"तुम्ही मिसळपाव डॉट कॉमवर नाही आहात का? एकदा या आणि बघा तरी.", ब्लॉगवाचक यकु एक दिवस ईमेलमधून वदला.
मी आलो. काही जोरदार चर्चा वाचल्या. "अमुक विधानाची गंमत वाटली", "ड्वाले पाणावले", "मोठे व्हा" वगैरे .. सॉरी वैग्रे वैग्रे काहीकाही वाचत होतो. बर्याच मिपा मेंबरांचे वाढदिवस इतरांकडून लक्षात ठेवले जातात अशीही माझी समजूत झाली, कारण तेवढ्या थोड्या दिवसांतही "वाढदिवसाच्या शुभेच्छा.. हॅपी बड्डे" वगैरे आपल्याशी मतभेद असलेल्या व्यक्तीलाही दिल्या जात होत्या.
विक्षिप्त आदिती, विसोबा खेचर, धमाल मुलगा, बेसनलाडू,टारझन,पंडित गागाभट्ट, गोगोल, गांधीवादी, छोटा डॉन, परिकथेतील राजकुमार अशा बर्याच रंगीबेरंगी वाटणार्या आयडींनी लक्ष वेधलं जात होतं.
पण सदस्य झाल्याशिवाय तितकी खास मजा नाही असं यकुने लक्षात आणून दिल्यामुळे मी एक सदस्यनाव घेऊन अॅप्लाय केलं. सदस्यत्व ताबडतोब मिळत नसून ते यथावकाश, संमतीनंतर मिळेल असं लक्षात आल्याने मी वाट पाहिली आणि विसरून गेलो. तीनचार दिवसांनी एकदम आठवण झाली म्हणून पाहिलं तर अॅप्रूव्हल नाहीच. नंतर दुसर्या नावाने परत अॅप्लाय केलं. पुन्हा वाट पाहिली. मग म्हटलं, जाऊ दे.. मला ब्लॉगरपणाच्या हवेत खूप मजा येत होती. मिसळपाव बिसळपाव काही मला अॅक्सेप्ट करत नाहीये, जावदे..
मग अचानक एक ईमेल आली. खातं चालू झाल्याची. लॉगिन केलं आणि हे सगळं सुरु झालं ते या क्षणापर्यंत चालू आहे.
आधी मी असं पाहिलं की इथे ब्लॉगपेक्षा बरंच जास्त चलनवलन, दळणवळण आहे. प्रतिक्रिया आणि चर्चाही एकदम गरमागरम आणि सदैव चालू उपसा असलेल्या..
"लेखन करा" च्या लिंकवर गेलो. ब्लॉगवरुन एक विमान कसं चालवावं याविषयीचा लेख चोप्य पस्ते केला. (हॅ हॅ हॅ... हे चोप्य पस्ते, असले अच्र्त ब्व्लत शब्द ही मिपाचीच भेट.)
यामागे सरळ विचार असा होता की पब्लिकशी ओळख नाहीये, उगाच काथ्या कुटायला घेतला आणि झाला भडिमार तर काय घ्या? त्यापेक्षा आपल्या पक्क्या कॉन्फिडन्सवाल्या विषयावरचा लेखच पेस्टूया..
लेख प्रकाशित केला न केला आणि धडाधड प्रतिक्रियांना सुरुवात. आयला.. तशा तर माझ्या ब्लॉगवरही बर्यापैकी संख्येने प्रतिक्रिया येतच होत्या. पण तुलनेत इथे प्रतिक्रियांचा धोंदाणाच..
रॉयल रिजन्सी नावाच्या कोण्या हॉटेलातला बुफे "ब्रेकफास्ट" आणि मामा काण्यांच्या स्वच्छ उपाहारगृहातली नाश्त्याची झुंबड इतका संख्यात्मक फरक होता..
मग काय.. मी ब्लॉगवर आधी लिहिलेले लेख उचलून दणादणा मिसळपाववर टाकायला लागलो. त्याच्यावरही बरेच प्रतिसाद येत गेले. ब्लॉगच्या पद्धतीमधे प्रत्येक वाचकाच्या उत्तराला वेगळं प्रत्युत्तर लिहिण्याची पद्धत पाहिली होती. त्यामुळे इथेही प्रत्येकाला धन्यवाद द्यायला सुरुवात केली. मी वाचक "मेंटेन" करण्यासाठी योग्य "कर्टसी" दाखवत होतो.. माझ्यामते.
सकाळी एक लेख, संध्याकाळी एक लेख. मग कसाबसा एक दिवस थांबून अजून एक लेख.. असं चालू झालं.
परिकथेतील राजकुमार या आयडीने हळूहळू माझ्या लेखांवर डायरीची चित्रं डकवायला सुरुवात केली. "तुम्हाला डायरी भेट द्यायला हवी", "वा वा, मिपाच्या गगनात तुमच्याच विहार्या दिसत आहेत", "कधीकधी मी मिपावर आलोय की तुमच्या ब्लॉगवर तेच कळत नाही" अशा कॉमेंट्स टाकायला सुरुवात केली.
त्रासदायक आयडी दिसतोय.. याला काय बरं उत्तर द्यावं असं म्हणत मी वेगवेगळ्या पद्धतीने या आयडीला उत्तरंही दिली. लगेचच काही जणांनी मला पाठिंबाही दिला, इत्यादिं इत्यादि. पण हा परिकथेतील राजकुमाराचा तिरकसपणा जाईना.
मग मी काहीतरी टोकाचं उत्तर दिलं. वादावादी मनस्ताप इत्यादिंमधून जरा शांत झाल्यावर मला लक्षात आलं की हा माझा ब्लॉग नाहीये. हे पब्लिकचं संकेतस्थळ आहे. विमानोड्डाण शिकताना आणि करताना आपण एका एरोस्पेसमधले सर्व विमानांचे पायलट्स मिळून एकच रेडिओ फ्रीक्वेन्सी वापरुन एअरपोर्टशी आणि एकमेकांशी संवाद साधत असतो. ती आपल्या घरच्या टेलिफोनची लाईन नसते.
तसंच इथे मिसळपाववर कोणताही नवा धागा टाकला किंवा कोणत्याही धाग्याला प्रतिसाद आला की तो धागा पहिल्या पानाच्या पहिल्या नंबरवर येतो आणि सर्व धाग्यांना एक एक अशा मात्रेने खाली ढकलतो. पहिल्या पानावर जे काही आहे त्याला लक्ष मिळतं. दुसर्या पानावर सरकलं की ते इतिहासजमाच, जवळजवळ.
हे मला माहीत नव्हतं. किंवा दिसत असलं तरी लक्षात आलं नव्हतं असं म्हणू. माझं सगळं लक्ष लेख टाकून प्रतिक्रिया वाचण्यात अन सुखावण्यात होतं. मी मिसळपावचे नियम किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न यापैकी काहीच वाचलेलं नव्हतं. सगळा रोख हा मिळालेल्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होण्याकडे होता.
परिकथेतील राजकुमार हे केवळ एक निमित्त झालं मला या सर्व गोष्टी जाणवण्याचं. त्या आयडीने वाईटपणा घेऊन मला हे जाणवून दिलं आणि ते आवश्यकच होतं. त्याबद्दल त्या आयडीचा मी आभारी आहे. याचा अर्थ लगेच परिकथेतील राजकुमार हा त्रासदायक आयडी नाही असं समजण्याची आवश्यकता नाही. तो अत्यंत हलकट आयडी आहे याबद्दल दुमत नसावं.
दणादणा पोस्टे टाकणं कमी झालं आणि इतर लोकांचं लिहिलेलं वाचण्याची अक्कल आली. मग सुरु झाली एक नवी मिपा लाईफस्टाईल. काय लिहितात लोक इथे.. वा.
एकोळी धाग्यापासून ते पूर्ण महाभारताच्या आकारापर्यंत. पण खरी मजा धाग्यात नसते. ती असते प्रतिसादांमधे. मला वाटतं नव्याकोर्या धाग्याच्यासुद्धा नावावर क्लिक न करता थेट नवीन प्रतिसादांच्या लिंकवर क्लिक करुन आधी प्रतिसाद वाचणारी आणि नंतर वाटल्यास संदर्भासाठी मूळ धागा पाहणारी मंडळी कमी नसावीत.
मिपावर रुळतारुळता त्या वेळचे लक्षात राहिलेले हायलाईट्स म्हणजे जागुताईचे जिताडा आणि मांदेली हे एरवी पाककृतीमधे फारसे न दिसणारे पण घरोघरी खाल्ले जाणारे मासे. या माश्यांची पूर्ण सीरीज वाचताना आपल्याला इतक्या माश्यांची नावंही माहीत नाहीत हे समजून थक्क व्हायला होत होतं. वामेपासून तिसर्यांपर्यंत सगळं कव्हर केलं होतं. समुद्रखजिना..
टारझन हे त्या क्षणी मिसळपाववर माजी व्यक्तिमत्व होतं. या आयडीचं अस्तित्व खुद्द तो आयडी जागृत नसूनही धाग्याधाग्यात जाणवायचं. टारु, टारबा असे उल्लेख आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या खमंग कॉमेंटसचे क्वोट्स वगैरे यायचे. त्याची आठवण काढली जायची. बसवला टेंपोतचा हा जनक आहे अशी माझी माहिती आहे. मला आठवतंय, त्याचं आफ्रिकेचं प्रवासवर्णन हा मिपाच्या इतिहासात जतन करुन ठेवावा असा ठ्ठोवा , सॉरी ठेवा आहे. एक दिवस नोटिफिकेशन निघून टारबा परत आले आणि आल्यापासून त्यांच्या प्रतिक्रियांनी ठ्ठो करुन हसायला लावलं. हजरजबाबीपणाचा अद्वितीय नमुना. नंतर परत गायब.. अजूनही कधीतरी परत येईल अशी आशा, किंवा आलाही असेल..या संशयित आयडींतला नेमका कोण टारबा ते कळायला हवं इतकंच.
पंडित गागाभट्ट यांच्या करड्या पांढुरक्या हायलाईट्स वापरुन दिलेल्या प्रदीर्घ प्रतिक्रिया वाचून डोळे थकायचे, पण त्यातला मुद्देसूदपणा आणि बिनतोडपणा लाजवाब होता. कितीही कीस पडला तरी चालेल पण मुद्द्याची सालं काढण्याचं काम ते अत्यंत चिकाटीने करत. आणि नुसता वादासाठी वाद नव्हे, त्यासोबत ठाम मत आणि तीक्ष्ण विनोदबुद्धीही. शंका हा पंगाशेटचा ट्रेडमार्क. "एक शंका" अशा टायटलने हे अशा काही शंका विचारत की धागाकर्ता गरगरलाच पायजे. पंडित गागाभट्ट ऐवजी "शंकित काकाभट्ट" असाही आयडी त्यांनी घ्यायला हरकत नव्हती.
यात संपादक नेमके कोण आहेत हे काही कळायचं नाही, अजूनही कळत नाही.. म्हणजे कळतं पण नेमकं कळत नाही. पण मधेच लाल रेघ आली की काहीतरी इचकलंय इतकं समजायचं .. एखादा बळी रोजचाच असतो.. पण कधीकधी साठसत्तर प्रतिसादांचं सामूहिक हत्याकांडही होतं. या ठिकाणी "हत्या" की "वध" यावर वाद हा मिपाचा पेटंटेड वाद असल्याने तो मोकळा ठेवतो.
स्पा या पात्राची प्रसिद्धी एका जबरी निराशावादी धाग्यामुळे झालेली होती. नंतर मात्र हे व्यक्तिमत्व अवली (अवलिया नव्हे) असल्याचं लक्षात आलं. हे साधारणपणे भीतीदायक कथा लिहितात असं दिसत होतं. अधेमधे भेळ वगैरे पदार्थांना पाककृतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कामही त्यांनी केलं. नंतर हळूहळू तो स्पावड्या झाला. यथावकाश पाहतो तो काय, आम्ही दोघे एकाच इमारतीत नोकरीला आलो आहे हे लक्षात आलं. "वर्ल्ड इज स्मॉल"चं इथलं पहिलं उदाहरण.
चोता दोन हे प्रकरण आधी कळलं नव्हतं. पण ब्लॉग माझा स्पर्धेत टीव्हीवर झळकलेला लांब केसांचा तरुण तोच हा "छोटा डॉन" हे नंतर लक्षात आलं. वायदेआझम हे नाव याला का पडलं असावं यावर तेव्हाही प्रश्न पडला होता आणि आताही आहे.
ज्याने मिपा सुचवलं ती खुद्द यशवंत कुलकर्णी ही व्यक्ती त्यावेळी काहीतरी तुफान पंगे घेऊन गच्छंती अवस्थेत होती. यथावकाश त्याला मिपाशिवाय स्वस्थ झोप येईना म्हणून यशवंत एकनाथ बनून तो परत आला. त्यावेळी यूजी सीरीज आणि कासाराचा गोईदा , गुंजग्रामीचे दिवस या वाचकाला अडकवून ठेवणार्या गोष्टी त्याने लिहिल्याचं आठवतं. अस्सल जिवंत आणि खरीखुरी, दिल से भाषा हा यकुचा खास ट्रेडमार्क आहे. भारतातल्या मध्यरात्री दीड-दोन वाजता ही वल्ली न चुकता ऑनलाईन दिसत असायची. अमेरिकेतली जनता त्या वेळी ऑनलाईन असेल हे तर समजायचं, पण यकु नक्की भारतातच असतो ना अशी मला शंका यायची. नंतर ब्लॉग माझामधे माझं बक्षीस घ्यायला माझ्यातर्फे तो गेला आणि टीव्हीवर दिसला तेव्हा तो इथेच असतो याची खात्री पटली. हल्ली नर्मदातीरी जाऊन आल्यापासून मेल्याने जिवाला घोर लावून ठेवला आहे..
शिल्पा ब हे कॅरेक्टर अधूनमधून प्रतिसादांमधे दिसायचं. दिसायचं म्हणजे काय, अजूनही दिसतं. घाबरतात की काय त्या? त्यांना मात्र सगळे घाबरतात.. या ताई त्यांच्या कीबोर्डची "वाय" ही कळ नवीन बसवून अथवा दुरुस्त करुन का घेत नाहीत हा प्रश्न मी आजपर्यंत त्यांना विचारलेला नाही. यांच्या धारदार जिभेला बरेच मी तरी घाबरुन असायचो. पण कधीकधी "चांगलं आहे" "आवडलं" असंही लिहितात, तेव्हा पोटातला खड्डा जरा कमी होतो.
"ब्रा-ज्वलन ते मुखपुस्तकावरील उरोजकर्क स्थितीसंदेश : स्त्रीमुक्तीवादातील बंधन-दृष्टिकोन प्रवासाचा मागोवा" अशा जब्रा ज्वलनशील षिर्षकाचा लेख वाचून राजेश घासकडवी हे नाव एकदम पाठ झालं. तार्किकतेचा अर्क कोळून प्यायलेला मुद्देसून मनुष्य म्हणून यांना गुर्जी म्हणत असावेत अशी समजूत मी करुन घेतली आणि कायम ठेवली आहे. कंसातली दर्जेदार विडंबनंही यांचीच खास ठेवणीतली चीज..अगदी झ झ झ झ झोपडीत चारपाई या हल्लीच्या विडंबनापर्यंत. बाबागिरीच्या साबणाचा पहिला गिर्हाईक, किंवा मिपावर स्लटवॉक असल्या अफलातून कल्पना यांच्याच सुपीक डोचक्यात उगवतात.
परिकथेतील राजकुमार, अवलिया, मृत्युंजय, असुर या सर्व एकाच माणसाच्या आयडी आहेत अशी माझी समजूत होती. किती वेगवेगळं बेअरिंग मेंटेन करतो ना हा मनुष्य, असं आश्चर्यही वाटायचं.. कोणत्या आयडी डुप्लिकेट आहेत हा मिपाजन्मापासून आजतागायतचा हॉट टॉपिक आहे.
कौल हा सेक्षन त्यावेळी इथे होता. कराटेप्रमाणे हय्या करुन कौलं फोडणारे खूप कौलपटू दिसायचे. इफ आय अॅम नॉट राँग, इंटेश, ऊर्फ इंटरनेटस्नेही हा याचा चँपियन होता.
काथ्याकूट हा मिपाचा अंतरात्मा. बाकी काही असो नसो.. जोसवर काथ्याकूट आहे तोसवर मिपा आहे. अनेक विषय आले गेले, पण गे-लेस्बियन, स्त्री-पुरुष, देव, धर्म, ज्योतिष, शाकाहार मांसाहार, निवासी अनिवासी हे विषय म्हणजे मराठा मंदिरमधे सतरा वर्षं चालू असलेल्या "दिलवाले दुल्हनिया"सारखे आहेत. ब्राह्मण अब्राह्मण याविषयी काही बोलायचीच सोय नाही. ब्रा म्हणता ब्रह्महत्या असा प्रकार होतो.
.....
(अपूर्ण..)
प्रतिक्रिया
30 Aug 2012 - 1:48 pm | मुक्त विहारि
मस्त..
30 Aug 2012 - 1:49 pm | मुक्त विहारि
मस्त..
30 Aug 2012 - 1:50 pm | अन्या दातार
पुढचा भाग पुढच्या वर्षासाठी ठेवला आहे का?
30 Aug 2012 - 1:53 pm | प्रचेतस
मस्त.
बर्याच आठवणींना उजाळा मिळाला.
30 Aug 2012 - 1:59 pm | किसन शिंदे
व्वा!!
मिपावर(हा शब्द दोन्ही अर्थानी घ्यावा) कितीही लिहायचं ठरवलं तरी ते कमीच पडेल.
इथे इतक्या व्यक्ती आणि वल्ली आहेत त्यामुळे तुमच्या नजरेतून अशा अजुन बर्याच आयडींची ओळख वाचण्यास उत्सुक.! :)
1 Sep 2012 - 9:22 am | सुहास झेले
किसन द्येवा एकदम मनातलं बोललात... गविंनी हा लेख अपूर्ण ठेवू नये, अजून चिक्कार आयडी हायेत इथे :) ;)
गेली तीन वर्ष ब्लॉगवर नियमितपणे लिहितोय, पण मिपावर फक्त पाहुणा म्हणून वाचन करत असे. मिपाची माझ्या मनात एक दहशत होती असं म्हणू शकाल, ऑफकोर्स त्याच्या वेगळेपणामुळेच. आता हाडाचा मिपाकर आहे.. हे वे सां न ल !!!
:) :) :)
30 Aug 2012 - 2:03 pm | तर्री
मिपा ताळेबंद एकदम तडाखे बंद - आवडला.
30 Aug 2012 - 2:03 pm | इरसाल
आणी तुम्हाला जर डुआयडी कोण हे माहीत झाले असेल तर तेही सांगावे.
तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर
30 Aug 2012 - 2:06 pm | उगा काहितरीच
सही...
30 Aug 2012 - 5:24 pm | मी_आहे_ना
हे 'अपूर्ण' ते अपूर्णच रहात, वाढत जावो, नव्या नव्या 'दखल' घेण्याजोग्या आयड्यांची अन् धाग्यांची भर पडत जावो, आणि मिपा असेच बहरत जावो!
30 Aug 2012 - 2:30 pm | मोहनराव
छान. मी मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा मिसळपाववरच आलो आणी इथला कधी झालो ते कळालेच नाही. दुसर्या संकेतस्थळावर मी असुनसुद्धा मी इथेच जास्त रमतो.
30 Aug 2012 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा
काथ्याकूट हा मिपाचा अंतरात्मा. बाकी काही असो नसो.. जोसवर काथ्याकूट आहे तोसवर मिपा आहे. >>> >>> ++++++++१११११११११११
30 Aug 2012 - 2:42 pm | गणपा
'लाइक' केल्या गेले आहे. :)
30 Aug 2012 - 2:52 pm | कवटी
याचा अर्थ लगेच परिकथेतील राजकुमार हा त्रासदायक आयडी नाही असं समजण्याची आवश्यकता नाही. तो अत्यंत हलकट आयडी आहे याबद्दल दुमत नसावं.
अगदी अगदी....
तमाम मिपाकरांच्या मनातल्या तळमळीला वाचा फोडल्याबद्दल श्री गवी यांचा पर्याच्या कॅफेसमोर सत्कार आयोजीत केला आहे.
बाकी आज एक्दम नॉस्टॅल्जिक मोड मधे का गेलाय कळत नाही....
31 Aug 2012 - 8:38 am | पक पक पक
वस्त्रहरण करतो म्हणुन लगेच हलकट... ? ;) हे काय पट्त नाय... :)
30 Aug 2012 - 3:02 pm | यकु
हा लेखाजोखा किंवा सिहांवलोकन ( येक्जॅक्टली सांगायचं तर विहंगावलोकन ) गविंकडून येत आहे हे मस्त.
गविंसह मिपावरच्या कित्येक सदस्यरत्नांची अजूनही प्रत्यक्ष भेट झालेली नाही, तरीही या ऑनलाईन मित्र - मैत्रिणींमुळेच जगण्यात मजा आली, येते असे छातीठोक पणे मी सांगू शकतो.
गविंचं लिखाण काय देतं हे आता कुणाला सांगण्याची गरज नसेल हे नक्की , म्हणूनच त्यावेळी फक्त ब्लॉगजगतात रमणारे गवि इथे फडावर असायला पाहिजेत असं वाटून त्यांना अक्षरशः मागे लागून इथे यायला बाध्य केलं. आपण सगळे जालीय भिडू गविंना चांगले ओळखत असलो तरी गविंची प्रतिभा त्याहीपेक्षा कितीतरी मोठी आहे - तिला ते साहित्यिक जगात दणदणीत प्रवेश करुन कधी न्याय देतात याची नेहमीच प्रतिक्षा आहे. स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा लिहून गविंनी थांबायला नको असं वाटतं.
बाकी इथल्याच आत्मशून्य, विलासराव या दोस्तांच्या संगतीनं नर्मदा किनार्यावर गेल्यापासून माझं जगणं मलाच समजेनासं झालंय. नियतीनं नव्हे, नर्मदेनंच एक विचित्र जबाबदारी माझ्यावर टाकली आहे - मी जगावेगळ्या, चमत्कार म्हणता येतील अशा अनेक गोष्टी अगदी दररोज पहातोय - जगतोय - पण प्रॅक्टीकली जे दुसर्यांनाही करुन पहाता येत नाही ( आय कॅनॉट पास ऑन व्हाट आय अॅम लिव्हींग ) आणि ज्याचा दुसर्यांना नुसती चर्चा वगळता इतर कशासाठीही उपयोग नाही - असले अनुभव लिहिण्यापासून मी मुद्दाम दूर आहे - म्हणूनच मी सध्या जालापासूनही थोडा दूर गेलो आहे.. बाकी काय नाय हो गवि.. :)
30 Aug 2012 - 3:38 pm | गवि
नको रे... नको..
हे सर्व लिहिण्याचा मान, हक्क आणि शक्यता ही मिपाच्या पहिल्या दिवसापासून सर्व पाहात असलेल्या सदस्यांपैकी लोकांची आहे. मी आत्ता आत्ता आलोय आणि काय काय आठवतंय ते लिहितोय. याला मिपाचं सिंहावलोकन म्हणणं म्हणजे सिनियर केजीतल्या पोराने आत्मचरित्र लिहिण्यापैकी आहे.
ते रामदासकाकांनी लिहावं अशी विनंती.
30 Aug 2012 - 3:05 pm | नाना चेंगट
याचा अर्थ लगेच परिकथेतील राजकुमार हा त्रासदायक आयडी नाही असं समजण्याची आवश्यकता नाही. तो अत्यंत हलकट आयडी आहे याबद्दल दुमत नसावं.
+१ सहमत आहे.
30 Aug 2012 - 3:29 pm | मृत्युन्जय
याचा अर्थ लगेच परिकथेतील राजकुमार हा त्रासदायक आयडी नाही असं समजण्याची आवश्यकता नाही. तो अत्यंत हलकट आयडी आहे याबद्दल दुमत नसावं.
शमत आहे. ;)
परिकथेतील राजकुमार, अवलिया, मृत्युंजय, असुर या सर्व एकाच माणसाच्या आयडी आहेत अशी माझी समजूत होती.
हे सर्व आयडी प्रतिसादांतुन हलकट वाटतात असे तुमचे म्हणणे आहे काय? माझ्यावर ही वेळ येईल असे कधी वाटले नव्हते. तसे परा आणि मी एकच आहोत असा आरोप एका निद्रिस्त सदस्याने केला होता म्हणा पण त्याआधी त्या सदस्याने परा हलकट आहे असे म्हटले नव्हते त्यामुळे ते मी फारसे मनावर नाही घेतले ;)
30 Aug 2012 - 3:49 pm | गवि
हॅ हॅ हॅ...छे छे..
ते वेगवेगळे बेअरिंग.. आश्चर्य वैग्रे वैग्रे वाचलं नाहीस का?
30 Aug 2012 - 3:47 pm | उदय के'सागर
खुप छान... आणि तुम्ही हे अगदी अचूक हेरले :
" मला वाटतं नव्याकोर्या धाग्याच्यासुद्धा नावावर क्लिक न करता थेट नवीन प्रतिसादांच्या लिंकवर क्लिक करुन आधी प्रतिसाद वाचणारी आणि नंतर वाटल्यास संदर्भासाठी मूळ धागा पाहणारी मंडळी कमी नसावीत."
आम्ही ही त्यातलेच एक :)
30 Aug 2012 - 4:02 pm | श्रावण मोडक
हा गवि म्हणजे कोकण्या आहे पक्का. साला, असं लिहिलंय की "सहमत" म्हटलं तर पाचपन्नास आयडींची दुश्मनी ओढवून घ्यायची. नाही म्हटलं तर आम्हाला जे वाटतं त्या अभिव्यक्तीची कोंडी. :-)
छ्या... ;-)
30 Aug 2012 - 4:12 pm | चिगो
मिपाचा लेखाजोखा आवडलाय.. आने दो. बादवे, मिपामुळे मी थोडाफार लिहीता (मुख्य म्हणजे मराठी टंकता) झालो, हे नम्रपणे नमुद करु इच्छितो.
30 Aug 2012 - 4:29 pm | प्रसाद प्रसाद
चिगो, सर्वात पहिल्यांदा मिपावर मी तुमच्याच पोस्ट वाचल्या आणि सदस्यत्वासाठी अर्ज केला (सदस्यत्व मिळायला ६ महिने लागले). मराठी साईटस् वगैरे शोधताना अचानक मला मिपा सापडले होते. तुमच्यानंतर यकुशेठचे लेखन वाचले होते. दोघांचेही लेखन अत्यंत आवडून गेले होते.
त्यावेळी तुमचे (चिगो) संपूर्ण लेखन असलेले वेबपेज मी फेव्हरेटमध्ये अॅड केले होते. अजूनही त्याच लिंकवरून रोज लॉगइन होतो.
गविंचा नेहमीप्रमाणेच उत्तम लेख हे.वे.सां.न.ल.
30 Aug 2012 - 5:31 pm | चिगो
धन्यवाद, प्रसाद..
30 Aug 2012 - 4:26 pm | चौकटराजा
मिपावर एक वरीस झाल्यावर असाच काहीसा लेख लिहायचा विचार होता. पण मिपाविषयी यात बरेच आले.मिपावरून परत जावे असे वाटले होते एकदा . पण या बाबतीत आपल्या खेरीज काही समदु:खी आहेत हे या लेखातून कळले. तसेच मिपावर काही काळ तग धरून रहा आपल्याला हळूहळू समानधर्मा मिळतील हा मालकानी एके ठिकाणी दिलेला सल्ला अमोल वाटतो. .
मिपावर लेखांवरच्या प्रतिक्रिया अनुकुल येण्यासाठी ख व तसेच व्यनि मधून मुद्दाम संपर्क ठेवून व्होट बँक वाढवावी लागते काय हे माझ्यासारख्या नवख्याला अजून कळलेले नाही.
गवि, हा एक ऊत्तम लेख झालाय ! आपल्या व्होट बँकेत माझे नाव टाकतो. आभार !
30 Aug 2012 - 4:37 pm | चित्रगुप्त
छान. अगदी मनातले लिहिलेत.
30 Aug 2012 - 5:00 pm | निश
गवि साहेब , अतिशय मस्त लेख .
तुमच्यातल्या लेखकाला माझा त्रिवार सलाम.
30 Aug 2012 - 5:07 pm | तिमा
मिसळपाववर रोजची फेरी झाल्याशिवाय चैन पडत नाही. गविंचा आढावा आवडला.
मिपावर सर्वात काय आवडत असेल तर, इथे कोणालाही क्षमा नाही. चुकला की भडिमार झालाच. आणि तरीही ते बहुतांशी सदस्य खिलाडु वृत्तीने घेतात.
30 Aug 2012 - 5:18 pm | प्रास
भन्नाट लिवलंय, एकदम....
मिपा जगताच्या आयड्या यात कशा व्यवस्थित व्यक्त झाल्यात, भई व्वा!
बहुतेक सगळ्याच मतांशी सहमत, आपल्याला नको ब्वॉ त्या श्रामोंसारखी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीची भीती! ;-)
बाकी गवि, ते तेव्हढं अपूर्ण फक्त जरा पूर्ण करण्याचं बघ रे....
30 Aug 2012 - 5:27 pm | पैसा
मिपाच्या लवकरच येणार्या वाढदिवसानिमित्त तर्री यानी एक धागा काढला होता. आता गविंकडून प्रत्यक्ष वाढदिवसापर्यंत मिपावरच्या खर्या आणि डुप्लिकेट आयडींचा असाच परिचय येत राहू दे!
1 Sep 2012 - 9:32 am | सुहास झेले
पैसाताईला अनुमोदन.... :) :)
30 Aug 2012 - 5:40 pm | कापूसकोन्ड्या
हा धागा अत्यंत टुकार आहे.
30 Aug 2012 - 6:22 pm | मराठे
सकाळी सकाळी मेल, फेसबूक आणि मिपा ही तिनही पानं सवयीने आपोआप उघडतात. एकदा मिपाचं व्यसन लागलं की ते सोडणं तसं अवघडच. मिपामुळे काहीतरी (च) लिहावं असं वाटून लिहायचं धाडस करता झालो.
गवि, लेख नेहमीप्रमाणेच फक्कड. अजून बरेच आयडी बाकी आहेत उदा रामदास, बिका, विजूभाऊ, नाना, गणपा वगैरे. त्याशिवाय सध्या अदृष्य असलेलेही किती आहेत, चुचु (अच्रत बाव्लत, चोप्य पस्ते ची जननी), तात्या .. वग्रे.
30 Aug 2012 - 6:50 pm | मन१
"अपूर्ण" ही ओळ आवडली. वाचत आहे. गविंचा कुठला कुठला धागा आवडला, भावला ह्यापेक्षा कुठला आवडला नाही हे सांगणं सोपं. "आवडला नाही, असा कुठलाच नाही. अगदि मृत्युवरही हा लिहितो तेव्हा (त्रास होत असूनही) झक मारुन वाचल्या जातच." बर्याचदा हा लिहितो तेव्हा "अरे मलाही हेच म्हणायचं होतं" असं वाटून जातं; हे अशा लिखाणाचा यश.
गवि म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व असावं असा अंदाज पहिल्या कट्ट्याच्या वृत्तातांवरून आलेला होता.
"मला वाटलं त्यापेक्षा तू बराच जाड आहेस आणि तुला वाटलं त्याहून मी बराच बारीक आहे" असं काहीतरी तत्क्षणी त्याला सुचलेलं पाहून गंमत वाटली.
असो, थोडक्यात काय, पुढच्याही अंकाची वाट पहातोय.
31 Aug 2012 - 2:53 pm | स्पा
उत्तम लेखाजोगा
गविंचा सुरुवातीला लेख टाकण्याचा झपाटा पाहता , सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या..
त्यांची छगन बिहारी अशी सही सुद्धा मध्ये मध्ये मी ठोकत होतो, पर्याच्या डायऱ्या पण होत्याच .
पण नंतर कळलं हि हे रसायन काहीतरी वेगळंच आहे , हा माणूस कुठल्याही विषयवार सहज पणे लिहू शकतो..
आणि लिहिण्याची खुबी पण वेगळीच .. पेशल गवि टच .
मग कळलं माताय, आम्ही एकाच इमारतीत कामाला आहोत .. त्यावर कहर म्हणजे ५० फक्त च आधीच मुंबईतल हापिस पण आमच्याच इमारतीत होत. :)
पण प्रत्यक्ष भेट मात्र कट्ट्यालाच झाली , आणि भेटल्यावरची सर्वात पहिली प्रतिक्रिया म्हणजे "मला वाटलं त्यापेक्षा तू बराच बारीक आहेस आणि तुला वाटलं त्याहून मी बराच जाड आहे" :)
बर्याचदा हा लिहितो तेव्हा "अरे मलाही हेच म्हणायचं होतं" असं वाटून जातं; हे अशा लिखाणाचा यश.
+११
हे बाकी अगदी खरे
30 Aug 2012 - 7:28 pm | रेवती
छान. लेखनाशी सहमत. काही लेखनाशी तर जास्तच सहमत. ;)
30 Aug 2012 - 8:04 pm | प्रदीप
लेख नेहमीप्रमाणेच छान आहे. गविंच्या लेखाबद्दल आता हे पुन्हा लिहीण्याची तशी जरूरी नाही. आणि इतकेच असते, तर मी हा प्रतिसाद दिला नसता.
पण मला एक वेगळाच संशय येतोय. ही निरवानिरवीची तर भाषा नव्हे? इथून जातांना, इथे आपण कसे आलो, रमलो, रूळलो, वगैरे सांगत, सांगत (व आम्हाला गुंगवत) हळूच गवि निरोपाचे काहीतरी लिहीणार की काय?
तसे नसावे, अशी आशा करतो.
30 Aug 2012 - 8:34 pm | नगरीनिरंजन
लेख पहिल्यांदा वाचला तेव्हा हेच मनात आलं की हा बाबा असं रिटायरमेंटच्या दिवशीच्या सेंडॉफमधल्या भाषणासारखं का लिहीतोय?
तसं नसावं अशी आशा..नव्हे खात्री बाळगतो.
30 Aug 2012 - 9:18 pm | गवि
नाही हो.
सोडून कशाला जाईन. आणि बाकी, सोडून जायचं असेल तर निरोपाचा धागा अजिबात काढू नये एवढं तरी इतक्या काळात शिकलो आहेच की.. ;)
आहे आहे मी इथेच. हे आपलं असंच स्मरणरंजन बस्स.
30 Aug 2012 - 8:28 pm | सोत्रि
मनोबाने व्यक्त केलेल्या ह्या मताची :
सार्थता म्हणजे
:)
असो, श्रामोंना जे वाटले तसे अजिबात न वाटू देता लेखाशी सहमत असल्याचे बिनधास्त नमूद करतो.
- ( हाडाचा मिपाकर) सोकाजी
30 Aug 2012 - 8:37 pm | कौशी
छान लिहिलय गवि ,
लेखन आवडले..
30 Aug 2012 - 8:37 pm | कौशी
छान लिहिलय गवि ,
लेखन आवडले..
30 Aug 2012 - 9:24 pm | सुकामेवा
ऐकच नंम्बर
30 Aug 2012 - 11:16 pm | सुधीर
सुंदर लिहिता तुम्ही. मिपावर मी डे१ पासून आहे. पण आपल्याला व्यक्त होण्यासाठी लिहायला जमत नाही. मी मिपावर तात्या अन सर्कीट यांच्यामुळे आलो. मिपाअगोदर मला तीन मराठी संकेतस्थळ माहित होती. त्यातलं एक फार मोठ आहे पण त्यांच्या धाग्यांचं सादरीकरण मला आवडत नाही. उरलेल्या दोघांकडे मी वाचनमात्र असतो. त्यातल एक मराठीच्या शुद्धिकरणासाठी प्रसिद्ध आहे (चांगली गोष्ट आहे; पण आपल्याला जमत नाही) तर दुसरं व्यासंगी आणि पंडितांसाठी! दोन्हीकडे प्रतिसाद देण्याचीपण आपली लायकी नाही. मिपावर मात्र तस नव्हतं पण तरीपण प्रतिसाद लिहिण्याइतपत लिहिता येईल का अशी शंका असते. इतर कामांच्या व्यापामुळे अधन-मधन सक्तीचा मराठी संकेतस्थळांचा संन्यास घेतो. त्यामुळे कदाचित अस्सल मिपाप्रेमी नाही. संपूर्ण मराठी संकेतस्थळांवरचे बरेचशे आयडी माहीत आहेत. पण बर्याच गोष्टींमुळे मिपा (धाग्यांचं सादरीकरण, रंगसंगती, धाग्यांची उलाढाल- डायनामिक कंटेण्ट) आणि मिपाकर आवडतात. मिपावरचे मान्यवरांचे प्रतिसाद वाचण्यात कधीकधी धमाल येते. पण त्यातूनच काही आय् डी गायब झाले/(काही इकडे तिकडे गेले) त्याचं थोडं वाईट वाटतं. पण असो मिपामुळे ५ वर्षांनी प्रतिसादतरी लिहायला शिकलो. त्यांमुळे मिपाला धन्यवाद. इथल्या आयडींनी अशीच धमाल करावी.
31 Aug 2012 - 12:05 am | बॅटमॅन
मस्त मस्त मस्त हो गवि!!! सीर्यस होऊनदेखील अच्रत बव्लत आणि निवांत टीपी करणे हे मिपाचे खास वैशिष्ट्य मात्र अन्य कुठे दिसले नाही हे मान्य केलेचि पाहिजे :) मिपावरची विडंबिक प्रतिभादेखील खास पहिल्या धारेची आहे हे नक्कीच. बाकी मिपावर येण्याचे आमंत्रण मलादेखील यकुनेच दिले. बझाबझीतून ओळख झालेली आमची नुकतीच, तिथून गबोल्यात एकदा तो म्हणाला मिपावर लटक म्हणून. तसे लटके तर आधीदेखील काहीवेळेस आलो होतो. विशेष लक्षात राहिले ते म्हंजे अस्सल आणि अंतर्बाह्य मराठी रूपडे तसेच विविध कमेंट्स. त्यातही पंगा हे नाव आणि त्यांच्या कमेंट्स मुख्यतः. शेवटी मग जॉईन झालो आणि आता मस्त मजा येऊ लागली आहे . ब्लॉग आणि मिपा यांच्या ट्रॅफिकबद्दल तर खंप्लीट बाडीस.
(मिपाचा फॅन ) बॅटमॅन.
31 Aug 2012 - 1:39 am | प्रभाकर पेठकर
गगन विहारींचा मिपा विहार सुद्धा रोमहर्षक झाला आहे. अभिनंदन.
31 Aug 2012 - 4:46 am | शिल्पा ब
चांगलं लिहिलंय.
मिपासारखा सडेतोडपणा दुसरीकडे नाही. बाकीचे पिचपिचीत , आम्ही फार सभ्य असं दाखवणारे संस्थळं अजिबात आवडत नाहीत.
31 Aug 2012 - 10:00 am | सुहास..
सडेतोड आणि सुस्पष्टपणा भावतो म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच !
गवि , अस्सल मिसळपाव पासुन प्रचंड लाब असलेला लेख भावला नाही, मुळात दर दोन-एक वर्षांनी असच एखाद्या आयडी च्या अंगात येते आणि मिसळपाव विषयी भावुक पणे लिहील्या जाते. मिपावर मिपा आणि मिपाकर विषयी काही ही लिहील तरी चलती असते. मुळात साधारण ( जेव्हा मी नवीन होतो तेव्हा) हि मिसळ ' काटा-किर्र' च्या तर्री सारखी झणझणीत होती. आता जी मिसळ आहे ती ब्राम्हणी प्रभाव असलेल्या, साखर पोहे घालुन केलेल्या, सोबतीला पावाएवजी स्लाईस वाढणार्या बेडेकरांच्या मिसळी सारखी झाली आहे . ( हे माझ्या एकट्याचे नव्हे, तर खाजगीत मला बर्याच जणांनी बोलुन दाखविले आहे.) कसे ते ही सांगतो.
हा बदल आहे हे मी मान्य करतो ..पण मान्य करतो म्हणुन तो बदल नाही हे कोणीही साबित करू शकत नाही, तेव्हा ( झाल याचं पालुपद सूरू) टिआरपी आणि व्कालिटी लिखाण यायच मिपावर, कंपू नावाचा प्रकारच नव्हता.आता तुम्ही कुठल्या तरी एका कंपुत असल्या शिवाय तुमच लिखाण चालणारच नाही, मग तो प्रस्थापित असो वा दुर्लक्षित वा शिशु वर्ग वा रिव्हर्स कंपु !! कोणीही क्वालिटी लिखाण केल तर त्यावर बिनधास्त पणे जावुन प्रतिसाद द्यायची हिम्मत प्रतिसादकांमध्ये होती, हल्ली बोटावर मोजण्याईतपत चांगल्या दर्जाचे लिखाण येते. ते ही लेखक जरा अवांतरबाजी मुळे जरा जपुनच टाकतात. काही आयडी तर दिसेल त्याच्यात/तिथे काड्या कश्या करता येतील याचाच विचार करत सकाळपासुन मिपावर देव पाण्यात बुडवुन बसलेले असतात. वर तुम्ही आधीच ऊल्लेख केलेत त्यामुळे नावानिशी उल्लेख टाळतो आहे.
काव्य विभाग हा त्यावेळी कोणाची ही मक्तेदारी नव्हती, माझ्या सारख्यांना काव्य कळत नसले तरी वाचनीय असायचे हे नक्की ! विषेश म्हणजे त्यात ही दर्जा असायचा, हल्ली काव्य विभाग आहे की सांडपाण्याची व्यवस्था तेच कळत नाही.त्यात त्याच दर्जेदार काव्यांची त्याला तोडीस तोड असणारी विडंबने पण यायची. ( ही आठवण म्हणून ) साक्षात श्रामोंसारख्या पट्टीच्या लेखकास एक दिवस काव्य करण्याचा मोह आवरला नाही, त्यांच काव्य प्रसवल्यानंतर अर्ध्या तासात त्याच काव्याची दहा विडंबने झाली होती.हल्ली काही आयडींचा वावर म्हणजे " टिआरपी साठी काय पण ! " असा झाला आहे. फॅन क्लब संभाळण्याचा तर ट्रेन्डच आला आहे.
बर्याच दिवसांपासुन एखाद छानसं " पुस्तक परिचय " वाचल नाही मिपावर. प्रवास वर्णनाच्या नावाखाली काय पाहतो आहे तर, मिपाकर मंडळी चे फोटोज, व्यक्ती चित्रण तर कदाचित कोठडीत बंद करून ठेवल्या गेले आहे, संपादक उठ-सुठ घरचे प्रॉब्लेम्स डिसकस करत बसतात, ( उगाच तो 'धम्या' असल्या धाग्यांना पूरूषांची मंगळागौर म्हणत नाही. ) मॉर्गनचा क्रिकेटवरचा लेख नाही, विमुक्त ची स्वैर भंटकती नाही.. असे बरेच लेखक आहे, तो फट्टु ऊर्फ धन्या कुटं खपला काय माहीत ? मास्तरांच तीन वेळा वाचुन समजणार क्र्पिप्टीक नाही, सोशल विषय तर काही महाभाग सरळ पेपरातुन उचलुन लिहीतात किंवा मग प्रांसगिक लिंका आणून डकवतात. त्यात डोक्याला शॉट म्हणजे स्वताच्या धाग्यावर स्वताच ऊत्तरे ही देत बसतात. अरे मित्रा, एखाद उत्तर किंवा धन्यवाद म्हणुन ठीक आहे, पण स्साली राळ ऊठवतात, आणि बोलायला गेले तर म्हणे दुखावल्या भावना !! (अबे लेका बोर्डावर नाचतोय तू , पब्लीक शिट्ट्या वाजविणारच की ) तेव्हा आमचा तात्या द्यायचा उत्तर , स्साल त्याच एक " कोंकणी " वाक्य जरी आल तरी पब्लीक उचलून धरायच. ( भौ, तात्या बाह्यजगतात कसाही असो, साईट चालवावी तर तात्याने असे आपले स्पष्ट मत आहे. एका साध्याश्या कौलाला अर्ध्या तासात पन्नास प्रतिसाद घेणे म्हणजे काही खेळ नव्हे. )
वर जागुताईंचा आणि शिल्पीचा ऊल्लेख केला आहे म्हणुन सुखावलो जरासा, जागुताई तर बेस्ट च ! पण त्या शिल्पी ला प्रतिसांदामधुन बाहेर निघुन लेखन करायला सांगा की , अजुन माहीत नसेल तर सांगतो , तिच्या ब्लॉगवरच लेखन वाचा कधीतरी ! " टची आणि डाऊन टू अर्थ " कसं लिहायचे याचा धडा नक्की मिळेल तुम्हाला. एक विनंती ही आहे, स्पावड्या चा " पास्ट " चा उल्लेख टाळत चला जरा, एक मित्र म्हणुन तुम्ही एकांतात थट्टा करा हवी तर, पण त्याचा त्याचे शत्रु फायदा ऊठवू शकतात. आधी एकदा घडलय ते ! बाकी तुम्ही सुज्ञ आहातच !!
जाता जाता : स्पष्ट पणे लिहीले याचा राग नसावा, पण भोवताली सगळ चान चान आहे, किंवा होत म्हणून स्मरणरंजनात रमू नये, देव करो आणि मिपाला गतवैभव पुन्हा प्राप्त होवो.
31 Aug 2012 - 10:15 am | गवि
....
काय बोलणार. तुझं सडेतोड मत दिल्याबद्दल आभारी आहे इतकंच म्हणतोय. अजूनही एक भाग लिहीणार होतो. त्यात जसं आठवेल तसं बरंवाईट इतरही (पण फक्त माझ्या दृष्टिकोनातून) लिहिणार होतो. चान, पुभाप्र, प्रकाटाआ वगैरे जार्गन्सनी नव्यानव्या मेंबराचे होणारे घोळ. मिपाची मला समजलेली खास परिभाषा, इथे झालेले मित्र, कट्ट्यांचे अनुभव, त्यात सामील होतानाचे विचार आणि इतर वेगवेगळ्या अनरिलेटेड मार्गाने मी हा प्रवास करणार होतो. तू जे लिहिलंयस ते सडेतोड आहेच, पण माझ्या या धाग्याचं सूत्र पूर्वीचं मिपा आणि आताचं यांची तुलना असं नव्हतंच. हे फक्त आले तसे विचार, नॉट नेसेसरिली भावुक, होते.
टीका करणं प्रगतीसाठी आवश्यक असलं तरी त्याला लागणारा अनुभव माझ्याकडे नाही आणि तसा पिंडही नाही. तू जे भाष्य केलं आहेस तसं काही करण्यासाठी मला अजून तीनचार वर्षं इथे रहावं लागेल. किंवा कदाचित पुढील तीनचार वर्षांपेक्षाही सुरुवातीपासूनची चारपाच वर्षं मिपासोबत वाढलेल्या तुझ्यासारख्या सदस्यांपैकी कोणी असं भाष्य करु शकेल. माझ्या दीड वर्षाच्या मेंबरशिपमधे मला पूर्वी आणि हल्ली अशा तुलनेइतका अवसर मिळालेला नाहीये. तेव्हाही मी जेनेरिक भाष्य करु शकेन का माहीत नाही. बदल अपरिहार्य आहे, पण तेव्हाही कोणी ना कोणी उत्तम वेगळं काहीतरी घेऊन येतच असेल अशी आशा नेहमीच आहे.
धाग्यामधे ज्या आयडींचा उल्लेख आहे तो केवळ स्नेहामधून आहे असा डिस्क्लेमर टाकायला हवा होता.. :)
31 Aug 2012 - 6:40 pm | पैसा
हे कशासाठी म्हणे? अजून लिहा की!
सुहासने लिहिलंय आणि त्यातल्या काही गोष्टी पटणार्या आहेत. पण तरी...खरं तर मीही तुमच्या जरा आधीच इथे मेंबर झाले त्यामुळे ५ वर्षांपूर्वी इथे काय होतं याबद्दल मी न बोलणं चांगलं. पण गेल्या दोन अडीच वर्षांत तरी इथे कंपू आहेतच. त्यापूर्वीही होते असं जुने लोक सांगतात. तेव्हा त्याबद्दल सुहास म्हणतोय ते नॉस्टॅल्जिक आहे असंच मी म्हणेन. हा माणसाचा स्वभावच आहे की भूतकाळातल्या गोष्टी जास्त आकर्षक वाटतात. अगदी जोरदार कडवट वादविवाद भांडणांच्या आठवणीसुद्धा भूतकाळातले म्हणून सुखद वाटायला लागतात. मी कोणत्याही कंपूत सामील नाही. पण माझा तरी अनुभव असा आहे की बरेचदा जवळचे मित्र म्हणवणारे लोक तुमच्या लेखावर प्रतिक्रिया देत नाहीत, तर जे कोणत्याही कंपूत नाहीत ते नक्कीच देतात!
आणखी एक पैलू आहे. माझा बिल्ला नं. १०९५२. गेल्या २ वर्षांत मेंबर्सची संख्या १९२०० च्या आसपास झालेली आहे. म्हणजे जवळपास दुप्पट. मिपा बदलत आहे आणि बदलणारच. सुरुवातीला अवखळ झरा असलेली नदी हळूहळू शांत होत जाते. तसं होणं अपरिहार्य आहे. सदस्य संख्या वाढणार तशी धाग्यांची संख्या वाढत जाणार. त्यातले चांगले वाईट फरक ठळक करणारे आपण वाचकच आहोत. मालक बदलले. बरेचसे संपादक बदलले तरी मिपा अजून लोकप्रिय आहे आणि मायबोलीनंतर इतकं यशस्वी दुसरं मराठी संस्थळ मला तरी माहिती नाही.
संपादकांबद्दल सुहासने लिहिलंय त्याला माझा पास. संपादक हे इतरांसारखेच सामान्य सदस्य आहेत हे सर्वांनीच लक्षात ठेवलं तर बरं. साहित्याबद्दल बोलायच तर अजूनही खूप चांगले धागे येतात. नियमितपणे लॉगिन करणार्याला "इथे हल्ली चांगले धागे येत नाहीत" असं वाटायचं कारण नाही. गेल्या महिन्यात सुरू झालेलं "अन्न हे पूर्णब्रह्म सदर", जयंत कुलकर्णी, मोदक, वल्ली यांचे इतिहासावरचे धागे/मालिका, रमताराम, गवि, श्रामो, नीतिन थत्ते, बिका, नगरीनिरंजन, चिगो यांचे वैचारिक लेखन, काही गडकिल्ल्ल्यांचे फोटो असलेले धागे, पराची फटकेबाजी, ५० फक्त आणि अपर्णा अक्षय यांच्या कादंबरी मालिका कितीतरी चांगले धागे आठवत आहेत. क्लिंटन, मन१, अर्धवटरावांचे आणि इतर काही जणांचे प्रतिसाद स्वतंत्रपणे वाचनीय असतात. (ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी रागवू नका!) अर्थात काय चांगलं वाईट हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. पण परिस्थिती वाईट आहे असं मला वाटत नाही.
लवकरच मिपा द्रुपल ७ वर नेण्यात येणार आहे. बरेच काही बदल होणार आहेत. त्यांचं स्वागत करूया! आणि गवि तुमचा पुढचा लेख जरूर लिहा. आम्ही वाट बघतो आहोत.
31 Aug 2012 - 10:25 pm | सोत्रि
पैसातैच्या शब्दाशब्दाशी सहमत!
ह्याचा अर्थ असा नाही की सुहासने जे व्यक्त केले आहे ते रास्त नाही. सुहासशी काही अंशी (बराचसा) मी सहमत आहे. मी मिपावर रुळायला किंवा मिपाचा जो USP होता तो सुहासने अगदी यथार्थ व्यक्त केला आहे. पण काळाबरोबर सर्व बदलते, नव्हे बदलावेच लागते. मिपाही त्यातुन जात आहे किंवा असेलही पण त्यामुळे गविंनी जे लिहीले आहे त्याची परिणामकारकता कमी होते असे नाही.
सदा सर्वकाळ 'जुने ते सोने' हे उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. हे म्हणजे किशोरकुमार किती अस्सल आणि कुमार सानू किती नक्कल ही तुलना करण्यासारखे झाले.
असो, गवि तुम्ही तुमच्या चष्म्यातुन आम्हाला, तुम्हाला जसे मिसळपाव भावले ते लिहून कळवाच. कारण आमचा तुमच्या लेखणीवर सार्थ विश्वास (आणि टंचंनिकेवर जीव ;) ) आहे.
- ( ही मिसळपाव बखर आवडलेला) सोकाजी
1 Sep 2012 - 6:14 pm | चौकटराजा
मला आता मिपावर येऊन पाचेक महिने झाले असतील. पण परिस्थिती वाईट आहे असं मला वाटत नाही. या वाक्याला माझा पाठिंबा आहे.काही निरि़क्षणे अशी आहेत की त्यात
मिपाचे मालक संपादक काहीही करू शकत नाहीत. कारण मुक्तद्वार व्यासपीठ म्हटल्यावर फारसा रोल
मालक किंवा संपादक याना रहात नाही.मिपावर मला आढळलेला दोष हा ऑर्कुट व फेसबुकवरही आढळलेला आहे तो म्हणजे कंपू बाजी. वैचारिक कंपूबाजी. त्यामुळे अयोग्य ठिकाणी प्रतिसादांची खैरात
तर काही धागे वेगाने मागे पडण्याची सोय. दुसरे असे की प्रतिसादाला इथे प्रतिप्ततिसाद देण्यात जवळ जवळ सर्वच सदस्य चिकटपणा करतात. काही वेळेस प्रतिसादही लेखाइतकच माहितीपूर्ण असू शकतो.पण मुळ धागाकर्त्यालाच प्रतिसाद दिला जातो.. धाग्याच्या विषयापेक्षा धागाकत्याची वाहवा किंवा निंदा कशी करता येईल याचा प्रयत्न दिसतो. धागा कर्ता हा केवळ निमित्त असतो. धागा महत्वाचा. पण एखाद्या विषयावर प्रतिसाद दिल्यास त्या प्रतिसादांची दखल घेण्याचे प्रमाण कमीच आहे. उलट प्रतिसाद लिहिंण्यापेक्षा वेगळा धागा काढा ! दुसर्याच्या धाग्यात तुमचे गुर्हाळ नको अशा अर्थाचे व्यनि पाठविले जातात. बरेचसे सदस्याना विशेषता: नव्याना नाउमेद करण्याचा उद्यम काही आयडी करतात. पी आर ओ वाढवा व धाग्यात लोकप्रिय व्हा ही संस्कृति ज्यानी खस्ता सोसून मिपा काढले त्याना नक्कीच अपे़क्षित नसावी. तरीही म्हणतो पण परिस्थिती वाईट आहे असं मला वाटत नाही.
31 Aug 2012 - 10:35 am | श्रावण मोडक
हा असा विचार करता येतो तर एरवी बऱ्याचदा अंगात आल्यासारखं वागण्याचं कारण काय? संताप वगैरे ठीक आहे. तो सारखाच व्यक्त करत बसलास तर हे असं संतुलित लिहिलेलंही वाऱ्यावर जातं.
हा सल्ला वैयक्तिक नाही, तो 'सुहास..' या आयडीच्या एकूण लेखनक्षमतेसाठी आहे. तरीही क्षमस्व!
31 Aug 2012 - 12:06 pm | सुहास..
तुमच्या लेखणीतुन प्रसवलेल 'क्षमस्व' वाचण्यापुर्वी माझ्या मॉनीटर ला आग का लागली नसावी !!
एरवी बऱ्याचदा अंगात आल्यासारखं वागण्याचं कारण काय? संताप वगैरे ठीक आहे >>>
थोडासा संताप आहेच ! का नसावा ? कोणीच बोलत नाही म्हणुन बर्याच मंडळीना शेफारताना या डोळ्यांनी पाहिले आहे . बाकी अंगात येण्याची लेखन प्रेरणा तुम्हीच आहात ;) ...आठवा .. " ही नको त्या वेळी 'लोकशाही ' बरी अंगात येते तुमच्या ! "
31 Aug 2012 - 12:36 pm | पुण्याचे वटवाघूळ
अगदी १००% मान्य.
31 Aug 2012 - 1:24 pm | श्रावण मोडक
असलाच पाहिजे. व्यक्तही केला पाहिजे. :-)
31 Aug 2012 - 2:03 pm | सुहास..
वाघुळ मित्रा , ते वाक्य माझं नाही , खुद्द श्रामोंनी एकदा एका सिनीयर संपादकाला खडे बोल सुनावताना वापरलेले वाक्य आहे ते ! :)
31 Aug 2012 - 8:46 pm | रेवती
सगळा प्रतिसाद काही पटला नाही. मिपाचे मालक, चालक, संपादक बदलले की हे सगळे बदल होणारच. तुझ्या काही कल्पना असतील तर मिपा मालकांकडे आराखडा द्यावास. संपादकांचे वागणे पटले नाही तर ओरडा होतच असतो. ते आता नवीन नाही. यात बदल हवे असल्यास नीलकांतला व्य. नी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्या सुविधेचा फायदा करून घेतल्यास बदल होण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणता येतील. तात्यांनी स्थळ चालवले ते चांगलेच होते. सगळ्यांनाच मान्य असेल. त्यानंतर दर्जा खालावत गेल्यामुळे जे तुझ्याशी खासगीत बोलले ते आणि तू यांनी अत्यंत दर्जेदार लिखाण कितीवेळा दिलेत? नियमीतपणे महिन्यादोन महिन्यांनी अत्यंत सुंदर लिखाण देण्याचा परिपाठ का ठेवला नाही? जे सदस्य पूर्वी येऊन नियमीत लिहायचे ते आता येत नसल्याचे कारण फक्त मिपाचा दर्जा हे एकच असण्याची शक्यता आहे काय? इतर कारणे नसतील असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही काय? एकवेळ मिपा बंद पडेल अशी आली होती. हे संस्थळ निदान आहे तसे चालू अवस्थेत रहावे यासाठी प्रयत्न काही ज्येष्ठ सदस्यांनी केले. नीलकांतने येऊन सगळी जबाबदारी घेतली. एकदा मूळ मालक (काही कारणाने) सोडून गेल्यावर लोकांची जमवाजमव करण्यात काही वेळ जाणे हे अपरिहार्य आहे. तुला आणि ज्यांना हे संस्थळ ब्राह्मणी वाटते त्यांनी ते तसे वाटू नये म्हणून प्रयत्न करायला कोणाची ना आहे? मिपाचे नियम पाळून लिहायला तुला कोणी मनाई केलीये? बर्याच दिवसांत मिपावर चांगला पुस्तक परिचय, सिनेमाचे परिक्षण, कथा आली नाहिये असे वाटते त्यावेळी आपण काय करू शकू? असे का नाही वाटत? कविता विभागाला तू ज्याप्रकारे संबोधलं आहेस त्यावर मात्र पुन्हा विचार करावास असे वाटते.
31 Aug 2012 - 9:26 pm | सुहास..
रेवाकाकू , हे असे कोणाचे तरी कान टोचले जाणार हे ही मी गृहीत धरलेच होते . आता सध्या ( खरच ) जरा बिझी आहे ..पण सविस्तर लिहीनेच ...फक्त अजुन " पोल-खोल " झाली तर राग येवु देवू नकोस. शेवटी " कळकळ " आहे म्हणुन च बोलतो.
संपादकांना ग्गोड - ग्गोड , गुलाबी गुलाबी कोथरूड च्या गल्ल्यांमधुन, जरा चाकण चा कचरा डेपो दाखवायची वेळ आणलीच तू :)
( फक्त रडारड करू नका नंतर कांताकडे जावून )
31 Aug 2012 - 10:20 pm | रेवती
मला कचरा डेपो बघण्याची इच्छा नाही. रोज जेवढा दिसतोय तो पुरेसा आहे. सांगायचं एवढच आहे की स्वत:कडेही तीन बोटे असतात हे विसरून चालणार नाही. कालच्या मिपावर तुला जे चित्र दिसले ते कदाचित आज बदललेले असू शकते. काही प्रश्न नव्या मंडळाने वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. तो अयस्वी झालेला असू शकतो.
तूही काल होतास तसा आज नाहीस. खूप रागाने प्रतिक्रिया देणारे सदस्य आज निवळू शकतात तर कालपर्यंत गोग्गोड वाटणारे तलवार घेऊन येऊ शकतात.
फक्त रडारड करू नका नंतर कांताकडे जावून
तुला नक्की हेच म्हणायचे आहे?
31 Aug 2012 - 8:06 am | ५० फक्त
लई भारी ओ गवि,
अवांतर - मिपावर निवडणुका येई घातल्या काय मिपाजी वन गौरव पुरस्कारासाठी ?
31 Aug 2012 - 12:53 pm | सूड
मस्तच ! आवडल्या गेले आहे.
माझी अवस्था 'असा मी असामी'तल्या बेंबट्यासारखी झाली आहे. गविंनी लिहीलेलंही पटतंय आणि डॉटवाल्या सुहासने म्हटलेलंही काही प्रमाणात योग्य वाटतंय. ;)
31 Aug 2012 - 8:43 am | पाषाणभेद
फारच छान
31 Aug 2012 - 10:19 am | दिपक
गवि तुमचा मिपाप्रवास आवडला. लिहित रहा.
31 Aug 2012 - 9:55 am | घाशीराम कोतवाल १.२
मतितार्थ म्हणजे आमचा परा महा हल़कट शिरोमणी आहे
पण नाना एव्हडा नाही
31 Aug 2012 - 10:28 am | टिवटिव
फारच छान!!!
मला जे. पी. मॉर्गन यांच्या क्रिकेट वरिल लेखाने मिपा चि ओळख झालि. तेव्हापासुन दिवसभर मिपावर पडिक असतो.अर्थात वाचनमात्र...
31 Aug 2012 - 10:30 am | स्वप्निल घायाळ
गवि राव एकदम झ्कास !!!!
31 Aug 2012 - 10:41 am | प्यारे१
गविंना हे असं लिहीण्याची काय गरज पडावी ब्रं?????
असो.
चान चान.
31 Aug 2012 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार
लेखनात आणि प्रतिसादात आमचे नक्की कौतुक केले आहे, का अपमान केला आहे हे समजले की सविस्तर प्रतिक्रिया देईनच.
31 Aug 2012 - 12:26 pm | गवि
हॅ हॅ हॅ, बस का पराषेट.. बाकी सर्व जाऊ दे.. तुम्हालाही डिस्क्लेमरची गरज भासावी?
31 Aug 2012 - 12:33 pm | इरसाल
नका जाउ हो गवि त्यात काय इतके राग मानायचे ते ?
31 Aug 2012 - 2:19 pm | सुमीत भातखंडे
एकदम मनातलं...
31 Aug 2012 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते
क्या बात है! छानच हो गवि! आधी मलाही प्रदीपदांना वाटलं तसं वाटलं! :)
31 Aug 2012 - 4:29 pm | सातबारा
या धाग्याच्या निमीत्ताने इन्द्रराज पवारांच्या मेगाबाइटी प्रतिसादांची पण आपण आठवण काढू यात.
31 Aug 2012 - 10:34 pm | सोत्रि
मला वाटते की इंद्रराज पवार, संजोपराव, घासकडवी.... हे सगळे 'अपूर्ण' ह्यात सामावलेले असावे!
-(मिपाकर) सोकाजी
31 Aug 2012 - 8:16 pm | जयनीत
म्हटलं गवि निरोप घेताहेत का?
नाय तसं!
लगे रहो....
31 Aug 2012 - 10:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटलं गवि कुठं चाल्ले की काय ? :)
-दिलीप बिरुटे
1 Sep 2012 - 3:43 pm | नीलकांत
तुमची मिपा सफर आणि सदस्यांबाबतच्या आठवणी आवडल्या.
छान लेखासाठी धन्यवाद.
- नीलकांत
3 Sep 2012 - 5:58 pm | आदिजोशी
मिपा चा भूतकाळ हा जितका भावूक करणारा विषय आहे, तितकाच तो अनेक अतर्क्य निर्णयांमुळे क्लेषकारकही आहे.
मात्र, सुरुवातीचं मिपा मनापासून आवडत होतं. मिसळकट्टे जोरात होते. त्यानंतर मध्यंतरी मिपा प्रचंड गंडलं होतं. आता पूर्वीइतके अॅक्टीव्ह नसल्याने सद्ध्याच्या परिस्थिती विषयी भाष्य करू शकत नाही.
एकच सांगतो, पूर्वी आमचं मिपा म्हणजेच एक मोठा कंपू होता.
3 Sep 2012 - 8:08 pm | यशोधरा
अॅड्या, काय बोललास रे!
3 Sep 2012 - 10:04 pm | शैलेन्द्र
माझ्यासारखा माणुस काय बोलणार?
मी साधारण गेली पाच वर्षे मीपावर आहे. माझ्यासारखे अनेक सदस्य असतील ज्यांनी सवडीनुसार व कुवतीनुसार कधी प्रतिक्रिया दिल्या, कधी थोडे पांढर्यावर काळे केले. काही व्यवधानांमुळे म्हणा किंवा स्वभावधर्मानुसार म्हणा, आम्ही जालीय विश्वाशी आमच्या आयुष्याची सांगड घालु शकलो नाही. काही व्यक्तींशी/आयडींशी खर्या आयुष्यात मैत्री कराविशी वाटते/ वाटेल- कधी जमते कधी नाही योग येणार
सुहास म्हणतो तो काळ पाहीला तसचं स्थित्यंतरानंतरचा काळही पाहीला. काही गोष्टी अपरिहार्य असतात. त्या तशा घडतातच, पण आजही दोन घटका निवांतपणा मिळाला किंवा हवा असला तर मिपा नक्किच उघडल जात, आणी आजही इथला झरा वाहताच आहे.. पाणी कदाचीत बदललही असेल..
बाकी गविंचा लेख मस्तच..
13 Jan 2021 - 7:58 pm | NAKSHATRA
मस्त मस्त मस्त