पं पं पं पं दारोदार......

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
2 Jul 2012 - 11:34 pm

पं पं पं पं दारोदार
पं पं पं पं दारोदार

बाईचा सोन्याचा संसारं
बाईचा सोन्याचा संसारं

तिचा पोरगा लई हुश्शारं
त्याची मारुती मोटारं.................

सत्तरची अखेर आणि ऐंशींची सुरुवात या सुमारास हे सहल गाणं बरच प्रसिद्ध झालं होतं. होळी, कोजागिरी, सहल वगैरे निमित्ताने जमलेली पोरं रंगात आल्यावर हे गाणं व्हायचं खर. सगळे बोल आता लक्षात नाहीत. पण संजय गांधी आणि त्याची मारुती मोटार हे समीकरण मारुती नावाची गाडी प्रत्यक्षात रस्त्यावर यायच्या अनेक वर्षे आधीपासूनच लोकांच्या डोक्यात पक्क बसलं होतं.

इंदिराबाईंनी लावलेली आणिबाणी, संजय गांधी, कुप्रसिद्ध चांडाळ चौकडी या सगळ्याईतकीच गरम चर्चा मारुतीवर होत होती. साठच्या दशकाच्या अखेरीस संजय गांधी इंग्लंडहुन परत आला तो डोक्यात मोटार घेऊनच. त्याचं दुसरं वेड होत ते विमानाच पण ते फक्त चालवण्यापुरत. मात्र आपण भारतात छोटी प्रवासी मोटार आणायचीच या ध्यासान या माणसाला पछाडलं होतं. मारुती मोटारची स्थापना, स्थित्यंतरं, सत्तापालट, पुन्हा कॉंग्रेसचं बहुमतान सत्ताग्रहण, संजय गांधींचा विमानाच्या कसरती करताना झालेला अकस्मात मृत्यु, डब्यात गेलेली मारुती मोटार कंपनी आणि बाईंनी पुत्राच्या आठवणीनं शोकविव्हल होऊन त्याच्या स्मरणार्थ केलेलं असेलही कदाचित पण मारुतीच पुनरुज्जीवन या सगळ्यातुन तावुन सुलाखुन निघत, बरे वाईट दिवस पाहत मारुती तरली आणि आणि बघता बघता डिसेंबर १९८३ मध्ये एअर इंडियाचे कर्मचारी असलेल्या श्री. हरपाल सिंह या भाग्यवान सदगृहस्थाला प्रत्यक्ष इंदिराजींच्या हस्ते पहिल्या मारुतीची चावी मिळाली आणि खरोखरच दशकभर गाजलेली मारुती मोटार प्रत्यक्ष रस्त्यावर धावु लागली.

मारुती ही एक केवळ एक मोटार नाही तर बरच काही आहे. मारुती हे जणु काही उदयाला येत असलेल्या मोठ्या अशा प्रगतिशिल मध्यमवर्गाचं जणु प्रतिकच होतं अस म्हटल तर गैर ठरु नये. मारुती येईपर्यंत भारतिय जनतेने गाड्यांचे दोनच प्रकार पाहिलेले. एक चित्रपटात सर्रास आणि रस्त्यांवर अधून मधून गर्भश्रीमंतांच्या दिसणाऱ्या भल्यामोठ्या परदेशी गाड्या किंवा बर्यापैकी दिसुन येणाऱ्या आणि टॅक्सीच्या रुपात प्रत्यक्ष बसायला मिळणाऱ्या फियाट आणि ऍंबेसेडर. मधुनच चुकुन एखादी स्टॅंडर्ड. डॉज, प्लायमाऊथ, वगैरे परदेशी गाड्यांचा जमाना संपत आला होता. साठच्या दशकाबरोबरच या गाड्या ठाणे- भिवंडी फेऱ्यांपुरत्या उरलेल्या, कुठे इथुन माघार घेणाऱ्या चार गाड्या पाचगणी-महाबळेश्वरात गेलेया. सरकारी धोरणानुसार मोजक्याच कंपन्यांना मोटारी बनवायला परवानगी होती. ’बिर्लाशेट, तुम्ही बनव्या आंबाशिटर आणि वालचंद शेट तुम्ही बनवा फ्याट. च्यामारी कोण मधे येतोय बघुयाच’ अशा सुरक्षाचक्रात या उद्योगातले अधिकारशहा आरामात होते. दुचाकींची स्थिती वेगळी नव्हती. बजाजला पर्याय नाही! भरा पाचशे रुपये आणि करा प्रतिक्षा. पांच - सात - दहा वर्षांनी जेव्हा लागेल नंबर तेव्हा मिळेल गाडी. आणि हो, रंग कुठचा वगैरे फालतु प्रश्न विचारु नका. गाडी मिळते आहे हे नशिब समजा. काय म्हणता? लवकर हवी? मग वितरकाचे पाय धरा नाहीतर दलाल गाठा. मोजा ठणठणगोपाळ आणि घ्या गाडी. या उद्योगाला कमालिची सुस्ती आणि आत्मसंतुष्टीची अवकळा आली होती. लोक आहे तो माल ’जसे आहे जेथे आहे’ तत्वावर विनातक्रार घ्यायला रांग लावुन वर हात जोडुन उभे असताना कोण कशाला आपल्या उत्पादनात सुधारणा करतोय? तांत्रिकदृष्ट्या या लोकांनी परदेशी तंत्रसहाय्य असलेल्या मूळ कंपन्यांना कराराचा काळ संपताच ’गाड्या कशा बनवायच्या ते आता आम्हाला उत्तम समजलय; आता यांना मानधन कशाला द्यायचे?’असा विचार केल्याने इथे होत असलेल्या गाड्यांवर मूळ देशात त्या गाड्या तिथे कालबाह्य झाल्याने संशोधन वा उद्धार नाही आणि इथे आपले अंतर्गत तंत्रज्ञान पुरेसे नाही. काही सुधारणा करायची इच्छाशक्ति तर नव्हतीच.

आणि अचानक मारुती नावाची चिमुकली गाडी रस्त्यावर लिलया खेळु लागली. लोक कौतुकाने पाहत राहिले. आवाज न करता पळणारी गाडी, लुकलुकणारे वळणदर्शक दिवे, आकर्षक रंग, सुबक आकार अशा मारुतीने सगळ्यांना वेड लावले. ८४ च्या पावसाळ्यात वर्तमानपत्रातली पहिल्या पानावरची बातमी मला अजुनही लक्षात आहे - ’मुंबापुरीला पावसाने गाठले. पहिल्याच पावसात रस्त्यात अनेक वाहने बंद पडली. मात्र लालचुटुक मारुती सुसाट धावत होत्या’. जनतेची म्हणुन लहान आकाराची, परवडेल अशी छोटेखानी म्हणुन बनविलेली मारुती घेण्यासाठी धनिकांनी गर्दी केली. रोज टोयोटातुन आमच्या एम डीं ना घेऊन येणारा गणपत ड्रावव्हर छाती फुगवुन सांगतांना आम्ही पाहिला "पुढच्या महिन्यात शेटची मारुती येणार’. सगळ्या थराच्या सगळ्या वयाच्या लोकांना या मारुतीन अक्षरशः वेडं केलं होतं. ८४ सालातलीच गोष्ट आहे. एकाएकी शाळकरी मुलांचे वही पेन्सिल घेतलेले घोळके वाहतुकीची तमा न बाळगता सिग्नलच्या दिशेने धावताना दिसु लागले. हा काय प्रकार आहे हे कुणालाच समजेना. मुले पटापट सिग्नल सुटायच्या आंत उभ्या असलेल्या मारुत्यांचे क्रमांक टिपताना दिसत होती. मग वर्तमानपत्रात आले की कुणी आणि कशी पण मुंबईत अशी अफवा पसरवली होती की मुंबईतल्या पहिल्या शंभर मारुती मोटारींचे क्रमांक जो कुणी सर्वप्रथम मारुती कंपनीला कळवेल त्याला म्हणे मारुतीवाले गाडी देणार होते.

एल एम ले वेस्पाने नुसती जाहिरात करायची खोटी, एका रात्रीत नोंदणी दुथडी भरुन वाहीली होती; उत्पादन क्षमतेच्या कितीतरी अधिक नोंदणी झाली होती. जे वाहन अजुन पाहिले नाही त्याला इतका प्रतिसाद? छे छे! हा तर वर्षानुवर्षे तांगडविणाऱ्या एकाधिकार शाहांविषयीचा जनतेचा नाराजीचा इशारा होता. मग जी मारुती खरोखरच भुलविणारी होती तिच्यावर उड्या न पडल्या तरच नवल. लोक प्रतिक्षेला कंटाळले होते. लोक उर्मटपणाला कंटाळले होते. लोक नित्कृष्ठ दर्जाला कंटाळले होते. लोक अगदी साध्या सोयी सुविधा न देण्याच्या वृत्तिवर वैतागले होते. आणि या खदखदत्या असंतोषात मारुतीचे आगमन म्हणजे लोकांच्या दृष्टीने आनंदाचा सोहळा होता. अलिशान गाडी नाही पण निदान दिलेल्या पैशाचा मोबदला मिळावा ही अपेक्षा चुकीची वा अवाजवी नव्हती पण उत्पादकांना मक्तेदारिमुळे काहीही पडलेली नव्हती. मारुती आली आणि लुकलुकणारे दिवे, माघार घेताना देखिल बरा प्रकाश, वेगवेगळ्या लयीत हालणारे काचपुशे, पुढच्या वाहनानं काचेवर उडवलेला चिखल धुण्यासाठी पाण्याचे फवारे, दार उघडताच आत पेटणारे दिवे, कार्यरत असलेला हॅण्डब्रेक, पुढील भागातली रेलणारी आसने, रेडिएटरचे पाणी बघायची आवश्यकता नाही अशा एक ना अनेक गोष्टी ग्राहकाला तो आजपर्यंत कशाला मुकत आला याची जाणीव करुन देत होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे ८०० सी सी चा इवलासा जीव थंडगार हवाही देत होता. मुंबईच्या उन्हाळ्याला पुरेसा. सगळ्यावर कडी म्हणजे बदललेले बॅटरी तंत्रज्ञान. आठ आठ दिवस चालवली नाही तरी नवव्या दिवशी पहिल्या चावीला सज्ज! इंजिन घॉं घॉं करीत व्यर्थ जाळायची बात नाही की गाडी चालवता येत नसली तरीही नवरोबा दौऱ्यावर गेले म्हणुन बायकोला रोज सकाळी एकदा तरी गाडी चालु करायची सक्ति नाही. तरीही सगळेच बरे बोलत होते असे नाही. काही कर्मठ लोक ’ह्यॅ - ही काय गाडी झाली? हे तर खेळणं आहे’, ’पत्रा बघितला का? बिस्किटाच्या डब्याचा पत्रा यापेक्षा बरा!’, ’गाडी सुगड दिसते पण तकलादु आहे’, ’हे खेळणं कसल वजन पेलतय’ अशी टिका आणि आशंका होत्याच. मात्र चार जणांना घेउन मारुती खंडाळा घाट चढुन गेली आणि लोक काय ते समजले.

मारुती ही गाडी नव्हती तर नव्या युगाची नांदी होती, एक क्रांती होती. चालविण्यातल्या सुलभतेमुळे व हलक्या चाका मुळे स्त्रीयांना या गाडीनं गती दिली. मोठ्या प्रमाणावर बायका - मुली गाडी चालवायला उत्सुक झाल्या. मध्यमवर्ग आपल्या शिक्षणाने, कष्टाने व आधीच्या पिढीने केलेल्या त्यागाने हळु हळु वर सरकत होता आणि लवकरच या देशात एक नवा वर्ग निर्माण होत होता. या गाडीने मध्यमवर्गाला नवी प्रेरणा दिली. ’अरेच्चा! ही गाडी तर उद्या मी सुद्धा घेईन. त्या साठी फार बडा अधिकारी, डॉक्टर वा उद्योगपती असायची गरज नाही’ हा आत्मविश्वास बदलत्या काळाबरोबर मध्यमवर्गियाला आला. कर्जबाजारी हा शब्द आता मागे पडत होता, ज्याची पत असते त्यालाच कर्ज मिळते हे हळु हळु मान्य होऊ लागले होते. कर्ज घेणे म्हणजे ऋण काढुन सण करणे नव्हे तर आपलीच भावी काळात होणार असलेली संपत्ती आपण किंमत मोजुन आगाउ उपभोगणे’ ही मानसिकता जन्माला आली. मारुती हा समाजाचा एक अविभाज्य भाग झाला. प्रगतीशिल मध्यमवर्गिय आता जागा बघताना ’स्टेशन जवळ आहे का’ या बरोबरच ’गाडी लावायला जागा आहे का हे शोधु लागला. शिकायला आधी जुनी डब्बा गाडी घ्यायची आणि हात बसला की मग नवी कोरी हा समज पटकन हात बसणाऱ्या गाडीबरोबर बदलत गेला. ’एल’ च्या पाट्या नव्या गाडीवर दिसु लागल्या. बघता बघता मोटार शिकविणाऱ्या संस्था भरभराटीस आल्या. भल्या मोठ्या इंपोर्टेड गाडीची स्वप्ने मध्यमवर्गाने कधीच पाहिली नाही. किंबहुना गाडी ही प्राथमिकता नव्हतीच . मात्र बदलत्या काळाबरोबर गाडी ’यादी’मध्ये येऊ लागली.

या मारुतीच्या यशाचं गमक काय? ही काही सिनेमातल्या गाड्यांसारखी अलिशान वा प्रशस्त नव्हती. कदाचित म्हणुनच लोकांना आपलीशी वाटली. ना बडेजाव ना मोठ्या फुशारक्या. पण जे सांगितले ते चोख मिळणार हा विश्वास मात्र या मारुतीमध्ये होता. मारुतीने ’ग्राहकाभिमुखतेचे संस्कार’ आपल्या गाडीबरोबर आणले. ग्राहकाला काय हवे? ग्राहकाची सोय कशात आहे? गाडी घेताना ग्राहक कशाचा प्रमुख्याने विचार करेल? या सगळ्याचा मारुतीन उत्तम अभ्यास केला. मुळात सार्वजानिक क्षेत्रातली कंपनी म्हणजे सरकारने लोकांच्या पोटाची सोय लावायला उघडलेला उद्योग; तिथे उत्पाद्कता, नाविन्य, जबाबदारी, गुणवत्ता’ बगैरे अपेक्षा ठेवायच्या नसतात हा रुढ समज मारुतीने मोडुन काढला. जे करायचे ते उत्तम, वेळेवर आणि प्रामाणिकपणे हा पायंडा मारुतीने नव्याने या क्षेत्रात पाडला आणि पी एस यु ची प्रतिमा बदलली. मारुतीने दुरगामी योजना आखल्या, उत्तम नियोजन केले. यशाने हुरळुन जायची वेळ येताच गर्भित धोका ओळखला आणि स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला. देशभरात वितरक आणि सेवा केंद्रे यांचे जाळे विणले. उत्तमतेचा ध्यास घेत मारुतीने एक थक्क करणारी भेट भारतिय मोटार उद्योगाला व ग्राहकाला दिली आणि ती म्हणजे गंजरहीत पत्रा. ११८ एन ई सारखी बरी गाडी सड्क्या पत्र्यामुळे डब्यात गेली. एक पावसाळा गेला की कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात गंजाचे ओघळ येणारच असा नियम असताना मारुतीने चार दशकांपूर्वी सात करोड्पेक्षा अधिक रक्कम गुंतवुन अत्याधुनिक रंगशाळा बांधली आणि विद्युतलेपनाधारीत अस्तराचा वापर भारतात प्रथमच केला ज्या योगे गाडीच्या आतुन, बाहेरुन सर्वबाजुंनी अस्तर व्यवस्थित बसेल, अगदी अडचणीचा कोपराही अस्तराशिवाय सुटणार नाही मात्र कुठेही अस्तराचे गठ्ठेही जमणार नाहीत याची काळजी घेतली. जो रंग मारुतीला दिला तोच रंग चढ्या भावाने हिंदुस्थान मोटर्सला देताना रंगनिर्मात्यांनी ठणकावुन सांगितले की पैसे मोजुनही तुम्हाला मारुतीसारखी पातळी आणि चकाकी मिळणार नाही कारंण तुमची रंगशाळा आणि प्रक्रिया या दोन्ही पुरातन आहेत. दर चार पाच वर्षांनी गाडी रंगवायची भविष्यात गरज उरणार नसल्याची ग्वाही मारुतीने तेव्हाच दिली होती. मारुतीने ग्राहकांना अभिमानाने सांगितले की गाडीला रंगकाम करायचे तर वरवर करा, पत्रा खरवडु नका कारण ज्या निगुतीने आम्ही प्रक्रिया केली आहे तशी स्थानिक गॅरेजवाला करु शकणार नाही.

मारुती ८००, ऑम्नी, जिप्सी, १०००, एस्टीम, बॅलेनो, वॅगन आर, झेन, आल्टो, स्विफ्ट, डिजायर, रिट्ज़, असा वारु चौखुर सुटला. अर्थात बदलत्या काळाबरोबर नवे निर्मातेही आले, नव्या गाड्या आल्या, प्रचंड स्पर्धाही आली, कुठे अपयशही आले. वर्सा सारखा दणदणीत पराभवही पत्करावा लागला. मात्र भारतिय गाडी परदेशात अगदी इंग्लंड व युरोपातही जाऊ शकते आणि ती सुद्धा जिथे सुझुकीचे वितरक आहेत त्या देशात हे मारुतीने जगाला दाखवुन दिले आणि देशाची मान उंचावली. प्रत्येकाला यशाबरोबर काही मर्यादाही लागतात तसा मारुतीला मध्यमवर्गीयांची गाडी हा शिक्का बसला. कदाचित बॅलेनो उत्तम गाडी असुनही यशस्वी न होण्यामागे त्या काळातल्या अपेक्षित किंमतीच्या तुलनेत चढ्या किंमतीबरोबर मारुतीची मध्यमवर्गीय प्रतिमाही कारणीभूत असेल. ग्रॅण्ड विटारा चालली नाही ती कदाचित ’नाजुक नार, एस यु वी नव्हे’ या प्रतिमेबरोबरच ती काळाच्या आधी आणल्यामुळेही असेल. अगदी अलिकडे आलेली किझाशी कधी आली आणि कधी गेली हे समजलेच नाही. होंडा ऍकॉर्डशी मारुतीने केलेली बरोबरी भारतिय ग्राहकाला रुचली नसावी. नपेक्षा होंडाच्या गाड्या सुद्धा नाजुकच असतात, दणकट नव्हे. मात्र प्रत्येक दशकातल्या सर्व अडी अडचणींना संकटांना मारुतीने तोंड दिले आणि झॆंडा फडकत ठेवला. आपली नाजुक साजुक बारीक सारिक ही प्रतिमा दूर करत आणलेल्या स्विफ्ट ने प्रतिमा बदलली आणि गाडी लोकप्रिय झाली. स्विफ्ट यशस्वी होत असतानाच एस्टीमला सक्षम पर्याय म्हणुन तीन खणी सेडान गटात मारुतीने स्विफ्ट डिजायर बनविली आणि ती तुफान चालली. ईतकी, की प्रत्येक उत्पादकाने अगदी आवर्जुन आपापल्या गाड्यांपैकी एकतरी गाडी अशी बनविली की जी हॅचबॅकही आहे आणि सेडान रुपातही उपलब्ध आहे.

मारुतीला भविष्यात स्पर्धा येणार हे अटळ होत. आणि ती आली सुद्धा. देवु, होंडा, ह्युंदाई, फ़ोर्ड, टोयोटा, टाटा, स्कोडा, फोक्सवागेन..एक एक करीत सगळे वाहन उत्पादक भारताच्या वाटेला लागले. अनेकांनी सावध पवित्रा घेत जिथे मारुती नाही अशा प्रकारात आपल्या गाड्या उतरविल्या. मात्र मारुतिने सर्वांवर वचक ठेवला होता आणि आहे. उत्तम सेवा, सुट्या भागांची उपलब्धता या साठी प्रत्येक नव्या गाडीची तुलना मारुतीशी होणे अविभाज्य आहे. कुणी अधिक सोयी देते, कुणी अधिक दणकट, कुणी अधिक सुरक्षित मात्र या सर्वांना विचारण्यासाठी एक प्रश्न मारुतीने ग्राहकांना शिकवुन ठेवला जो ग्राहक अजुनही विसरलेला नाही - "गाडी किती देते?". अनेकजण देखभाल आणि सुट्या भागांची किंमत हे घटक लक्षात घेत अजुनही मारुतीलाच कौल देतात. भारतिय ग्राहक नुसता किंमतीच्या बाबतीतच आग्रही नाही तर तो गाडी घेतानाच ’गाडी पाच सात वर्षांनी विकली तर काय भाव मिळेल’ याचाही विचार करतो. पुनर्विक्रीमुल्य ही मारुतीने भारतिय ग्राहकाला दिलेली आणखी एक भेट. मारुती ८०० किंवा झेन नुसती ’विकायची आहे’ असे म्हटले तरी विकली जाते. त्यात स्पर्धी केवळ सॅंट्रोची. बाकी कुठल्याही गाडीत केलेल्या गुंतवणुकीवर इतका चांगला परतावा मिळत नाही. मारुती ही मध्यम वर्गीयांच्या मनात आणि घरात जागा मिळवुन राहीली याचे एक कारण म्हणजे सुलभ वापर, कमी खर्चाची देखभाल, कमी इंधन खर्च आणि उत्तम विक्रीमूल्य. आम्हा मध्यमवर्गियांच्या भाषेत मारुती म्हणजे चार चाकी बजाज. पेट्रोल टाका आणि पळवा. कुठेही दुरुस्त होते, सुटे भागही स्वस्त मिळतात आणी मुळात अतिशय विश्वासू. सहसा रस्त्यात धोका देणार नाही. हळु हळु संकल्पना बदलत गेल्या. लोकांचे उत्पन्न वाढत गेले ऐपत बदलत गेली. अनेक मोहमयी गाड्या बाजारात आल्या, भराभर सहजगत्या विकल्याही जाऊ लागल्या. बरोबरच आहे. दर वीस वर्षांनी पिढी बदलते म्हणतात. जे आकर्षण त्या वेळच्या पिढीला मारुतीचे वाटले ते आता नव्या पिढीला आधुनिक महागड्या गाड्यांविषयी असणे स्वाभाविकच आहे. शिवाय दारातली गाडी हे उपयुक्ततेपेक्षाही अधिक प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. गाडी जितकी भारी तितका मान मोठा. मुळात ज्यांच्या विषयी बालपणापासून सुप्त आकर्षण असते त्या गाड्या आता सहज उपलब्ध झाल्यावर ते साहजिकच आहे. बघता बघता बेन्झ, बी एम डब्क्यु, ऑडी यांचा ओघ वाढतो आहे. मात्र तरीही सगळे उत्पादक अजुनही झेन आणि आल्टोवर नजर ठेवुन आहेत, आणि प्रत्येकाने स्विफ्ट च्या गटात आपली एक तरी गाडी उतरवली आहेच.

अशी ही मध्यमवर्गीयांची लाडकी मारुती. काळाबरोबर प्रगती होत गेली. मध्यमवर्गियांचे उच्च मध्यम वर्गिय वा उच्च वर्गिय झाले पण तरीही ते मारुतीला विसरले नाहीत. नव्या गाडीचा कोराकरीत वास अनेक मध्यमवर्गियांनी याच मारुतीत भरभरुन घेतला. पाहुणे बोलवायला घर नव्हे तर मन मोठ असावं लागतं, तस मध्यमवर्गाच झालं होतं. आपली गाडी केवढी आणि त्यात माणसे किती बसतील हे विचारात न घेता पहिलटकर सर्रास पाच जण घेउन मुंबईभर फिरले. आणि त्या मारुतीनेही कधी कुरकुर केली नाही, तिने अगत्यच जोपासले. मारुतीने मध्यमवर्गियांच्या मनात अढळ स्थान मिळविले. दारात होंडा, टोयोटा, फियाट, फोर्ड वा फोक्सवागेन येवो, असलेली मारुती कुणाला काढाविशी वाटत नाही. फारतर ती घरातली दुसरी गाडी झाली, पण मारुती घराबाहेर गेली नाही. आणि जाणारही नाही.

संस्कृतीसमाजजीवनमानराहणीविचारलेखआस्वाद

प्रतिक्रिया

गणपा's picture

2 Jul 2012 - 11:56 pm | गणपा

साक्षीदेवा मस्त घेतलात मारुतीचा आढावा.

बॅटमॅन's picture

2 Jul 2012 - 11:58 pm | बॅटमॅन

मस्त इतिहास!!!! आवडेश :)

योगप्रभू's picture

2 Jul 2012 - 11:59 pm | योगप्रभू

या संपूर्ण लेखात सुझुकी हा शब्द कुठेही नाही, हे महदाश्चर्य! त्यामुळे वर्णन चांगले जमूनही लेखाचा पार आत्माच हरवला की हो. जपानच्या सुझुकी कंपनीच्या उल्लेखाविना या 'मारुतीस्तोत्रा'ला अर्थ उरत नाही. कृपया दुरुस्ती कराल का?

योगप्रभुंशी सहमत.
एकंदरीतच मारुतीची वाटचाल टिपीकल भारतिय कंपनीप्रमाणेच चालली होती.
त्यामुळे प्रतिष्ठा जपण्यासाठी इंदिरा गांधींनी सुझुकी कंपमीला भागीदार करून घेतले. त्यामुळे गुणवत्ता, व्यावसाइकता, ग्राहकाभिमुख सेवा अशा गोष्टींनी मारुती सुझुकी ने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले.

बाकी लेखातील इतर बाबींशी प्रचंड सहमत!
भारतिय रस्ते आणि भारतिय मानसिकता यांचा विचार करुन बनलेली भारतीय गाडी म्हणजे, मारुती सुझुकी.

-(मारुती ब्रॅंड लाॅयल) सोकाजी

५० फक्त's picture

3 Jul 2012 - 10:19 am | ५० फक्त

योगप्रभुशीं सहमत मी पण,

या संपुर्ण प्रगतीत मारुतीचा सहभाग फक्त मम म्हणताना हाताला हात लावण्यापुरता, सुरुवातीला तर बहुतेक संपुर्ण कंपनी सुझुकीच चालवत होती.

टाटांनी इंडिका बाजारात उतरवेपर्यंत मारुतीचा जमाना होता, पण more car per car ला मारुती कडं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजसुद्धा नाही. डिझाईनमध्ये सुझुकीचा मोठा हात असल्यानं सुरुवातीच्या बहुतेक गाड्या साधारण जपानी माणसाची उंची वजन लक्षात ठेवुन केलेल्या आजपण अपवाद स्विफ्टचा , बोलेनो, एस्टिम तर पक्क्या युरोपिअन डिझाईन, आणि ते बिस्किटच्या डब्याचा पत्रा वगैरे प्रयोग ' कितना देती है ?' चं समाधान करण्यासाठी केलेले. सुरक्षिततेच्या किमतीत जास्त मायलेज.सुरक्षितता ह्या कसोटीवर कोणत्याही युरोपियन गाडीला मारुती टक्कर देउ शकत नाही. हाच प्रकार टायर्सच्या बाबतीत, आज देखील स्विफ्ट सारखी ११००+ किलो वजन असलेली गाडी १६५ एमेम च्या टायरवर येते, तेंव्हा मायलेज २०-२१, पण तेच १७५ चे टायर केले की मायलेज १७-१८ ला उतरते.

असो, एका कंपनीचा लेखाजोखा म्हणुन लेख उत्तम पण वैयक्तिक मत, मारुती सुझुकी ही भारतियांची मानसिकता ओळखुन फसवणुक करणारी कंपनी आहे, अर्थात ही एकच तशी नाही.

सर्वसाक्षी's picture

3 Jul 2012 - 2:55 pm | सर्वसाक्षी

५० राव,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपल्या सुरक्षेच्या मुद्द्यावर थोडी असहमती - आपल्या मताचा आदर राखुनः)
<<सुरक्षिततेच्या किमतीत जास्त मायलेज.सुरक्षितता ह्या कसोटीवर कोणत्याही युरोपियन गाडीला मारुती टक्कर देउ शकत नाही.>> मुद्दा एकदम मान्य! पण सुरक्षा महत्वाची कुठे ठरते? युरोपात कमी प्रकाशात ओल्या/ बर्फ पडलेल्या रस्त्यांवर वेगानी गाड्या धावताना अपघाताची शक्यता अधिक तेव्हा तिथे गाडी अधिक सुरक्षित असणे महत्वाचे. इथे आपल्या रस्त्यांवर अर्ध आयुष्य पहिल्या -दुसर्‍या गिअरमध्ये जात. मारुतीने आपली प्रतिमा 'कौटुंबिक गाडी' अशी केली, मजबूत, मस्त आणि वाटेल तिथे घुसणारी बेदरकार गाडी म्हणुन नव्हे. शहरात नोकरीला जायला, गावात फिरायला मारुती उत्तम.

५० फक्त's picture

4 Jul 2012 - 10:34 am | ५० फक्त

पण सुरक्षा महत्वाची कुठे ठरते? - सुरक्षा ही सुरक्षाच असते, ती जगात कुठेही असो. आणि भारतात तर बेदरकार वेगाने, वेड्यावाकड्या पद्धतीने गाडी चालवणे हा एक मोठा प्रश्न आहे, त्यामुळे इथल्या गाड्या जास्त सुरक्षित असायला हव्यात.

एक माहिती अशी आहे की मारुतीच्या काही मॉडेल्सला मिळतीजु़ळती मॉडेल्स जी सुझुकीची होती, ती जपान सरकारने असुरक्षित घोषित केली होती, त्यातच थोडाफार फेरफार करुन ती मॉडॅल्स भारतात बाजारात उतरवली गेली, अर्थात यामागे खुप वरच्या लेव्हलचा 'छगनलाल' फॅक्टर असणारच आहे. खाली कुणीतरी प्रतिसादात म्हणलेच आहे ना स्वत संजय गांधी पहिल्या टेस्टिंगच्या वेळी बसुन होते तिथेच.

तिमा's picture

3 Jul 2012 - 1:48 pm | तिमा

सोत्रिंशी सहमत. लेख फारच छान झाला आहे, संपूर्ण मागोवा त्याच्यात आला आहे. परन्तु संजय गांधी याचे त्यात काहीच कर्तृत्व नाही. आई सत्तेत असल्याचा प्रचंड फायदा असूनही तो छोटी कार निर्माण करु शकला नाही. लोकसभेत त्यावेळेस ह्या विषयावर खडाजंगी होत असे. निव्वळ इभ्रत वाचवण्यासाठी इंदिराबाईंनी सुझुकीला बोलावले आणि मग पुढचा सगळा इतिहास घडला. अर्थात या त्यांच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे कारण लेखात वर्णन केल्याप्रमाणे मध्यमवर्गाचा फायदाच झाला.
त्याआधी टाटा यांनी छोट्या कारचा प्रस्ताव मांडला होता, पण सत्ताधारी राजकारण्यांनी तो उधळून लावला. तेंव्हा आम्हाला खूपच हळहळ वाटली होती. पण आता टाटाच्या छोट्या गाड्यांच्या दर्जाकडे पहाता असे वाटते की सुझुकी आली हेच चांगले झाले. किमान दर्जाचा एक मापदंड रोवला गेला.

श्रावण मोडक's picture

3 Jul 2012 - 12:47 pm | श्रावण मोडक

'मारूती' ही 'मारूती' म्हणूनच अधिक प्रसिद्ध. 'सुझुकी' तिच्या पोटात असली तरीही. 'मारूती सुझुकी' असा उल्लेख करणं म्हणजे पाककृतीत 'अर्धा इंच आलं घ्यावं' म्हटल्यासारखं आहे.
आता या शेवटच्या वाक्यात एकाचवेळी अनेक तीर सुटलेले कुणाला दिसलेच तर तो त्याच्या दृष्टीचा दोष! ;-)
सर्वसाक्षी, या लेखानं रामदासांची आठवण झाली. :-) हे लिहून खाली जाऊन पाहतो तर तिथंही ही आठवण इतरांना आलेलीच दिसते.

शिल्पा ब's picture

3 Jul 2012 - 12:07 am | शिल्पा ब

लेखात घेतलेला आढावा आवडला.

खेडूत's picture

3 Jul 2012 - 12:07 am | खेडूत

खूप छान! धन्यवाद..
(रामदास काकांची पण आठवण झाली.)
तीस वर्षांचा काळ 'फास्ट फोरवर्ड' मध्ये पाहिल्यासारखे वाटले. आजच्या पिढी साठी पण छान माहिती.
तुम्ही बरेच षटकार आणि चौकार मारलेत. त्यामुळे शतक नक्की..! :)

सुनील's picture

3 Jul 2012 - 12:12 am | सुनील

रामदास काकांची पण आठवण झाली
सहमत.

अगदी आठवणीतील ब्रॅन्डांची आठवण आली!

छान आढावा.

अमृत's picture

3 Jul 2012 - 12:33 pm | अमृत

रामदास काकांची आठवण झाली.

अमृत

बहुगुणी's picture

3 Jul 2012 - 12:40 am | बहुगुणी

धावता आढावा आवडला.

मला वाटतं मारुतीने गाड्यांच्या किंमती बहुतांशी जनसामान्यांच्या आवाक्यात ठेवल्या, अगदी आजही, हेही एक कारण होतं आणि आहे त्या गाड्यांच्या लोकप्रियतेचं; खालील चित्र मारुतीच्या संस्थळावरून साभारः

अवांतरः व्हेस्पा, बजाज स्कूटर्सच्या आठवणींबरोबरच आठवली ती विजय सुपर; कित्येक दशकं दादागिरी टिकवून राहिलेल्या लॅंब्रेटा स्कूटरला या भारतीय बनावटीच्या स्कूटरने थोडीफार टक्कर दिली होती.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 10:21 am | श्रीरंग_जोशी

आपण टाकलेल्या चित्राला नजर स्थिर ठेवून हळूच खालून वर सरकवल्यास फ्लिपर इफेक्ट भेटतोय; अन असे वाटते की एक कार पुढे पुढे सरकत आहे :-).

अमृत's picture

3 Jul 2012 - 12:28 pm | अमृत

अमृत

योगप्रभू's picture

3 Jul 2012 - 1:01 pm | योगप्रभू

प्रिया ही त्या काळातील दणकट आणि तीन गिअरची ताकदवान स्कूटर होती. त्याचेच सुधारित व्हर्जन म्हणजे चार गिअरची चेतक. पण प्रियाचा पिक अप छान होता. पूर्वीच्या स्कूटरमधील एक त्रुटी म्हणजे तिचे इंजिन व डिक्की डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला मात्र बॅलन्स करणारे वजन नाही. त्यामुळे स्कूटर घसरली, की नेमकी इंजिनाच्या वजनाने नेहमी डाव्या कुशीवर पडायची. एलएमएल व्हेस्पाने कल्पकतेने इंजिन डाव्या अंगाला व उजव्या बाजूला स्टेपनी अशी रचना केली. त्यामुळे व्हेस्पा बॅलन्स्ड झाली व वेगाने जाताना घसरण्याची शक्यता कमी झाली. पुन्हा व्हेस्पाची सीट चालक व मागे बसणार्‍यासाठी एकाच उंचीची व लांब होती. बजाजच्या स्कूटरमध्ये चालकासाठी खोगीरासारखी अडचणीची सीट होती. बजाजच्या जुन्या गाड्यांचे सस्पेन्शन कधीच आवडले नाही. पाठदुखीला आमंत्रण.

सुझुकीने केवळ भारताला स्मॉल कारचीच भेट दिली नाही तर बाइकचा पहिला अनुभवही येथील तरुणाईला दिला. इंड-सुझुकी ही पहिली बाइक कसली सॉलिड होती.

(असो. विषय मारुतीचा आहे. तो नको भरकटायला. दुचाकीसाठी वेगळ्या धाग्यावर बोलता येईल.)

मुक्त विहारि's picture

3 Jul 2012 - 1:22 am | मुक्त विहारि

छान माहिती

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2012 - 2:49 am | प्रभाकर पेठकर

छान माहिती. अगदी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळा येत नाही.

मारुतीचे नांव घेतल्यावर डोळ्यासमोर शेंदूर फासलेला सर्वशक्तीमान मारुतीराया उभा राहतो आणि त्याच वेळी 'ती' मारूती हे स्त्रीलींगी संबोधन बिच्यार्‍याच्या 'पदरात' (खरे पाहता लंगोटात म्हणायला हवे!) श्री. संजय गांधी ह्यांनी टाकले ह्याचा विषादही वाटतो.

+ १.
अगदी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. आवडले.

उत्तम आणि माहिती पूर्ण लेख

सहज's picture

3 Jul 2012 - 6:25 am | सहज

मारुती-सुझुकीचा रम्य आढावा

चौकटराजा's picture

3 Jul 2012 - 8:31 am | चौकटराजा

१९८२ रोजी पुणे येथे कंपनी शोरूममधे एम ५० या उतपादनाचे बुकींग चे दरम्यान अपेक्शेच्या कित्येक पटीने प्रतिसादामुळे दंगल झाली. कंपनी शोरूमवर ग्राहकानी संतापून हल्ल्ला केला. काच फोडल्या. मी तिथे
नोकरीत होतो. सायंकाळी एक माणूस माझ्याकडे एम ५० चा फॉर्म ब्लॅकमधे मिळेल या आशेने माझा
पाठलाग करीत आला होता. भारताच्या ऑटो इतिहासात हे बुकींग विक्रमी होते. आठ दिवसात सुमारे १२ लाख बुकिंग झाले. बजाज हिरोहोंडा व मारुती सुझुकी या तीन नावानी भारत व्यापून टाकला आहे .

प्रचेतस's picture

3 Jul 2012 - 9:18 am | प्रचेतस

मारूतीचा उत्तम धांडोळा.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 10:45 am | श्रीरंग_जोशी

हो लहानपणापासून मारुती चा प्रवास पाहिलेला असल्यामुळे हा लेख मनाला स्पर्शून गेला.

एक प्रश्न -माझ्या मते बरेच लोक प्रीमियर पद्मिनी ला फियाट संबोधतात. एवढे सुंदर नाव असूनही.
मूळ फियाट कार म्हणजे ऍम्बॅसेडरला महिनाभर एक वेळ उपाशी ठेवल्यास ती बारीक होऊन जशी दिसेल तशी असायची.

याबाबत कुणाला काही माहिती असल्यास यावर उजेड टाकावा...

अवांतर - व्हि. आर. डी. ई. अहमदनगर येथे या गाडीच्या मान्यतापूर्व चाचण्या सुरू असताना संजय गांधी नगरमध्ये १५ दिवस तळ ठोकून बसल्याचं वाचलं आहे.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 11:23 pm | श्रीरंग_जोशी

पैसातैंकडून याचे उत्तर मिळाले.

बिच्चारी पद्मिनी, भारतातील पहिली तीन वर्षे फियाट म्हणून वावरल्यामुळे आज ४५ वर्षांनंतरही तिला पद्मिनी म्हणत नाहीत.

अधिक माहिती.

पहिली काही वर्षे फियाट म्हणून वावरल्यापेक्षाही महत्वाचं कारण हे की भारतीय लोकांना निदान ऑटोमोबाईल आणि तांत्रिक क्षेत्रात पूर्ण देशी नाव असलेले ब्रँड उच्चारायला काहीशी लाज वाटते. लाज वाटते हे शब्द बरोबर नसतील तर अशी ब्रँड-नावं पसंत पडत नाहीत असं म्हणू हवंतर.. यामागे बरीच सोशल कारणं असतील..

पद्मिनी, सुवेगा, अवंती, विजय सुपर, राजदूत (फिलिप्स जवान रेडिओ, उषा पंखे, इ इ) हे ब्रँड पूर्वी खूप प्रसिद्ध होते आणि लोकांनाही आवडायचे. पण ज्या क्षणी चॉईस आला त्या क्षणापासून लोकांनी परदेशी / इंग्रजी नावांच्या ब्रँडमधे प्रतिष्ठा मानायला सुरुवात केली आणि आजरोजीपर्यंत ती परंपरा आणखी घट्ट झाली आहे. आता एखादा सोनालिका सारखा वाहनाचा ब्रँड सोडला तर देशी नावाचे ब्रँड्स येतही नाहीत.

म्हणून मग परदेशी नावांच्या मधे आपली पद्मिनी म्हणताना काहीसा कमीपणा वाटत असलेले लोक फियाट म्हणतात. पद्मिनीप्रेमी असे काही लोक आहेत ते पद्मिनीच म्हणतात..

मुंबई न म्हणता "बॉम्बेवरुन कापडं आणली" सारख्या उदगारांची आठवण होते.

अशा वेळी मारुति हे देशी वळणाचं नाव प्रसिद्ध झालं हे विशेष म्हणायला हवं. (तरीही आमची मारुति - स्विफ्ट आहे असं आता कोणी म्हणत नाही.. केवळ स्विफ्ट आहे असंच म्हणतात. मारुतीने "हरिणी", "गरुड" अशा नावांची मॉडेल्स काढली असती तर कितपत चालली असती शंका आहे.. त्यांनी जिप्सी, ओम्नी, बलेनो, व्हर्सा अशी नावंच निवडली.. :) )

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2012 - 7:17 am | श्रीरंग_जोशी

गवि - आपल्या उत्तराशी १००% सहमत. भारतीय लोकांची मानसिकता परखडपणे मांडणारे हे विचार. भारतीय नाव असलेली टूथ पेस्ट कितीही चांगली असली तरी कोलगेटचे स्थान अटळ आहे.

येथे शिलाई मशीन चे एक उदाहरण देतो. घरगुती वापरासाठी अत्यंत उपयुक्त अश्या रिटा, कापसे या कंपन्यांच्या मशीन खरेदी करण्यापेक्षा बरेच अधिक पैसे मोजून सिंगर च्या मशीन खरेदी करणार. नंतर गरजेपेक्षा अधिक असणाऱ्या फंक्शन्स चा वापर तर होतच नाही अन थोड्या थोड्या दिवसांनी बिघडली की दुरुस्तीचा खर्च ही फार येतो. पण भारतीय नाव असलेले यंत्र खरेदी करणे विरळाच. काही अपवादात्मक उदाहरणे म्हणजे विहिरीवरील अथवा पाण्याच्या टाकीवरील मोटर.

ग्रीव्हज गरुडा नावाची ऑटोरिक्षा डिझेल वर चालणारी असल्याने काही काळ चालली होती .

नुकतेच होंडा ने ड्रीम युगा नावाची बाइक बाजारात आणली आहे. बघूया किती चालते ते.

बादवे - गेल्याच आठवड्यात अमेरिकेत एका माणसाला कायनेटिक लुना चालवताना बघितले अन डोळ्याचे पारणेच फिटले. आजकाल पुण्यातसुद्धा चुकूनही लुना दिसत नाही. १०० किमी पलीकडे नगरमध्ये अजूनही दिसते. गुगलून पाहिल्यावर कळले की अमेरिकेत कायनेटिक लुना विकली जाते (किंमत ९५० डॉलर्स).

खूप अभ्यासपूर्ण लेख.
इतरांनी म्हटल्याप्रमाणं 'सुसु की' चं नाव यायला हवंच होतं.

मात्र लेख वाचताना सुरुवातीचे २-४ परिच्छेद वाचून झाल्यावर लेखकाचं नाव नक्की काय आहे हे पुन्हा एकदा पाह्यलं.
नो ऑफेन्स सर्वसाक्षी ; रामदास काका हे 'ब्रॅन्ड्सचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर' आहेत.
आणि आपण ती शैली अचूक उचलली आहेत. :)

स्मिता.'s picture

3 Jul 2012 - 1:39 pm | स्मिता.

लेख सुंदर आणि माहितीपूर्ण झालाय. बर्‍याच गोष्टी आमच्या जन्माच्याही आधीच्या असल्याने नव्याने समजल्या.

मात्र लेख वाचताना सुरुवातीचे २-४ परिच्छेद वाचून झाल्यावर लेखकाचं नाव नक्की काय आहे हे पुन्हा एकदा पाह्यलं.

मीसुद्धा अगदी असंच केलं!

स्वाती दिनेश's picture

3 Jul 2012 - 10:59 am | स्वाती दिनेश

माहितीपूर्ण आणि रंजक लेख आवडला.
स्वाती

पियुशा's picture

3 Jul 2012 - 11:20 am | पियुशा

लेख आवडला :)

अमृत's picture

3 Jul 2012 - 12:29 pm | अमृत

मारूतीची गाथा आवडली. MBA च्या अभ्यासक्रमाकरीता मस्त case study आहे.

अमृत

कुंदन's picture

3 Jul 2012 - 12:42 pm | कुंदन

आवडला.

वा झक्कास लेख. मारुतीची ओम्नीच्या आधीची व्हॅन आवृत्ती आठवली. टप काहीसा उंच उचललेला असायचा. नंतर फ्लॅट टपाची ओम्नी आली. जिप्सीही फार पूर्वीच आली होती.. शिकारी वाहनं असायची त्या प्रकारातली फोर व्हील ड्राईव्ह. पण जिप्सी आता नवीन बनत नाही असं वाटतं. जुन्या जिप्सी षौक म्हणून अधिक किंमतीला लोक आता विकत घेतात.

बाकी व्हेस्पाची आठवणही छान करुन दिलीत. व्हेस्पाचा "नंबर" वडिलांना लागला तेव्हा आसपास जणू लॉटरी लागल्याचं वातावरण होतं. पूर्वीच नंबर लावून ठेवलात, बघा कसा नशिबाने लाभ झाला.. व्हेस्पा मिळून गेली वगैरे अशी वाक्यं लोक बाबांना जणू मोफत स्कूटर मिळणार असल्यासारखे बोलायचे.. मुंबईपासून रत्नांग्रीपर्यंत भर पावसात वडील ती व्हेस्पा चालवत घेऊन आल्याची आठवण आहे. लोक त्यावेळी ती प्रीमियम किंमतीत सेकंड हँड घ्यायला तयार असायचे.

सर्वसाक्षी's picture

3 Jul 2012 - 2:40 pm | सर्वसाक्षी

मिपाकरांनो, वाचनासाठी आणि अभिप्रायासाठी आभार. आणि विजुभाउंचेसुद्धा आभार, सहज बोलताना एकदा त्यांनी 'मारुती; चा उल्लेख केला आणि नुसते उल्लेख करुन न थांबता स्तः ते पुस्तक माझ्यासाठी घेउन आले. अनेक दिवस ते वाचायचेच राहुन गेले. खरे तर आमची त्या पुस्तकावर चर्चा झाली ती व्यवस्थापनशास्त्रातला एक धडा या दृष्टिने. मात्र मला मारुतीचा सामाजिक आणि भावनिक आविष्कार अधिक भावला. अनेक जुन्या गोष्टी आठवल्या आणि लिहायचा म्हणताना राहुन गेलेला हा लेख अखेर काल लिहिला गेला.

अनेकांनी सुझुकीचा उल्लेख राहिल्याचे लिहिले आहे. तांत्रिक दृष्ट्या त्यांचे म्हणणे योग्य आहे. पण मुळात संपूर्ण लेख 'मारुती' या चिजेविषयी फिरत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सरकारी कंपनी अशी स्वतःला बदलते आणि व्यावसायिक जगात ठाम उभी राहते हे माझ्या दृष्टीने अलौकिक आहे. जपानी कंपनी झटुन काम करेल तर नवल नाही. आणि जपानी कंपनी इतकीच इथली कंपनीही महत्वाची. नुसती सुझुकी आपल्या पायावर आली असती तर यशस्वी झाली असती का? गेली तीन दशके सर्वांच्या मुखी मारुती हेच नाव आहे, लेखी व्यवहार सोडता कुणी मारुती-सुझुकी असे म्हणताना आढ़ळत नाही. (याच सुझुकीची फट्फटी बनविणार्‍या कंपनीशी जोडी जुळली होती पण हिरो होंडा आणिबजाज कावासाकीपुढे ती फारशी टिकली नाही). असो. मारुती हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्याने लेखात मारुतीचाच उल्लेख आला आहे हे खरे.

मारुती निर्यात कराय्च्या वेळी सुझुकी मोटर्सच्या परदेशातल्या वितरकांनी हात झाडले होते व मारुतीने आपले नवे वितरक उभे केले होते हे विसरता येणार नाही. मारुतीला सरकारकडुन झुकते माप मि़ळाले हे निर्विवाद, बन्सीलालनी २९७ एकर जमीन अल्पभावात दिली हे सत्य आहेच. मात्र यातुन काहीतरे चांगले निर्माण झाले हे नाकारता येत नाही. एकाधिकारशाही यापूर्वी बिर्लाशेटनी उपभोगली होती ना? त्यांनी फक्त वैयक्तिक फायदा करुन घेतला. उलट मारुतीने मोटार उद्योगाला नवाळी दिली. मारुती गाड्या वजनाला हलक्या आहेत व उंधन सरासरी अधिक मिळावे म्हणुन वजन कमी ठेवले आहे हे सत्य आहे पण मारुती आपल्या गाड्यांच्या मजबुतीचा भ्रामक दावा करीत नाही.

'रामदास' हा ब्रॅण्ड किती मोठा आहे हे या लेखाला आलेल्या प्रतिसादातुन दिसुन येते, रामदासशेट, फार दिवसात गाठभेट नाही चला आता भेटायची वेळ झाली..

पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2012 - 6:32 pm | प्रभाकर पेठकर

रामदासशेट, फार दिवसात गाठभेट नाही चला आता भेटायची वेळ झाली..

कधी ठरतेय 'गाठ-भेट' नक्की कळवा. आम्हीही येऊ म्हणतो................ 'बैठकीला'.

सर्वसाक्षी's picture

3 Jul 2012 - 8:55 pm | सर्वसाक्षी

फक्त तारिख कळवा बाकी मी जमवतो

सर्वसाक्षी's picture

3 Jul 2012 - 8:58 pm | सर्वसाक्षी

चुकुन दोन वेळा उमटल्याने दुसरा प्रतिसाद काढत आहे

सन्जोप राव's picture

3 Jul 2012 - 2:59 pm | सन्जोप राव

लेख आवडला.
आणि त्याबरोबर 'या' लेखकाकडून खालील शब्द का वापरले गेले नाहीत असा प्रश्नही पडला.
मोटार = चारचाकी
टॅक्सी = भाडोत्री चारचाकी
एम डीं = व्य. सं.
ड्रावव्हर (ड्रायव्हर) = वाहनचालक
सिग्नल = किंचितमार्गदर्शक ताम्रलोह दंडिका
हॅण्डब्रेक = हस्तसंचालित गतिरोधक
रेडिएटर = शीतलक संयंत्र
सी सी = घन से.मि.
बॅटरी = जनित्र / मसाला
’एल’ च्या पाट्या = शिकाऊच्या पाट्या
पी एस यु = ????
गॅरेज = देखभालशाळा
सेडान, हॅचबॅक, एस यु वी = ???

सर्वसाक्षी's picture

3 Jul 2012 - 8:54 pm | सर्वसाक्षी

म्हटलं वडापाव खाणारे कधी पिझाही खातात बरे:))

पी एस यु = ???? => सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग / नवरत्न कंपन्या पण म्हणतात..
सेडान, हॅचबॅक, एस यु वी = ??? => तीन कप्प्यांच्या / उतरत्या पाठीच्या / क्रीडा प्रकारच्या किंवा सरळ ' दणकट गाड्या' ?

मन१'s picture

4 Jul 2012 - 5:19 pm | मन१

सिग्नल = किंचितमार्गदर्शक ताम्रलोह दंडिका

थांबादर्शिका हा शब्द जरा सोपा नाही का ह्याच्याहून?
हॅण्डब्रेक = हस्तसंचालित गतिरोधक

ब्रेकला इतका अवघड शब्द वापरण्यापेक्षा "थांबक"(गाडी थांबवतो तो) किंवा "घर्षक" (ब्रेक घासतात म्हणून) किंवा "मंदक" (जो (गाडीची )गती मंद करतो तो) हा सोपा शब्द रुळला तर बराच सोपा वाटेल.
आजपासून मंदक हा नवा शब्द मी मराठी भाषेला मोफत उपलब्ध करुन देत आहे.

पी एस यु = ????
public sector unit सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग(पण हे फारच वृत्तपत्रीय भाषेसारखं वाटतं; बोजड अग्रलेख वाचल्यासारखं)

गॅरेज = देखभालशाळा
ह्या ऐवजी "गाडीपागा" हा शब्द जास्त चपखल वाटतो. म्हणजे बोलीभाषेत वापरता येण्यासारखा वाटतो.
दवाखाना,सरकार ह्याला रुग्णालय आणि शासन हे पर्यायी शब्द आहेत, पण बोलीभाषेत कुठले सोयीस्कर वाटतात, हेच महत्वाचं ठरतं.

सेडान, हॅचबॅक, एस यु वी = ???
सेडान = लांबमाग्या (गाड्या)
हॅचबॅक = बसक्या (गाड्या)
एस यु वी = विलासी गाड्या (शब्दशः भाषांतर करण्यापेक्षा "रुपांतर" करण्म, ज्या-त्या भाषेच्या पोतानुसार करणं, हेच मला महत्चाचं वाटतं. मी तरी बोलताना ह्यांना "विलासी" गाड्याच म्हणेन.)

सर्वसाक्षी's picture

4 Jul 2012 - 9:02 pm | सर्वसाक्षी

खेडुत, मनोबा,

प्रतिशब्द इतके मनावर घेऊ नका. ही माझी आणि रावसाहेबांची गंमत आहे. मी शक्यतोवर मराठी शब्दच वापरतो आणि रावसाहेबांना ते जेवणात खडा आल्यागत वाटतात. या वेळी मी तसे शब्द न वापरता काही इंग्रजी शब्द तसेच वापरले म्हणुन ते माझी खोडी काढत आहेत. चालयचच. पुण्याला अलो की बिअर वसूल करीन त्यांच्याकडुन. आणि तेही प्रेमाने देतील.

श्रावण मोडक's picture

4 Jul 2012 - 10:00 pm | श्रावण मोडक

वसुली कराल तेव्हा कळवा. तुम्हा दोघांच्या या शाब्दीक खेळ्यांवरच्या गप्पा ऐकायला आवडेल. ;-)

मन१'s picture

3 Jul 2012 - 3:38 pm | मन१

मांडणीवरून रामदास काकांच्या लेखाची आठवण झाली.

एकदा वाचायला सुरु केल्यावर थांबता आल नाही. खुपच छान लिखाण अगदी भावनेला हात घालत.
आम्ही जेंव्हा मारुती घेतली तेंव्हा त्यांची टाईम्स मध्ये जाहिरात आली होती, या एकाच दिवशी जर तुम्ही आमच्या इथे अ‍ॅप्लिकेशन फॅक्स केलतर ० डाउनपेमेंट मध्ये गाडी उचला. आख्ख्या भारतात ० डाउनपेमेंट देउन गाडी घेणारे आम्हीच. जेंव्हा त्यांचा रिप्लाय घेउन शोरुमवर गेलो तेंव्हा अशी काही अ‍ॅड काढली गेलीय हे तेथे माहित सुद्धा नव्हते. आम्ही गाडी घेणारच होतो, पण एक पै न देता घेता येते म्हणुन मारुती घेतली. फारछान कलर होता, कॅलिफॉर्निया गोल्ड.

मराठे's picture

3 Jul 2012 - 7:20 pm | मराठे

एक निरिक्षण, पूर्वी मारुती गाड्यांवर मारुतीचा लोगो असायचा.. आजकाल बहुतांश सगळ्याच नव्या मॉडेल्स वर सुझुकीचा लोगो असतो. असं का? पार्टनर्शीपमधून मारुतीने आपली शेपटी काढून घेतली आहे का?

मिहिर's picture

3 Jul 2012 - 8:12 pm | मिहिर

लेख आवडला! :)

जाई.'s picture

3 Jul 2012 - 8:44 pm | जाई.

लेख आवडला

अमितसांगली's picture

3 Jul 2012 - 9:05 pm | अमितसांगली

अभ्यासपूर्ण लेख व चांगली माहीती........

पैसा's picture

3 Jul 2012 - 10:36 pm | पैसा

मारुतीची बरीचशी माहिती आली आहे. राहिलेलं इतकंच की मारुतीचं नियंत्रण आता सुझुकीच्या हातात आहे आणि जेव्हा टाटा नॅनो आली तेव्हा मारुती ८०० चा निर्मिती खर्च विचारात घेता तीसुद्धा एक लाखात विकणं शक्य आहे असं काही लोक म्हणत होते. ८०० ही खरंच "व्हॅल्यू फॉर मनी" प्रकारातली गाडी. पण तिच्यात किरकोळ सुधारणा केलेली अल्टो मात्र कंपनीने अव्वाच्या सव्वा किमंतीला विकली होती!

शैलेन्द्र's picture

4 Jul 2012 - 9:28 am | शैलेन्द्र

८०० आणी अल्टोमध्ये बरेच फरक होते, मला वाटत ८०० ला ४ गियर होते, अल्टोला ५- वेग, ताकद, डिझाइन सगळ्यातच फरक होते, आणी किमतीतला फरक फारसा नव्हता.

पैसा's picture

4 Jul 2012 - 5:06 pm | पैसा

८०० मधे पण ५ गिअरचे मॉडेल उपलब्ध होते. दोन्ही गाड्या ८०० सीसी च्याच. उंची आणि लांबीतही काही फार फरक नव्हता. किंमतीत मात्र बराच फरक होता.

या एकच नाही, सगळ्याच गाड्या काम्पिटिशनच्या मानाने चिल्लर सुधारणा करुन / कमी सुविधा देउन, अव्वाच्या सव्वा भावाने विकण्यात मारुतीचा नंबर बराच वरचा आहे, त्याच पंगतीत व्होल्सवॅगन (नविन जेट्टा), होंडा (जाझ, ब्रायो) सुद्धा आहेत.

रमताराम's picture

4 Jul 2012 - 4:57 pm | रमताराम

_/\_. एक नंबर लेख. अभ्यास, मांडणी नि कंटेंट तीनही दृष्टीने उच्च लेख. शेअर केला आहे.

चित्रगुप्त's picture

4 Jul 2012 - 10:30 pm | चित्रगुप्त

पण...
मला तर बुवा मारुती येण्यापूर्वीचा काळच रम्य वाटतो...
इंदूरच्या आणि नंतर दिल्लीच्या मोकळ्या रस्त्यांवरून मनमुराद करता येणारी सायकल-भ्रमंती....
आता तर तशी कल्पनाही करता येणे अशक्य.
मारुती आली, आणि हळूहळू रस्त्यांची, शहरांची शांती, सौंदर्य, गरिमा नाहिशी होत गेली...

पूर्वीची दिल्ली, अन आताची दिल्ली:

एमी's picture

5 Jul 2012 - 8:09 am | एमी

छान लेख! आवडला!

विजुभाऊ's picture

15 Jul 2012 - 6:13 pm | विजुभाऊ

या वरच्या गर्दीत किती मारुत्या दिसतात हो?