चान चान म्हणजे छान छान अजिबात नव्हे हे पहिल्या काही दिवसांत मला लक्षात आलं. "ब्वॉर्र" आणि "बरं" मधला फरकही नीट समजला. "मोठे व्हा" याचा आपण मोठे असण्याशी काही संबंध नाही वगैरे हळूहळू कळत गेलं तेव्हा जरा समजून प्रतिसाद वाचणं चालू झालं.
यात गंमत अशी आहे की आपल्याला बर्याच गोष्टी माहीत नाहीत, कळत नाहीत आपण भोट आहोत हे सिद्ध करणं बर्याचदा कठीण जातं. अमुक इतका जुना मेंबर आहे ना म्हणजे त्याला बर्याच "आतल्या" गोष्टी माहीत असणारच अशी समजूत असते. तुलनेत नव्या मेंबराला तर बर्याच प्रतिसादांतल्या चर्चा हाय कॉन्टेक्स्ट अतएव शिरोर्ध्वगामी पडतातच पण काहीशा जुन्या मेंबरालाही त्या भारीच पडतात. हे लोक एकमेकांना डोळे मारत किंवा टाळ्या देत नेमक्या कशाविषयी गूढवार्ता करताहेत याचे संदर्भ लागत नाहीत. अर्थातच त्यामागे काहीतरी जुना संदर्भ असतो आणि तो माहीत असलेले चारपाच लोक त्यावर काव्यशास्त्रविनोद करत राहतात. बरं, काय विषय म्हणून विचारावं तर "अभ्यास वाढवा"..
..मग अशा वेळी व्यनि हा जबरदस्त उपयोगी मार्ग आहे. ज्येष्ठांकडे व्यनिने पृच्छा केल्यास अनेक संदर्भ मिळतात आणि अभ्यास वाढतो.
"अभ्यास वाढवण्या"साठी कट्टा हे स्थान सर्वाधिक उपयोगी आहे. कट्ट्यावर चार भावंडे बसली की ती तो निर्जीव कट्टाही चालू पडतो याचं उदाहरण आंतरजालकालापूर्वी हजार वर्षांपासून आहे. मिपाभावंडांचा कट्टा जिथे बसतो तिथे आजुबाजूचे उठून चालू पडतात..कारण एकतर मिपाकर्स हा उच्चारवात तावातावाने चर्चा झोडणारा समूह असतो आणि त्यात ती चर्चाही महाभारतातल्या द्रौपदीपासून अहाभारतातल्या दारुपर्यंत कशावरही असू शकते. याउप्पर हे सर्व कट्टेकरी लोक जी काही नावं घेत असतात ती आम पब्लिकला शष्प कळत नसणार.. उदा. "अहो भासं लीमाउजेट नाही आली का तुमच्यासोबत, माझीही शॅम्पेन येतोय पाच मिण्टात.. आज मालकही येणार आहेत का, अरे वा.... विमे आणि स्पावड्या तुम्ही त्या साईडचं टेबल पकडा म्हणजे प्रास आणि गवि दोघांना मोठ्या खुर्च्यात बसवता येईल.." वगैरे..
रामदासकाका हे मुंबई ठाणे पट्ट्यातल्या मिपाकट्ट्यांची जान आणि शान.. हे आले की कट्टा एकदम जिवंत होतो. मुंबई शहराची बखर, टाईमटेबल, यलो पेजेस आणि विकीपीडिया असे सर्व मिळून एकग्रंथ असलेले रामदासकाका. भंगारातल्या धातूंपासून ते शेअरबाजारापर्यंत आणि कवितेपासून ते कोणत्या ग्यांगस्टरने कोणत्या हॉटेलात किती साली काय राडा केला इतपर्यंत थरारक कहाण्या त्यांच्या रसपूर्ण कथनशैलीतून बाहेर येतात. कट्ट्याचे कथेकरीबुवाच ते..शिवाय कुठेही पुस्तकप्रदर्शन वगैरेमधे गेले असले की त्यांना सर्व कट्टेकर्यांच्या आवडीनिवडी नीट लक्षात असतात. एखाद्या पुस्तकाने लक्ष वेधलं की ते नेमकं कोणत्या मिपाकराला रोचक वाटेल हे ओळखून ते घेऊन टाकतात आणि कट्ट्याला त्या सदस्याच्या हाती देतात.
मिसळपावचा सध्याच्या बॅनरखेरीज एखादा प्रतीकात्मक लोगो बनवायचा झालाच तर एका बाजूला चमचा (खाण्याचा चमचा.. चमचेगिरीशी प्रतीकात्मक संबंध नाही..) आणि दुसर्या बाजूला लेखणी असं काल्पनिक आयुध चितारावं लागेल. मिसळपाव या नावापासूनच मिपाकरांचं खाण्यापिण्याविषयीचं ममत्व दिसतं. बर्याचदा प्रवासवर्णनामधे हिमाच्छादित वर्णनांपेक्षाही तिथल्या बर्फाळ थंडीत चरचरत्या तव्यावरचे गरमागरम आलू पराठे आपल्याला कसे हादडायला मिळाले हेच आधी सांगणारे मजसारखे समानधर्मी इथे भरले आहेत. आजुबाजूची शीनशिनरी फक्त खाद्ययात्रेला "ब्याकग्राउंड" म्हणून असते यावर इथे अनेकांचा गाढ विश्वास आहे. जनातलं मनातलं किंवा काथ्याकुटाइतकाच, किंवा कणभर जास्त पण कमी नाही असा प्रतिसाद पाककृती विभागाला नेहमी मिळालेला आहे.
या पाककृती विभागाचीही गंमतच आहे. पोहे, उपमा वगैरे अशा अगदीच रोजच्या पदार्थांच्या पाककृतीही एक नवा पदार्थ असल्याप्रमाणे येतात. आणि त्यावरही आपले लोक्स "उपमा शब्द बरोबर की उप्पीट", "उप्पीट की उप्पीठ.. ", "उपमा आणि तिखट सांजा यातले फरक","पोहे म्हणजे महाराष्ट्राची देणगी की इंदूरची अस्मिता.." असे अनेक विषय चाखून त्या पाककृतीतच काथ्याकूट विभाग निर्माण करतात. तोंपासु, विकांताला करुन पाहणार, अंडे न घालता कसे करता येईल, अंडे घालून करता येईल का? वगैरे प्रश्न सटासट येतात. त्यावरही "अंडे घालून तुम्हाला किती वेळ झाला आहे त्यावर ते अवलंबून आहे" अशी प्रत्युत्तरं येऊन "जनाची नाहीतर मनाची.." असा नवीन लेखनविभागही तिथे सुरु होतो.
उपमा पोहे हा एक प्रकार झाला. पण कधीही न ऐकलेल्या अनवट रेसिपीजसुद्धा इथे मिपावरच मिळतात. "चिमीचांगा" म्हणजे काय असेल बुवा असा मला नुसता प्रश्न पडला तेव्हा प्रतिक्रिया म्हणून मिपावरच्या साग्रसंगीत "चिमीचांगा" पाककृतीची लिंकच कोणीतरी डकवली. घ्या..
धाग्यांवरचे प्रतिसाद हे एक उपनिषद आहे. यावर काय आणि किती बोलावं. काहींच्या मते कंपूबाजी करुनच प्रतिसाद मिळतात. काहींच्या मते चांगल्या लिखाणाला प्रतिसादच मिळत नाहीत. एखाद्या धाग्याचे ठरवून बारा वाजवले जातात (बाजार उठवला जातो) असंही एक मत आहे. शिवाय अजून एक पेश्शल इफेक्टही असतो. एकदा पहिला प्रतिसाद आला की त्याच्या दिशेने पुढचे प्रतिसाद येतात असं काहीवेळा दिसतं.
पहिला प्रतिसाद "जम्या नही" असा आला की दुसरा:
"+१ नेहमीचं पहिल्या धारेचं लिखाण वाटलं नाही.."
मग :
"+३ अजून रंगवता आला असता.."
अशी लाईन सुरु होते.
याउलट पहिलाच प्रतिसाद:
"भन्नाट.. जमून आलं आहे.." असा आला की:
"+१.. अमुक अमुक रॉक्स.." ,
"+२ लई भारी"
"+३ और ये लगा सिक्सर.."
अशी मालिका सुरु होते.
या सर्वाबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रतिसादच लेखकाला हजार हत्तींचं बळ देतात. अंगावर मूठभर नव्हे, मणभर मांस चढवतात, छाती फुगते, कॉलर टाईट होते..
याठिकाणी मी एक गोष्ट आधीच स्पष्ट करु इच्छितो की स्वान्तसुखाय लिखाण याचा अर्थ लिखाणातून आनंद मिळणं इतकंच मला अपेक्षित आहे. याचा पुढचा अर्थ म्हणजे स्वतःला आनंद मिळाला की बास.. प्रतिसाद आले न आले.. काही फरक पडत नाही.. असा नव्हे.
लोकांनी वाचावं म्हणूनच लिहिलेलं असतं हे मी प्रामाणिकपणे सांगतो. "वाचक" हा एकमेव मूळ ड्रायव्हिंग फॅक्टर लिखाणाला ऊर्जा देत असतो.. माझ्या बाबतीत तरी. त्यामुळे प्रतिसादांची इच्छा आणि आवड ही लेखकाची मूलभूत वृत्तीच आहे यावर माझा विश्वास आहे. वाचक आहेत म्हणून मी आहे.. माझ्यामुळे वाचक नाहीत. यात बेगडी नम्रपणा नसून जमिनीवरचं वास्तव आहे.
बर्याचदा या प्रतिसादप्रेमाला प्रतिसादलोलुप किंवा तत्सम नावं ठेवली जातात. आपलं लिखाण अनेकांनी वाचावं, त्यावर प्रतिक्रिया भरभरुन याव्यात अशीच इच्छा लेखकाची असते आणि असावी. वाचकाला आपल्या लिखाणात समाविष्ट न करुन घेता लिहिणारे "स्वान्तसुखाय" लेखक आपलं लिखाण लिहिण्याचा आनंद मनसोक्त उपभोगून मग ते स्वतःच्या फडताळात ठेवून का देत नाहीत ? प्रकाशित करण्याचा कष्टमय मार्ग का निवडतात? असा प्रश्न पडतो.
(अपूर्ण...)
प्रतिक्रिया
3 Sep 2012 - 1:05 pm | भरत कुलकर्णी
भन्नाट.. जमून आलं आहे..
3 Sep 2012 - 1:05 pm | गणपा
=)) =)) =))
बाकी हा भागही फक्कड. बरचसं माझ्याच मनातलं बाहेर निघालय असं वाटण्या इतपत.
खालची 'अपूर्ण ....' पाटी वाचुन आवडले.
3 Sep 2012 - 2:18 pm | किसन शिंदे
गणपा भौ,
तुमच्याच का प्रत्येक मिपाकराच्या मनातलं बाहेर पडतंय असं वाटतं. :)
बाकी या भागातल्या काही वाक्यांनी खूप हसतोय, इतकं कि शेअर आॅटो मध्ये बाजूच्या सीटवर बसलेल्या माणसाच्या चेहर्यावरचे भाव ह्ये 'बावळट' ध्यान उगाच का हसतंय असे झाले आहेत.
पु.भा.प्र. ;)
3 Sep 2012 - 2:55 pm | ५० फक्त
एवढा प्रामाणिकपणा आणि तो ही आंतरजालावर .....
3 Sep 2012 - 1:27 pm | नंदन
वाचतो आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
लंपनच्या भाषेत सांगायचं तर तंतोतंत!
3 Sep 2012 - 3:23 pm | सुहास झेले
मुंबई शहराची बखर, टाईमटेबल, यलो पेजेस आणि विकीपीडिया असे सर्व मिळून एकग्रंथ असलेले रामदासकाका..... अगदी अगदी !!
:) :)
3 Sep 2012 - 1:31 pm | प्रचेतस
गवि मिपाची शान आणि आम्ही गविंचे फ्यान.
3 Sep 2012 - 1:32 pm | मी_आहे_ना
का कोण जाणे, पण पु.ल. (भाईकाका) त्यांच्या आवाजात सांगतायेत आणि मी तल्लीन होवून ऐकतोयं असंच वाटत होतं!
3 Sep 2012 - 2:05 pm | बाळ सप्रे
+१
3 Sep 2012 - 1:37 pm | मन१
काय गवि...
.
इसबार जम्या नही
नेहमीचं पहिल्या धारेचं लिखाण वाटलं नाही..
अजून रंगवता आला असता..
;)
असो.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
माझा मूळ आयडी(मन) ८३०, म्हटला तर भलताच जुना. सध्याच्या सक्रिय कित्येक सदस्यांहूनही जुना.
पण हे डोळे मारणे आणि "अभ्यास वाढवणे" कधी जमले नाही अजून.चार वर्षात खरडवहीची इनमिन तीन्-चार पानं भरली गेली असतील नसतील तेवढीच. :(
4 Sep 2012 - 8:45 pm | मोदक
>>>चार वर्षात खरडवहीची इनमिन तीन्-चार पानं भरली गेली असतील नसतील तेवढीच
व्यनींचा उल्लेखही नाही वरच्या वाक्याच्या आधी / नंतर..
चुकून राहिला आहे की... हॅ.. हॅ.. हॅ.. ;-)
4 Sep 2012 - 9:12 pm | बॅटमॅन
वैयक्तिक...वैयक्तिक!!!!!!
समज द्यावी..समज! समज!! समज!!! ;)
3 Sep 2012 - 1:44 pm | बिपिन कार्यकर्ते
तंतोतंत जमून आलंय! :)
3 Sep 2012 - 1:51 pm | मोहनराव
एकदम भारी.
तुमचं लेखन वाचतच बसावं वाटतं. मुद्देसुद लेखन, परिच्छेद, सुटसुटीतपणा व वाचकाला खिळवुन ठेवणे हे तुमच्या लिखाणातुन शिकण्यासारखे आहे. खरंच मिपाची शान आहात तुम्ही!
3 Sep 2012 - 1:58 pm | प्रास
वीस हजारावर सदस्यसंख्या असलेल्या मिपामध्ये कालानुरोधाने अनेक फरक पडले असणे सहाजिकच आहे. तरी या प्रत्येक फरकाचा लेखाजोखा कुणी एक सदस्य देऊ शकत असेल असं म्हणता येणारच नाही. नव्याने इथे दाखल होणारा सदस्य हळूहळू चुकत माकतच शिकत असतो आणि या दरम्यानच त्याला समानशीलाच्या मित्र-मैत्रिणींची प्राप्ती होत असते असं आपण नक्की म्हणू शकतो.
मात्र तरीही आपण कोणत्या प्रकारच्या संस्थळावर सदस्यत्व घेतलंय हे कळणं हे गविच्या अशा धाग्याचं फलित म्हणता येईल. काही प्रमाणात सर्वांनाच याची माहिती मिळणं आवश्यक असतं असंच माझं मानणं आहे.
तेव्हा गवि, ते काम तुझं लेखन योग्य प्रकारे करतंय असं मला वाटतंय.
येऊ दे पुढलं असंच लिखाण.....
(गविंशेजारी मोठ्या खुर्चीतही जेमतेम मावणारा) प्रास.
3 Sep 2012 - 1:59 pm | चिगो
100% सहमत.. आपण लिहील्यावर कुणीतरी ते वाचावं आणि कौतुक करावं, हे प्रत्येकालाच वाटतं. असं नसतं तर टुकार लिहूनही स्वसुत्रवर्धापणकारणेप्रयत्नं केलेच नसते कुणी.. ;-)
गवि, लेख एकदम झक्कास.. आवडेश !
3 Sep 2012 - 2:07 pm | गवि
मी एका प्रतिसादात अन्यत्र कुठेतरी म्हटल्याप्रमाणे प्रतिसादलोलुप किंवा तत्सम शब्द विचित्र रचनेचे आहेत. लग्नसमारंभ घडवून आणणारा कोणीतरी मुख्य लग्नाला येऊ न शकलेल्यांसाठी रिसेप्शनचा जास्तीचा कार्यक्रम ठेवतो म्हणून त्याला आशिर्वादलोलुप किंवा शुभेच्छापिसाट म्हणावं का?
3 Sep 2012 - 2:14 pm | चिगो
खिक्क.. :-D . भारीच बुवा शब्दप्रसवपारंतर तुम्ही.. ;-)
3 Sep 2012 - 2:18 pm | अन्या दातार
या दोन शब्दांवरुन प्रचंड हसत सुटलोय :D :D :D
3 Sep 2012 - 3:42 pm | बॅटमॅन
शब्दप्रसवबाहुल्य आवडल्या गेले आहे.
(कुंतलत्वग्विच्छेदक) बॅटमॅन.
3 Sep 2012 - 3:58 pm | सूड
(कुंतलत्वग्विच्छेदक)
मान गये. वाल्गुदाचार्य !! :D
3 Sep 2012 - 5:30 pm | प्रास
'कुंतलत्वग्विच्छेदक' म्हणजे हो काय आण्णा?
कारण काये, 'गलविच्छेदक कुंतल' याबद्दल ऐकलंय पण हे काही तरी वेगळच वाटतंय.....
3 Sep 2012 - 5:41 pm | पैसा
बाल की खाल
3 Sep 2012 - 5:43 pm | बॅटमॅन
मान गये प्रासभौ _/\_
3 Sep 2012 - 2:20 pm | ५० फक्त
पुन्हा एकदा लई भारी,
अवांतर - मिर्ची पौडर संपली जणु पहिल्या राउंडात, जरा ग्वाड लागालंय यंदा.
3 Sep 2012 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार
लेखाजोखा आवडेश.
पण
हे काय पटले नाही.
उलट अशा चर्चा सुरु असताना आजूबाजूच्या अनोळखी टेबलावरील लोकं येउन चर्चेत सामील झाल्याचा अनुभव २/३ वेळा घेतला आहे.
अर्थात वाक्य गंमतीने लिहिले असल्यास क्षमस्व.
7 Sep 2012 - 2:42 pm | सुहास..
ही गाडी दुसर्या भागावर आल्यावर , गियरचा आवडता अस्सा " ट्टॉक्क " आवाज करत फुर्रर्र करीत निघुन गेली, आवडले..कट्ट्याच्या आठवणी आल्याने आम्ही ही आमच्या पहिल्या वहिल्या कट्ट्याच्या आठवणीत रमुन गेलो :)
3 Sep 2012 - 2:27 pm | सहज
एखादी घटना/प्रसंग घडला, मजेशीर पाटी दिसली की कधी मिपावर टाकीन असे होणे. ते पार झोपेतही (स्वप्नात)मिपाकट्टा / मिपाचर्चा घडली की नाही? :-)
फोडा मिपा नाम टाहो...
3 Sep 2012 - 2:31 pm | निश
गवि साहेब मस्त लिहिल आहेत.
तुमचा लेख म्हंजे एक प्रकारची मेजवानीच असते.गोड कडु तिखट व इतर रस ह्यांच एक परफेक्ट मिश्रण असलेली.
खरच मस्त लेख.
3 Sep 2012 - 4:31 pm | सविता००१
आवडेश
3 Sep 2012 - 5:42 pm | पैसा
मस्त! आणखी येऊ द्या. जोपर्यंत लेखाच्या शेवटी अपूर्ण येतंय तोपर्यंत आमची काही तक्रार नाही.
3 Sep 2012 - 5:48 pm | ५० फक्त
जोपर्यंत लेखाच्या शेवटी अपूर्ण येतंय तोपर्यंत आमची काही तक्रार नाही, आणि आम्हाला शालजोडीतले मिळत नाहीत तोपर्यंत ,
3 Sep 2012 - 5:44 pm | कवितानागेश
छान छान! :)
3 Sep 2012 - 5:50 pm | सानिकास्वप्निल
हा ही भाग खासचं आहे
:) :)
3 Sep 2012 - 5:59 pm | रेवती
छान.
हे लेखनही आवडले.
3 Sep 2012 - 6:06 pm | अत्रुप्त आत्मा
3 Sep 2012 - 6:16 pm | स्पा
याउप्पर हे सर्व कट्टेकरी लोक जी काही नावं घेत असतात ती आम पब्लिकला शष्प कळत नसणार.. उदा. "अहो भासं लीमाउजेट नाही आली का तुमच्यासोबत, माझीही शॅम्पेन येतोय पाच मिण्टात.. आज मालकही येणार आहेत का, अरे वा.... विमे आणि स्पावड्या तुम्ही त्या साईडचं टेबल पकडा म्हणजे प्रास आणि गवि दोघांना मोठ्या खुर्च्यात बसवता येईल.." वगैरे..
हे एकदम पटेश..
आजूबाजूची लोक्स हैराण होतात..
अशी विचित्र नाव असणारी हि माणस कुठल्या ग्रहावरून आली असावीत .. असे भाव असतात अशा वेळी यांच्या चेहऱ्यावर :)
3 Sep 2012 - 7:10 pm | तिमा
घ्या विविध प्रतिक्रिया:-
पहिल्या भागाइतकी मजा आली नाही.
दुसरा भाग एकदम भारी !
हम्म!
तुम्ही म्हणजे आमचे पुलंच!
चालू द्या.
पुलेशु.
इत्यादि, इत्यादि.
4 Sep 2012 - 5:37 am | स्पंदना
प्रवासवर्णनामधे हिमाच्छादित वर्णनांपेक्षाही तिथल्या बर्फाळ थंडीत चरचरत्या तव्यावरचे गरमागरम आलू पराठे आपल्याला कसे हादडायला मिळाले हेच आधी सांगणारे मजसारखे समानधर्मी इथे भरले आहेत. आजुबाजूची शीनशिनरी फक्त खाद्ययात्रेला "ब्याकग्राउंड" म्हणून असते यावर इथे अनेकांचा गाढ विश्वास आहे
टाळ्या! शिट्ट्या!
4 Sep 2012 - 7:40 am | सोत्रि
झक्कास!
आधि लेखाच्या खाली अपूर्ण आहे का ते बघितले आणि ते दिसताच हायसे वाटले आणि मग लेख वाचला.
पु.भा.प्र.
-( मिपाकर) सोकाजी
4 Sep 2012 - 9:10 am | चिंतामणी
अजून येउ द्या.
4 Sep 2012 - 9:19 am | सूड
वाचतोय. पुभाप्र.
4 Sep 2012 - 10:01 am | इरसाल
काय चालवलेय काय तुम्ही हे.
तुमने तो मेरे मन का बात छीन लिया. मय अईसा कब लिक पाउन्गा ?
4 Sep 2012 - 11:07 am | यकु
तेवढे आणखी दोन पाच पॅरे असते तर..
4 Sep 2012 - 1:28 pm | गोंधळी
वाचतो(शिकतो) आहे.कारण वाचाल तर वाचाल.
मी.पा. वरचा आपला आयडी वाचवायचा असेल तर तुमचे हे लेख वाचलेच पाहिजेत.
4 Sep 2012 - 4:14 pm | ऋषिकेश
फ क्क ड!!!
4 Sep 2012 - 5:06 pm | हारुन शेख
खूप मस्त ! अगदी सूक्ष्म निरीक्षणं आहेत तुमची. त्यामुळे जो अस्सल मिपाकर आहे त्याला लगेच अपील होणारं लिखाण झालंय. अजून येउद्यात.
4 Sep 2012 - 5:36 pm | मृत्युन्जय
गवि, मागचा भाग जास्त चांगला होता :)
4 Sep 2012 - 6:16 pm | तर्री
हा भाग आवडला.
मागचा (पूर्वीचा म्हणायचे आहे. परंपरागत अर्थ नको ) भागही आवडला.
येणारा लेख ही आवडेल ही खात्री आहे म्हणूनच पु.भा.प्र.
5 Sep 2012 - 9:25 am | राजेश घासकडवी
अपूर्ण हा शेवटचा शब्द या भागाला अधिक शोभतो आहे. पहिल्या भागात मिपाचं व्यक्तिमत्व सादर करताना काही वारंवार दिसणारे आयडी आणि त्यांच्या जालीय अभिव्यक्तीचा लेखाजोखा असं स्वरूप होतं. या लेखात अचानक गीअर बदललेले दिसतात. तत्त्वतः त्याला काहीच हरकत नाही. मात्र पहिल्या भागाच्य 'अपूर्ण'तेनंतर या भागाची अपूर्णता वेगळी जाणवते. तुम्ही 'मिसळपाव म्हणजे काय?' या विषयाचा आवाका आणखीन मोठा केल्याचं लक्षात येतं.
तेव्हा आता ही सगळी सूत्रं जुळवून आणण्यासाठी अजून बरेच भाग यायला हवेत असं वाटतं. माझी त्याला काहीच हरकत नाही, आणि इतर वाचकांचीही नसावी.
5 Sep 2012 - 1:42 pm | सुमीत भातखंडे
(अपूर्ण...)
हे सुद्धा उत्तम. वाचतोय आम्ही
5 Sep 2012 - 3:51 pm | गणेशा
छान वाटले वाचुन
8 Sep 2012 - 12:15 am | निनाद मुक्काम प...
मिपागाथा जबरी झाली आहे.
आजपर्यंत एकाही कट्टा अटेंड केला नसल्याने आयुष्यात मी कोणत्या आनंदाला मुकत आहे हे ह्या लेखामुळे कळले.
8 Sep 2012 - 10:22 am | मी ऋचा
गवि, आज खुप खुप खुप दिवसानी मिपावर आले आणि तुमचे मिपा-१, २ लेख वाचून इतक्या दिवसांचा ब्याकलॉग भरून निघाल्यासारखे वाटले.
मस्तच !! धन्यु!!