आई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट! घरावर मी आणि माझा धाकटा भाऊ दोघांचच राज्य होतं. भावाने चतुराईने टिव्हीच्या रिमोटवरचं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. अगदी बाथरूमला जातानाही रिमोट बरोबर घेऊन जात होता म्हणा ना! त्यामुळे चालु कार्यक्रम आवडता असुनही, त्याने लावलेला कार्यक्रम कसा बघणार, असा प्रश्न इगोचा असल्याने मी टिव्ही बघु शकत नव्हतो. माझे मित्र (ज्यांबरोबर फिरताना रविवार कमी पडत असे) आता एकच मिळणार्या रविवारी झोपलो नाहि तर ऑफिसात लागलेली सवय मोडेल या कारणाने दुपारच्या झोपा काढत होते. शेजारच्या बांधकामावरचे मजूरही रविवार असल्याने शांतपणे विडीचे झुरके मारत मातीच्या ढिगार्यावर बसले होते. समोरच्या पटेलांची क्रिमा... हे गुज्जु नावं कुठुन शोघतात हा एक प्रश्नच आहे. माझा एक मित्र त्याच्या मुलीचं नाम स्म्लेषा ठेवणार होता. त्याचा अर्थ नाकातील प्रवाही पदार्थ आहे हे सांगितलं आणि मोठ्या कष्टाने त्याने हा बेत बदलला. पण ही क्रीमा आहे बरीक खास हं .. असो तर ही तासनतास खिडकीत घुटमळणारी क्रीमादेखील आज खिडकित येऊन आपले केस वाळवून आत लुप्त देखील झाली होती. अगदी लक्ष्मीदेखील लेकीला चित्रकला 'कॉन्टेस्टला' घेऊन जायचय म्हणून शिल्लक असलेली दोनचार भांडिच घासून पसार झाली होती. थोडक्यात माझ्या भोवतीची सारी स्थिरचर सृष्टी आत्मानंदात तल्लीन होती आणि मी मात्र एका रविवारची दुपार घालवावी कशी या वंचनेत होतो.
आता म्हणाला हा काहि प्रश्न आहे का? मस्त ताणून द्यावी, नाहीतर वाचन करत पडावं, नाहितर गाणी ऐकावीत किंवा जालावर येऊन काहितर खरडावं.. पण का कोण जाणे त्या दुपारी मला यापैकी काहि काहि करावसं वाटेना.. अगदी भावाशी भांडावसं देखील!.. मग एकदम माझ्या डोक्यात किडा वळवळला. चला काहितरी खायला करू या!
झालं! भावाला म्हटलं चलरे आपण मस्तपैकी काहितरी बनवुया खायला. भावाने एक असा काहि लुक दिला की तुला जे काहि करायचय ते कर, मला ते खायला लाऊ नकोस असं तो बजावतोय हे न बोलताही मला स्पष्ट ऐकु आलं. त्याला मस्का मारण्यात अर्थ नव्हता.
आता माझ्यापुढे प्रश्न होता करायचं काय? म्हणजे मला बरेच पदार्थ येतात आणि त्यातला कोणता बरं करावा अशातला भाग आहे असं समजु नका हं! (आता तुमच्यापैकी कोणाचाही असा समज नाहि आहे हे खरं असलं तरी लोक आपल्याला आहोत त्यापेक्षाही ग्रेट समजताहेत असं माणसाला उगाचच वाटत असतां नाहि!?) माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो.
मी काय करू शकतो याची यादी तशी अगदिच काहि लहान नाहि. चहा नामक भारतीयाची प्राथमिक गरज मी अगदी लीलया पूर्ण करू शकतो. त्याच बरोबर कॉफी, हॉट चॉकलेट, आईस टी आदी पेयेदेखील मी बनवूनही लोक पिऊ शकतात. खाद्यपदार्थांत सँडविच, ऑमलेट अश्या सोप्य सोप्या पदार्थांपसून ते पोहे, उपमा असे कॉप्लेक्स आणि पावभाजी नामक अतिकॉप्लेक्स पदार्थ बनवता येण्याचा दावा मी करतो. पण दुपारचे चहाबरोबरचे खाणे यासाठी यापैकी काहिच फिट बसेना. भावाला विचारल्यावर उपकार केल्याच्या थाटात "तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा! तुला हा पदार्थ नक्की जमेल!" अशी अगदी सदाशिवपेठी कमेंट मारून हा हा हा करून हसून घेण्याशिवाय त्याने काहि केलं नाहि. काहिच सुचेना तेव्हा मी नाईलाजाने घरात काहि रेडीमेड आहे का ते शोधायला लागलो. एका डब्यात तळाला थोडासा साबुदाण्याचा चिवडा होता. दोन घासांत संपला देखील. तोंड मात्र चाळवलं!
"घरात आहे का रे चिवडा अजून", भावाला विचारलं
"कसला?"
"साबुदाण्याचा, या पिवळ्या झाकणाच्या डब्यातला संपवला मी आताच"
"तेवढाच होता!"
"अरे! हा चिवडा करुया!" माझ्या मनाने नक्की केलं. या विचारासरशी काहितरी नवं करायच्या आनंदात मी अगदी स्टाईल मधे साबुदाणा काढायला सुरुवात केली. पण एकदम जाणंवलं की साबुदाणा खिचडी करता येत असली तरी चिवडा कसा करतात कोणास ठाऊक होतं. भावाला केवळ प्राथमिक गरज पूर्ण करता येते. बाकी अगदी साधी फोपो देखील करत नाहि तो! मग काय नेट जिंदाबाद!
जालावर रेसिपि वाचली. त्याप्रमाणे एकेक स्टेप करू लागलो. "आता साबुदाणा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळवा आणि टिपकागदावर पसरावा" असं एका ब्लॉगवर वाचलं. तेल तापवलं आणि साबुदाण्याचा मस्तपैकी एक बचका तेलात टाकला.
झालंऽऽऽ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ताड-ताड-ताड-ताड साबुदाणा फुटाण्यासारखा उडू लागला. मी डोळे बंद करून घेतले. जरा आवाज कमी झाला आणि बघतो तर काय त्या कढईत फक्त दोनचार साबुदाणे माझ्याकडे दात विचकून हसत पडले होते. बाकी सार्यांनी जमिनीवर उड्या मारल्या होत्या. त्या आवाजाने भाऊ घाबरून आत आला. ओट्याचा अवतार बघून "आईला येऊ दे, मग बघ.. आणि बंद कर हे नाटक तुला नाहि जमायचं" अशी धमकी देऊ लागला. त्याला गप्प करणं ही काळजी मला नव्हती. कारण त्याच्या धक्क्याने फुटलेल्या ६ बश्या मांजरीने फोडल्या अशी घोषणा करेन या तहाद्वारे त्याला गप्प करता आलं असतं. पण आता त्याने डिवचल्यावर त्याच्या नाकावर टिच्चुन चिवडा करणं हे क्रमप्राप्त होतं!
मी पुन्हा सरसावलो. यावेळी साबुदाणा तेलात घालताच एक झाकण त्यावर ठेवलं! काहि क्षणातच आवाज बंद झाला. झाकण उघडून पाहतो तर काय काळेठिक्कर पसलेले साबुदाणे दुप्पट जोराने माझ्याकडे बघून खिदळत होते. आता मात्र हद्द होती. झाकण ठेवावं तर जळणार आणि झाकण काढावं तर उडणार अशी पंचाईत झाली होती. त्यात भावाची भोचक नजर टोचत होती. त्याचं ते मनातल्या मनात खिदळणं समजून अजून चेव येत होता. आता साबुदाण्याचा चिवडा करून खाणं हा प्रेस्टीज इशु बनला होता.
आता मात्र हार मानायची नाहि हे नक्की झालं. डोकं वार्याच्या वेगात कल्पना लढवू लागलं. एकामागून एक निष्फळ विचार येत होते. शेवटी एकदाची डोक्यात वीज चमकली. कपाट उघडलं आणि त्यातून एक जूना गॉगल बाहेर काढला.
आता मी साबुदाणा तळात होतो. सगळं स्वयंपाकघर आणि माझी रविवारची दूपार साबुदाणामय झाली होती. तरीही मी साबुदाणा तळला.. डोळ्यावर गॉगल लाऊन!!! .. असा कीचनमधे मनसोक्त बागडत केलेला चिवडा मस्त झाला हे वेगळे सांगणे नलगे!
-ऋषिकेश दाभोळकर
प्रतिक्रिया
18 May 2008 - 6:21 pm | शितल
तुमचा साबुदाणा तळणे हा प्रयत्न आवडला, डोळ्यावर गॉगल घालुन तुम्ही कसे तो शाबुदाणा तळत असाल ह्या चा फोटो डोळ्यासमोर तयार झाला, असा फोटो काढुन जर मिपा वर चढवला असता तर अजुन हसुन हसुन पुरेवाट झाली असती.
बाकी लेख मस्त.
18 May 2008 - 8:05 pm | मन
छानच लेख.
त्यातही :-
...झाकण ठेवावं तर जळणार आणि झाकण काढावं तर उडणार अशी पंचाईत झाली होती.
हे भारिच.
आपलाच,
मनोबा
18 May 2008 - 10:27 pm | ईश्वरी
भावाला विचारल्यावर उपकार केल्याच्या थाटात "तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा! तुला हा पदार्थ नक्की जमेल!" अशी अगदी सदाशिवपेठी कमेंट मारून हा हा हा करून हसून घेण्याशिवाय त्याने काहि केलं नाहि.
लहान भावंडे अशीच असतात का हो? मलाही अनुभव आहे. :)
बाकी .. लेख मस्त झालाय....एकदम खुसखुशीत. मजा आली वाचताना. गॉगल घालून साबुदाणा तळला...सही अगदी.
ईश्वरी
18 May 2008 - 11:52 pm | विसोबा खेचर
अरे वा ऋषिकेशराव, आम्हालाही एकदा खाऊन पाहिला पाहिजे तुमच्या हातचा साबुदाण्याचा चिवडा! :)
बाकी लेख मस्त आणि खुसखुशीत. वाचून मौज वाटली....:)
अजूनही तुमच्या अश्या गॉगल लावून केलेल्या भन्नाट पाकृ आणि अनुभव येऊ द्यात प्लीज...
आपला,
(साबुदाणा खिचडी प्रेमी) तात्या.
19 May 2008 - 12:27 am | वरदा
मी अगदी अश्शाच रविवारच्या दुपारी एकटी बसलेय साबुदाणा तळू का? खी खी खी. नको माझं स्वयपाकघर साबुदाणामय झालं तर आई नाही काही येणार साफ करायला....चहाच टाकावा म्हणते येतय का कुणी चहा घ्यायला? पोह्याचा चिवडा आहे माझ्याकडे परवा केलेला....
28 May 2008 - 6:59 pm | वैभव
येतो की....
अगदीच पोह्याचा चिवडया वर यायला नको..
मला साबुदाणा तळ्ता येतो...
19 May 2008 - 1:02 am | पक्या
वा , मस्त..आज सकाळी सकाळी छान मिळाल वाचायला....खुसखुशीत, चटकदार, चमचमीत, खंमग, कुरकुरीत....
मजा आली राव वाचताना.
धन्यवाद
19 May 2008 - 2:12 am | रविराज
एकदम झकास लिहलयं!!!
माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो.
=))
19 May 2008 - 8:20 am | दिगंबर
चिवडा आवडला बुवा ! लेख अगदी मस्तच !!
19 May 2008 - 8:38 am | छोटा डॉन
च्यायला हसुन हसुन पुरेवाट झाली ... लेख फक्कड जमला आहे... अजुन येऊ द्यात ...
बाकी "चिवडा " झाला की नाही ?
"माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो."
हे वाक्य भारी ...
"भावाला म्हटलं चलरे आपण मस्तपैकी काहितरी बनवुया खायला. भावाने एक असा काहि लुक दिला की तुला जे काहि करायचय ते कर, मला ते खायला लाऊ नकोस असं तो बजावतोय हे न बोलताही मला स्पष्ट ऐकु आल"
हम्म. शेवटी घरोघरी मातीच्या चुली [ किंवा फार तर गॅस ] म्हणा ...
फरक इतकाच की आमच्या इथे असा "मूड - ऑफ " करायला स्वताला आमचा मित्र म्हणवणारे काही हलकट, नालायक असे लोक राहतात व आपले काम इमानदारीने करतात ...
स्वगत : आपण सुद्धा असल्या विषयावर लिहायला हरकत नाही ...
पदार्थ जमत नाही म्हणून काय झालं जर लेख जमला तरी हरकत नाही, कोण डोंबलाच येतय बघायला मी खरच केला होता की नाही ते ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
19 May 2008 - 9:01 am | केशवसुमार
दाभोळकरशेठ, बर्याच दिवसांनी येणे केलेत.. कुठे दडी मारली होती..
अनुभव कथन एकंदर उत्तम..
वरचे वर येत जा आणि लिहित जा..
(वाचक)केशवसुमार
स्वगतः मिपावर येणारे सगळेच माझ्यासारखे निरुद्योगी किंवा 'उद्योगी' असतात की काय? :?
19 May 2008 - 11:33 am | स्वाती दिनेश
चिवडा मस्त जमलाय!
केसु म्हणतात तसेच..,बरेच दिवसांनी येणं केलं,कुठे दडी मारली होती?
स्वाती
19 May 2008 - 11:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिवड्याचा अनुभव सही रे !!!
डोळ्यावर गॉगल लावून शाबूदाना तळला हे तर लय भारी !!!!
अवांतर : डोळ्यावर गॉगल लावलेला फोटो आम्ही तर पाहतोच असतो !!! :)
19 May 2008 - 12:13 pm | राजे (not verified)
हा ! हा ! हा हा !
=)) :)) :D =))
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
19 May 2008 - 2:33 pm | ऋषिकेश
शितल,
असे उद्योग करतानाचे फोटो काढले तर आई-बाबाच्या हाती लागण्याचा दाट शक्यतेमुळे या (व अश्या अनेक) उद्योगांचा फोटो नाही. :-) असता तर नक्की डकवला असता. प्रतिक्रियेबद्दल आभार
डॉन,
चिवडा झाला म्हणजे काय.. एकदम फक्कड झाला. त्यात भावाला फक्त चमचाभर दिला आणि बाकीचा त्याच्या समोरच बसून संपवला ;) त्याला ही चिवडा आवडला पण सांगणार कसे त्यामुळे माझ्याकडे बघत बसावे लागले :प. बाकी प्रतिक्रियेबद्दल आभार. तुझ्याही यशस्वी/फसलेल्या पाकृ येउ देत. वाट पाहतोय
केसु /स्वाती,
महिनाभर गुजरातमधे गांधीनगरला होतो. जालापासूनच काय तर कोणत्याही शहरी मायाजालापासून दूर होतो :) फार मस्त अनुभव आहेत तिथले. बघु वेळ मिळेल तसे ते अनुभवही सांगीनच. बाकी लेख आवडल्याचे कळविल्याबद्द्ल दोघांनाही धन्यु!
बाकी मन, इश्वरी, तात्या, वरदा, पक्या, रविराज, दिगंबर, प्राडॉ आणि राजे सार्यांचे प्रोत्साहन दिल्याबद्दल अनेक आभार!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 May 2008 - 7:04 pm | स्वाती राजेश
याचे उत्तर मिळाले....त्यामुळे विचारत नाही.
आम्ही वाट पाहात होतो कि कोणत्या इंग्लीश गाण्याचे भाषांतर आम्हाला वाचायला मिळेल?:)
तसेच नविन सिनेमाची परीक्षणे....
वरील लेख फारच छान.....यादगार्....परत चिवडा केलास तर तो चवीला कसा झाला? हे न लिहिता, कसा केलास? हे लिही....:)
कारण तुला भरपूर मार्गदर्शन मिळाले आहे वरील प्रतिक्रियांमधून....तेव्हा त्याचा वापर कर... :)) :)) :))
19 May 2008 - 8:31 pm | ऋषिकेश
स्वातीताई,
अभिप्रायाबद्द्ल धन्यु!
एक ऍनिमेटेड सिनेमावर लेख लिहिणार होतोच. तुमच्या प्रोत्साहनाने उत्साह वाढला. लवकरच लिहिन :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 May 2008 - 7:47 pm | चतुरंग
चिवडा मस्त रे! तुझे तळकट प्रताप वाचून छान वाटले! B)
चतुरंग
20 May 2008 - 3:24 pm | पद्मश्री चित्रे
काय डोकं आहे!
गॉगल लावुन साबुदाणे तळणे- मला नसतं बुवा सुचलं....
:))
20 May 2008 - 5:14 pm | अनिल हटेला
सही रे सही!!!!!!!!!!!
मस्त मजा आली वाचून!!!!!!
22 May 2008 - 1:02 pm | धमाल मुलगा
वा बंधो,
मुदपाकखान्यातला उपद्व्याप यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन!
तो गॉगल लावून तडीस नेला, ह्या 'ष्टायली'ची कल्पना आवडली :)
=))
खत्तरा :) लै लै जोरात पोपट रे!
बाकी पुरंदर पायथ्याची मिसळ चापणार्याला हे असं कुजकट बोलणार्या भावाच्या तोंडात त्या चिवड्याचे निव्वळ चार-दोन दाणे घालून मस्त बदला घेतला हां :)
24 Mar 2016 - 5:21 pm | उल्का
खुप मस्त लिहिला आहे अनुभव! पुन्हा कधी बनवला की नाही?
25 Mar 2016 - 10:48 am | विवेकपटाईत
मस्त. अस्मादिकांनी हि असे फसलेले प्रयोग केले होते आणि मार हि खाल्ला होता.