मंडालेचा राजबंदी-१: http://www.misalpav.com/node/22036
मागील भागात आपण दुष्काळ तसेच प्लेगचे आलेले संकट, दुष्काळ निवारन्यासाठी टिळकांनी केलेले प्रयत्न, प्लेगच्या साथीत सामान्य नागरिकांवर झालेले अत्याचार याची माहीती घेतली. या भागात अत्याचारांमुळे लोकांमध्ये निर्माण झालेला असंतोष व त्याचा कसा स्फोट झाला हे जाणून घेऊया.
*************************************************************
प्लेगच्या त्या भीषण काळात पुणेकरांना मार्गदर्शन करण्याची तसेच रँडच्या जुलूमशाहीविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती देण्याची क्षमता फक्त टिळकांमध्येच होती. रँडशाहीविरुद्ध ना. गोखलेंनी इंग्लंडमध्ये आपली बाजू मांडली पण त्यांनी नंतर याबद्दल माफी मागितली. टिळक हे आपला युक्तिवाद पायरी-पायरीने आणि प्रमेय पद्धतीने मांडत आणि सावज पूर्णपणे हद्दीत आले कि त्यास धोपटून काढत. प्लेगसंदर्भात सरकारी उपाय योजनांना सहकार्य करण्याचे आवाहन टिळकांनी केले होते मात्र अतिप्रसंग, मानहानी, स्वैराचार यांनी सूळसुळाट माजविल्यावर त्यांनी लेखणीची धार अधिक तीव्र केली. अठरापगड जाती-जमाती, हिंदू, मुस्लीम, जैन अशा सर्वाना त्यांनी एकत्र आणले आणि अत्याचार वाढला कि तो संपायची जिद्द बाळगायची असते असा कानमंत्र दिला.
'पुण्यात चालू असलेला धुमाकूळ' व 'पुण्यात आलेला सध्याचा प्रसंग' अशा अग्रलेखातून टिळकांनी गव्हर्नर लॉर्ड सँढर्ष्ट व सरकारसमोर रँडच्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यांनी प्लेगव्यवस्थेची तुलना थेट मोगलायीशी केली. त्याच सुमारास पुण्यात मोहरमवर बंदी घातली होती. 'मोहरमच्या मिरवणुकीवर बंदी घालणे किंवा ताबुतही बसू न देणे हा प्लेगच्या हाहाकारावर उपाय ठरू शकत नसल्याचे ' त्यांनी स्पष्ट केले. पुण्याच्या मुसलमानांनी यावेळी स्वस्थ बसू नये. आपल्या तक्रारी गव्हर्नर साहेबांपुढे मांडून उत्सव करण्याची परवानगी मिळवावी. कोणत्याही जातीच्या धर्मसमजुतीत सरकारने निष्कारण हात घालणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. तरीही त्यावर्षी मोहरण सार्वजनिकरित्या पार पडू शकला नाही.
व्हिक्टोरिया राणीच्या राज्यकारभारास साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी 'महाराणी सरकारचा जयजयकार' या अग्रलेखात(१५ जून १८९७) इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा गौरव केला होता. इंग्रजांनी सत्ता विस्तारासाठी आणलेल्या तारयंत्र, आगगाड्या, आगबोट यांचा उल्लेख केला होता. पण यामुळे गेल्या साठ वर्षात इंग्रजांप्रमाणे भारतीय लोकांची भरभराट झाली असे म्हणता येणार नाही असे लिहित शालजोडीतले जोडे हाणले. याच अग्रलेखाशेजारच्या स्तंभात 'शिवाजीचे उद्गार' या शीर्षकाखाली एक कविता प्रसिद्ध करण्यात आली होती. या कविताखाली कवीच्या नावाऐवजी "निशाणी भवानी तलवार" असा उल्लेख केला होता. या कवितेतील श्लोकात रँडने वाईमध्ये शेतकऱ्यांवर केलेल्या तसेच पुण्यात स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचे वर्णन केले होते. तसेच त्यात 'या देशाला इंग्रजांनी लुटले आणि देशात दुर्भिक्ष्यासह रोगाची अक्काबया आणून ठेवायलाही त्यांनी कमी केले नाही. लक्ष्मीला तर परक्या लोकांकडून छळण्यात आले असून ते तिला ओरबाडून घेऊन जात आहेत. आपल्या देशातील विपुलता, संपन्नता कुठक्या कुठे गेली आहे तर आरोग्यही त्यापाठोपाठ निघून गेले हे आपल्याला विसरून चालणार नाही' असे स्पष्ट केले होते. सरकारच्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्या भारतीय संस्थानिकांवरही ताशेरे ओढण्यात आलेले आहेत.
कवितेतील काही महत्वाच्या ओळी:
'ऐशीं हाताळती अतां नृपकुले दुर्दैव हे ओढले
सारे केवळ हे दळ्ये बुदबुळ्ये राजे कसे जाहले'
अर्थ: सध्याची संस्थाने आणि त्यांचे राजे हे आपले दुर्दैव. हे राजे आहेत तरी कोण तर बुळ्ये आणि खालमुंडे. त्यांच्याकडून अपेक्षा तरी कशाची करणार?
'आता अग्निरथांत संधि बघुनी हस्ते स्त्रिया ओढिती
षण्ढांनों करितां कसें सहन हें लावून घ्या दाद ती'
अर्थ: महिलांची, आपल्या आयाबहिणींची छेड रेल्वेगाड्यांमधून काढली जात असताना हे आपण कसे सहन करतो? त्यांचा हा बीभत्स चाळा आता संपवा. उठा, आता बस झाले, संपवून टाका हे सगळे.
पुण्यात प्लेगचा थयथयाट चालू असताना संपन्न आणि बऱ्यापैकी स्थिती असणाऱ्या लोकांची बेफिकिरी वाढत चाललेली होती. टिळकांनी प्लेगासाठी स्वतंत्र इस्पितळ उभे करण्याची कल्पना मांडली. पहिल्याच प्रयत्नात त्यासाठी ८०० रुपये गोळा झाले. 'इस्पितळ हे वरच्या वर्गाकरिता राखीव नसून त्यात आजारी असणारा प्रत्येक माणूस दाखल व्हावा आणि त्यावर तातडीने योग्य ते उपचार करावेत' असे टिळकांनी बजावले होते. त्यातच नंतर रँडशाहीचा मस्तवालपणा वाढत चालला होता. 'हल्ली जी मोगलाई उर्फ रँडशाही आहे ती फार दिवस टिकणे शक्य नाही. लोक कितीही गरीब असले तरी हा जाच फार काळ सहन करतील असे नाही. लोक आता प्लेगने मेलो तर मेलो पण या त्रासातून सुटका करून घेऊ' अशा पायरीपर्यंत आल्याचे सांगून टिळकांनी सरकारलाच सावधगिरीचा इशारा दिला होता. लोकांमध्ये या अत्याचारांविरुद्ध असंतोष तर खदखदतच होता पण आता संयमही सुटत चालला होता.
शिवजयंतीचा उत्सव टिळकांनी सुरु केला. पण त्याआधीपासूनच पुण्यात शिवराज्याभिषेकोत्सव होत असे. हा उत्सव १२ जून रोजी लकडी पुलानजीकच्या(सध्याचा संभाजी पूल) विठ्ठल मंदिरात पार पडला. या सभेचे अध्यक्षस्थान टिळकांनी भूषविले होते. प्लेगच्या काळात स्वराज्याविषयी निष्ठा व्यक्त करण्याची आणि खदखदणाऱ्या असंतोषाचे प्रतिक म्हणून पुणेकरांनी या उत्सवाला गर्दी केली होती. सभेच्या सुरवातीलाच प्रा. चिंतामण भानू यांनी 'अन्याय, अत्याचार, दृष्टपणा यांचेच राज्य जिथे चालते तिथे मग अफजलखानासारखाचा कोथळा बाहेर काढावा लागतो. अफजलखानाला मारल्याशिवाय त्याची पुंडाई संपुष्टात येणे शक्यच नव्हते ' असे विचार मांडले व टाळ्यांचा प्रचंड कडकडात झाला. या भाषणानंतर चापेकर या तरुणाने स्वतः रचलेल्या दोन-तीन कविता सदर केल्या ज्यामध्ये प्लेगसंबंधी व त्यामध्ये स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांचा समावेश होता. त्या कवितेतील काही ओळी:
'होती काय बिशाद वक्र नयने पाही परस्त्री कुणी
म्यानातून सहस्त्र तीक्ष्ण असिका बाहेर ये त्य क्षणी
आता अग्निरथांत संधि बघुनी हस्ते स्त्रिया ओढिती
षण्ढांनों करितां कसें सहन हें लावून घ्या दाद ती'
या कवितेतला जहाल आशय लक्षात घेऊन टिळकांनी प्रथम चापेकरांनाच प्रश्न केला कि, 'इथे ज्यांनी भाषणे केली ते षंढ, तुम्ही मात्र पौरुषत्व जागवणारे ना? मग रँड जिवंत कसा?'
सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या टिळकांनी 'अफजलखानाचा वध हा छत्रपती शिवाजीमहाराजांनी केला व तो न्याय्यच आहे ' अशा खणखणीत शब्दात व्याख्यानाला सुरुवात केली. 'फळाची इच्छा न ठेवता कर्म आचरल्यास कोणताही दोष मानता येत नाही. श्रीशिवाजीमहाराजांनी स्वताचे टीचभर पोट भरण्यासाठी काहीही केले नाही. सात्विक बुद्धीने, परोपकाराने त्यांनी खानाला मारले. आमच्या घरात जर चोर शिरले आणि त्यांना घालवण्याएवढा जोर आमच्या मनगटात नसेल, तर त्यांना खुशाल कोंडून घालून जाळावेत. मोगलांना हिंदुस्थानच्या राज्याचा ताम्रपट परमेश्वराने दिलेला नाही. आपल्या जन्मभूमीत त्यांना हाकलून लावायचा महाराजांनी जो पराक्रम केला त्यात पराभिलाषाचे पाप नाही. विहिरीतल्या बेडकाप्रमाणे आपली दृष्टी आकुंचित करू नका. ज्या राष्ट्राला थोडक्याप्रसंगी तरी एक होता येत नाही, त्या राष्ट्राने उर्जित दशेस चढण्याची आशाच करू नये' अशा शब्दात टिळकांनी अफजलखान वधाचे समर्थन केले व आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचा संदेशही दिला.
चापेकर बंधूंच्या डोक्यात टिळकांनी केलेला प्रश्न घुमत होता, 'मग रँड जिवंत कसा? सोजीराना(गोऱ्या शिपायांना) शिक्षा देऊन काय होणार? ते तर आपल्या वरिष्ठांचे हुकुम पळत असतात'. २२ जून रोजी अखेर चापेकर बंधूनी गव्हर्नर हाउसवर मेजवानी करून घरी परतणाऱ्या रँड व आयर्स्ट या दोघांवर गोळ्या झाडल्या. आयर्स्ट गोळी लागताच ठार झाला, तर रँड विव्हळत पडला होता. रँडच्या फुप्फुसात गोळी आरपार गेली होती पण अंगात धुगधुगी होती. १ जुलैपर्यंत तो तळमळत होता. अखेरीस ३ जुलै रोजी मृत्युमुखी पडल्याचे जाहीर करण्यात आले व भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईचे नव्याने रणशिंग फुंकले गेले.
टिळकांचे पुण्यातील सभेतील भाषण, अग्रलेखातून केलेले लिखाण यामुळेच रँडचा वध करण्यात आला असे पालपुद मागे लावून त्यांना राजद्रोहाच्या खटल्यात कसे अडकविण्यात आले, यात त्यांना झालेली शिक्षा, बचावाचे अयशस्वी प्रयत्न हे पाहूया पुढील भागात....क्रमश:
प्रतिक्रिया
9 Jul 2012 - 11:53 am | सुधीर
टिळक हे आपला युक्तिवाद पायरी-पायरीने आणि प्रमेय पद्धतीने मांडत.
याचा प्रत्यय गीतारहस्य वाचताना येतोय.
'फळाची इच्छा न ठेवता कर्म आचरल्यास कोणताही दोष मानता येत नाही.'
गीतारहस्य मधल्या "सिद्धावस्था आणि व्यवहार" या प्रकरणात वरील वाक्याच्या ("ज्याची बुद्धी शुद्ध आहे" ही महत्त्वाची क्लॉज-पोटवाक्य-टाकून), समर्थनार्थ त्यांनी, हिंदू धर्मातल्या मातृहत्या करणार्या परशुरामाचे, पितामह-गुरुहत्या करणार्या अर्जुनाचे, तर ख्रिस्थी धर्मातल्या मुलास बळी चढवणार्या अब्राहमचे आणि गौतम बुद्धाच्या सासर्याला शाप देण्याचे उदाहरण दिले आहे.
9 Jul 2012 - 11:57 am | llपुण्याचे पेशवेll
कॉलिंग चाचा कॉलिंग.
अमितराव लेख दणदणीतच. जाता जाता हे प्रो. भानू म्हणजे नाना फडवीसांचे वंशज आणि तत्कालिन प्रसिद्ध कथा कादंबरीकार होत.
9 Jul 2012 - 12:56 pm | प्रचेतस
अत्यंत माहितीपूर्ण व वाचनीय.
पुभाप्र.
9 Jul 2012 - 1:35 pm | अन्या दातार
पुभालटा
ुूू
9 Jul 2012 - 3:45 pm | रणजित चितळे
वाचत आहे. प्रतिसाद देतोच.
9 Jul 2012 - 3:50 pm | चावटमेला
माहितीपूर्ण लेख. वाचतो आहे.
9 Jul 2012 - 4:41 pm | मन१
वाचतोय.
अवांतर :- टिळकांचे विचार व कार्य ह्याबद्दल उपद्रवी अवांतर टाकायची व धागा भरकटावायची जाम इच्छा होते आहे.
9 Jul 2012 - 4:49 pm | गोंधळी
वाचतो आहे.
9 Jul 2012 - 6:26 pm | तर्री
टिळकांच्या व्यक्तिमत्वाला पेलवले आहे.
हे काम सोपे नाही.
11 Jul 2012 - 1:53 pm | मुक्त विहारि
छान लिहिले आहे..