मुसोलिनीचा उदयास्त.............. भाग १

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Dec 2011 - 10:07 pm

मुसोलिनीचा उदयास्त !

मुसोलिनी.

एपिनाईन्सच्या डोंगर रांगात टिबर नदी उगम पावते आणि रोमपाशी जवळच समुद्राला मिळते. या नदीच्या उगमस्थानापासून ती जेथे समुद्राला मिळते तेथपर्यंत तिच्या काठाकाठाने मानवाच्या वसाहती होत गेल्या आणि इटलीला या नदीचे महत्व इजिप्तला जे नाईलचे आहे तेवढेच वाटू लागले. इटालियन जनतेची अस्मिता हिच्या रुपाने वहाते असे म्हटले तरी हरकत नाही. या अस्मितेचे एक द्योतक म्हणून मुसोलिनीने एक संगमरवरी पाटी जेथे टिबर, ही नदी म्हणून ओळखली जाते तेथे उभी केली.
त्यावर लिहिले आहे “रोम साम्राज्याची जिवनरेखा “टिबर” या नदीचे उगमस्थान.”

ही ती संगमरवरी पाटी जी तेथे अजूनही आहे...

या नदीवर २००० वर्षापूर्वी बांधलेले अनेक उत्कृष्ट दगडी पूल व काठाने बांधलेले दगडी रस्ते या नदीच्या सौंदर्यात भरच घालत असतात.

टिबर नदीवरचे रस्ते व पूल.

याच रस्त्यावरून २८ ऑक्टोबर १९२२च्या अंधार्‍या पहाटे फॅसीस्ट ब्लॅकशर्टस्‌ रोमच्या दिशेने निघाले होते. पावसात त्यांचे गणवेष गच्च भिजले होते, त्यांना रोम मधे जाऊन काय करायचे आहे याची कल्पनाही नव्हती पण रोम ! रोम ! रोम !....... हेच त्यांच्या ध्यानीमनी होते. त्याच वेळी त्यांच्यातील काही तुकड्यांनी त्या विभागातील पोस्ट ऑफीसे, पोलिस चौक्या, रेल्वे स्टेशन आणि लष्कराच्या रहाण्याच्या बराकी जबरदस्तीने अगोदरच ताब्यात घेतल्या होत्या. फॅसीस्ट पार्टीचे सदस्य असलेल्या रेल्वेच्या ११००० मजूरांनी जमतील तेवढ्या आगगाड्या पळवून पार्टीच्या दावणीस जुंपल्या होत्या आणि त्यातूनही बरेच सद्स्य कोंबून रोमला नेण्यात येत होते. हे सगळे तेथे अगोदरच डोंगरात ठाण मांडून बसलेल्या ४०,००० ब्लॅकशर्टस्‌ना सामील झाले.

या सगळ्यांचे उद्दिष्ट एकच होते ते म्हणजे त्या डोंगराच्या कोंदणात वसलेल्या रोम शहरातील प्रस्थापित सरकार उलथवून सत्ता हस्तगत करणे. त्यांच्या हातात होती कवटी व हाडे हे चिन्ह असलेले झेंडे नाचत होते आणि एखादा चाचा एखाद्या जहाजावर तुटून पडतो त्या प्रमाणे ते रोमवर तुटून पडले.
त्यांच्या हातात असलेली हत्यारे जुनाट होती. तलवारी, ठासणीच्या बंदूका, पिस्तूले, लाठ्या काठ्या, घेऊन ते रोमला जिंकणार याबद्दल त्यांच्या मनात कुठलीही शंका नव्हती. एकाच्या हातात तर गोल्फची काठी तर दुसर्‍याच्या हातात कुठल्यातरी प्राण्याच्या पायाचे हाडही तेथे असलेल्या काही पत्रकारांना दिसले. जसजसा दिवस सरू लागला तसेतसे या सदस्यांचा ओघ वाढत वाढत एवढा झाला की रोममधील नागरीक भयभीत झाले. हे सगळे एका माणसाच्या इशार्‍यावर आपला जीवही द्यायला तयार होते. सरकार उलथवणे ही त्यांच्या दृष्टीने फार किरकोळ बाब होती. त्या माणसाचे नाव होते “मुसोलिनी”. तारस्वरात वेड लागल्यासारखे तो जनसमुदाय ओरडत होता, किंचाळत होता “व्हिवा मुसोलिनी ! व्हिव्हा मुसोलिनी !” हो त्यांना वेडच लागले होते मुसोलिनीचे. त्यावेळी त्याचे वय होते फक्त ३९ आणि आदल्याच दिवशी तो शांतपणे मिलानमधे आपल्या लाडक्या सुंदर पत्नीबरोबर, रॅशेल, आणि मुलगी एडा बरोबर एका नाट्यगृहात ऑपेरा पहात बसला होता. दुसर्‍या सज्जावर असलेल्या त्या खास बॉक्समधे त्याच्या गोर्‍या हातावर त्याची मोठी हनूवटी टेकवून तो तेथून खाली त्याच्या काळ्याभोर डोळ्यांनी बघत असलेला अनेकांनी पाहिला. दुसर्‍या अंकामधे ताडकन उठत तो म्हणाला “ चला निघुया आता”.
तेथून निघून त्याने तडक त्याच्या फॅसीस्ट पार्टीचे मुखपत्र “इल पोपोलो इटालिया’ चे कार्यालय गाठले. तो स्वत:च या वर्तमानपत्राचा संपादक होता. त्या कार्यालयात दुरध्वनी सारखे खणखणत होते पण गेल्या तीन दिवसात वर्तमानपत्राची एकही आवृत्ती निघू शकली नव्हती. कारण फारच भारी होते. त्या कार्यालयात फॅसीस्ट पार्टीच्या सदस्यांची इतकी गर्दी झाली होती की तेथे कामगारांना काम करणे मुष्कील झाले होते आणि तेथील सर्व कपाटात व जागा मिळेल तेथे हातगोळे लपवण्यात आले होते. खणखणणारा प्रत्येक दुरध्वनी पार्टीच्या विजयाची आणि सरकारी फौजेच्या पराभवाची बातमी देत होता.
वातावरण आता फारच तंग झाले होते. गेले २४ तास इटलीचा राजा इमॅन्युएल व्हिट्टोरिओ-तिसरा याला कोणाची बाजू घ्यावी हेच कळत नव्हते. रात्रभर चाललेल्या बैठकीनंतर त्याच्या मंत्रीमंडळाने देशात आणिबाणी जाहीर केली होती पण राजाने ती बेकायदा ठरवली. व्हिट्टोरिओच्या मनात फॅसीस्टांविषयी खरे म्हटले तर अजिबात प्रेम नव्हते. पण त्याच्या दृष्टीने त्यांची एक बाजू जमेची होती, ती म्हणजे त्यांचे राजघराण्याविषयी असणारे प्रेम. राजाला आत्तातरी त्यांच्या राजघराण्याची सत्ता टिकवणे अत्यंत महत्वाचे होते आणि तो त्याप्रमाणे राजकारण खेळत होता. १००० वर्षे चालत आलेली सत्ता अशी कोण सहजासहजी सोडणार ? यादवीसदॄष परिस्थिती निर्माण झाल्यावर त्याने असा विचार केला की जर मुसोलिनी विरूद्ध कडक कारवाई केली नाही तर त्याची सत्ता आणि देश दोन्ही वाचू शकतील. हा निर्णय इटलीच्या राजकरणावर दुरगामी परिणाम करणारा ठरला याची साक्ष इतिहास देतोच.

काही दिवसापूर्वी मुसोलिनीची भूक काही मंत्रालयापर्यंतच मर्यादीत होती. आता त्याने राजाकडे पंतप्रधानपदाची मागणी केली. एवढेच नाही तर त्याने स्वत:चे मंत्रीमंडळ निवडण्याचे स्वातंत्र्यही मागितले. मुसोलिनीच्या सल्लागारांनी त्याला काही हट्ट सोडायला सांगितले पण त्याने हा सल्ला सपशेल धुडकावून लावला. “ मी असले काही करणे शक्य नाही. अंतीम विजय माझा आहे आणि मी तडजोड करायचे काहीच कारण नाही” तो ठामपणे म्हणाला. रात्रभर मुसोलिनीचा वकील आणि सरकारच्या चर्चेचे गुर्‍हाळ चालू राहिले आणि वर उल्लेख झालेल्या त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात त्याला या बैठकांचे वृत्तांत क्षणोक्षणी मिळत होते. राजाने वेळ मागून घेतला आणि मुसोलिनी त्याच्या कार्यालयात कपाळावर येणार घाम पुसत अस्वस्थपणे येरझारा घालत राजाच्या निरोपाची वाट बघत होता. अखेरीस रात्री १२ वाजता फोन वाजला आणि राजाचे निमंत्रण मुसोलिनीला मिळाले.

इटलीचा राजा एमॅन्युएल व्हिट्टोरिओ तिसरा.

राजा उम्बर्टो आणि राणी मार्गरेटा यांच्या पोटी या युवराजाने जन्म घेतला ती तारिख होती ११ नोव्हेंबर १८६९ आणि जागा होती नेपल्स. लहान वयातच त्याने आपल्या अजोबांच्या पराक्रमाच्या हकीकती ऐकल्या होत्या आणि ज्या प्रकारे त्यांनी इटलीचे एकत्रीकरण केले, आणि इटलीच्या वसाहती स्थापन केल्या होत्या त्याने तो भारून गेला. प्राचीन इतिहास असलेले सॅव्हॉय राजघराणे, त्यांचा इतिहास आणि ती परंपरा पुढे चालवायची जबाबदारी आता अर्थातच तरूण व्हिट्टोरिओच्या खांद्यावर येऊन पडली आणि त्याने ही मोठ्या धाडसाने ती पेलायचा प्रयत्न केला. इटालियन सरकारमेधे जरी उदारमतवाद्यांचा भरणा होता तरी इटलीचे युरोपमधे वर्चस्व प्रस्थापीत करायचे यावर सगळ्यांचे एकमत होते आणि त्याला राजाही अपवाद नव्हता. व्हिट्टोरिओचे लग्न एका मॉंटेनिग्रोच्या राजघराण्यातल्या मुलीशी झाले. त्यांना पुढे पाच अपत्येही झाली. इटालियन राजकारणाचे एक वैशिष्ठ्य असे आहे की तेथे लोकमत पटकन टोकाची भुमिका घेऊ शकते. हे तरूण व्हिट्टोरिओच्या वडिलांचा जो खून झाला त्यावरून त्याला चांगलेच कळले होते. या प्रकारच्या अतिरेकी मतांचे दडपण त्याने आयुष्यभर मनावर वागवले. स्वत: व्हिट्टोरिओ हा उदारमतवादी होता आणि त्याला इटलीच्या राज्यघटनेबद्दल नितांत आदर होता. जनतेवर राजेशाही लादली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत याची खात्री त्याला होती. उदाहरणार्थ पहिल्या महायुद्धात जनमत जर्मनी आणि ऑस्ट्रीयाशी त्याच्या वडिलांनी हातमिळवणी करायची ठरवले होते पण जनमत या विचाराच्या विरूद्ध होते. व्हिट्टोरिओने या प्रकरणात हस्तक्षेप करून ब्रिटन आणि फ़्रान्सशी हातमिळवणी केली. व्हिट्टोरिओने विजयी बाजू बरोबर पकडली पण त्याची जबरी किंमत इटलीला मोजावी लागली जबरदस्त मनूष्यहानीच्या स्वरूपात. ब्रिटन आणि फ्रान्सने जी भूमी इटलीला युद्ध जिंकल्यावर द्यायचे कबूल केले होते, त्यातील कपटाने काहीही इटलीला दिले नाही. यामुळे इटलीमधे दोस्त राष्ट्रांच्या विरोधात असंतोष भडकला. याला कारणीभूत व्हिट्टोरिओच आहे असे समजून त्याच्या हत्येचे दोन प्रयत्नही झाले. या सगळ्या असंतोषाचे खापर त्याच्यावर फोडण्यात आले. स्वत:चे राजघराणे वाचवण्यासाठी शेवटी त्याला मुसोलिनीला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करायला लागले आणि त्याचे भयंकर परिणाम काय झाले हे आपल्याला कळेलच. त्याच्यावर असाही आरोप केला जातो की त्याने मुसोलिनीला पाचारण केले नसते आणि लष्कराला त्याला थोपवायचा आदेश दिला असता तर ते सहज शक्य होते. पण व्हिट्टोरिओला आपल्याच सैनिकांनी इटालियन जनतेवर गोळ्या चालवल्या असत्या की नाही याची शंका होती पण त्याला स्वत:लाही ते आवडले नसते. असो.
माणूस म्हणून व्हीट्टोरिओ एक प्रेमळ नवरा, बाप होता. तो सुसंस्कृत होता आणि त्याचा नाण्यांचा संग्रह खूपच मोठा होता. त्याचे शौर्यही पहिल्या महायुद्धात दिसून आले. तो नेहमी आघाडीवर असायचा आणि त्याने त्याच्या सैनिकांची काळजी घेण्यात कुठलीही कसर सोडली नाही. पण राजकारण आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय धुमाळीत त्याचा निभाव लागला नाही हे खरे.

रोम ! रोम ! रोम !...........

मुसोलिनीने मिलान सोडले त्यावेळी जे दृष्य होते त्यावरून भविष्याची चुणूकच बघायला मिळली असे म्हणायला हरकत नाही. मिलान-रोम मधे धावणार्‍या रेल्वेचा खास डबा फुलांनी हारांनी खच्चून भरला होता. बाहेर स्टेशनमधे हजारो माणसे त्याची अतुरतेने वाट पहात होती. ब्लॅक शर्टसनी त्याला मानवंदना दिली आणि खास बॅंडवर विजयाची धून वाजविण्यात आली. लोकांच्या मानवंदनेचा स्विकार करत मुसोलिनी मग त्या डब्याच्या मोठ्या खिडकीत उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावर तणाव दिसत होता आणि तो जवळजवळ पांढराफटक पडला होता. पण जेव्हा ही आगगाडी रोमच्या जवळ आली तेव्हा तीन विमानांच्या फॅसीस्ट वैमानिकांनी आकाशात झेप घेत त्याला मानवंदना दिली आणि त्याच्या चेहर्‍यावरचे नैराश्य दूर होऊन त्यावर आत्मविश्वास प्रकट झाला.

बरोबर ११वाजून १५ मिनिटांनी त्याने रोम मधल्या राजवाड्यात प्रवेश केला. त्या राजवाड्याचे नाव आहे पालाझ्झो दी क्युरिनाले.

त्याने जो वेष परिधान केला होता तो पुढे कुप्रसिद्ध होणार हे नियतीच्या मनात असावे. त्याने डोक्यावर बॉलर हॅट घातली होती आणि पायात बुटाच्या वरती पांढरे स्पॅट. त्याच्या अंगावर अजून एक डोळ्यात भरणारे वस्त्र होते आणि ते म्हणजे काळा शर्ट. फॅसीस्ट पार्टीच्या लढणार्‍या विभागाचा पोषाख ! राजाला भेटायला ना त्याने हे कपडे बदलले ना त्याला त्याची काही जरूरी वाटली.

राजाला भेटल्यावर नाटकीपणे त्याने म्हटले
“ महाराज मला माझ्या पोषाखाबद्दल क्षमा करतील अशी आशा आहे. आपण बोलावल्या बोलावल्या मी तसाच तडक युद्धभूमीवरून आलो आहे…………………………………..

क्रमशः

जयंत कुलकर्णी.
ही लेखमालिका लिहायचे कारण मुसोलिनीची आणि त्याच्या राष्ट्राची शोकांतिका आपल्यासमोर आणावी ही आहे. ती का झाली याचाही उहापोह शेवटच्या भागात करण्याचा मानस आहे. ज्या प्रमाणे हिंदुस्तानी संगीतावरची लेखमालिका पूर्ण केली त्याप्रमाणे हळू हळू का होईना ही ही पूर्ण करायचा विचार आहे. अल्बर्ट स्पीअरची अर्धवट आहे, त्याची कल्पना आहे आणि ती ही पूर्ण करण्यात येईल. :-) border=

हे ठिकाणविचारसमीक्षालेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

स्वागत आहे!
सुरुवात तर उत्तम झाली आहे.

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

अर्धवटराव's picture

30 Dec 2011 - 10:35 pm | अर्धवटराव

तुमची लेखनशैली, लेखन विषय... सर्वच अप्रतीम असतात राव.
पुढील भागांची वाट बघतोय दादा...

अर्धवटराव

विलासराव's picture

30 Dec 2011 - 10:35 pm | विलासराव

वाचत आहे.

अन्या दातार's picture

30 Dec 2011 - 11:19 pm | अन्या दातार

शीर्षक वाचले नि जयंत सरांचा एक मस्त लेख वाचायला मिळणार याची खात्री वाटली.

नेहमीप्रमाणेच पुभाप्र :)

कुलकर्णीकाका ग्रेट. हीपण लेखमालिका माहितीपूर्ण असणार यात शंकाच नाही.

- पिंगू

पाषाणभेद's picture

30 Dec 2011 - 11:46 pm | पाषाणभेद

आपण मिपाचे इतिहासकार आहात. वाचतोय.

सुनील's picture

30 Dec 2011 - 11:54 pm | सुनील

हे लेखमालादेखिल उत्तम होणार याची खात्री!

मला फोटो दिसत नाहीत. काय कारण असावे?

धाग्याचं नाव आणि विषय यावरुन तुमचाच असणार याची कल्पना आलेली होती, अपेक्षाभंग झाला नाही त्याबद्दल धन्यवाद.

उत्तम लेखमालेचा आरंभ. पुढील भागांची प्रतिक्षा करत आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

31 Dec 2011 - 10:20 am | घाशीराम कोतवाल १.२

उत्तम सुरुवात खर तर हिटलर बद्दल बरच वाचल ऐकल पण मुसोलिनी बद्दल फार थोड साहित्य वाचायला मिळाल आहे आशा आहे हि मालिका उत्तम होइल

चावटमेला's picture

31 Dec 2011 - 11:10 am | चावटमेला

चांगली लेखमालिका सुरू केल्याबद्दल धन्यवाद. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

प्रास's picture

31 Dec 2011 - 11:23 am | प्रास

आणखी एका, मराठी भाषेतल्या काहीशा अस्पर्शित अशा, ऐतिहासिक घटनांच्या मुख्य पात्राच्या जीवनपटाला, या लेखमालेच्या निमित्ताने, हात घातल्याबद्दल अभिनंदन!

ही मालिकादेखिल आधीच्या लिखाणाप्रमाणे उत्तम होईल यात संशय नाही पण हे पहिलं पुष्प वाचल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या त्या इथेच सांगतो आहे.

इटालीचे राजे व्हिट्टोरिओ तिसरे यांची माहिती तुम्ही याच भागात दिलेली आहे. ती काहीशी त्रोटक आणि मध्येच आल्यासारखी वटतेय. या मालिकेचा पहिला भाग म्हणून व्हिट्टोरिओची माहिती आली असती तर एकूणच मालिकेची पायाभरणी योग्य झाली असती असं वाटतं. कारण व्हिट्टोरिओची माहिती फारच त्रोटक आल्यामुळे त्याने घेतलेल्या निर्णयांची योग्य समीक्षा होऊ शकणार नाही असंच वाटत राहतं कारण पहिल्या आणी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात त्याने जे विरुद्ध टोकाचे निर्णय घेतलेत त्यामागे त्याची उदारमतवादी भूमिका बघता केवळ राजसत्ता टिकवणे हाच हेतु असेल असं वाटत नाही.

सुरूवात तर चांगली झालेलीच आहे.

आता पुढल्या भागांच्या प्रतिक्षेत.

अवांतर - अल्बर्ट स्पीअर पूर्ण होणार आहे या बातमीनेसुद्धा खूप आनंद दिलेला आहे.

जयंत कुलकर्णी's picture

31 Dec 2011 - 1:05 pm | जयंत कुलकर्णी

प्रास,

एखाद्या लेखात काही अवांतर माहिती द्यावी लागते ती साधारणतः दुसर्‍या रंगात किंवा करड्या रंगात द्यावी असा संकेत आहे. ही जी माहिती आहे ती सविस्तर नसावी कारण मग मुळ विषय बाजुलाच रहाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तो उदारमतवादी होता तरी असा वागला म्हणूनच त्याच्या हेतू विषयी असा संशय घेण्यास पुष्कळ जागा उरते आणि काही इतिहासकारांनी ती रास्तपणे घेतली आहे.

असो.

निश's picture

31 Dec 2011 - 12:57 pm | निश

जयंत सर,

लेख व फोटो एकदम सुंदर.

पुढिल लेखाची वाट पहातो आहे.

निश's picture

31 Dec 2011 - 12:58 pm | निश

जयंत सर,

लेख व फोटो एकदम सुंदर.

पुढिल लेखाची वाट पहातो आहे.

जयंत कुलकर्णी's picture

31 Dec 2011 - 4:56 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

अमित's picture

31 Dec 2011 - 5:23 pm | अमित

अप्रतिम सुरवात.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मन१'s picture

31 Dec 2011 - 6:11 pm | मन१

चांगली मालिका सुरु होते आहे, हे पाहून आनंद झाला.
इटालीच्या राजाला फार काही पर्याय उप्लब्ध नव्हते असेच जास्त ऐकले आहे.
फॅसिस्ट घोषणांमध्ये जुने रोमन साम्राज्य, त्यांची सर्वदूर सार्वभौम सत्ता ह्या गोष्टी रंगवून रंगवून सांगितल्या जात.
जनतेला भावनिक करून "आताही तसेच काहिसे करून इटालीचे भवितव्य उज्ज्वल करु" असा आशावाद दिसायचा.
सर्वत्र इटालीचे "रोमन साम्राज्य" ह्या कल्पनेत "राजा" हा भावी "सम्राट" बनू शकत होता.(from kingdom to an empire). आता हे कोणत्या राजाला नको असेल? मुसोलिनीविरुद्ध क्ठोर भूमिका न घेण्याचे एक कारण हे ही असू शकेल .

बाकी ह्या महायुद्धादरम्यान कागदोपत्री का असेना राष्त्रप्रमुख असणार्‍या राजघराण्यांची मला नेहमीच मौज वाटते.
महायुद्धात जबरदस्त नुकसान होउन इटाली, जपान हे देश हरले. जेत्या सैन्यांतर्फे मुसोलिनी व जनरल टोजो ह्यांचा यथावकाश समाचार घेण्यातही आला.पण राजघराण्याला कुणी जेत्याने बोटही लावले नाही. अगदि इटालेने जिंकलेल्या अल्बानिया व इथिओपिआच्या राजघराण्याचेही पुनर्पदार्पण झाले होतेच.

उत्तम सुरुवात! मुसोलिनीबद्दल फारशी माहिती नाही त्यामुळे या लेखमालेबद्दल धन्यवाद.

फारएन्ड's picture

1 Jan 2012 - 12:43 pm | फारएन्ड

आवडला पहिला भाग. हिटलरबद्दल जेवढे वाचले आहे तेवढे मुसोलिनीबद्दल नाही, त्यामुळे चांगली माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. पुढील भागांबद्दल उत्सुकता आहे आता.

पैसा's picture

1 Jan 2012 - 2:21 pm | पैसा

सावकाशीने लेख वाचला आणि फार आवडला. अभ्यासपूर्ण आणि अनवट विषयावरील लेखांची परंपरा कायम ठेवली आहेत त्याबद्दल धन्यवाद!

मोदक's picture

2 Jan 2012 - 2:08 am | मोदक

पुढील भागांबद्दल उत्सुकता आहे.

मोदक.