आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी?
एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ... बंटीला शिकवलेला डार्विन आठवतो पण त्या डार्विनला खरं साबित करायचं तर सर्व्हायवल साठी आम्ही किती फिट की मिसफिट हे आम्हालाच ठाऊक नाही तर तिथे इतरांची काय गत.
खूप जुनं काहीतरी आठवायचं तर आई न्यायची शाळेत ते आठवतं. सकाळी सकाळी डोक्यावर पडणारं थंड पाणीसुद्धा झोप घालवायला अपुरं. पण तिच्या हाती दूध चपाती खाताना मात्र झोप नसायची. मस्त असायचं ते सगळं. निरागस. निकोप. शेवटी आई होती ना भोवती. आपलं सारं आयुष्य सामावून घ्यायला. आजकाल खायला पण सक्तीचे वेज डेज पाळायला लागतायत... घोळीचा खारा खाऊन युगं लोटली असतील.. तोही एक किलो आणायचा तर त्यापेक्षा पोरांचा पिझ्झा स्वस्त पडतोय.... भिकाऱ्यासारखं मोजून मापून खाणं ... श्शी!
बिंकीला क्लासला घालायचं .... पण कसं जमणार ते? एक लाख म्हणे फी... पोर तशी स्वतः अभ्यास करू शकते पण इतर जण करतात म्हणून पाहिजे तिला क्लास... म्हणजे क्लास फक्त फॅड म्हणून... कसं समजवू तिला? ... त्यादिवशी पैशाविषयी बोल्लो तर रडली ... लहानपणी खेळणी हवीत म्हणून रडताना तिला कसंबसं समजवायचो आम्ही... पण आता कुठून येणार ते त्राण? ... कसं सांगू तिला की आम्ही कसे शिकलो ते... बाबांचा दरारा होता म्हणून आजी, काका, आत्या पकडून आठ लोकांच्या एका खोलीत राहून शिकलो. नाहीतर बाजा वाजवायला लागलो असतो. पण तेवढ्याने पोट भरत नाही हे मिसरूड फुटायच्या आधीच आमच्या डोक्यात बिंबवलं होतं, म्हणूनच स्वतःच्या हाताने तोच बाजा शाळा झाल्यावर भंगारात विकला. वाटलेलं रडू कोसळेल. पण डोळ्यांत साधा ओलावा सुद्धा आला नव्हता. गच्च रूक्षपणा साचला होता मनात ...
तिथेच आई बाबांनी त्यांचं काम फत्ते केलेलं होतं...
शिक्षण, लग्न आणि कुटूंब तर सगळेच सांभाळतात... पण जीवनातल्या काही छोट्या गोष्टी खास असायला हव्या... मित्र मंडळी, सिनेमा, नाटक, क्रिकेट... पण त्याचं अस्तित्त्वच किती क्षणभंगुर? ह्या सगळ्या अवसानाला पैसाच असतो हो... त्यात देव धर्म करावा तर तोही नावालाच... प्रदक्षिणा आटपा पण दक्षिणा नका आटपू ... अहो देवाचं सोडा आपल्या सग्या सोयऱ्यांशी किती सख्य असतं ते मागा कधी त्यांच्या कडे पैसे तेव्हा कळेल... बघा कित्ती क्षुद्र वाटेल ते.
क्षुद्र!
अगदी तोडीचा शब्द.
आज ह्या पुलाच्या कठड्याशी उभं राहून सारखं तसंच वाटतंय. खालचा तो समुद्र मला केव्हापासून हेच हिणवतोय. ऑफिस मध्ये मर मर मरायचं तर मग असं एका झटक्यात का नाही. तसं मुलांचं शिक्षण माझ्या लाईफ इंश्युरंसने आटपेल. एक बरं की त्या इंश्युरंसमध्ये बुडण्याशी निगडीत मृत्यूचा दाखला नाहीय. पैसे मिळतील वेळेत. इकडचा एक बेडरूम हॉल विकून उरलेलं कर्ज जाईल निघून आणि मग मीरारोड वगैरे ठिकाणी आरामात दोन बेडरूम मिळेल. तेवढी ही प्रॅक्टिकल आहे. सगळं मॅनेज करेल...
नेहेमीच करते... खंबीर मनाची आहे ... म्हणूनच तर तिला पसंत केलेलं...
माझी आनंदी ...
तिलाच असं धोका द्यायला जीवावर आलंय मला... माफ कर मला आनंदी ... आय ऍम सॉरी... पण मी काय करू?
आज नोकरी गेली... रीसेशनचा बहाणा पुरला आमच्या कंपनीला. वीस वर्षांची मेहेनत फुकट... कवडीमोल... धूळ झटकावी तसं झटकलं... सरभरीत झालो... अशी नोकरी जाऊ शकते हे कधी ध्यानीमनीही नव्हतं... काय करावं कळेना... नोकरी शोधायचीच होती ... आजच ... इंटरनेट चालवणाऱ्या नाडकर्ण्याकडून वेकंसी शोधल्या आणि ऑफिसच्या बाहेरच्या झेरॉक्स सेंटरवर तशीच नवी बायोडेटाची झेरॉक्स काढली. झेरॉक्स काढणाऱ्या मुलाने आजकाल त्याला रेझ्युमी किंवा सीवी म्हणतात असं सांगितलं...
इथंच कालबाह्य झालेलो मी...
नोकरीसाठी गेलो तर लाईनमध्ये सगळी मुलंच ती... नुकतीच आशा आकांक्षांचे पंख फुटलेली ... कशीबशी त्या लॉबीत बसलेली... अस्वस्थ... आपला भरारीपणा सिद्ध करण्यासाठी आतुर... अन मी इथे... थकलेला... खंगलेला... पंख छाटलेला... त्यांच्या नजरेशी कसा सामना करू मी... त्यांच्या स्वप्नांच्या राशींवर स्वतःचे इमले बांधू?
त्यांच्यात बंटी दिसत होता मला... बिंकीसारख्या वाटत होत्या त्या पोरी... इतकं स्वार्थी व्ह्यायचं? त्यापेक्षा मरण काय वाईट? ...
म्हणूनच मोकळं सोडतोय स्वतःला ... ह्या उंचीवरून... आई वडीलांची आणि आपल्या मुला बाळांची माफी मागत...
माहित आहे मी मेल्यावर भ्याडाचा शिक्का बसेल माझ्यावर... कर्तव्यपराड.मुख म्हणून हेटाळणी करतील सगळे ....
पण त्या पाण्याशिवाय मला दुसरा मार्गच दिसत नाही ... दिसतोय तो फक्त आनंदीचा चेहेरा... आनंदी ...
....
....
....
....
"चला आजचं शेवटचं काम उरकलं. इतके कपडे इस्त्री करायचे म्हणजे नुसती कटकट. त्यात सगळ्याच्या तऱ्हा वेगळ्या. बिंकीला जीन्सला थोडक्यात ईस्त्री हवी.... ’मम्मी जीन्सला सुरकुत्या हव्याच ... फक्त पायकडचा भाग ईस्त्री कर’ ... आणि बंटीला रूमालालापण ईस्त्री हवी ... मला लॉंड्रीवाली करून टाकलंय नुसतं.
"पुन्हा आज सकाळी मूग भिजत घालायला विसरले ... आता विचार करतेय संध्याकाळी काय करावं... बाजारात जायचं आहेच... तिथून आणून मस्त बांगडा करेन... आजकल गुरूवारी भाज्या खाऊन खाऊन तो उपासाचा झालाय जणू... आजच्या दिवशी आपला सगळ्यांचाच झालेला हा भ्रम तोडूया... मजा येईल... काय म्हणता?
"आणि माश्याचं म्हणावं तर दोन बांगडे पण पुरेसे आहेत... मुलांना देऊ शेपटीचा भाग... आपण डोकीच खाऊ... म्हणे माश्यांच्या डोक्यात ओमेगा थ्री असतं... बंटी सांगत होता चांगलं कोलेस्टरॉल वाढवतं म्हणे ते...
"बाजाराला जायला निघाले तशा दिघेभाऊंच्या मिसेस कवितावहिनी भेटल्या. नवी झेन घेतलीय त्यांनी असं म्हणाल्या. मस्तच. म्हणाल्या ड्रायव्हर पण ठेऊ. मी म्हटलं शिकून घ्या. केव्हातरी ऊपयोगी पडेल. पण लोकांना फुकटचा सल्ला दिला तर आपल्यावर कंजूषीचा शिक्का बसतो मग जास्त काही नाही बोल्ले.
"आपण कधी कार घेतली तर मी तर बाई शिकणारच. ऊगीच ड्रायव्हर कशाला ठेवायचा. सगळे शिकू आणि कार चालवू.... म्हणजे अगदी आत्ताच घ्यायची गरज नाही. पण नंतर कधीतरी... बंटी कमवेल तेव्हा. बंटी म्हणतो तसं स्टेटससाठी नको पण ऊपयुक्ततेसाठी .... काय तो शब्द ... हां ... ‘युटीलिटी’ म्हणून.
"आज पुन्हा श्यामलने फोन केलेला. आई बरी आहे म्हणते. ऎकण्याच्या पार गेलीय आता. मशीन बसवायला लागेल म्हणे. धड नोकरी असती तर स्वतःच आणली असती तिनं ... पण हतबलतेची कारणं आपल्या लोकांना दाखवावी तरी बोचतातच... तिच्या शिक्षणाचं नीट झालं असतं तर अशी वेळ.... ते जाऊदे ... मी तिला म्हटलं आईसाठी मी बघते ... बंटीच्या ओळखीतून लॅमिंगटनला वैद्यकीय ऊपकरणं मिळतात .... अगदी आत्ताच खराब होणार नाहीत ... दोन तीन वर्षं चालतील... तसं त्यापेक्षा जास्त वेळ आईला लागणार पण नाहीत ती... नाहीतरी तिचं वय लक्षात घेऊन.... मी तिची मुलगी असून असा विचार करतेय हेच निष्ठूर वाटतंय ना... पण आईला तशीही जास्त गरज लागणारच नाही ह्या मशीनची ... शेवटची वर्षं शांततेत तरी जातील.... आणि श्यामललाही बरं वाटेल ... निदान कुणीतरी मदत केल्याचं समाधान.
"उगीच माझ्याविषयी भ्रम करून घेऊ नका. शेवटी माझ्यात आईचंच बाळकडू आलंय ... अजूनही आठवतंय लहानपणी सहा केळी आम्हा चार भावंडात कित्येक दिवस पुरवायची ती... अन तेही आमच्यात एकमेकांविषयी असूया निर्माण न करता ... बाबांना पक्षाघात झाल्यावर तर आईनेच डबे पोचवले. नवी मुंबईत राहून आणि अशिक्षित असूनही गिरगावातले पत्ते तोंडपाठ. मग डबेवाले भाऊ आले आणि त्यांच्या हाती डबे बनवून पाठवायला लागली. संत माणसं हो. पगार किती? काही हजारच... पण अंबाबाईचा गोंधळ घालायला लागली की सोन्याचा आत्मा व्हायचा त्यांचा... आईचा हुरूप पाहून मोठी मुलगी म्हणून ते मलाही आशीवार्द द्यायचे ... चांगलं होईल सगळं म्हणून...
"तसा आशीर्वाद फळला बरं का आज. बिंकीने क्लास शोधलाय. म्हणे पनवेलला आहे. दोन टीचर आहेत. दहा - वीस हजारात करतायत सगळं ... संध्याकाळी साडे सहा ते साडे दहा क्लास.... मी म्हटलं ठाण्याला आईकडेच रहा... येऊन जाऊन पैसे आणि श्रम वाया जातील... एक वर्षं राहिल तिथं... श्यामल संध्याकाळी असते... ही सकाळी राहील... आईला तेवढील सोबत. श्यामल जेवणपाण्याचा खर्च करेल... तितकीच आपली एक सोय होईल...
... शेवटी आईचा मातृगुण पोचला बिंकी पर्यंत ... रडली तेव्हा किती टेंशनमध्ये आलेलात तुम्ही ... पण मोठी झालीय हो... आज अचानक.
"बंटीला म्हटलं तर तिला नोकरीचा बागुलबुवा दाखवू लागला... मी म्हटलं त्याला तू आधी नोकरी मिळवून दाखव ... तर म्हणतो कसा अंकल लोकांनी सोडल्या तर तरूणांना मिळतील ना... मी म्हटलं त्या अंकल लोकांत बाबा पण येतात तुझे. तर म्हणतो कसा बाबांचं वेगळं आहे...
ते सुपरमॅन आहेत...
... कार्टा मोठ्यामोठ्या गोष्टी करायला लागलाय आजकल ....
पण काहीही म्हणा ... मुलं अशी वागायला लागली की दगदग कुठच्याकुठे पळून जाते ... आधाराचे दोन बोल पण किती ऊर्मी देऊन जातात ना?
काय म्हणता?
...
...
...
हॅलो? हॅलो?? ऎकताय ना? ...."
...
...
...
समोरून काहीच प्रतिक्रिया आली नाही...
... पण तसंच एक पाऊल मागे सरसावलं आणि घरच्या दिशेने चालू लागलं ....
... कारण त्याला उमगलं की तिथेच त्याचा मोक्ष होता.
-- विनीत
प्रतिक्रिया
31 Aug 2011 - 3:42 pm | अन्या दातार
मस्त कथा. अगदी गुंग झालो वाचनात
31 Aug 2011 - 4:22 pm | नगरीनिरंजन
आशा-निराशेचा हिंदोळा मस्त घेतला आहे! भाषा आवडली.
31 Aug 2011 - 4:32 pm | अनिवासि
काय म्ह्णु ? अप्रतिम! शेवट्पर्यन्त वाचयला लावणारी कथा. अभिनन्दन!!!!!
31 Aug 2011 - 4:34 pm | नि३सोलपुरकर
विनित राव,
छान ! मस्त... लिखाण
31 Aug 2011 - 4:47 pm | विजुभाऊ
कळत नकळत हे स्वतःशी ताडून पहात होतो.
नुस्तच छान लिहिलय इतक्यावर बोलून भागणार नाही.
31 Aug 2011 - 9:36 pm | रामपुरी
:)
31 Aug 2011 - 10:38 pm | अर्धवटराव
असच म्हणतो.
अर्धवटराव
31 Aug 2011 - 11:47 pm | विनीत संखे
असं का म्हणता राव?
31 Aug 2011 - 5:15 pm | साबु
_/\_
31 Aug 2011 - 5:23 pm | सूड
मस्त !!
31 Aug 2011 - 5:34 pm | स्वानन्द
अप्रतीम.. लाजवाब!!
31 Aug 2011 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार
छान लिहीले आहेत.
31 Aug 2011 - 6:26 pm | आदिजोशी
मस्त आहे कथा
31 Aug 2011 - 6:28 pm | पल्लवी
मस्त :)
31 Aug 2011 - 6:41 pm | जाई.
उत्तम प्रकटन
31 Aug 2011 - 6:46 pm | मुक्तसुनीत
कथा आवडली. नवीनतम संदर्भ असल्यामुळे विशेष आवडली.
अशा स्वरूपाच्या कथांमुळे दिवाकरांच्या नाट्यछटांची आठवण येते. त्यांचा आवाका अशा कथांच्या मानाने छोटा पण परिणामकारक होता. आत्महत्येच्या विचारशृंखलांमुळे "क्राईम अँड पनिशमेंट" ची आठवण आली. त्या महाकादंबरीच्या मानाने ही कथा खूपच लहान आहे परंतु जातकुळी काहीशी तशीच.
मी नक्की सांगू शकत नाही परंतु या जातीचं लिखाण संज्ञाप्रवाही ज्याला म्हणतात त्या वर्गात येईल : व्यक्तीच्या मनातले अस्ताव्यस्त विचार विदित करणे हे त्या प्रकाराचे वैशिष्ट्य.
असो. हा उत्तम प्रयत्न होता. आपल्या मनातल्या विचारांची विहिर यापेक्षा अधिक गहिरी असते आणि कदाचित लेखकाला त्या दिशेने जाता येईल असं वाटलं. शुभेच्छा.
31 Aug 2011 - 7:08 pm | विनीत संखे
धन्यवाद सुनीतराव ... आणि तुमचे विचार नक्कीच ज्ञानदायी आहेत.
31 Aug 2011 - 6:50 pm | विशाखा राऊत
:)
31 Aug 2011 - 6:59 pm | स्मिता.
शेवटपर्यंत वाचून काढलं. छान लिहिलंय.
31 Aug 2011 - 7:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अनेकदा डोक्यात विचार येतात ते तुटक तुटक असतात; सलग वाक्य बोलल्यासारखे विचार असतीलच असं नाही. ते तसेच लिहीण्यामुळे कथा जास्तच आवडली.
31 Aug 2011 - 7:36 pm | प्रास
छानच जमलंय हे मुक्तक!
आवडलं.
31 Aug 2011 - 7:37 pm | गणेशा
पुन्हा एकदा उत्कृष्ट लिखान ....
असेच लिहित रहा... वाचत आहे ...
1 Sep 2011 - 2:34 pm | विनीत संखे
:) धन्यवाद.
31 Aug 2011 - 7:46 pm | सविता००१
खुप मस्त लिहिले आहे.
31 Aug 2011 - 8:13 pm | प्रचेतस
छानच लिहिलेय.
31 Aug 2011 - 9:40 pm | रेवती
हुश्श्य! घरीच गेला तो शेवटी.
गोष्ट संपताना काय होणार अशी भिती वाटत होती.
31 Aug 2011 - 10:11 pm | रामदास
खाली उतरे पर्यंत आपणच जीव मुठीत धरून बसतो तसा अनुभव आला.
सुंदर कथा.
2 Sep 2011 - 5:59 am | स्पंदना
+१
अगदी असच काहीस वाटत होत वाचताना.
सुरेख भावना चित्र !
( तश्या बायका असतातच धिराच्या अन धिर देणार्याही)
2 Sep 2011 - 4:16 pm | प्यारे१
आमच्या मनात जे कधी मधी असतं ते लेखकानं कथेतून आणि कथा वाचून मनात जे आलं ते प्रतिसाददात्यांनी प्रतिसादातून अगदी मस्त शब्दांकित केलंय.
2 Sep 2011 - 4:24 pm | स्पा
अप्रतिम.... सुरेख.. शब्दच नाहीयेत
जाम आवडली
31 Aug 2011 - 10:49 pm | ५० फक्त
जबरदस्त आहे एकदम, आवडलं खुप छान.
1 Sep 2011 - 3:38 pm | अर्धवट
कथा आवडली
1 Sep 2011 - 3:59 pm | utkarsh shah
वाचताना शेवट काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती...
1 Sep 2011 - 4:40 pm | नावातकायआहे
सुंदर कथा.
3 Sep 2011 - 12:07 am | विनीत संखे
धन्यवाद माझ्या मिपामित्रांनो.
:)
4 Sep 2011 - 5:11 pm | नंदू
कथा आवडली.
4 Sep 2011 - 6:01 pm | अप्पा जोगळेकर
आवडंलंय.
4 Sep 2011 - 9:17 pm | पैसा
या कथेत दोघांच्या मनातले विचार आहेत, आणि ते लिहिताना भाषा पण छानप्रकारे बदललीय. कथा खूप आवडली. सामान्य मध्यमवयीन माणसांच्या आयुष्यात असे आशा-निराशेचे प्रसंग येत जात रहातातच, पण सर्वसामान्य माणूस सहसा परिस्थितीतून कसातरी मार्ग काढतोच, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत नाही, हेच सामान्यातलं असामान्यत्व. ते खूपच छान प्रकारे या कथेत आलंय.
5 Sep 2011 - 1:04 am | पाषाणभेद
खरोखर सुंदर कथा आहे. उत्सूकता ताणली गेली होती.
6 Sep 2011 - 2:58 pm | विनीत संखे
धन्यवाद मित्रांनो.
:-)
24 Feb 2014 - 2:46 pm | नावातकायआहे
उत्खनन