|| श्री गुरवे नम: ||
दिवाळीच्या आदल्या दिवशी सोमवारी (२४ ऑक्टोबरला) सकाळी मी बोरिवलीला एका विद्यालयात गेलो होतो. इ.९वीतली ४५-५० मुलं (दिवाळी सुटी सुरु झाली असूनसुद्धा) जमली होती. नुकतीच परिक्षा संपल्यामुळे डोक्यावर अभ्यासाचा भार नव्हता. शाळेचे मुख्याध्यापक आणि १०-१२ पालकही आले होते. मी सोबत भरपूर रंगीत चौरस कागद नेले होते. छोट्याशा प्रास्ताविकानंतर आमची ओरिगामी कार्यशाळा सुरु झाली.
ओरिगामीचे मूलभूत आकार शिकवताना.
मुलांबरोबर स्वतः मुख्याध्यापकही सहभागी झालेले दिसत आहेत.
टारगट, मस्तीखोर, बेशिस्त, उर्मट समजली जाणारी ही सर्व मुलं (मुलीसुद्धा) त्यानंतर सुमारे ४ तास मन एकाग्र करून माझ्या सूचना ऐकत होती आणि त्याप्रमाणे कागदाच्या वस्तू तयार करण्याचा आनंद लुटत होती.
एकाग्रतेने सूचना ऐकताना
आम्ही ओरिगामीच्या ८-९ वस्तू बनवल्या. कमीत कमी घड्या घालून तयार होतील अशा, अगदी सोप्या वस्तू मी शिकवण्यासाठी निवडल्या होत्या. ट्रे, कप, कोलांटी मारणारं खेळणं, वर्तमानपत्राची गांधीटोपी, तिळगूळ वाटी, पेन्सिल वगैरे तयार करण्यात मुलं (आणि पालकसुद्धा) अगदी रंगून गेली.
काही सुशिक्षित, सधन, संवेदनाशील पालकांनी ही ओरिगामी कार्यशाळा आयोजित केली होती. केवळ ३-४ तास मजा करणे यापेक्षा ही कार्यशाळा आयोजित करण्याचा अंतस्थ हेतू मात्र काहीसा वेगळाच होता.
ही सर्व मुलं मराठी माध्यमात शिकत आहेत. बहुतेक मुलांचे पालक फारसे सुशिक्षित नाहीत, घरकाम, रोजंदारीवरची कामं, कष्टाची कामं करतात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यांची घरंही बकाल वस्तीत, झोपडपट्टीत, दाट लोकवस्तीत. आजूबाजूला दारुडे, शिवीगाळ, मारामाऱ्या रोजच्याच. योग्य सांस्कृतिक वातावरण अजिबात नाही. त्यामुळे मुलांच्या संगोपनासाठी, योग्य जडणघडणीसाठी अगदी प्रतिकूल वातावरण. मुलांच्या भावनिक, मानसिक वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध कलाविष्कारांची ओळख, स्वत:मधले गुण ओळखून त्यांची जोपासना करणे अशा अनेक गोष्टीचे मार्गदर्शन त्यांचे पालक (इच्छा असूनही) त्यांना करू शकत नाहीत. असं असेल, तर मग ती आपली स्वत:ची पोटची मुलं नसली, तरी आपण ज्या समाजात राहतो, ज्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्याच समाजातल्या या मुलांना आपण आपले पाल्य समजून त्यांच्यासाठी आपल्याला शक्य ते करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. दुसऱ्या शब्दात, आपण त्यांचे कौटुंबिक / जैविक पालक नसलो तरी सामाजिक पालक असतो. ही पालकत्वाची जबाबदारी आपण पार पडायला हवी. आपली ही जबाबदारी पार पाडणं आणि मुलांना काहीतरी सर्जनशील कलाकृती शिकवणं, एक सुंदरसा अनुभव देणं हाच या कार्यशाळेचा अंतस्थ हेतू होता.
टंबलिंग टॉय (कोलांटी मारणारं खेळणं)ने कोलांटी मारल्यावर आनंदलेली मुलं
या मुलांपैकी काहींचे पालक सुशिक्षित, सुजाण, सामाजिक बांधिलकी मानणारे आहेत. इतर वंचित मुलांना काही चांगलं शिकवावं, यासाठी ते प्रसंगी स्वत: पदरमोड करून अनेक उपक्रम आयोजित करत असतात. त्यांच्या या धडपडीमधे माझा एक खारीचा वाटा उचलू शकलो, याचा मला आनंद वाटतो.
कार्यशाळेचा समारोप
याच उद्देशाने गेल्या वर्षी मी डहाणू जिल्ह्यातल्या तळासरीला वनवासी विकास प्रकल्पामध्ये गेलो होतो. तिथे आदिवासी पाड्यांमधली मुलं आपल्या आईवडिलांपासून दूर राहून शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं. मग त्या मुलांच्या सोयीने तिथे राहायला गेलो.
केंद्राच्या व्यवस्थापकांशी आदल्या दिवशी सविस्तर चर्चा करुन कृतीसत्रांची रूपरेषा ठरवली. त्यानुसार दुस-या दिवशी सर्व मुलामुलींना दोन गटात विभागून ओरिगामीच्या काही अगदी सोप्या गोष्टी शिकवल्या. हा अनुभव खूपच छान होता. ओरिगामी हे फक्त एक माध्यम होतं, त्यामागचा हेतू होता......त्यांच्याशी जवळीक साधणं, त्यांना थोडंसं धीट बनवणं, त्यांना बोलतं करणं. ही मुलं न्यूनगंडग्रस्त, अत्यंत लाजरीबुजरी, अबोल आहेत. शिक्षण संपवून ती जेव्हा बाहेरच्या जगात पाऊल ठेवतील तेव्हा आवश्यक असलेला धीटपणा, आत्मविश्वास त्यांच्यात असावा यासाठी आतापासूनच विविध उपक्रम करण्याची नितांत आवश्यकता आहे. ओरीगामीच्या माध्यमातून हा उद्देश बराचसा सफल झाला असं निश्चित म्हणता येईल, कारण सुरुवातीला स्वतःचं नाव सांगायलाही बुजणारी मुलं सत्राच्या शेवटी अनौपचारिक आभार मानायला आपणहून माझ्याजवळ आली. म्हणूनच, आता पुन्हा एकदा जाण्याचा मानस आहे.तेव्हा ओरिगामीबरोबरच नाट्य-अभिनयविषयक कृतीसत्र घ्यायचा विचार आहे.
प्रतिकूल परिस्थितीमधे, आईवडिलांपासून लांब राहून शिक्षण घेणा-या या मुलांच्या जीवनातले चार क्षण आनंदित करुन त्यांना थोडंसं धीट, बोलतं करण्यातलं आगळं समाधान मला मिळालं. ओरिगामीमुळे मला सामाजिक पालकत्वाचे हे अनुभव मिळाले. अनेक नवे मित्र मिळाले. ओरीगामीचा हा एक वेगळाच फायदा आहे, नाही का ?
कार्यशाळेत बनवलेल्या वस्तू
टीप : १. वरील सर्व छायाचित्रे : श्री. प्रशांत ननावरे.
२. यापूर्वीच्या दोन धाग्यांना प्रतिसाद म्हणून काही मिपाकरांनी ओरिगामी शिकवायची विनंती केली होती. माझ्याकडे सध्या कॅमेरा नसल्यामुळे मिपावर छायाचित्रं टाकता येत नाहीयेत. म्हणूनच, निदान मुंबईच्या मिपाकरांसाठी प्रत्यक्ष कार्यशाळा घ्यायच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी सोयीस्कर जागा हवी. कुणी मिपाकरांनी जागा मिळवण्याच्या बाबतीत पुढाकार घेतला, तर इतर व्यवस्था मी करू शकेन.
प्रतिक्रिया
19 Dec 2011 - 9:00 pm | निवेदिता-ताई
छान छान..........
ओरिगामीमुळे मला सामाजिक पालकत्वाचे हे अनुभव मिळाले. अनेक नवे मित्र मिळाले. ओरीगामीचा हा एक वेगळाच फायदा आहे, नाही का ?
+११११११११११११११११११११११
आम्हालाही आवडेल ओरिगामी शिकायला....
पुर्वी आमचेकडे शाखेचे प्रचारक येत असत..ते माझ्या मुलीला असेच काहीबाही करुन दाखवायचे...
छान छान वस्तू बनवायचे....मोर, (विशेष लक्षात राहिलेला).....
सुधांशू..............ग्रेट....ह ..
21 Dec 2011 - 1:19 pm | सुधांशुनूलकर
सर्वांना धन्स.
जानेवारी महिन्यात मुंबईत एखादी कार्यशाळा आयोजित करायचा प्रयत्न आहे. नक्की ठरलं, की माहिती देईनच.
सुधांशु.
19 Dec 2011 - 9:07 pm | गणपा
सुधांशू उत्तम कार्यक्रम.
आणि तुम्ही जो खारीचा वाटा उचललात त्याबद्दल तुमचं कौतुक आहे.
कीप इट अप. :)
19 Dec 2011 - 10:22 pm | देविदस्खोत
सामाजिक पालकत्व...... ही संकल्पना आवड्ली.........आपण हे सर्व अनुभवताय एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष सहभागी होवुन त्यात मोलाचे योगदान देताय.... आदरणीय आहे हे................
19 Dec 2011 - 10:25 pm | अन्या दातार
या प्रकल्पाबद्दल मी ऐकलेलं आहे. आज तुमच्या लेखामुळे माहितीत भर पडली.
19 Dec 2011 - 10:30 pm | विलासराव
१०-१२ लोक येनार असतील तर माझ्याकडेच या गिरगावला.
बाकी तुमचा उपक्रम आवडला.
20 Dec 2011 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा
वा छान आहे,किप इट अप...
20 Dec 2011 - 7:25 am | ५० फक्त
अतिशय प्रशंसनीय उपक्रम,
सुधांशु, पुण्यात माझ्या घरी स्वागत आहे, पत्ता आणि फोन नंबर व्यनि करतो, कधी येताय ते सांगा. मिपाकरांना मी कळवतोच.
आणि मुंबईत माझी बहिण बिएम्सि मध्ये शिक्षिका आहे, याची काही मदत होइल का कळवा, म्हणजे तिला सुद्धा कळवतो तसे.
20 Dec 2011 - 9:49 am | फारएन्ड
आवड्ला उपक्रम व लेख!
20 Dec 2011 - 10:52 am | गवि
फार छान.
ओरिगामी म्हणजे कागदांना घड्या घालून वस्तू बनवण्याची कला हे फार पूर्वी ऐकून कपाळाला आठ्या घातल्या होत्या.. त्यात कसली मोठी कला..? होड्याबिड्या बनवतोच की आपण.. आणि कागदाचे प्राणी, पक्षी यांचं कसलं कौतुक?
पण अवचट आणि इतरांच्या निमित्ताने उत्कृष्ट ओरिगामीचे नमुने बघितले आणि थक्क झालो. बापरे.. काय नाही बनवता येत ओरिगामीत असं वाटलं..
मनातल्या मनात शरमलो आणि माझं मत बदललं.
केवळ कागदाखेरीज काहीच न लागणारा हा छंद विलक्षण असावा असं जाणवतंय. हँड्स ऑन एकदाही करुन पहायचा योग आला नसला तरी.
शुभेच्छा..
(पांघरुणाचीही घडी न घालता येणारा) - गवि
20 Dec 2011 - 10:13 pm | क्रान्ति
उपक्रम आवडला.
21 Dec 2011 - 1:24 pm | किसन शिंदे
उपक्रम आवडला तुमचा.
21 Dec 2011 - 7:41 pm | चित्रा
कौतुकास्पद.
अलिकडे कागदाचा एक उडी मारणारा लहानसा बेडूक एका छोटीने केला तो पाहिला, असे वाटले की घरच्या मोठ्यांनाही हा करण्यासारखा उद्योग आहे. (सास-बहूच्या गोष्टी बघून कंटाळा आला असला तर! ).
21 Dec 2011 - 9:35 pm | पैसा
साध्या कागदाच्या फार सुरेख कलाकृती तयार होतात हे पाहून आश्चर्य वाटतं. हा बिनखर्चिक छंद अगदी गरीब मुलानाही जोपासण्यासारखा आहे.
22 Dec 2011 - 9:36 pm | विकास
उत्तम प्रकल्प!
ओरिगामी हे फक्त एक माध्यम होतं, त्यामागचा हेतू होता......त्यांच्याशी जवळीक साधणं, त्यांना थोडंसं धीट बनवणं, त्यांना बोलतं करणं. ही मुलं न्यूनगंडग्रस्त, अत्यंत लाजरीबुजरी, अबोल आहेत. शिक्षण संपवून ती जेव्हा बाहेरच्या जगात पाऊल ठेवतील तेव्हा आवश्यक असलेला धीटपणा, आत्मविश्वास त्यांच्यात असावा यासाठी आतापासूनच विविध उपक्रम करण्याची नितांत आवश्यकता आहे.
सहमत!
सामाजीक पालकत्व हा शब्द आवडला. पुढील प्रकल्पासाठी शुभेच्छा!
22 Dec 2011 - 10:22 pm | रामदास
माणसं जमली तर जागेची व्यवस्था करण्यात येईल.