या आधीच्या काही आठवणी : मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी :
http://misalpav.com/node/18587
आमचे सक्सेना सर त्यांच्या तरुणपणी सहा महिने मांडूगडावर (मांडवचा किल्ला) जाउन राहिले होते, त्यांची त्याकाळची तिथली अद्भुत निसर्गचित्रे आजही मला आठवतात. ती बघून आम्ही तीन मित्रांनी मांडवला जायचे ठरवले. छप्पन मैलांचा प्रवास सायकलने सहज पार पडला. वाटेत खेडूत वा आदिवासींचे घोळके दिसले, की थांबून स्केचेस करायचो (सुमारे १९७० साली)
रात्रीच्या सुमारास मांडव ला पोचल्यावर तिथल्या राम मंदिराच्या ओट्यावर झोपी गेलो.... रात्री भयंकर थंडी पडली, आम्ही पांघरुणे वगैरे काहीच आणली नव्हती... पण सकाळी जाग येते तो काय, आमच्या अंगावर दुलया, आणि जवळच एक तरुण आमच्या उठण्याची वाट बघत सुहास्य वदनाने बसलेला... लगेच गरमागरम चहा आणून त्याने आस्थेने आमची विचारपूस केली. त्याचे नाव कैलाश शर्मा. मंदिराच्या आवारातच वृध्द आईसोबत रहायचा. त्याने आमचे सामान बघून आम्ही चित्रकार असल्याचे ओळखले होते ...
त्याचेशी गप्पा झाल्यावर कळले, की तो पूर्वी आठवीत नापास झाल्याने वडील मारतील या भीतीने घरून पळून मुंबईला गेला होता. योगायोगाने त्याला प्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांचे घरी नोकर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मुंबईतील चित्रकार व चित्रकलेबद्दल त्याला माहिती झालेली होती. आमच्या त्या मुक्कामात त्याने आमची खूप सरबराई केली.
नंतरची काही वर्षे मी मांडव ला आलो की त्याला भेटायचो, वडील वारल्यामुळे त्याला तिथे रहाणे भाग पडले होते, पण आता त्याचे चित्त तिथे रमत नव्हते, तो नेहमी उदास मुद्रेने 'ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही' हे गाणे म्हणत असायचा. पुढे त्याला दारूचे व्यसन लागले आणि शेवटी त्याचा मृतदेह जंगलातल्या खोल दरीत सापडला... हे ऐकून मी खूप विषण्ण झालो होतो. एक उमदा जीव असा भरकटत गेला...आपण त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही, ही हळहळ पण दाटली...
मांडव मधील सर्वात थोर व्यक्ती म्हणजे वयोवृद्ध विश्वनाथ शर्माजी. त्यावेळी काहीतरी ऐंशी नव्वद वयाचे असावेत. त्यांचे अतिशय सुंदर कौलारू घर तिथे होते, पाठ पूर्णपणे वाकून गोल झालेल्या पत्नीसह ते तिथे रहात. ते तिला "ब्राम्हणी" म्हणत. ब्राम्हणीला उभे राहता येत नसे, जमिनीवर रखडत रखडत इकडे तिकडे सरकायचे. अश्या अवस्थेतही ती स्वयंपाकपाणी वगैरे सर्व करायची, आमचा मुक्काम त्यांच्या घरीच असायचा. त्यांच्याकडे शेंगा, बोरे, कवठे असा रानमेवा भरलेला असायचा, आम्हाला आग्रह करकरून घ्यायला लावायचे.
वृध्द शर्माजी त्यांच्या अनेकानेक आठवणी अगदी रसाळ भाषेत रंगवून रंगवून सांगायचे... अतिशय गोड, लाघवी बोलणे असलेली व्यक्ती, असा पुलंनी त्यांचा उल्लेख केलेला वाचनात आलेला आहे... संस्कृतचे ते पंडित होतेच, इतिहासाचा गाढा व्यासंग, पेशाने सिव्हील इंजिनियर, विनोदप्रिय, रसिक स्वभाव, असे बहुरंगी व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते. पंडित नेहरू, परदेशातील महत्वाचे सरकारी पाहुणे, अशी थोर मंडळी मांडव बघायला आली, की त्यांना मांडवगड दाखवण्यासाठी शर्माजीच असायचे. 'लोहानी गुफा' ही खडकात खोदलेली लेणी त्यांनीच शोधली होती. एकदा दरीच्या टोकावर धबधब्या जवळ बसलेले असताना अचानक खालच्या खडकाखालून एक वाघ निघून दरीत उतरून गेला. वाघाची गुहा शोधून काढताना लेणी सापडली.
त्यांनी सांगितलेली एक आठवण अशी: " फ्रेंच अँबेसॅडर आया था... होशंगशाह का मकबरा देखकर बोला, ब्यूटिफुल... मैने पूछा, आपके देशमे सौंदर्य की व्याख्या क्या है ? उसने कहां, " everything in prportion is beauty " फिर उसने पूछां, आपके देशमे सौंदर्य की व्याख्या क्या है ? मैने कहां, एक घंटे बाद बताऊंगा... उसे आश्चर्य हुवा... एक घंटे बाद घूम फिर कर वो वापस जाने निकाला, तब मैने कहा, चलो होशंगशाह का मकबरा एक बार फिर देखते है... उसने कहा, वो तो देख लिया, अब फिर क्या देखना है ? मैने कहा, " सौंदर्यपूर्ण वस्तुओंकी फेरहिस्त से होशंगशाह के मकबरे का नाम निकाल दो... उसने पूछां क्यो? फिर मैने संस्कृत मे सौंदर्य की व्याख्या सुनाई: " क्षणेक्षणेयन्नवतामुपयती तदेवरूपं रमणीयताय: " अर्थात बार बार देखने, सुनने पर भी जो प्रतिपल नवीनता की अनुभूती दे, वही सौदर्य है... खुष हुवा, व्याख्या लिख कर ले गया... उसने बोला, मिस्टर शर्मा, आपके लिये अपने देश से क्या भेजू? मैने कहा, मुझे कुछ नही चाहिये, लेकीन यहांके गरीब आदिवासी जंगल मे रहते है, थंड मे बडी मुश्किल होती है, उनके लिये अगर कुछ कर सको तो करो... फिर कुछ दिन बाद ट्रक भर कर कंबल आये... बाट दिये "
मांडव गडाचे एका ब्रिटिश कलावंताने काढलेले चित्र त्यांच्या बघण्यात आले, तेंव्हा त्यांनी त्यातील चूक अशी काढली, की चित्रातील गाय ही इंग्लिश आहे... (बहुधा ते चित्र हे असावे).
... असे होते शर्माजी. लग्नानंतर मी सर्वात आधी पत्नीसह त्यांच्या पाया पडायला मांडवला गेलो होतो...
तर अश्या या मांडवला अनेकदा गेलो, चित्रे काढली. तिथले ते सर्वत्र माजलेले रान आणि त्यात पसरलेले भग्नावशेष, आकाशातील ढग आणि उन्ह-सावलीचे खेळ, दूरवर पसरलेल्या दर्या-खोर्यांवर पसरणारे धुक्याचे अद्भुत आवरण, सर्व काही अगदी भारून टाकणारे असायचे. मी या जागेच्या इतक्या प्रेमात पडलो, की आपण यापुढे इथेच राहावे, असे वाटू लागले. शर्माजी म्हणाले की तिथे शंभर रुपयात प्लॉट मिळत होता, तो घेउन तिथे मातीचे सुंदर कौलारू घर व स्टुडियो बनवावे, असे फार वाटू लागले...पण उपजीविकेची सोय काय करायची ? मांडव गाव अगदीच लहान, एकवेळ मी न्हावगंड असतो (त्याकाळी बहुतेक लोक न्हाव्याला 'न्हावगंड' म्हणत) तरी हजामती करून पोटापुरते मिळविता आले असते, पुढे सलून वगैरे थाटून गावातील प्रतिष्ठित वगैरेही होता आले असते, पण चित्रकार ? ... काहीतरीच काय ?
... मग कैलाश शर्मा म्हणाला की आपण तुझी इथली निसर्गचित्रे इथल्या एम्पोरियममध्ये ठेऊया, ती तिथून विकली जातील. चित्रकलेशिवाय मला काही करायचेही नव्हते आणि येतही नव्हते, त्यामुळे ही कल्पना मला आवडली. मग मांडवची खूपशी चित्रं काढून एम्पोरियममध्ये ठेवली आणि इंदूर ला येउन मांडवला स्टूडियो बांधून राहण्याच्या स्वप्नात मग्न झालो....
त्या काळी भारतात दूरदर्शन अगदी प्रारंभिक अवस्थेत होते. ओरिसात कटकला नवीन दूरदर्शन केंद्र उघडत होते. तिथे चित्रकार म्हणून माझी नियुक्ती झाल्याचे पत्र आले. मी कटकला गेलो देखील, पण मांडव ला रहाण्याच्या कल्पनेने इतका भारून गेलेलो होतो, की एवढी चांगली संधी सोडून नोकरीवर रुजू न होताच परतलो. परंतु मांडव माझ्या नशिबात नव्हते, असेच म्हटले पाहिजे, कारण पुढील २-३ वर्षात तिथून एकही चित्र विकले गेले नाही, मग कसला स्टुडिओ अन कसले काय... अश्या प्रकारचा अव्यवहारीपणा माझ्याकडून अनेकदा घडला, अजूनही घडतो ... पण असे असूनही कधी कोणत्या गोष्टीचा पश्चाताप वाटला नाही..
प्रतिक्रिया
13 Apr 2012 - 9:20 pm | यकु
मस्त!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
चित्रात दाखवले आहे तसे शांत, पुरातन फील देणारे मांडो आज 'टुरिझम' (म्हणजे अस्ताव्यस्त वाहाने, कर्कश्य हॉर्न, पार्कींग, ट्राफिक जाम, बकालपणा - रामरामराम) मुळे पहायला मिळेल की नाही देवजाणे.
सात महिने झाले इंदुरमध्ये येऊन पण अजून मांडो पाहिले नाही.
मोदक आणि कंपनी, लेको लवकर या रे !
13 Apr 2012 - 9:36 pm | चौकटराजा
लेखन फार आवडले. मी स्वत: श्री ए ए अलमेलकर, रघुवीर मुळगावकर , प्रताप मुळीक, सुभाष अवचट तसेच अभिनेते चित्रकार सुर्यकांत मांडरे
अशाना भेटलो आहे. अलिकडे मुळीकांचा इंजिनियर मुलगा मिलिंद हा जलरंगाचा बादशहा बनला आहे. आपण रहाता कुठे ?
13 Apr 2012 - 9:47 pm | चित्रगुप्त
.....तुम्ही बर्याच चित्रकारांना भेटलेले आहात, हे वाचून आनंद वाटला. त्यापैकी आलमेलकर व प्रताप मुळीक यांचे भेटी विषयी वाचायला आवडेल. तुम्ही त्या आठवणी लिहिल्या आहेत का?
14 Apr 2012 - 4:09 am | चौकटराजा
या सर्वच चित्रकरांच्या भेटीचा थोडक्यात वृतांत देणारा लेख लिहितो. तसेच " मी गोनीदा व ओ पी नय्यर" असाही एक लेख लिहितो. कारण मला
ओपी च्या नादी आप्पा दांडेकर यानीच लावले.
आपला चौ रा.
13 Apr 2012 - 9:48 pm | रामपुरी
सुर्यकांत मांडरे की चंद्रकांत मांडरे?
14 Apr 2012 - 3:50 am | चौकटराजा
चंद्रकांत मांडरे याना भेटायला आवडले असते. ते जलरंगाचे खास खेळाडू .त्यांच्या कला़कृतीचे एका कंपनीने कंलेंडरही काढले होते. मी लिहिले ते सूर्यकांत यांच्या बद्द्ल.ते ही उत्तम चित्रकार होते. त्यांचा हात विशेष करून चारकोल या माध्यमात खास होता. फर्गसनचे माजी प्राचार्य वि मा बाचल हे चित्रकार . त्यांचे व सूर्यकांत यांचे चित्राचे प्रदर्शन पुण्यात होते. त्यावेळी भेट व काही गप्पा झाल्या होत्या.
13 Apr 2012 - 10:41 pm | स्मिता.
बर्याच दिवसांनी काका पुन्हा लिहिते झाल्याचा आनंद वाटला. आणखी भाग येऊ द्या.
14 Apr 2012 - 1:57 am | निनाद मुक्काम प...
हेच म्हणतो मी
13 Apr 2012 - 10:41 pm | प्रास
मस्त लिखाण. खूप दिवसांनी भाग आला पण छान वाटलं. मागचं - पुढचं व्यवस्थित सांधलं गेल्यासारखं वाटलं. तुमचा पुढील जीवनानुभव वाचायला निश्चित आवडेल तेव्हा लवकरात लवकर पुढचे भाग टाका ही विनंती.
काही काळापूर्वी, चित्रांच्या रसग्रहणासंबंधी तुम्ही चांगली सुरूवात केली होती. त्या प्रयोगाचाही पुढला भाग टाकावा असा जाता जाता इथेच अर्ज करून ठेवतो.
अवांतर - मांडवगडच काय अख्खा मध्यप्रदेश फिरायचा बाकी आहे. कस्क्रावब्रं? :-(
14 Apr 2012 - 6:44 pm | चित्रगुप्त
... तर तुम्ही 'ओरछा' पासून सुरुवात करू शकता.
झासी पर्यत रूळवाटेने जाऊन, झाशीचा किल्ला बघून ('माझा प्रवास' मध्ये वरसईकर गोडसे भटजी यांनी वर्णिलेला) तेथुन २० किमि. वरील ओरछा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. गाव लहानसे असून अतिशय सुंदर,एकांतपूर्ण बेतवा नदीत डुंबा , खडकांवर पडले रहा... प्राचीन मंदिरे, किला, राजवाडा सर्व खूपच छान. म.प्र. टूरिझम च्या रहाण्यासाठी विविध सोयी आहेत, गावातही सोय आहे. किमान एक रात्र तरी रहावे....
मी ओरछाला बरेचदा गेलेलो आहे, आसपास आणखी किल्ले (उदा. 'गढकुंडार') देखील आहेत.
झाशीहून 'खजुराहो' साठी बसने जाउ शकता.
ओरछातील काही जागा:
चित्रे विक्किमिडिया वरून साभार.
14 Apr 2012 - 8:37 pm | प्रास
तुम्ही एक विवक्षित कार्यक्रम देऊन पहिली स्टेप पार पाडली आहे.
आता मला खरोखरंच मध्यप्रदेश पर्यटनाचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.
पुन्हा एकदा आभारी आहे. कधी उत्तरेकडे आलो तर फरिदाबादेत भेट घेईन म्हणतो. :-)
16 Apr 2012 - 9:16 pm | निनाद मुक्काम प...
आमच्या हिंदुस्थानातील पर्यटनाच्या पंचवार्षिक योजनेत गोवा आणि कर्नाटक नक्की आहेत.. मात्र आता प्रास भाऊ प्रमाणे मध्य प्रदेशाचा ही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे
14 Apr 2012 - 12:12 am | पैसा
आणखी वाचायला आवडेल! लेखाच्या शेवटी क्रमशः राहिलं आहे का?
14 Apr 2012 - 12:58 am | खेडूत
खूपच छान!
मागचे राहून गेलेले भाग वाचायला मिळाले.
अजून येउद्या! चित्रकलेबद्दल किती वाचावे तेवढे कमीच!
14 Apr 2012 - 1:22 am | संजयक्षीरसागर
बार बार देखने, सुनने पर भी जो प्रतिपल नवीनता की अनुभूती दे, वही सौदर्य है..
धन्यवाद!
माझ्याकडून एक अॅडीशन स्विकार व्हावी :
अनारकली विषेश देखणी नव्हती असं म्हणतात. अकबरानं जेव्हा सलीमला विचारलं की ` आपल्या साम्राज्यात एकापेक्षा एक लावण्यवती आहेत, एवढं काय पाहिलयंस तू त्या अनारकलीत? यावर सलीम म्हणाला `जहांपनाह, अनारकलीको देखना हो तो सलीमकी नजर चाहिए! '
मला वाटतं सौंदर्य हा पाहणार्याचा नजरिया आहे
14 Apr 2012 - 6:56 am | ५० फक्त
मस्त आठवण आणि खुप छान शब्दांकन
14 Apr 2012 - 7:39 am | सहज
सौंदर्याची व्याख्या आवडली.
सुरेख आठवणी!!
पुढचा लेख लवकर येउ द्या.
14 Apr 2012 - 9:19 am | प्रभाकर पेठकर
फार सुंदर लेख.
अव्यवहारी पण संवेदनशील कलाकाराच्या लेखणीतून उतरलेले हे शब्दचित्र मनाला स्पर्श करणारे आहे. अजून अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. अभिनंदन.
14 Apr 2012 - 11:13 am | चित्रगुप्त
....अव्यवहारी पण संवेदनशील कलाकार...
मोजक्या दोन शब्दात अगदी सर्व काही सांगून गेलात.... छान.
14 Apr 2012 - 10:36 am | मृत्युन्जय
छा न लिहलय
15 Apr 2012 - 10:22 am | बिपिन कार्यकर्ते
स्मिताशी सहमत आहे. आणि छान काही वाचायला मिळाले याचाही आनंद आहेच. काही असेच भन्नाट येऊ द्या ना आणखी!
16 Apr 2012 - 9:38 am | ऋषिकेश
निव्वळ सुरेख, अभिनिवेषरहित लेखन!
अतिशय आवडले
क्रमशः टंकायचे नसल्यास ते आता टंकावे ही विनंती :)
16 Apr 2012 - 4:15 pm | चित्रगुप्त
क्रमशः लिहायचे राहिले, परंतु पुढले केंव्हा लिहून होणार, कुणास ठाउक. तरी मंडळींना वाचायची उत्सुकता आहे, तेंव्हा लिहावेच....
17 Apr 2012 - 12:24 pm | पहाटवारा
तुमचा पहिला लेख वाचायचा राहून गेला होता .. तोहि सुरेख आहे .. तेव्हा हि लेख मालिका थांबवू नका ..
तुमची काहि पेन्टिंग्ज फ्लिकर वर पाहिलीत .. अप्रतीम आहेत ..
अजून पहायला आवडतील .. खासकरून या लेखातील वर्णनात जी आलियेत ती ..
-पहाटवारा
17 Apr 2012 - 1:27 pm | चित्रगुप्त
हे जे मांडव वगैरेचे लिहिले आहे, त्याला आता चाळिसेक वर्षे उलटली आहेत. त्या़काळची काही चित्रे असतीलच अजून माझेकडे. तरी हुडकून इथे टाकतो.
मी १९६७ पासून रोजनिशी लिहिणे सुरु केले, ते पुढे पुष्कळ वर्षे चालले, तो एक खजिनाच आहे, परंतु ते सर्व वाचून त्यावरून लिहिणे मोठेच काम आहे....
तरी जमेल तितके करायला हवे, हेही खरे.