बाबा...

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
5 Jun 2008 - 4:17 pm

फादर्स डे च्या निमित्ताने...

१५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती.
खरं तर मदर्स डे आणि फादर्स डे हे साजरे करण्यासाठी अमुक एखादी तारिखच हवी असं नाही. कारण आपल्या मात्यापित्यांचे आपण नेहमीच ऋणी असतो.
माझ्या बाबांबद्द्ल काय सांगू मी??
आई सांगते की, माझा जन्म झाला त्याचदिवशी माझ्या काकाच्या पॉवर लूम्सच्या कारखान्याचं उद्घाटन झालं. सगळे जण कार्यक्रम आटोपून बसले होते आणि बाबा सांगत आले की, "मुलगी झाली, मुलगी झाली". त्या काळाला शोभेल अशीच असलेली माझी आजी थोडी नाराज झाली.. .. आणि आई का नाराज झाली या विचाराने माझे बाबा ही नाराज झाले. पण गोखले घराण्यातलं पहिलं मूल आणि त्यातूनही मी खूप म्हणजे खूपच लवकर बोलायला लागलेली.. त्यामुळे आजीची ही नाराजी पुढे आजीबात टिकली नाही. आणि बाबा मात्र माझ्यामध्ये पूर्ण गुंतून गेले. मी नेहमी बाबांकडेच असायचे. काही लागलं, खुपलं तर सगळी मुलं "आई......." म्हणून रडतात पण मी "बाबा...." म्हणून रडायचे. आजही बाबा मला यावरून चिडवतात. माझी नक्कल करतात.
माझे बाबा शांत, संयमी आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. खरं सांगायचं तर, आजही ते तसे नाहीत. वयाच्या ५५व्या वर्षीही माझे बाबा बर्‍याच वेळेला लहान मुलासारखे वागतात आणि ते त्यांना शोभतंही.
आई अंघोळीला गेली होती आणि बाबांना कपाटातल्या लॉकर मधून काहीतरी काढायचे होते. आईने लॉकरची चावी तिथेच कपाटातल्या एका खणात ठेवली होती. पण बाबांकडे असणार्‍या जुडग्यामधल्या चाव्यातून लॉकरला चावी लागेल. तेव्हा ती चावी हरवली असं समजून त्यांनी स्क्रू ड्रायव्हरने ते लॉकरचं लॉक तोडून काढलं. आई बाहेर आल्यावर तिला विचारावं आणि मग पुढे काय करायचं ते ठरवावं हे त्याना सुचलंच नाही. पण आईनं मात्र नंतर त्यांना फैलावर घेतलं. मला आणि माझ्या भावाला एक विषय मिळाला बाबांना चिडवण्यासाठी.
एक प्रसंग मला आठवतो, मी ५ वीत होते तेव्हा आमची शाळेची ट्रीप जाणार होती. बाबा ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेले होते. जाण्याआधी मला म्हणाले होते," मी तुझ्यासाठी येताना ड्रेसेस घेऊन येतो मस्त.. तेच घेऊन जा तू ट्रिपला" मलाही आनंद झाला. पण मुंबईला गेल्यानंतर बाबांचं काम वेळेत नाही उरकलं आणि त्यांना ऐनवेळी रेल्वेचं टिकीट नाही मिळालं. त्यांच्यापुढे प्रश्न होता घरी वेळेत पोहोचण्याचा. मी आणि आई, ट्रीपच्या आदलेदिवशी रात्री पर्यंत बाबांची वाट पाहात होतो. शेवटी आईने माझी बॅग भरली. म्हणाली,"आता बाबा तू जाईपर्यंत येतील की नाही माहिती नाही. तू हे कपडे घेऊन जा." मी ही निराश झाले होते. पण नाईलाज होता. पहाटे ६.०० ला शाळेत पोहोचायचं होतं. बॅग भरून आम्ही झोपलो. एकदम कधीतरी आईने हाक मारली.."तायड्या, उठ बघ, बाबा आलेत. बघ तुझ्यासाठी कित्तीतरी ड्रेसेस आणले आहेत..." मी पटकन उठले. आणि बाबांच्या गळ्यात पडले...पाहिलं तर पहाटेचे ४.३० झाले होते. माझे बाबा रिझर्वेशन न मिळाल्यामुळे मुंबईहून माझ्यासाठी गाड्या बदलत.. रात्रभर हेक्टीक प्रवास करत.. इचलकरंजीत पोचले होते. तेव्हा डोळे भरून यण्या इतकी मी मोठी नब्व्हते किंवा बाबांनी आपल्यासाठी वेगळं काहीतरी केलं याचीही जाण नव्हती. मला बाबा म्हणाले, "तू तुझं आवरून घे सगळं.. तोपर्यंत मी तुझी बॅग भरतो. हे आणलेले सगळे ड्रेस घालतो बॅगेत". इतके दमलेले माझे बाबा पण सगळा शीण विसरून माझी बॅग भरायला बसले आणि मला शाळेत सोडायलाही आले. आज या प्रसंगाची किंमत मला समजते आहे.
इतरांशी म्हणजे माझ्या भावाशी, ऑफिसमधल्या इतर लोकांशी अतिशय कडक असणारे माझे बाबा माझ्याबाबतीत अतिशय हळवे आहेत.
मी ११ वर्षाची असताना, एकदा आई तिच्या शाळेतल्या मुलांची ट्रिप घेऊन गेली होती. घरी मी, बाबा आणि माझा भाऊ. कामवल्या बाईंनी पोळ्या आणि भाजी केली होती. पण बाबांचं थोडं डोकं दुखत होतं त्यामुळे ते जेवणार नाही म्हणाले. मग मी विचारलं, "आमटी भात खाणार का?" त्यांना गंमत वाटली. पण त्यांनी मला "तुला जमणार नाही. तू नको करू" असं अजिबात म्हंटलं नाही. मला म्हणाले,"करशील?? येईल तुला?? कर मग." त्यांच्या या बोलण्यातूनच जे काही मी करेन ते खाण्याची मानसिक तयारी किती आधीपासून त्यांनी केली होती हे आता जाणवते. मी कुकरला भात केला अणि छान फोडणी करून आमटी केली. बाबा जेवायला बसले तर म्हणाले ," अगं.. आमटीत डाळ कुठे आहे?" मला माहितीच नव्हतं की, आमटित आई डाळ घालते ते. मी आपली मसालेदार पाणी केलं आणि वाटित घालून बाबांना दिलं भातासोबत खाण्यासाठी. पण माझ्या बाबांनी, जराही का कू न करता ते पाणी भातावर घेऊन खाल्लं. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती. त्यानंतर जसजशी मी मोठी होत गेले तसतशी गरज नसतानाही स्वयंपाकघरातली माझी लुडबूड वाढत गेली. सगळे प्रयोग बाबांवरच होत असत.
मला दिलेल्या रूपयांचा बाबांनी कधीही हिशोब मागितला नाही की, पैसे कशाला हवेत असं विचारलं नाही. कधी सांगायला गेलेच तर, ते रूपये तुला दिलेत... आणि दिलेत म्हंटल्यावर दिलेत. मला त्याबद्दल सांगू नको.. असंच उत्तर मिळालं. कदाचित, आपली मुलगी उधळपट्टी करणार नाही याची खात्री आणि त्यांनी केलेल्या संस्कारांवर ठाम विश्वास, हेच कारण असावं त्या मागचं. माझ्या अभ्यासातल्या यशावर, वक्तृत्व, कथाकथन, नाट़क नाट्यवाचन... गाण्याच्या परिक्षा या सगळ्याचा माझ्या बाबांना खूप अभिमान असायचा आणि आजही आहे. बाबांचं काम सगळं भव्यदिव्यचं असतं. अगदी भाजी घ्यायची झाली तरी. किलो दोन किलो चा भाव बाबा कधीच विचारत नाहीत. बुट्टी कशी देणार?? हाच प्रश्न त्या भाजीवाल्याला विचारणार... आणि मग आमच्या घरी आणि शेजारी पाजारी पुढचे २-३ दिवस बाबांनी आणलेलीच भाजी !! घर बांधलं ते ही इतकं मोठं.. राहणार माणसं ४. आणि घर झाडायला, पुसायला कामवाल्या ४ .. असा प्रकार.
मी प्रेमाने बाबांना "बाबड्या " म्हणते आणि बर्‍याचद 'डॅड ' असंही म्हणते. अशा नावानी त्यांना बोलवण्यावर आईने बर्‍याचदा आक्षेप घेतला पण बाबांनी कधीच नाही. आपल्या मुलीची क्षमता ते पूर्णपणे जाणून आहेत. आजपर्यंत कोणत्याही बाबतीत त्यांनी मला अडवलं नाही. सतत प्रोत्साहन देत राहिले. किंबहुना मी तर असं म्हणेन की, माझ्या भावापेक्षा जास्ती त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. पहिल्यांदा अमेरिकेला एकटी माझ्या २ वर्षांच्या मुलाला घेऊन निघाले ... खूप भिती होती मनांत... आय मस्ट से इट वॉज माय डॅड हू एन्करेज्ड मी टू ट्रॅवल अलोन.
पिता होणं फारसं कठीण नसतं पण "बाबा" होणं खूप कठीण असतं. आणि एखाद्या मुलीचा बापच "बाबा" होणं म्हणजे काय ते सांगू शकेल.

मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं. जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.

माझ्या बाबांसाठी..

बोट तुझे धरूनी पाऊल माझे स्थिरावले..
मायेच्या वर्षावात माझे बालपण विसावले..

छोटी पोळी , छोटा भात... वरण इवलसं
बाहुलीचं घर आपण बांधलं.. ते ही इवलसं..

क्षितिजाच्या पारचे विश्व मला तू दाखवले
पंखामध्ये बळ घेऊनी.. मी आभाळाकडे झेपावले

सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी
आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..

- प्राजु

धोरणमांडणीसाहित्यिकविचारसद्भावनाशुभेच्छालेख

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 4:31 pm | विसोबा खेचर

पण माझ्या बाबांनी, जराही का कू न करता ते पाणी भातावर घेऊन खाल्लं. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती.

क्या बात है! जियो...!

प्राजू, छोटेखानी परंतु सुंदर लेख. अगदी मनापासनं लिहिलेला वाटतो आहे!

कविताही छान आणि बोलकी आहे...!

आपला,
(मातृभक्त) तात्या.

ऋचा's picture

5 Jun 2008 - 4:44 pm | ऋचा

मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं. जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.

आमच्या घरात मी आणि माझी बहीण आहोत माझे बाबा दुप्पट सुखी आहेत .
;;)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jun 2008 - 11:14 pm | बिपिन कार्यकर्ते

ऋचाताई, मी पण दुप्पट सुखी आहे... मला २ मुलीच आहेत. तुम्ही लिहिले ते अगदी खरं आहे.

(दुप्पट सुखी) बिपिन.

वेदश्री's picture

5 Jun 2008 - 4:49 pm | वेदश्री

प्राजु, मस्तच लेख लिहिला आहेस. आता लवकरच माझ्या बाबांबद्दलचे लेखन माझ्या ब्लॉगवर आले तर नवल राहणार नाही.. :)

>मला दिलेल्या रूपयांचा बाबांनी कधीही हिशोब मागितला नाही की, पैसे कशाला हवेत असं विचारलं नाही

माझ्याहीबद्दल असेच झाले.बाबांनी कधी हिशेब विचारायचीच वेळ आली नाही कारण तो त्यांनी विचारण्यागोदरच त्यांच्याकडे पोहोचलेला असायचा आणि आजही पोहोचतो. मी त्यांच्यापेक्षा हिशेबात पक्की निघाल्याने उलट हिशेबतपासणी मात्र नेहमी झाली...आजही होते .. म्हणजे मी बाबांना हिशेब विचारण्याची आणि ती त्यांनी राजरोसपणे देण्याची ! अर्थव्यवहारातले कळायला लागल्यापासून तो सगळा प्रकारच मला संभाळायला घेतला शेवटी मी बाबांकडून... त्यांना समजवण्यापेक्षा ते तरी सोपे ! त्यांच्याकडून मार्गदर्शन होत असतेच म्हणा वेळोवेळी... :)

स्वाती राजेश's picture

5 Jun 2008 - 4:55 pm | स्वाती राजेश

सुंदर लिहिले आहेस...
एक एक प्रसंग कसे डोळ्यासमोरून जातात.
बाबा रिझर्वेशन न मिळाल्यामुळे मुंबईहून माझ्यासाठी गाड्या बदलत.. रात्रभर हेक्टीक प्रवास करत.. इचलकरंजीत पोचले होते. तेव्हा डोळे भरून यण्या इतकी मी मोठी नब्व्हते किंवा बाबांनी आपल्यासाठी वेगळं काहीतरी केलं याचीही जाण नव्हती.
खरे आहे त्यावेळी आपल्याला जाणीव नसते, पण त्याची खरी किंमत आता जाणवते... आपण मोठे झाल्यानंतर...
कविता छान आहे..
सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी
आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..

फक्त संदीप's picture

5 Jun 2008 - 4:57 pm | फक्त संदीप

सर्वाच्या नशिबात असे भाग्य नसते

प्रत्येक मुलीला असेच वडिलांचे प्रेम लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

मी संदीप..................(विचारात गुंतलेला)

राजे's picture

5 Jun 2008 - 5:09 pm | राजे (not verified)

ख-या अर्थाने आज तुम्ही आपल्या वडिलांचे आभार व्यक्त केले आहेत...
प्राजु... खरोखर मनापासून आवडले लेखन !
तु खुप भाग्यवान आहेस...

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

डोमकावळा's picture

5 Jun 2008 - 5:10 pm | डोमकावळा

जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं

उत्कृष्ट.....
मलाही आवडेल जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळवायला... :)

जयवी's picture

5 Jun 2008 - 5:22 pm | जयवी

प्राजु...... तू तर अगदी डोळ्यात पाणी आणलंस गं.....!! खूप छान चितारले आहेस तुझे बाबा :)
बहुतेक सगळ्याच मुलींचा बाबा काहीसा असाच असतो ना गं...!!

प्राजु's picture

5 Jun 2008 - 5:50 pm | प्राजु

मुलीला बाबा इतका जवळचा मित्र नसतोच. पिता आणि बाबा या दोन शब्दांमध्ये हाच तर फरक आहे.. पितृत्व हे नाकारता येतं पण "बाबापण" हे मायेनं वेढलेलं असतं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सखी's picture

5 Jun 2008 - 5:59 pm | सखी

प्राजु छानच लिहला आहेस लेख. कविताही छान आहे, आणि शेवटचे वाक्य खूपच समर्पक आहे.

छान लिहिले आहेस प्राजू! आमटीचा किस्सा तू आधी सांगितला होता. तुझे बाबांचे प्रेम छान दिसून येते. :)

मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं.

मी पाहिली आहेत, जवळच्या नात्यात वितुष्ट आले की खूप कडवटपणा येतो...आरुषी आणि रमेश तलवार हयांचे पण नाते फार चांगले होते असे वाटत नाही....खूप उदाहरणे आहेत अशी. तू भाग्यवान आहेस खरच!

जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.

तुझ्या भावनांचा आदर राखूनही मला वाटते की हे नेहमीच खरे नसते, थोडे ओव्हर-जनरलायझेशन होते आहे. तसे असते तर एवढ्या स्त्री भ्रुण हत्या का झाल्या असत्या? प्रत्येक पुरुषासाठी हे वेग-वेगळे असावे असे वाटते. शिवाय - हे (एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख...) पुरुषानेच सांगितले तर बरे नाही का? :)

शितल's picture

5 Jun 2008 - 6:09 pm | शितल

प्राजु मस्त लिहिले आहेस तुझ्या बा॑बा बद्दल.
माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात आणि ते आठवुन आज ही माझे डोळे पाणवतात.

आनंदयात्री's picture

5 Jun 2008 - 6:29 pm | आनंदयात्री

सुंदर लेख. आवडला.

इनोबा म्हणे's picture

5 Jun 2008 - 8:49 pm | इनोबा म्हणे

खूप सुंदर लेख लिहीला आहेस.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा's picture

5 Jun 2008 - 6:26 pm | वरदा

अगदी सुरेख..
अस्सेच आहेत माझेही बाबा...खूप आठवण करुन दिलीस गं....
बाबांचं काम सगळं भव्यदिव्यचं असतं.

अगदी अगदी ११ खोल्यांच घर होतं माझं......

सगळे प्रयोग बाबांवरच होत असत.

हेही १००% खरं बिचार्‍यांना काय काय पदार्थ खावे लागलेत...पिझ्झा केला होता मी पहिल्यांदा इतका जळला होता..पण चांगला लागतोय म्हणून खाल्ला बिचार्‍यांनी.....आई म्हणाली माझी पोळी थोडी जळली की म्हणता आज पोळी बनवताना पोटातले गॅस निघून जावे ह्या उद्देशाने बनली वाट्टं आणि पोरीने कसंही बनवलं तरी चालतं... तर म्हणाले, लाडकी लेक काय असते ते फक्त मलाच माहीत तिने काहीही वाढलं तरी ते किती चविष्ट लागतं हे समजायला मी होऊन पहा......

खूप खूप आठवणी आल्या...इतक्या सुंदर लेखासाठी तुझं अभिनंदन! कविताही खूपच छान!

चतुरंग's picture

5 Jun 2008 - 8:06 pm | चतुरंग

तुझ्या आणि बाबांमधल्या नातेसंबंधाचा एक हळवा पट अवचित उलगडला आहेस.
तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती

क्या बात है! खरं आहे. हे फक्त बाबाच करु शकतात.

तुझी कविताही उत्स्फूर्त आहे, सुंदर आहे!

वडील-मुलगी हे नातंच फार वेगळं आहे, खूप गुंतागुंतीचं आणि त्याच वेळी साधं, सोपं आणि सरळ असं मला वाटतं! माझे बाबा मला जे निकष लावत त्यातून माझ्या बहिणीला त्यांनी कित्येकवेळा सूट दिलेली दिसली की मी त्यांच्याशी भांडे पण मोठा झाल्यावर हळूहळू समजू लागले की बाप-लेक नात्यात तर्काचे नियम नव्हे तर भावनांचे गोफ असतात.
एकाचवेळी आपल्या मुलीबद्दल, तिच्या कर्तृत्त्वाबद्दल गाढ विश्वास असणारे बाबा मनात कुठेतरी तिच्याबद्दल काळजीने धास्तावलेले असतात. तसं दाखवणं हे त्यांना मनानं मान्य नसतं पण ते न दाखवण्याइतकं राजकारणीही त्यांना होता येत नाही!

चतुरंग

वरदा's picture

5 Jun 2008 - 8:32 pm | वरदा

मी कुठुनही यायला उशीर झाला तर गॅलरीत तासनतास उभं राहून वाट बघणार्‍या बाबांच्या डोळ्यातली काळजी मला अजूनही आठवते. ..

विदेश's picture

5 Jun 2008 - 8:49 pm | विदेश

छान उभं केलं तुम्ही आमच्या नजरेसमोर!

स्वाती दिनेश's picture

5 Jun 2008 - 9:02 pm | स्वाती दिनेश

छान लिहिलं आहेस,वाचता वाचता मी पोहोचलेच की ग आईबाबांकडे,
स्वाती

धनंजय's picture

5 Jun 2008 - 9:31 pm | धनंजय

लिहिलेला लेख. फार आवडला.

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 10:01 pm | भाग्यश्री

ए प्राजु मस्तच लेख लिहीलास बघ! ... माझे बाबा पण अस्सेच आहेत!! कधीही हिशोब मागितला नाही, कायम विश्वास दाखव्ला माझ्यावर, अपयशाच्यावेळेला एक मस्त पत्र लिहून एन्करेज केले होते त्यांनी मला.. बाबांचा कायमच आधार वाटतो मला...
शितलशी पण सहमत.. कधीही डोळ्यातून पाणी न काढणारे बाबा , त्या दिवशी इतके रडले.. मी बघायचच टाळत होते..
आईची बँगलोर ला बदली झाली होती मी १ वर्षची पण नसेन तेव्हा.. ते १-१.५ वर्ष बाबांनीच सांभाळल मला न दादा ला.. मी म्हणे तेव्हा बाबांनाच आई म्हणायचे ! :)

एक's picture

5 Jun 2008 - 10:17 pm | एक

तुमच्या वडिलांवरून "फादर ऑफ द ब्राईड" सिनेमामधल्या वडिलांची आठवण झाली..

तो सुद्धा अतिशय सुंदर सिनेमा. वडिलांच्या मनाची मुलीच्या लग्नामुळे झालेली अवस्था अतिशय तरल पणे दाखवली आहे. अर्थात एका हिंदी सिनेमाने त्याची कॉपी करून करायच ते कडबोळ केलच.

बेसनलाडू's picture

5 Jun 2008 - 10:26 pm | बेसनलाडू

हृद्य आठवणी जाग्या करणारा लेख आवडला.
(वाचक)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

5 Jun 2008 - 10:32 pm | मुक्तसुनीत

आवडला. प्रामाणिकपणामुळे , साधेपणामुळे सुंदर झाला आहे.

या विषयावरून आठवले. "बापलेकी" या नावाचा लेखसंग्रह अलिकडे प्रकाशित झाला आहे. बाप-मुलीचे नाते हा या सर्व लेखांमधला धागा. अनेक चांगल्या लेखिका, अभिनेत्री आणि इतर क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांनी आपल्या वडीलांबद्दल लिहीलेले आहे. सर्वच लेख "काँग्रॅचुलेटरी" नाहीत. उदा. ना सी फडक्यांच्या मुलीने लिहिलेला लेख एक बाप आणि पती - आणि पर्यायाने एक व्यक्ती म्हणून फडक्यांची काळीकभिन्न बाजू दाखविणारा आहे. (असे लेख लिहायला प्रचंड धैर्य एकवटावे लागले असणार !) काही लेख वडीलांनीही मुलींबद्दल लिहीलेले आहेत. विजय आणि प्रिया तेंडुलकर या दोघांचेही लेख अत्यंत सुंदर झालेले आहेत ! पद्मजा फाटक, जाई निम्बकर, सई परांजपे सारख्या लोकांनी हजेरी लावलेली आहे. साडेचारशे पानांचा एक उत्तम दस्तावेज.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2008 - 10:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लाडक्या लेकीने तिच्या बाबांना मस्त रेखाटलंय !!!
कविताही मस्तच !!!

ईश्वरी's picture

6 Jun 2008 - 11:56 am | ईश्वरी

सुंदर लेख लिहीला आहेस. कविता पण छान. आमटीचा प्रसंग तर खासच.

>>माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात - शितल
माझे ही बाबा पाठवणीच्या वेळी असेच रडले होते. आईपेक्षा ही तेच जास्त रडले. आणि अजूनही जेव्हा केव्हा दिड दोन वर्षानी भारतात जाणं होतं त्या वेळी मी परत निघताना त्यांना रडू आवरत नाही. तिच स्थिती नवर्‍याची. एरवी कधीही डोळ्यात पाणी येणार नाही . पण गमतीत ७ वर्षाच्या मुलीचा लग्नाचा विषय काढला की लगेच त्याचे डोळे पाणावतात.

>> १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती.
अमेरिका मध्ये पहिला फादर्स डे १९ जून १९१० ला साजरा केला...स्पोकेन, वॉश्गिंटन येथे.
अमेरिकेत आणि बर्‍याच इतर देशात दरवर्षी जून च्या ३ र्‍या रविवारी फादर्स डे असतो. या वर्षी ३ रा रविवार १५ जून ला आला आहे. काही देशात जून च्या २ र्‍या रविवारी असतो.

ईश्वरी

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2008 - 11:20 pm | प्रभाकर पेठकर

'माता देवो भवो' वर अनेकदा भरभरून लिहीले जाते. आणि वडील मात्र बहुतेकवेळा 'अन् संग हिरो'च राहतात. आईचे महत्व असतेच आभाळाएवढे पण त्याच बरोबर वडीलही संपूर्ण संसारावर 'निळी छत्रीवाले' बनून राहतात.

डॉक्टरांचे बील नको म्हणून अंगावर आजारपण काढणारे, शर्ट शिवला की एक एक्स्ट्रा कॉलर शिवून घेणारे (कॉलर जूनी झाली, फाटली तर ही जास्तीची कॉलर शर्टाला शीवून तोच शर्ट वापरता येतो. तेवढ्यासाठी नवीन शर्टाचा खर्च नको, हा विचार), कर्तव्यकठोर आणि तरीही मुलांच्या बाबतीत हळवे वडील मलाही लाभले होते.

सगळ्याच वडीलांना मुलांपेक्षा मुली जास्त जवळच्या असतात. ह्याला कारण त्या आई-वडीलांना सोडून सासरी जाणार असतात. मुली बर्‍यापैकी संवेदनशील असतात. वडीलांच्या भावना, त्यांच्या मनातील विचार शब्दाविना ओळखतात. मुलांचे तसे नसते, लहानपणी ती हूड असतात, भावना ओळखण्याच्या कोमल संवेदनेपेक्षा व्यवहारातला रोखठोकपणा त्यांना जास्त भावतो. रफ अँड टफपणा त्यांच्या ठायी नैसर्गिकपणे असतो. आणि त्याहूनही भावना ओळखल्या तरी त्या नजरेतून दाखविण्याची, शब्दांतून मांडण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही/जमत नाही. मुलांकडे बघण्याचा आई-वडीलांचा दृष्टीकोन लहानपणा पासूनच वेगळा असतो. त्याला वेगळ्या पद्धतीने वाढविले जाते. त्यालाही संवेदना असतात. वडीलांची शिस्त आणि आईचे प्रेम त्यालाही दिसते. त्याला वडीलांबद्दल आदर वाटला तरी वडीलांची सक्षमता त्याला जाणवते आणि त्यातल्या त्यात दुर्बल आईकडे तो प्रेमाने आकर्षित होतो. तिचा संरक्षक बनतो. असो.

ह्या विपरीतही अनुभव येऊ शकतात ह्याची जाणीव आहे. पण जनरली मुली वडीलांकडे आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात.

प्राजू, लेख मनाला भिडणारा आहे. अभिनंदन.

अवांतरः सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला मुलगी नाही. ह्याची खंत अनेकदा वाटते पण मुलगी नाही ह्याचा आनंदही होतो कारण तिचे 'सासरी' जाणे मला झेपले नसते.

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 6:33 am | विसोबा खेचर

आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात.

सहमत आहे...!

बाप आता वारला बिचारा! त्याचा खूप जीव होता माझ्यावर. मलाही त्याच्याबद्दल खूप आदर अन् प्रेम वाटे. परंतु कधी त्याची भक्ति नाही केली! भक्ति हा प्रकार काही निराळाच असतो! ती फक्त आईचीच केली आजतागायत! :)

बाप कितीही चांगला अन् प्रेमळ असला तरी मांडीवर डोकं ठेवायला आईच पाहिजे, डोक्यावर तेल थापायला आईच पाहिजे! :)

आपला,
(कट्टर मातृभक्त!) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jun 2008 - 11:34 pm | बिपिन कार्यकर्ते

प्राजु, मस्तच लिहिले आहे तुम्ही. माझ्या बाबांनीही आमच्यासाठी खूप काही केले.

मी १०वीत असताना माझे बाबा ज्या कंपनीत होते ती बंद पडली. त्या नंतर ते काही दिवस घरी होते. आणि रोज दुपारी घराच्या बाल्कनीत बसून दूरवर काही तरी बघत आपल्याच विचारात असायचे. तेव्हा काय कळणार, आज माझा स्वतःचा संसार उभा राहिल्यावर मला थोडी थोडी कल्पना येत आहे त्यांच्या मनात काय विचार येत असतील तेव्हा, अर्ध्या संसारात असा आघात झाल्यावर.

बोट तुझे धरूनी पाऊल माझे स्थिरावले..
मायेच्या वर्षावात माझे बालपण विसावले..

छोटी पोळी , छोटा भात... वरण इवलसं
बाहुलीचं घर आपण बांधलं.. ते ही इवलसं..

क्षितिजाच्या पारचे विश्व मला तू दाखवले
पंखामध्ये बळ घेऊनी.. मी आभाळाकडे झेपावले

सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी
आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..

प्राजुताई, मला कविता वगैरे करता येत नाहित, तेव्हा तुमच्या परवानगीशिवाय, ह्या ओळी माझ्याही बाबांसाठी, माफ कराल अशी आशा आहे कारण मला वाटते की ह्या ओळी केवळ तुमचेच बाबा नाही तर 'बाबा' ह्या नात्याबद्दल आहेत.

बिपिन.

फटू's picture

6 Jun 2008 - 8:22 am | फटू

खुप छान लिहिलं आहेस गं... वाचता वाचता भारतात असलेल्या बाबांच्या आठवणीने डोळे भरून आले...

आईच्या ममतेबद्दल खुप लिहिलं जातं पण बाबांबद्दल सहसा नाही...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु's picture

6 Jun 2008 - 2:48 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा लेख मी खरंच मनापासून लिहिला आहे.
माझ्या सगळ्या मिपा परिवाराला फादर्स डे च्या आतापासूनच शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

6 Jun 2008 - 3:55 pm | चित्रा

बाबांवरचा उत्कटतेने लिहीलेला लेख आवडला. ड्रेसची आठवण आवडली.

असे कुठेतरी वाचले आहे की वडिलांनी मुलींना प्रेमाने प्रोत्साहन दिले, त्यांच्या वाढीत सक्रिय सहभाग घेतला, सांभाळून घेतले तर मुलींचा जगात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आईने ते करायची गरज नाही असा नव्हे!

मदनबाण's picture

6 Jun 2008 - 9:00 pm | मदनबाण

प्राजुताई खरच सुंदर आहे हा लेख.....

माझ्या बाबांबद्दलच्या माझ्या भावना:--

माझ्या वडीलांमुळेच मी आज इथ पर्यन्त पोहचु शकलो आहे...आईच प्रेम असतच पण वडीलांच हे प्रेम मात्र मुलासाठी न बोलताही सबकुछ अस असत.....
लहानपणी मी व माझे बाबा बर्‍याच वेळी बुद्धीबळ खेळायचो ..मला हा खेळ काही आवडायचा नाही कारण,,, १ नाही तर सलग अनेक खेळ मी हारायचो..सगळी कडुन कोंडी करुन माझे वडील काही चालीतच मला गारद करुन टाकत्...मी मग भरपुर चिडायचो...त्यांना सांगायचो..एकदा तरी तुम्हाला मी हरवणारच !!!!!.....आणि मला जिंकण्याचा आनंद देण्यासाठी ते मग एखादा डाव अगदी सहजपणे हारत.
लहानपणी मला सायकल शिकवताना त्या मागे धावणार्‍या माझ्या बाबांनी मला अता पर्यन्त बरच काही शिकवल आहे आणि अजुनही मी त्यांच्या कडुन शिकतच आहे...
कधी प्रेमळ तर कधी कठोर होऊन त्यांनी मला नेहमी योग्य तेच कसं कराव आणि वागाव ते समजवल...
माझ्या बाबांबद्दल लिहाव तेवढ कमीच आहे...
फक्त एवढच म्हणतो... की गेले कित्येक जन्म मी भरपुर पुण्य कमवल असणार म्हणुनच या जन्मी मला असे बाबा आणि आई मिळाले.

(पितृछाया प्रेमी)
मदनबाण.....

ऋषिकेश's picture

7 Jun 2008 - 12:57 am | ऋषिकेश

अतिशय हृद्य लेख! फार फार आवडला!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सहज's picture

7 Jun 2008 - 7:03 am | सहज

हेच म्हणतो.

सुरज बडजात्याच्या सिनेमातील गाणे, भारतात असताना तो सिनेमा, गाणे मी बघीतले किंवा ऐकले ही नसते. एनी हाउ.. हे गाणे "ते शब्द ऐकल्यावर" डोळे जरा पाणावले होते.

पिवळा डांबिस's picture

8 Jun 2008 - 7:30 am | पिवळा डांबिस

म्हणुन तर इथे असं म्हणतात,
"माय सन इज माय सन, टिल ही गेटस् हिज वाईफ
बट माय डॉटर इज माय डॉटर, फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ"

हॅपी मदर आणि फादर्स डे!!!

विसोबा खेचर's picture

8 Jun 2008 - 9:27 am | विसोबा खेचर

डांबिसा,

'वाईफ' आणि 'लाईफ' हे यमक आवडले रे! :)

आपला,
(विदाऊट वाईफ) तात्या.