिच.
बाकी, "दादर" चं "ठाकरेनगर" करा म्हणावं. शिवाय स्मारकापेक्षा दहापट मोठ्या जागेवर भावनिक मालकी स्थापित होइल ठाकरेभक्तांची ते वेगळच.
खरं तर "मुंबई"चच ठाकरेनगर करा म्हणणार होतो, पण म्हटलं अजून लायनीत बरेच येतील मग भांडायला, पारशांपासून सगळे. शिवाजी पार्क चं ठाकरेपार्क करा म्हणणार होतो, पण साला सध्याचं नाव हेच दैवताच्या दैवताचं असल्यानं खुद्द दैवताला ते बदलणं आवडणार नै. दादरमध्ये मात्र असली काही कॉम्पिटिशनच नाही.
हा का ना का. स्वस्त , मस्त अभिनव उपाय वाप्रा की जरा.
शिष्यवृत्त्या , लायब्रर्या सुरु करणं कसं डाउनमार्केट वाटतं. कै धाक , वट (किंवा सौम्य भाषेत "आदर") दिसायला नको?
30 Nov 2012 - 1:58 pm | बॅटमॅन
+११११११११
1 Dec 2012 - 5:33 pm | इरसाल
+ १, २ , ३ पण
2 Dec 2012 - 11:32 pm | प्रास
अहो मन्राव, तुमचं आपलं कै तरीच.
असं म्हणताय खरं पण जरा अभ्यास कमी पडलाय तुमचा. पूर्वी अनेकदा दादरचं नामांतर 'चैत्यभूमी' करण्याचा घाट घातला गेलाय. सध्याच काय ते प्रकरण थंडावलंय. ठाकरे नगर करण्याच्या नादात ते पुन्हा उकरलं जाण्याची शक्यताच जास्त आहे. तेव्हा ते दादरचं नामांतराचं विसरा पाहू चट्कन्.....
30 Nov 2012 - 3:55 pm | सुखी
मस्त......
30 Nov 2012 - 7:33 pm | स्मिता.
नेहमीप्रमाणेच सर्वविचारसमावेशक आणि मस्त!
30 Nov 2012 - 7:58 pm | मदनबाण
गप्पा आवडेश ! :)
1 Dec 2012 - 1:01 am | निनाद मुक्काम प...
चावडीचा फोटो आवडला.
आणि चर्चा सुद्धा
आजकाल सोकाजींची चावडी हा आभसी जगतातील नामवंत ब्र्यांड होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.
1 Dec 2012 - 6:46 am | किसन शिंदे
योग्यवेळी योग्य मुद्यावर योग्य तेच बोलण्यात सोकाजीनाना लै पटाईत हैत. ;)
(सोकाजीच्या चावडीचा पंखा) किसन
1 Dec 2012 - 5:35 pm | इरसाल
ये फटु डालके तुमने तो भारीच काम कर डाल्या सोकाजीराव.
मस्त एकदम
3 Dec 2012 - 10:53 am | परिकथेतील राजकुमार
ही तर सुरुवात आहे. बाळासाहेबांचे नाव घेत अजून बरेच राजकारण केले जाणार आहे हे नक्की.