सकाळचं कोवळं सोनसरी ऊन चहूकडे पसरले होते. निंबाळकरांच्या वाड्यासमोरच्या हौदात त्या उन्हाचे कवडसे पडुन उन उन हिरे चमकत होते. कधी काळी ज्या वाड्यात हिर्यांचा लखलखाट असायचा तिथे आता या हिर्यातच समाधान मानून घ्यायला लागत होते. वाड्यासमोरच्या सैलसर मो़कळ्या पटांगणात निंबाळकरांचे दोन चार बैल चरत होते. पलीकडेच नुकतीच पाडसाला जन्म दिलेली गौरा गाय पाडसाला दूध पाजत होती. निंबाळकर तसे जुन्या वळणाचे त्यामुळे पाडसाचे दूध त्यांनी हिरावून घेतले नव्हते. बाकी पटांगणात गावातल्या कुठल्याही घरात असतो तसा आणि तितकाच पसारा पडला होता. दोनचा धान्याच्या गोण्या, दूधाच्या कासर्या, शेणाच्या गवर्या, एका बाजूला हारीने उभ्या असलेल्या चांदणीच्या फुलांचा सडा, भिंतीच्या आधाराने अधाशीपणे चढलेला जाईचा वेल नंतर त्याची व्यवस्थित मशागत न झाल्याने फुलांनी डवरला वगैरे नव्हता पण देवापुरती फुले अंगावर बाळगुन होता. सकाळी सक्काळी निंबाळकरांच्या डाव्या अंगाने टाकलेला सडा आत्तापावेतो वाळला होता पण तसा सारखच कोणीतरी येउन अंगणात पाणी ओतुन जात होते त्यामुळे मातीचा मंद सुगंध सर्वदूर पसरला होता. वाड्यासमोरच्या रस्त्यावरुन सायकलींचा मधुनच फटफटींचा खडखडाट चालु होता. एरवी वाडा एकाबाजूला असल्याने बर्यापैकी शांतता होती.
निंबाळकर धारोष्ण दूध पिउन पहिल्या मजल्यावरच्या सज्ज्यावर येउन बसणारच होते. वाड्याप्रमाणेच सज्जा देखील ऐसपैस होता. शहरातल्या शे दीडशे चौरस फूटांच्या टेरेसला ती मजा नाही. निंबाळकरांची बैठक घरात असताना नेहमी तिथेच असायची. तीन चार गाद्या त्यावर शुभ्र चादरी, त्याबाजूला शिस्तीने ठेवलेले पितळी तांबे आणि फुलपात्रे, एक शिवकालीन मेज आणि त्यावर साधारण त्याच काळात कधीतरी बनवलेली पेनं आणि कसलीशी वही. एका बाजूला वाचुन झाल्यावर निवांत कलंडलेला पुढारी आणि दुसर्या बाजूला त्याची पुरवणी निवांत वाचणारा किसन्या. त्यालाही रिवाजाप्रमाणे चांदीच्या पेल्यात केशरी दूध दिले गेले होते. निंबाळकर आले तसे त्याने शांतपणे पुढारी बाजूला ठेवला.
किसन्या तसा गावचा कलंदर गडी. गाठीशी ४-२ छोट्या मोठ्या जमिनी, बाजारात १-२ गाळे आणी बि बियाणांचा जम बसलेला धंदा. किसन्याने मनावर घेतले असते तर अजुन कितीतरी वाढवु शकला असता. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. पब्ण त्याला तसा धंदा वाढवणे, पैसा कमावणे याचा फारसा नादच नव्हता म्हणा ना. त्यापेक्षा गावभर उंडारुन थोरामोठ्यांशी गप्पा छाटाव्यात, इकडे तिकडे पिना मारत गंमत करत हिंडावे, चौकस नजरेने टिपुन घ्यावे आणि मग दुसर्या ठिकाणी गेल्यावर गप्पा छाटायला त्याचा उपयोग करुन घ्यावा इतकेच किसन्याचे माफक छंद होते. एरवी निंबाळकरांचा आणी त्याचा संबंध असण्याचे कारण नाही. पण त्याच्या याच गुणांमुळे निंबाळकरांच्या बंधुंशी त्याचे निकटचे संबंध होते. निंबाळकरांचे एकत्र कुटुंब होते त्यामुळे येणारा जाणारा आप्पासाहेबांना म्हणजे निंबाळ्करांना भेटुन जायचाच. तसाच किसन्याही आल्यासरशी बैठकीवर येउन घटकाभर बसून जाणार होता. निंबाळकर आले तसे निवांत गावगप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. तसा किसन्या निंबाळकरांच्या पुतण्याबद्दल अजुन जाणुन घेण्यास उत्सुक होता. पण विषय स्वत:हुन काढु नये हे त्याला माहिती होते. गावच्या बातम्या तश्याही त्यालाच पहिल्यांदा माहिती होत त्यामुळे कदाचित निंबाळकरांपर्यंत बातमी अजुन पावेतो पोचली नसेल पण प्रतापकुमारांचे प्रताप आणि प्रकरण किसन्याला कळुन चुकले होते. त्यामुळे किसन्या निघायच्या बेतातच होता.
तेवढ्यात समोरुन साक्षात मोहिते डॉक्टर येताना दिसले तसा किसन्या मोहरुन खाली बसला. मोहरुन जाण्याचे कारणच तसे होते. आत्ता अंमळ मज्जा येणार हे किसन्याला कळुन चुकले. डॉ़क्टर साहेबांनी आयुष्यभरात कधी डॉक्टरकी केलेली नव्हती कारण मुळात ते मेडिकल डॉक्टर नव्हते. आंबेडकर विद्यापीठातुन त्यांनी समाजशास्त्रात पीएचडी केली होती त्यामुळे ते डॉक्टर होते हे मात्र खरे. पण गावाला हे माहिती नसल्याने लोकांना उगा त्यांच्याबद्दल अंमळ जास्त आदर होता. बाकी आदर वाटण्याजोग्या व्यवसाय मात्र ते करायचे नाहीत. निव्वळ शब्दात सांगायचे तर ते तालुक्याचे आमदार देशमुखांचे मेहुणे होते. देशमुखांच्या बायडीचे कनिष्ठ बंधु. आणि आमदारकीच्या अनुषंगाने येणार्या 'दलालीच्या मॅनेजमेटच' काम देशमुखांनी विश्वासातले म्हणुन त्यांच्याकडे दिले होते. त्यामुळे मोहिते सुद्धा योग्य तो पैसा अडका चार दोन फियाट एखाद फॉर्ड, सुमो, क्वालिस इत्यादी गाड्या बाळगुन होते.
पण मोहिते आल्यावर गंमत येणार याचा चुणुक किसन्याला लागण्याचे मुख्य कारण म्हणजे निंबा़ळकर आणि देशमुखांमधुन विस्तव जायचा नाही हे होते. अश्यात मोहित्यांनी निंबाळकरांच्या घरी येणे हे एकता कपूरच्या एखाद्या आगामी डेली सोपचे लाइव्ह चित्रीकरण पाहण्या एवढे मजेदार होते. आणि खरे सांगायचे तर मोहित्यांच्या येण्याचे कारण काय असावे याची थोडी 'कल्पना' किसन्याला आली होती.
आप्पासाहेब डॉक्टर मोहिते आल्यात - इति किसन्या.
मंग येउ देत की. तु कश्यापाई निघालास? मोहितेच येतायत नव्हं सयामचे राजे तर येइनात? बस की.
तसाही किसन्या बसणारच होता परत. पडत्या फळाची आज्ञा मानून तो परत स्थानापन्ना झाला. आप्पासाहेबांचा चेहरा पुर्णकाळ निर्विकार होता. देशमुखांशी असलेली खानदानी दुष्मनी बघता आप्पासाहेबांच्या चेहर्यावर किमान एक आठी पडेल अशी किसन्याला अपेक्षा होती. शिवाय एवढा निर्विकार चेहरा बघुन आपासाहेबांना प्रतापरावांबद्दल 'कल्पना ' आहे की नाही याची किसन्याला कल्पना येइना. त्यामुळे एरवी एवढा बिलंदर असलेला किसन्यादेखील क्षणभर गोंधळला.
एव्हाना घरचा गडी मोहित्यांना घेउन सदरेवर आलाच. निंबाळकरांच्या गडीमाणसांना सक्त ताकीद होती की बैठकीला सदरच म्हणावे. उगा मालक सज्ज्यावर बसलेत म्हणुन सांगितले तर ५० वर्षापुर्वा देशात आलेल्या लोकशाहीला वेशीवर टांगुन निंबाळकर पोकळ बांबुंनी ओल्या ढुंगणावर १०-२० फटके हाणल्याशिवाय राहणार नाहीत हे सर्वांना माहितीच होते. मोहिते तसा ऐसपैस माणूस. साधारण १५० - २०० किलोचे शरीर, गोरापान वर्ण, साहेबी थाटाने साफ केलेला चेहरा, कोकणातल्या ब्राहमणाला लाजवतील असे घारे डोळे, गळ्यात ८ तोळ्याचा गोफ, २ हातात मिळुन वेगवेगळ्या खड्यांच्या पाच अंगठ्या, एचएमटीचे दणकट घड्याळ आणि हातात ब्रेसलेट आणि साहेबी पोषाख. या एकुण लवाजम्यामुळे ते आहेत त्यापेक्षा दुप्पट वाटायचे त्यामुळे एका आख्ख्या गादीवर तेच कसेबसे मावलेनिंबाळकर त्याच्या उलट. सहा फूट उंच. गोरा पण रापलेला वर्ण. एक डाव भूताचा मधल्या 'मास्तुरे' म्हणणार्या मावळ्याच्या भूतासारख्या भरघोस मिश्या, टाइडला लाजवेल एवढा शुभ्र सदरा, शहरातुन जमान्यापुर्वी हद्दपार झालेले परीट घडीचे सदर्याच्या रंगाशी स्पर्धा करणारे धोतर, अस्सल सोन्यातुन घडवलेली पण अवघी एक अंगठी, काळेभोर डोळे आणि सुरकुत्यांमुळे अजुनच करारी भासणारा भारदस्त चेहरा.
कुस्तीपुर्वी दोन मल्ल कसे एकमेकांना जोखतात तसे हे दोन कमालीचे धुर्त आणि चाणाक्ष खेळाडु एकमेकांना केवळ नजरेने जोखत होते. रिवाजानुसार मोहित्यांना चांदीच्या पेल्यात केशरी दूध आले. दुष्मनी एकीकडे आणि घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत एकीकडे ही खानदानी परंपरा निंबाळ्कर कसोशीने जपत. एकेकाळी असलेले राज्य त्यांच्या वाडवडिलांनी नाना करामती करुन आधी मुघल / मराठे यांच्या आमदानीत आणि नंतर गोर्या साहेबाच्या अधिकाराखाली सुद्धा कसोशीने जपले होते. पण कावेबाज पटेलासमोर मात्र त्यांचा निभाव लागला नाही आणि छोटेखानी राज्य सरकारदरबारी जमा झाले. हळुहळु अपरंपार संपत्ती कमी होत गेली. वाडा वरचेवर दुरुस्तीची गरज असताना सुद्धा कधीमधीच दुरुस्त होत होता. जमिनी होत्या पण वडिलोपार्जित जमिनी आप्पासाहेबांची म्हातारी विकु देइना. भलीमोठी शेती होती पण तिचा दाणागोटा सात भावंडांच्या भल्या मोठ्या घरात आणि शेतावर राबणार्या लोकांतच संपुन जायच्या. उरलेल्या धान्यातुन निघणार्या पैश्यातुन गडीमाणसांचे आणि शेतमजुरांचे पगार व्हायचे. नाही म्हणायला गावाबाहेर चांगली २०० एकर जमीन होती पण ती देशमुखांच्या कृपेने लवकरच धरणाखाली जाणार होती. भला मोठा गोठा होता पण भरपुर गाई होत्या. त्यातुन थोडे उत्पन्न मिळे. नाही असे नाही. पण भल्या थोरल्या घरोब्याला तो कितीसा पुरणार? थोडक्यात सुबत्ता होती पण संपत्ती नव्हती. जमीन जुमला होता पण व्हिटामिन "एम" ची कामी होती. जी थोडीफार होती ती देशमुखांसमोर तिनदा निवडणुक लढवुन उधळली. त्यामुळे निंबाळ्करांकडे खाण्यापिण्याचे वांधे कधीच होत नव्हते. पण देशमुख मोहित्यांसारखी पैशाची गंगा देखील घरात वहात नव्हती.
याउलट देशमुख सलग १५ वर्षे विधानसभेवर निवडुन जात होते. गावोगावचे डोंगर त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने त्यांच्या नावावर होते. साखर कारखान्यात वरचष्मा होता. सेंद्रीय खतांचा कारखाना होता. शिक्षणसंस्था होत्या, स्वतंच्या नावावर नसली तरी भरघोस शेती होती, एक दोन पेट्रोलपंप होते, आडते बाजारात वट होता, कांद्याच्या पुरवठादारांवर वचक होता. थोडक्यात लक्ष्मीची कृपा होती आणि कुबेराचा वरदहस्त होता.
देशमुखांमध्ये आणि निंबाळकरांमध्ये साप - मुंगुसाचे नाते तयार व्हायला थोडक्यात सांगायचे तर अगदी योग्य ती पार्श्वभूमी होती. अश्यात मोहित्यांचे असे स्वतःहुन अचानक चालत येणे थोडे अनपेक्षित होते आणि ते अनपेक्षित असणे मोहित्यांना अपेक्षित होते. पण तसे काहीच आश्चर्य निंबाळकरांच्या चेहर्यावर दिसेना तसे मोहित्यांसारखा मुरलेला माणूसदेखील गोंधळला. दोघांच्या चेहेरर्याकडे बघुन एव्हाना किसन्याला लई धमाला येणार आहे हे कळुन आनंदाचे धुमारे फुटत होते. पण एखाद्या कसलेल्या कलाकाराप्रमाणे तो देखील मख्ख चेहर्याने बसला होता. कोंडी फुटायची चिन्हे काही दिसेनात, निंबाळ्करांच्या तोंडुन स्वागताचा एक शब्द फुटेना, किसन्याच्या उपस्थितीत मोहित्यांना नीट बोलवेना तसे मोहिते अस्वस्थ होउ लागले.
अखेर मनाचा हिय्या करुन तेच बोलले..............
**************************************************************
क्रमशः पहिला भाग पुर्ण.
क्रमशःचा किडा मलाही चावला असल्याने जाहीर माफी :)
**************************************************************
प्रतिक्रिया
6 Dec 2011 - 12:20 pm | मराठी_माणूस
उत्कंठा वाढली आहे
6 Dec 2011 - 12:20 pm | चैतन्य दीक्षित
गावचं वातावरण छान टिपलंय.
निंबाळकरांची, मोहित्यांची व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभी राहते.
छान लिखाण.
येऊ द्या पुढला भाग लवकरच !
6 Dec 2011 - 2:07 pm | गवि
उत्तम सुरुवात...
वाड्याचं आणि परिस्थितीचं वर्णन अगदी थोडक्या पण सूचक गोष्टींकडे लक्ष वेधून केलं आहेस. त्यामुळे अतितपशीलवार (परिसराच्या नकाशासारखं किंवा गायडेड टूरसारखं ) बटबटीत वर्णनात्मक न होता हलकीच, जाता जाता सुचवून जाणारी पण चित्रदर्शी शैली झाली आहे.
आम्हालाही किसन्याप्रमाणे उत्सुकता लागली आहे.. दोन भागांत अंतर नको जास्त..
6 Dec 2011 - 12:25 pm | नगरीनिरंजन
झकास झाला आहे. मेन ष्टुरी येऊंद्या बिगीबिगी.
6 Dec 2011 - 1:58 pm | प्रमोद्_पुणे
मस्त वातावरण निर्मिती केली आहेस्..पुढचा भाग लवकर टाक.
6 Dec 2011 - 2:07 pm | अन्या दातार
आता तुम्ही किती दिस आम्हाला लटकवून ठेवणार?? ;)
6 Dec 2011 - 2:19 pm | स्मिता.
सुरुवात छान झालीये. उत्सुकताही वाढलीये... पुढचा भाग लवकर येवू द्या.
6 Dec 2011 - 2:26 pm | पैसा
पुढचा भाग कवा यायाचा हो?
6 Dec 2011 - 2:27 pm | मी-सौरभ
पु.भा.वे.ला.न. हे वे.सां. न लगे....
6 Dec 2011 - 2:29 pm | प्यारे१
पुढचा भाग लवकर येऊ द्या.
बाकी १५०-२०० किलोचा माणूस म्हणजे थोडी अतिशयोक्ती वाटत आहे.
११५-१२० पर्यंत 'ट्रीम' करता आला तर बघा. ;)
6 Dec 2011 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार
सुरुवात रोचक आणि खिळवून ठेवणारी.
पु.भा.प्र. आणि आता मला क्रमशः वरून छळणारी एक व्यक्ती कमी झाल्याने आनंदात.
6 Dec 2011 - 3:06 pm | गणपा
वाचतोय....
बाकी प्रतिसाद लेखाच्या शेवटी 'समाप्त' दिसल्यावर. ;)
6 Dec 2011 - 4:55 pm | प्रीत-मोहर
हेच्च म्हणते
6 Dec 2011 - 4:36 pm | प्रभाकर पेठकर
पहिला भाग व्यवस्थित जमला आहे. अभिनंदन.
पुडील भागांच्या प्रतिक्षेत.
6 Dec 2011 - 7:55 pm | यकु
वा:!!
श्री. दा. पानवलकरांच्या लेखनशैलीची आठवण झाली.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
6 Dec 2011 - 8:48 pm | रेवती
गोष्ट रंगणार याची खात्री पटलिये.
पुढचे लेखन लवकर व्हावे म्हणून एखादी टंकनिका बोलवा.;)
6 Dec 2011 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा
येतिल तेवढे भाग वाचणार आहे...येत राहु द्या.