|| श्री गुरवे नम: ||
ओरिगामी म्हणजे कागदाला घड्या घालण्याची कला. कागदाचा शोध चीनमध्ये लागला. मात्र ओरिगामी ही कला जपानमध्ये जन्मली आणि फुलली. जपानमध्ये या कलेला सांस्कृतिक, सामाजिक महत्व आहे. १००० ओरिगामी क्रेन तयार केले की देव आपल्याला एक इच्छापूर्ती बहाल करतो असं जपानी लोक मानतात. नवजात अर्भकाला, नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठीही १००० क्रेन्स भेट देण्याची प्रथा आहे. यासंबंधी 'जपानी मुलांचा शांतीदूत' हा लोकसत्तामध्ये (रविवार, २७ मार्च २०११, बालरंग पुरवणीमधे) प्रकाशित झालेला माझा लेख इथे वाचा.
जपानमध्ये त्सूनामीचं भयानक संकट कोसळलं होतं. त्यातून जपान देश लवकरात लवकर सावरावा या सद्भावनेनं ओरिगामी मित्र संस्थेच्या आम्ही मुंबई-पुण्याच्या सदस्यांनी भारतीय ध्वजाच्या केशरी-पांढरा-हिरवा या तीन रंगामध्ये १००० क्रेन्स तयार करून (ते एका कापडावर व्यवस्थित चिकटवून) सर्व भारतीयांच्या वतीने जपानी वकिलातीच्या उच्चाधिका-यांना सदिच्छाभेट दिला.
त्याचा फोटो :
गेल्या साठ-सत्तर वर्षांत या कलेचा प्रसार जगभर झाला आहे. याचं मुख्य श्रेय जातं ‘अकिरा योशिझावा’ या जपानी व्यक्तीकडे. त्यांनी सोप्या खुणा वापरून ओरिगामीची एक सर्वसंमत, प्रमाणित भाषा तयार केली. (त्यामुळे कुणीही – अगदी निरक्षर व्यक्तीसुद्धा – ओरिगामी अगदी सहज शिकू शकतं). तसंच, घड्या घालण्यापूर्वी कागद ओलसर करण्याची (wet foldingची) पद्धत शोधून काढली. यामुळे तयार होणारी वस्तू – विशेषत: प्राणी, पक्षी, कीटक – कमालीची खरीखुरी वाटते. ओरीगामीच्या प्रसारासाठी त्यांनी जगभर प्रवास केला, कार्यशाळा घेतल्या, अनेक पुस्तकं लिहिली, अक्षरश: हजारो नव्या मॉडेल्सचा शोध लावला. ओरीगामीचे पितामह म्हणून ते ओळखले जातात. ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ या जपानच्या सर्वोच्च नागरी बहुमानानं त्यांना गौरवण्यात आलं. २००५ मधे वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचं दु:खद निधन झालं.
शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी ओरिगामीचे अनेक फायदे होतात असं आढळलंय. अल्झायमरसारखे विस्मृतीसंबंधित रोग दूर ठेवायला ओरिगामीची मदत होते. ओरीगामीमुळे मन एकाग्र व्हायला मदत होते. मनोरुग्ण, व्यसनाधीन व्यक्ती यांना मानसिक स्थैर्य मिळायला मदत होते. सर्जनशीलतेला वाव मिळतो. दोन्ही हातांच्या बोटांचा वापर होत असल्यामुळे, मेंदूचा उजवा भाग कार्यरत राहतो. मेंदूचा उजवा भाग हा कल्पकता, सर्जनशीलता, नवनिर्मिती, भावनिक प्रगल्भता यांच्याशी निगडीत असतो.
माझी ओरिगामी
श्रीगणेशाची ही दोन ओरिगामी-रूपं, सप्तरंगी मोदकाच्या नैवेद्यासह. माझ्या मित्राच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेवर हे ओरिगामी श्रीगणेश विराजमान झाले आहेत. यासाठी ५०० श्रीगणेश तयार केले.
आमची ‘राणीची बाग’ अर्थात प्राणीसंग्रहालय,
आणि हे आमचं ज्युरासिक पार्क.
काही टॅसलेशन्स, पार्श्वप्रकाशासह
दोन वाडगे – यातला उजवीकडचा चौरसाकृती ‘एनिग्मा बाऊल’. याची मूळ कृती खूप लांबलचक आणि थोडी क्लिष्ट आहे. मी त्याच्या घड्यांच्या आकृतीबंधाचा (crease pattern चा) अभ्यास करून, कमीतकमी घड्यांत हा बाऊल तयार करण्याची एक सोपी पद्धत शोधली.
ओरीगामीचा आणखी एक (अदृश्य) फायदा माझ्या अनुभवात आला, तो म्हणजे ओरिगामीमुळे होणारी छोट्यांशी दोस्ती आणि थोडीशी सामाजिक बांधिलकी. त्याबद्दल...... पुढच्या लेखात.
प्रतिक्रिया
22 Nov 2011 - 10:11 pm | रेवती
माहितीपूर्ण लेखन.
सगळ्या कलाकृती ग्रेट वाटतायत.
कागदी बाऊल मस्त!
गणपती तोही मोदकाच्या नैवेद्यासकट याची मजा वाटली.
पारदर्शक कागदाचे प्रकारही चांगले झालेत.
22 Nov 2011 - 10:14 pm | प्रचेतस
मस्त मस्त मस्त.
ओरीगामी कशी करायची ते पण शिकवा न जरा.
22 Nov 2011 - 10:17 pm | जोशी 'ले'
खुपच सुंदर, ओरिगामी गणेश तर अप्रतिम... जमल्यास थोडे थोडे शिकवताही आले तर पहा, कमीत कमी बाप्पा तरी ..
22 Nov 2011 - 10:25 pm | पिंगू
हा भाग पण मस्त जमून आला आहे.
- (नवोदित ओरिगामीकार) पिंगू
22 Nov 2011 - 10:51 pm | निवेदिता-ताई
मस्त...ह
आम्चे कडे पण एक आर एस एस चे प्रचारक यायचे , ते असच काहितरी करत रहायचे....
22 Nov 2011 - 11:00 pm | पैसा
सगळ्याच कलाकृती सुंदर आहेत!
22 Nov 2011 - 11:25 pm | गणपा
असचं म्हणतो.
पण आमचं मागण पण पुर्ण करा की सुधांशुराव.
छोट्या छोट्या सोप्या कलाकृती शिकवा की आम्हाला पण. :)
22 Nov 2011 - 11:29 pm | दादा कोंडके
हाही भाग सुंदर! पन आमालाबी शिकवा की राव..
23 Nov 2011 - 7:25 pm | सुधांशुनूलकर
रेवतीताई, पैसाताई, पिंगू, निवेदिता ताई, अत्रुप्त आत्मा
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
गणपा, दादाकोंडके, जोशी'ले', वल्ली,
ओरिगामीच्या सोप्या वस्तूंच्या कृतींची चित्रं टाकून शिकवायचा विचार होता. त्यापेक्षा प्रत्यक्ष शिकवणं जास्त सोपंय , असं वाटायला लागलं. त्यादृष्टीनं विचार चाललाय. त्यानिमित्ताने 'कलाकट्टा' सुरू करता येईल आणि इतरही कला आपल्याला शिकता येतील.
दोन-तीन तासांसाठी एखाद्या जागेची व्यवस्था होऊ शकली तर हे करता येईल. बघू या.
24 Nov 2011 - 10:22 am | विलासराव
>>>>>दोन-तीन तासांसाठी एखाद्या जागेची व्यवस्था होऊ शकली तर हे करता येईल. बघू या.
माझ्या घरी करा. गिरगावला.
मलाही शिकवाव लागेल .
23 Nov 2011 - 1:29 am | अत्रुप्त आत्मा
छान माहीतीपुर्ण धागा आहे.सगळ्या कलाक्रुती सुंदरच आहेत,पण आंम्हाला त्यातले बाउल एकदम आवडले,मनातच बसले म्हणा ना...!