एक जत्रा..... हरवलेली

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
6 Sep 2011 - 8:52 pm

बरेच दिवसांनी पावसाळ्यात घरी असल्याने भारी वाटत होतं. त्यातच श्रावणाची चाहूल लागलेली. अशी संधी असताना फक्त घरी बसणे शिक्षेसारखे वाटायला लागले होते. यंदाचा श्रावण कुठेतरी जाऊन कामी आणायचा असं मनोमन ठरवलं होतं. :) श्रावणाच्या दुसऱ्याच सोमवारी सांगली जवळ हरिपूर येथील जत्रेला जाण्याचे निश्चित केले. सकाळी लवकरच घराबाहेर पडलो, जेणेकरून जत्रेची पूर्वतयारी वगैरे बघता येईल.
जातना वाटेत इतका जोरदार पाऊस लागला की बीच रास्ते से ही परत फिरावे का असा प्रश्न पडला. पण उम्मीद ठेवून मी पुढेच निघालो. तासाभराच्या रस्त्याला दीड तास लागला, पण पोचलो एकदाचा सांगलीत. सकाळपासून पाठी लागलेला पाऊस इथे मात्र कुठे गायब झाला तेच कळेना.
सांगलीत आत आल्याबरोबर एसटी स्टँडकडे न वळता डावीकडे वळून पुढे जात राहिल्यास साधारण ३.५ किमी अंतरावर हरिपूर नावाचे गाव लागते.
जसजसं मी हरिपुराच्या दिशेने जायला लागलो, माझे मन भूतकाळच्या आठवणीत जायला लागले. आठवू लागले ते दिवस, जेंव्हा मी आजोबांबरोबर (ज्यांना मी आप्पा म्हणतो) रात्रीच हरिपुराला जायचो.रात्रीच्या वेळेस सांगली ते हरिपूर रस्ता इतका भयाण वाटायचा की कधी एकदा हरिपूर येते असं व्हायचं. १५ मिनिटांचा रस्ताही तासाभराचा असल्याप्रमाणे वाटायचा. जाताना काही लँडमार्क्स बघून किती वेळ राहिला याचा अंदाज यायचा. वास्तविक संगलीतले घर भाड्याचे होते अन हरिपुरचे घर स्वतःचे होते, पण का कुणास ठावूक आईच्या मायेसारखी ऊब वाटायची ती सांगलीतल्या घरात आणि हरिपूरचे घर हा वडिलांसारखा आधारागत वाटायचा. सकाळी पहाटे लगबगीने उठून स्वच्छ केलेला घराचा आवार, देवपूजेसाठी तोडलेली फुले, वेचलेली कवठे, सकाळी सकाळी ऐकलेल्या ऑल इंडिया रेडियोच्या इंग्रजी आणि हिंदी बातम्या. खरंच काय दिवस होते ते! आधी घरच्या देवांची पूजा, नंतर संगमेश्वराची पूजा असा दिनक्रम अप्पांनी कितीतरी वर्ष सांभाळला.
श्रावणात तर हरिपूरला वेगळीच धुंदी असायची. (तेंव्हाच्या)लोकल ट्रेनपेक्षाही जास्त गर्दी व्हायची जत्रेसाठी. सगळा सांगली जिल्हाच जणू लोटायचा इथे! सांगली एसटी स्टँड पासून हरीपूरला येण्याचे एकमेव साधन म्हणजे टांगे. श्रावणी सोमवारी या टांगेवाल्याना पण जबरा भाव यायचा. लहान मुलांना आवडणारे विविध प्रकार विक्रीला यायचे. धनुष्यबाण, काठीच्या तलवारी, पत्र्याच्या शिट्ट्या, प्लास्टीकचे गॉगल्स, पुढे-मागे करता येणारे वेताचे साप असल्या खेळण्यांच्या टोपल्या जागोजागी दिसायच्या. त्याच्या भोवतीनं गराडा घालून कुतूहलाने बघणारी मुलं, मला अमुक एक खेळणे पाहिजेच म्हणून हट्टाला पेटणारी मुलं आणि त्यांचे वैतागलेले आई-बाप हा झाला एक सेक्शन.
दुसरा सेक्शन असायचा फुल विक्रेत्यांचा. गलाट्याचे ढीग, गुलाब आणि काही पांढरी फुले यापासून बनवलेले हार, त्या सगळ्याचा एकत्रित असा वेगळाच गंध. आपल्याकडून भाविकांनी हार-फुले घ्यावीत यासाठी चाललेला विक्रेत्यांचा आटापिटा तेंव्हा गंमतशीर वाटायचा. लोक आपापल्या घरात फुलझाडे का लावत नाहीत असं राहून राहून वाटायचे. घरीसुद्धा अनेक लोक फुलं मागायला यायचे पण अनेकांना मी ओळखत नसल्याने जाम पंगा घ्यायचो. “मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला घरात येऊ देणार नाही” असं मी टिळकांच्या आवेशात ओरडायचो असं गप्पातून कळलं की आता हसू येते.
या जत्रेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे मिळणाऱ्या साखरेच्या मूर्ती. हत्ती,घोडे, उंट, गणपती यांच्या मूर्ती त्याही मातीच्या नव्हेत, तर चक्क साखरेच्या. सुबकता बघितली तर एखादी गणेशमूर्ती घरात ठेवावी असे वाटेल. एरवी आपल्याला साखरेची माळ गुढीपाडव्यालाच बघून माहिती असते. इथे मात्र निराळाच प्रकार. साखरेपासून असे काही करता येते हे हरीपुराच्या जत्रेतच कळले. बाकी चिंचा-कवठे विकायला बसलेल्या बायका आणि त्यांचे एकमेकींशी चाललेले बोलणे हा एक रिसर्चचा विषय होईल. (लहान असल्याने तेंव्हा याची काही कल्पना नव्हती हो! ;) )
आप्पा देवळात पुजारी असल्या कारणाने सगळे देऊळ हे आपल्याला आंदण दिलेले असे वाटून मला कितीही दंगा घालता यायचा. अनेकदा संगमेश्वराचे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलेले आठवतेय. देवळातच एका पारावर ठेवलेली भली मोठी सहाण हा माझ्या तसेच इतर लहान मुलांच्या औत्सुक्याची गोष्ट असे.
इतक्या सगळ्या आठवणी उराशी बाळगून मोठ्या अपेक्षेने मी निघालो होतो. वाटले, या सगळ्या आठवणींना एक तजेला मिळेल; तो माहौल पुन्हा एकदा अनुभवू.
एव्हाना हरिपूर रोडला लागलो होतो. काही खुणा अजूनही तश्याच होत्या. पण नंतर नंतर सगळेच बदललेले दिसू लागले. टांग्याची वर्दळ कमी झाली होती. तेंव्हा अगदी सामसूम दिसणारा हरिपूर रस्ता आता वाहनांनी बऱ्यापैकी गजबजला होता. पण श्रावणी सोमवार म्हणून जितकी गर्दी असायला हवी होती तितकी दिसली नाही. बॅनर्स आणि फ्लेक्स ची दाटी झाली होती. जाताना लागणाऱ्या ओढ्याचा आवाज आता ऐकू येत नाही. जाणवते फक्त पाण्याची दुर्गंधी. कुठल्या कुठल्या नगर्‍या आजूबाजूला दिसू लागल्या होत्या. इतर महानगरांप्रमाणेच सांगलीचा विस्तार दूरदूरवर होतोय हे दिसत होतं. मनात एक आशा पल्लवीत झाली होती की ज्या तऱ्हेने लोकसंख्या वाढली, त्यामुळे जत्रेनेसुद्धा आता एकदम ग्रँड रूप घेतले असेल.
लगेचच हरीपुरात पोचता झालो. वेशीजवळ गाडी पार्क केली आणि मंदिर आवारात गेलो. डोळ्यासमोर अपघात व्हावा तसा मला धक्का बसला. जी जत्रेत १०% सुद्धा लोक नव्हते. कवठ-चिंचा विकणाऱ्या बायका दुर्मिळ झाल्यात आता. साखरेचे हत्ती-घोडे, गणपती गायब झालेत. तलवारी, धनुष्यबाण याच्यासाठी हट्ट करणारी मुळे आता इतिहासजमा झालीत. वेताचा साप सुद्धा कुठे दिसत नाही. रंगीबेरंगी गॉगल्सच्या अवतीभवती कुणी लहानगा घुटमळताना दिसत नाही.
काय अपेक्षा घेऊन आलो होतो आणि काय बघतोय मी हे? आजूबाजूच्या परिसरात राहायला असणाऱ्या लोकांना माहितीच नाहीये का इथे जत्रा भरते ते? कुठे गेले ते लोक जे पूर्वी कित्येक किलोमीटर वरून टांगा करून यायचे? कुठे गेली त्यांची श्रद्धा? कुणालाच काही आठवत नाहीये का? नक्की काय हरवलंय? बालपण? माणसे? की जत्रा?
खरंच गदिमांनी अगदी बरोबर लिहून ठेवले आहे

संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही

कारण इतक्या सगळ्या गदारोळात एकटी कृष्णामाईच स्थितप्रज्ञासारखी वाहत होती. माझ्या डोळ्यात तारालालेल्या अश्रूंशी तिला काहीच देणे घेणे नव्हते.

संस्कृतीधर्ममुक्तकसमाजजीवनमानरेखाटनप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

6 Sep 2011 - 8:57 pm | आत्मशून्य

माझ्या डोळ्यात तारालालेल्या अश्रूंशी तिला काहीच देणे घेणे नव्हते.

नेमके चित्रण केलं आहेस, आपल्या हातात गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी म्हणन्यापलीकडे काही नाही :(

प्रचेतस's picture

6 Sep 2011 - 9:11 pm | प्रचेतस

अगदी सुरेख लिहिले आहेस रे.
आम्हास पण आमची पुण्याची नवरात्रातील चतुश्रुंगीची यात्रा आठवते. तीही आता अशीच हरवलेली.

रेवती's picture

6 Sep 2011 - 9:15 pm | रेवती

लेखन आवडले.

जाई.'s picture

6 Sep 2011 - 9:54 pm | जाई.

छान लेख

अन्या दातार's picture

6 Sep 2011 - 10:07 pm | अन्या दातार

माझा हुरुप वाढवल्याबद्दल आत्मशून्य, वल्ली, रेवतीतै, जाई यांचे आभार. :)

किसन शिंदे's picture

9 Sep 2011 - 9:52 pm | किसन शिंदे

अजुन काय बोलावे...

३ संपुर्ण दिवस चालणारी आमच्या गावची यात्रा आता ५ ते ६ तासात संपते सुध्दा.. :(
काय करणार, बदलत्या काळाची नांदी....

योगी९००'s picture

9 Sep 2011 - 9:52 pm | योगी९००

लेखन आवडले..

कारण इतक्या सगळ्या गदारोळात एकटी कृष्णामाईच स्थितप्रज्ञासारखी वाहत होती. माझ्या डोळ्यात तारालालेल्या अश्रूंशी तिला काहीच देणे घेणे नव्हते.
माझ्यामते कृष्णामाई तुम्हाला धीरच देत होती...तिला बदललेल्या परिस्थितीबद्दल निश्चित वाईट वाटत असेल पण ती स्वतः न डगमगता खंबीरपणे आहे त्या परिस्थितीला तोंड देत होती. आणि तुम्हालाही हेच सांगत होती.

अन्या दातार's picture

9 Sep 2011 - 10:25 pm | अन्या दातार

खरंच कृष्णामाई खंबीरपणे तोंड देत होती असं वाटतं तुम्हाला? का हतबलपणे वाहत होती, जे काही चाललंय त्याकडे जाणून बुजुन दुर्लक्ष करत?

जर नदीला बोलता आले असते, तर आजूबाजूच्या गावकर्‍यांना तिने कदाचित कधीच विसर पडू दिला नसता असे वाटते.

असो, आपल्या सोयीसाठी आपण याला कृष्णामाई स्पिरीट म्हणू. :(

अत्रुप्त आत्मा's picture

9 Sep 2011 - 10:17 pm | अत्रुप्त आत्मा

लाजवाब,अत्यंत ह्रुदयस्पर्शी चित्रण

@- संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही....

कारण इतक्या सगळ्या गदारोळात एकटी कृष्णामाईच स्थितप्रज्ञासारखी वाहत होती. माझ्या डोळ्यात तारालालेल्या अश्रूंशी तिला काहीच देणे घेणे नव्हते...........

वाहव्वा,गाण्याचा अत्यंत समायोचीत अर्थ लावलास मित्रा

धन्या's picture

9 Sep 2011 - 10:26 pm | धन्या

काळाबरोबर खुप काही बदलत असतं... आपल्या हाती निघून गेलेल्या क्षणांच्या आठवणीं व्यतिरीक्त काहीही उरत नाही.

गणेशा's picture

9 Sep 2011 - 10:51 pm | गणेशा

मन, मनातल्या आठवणी.., आणि त्या आठवणींमधील जत्रा खरेच हृद्याला जावुन भिडते...

आणि नंतर च्या या परिस्थीवर ...

लगेचच हरीपुरात पोचता झालो. वेशीजवळ गाडी पार्क केली आणि मंदिर आवारात गेलो. डोळ्यासमोर अपघात व्हावा तसा मला धक्का बसला. जी जत्रेत १०% सुद्धा लोक नव्हते. कवठ-चिंचा विकणाऱ्या बायका दुर्मिळ झाल्यात आता. साखरेचे हत्ती-घोडे, गणपती गायब झालेत. तलवारी, धनुष्यबाण याच्यासाठी हट्ट करणारी मुळे आता इतिहासजमा झालीत. वेताचा साप सुद्धा कुठे दिसत नाही. रंगीबेरंगी गॉगल्सच्या अवतीभवती कुणी लहानगा घुटमळताना दिसत नाही.

काय बोलावे तेच कळत नाही.. निरागस असणारी माणसे आता खरेच हरवली आहेत हे जानवुन वाईट वाटते..
वेताचा साप पाहुन तर आता २० वर्षे तरी होत आली आहेत असे वाटते आहे मला पण...

शेजारील कृष्णामाई... आता आईच म्हंटल्यावर आपल्या लेकरांच्या प्रगतीपुढे उगाच त्यांच्या आनंदासाठी बळेच हसणारी वाटते आहे .. संथपणे वाहताना ही मनाता सल घेवुन आपल्या लेकरांसाठी एक छोटेसे स्मित केल्यासारखी दिसणारी आई ही आता चिंतेतच पडलेली असेल...

५० फक्त's picture

9 Sep 2011 - 11:01 pm | ५० फक्त

@ गणेशा, ''निरागस असणारी माणसे आता खरेच हरवली आहेत हे जानवुन वाईट वाटते..'' व्यनिमध्ये कितीतरी निरागस फोटो आहेत की रे, पुन्हा स्पावड्याच्या खरडवहीत आहे एका निरागस माणसाचा फोटो,

अन्या दातार's picture

9 Sep 2011 - 11:04 pm | अन्या दातार

>>स्पावड्याच्या खरडवहीत आहे एका निरागस माणसाचा फोटो
तो निरागस दिसणार्‍या माणसाचा फोटो आहे.

पाषाणभेद's picture

10 Sep 2011 - 3:33 am | पाषाणभेद

छान लेखन.
जत्रांच्या जुन्या स्मृती खरोखर चांगल्या होत्या. आताशा होणार्‍या जत्रांमध्ये पुर्वीसारखी मजा येत नाही हे खरेच.

राही's picture

9 Sep 2011 - 11:18 pm | राही

स्मरणरंजन रम्य असतं खरं पण त्यात वास्तवाचं भान सुटण्याचा किंवा वास्तवाबाबत अप्रियता निर्माण होण्याचा धोका असतो. एखाद्याला वास्तव न आवडण्यासारखं असू शकतं. पण बहुसंख्य लोकांना तेच पसंत आहे म्हणून ते तसं निर्माण झालं आहे हे ध्यानात घेणं जरूरीचं आहे.
पण प्रत्येक मृत्युघंटा मनात भय आणि दु:ख निर्माण करते; प्रत्येक मृत्युघंटेबरोबर आपणही कणाकणाने मरत असतो, हेही खरंच. "फॉर हूम द बेल टोल्स,इट टोल्स फॉर दी!"

अन्या दातार's picture

9 Sep 2011 - 11:25 pm | अन्या दातार

चांगला विचार आहे. दुसरी बाजू पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. :)

सूड's picture

9 Sep 2011 - 11:33 pm | सूड

छान लिहीलंयस.

मी-सौरभ's picture

9 Sep 2011 - 11:56 pm | मी-सौरभ

उत्त्म लेखन...

आता जत्रा अन् तिथलं उत्साही वातावरण काल बाह्य झाल्यासारखेच आहे...
गावातला आठवडे बाजार पण आता हळू हळू त्याच वाटेवर आहे :(

सध्या उत्साह फक्त शॉपिंग मॉलमधेच दिसतो आणि तो सुद्धा फक्त बायकांच्या चेहर्‍यावर असतो :)

आत्मशून्य's picture

10 Sep 2011 - 12:27 am | आत्मशून्य

सध्या उत्साह फक्त शॉपिंग मॉलमधेच दिसतो आणि तो सुद्धा फक्त बायकांच्या चेहर्‍यावर असतो

+१ :)

अन्या दातार's picture

10 Sep 2011 - 12:34 am | अन्या दातार

गावातला आठवडे बाजार पण आता हळू हळू त्याच वाटेवर आहे

अहो भारताचा विकास होतोय ते बघवत नाही का आपल्याला सौरभ? कसल्या आठवडे बाजाराच्या बाजारगप्पा करताय तुम्ही? :(

मी-सौरभ's picture

10 Sep 2011 - 12:41 am | मी-सौरभ

अन्या लेका तू कधी गेल्ता का असल्या बाजारात??? लै मजा असायची तिथं :)

विकास म्हंजे जर १० रुपड्यात मिळणारी ताजी भाजी सोडून मॉल मधून शिळी भाजी १५ रुपयात घेणे असेल तर नको तो विकास .

अन्या दातार's picture

10 Sep 2011 - 12:55 am | अन्या दातार

सौरभ, अरे या हरिपुरातच भरायचा रे आठवडी बाजार.
त्याचबरोबर इचलकरंजी, कागल भागातले आठवडी बाजारही हिंडलोय मी. :)
बादवे, भाजी घ्यायलासुद्धा तुम्ही मॉल गाठता? रेल्वेलाईनच्या बाजूला भाजीवाले बसत नाहीत का तळेगावात? (का फक्त बटाटा वेफर्ससाठी पेस्शल बटाटे विकतात तळेगाव बाजारात?)

आत्मशून्य's picture

16 Sep 2011 - 2:27 am | आत्मशून्य

हॅहॅहॅ

स्वाती२'s picture

10 Sep 2011 - 2:33 am | स्वाती२

आवडले.

इंटरनेटस्नेही's picture

10 Sep 2011 - 3:28 am | इंटरनेटस्नेही

अतिशय चांगले, दर्जेदार लेखन! कीप इट अप ड्युड!

चावटमेला's picture

10 Sep 2011 - 11:41 am | चावटमेला

वा, छान!!! जुन्या आठवणी ताज्या झाल्या, आणि सध्याची स्थिती वाचून वाईटही वाटले. आम्ही लहानपणी वडिलांबरोबर श्रावणी सोमवारी हरिपूरच्या जत्रेला जायचो. मला तर ते जत्रेत मिळणारे गॉगल्स खूप आवडायचे. असो, वडिल गेले, सांगलीही सोडली, आणि त्याबरोबर छोटसं टुमदार हरिपूर सुध्दा मागं पडलं.. तसंही सगळं कुठे पूर्वीसारखं राहिलंय म्हणा..

amit_m's picture

10 Sep 2011 - 12:35 pm | amit_m

Nostalgic का काय, ते झालो...

परिकथेतील राजकुमार's picture

10 Sep 2011 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

शब्दसामर्थ्यावर जत्राच हिंडून आणलीत की आम्हाला.

वर्णन आणि आठवणी एकदम आवडेश.

बाकी दातार तुम्हीपण सांगलीचे का ? वा ! वा ! आनंद झाला.

विसुनाना's picture

10 Sep 2011 - 12:52 pm | विसुनाना

अजून वीस-पंचवीस वर्षानंतर लिहिलेला "एक मॉल हरवलेला" हा लेख वाचत आहे असे वाटले. ;)
गेले, ते दिन गेले.... :(

योगप्रभू's picture

10 Sep 2011 - 1:10 pm | योगप्रभू

कृष्णा नदीचे लोकांनी गटार करुन टाकलंय.
आता वर्षातून कधीही या नदीचे पाणी हिरवे-निळेशार बघायला मिळत नाही. कधीही पाहावे तेव्हा तांबडे मातकट. वाळूचा बेसुमार उपसा झाल्याने तळ खरवडले गेले आहेत. पावसाळ्यात धोम धरणातून पाणी ओसंडून वाहते तेव्हाच काय ती कृष्णा दुथडी भरुन वाहते. उरलेले वर्षभर ती संथ पाण्याचे गटार असते. त्यामुळे 'संथ वाहते गटारगंगा' म्हणणे योग्य ठरावे. त्या तुलनेत आंध्रप्रदेशात कृष्णा नदी भव्य आणि खूप सुंदर आहे. वाडीला कृष्णा-पंचगंगा संगम आहे. तिथे ही नदी छान दिसते. पुढे सोलापूरपासून जवळ कुडलसंगम (कृष्णा - घटप्रभा) येथेही ही नदी भव्य आहे. अलमट्टी धरण, प्रकाशम बराज धरण बघताना तिचा विस्तार नजरेत मावत नाही.

असो हरीपूर हे जत्रेसाठी, निसर्गरम्य शांत गाव म्हणून त्याचबरोबर चवदार वांगी आणि पेरुंसाठीही प्रसिद्ध आहे. त्याचा उल्लेख विसरलास का रे अन्याभाऊ? :)

अन्या दातार's picture

10 Sep 2011 - 1:26 pm | अन्या दातार

योगप्रभू, नदीबद्दलच्या शब्दाशब्दाशी सहमत.

पेरु आणि वांग्यांबद्दल लिहायचे राहिलेच. सॉरी!

स्पा's picture

10 Sep 2011 - 7:30 pm | स्पा

दातरू सेठ लेख अत्यंत आवडलेला आहे

स्पावड्या वर त रंगहिन करायचा राहिला का रे फार कामं आहेत वाटतं हल्ली तुला ?

अन्या दाताराचा 'दातरु' आणि त्याहीपुढे 'सेठ' हा प्रत्यय पाहून उगा टक्केवारीची काही भानगड असल्यासारखं वाटलं. :D

चित्रगुप्त's picture

11 Sep 2011 - 12:44 am | चित्रगुप्त

अतिशय सुंदर लेख.

उल्हास's picture

11 Sep 2011 - 1:57 am | उल्हास

पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. चालत हरीपूरला जायचो. फार मजा यायची.

अनिरुद्ध,
माझे आजोळ सांगलीचे! माझ्या आजोबांना त्यावेळी 'भावे इंजीनियर' म्हणूनच ओळखत. गांवभागात त्यांचा वाडा होता. आम्ही प्रत्येक उन्हाळ्यची सुट्टी तिथे घालवायचो. तिथे आजोळच्या नात्यातले कुणीतरी रहात होते, त्यामुळे एक courtesy call म्हणून आईबरोबर जाणे होत असे. त्यामुळे हरिपुरला खूपदा गेलेलो आहे. आई व इतर वडील मंडळी टांग्यातून जायची व मी आणि माझा भाऊ व वाड्यातले समवयस्क मित्र चालत जायचो. जाताना दोन्ही बाजूच्या आंब्याच्या झाडांना मोहोर लागलेला असायचा. झाडावर चढून-तोडून तो आम्ही खाल्लेला आजही आठवतो.
तुझा लेख वाचून अशा खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या व मी पुनःप्रत्ययाचा आनंद भरपूर लुटला. त्याबद्दल धन्यवाद.
हल्ली सांगलीला जाणे होत नाहीं कारण आजी आजोबा गेले व सर्व मामा मंडळी सांगलीतून बाहेर पडली. पण पुन्हा कधी जाणे झाले तर हरिपूरला जाऊन ती "संथ वाहते कृष्णामाई" नक्की पाहून येईन.
तुझी लिहिण्याची शैली झकास आहे. मजा आली वाचायला. लिहीत जा असाच.

नगरीनिरंजन's picture

11 Sep 2011 - 6:47 am | नगरीनिरंजन

स्मृतीरंजन (त्यातही गेले ते दिन गेले) हा एक हमखास यशस्वी विषय असला तरी लेखाची भाषाशैली ओघवती आणि अकृत्रिम असल्याने लेख चांगला आहे असे म्हणतो.

अन्या दातार's picture

11 Sep 2011 - 10:36 am | अन्या दातार

इतके सारे सांगलीकर इथे आहेत हे पाहून आनंद झाला.
परा, ननि, चावटमेला, स्वाती२, इंट्या, सुड, अमित, चित्रगुप्त, काळेकाका आपणा सर्वांना धन्यवाद. आपल्या प्रतिक्रियांमुळे लेखन करायचा हुरुप वाढला आहे.

पैसा's picture

11 Sep 2011 - 10:49 am | पैसा

अनेक गावातून आता फक्त म्हातारे राहिले आहेत, त्यांची मुलंबाळं शहरांतून रहायला गेली आहेत. सगळी गावं अशी ओस पडायला लागली तर जत्रांची अशीच अवस्था होणार...

इथे आणखीही एक गोष्ट आहे, लहान असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीत एक निरागस आनंद मिळतो, जगाचे अनुभव येतात, तसा तो हळूहळू तो हरवत जातो. आपणही काळाबरोबर बदलतो. हे सगळं अपरिहार्य आहे.

:(

तुम्हीच किती दिवसांनी गेलात पहा ना? सार्‍यांच तेच होतय हल्ली.

माझ्या गावची जत्रा मात्र अजुन आहे. फक्त मध्यंतरी एका बाईन येउन देवा समोर नाचलच पाहिजे असा काहिसा पायंडा पाडायला बघितला तेंव्हा जरा वाईट वाटल. अजुन ती येउन तसल काही करते की नाही अन बाकिच्या 'अतिहुषारांनी ' ते उचललय की काय माहित नाही.

शब्द चित्रण अन मनातली परत बालपणात फिरुन यायची हौस दोन्ही अतिशय सुंदर जमल आहे.

वपाडाव's picture

12 Sep 2011 - 11:07 am | वपाडाव

तुमी लिवा मालक.....
असंच कायतरी लिवा....
मज्या आजाच्या गावच्या जत्रेची आठौण झाली....

एका चिकट पदार्थाचं घड्याळ बनवुन देणारा माणुसही असायचा त्या जत्रांमध्ये...
अन मंदिर आवारात पंगतीला बसुन भात-वरण-पिठलं द्यायचे...
जाम मजा यायची....
तेव्हा अन्न कमी पडायचं आता माणसं....

हरिपूर.. काय आठवण काढलीस मित्रा..

निसर्गनिरिक्षणाचं वेड होतं तेव्हा कृष्णेच्या काठाकाठाने सांगलीहून हरिपूरपर्यंत दुर्बिणी घेऊन आम्ही पोरं पक्षी शोधत भटकत असायचे. हरिपूर परिसरात खूप अनपेक्षित पक्षीजाती बघायला मिळाल्या.

त्या रस्त्यावरची "बागेतला गणपती" ही माझी खास आवडती जागा. नदीकाठचं शांत मंदिर. थंड शांत जागा एकदम. कारण माहीत नाही पण जागा खूप आवडते एवढंच कळतं.

शिवाय हरिपूर म्हटलं की तिथली हळदीची पेवं.

जत्रा तर सर्वात मेन अ‍ॅट्रॅक्शन..

बाकी काय बोलू.. सगळं लिहिलं आहेसच.. आठवणी उसळून येताहेत. मस्त.. आवडले रे एकदम..

अन्या दातार's picture

12 Sep 2011 - 1:44 pm | अन्या दातार

ही खरंच एक रम्य जागा आहे. यंदासुद्धा गेलो होतो तिथे. तिथलेही रुप बदललंय आता. ओकं-बोकं वाटतं आता मंदिर.

छोटा डॉन's picture

12 Sep 2011 - 12:07 pm | छोटा डॉन

एकदम झकास लेख मालक.
तुमच्या आठवणीतली यात्रा शब्दांमार्फत अगदी हुबेहुब डोळ्यासमोर उभी केलीत :)

जग बदलतं आहे, लोकांच्या प्राथमिकता बदलत आहेत, लोकं बिझी होत चालली आहेत, नाही म्हणली तरी बर्‍यापैकी आर्थिक सुबत्ता आली आहे.
पुर्वी यात्रेनिमित्ताने वर्षातुन कधीतरी एकदा लोक भेटत, त्यामुळे यात्रा भरभरुन वहायची, लोकांनी यात्रेची ओढ लागायचे कारण म्हणजे आप्तांना भेटणे/बोलणे हे असायचे. आता टेलिकम्युनिकेशन्सच्या साधनांनी हा प्रश्न मिटवला आहे व कदाचीत त्याचाही परिणाम यात्रेवर होत असेल.

लिहण्यासारखे बरेच आहे पण इथेच थांबतो.
जीवनशैली बदलली तर त्याचे परिणाम अशा ठिकाणी दिसणे अटळ आहे इतकेच म्हणतो.

- छोटा डॉन