आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही.
सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प. आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकांचे फारसे लक्ष न गेलेली एक बातमी मनात घर करून राहिली.-
"'नासा'त काम केलेला अठ्ठावीस वर्षांचा एक तरुण संशोधक दूर कुठेतरी बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात पांगराडोळे तहशीलातून बुलढाणा जिल्हा परिषदेवर निवडून आला."
कोण आहे हा वेडपट मनुष्य? असा एक प्रश्न चटकन मनात उभा राहिला म्हणून जालावर शोधले तर त्याच्याबद्दल विकीपासून सर्वत्र असलेली माहिती मिळत गेली. कदाचित चुकून दिलेली परवानगी असेल पण 'पब्लिक' असलेली गूगल+(पिकासा)वरची त्याची अमेरिकेतील प्रकाशचित्रेही पहायला मिळाली.
आणि मग भावी पिढीला आदर्श ठरू शकेल असे एक व्यक्तिमत्त्व समोर उभे रहात गेले - "बाळासाहेब दराडे".
एका लेखात सामावणारे हे व्यक्तीमत्त्व नाही याची जाणीव आहे. अगदीच थोडक्यात सांगायचे तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराजवळील परडा दराडे नावाच्या एका लहानशा गावात जन्म झालेला हा मुलगा औरंगाबादला नेहरू इंजिनियरिंग कॉलेजमधून २००५ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाला. इथे भारतात कॉग्निझंट सारख्या कंपनीत काही काळ नोकरी करून तो युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी मधून एम.एस. (इलेक्ट्रिकल) झाला. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान समजल्या जाणार्या नॅनोटेक्नॉलॉजीवर (मेम्स) काम करताना नासाच्या 'मार्स रोव्हर' प्रोजेक्टमध्ये सोलर सेल्स संशोधनाचे काम करण्याची त्याला काही काळ संधी मिळाली. Research Student at Spintronics and Vacuum Nanoelectronics Lab, Uni of Cincinnati असणे म्हणजे काय- ते आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. तिथले त्याचे भावी जीवन अगदी सुखावह झाले असते याबद्दल शंकाच नाही. चटकन वेध घेणार्या हिरव्या डोळ्यांचा हा उमदा तरूण तिथेच अमेरिकेत राहिला असता तर... तर भविष्यात त्याला काय काय करणे आणि होणे शक्य होते त्याची आपण कल्पना करू शकतो.
ते सारे ठोकरून तो परत का आला? याचे कारण एपीजे अब्दुल कलाम? की आण्णा हजारे? की श्रीश्री रविशंकर? की आपल्या गावातल्या माणसांसाठी काहीतरी चांगले केले पाहिजे ही लहानपणापासूनची प्रामाणिक इच्छा? कसेही असो. त्याला गावाकडे परत यावेसे वाटले. ज्या निवडणुकांना आम्ही नाके मुरडतो, मतदानालाही जात नाही अशा निवडणुकीत तो अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला. पैसा आणि 'पार्टी' या दोहोंचे पाठबळ नसताना अनेक अनुभवी राजकारण्यांना धूळ चारून निवडून आला. सिनसिनाटी युनिव्हर्सीटीत 'आर्ट ऑफ लिविंग' चा प्रचार करणारा आणि आणा हजारेंच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणारा हा ध्येयवादी तरूण निवडून येतो ही घटना अत्यंत आशादायक आहे.
या ध्येयवादी तरुणाची भारताच्या राजकारणात चांगल्या अर्थाने भरभराट होवो आणि त्याच्या गावाला, त्याच्या जिल्ह्याला, त्याच्या राज्याला आणि त्याच्या देशाला एक चांगला नेता मिळो ही सदिच्छा.
प्रतिक्रिया
18 Feb 2012 - 7:27 pm | बहुगुणी
है शाबास!
विसुनाना, हे आशादायक वृत्त इथे प्रसारित करण्याबद्दल आपलेही आभार!
या युवकाच्या बद्दलचे काही दुवे चटकन मिळाले तर पहावे म्हणून शोध घेतला तर इथे आणि इथे माहिती मिळाली. या दोन्ही ठिकाणी त्याने स्वतःच दिलेली माहिती आहे. इतरांनी (वृत्तपत्रांनी वगैरे) दिलेल्या माहितीचे दुवेही मिळाले, ते इथे:
१
२
" alt="" />
त्याला प्रेरणा कुणाकडूनही मिळू दे, पहिलं पाऊल त्याने उचललं आहे हे महत्वाचं. फक्त त्याने प्रचलित घाणेरड्या राजकारणी लोकांपासून स्वतःला आणि त्याच्यावर विश्वास ठेवणार्या मतदारांनाही सांभाळावं इतकीच सदिच्छा!
18 Feb 2012 - 7:30 pm | पैसा
भारी प्रकार आहे! म्हणजे निवडून येंणं हा! एखादा नासामधे काम केलेला इंजिनिअर परत भारतात यायचा निर्णय घेईल, पण परत आल्यावर निवडणुकांचा वगैरे विचार करील ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि त्याहून आश्चर्यकारक आहे, त्याने चक्क निवडून येणं! म्हणजे अजून आपल्या देशात असं काही घडू शकतं तर!!
18 Feb 2012 - 8:20 pm | प्रचेतस
धन्यवाद विसुनाना. पेपरमध्ये वाचलेच होते पण तुमच्याकडून अधिक संगतवार माहिती समजली.
18 Feb 2012 - 8:52 pm | रेवती
एकदम मस्त! भारी वाटलं.
18 Feb 2012 - 11:36 pm | दादा कोंडके
हॅट्स ऑफ!
चला जो पर्यंत आण्णांची आंदोलनं आहेत, त्याच्या पासून प्रेरणा घेउन चकचकीत आयुष्याला लाथ मारून मायभुमीच्या ओढीनं गलिच्छ राजकारणात उतरून ही व्यवस्था बदलण्याची स्वप्न बघणारे आहेत. तो पर्यंत आशा ठेवायला हरकत नाही.
19 Feb 2012 - 12:09 am | मन१
प्रतिसाद संपादित.
20 Feb 2012 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार
चांगला प्रतिसाद.
मनोबासाहेब माझ्याच आंतरजालात माझ्या एक वर्ष पुढे होते. MIPA, MeMarathi.
तेव्हा पासूनच ह्या नावाची चर्चा होतीच. अधिक माहिती हवी असेल तर मला मोबाइलवर संपर्क करावा.९७३०९५६३५६.
(कृपया उपप्रतिसाद दिला तरी चालेल. मी काही काळाने हा प्रतिसाद संपादित करुन माझा नम्बर इथून उडवणार आहे अशी शक्यता नाही.)
बाकी नासापेक्षा राजकारणात कीर्ति आणि पैसा दोन्ही मुबलक आहे.
19 Feb 2012 - 5:57 pm | चतुरंग
परवा चेपुवर ह्या युवकाचा फोटो बघितला होता आणि येथे ही बातमी वाचून उलगडा झाला. धन्यवाद विसुनाना!
भारतीय राजकारणात नवे रक्त येत आहे ही अतिशय आशादायक बाब आहे. बाळासाहेब दराड्यांसारख्या प्रेरित तरुणांच्या रुपाने चांगले बदल घडण्याची सुरुवात होवो अशा शुभेच्छा!
-चतुरंग
19 Feb 2012 - 7:19 am | सन्जोप राव
काल माझ्या मुलाने मला ही बातमी सांगितली. तेंव्हाही बरे वाटले होते, आताही वाटले. फक्त लेखातला पहिला आणि दुसरा फोटो, आणि त्यांमधला फरक बघून भीती वाटली.
19 Feb 2012 - 9:09 am | टुकुल
बातमी छानच पण अक्षरक्षः उडालोच वाचुन.
वर विसुनाना नि सांगितलच आहे कि बाळासाहेब कॉग्निझंट मधे होते कामाला, एकाच मजल्यावर आणी अकांउट मधे आम्ही होतो, मी त्यामानानी सिनियर होतो तिथे आणी जुन्यियर च्या ग्रुप मधे ह्यांना बरेच वेळेला पाहिल, मधुनच ऐकायला मिळत होत कि बाळासाहेब हे खुपच हुशार आहेत आणी बर्याच ठिकाणी लिहितात आणि टेक्निकल कॉन्फरन्स साठी जातात, पण मी एवढ लक्ष नाही दिल. शेवटची खबर हिच होती कि ते अमेरिकेला एम एस साठी आले, त्यानंतर आज हि बातमी वाचली. अजुन शोधाशोध केल्यावर खालील माहीती मिळाली.
http://en.wikipedia.org/wiki/User:Balasaheb
हे वाचुन आनंद तर झालाच पण एवढ सर्व सोडुन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे राहायचा निर्णय घेतला ह्याबद्द्ल कौतुक आणी अभिमान वाटला.
निवडणुक जिंकल्याबद्दल त्यांच हार्दीक अभिनंदन आणी पुढच्या वाटचालीला शुभेच्छा !!!
जाता जाता : हा विजय ४००० मतांनी नावजलेल्या पक्षांच्या उमेदवारांसमोर झाला, म्हणजे लोकांनी जुन्यांना फाटा देवुन नवीन युवापिढीवर चांगलाच विश्वास टाकला आणी हि एक खुप चांगली गोष्ट आहे.
--टुकुल
19 Feb 2012 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालच विविध निकालाच्या रणधुमाळीत बाळासाहेब दरांडेची बातमी वाचली. पूर्वीही नासाचा संशोधक निवडणूकीसाठी उभा अशा आशयाची बातमी वाचनात आली होती. केवळ आपलं आणि आपल्यासाठीच पाहणार्या समाजात परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी कोणी युवक पुन्हा गावाकडे येतो यावर विश्वास बसत नाही. नोकरी का सोडली, काही कारण असतील वगैरे असं मनातल्या मनात सुरु झालं होतं. पण, आश्चर्य वाटाव्या गोष्टी घडतात त्यातली ही एक गोष्ट. बाळासाहेबांनी ग्रामविकास करावा, ग्रामीण जनतेला विविध योजनेच्या माध्यमातून अधिक समृद्ध करावं, हीच अपेक्षा. राजकारणातील छक्के पंजे पाहता बाळासाहेब निराश होणार नाही किंवा त्यांनी त्यातलं एक होऊ नये, म्हणजे झालं.
ग्रेट बाळासाहेबाला आमचा सही दिलसे सॅल्यूट........!
-दिलीप बिरुटे
19 Feb 2012 - 12:37 pm | प्रभाकर पेठकर
श्री. बाळासाहेब दराडे ह्यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
ध्येयाने प्रेरित होऊन, श्री एपिजे कलाम, श्री अण्णा हजारे ह्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतात परतण्याचा, राजकारणात उतरण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच अभिनंदनिय आहे.
फक्त ते दुसरे 'बाळासाहेब' होऊनयेत एवढीच इच्छा..!
19 Feb 2012 - 1:05 pm | मराठी_माणूस
सहमत आणि शुभेच्छा
19 Feb 2012 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा
लागली होती बातमी..पण आज डिटेल कळली...धन्यवाद
19 Feb 2012 - 3:47 pm | चिंतामणी
या ध्येयवादी तरुणाची भारताच्या राजकारणात चांगल्या अर्थाने भरभराट होवो
आणि
भारताचीसुद्धा.
19 Feb 2012 - 5:16 pm | ५० फक्त
अभिनंदन आणि अभिनंदन,
पण सामना, सिंहासन आणि सरकारनामा हे तिन चित्रपट गेला बाजार महिन्यातुन एकदा तरी त्यांनी पहावेत ही विनंती.
नासामध्ये किंवा कुठंही बसुन संशोधन करणं आणि रस्त्यावर उतरुन राजकारण करणं, अर्थात हे सुद्धा कुठंही, भारतच नाही तर पार अमेरिका, इंग्लंड, जर्मनी किंवा कुठंही, यात नुसता जमिन अस्मानाचा नाहीतर पाताळ - अवकाशाइतका फरक आहे, ( नव्या जमान्यानुसार विंडोज आणि अँड्रोईड इतका म्हणा हवं तर).
राजकारण हा सगळीकडेच नालायक लोकांचा शेवटचा धंदा असतो असं ऐकलं आहे, त्यामुळं या उदाहरणानं फार काहि घडेल अशी अपेक्षा नाही , फक्त वर डॉ, बिरुटे म्हणतात तसं 'राजकारणातील छक्के पंजे पाहता बाळासाहेब निराश होणार नाही किंवा त्यांनी त्यातलं एक होऊ नये, म्हणजे झालं' किंवा श्री. संजोप रावांना वाटणारी ' फक्त लेखातला पहिला आणि दुसरा फोटो, आणि त्यांमधला फरक बघून भीती वाटली.' ही भिती खरी व्हायला किती वेळ लागतोय तेवढं पाहावं.
19 Feb 2012 - 6:21 pm | चतुरंग
असे जे वाटते ते बरोबर आहे. परंतु मोठे बदल एकदम होतच नाहीत. चांगली माणसे हळूहळू येत जातील आणि गोष्टी बदलतील. नदीचा प्रवाहसुद्धा वर्षानुवर्षे वळणावळणाने वाहून मग डोंगर फोडून वाट काढतो. राजकारणात काय किंवा इतरत्रही चांगली वाईट माणसे असणारच आहेत परंतु चांगल्या लोकांकडे काही प्रमाणात तरी निर्णय घेण्याची शक्ती आणि सत्ता असणे हेच महत्त्वाचे आणि ते घडेल असा विश्वास वाटतो!
-रंगा
19 Feb 2012 - 5:41 pm | Pearl
बाळासाहेबांचा मोठा डिसिजन आहे हा.
निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांना खूप शुभेच्छा.
सिस्टिममध्ये उतरून (चांगलं) काम करणं खूप महत्वाचं आणि खूप अवघडं असतं. त्यांच्या हातून खूप चांगली विकासकामं घडू देत आणि एक चांगला नेता म्हणून ते पुढे येउ देत, ही सदिच्छा.
19 Feb 2012 - 6:13 pm | प्यारे१
बाळासाहेबांना हार्दिक शुभेच्छा...!
19 Feb 2012 - 6:32 pm | श्यामल
बाळासाहेबांचं खुप कौतुक वाटतंय. बाळासाहेबांच्या रुपाने जनतेला सच्चा नेता लाभो ही सदिच्छा !
19 Feb 2012 - 8:24 pm | आशु जोग
'स्वदेश' हा चित्रपट उत्तमच होता
या चित्रपटाच्या कल्पनेबाबत बोलताना आशुतोष म्हणाला होता
यातील हीरोची कल्पना त्याच्या काकांवरून सुचली.
जे करीयरच्या सुरुवातीला परदेशात आणि नंतर विक्रम साराभाईंच्या हाकेसरशी
पुन्हा देशात परतले. सोयीसुविधा, पैसा कमी असूनही त्यांनी देशासाठी काम करणे महत्त्वाचे मानले.
इस्रो या संस्थेमधील सुरुवातीच्या शास्त्रज्ञांपैकी डॉ. वसंत गोवारीकर हे एक
--
बाकी विषयकर्त्याने दिलेली माहिती अतिशय उत्तम व प्रेरक आहे
वाचून आनंद वाटला.
20 Feb 2012 - 9:08 am | आनंद
छान आहे.
बाळासाहेबानीच दिलेल्या माहिती वरुन त्यांचा नासाशी संबध २००५ मध्ये भारतातच लोणार सरोवरच्या टिम बरोबर आला होता. म्हणजे ते इंजीनियरींग च्या शेवट्च्या वर्षी आला होता. “Deep Impact Mission-2004”,“MARS Exploration Rover-2003 Mission”, NASA. अनुक्र्मे २००४ आणि २००३ साली आला होता
ttps://sites.google.com/site/balasahebsdarade/resume (अर्थात २००९ च्या पुढच त्यानी यात लिहलेल नाही)
यावरुन नासा मधली नोकरी सोडुन भारतात परतले म्हणणे थोड जास्तच होतय.
मनोबाच्या " दूरचे डोंगर साजरे राहतीलच ह्याची खात्री." ह्या वाक्याचा थोडा अर्थ लागला.
19 Feb 2012 - 10:42 pm | मालोजीराव
अश्या ध्येयवादी तरुणांकडून अनेक आशा आहेत...
या राज्यकर्त्यांच्या बाजारात मिसळून न जाता त्यांनी स्वत: चं स्थान निर्माण करावं आणि समाजापुढे नवीन आदर्श घालून द्यावा ...एवढीच अपेक्षा !
-मालोजी
19 Feb 2012 - 10:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दराडे डोंगराएवढे कर्तृत्व करतील ही आशा.
मिपाकरांसाठी दूरचे डोंगर साजरे राहतीलच ह्याची खात्री.
बाकी, दराडेंना शुभेच्छा.त्यांना शुभेच्छा देणार्या मिपाकरांनाही आमच्या शुभेच्छा.
काहो, मन १, इतका अलिप्तपणा ? टोपी खाली काही दडलंय की काय ?
(आपल्या भ्र.ध्व वर उशीर झालाय तरी एस्सेमेस टाकला आहे. क्ष.अ.)
-दिलीप बिरुटे
(संशयी)
20 Feb 2012 - 11:31 am | विसुनाना
या छोटेखानी लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
चर्चा पुढे सुरू ठेवावी. काही प्रतिसादांवरुन असे दिसते की काही लोकांना आणखी जवळून ही व्यक्ती माहित आहे.
मला असलेली काही माहिती/ माझी मते पुढीलप्रमाणे -
१. श्री. बाळासाहेब दराडेंना 'भारतीय राजकारण' आतापर्यंत फक्त दुरून माहित होते असा गैरसमज नको.
त्यांचे वडील श्री. शंकरराव दराडे आणि आई रत्नमाला यांचा २००८ साली अग्निजन्य अपघातात मृत्यू झाला. तत्पूर्वी श्री. शंकरराव हे लोणार तालुक्याच्या पंचायत समितीचे सभापती होते. बाळासाहेबांचे आजोबाही पंचायत समितीचे सदस्य किंवा परडा ग्रामपंचायतीचे सरपंच असावेत.
त्यामुळे बाळासाहेब दराडेंना राजकीय महत्वाकांक्षा असणे अनुचित नाही.
२. श्री. बाळासाहेब दराडे हे नासाच्या लोणार प्रकल्पाशी त्यांच्या भारतातल्या शिक्षणावेळीच निगडीत होते हे खरेच. पण पुढे त्यांनी अमेरिकेतल्या शिक्षणाच्यावेळी (युओसि) मार्स रोव्हरच्या नॅनोटेक-आधारित सोलर सेल्सवर अमेरिकेत कंन्सल्टंट म्हणून काम केलेले आहे असा त्यांचा दावा आहे.
पूर्ण बातमी हा दावा खरा ठरवण्यासाठी त्यांच्याकडे पुरावे असावेत अशी अपेक्षा
३. मेम्ससारख्या काही तांत्रिक बाबीत त्यांनी संशोधन केलेले आहे हे नाकारता येणार नाही.
४. त्यांच्याकडे इतर पर्याय असूनही त्यांनी राजकारणात उडी घेतली हे महत्त्वाचे आहे. शिवाय एपीजे अब्दुल कलाम, रविशंकर आणि आण्णा हजारे यांची नावे संदर्भाने येतात यालाही थोडे का होईना महत्त्व आहे.
५. इतःपर ते पूर्णपणे स्वच्छ राजकारण करतील याची खात्री कोण देईल? अपेक्षा आहे इतकेच. नाहीतर आहेच, येरे माझ्या मागल्या...
६. आजवर भारतीय राजकारणात काय कमी उच्चशिक्षित/उच्च्पदस्थ आलेत का? भारताचे आजचे पंतप्रधान / महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री - ही उत्तम उदाहरणे आहेत. पण या गटारगंगेत भलेभले वाहून गेले हे तर स्पष्टच आहे!
या अनुषंगाने चर्चा सुरू राहील ही अपेक्षा.
20 Feb 2012 - 6:21 pm | सूड
दराडे प्रत्यक्षातले मोहन भार्गव ठरोत ही शुभेच्छा !!
20 Feb 2012 - 6:26 pm | गवि
सर्व उत्तम आहे.. आणि आश्चर्यकारक, आनंददायी सुद्धा..
अवांतर :
का नाही बुवा???