हत्या करायला शीक

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
29 May 2011 - 10:33 pm

हत्या करायला शीक

विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.
विद्या आली की मती येईल, मती आली की निती येईल, निती आली की गती येईल, गती आली की वित्त येईल आणि वित्त आले की अस्मानी-सुलतानी संकटांशी लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल आणि शेतकर्‍यांचा दिवस उजाडेल असाच दुर्दम्य आशावाद जोपासत म. फुले जगले.

म. फुले गेल्याला शंभरावर वर्षे लोटली. वाहत्या काळाच्या ओघात बर्‍याच उलथापालथी झाल्यात. शिक्षणाचा प्रसार झाला. सर्वदूर शाळा निघाल्यात. महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था झाली. भरीस भर म्हणून रात्रीच्या शाळाही निघाल्यात आणि शूद्र शेतकर्‍यांची पोरं शिकून मोठी झालीत. उच्च पदावर गेलीत. राजकारणात सत्तास्थानी विराजमानही झाली. पण एकंदरीत शेतकरी समाजाची दुर्दशा काही खंडीत झाली नाही. शेतकर्‍यांची मूठभर पोरं गलेलठ्ठ पगार मिळवती झाली किंवा शेतकर्‍यांची मूठभर पोरं लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागली याचा अर्थ एकंदरीत संपूर्ण शेतीमध्येच समृद्धी आली असा कसा घेता येईल?

मग शिक्षणाने नेमके काय केले? याचा जरा शोध घेऊन बघितला तर मोठे मजेदार निष्कर्ष बाहेर यायला लागतात. झाले असे की, शिक्षणाने विद्या आली. विद्येमुळे मतीही आली, पण मती मुळे निती येण्याऐवजी थेट गती आणि वित्त आले. निती नावाचा मधला एक टप्पाच गहाळ झाला. शिवाय वित्त आले की लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल, असा जोतीबांनी केलेला कयासही शेतकरीपुत्रांनी-शुद्रपुत्रांनी उताणा-उपडा-तोंडघशी पाडला. शूद्राचा पोरगा जेवढा अधिक शिकला तेवढा तो आपल्या इतर शेतकरी बांधवापासून दूर गेला आणि आत्मकेंद्रीत झाला असेच समीकरण दृग्गोचर झाले. संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले पण हा उच्चशिक्षित शेतकरीपुत्र हादरला नाही, पाझरला नाही, विव्हळला नाही आणि पेटून वगैरे तर अजिबातच उठला नाही. शेतकर्‍याच्या जळणार्‍या चिता पाहतानाही तो ढिम्मच्या ढिम्मच राहिला.

"एकजूटीची मशाल घेउनी पेटवतील हे रान" या साने गुरुजींच्या ओळी साकार करण्याचा शिकल्या-सवरल्या-शहाण्या आणि बर्‍यापैकी वित्तप्राप्ती केलेल्यांनी कधी प्रयत्नच केला नाही किंवा चुकून कधी त्या मार्गालाही शिवले नाहीत. कदाचित यात त्यांचा दोषही नसावा. जळत्या घरात आगीचे चटके सोसल्यानंतर त्या घरातल्या एखाद्याला त्या पेटत्या घरातून जर बाहेर पडायची संधी मिळाली तर तो स्वत:चा जीव मुठीत घेऊन जीवाच्या आकांताने पळत सुटतो. पुन्हा मागे वळून त्या घराकडे पाहण्याच्या फंदात पडत नाही किंबहुना मागे वळून त्या घराकडे पाहण्याची त्याच्यामध्ये इच्छाशक्ती उरलेलीच नसते. कदाचित अशाच तर्‍हेच्या सामूहिक मानसिकतेतून शेतीच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी झगडण्याऐवजी आहे त्या व्यवस्थेत स्वत:ला समरस करून घेण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही शिकली-सवरली शेतकर्‍यांची मुले "अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण" असे स्वनातही म्हणायला धजावली नसावीत.

"किसान मजूर उठलेले, कंबर लढण्या कसलेले" असे दृश्य अनेकवेळा पाहायला मिळते पण लढण्यासाठी कंबर कसणार्‍यांमधे अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोकांचाच जास्त भरणा असतो. उच्चशिक्षितांची संख्या मोजायला एका हाताची बोटे देखिल पुरेशी ठरतात किंवा तितकेही नसतात आणि असलेच तर ते लढण्यासाठी नव्हे तर लढणार्‍यांना हुसकावून लावण्यासाठी असतात, लाठ्या घालण्यासाठी असतात किंवा गोळीबाराचे आदेश देण्यासाठी असतात. आणि नेमका येथेच म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या "शिक्षणातून क्रांती घडेल" या तत्त्वाचा पराभव झाला असावा, असे समजायला बराच वाव आहे.
हे खरे आहे की, एकूण लोकसंख्येपैकी दहा-वीस टक्के लोकांच्या आयुष्यात शाळा-महाविद्यालयीन शिक्षणाने आमूलाग्र बदल घडत असतो. स्वातंत्र्याच्या फळांची चवही चाखण्यात त्यांचाच हातखंडा असतो. आयुष्यही समृद्ध आणि वैभवशाली होत असते. त्यांच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याच्या कक्षाही नको तेवढ्या रुंदावायला लागतात. पण उरलेल्या सत्तर-अंशी टक्के जनतेचे काय? शेतीवर जगणार्‍या शेतकरी-शेतमजुरांचे काय? त्यांना ना जगण्याची हमी, ना मरण्याची हमी. मरण येत नाही म्हणून जगत राहायचे, एवढेच त्यांच्या हातात असते. ज्या देशात हजारो कोटी रुपयांचे गैरव्यवहार सहज पचवले जातात त्याच देशातल्या शेतकर्‍यांना केवळ काही हजार रुपयाच्या कर्जापायी आत्महत्या करावी लागते. शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ का येते, या प्रश्नाचे तपशीलवार उत्तर शोधण्याची शिकून शहाणा झालेल्या आणि शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेऊन उच्च शासकीय पदावर कार्यरत असणार्‍या शुद्रपुत्रांना अजिबातच गरज वाटत नाही, हा इतिहास आहे.

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

आता शेतकर्‍यांच्या पोटी जन्म घेतलेली काही मुले उच्चशिक्षण घेऊन प्रशासनात उच्चपदावर पोचतील, काही मुले राजकारणात शिरून सत्तास्थानी विराजमान होतील त्यामुळे संपूर्ण शेतीव्यवसायाचे भले होऊन गरिबीचा आणि दारिद्र्याचा नि:पात होईल, अशी आशा बाळगणे यापुढे भाबडेपणाचे व मूर्खपणाचे ठरणार आहे. कुणीतरी प्रेषित जन्माला येईल आणि आपल्या घरात दिवे लावून जाईल, हा आशावादही चक्क वेडेपणाचा ठरणार आहे. "ज्याचे जळते, त्यालाच कळते" हेच खरे असून त्यावरील इलाजही ज्याचे त्यानेच शोधले पाहिजेत.
कवी इंद्रजित भालेराव म्हणतात,

शीक बाबा शीक लढायला शीक
कुणब्याच्या पोरा आता लढायला शीक

शालेय शिक्षणातून मिळणार्‍या विद्येवर विश्वास ठेवल्याने व त्यानुसार कृती केल्याने जर शेतकर्‍याचे काहीच भले होणार नसेल तर शेती कसणार्‍या व शेतीवर जगणार्‍या शेतकरीपुत्रांच्या-कुणब्याच्या पोरांच्या नव्या पिढीला स्वत:चे मार्ग स्वत:लाच शोधावे लागतील. जुन्या समजुती व विचारांना फाटा देऊन नव्या वास्तववादी व परिणामकारक विचारांचा अंगिकार करावाच लागेल. लढणे हाच जर एकमेव पर्याय उरला असेल तर कुणब्याच्या पोराने आता लढायला शिकलंच पाहिजे.

लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ईक
घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इख
मागं मागं नको पुढं सरायला शीक
आत्महत्या नको हत्या करायला शीक

हत्या करणे हा शेतकरी समाजाचा धर्मच नाही. लाथेखाली तुडवू इच्छिणार्‍यांशी सुद्धा अदबीने वागण्यातच त्याचे आयुष्य गेले. व्यक्तिगत जीवनात प्रसंग आला तर ज्या व्यवस्थेने त्याच्या आयुष्यात माती कालवली, त्या जुलमी व्यवस्थेला जाब विचारायचे सोडून स्वत:च आत्मग्लानी स्वीकारून विषाची बाटली घशात ओतली किंवा गळ्यात दोर लटकवून जीवनयात्रा संपविली. नेमका याच चांगुलपणाचा सर्वांनी गैरफायदा घेतला. नक्षलवाद्यांचे नाव काढल्याबरोबर थरथरायला लागणारे प्रशासकिय अधिकारी निरुपद्रवी शेतकर्‍यावर नेहमीच मर्दुमकी गाजवताना दिसतात. एका हातात एके रायफल व दुसर्‍या हातात हॅन्डग्रेनेड घेतलेले दोन तरुण बघून सरकारे हादरलीत. डोईवर लाल-पिवळा दिवा मिरवणारे माजघरात दडलीत. टीव्ही चॅनल आणि वृत्तपत्रे एकाच विषयावर रेंगाळलीत. जनजीवन ठप्प झाले, असे अनेकवेळा घडल्याचा इतिहास सांगतो. याउलट पाठीशी पोट जाऊन शरीराने कृश झालेले लाखो शेतकरी अहिंसक मार्गाने हात छातीशी बांधून "हक्काची भाकर" मागण्यासाठी जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा मायबाप सरकारने त्यांच्या पाठीवर गोळ्या घालून मुडदे पाडलेत. घालायच्याच असेल तर छातीवर गोळ्या घाला असे म्हणणार्‍या शेतकर्‍यांची एवढी साधी इच्छा देखिल पूर्ण केली नाही. शासन आणि प्रशासनाला जर बंदुकीचीच भाषा कळत असेल तर आत्मग्लानी व आत्महत्या निरुपयोगीच ठरतात, असे म्हणावे लागेल. अशा परिस्थितीत इच्छा असो नसो, स्वत:ला बदलावेच लागेल. आत्महत्या नव्हे तर हत्या करायला शिकावेच लागेल.

कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं
बुडिविती त्याचा कधी करिती ना घोरं
तुला टाळून जाणार्‍याला आडवायला शीक
घेतलेली कर्जं सारी बुडवायला शीक

जे जे आलेत ते शेतकर्‍याच्या नरडीला नख लावूनच गेले. तलाठ्यापासून तहसीलदारापर्यंत, दलालापासून व उद्योगपतीपर्यंत आणि गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत सर्वांनीच त्याने पिकविलेल्या मालास उत्पादनखर्चापेक्षा कमी भाव देऊन शेतमालाची लयलूट करण्यासाठी हातभार लावला. त्यांच्या चुकीच्या धोरणाच्या फटक्यानेच शेतकर्‍याचा संसार उध्वस्त झाला. आता हेच बघा, यंदा डिसेंबर मध्ये कापसाचे भाव रु. ७०००/- प्रति क्विंटल होते. ते काही सरकारच्या कृपेमुळे नव्हते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आहे म्हणून होते. पण केंद्र सरकारने मे महिन्यात कापसाच्या निर्यातीवर बंदी लादली आणि कापसाचे भाव रु. ३०००/- प्रति क्विंटल एवढे कोसळलेत. मग शेतकर्‍याने एवढा तोटा कसा भरून काढायचा? कर्जे कशी फेडायचीत? मग तो कर्जबाजारी झाला तर त्याच्या कर्जबाजारीपणाला तोच एकटा दोषी कसा? त्यामुळे आता काही नाही, एकच सरळसोपा मार्ग आणि तो म्हणजे घेतलेली कर्जं सारी बुडवायला शिकणे. पिकलं तवा लुटलं म्हणून देणंघेणं फ़िटलं.

उंटावून शेळ्या हाकी सरकारं शहाणं
त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण
तुझं ऐकत नाही त्याला झाडायला शीक
तूच दिली सत्ता त्याला पाडायला शीक

शेतीला अवकळा येण्याला केवळ आणि केवळ शासनयंत्रणाच कारणीभूत आहे. शेतीचे प्रश्न सुटत नाहीत कारण शेतकरी कधी शेतीच्या मुद्द्याच्या आधारावर मतदानच करीत नाही. जाती-पाती धर्म-पंथाच्या आधारावर मतदान करण्याचा या देशातल्या लोकशाहीला रोगच जडला आहे. निदान शेतकर्‍याने तरी यातून बाहेर यावे. जो शेतीचे प्रश्न सोडविणार नाही त्याला मतदानच करायचे नाही, मग तो उमेदवार त्याच्या जाती-धर्माचा का असेना, असा निश्चय करायलाच हवा. दिलेले आश्वासन पूर्ण न करणार्‍याला निवडणूकीच्या मैदानात लोळवायलाच हवे.

जातील हे दिस आणि होईलही ठीक
उद्या तुझा शेतामधी उधाणेल पीक
गाळलेल्या घामासाठी रस्त्यावर टीक
हक्कासाठी लढ बाबा मागू नको भीक

प्रत्येक अवस्थेला अंत असतोच. कोणतीही व्यवस्था चिरकाल टिकत नाही. आजचा दिवस कालच्या सारखा असत नाही आणि उद्याचा दिवस आजच्या सारखा असत नाही. स्थित्यंतरे घडतच राहतात. त्याच प्रमाणे कोणतीही व्यवस्था निर्दोष असू शकत नाही. एका दोषास्पद व्यवस्थेकडून दुसर्‍या दोषास्पद व्यवस्थेकडे आपण वाटचाल करीत असतो. पण दुर्दैव हे की, बळीराजाला पाताळात गाडल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व व्यवस्थांमध्ये शेतकरी केंद्रस्थानी कधीच नव्हता. त्याला कधी शूद्र म्हणून हीनतेची वागणूक दिली तर कधी औद्योगीकरणाच्या उत्कर्षासाठी कच्चा माल म्हणून त्याची पिळवणूक केली गेली. पण हे आता थांबायला हवे.

हे शेतकर्‍याच्या पोरा, आता गाळलेल्या घामाची रास्त किंमत कशी वसूल करायची हेच तुला शिकायचे आहे. त्यासाठी ठाण मांडून बसायचे आहे आणि प्रश्न निकाली निघेपर्यंत तसूभरही न ढळता अंगिकार केलेल्या रस्त्यावर टिकायचेही आहे.

गंगाधर मुटे
........................................................................

समाजजीवनमानअर्थकारणशिक्षणविचारलेखसमीक्षा

प्रतिक्रिया

निशान्त's picture

30 May 2011 - 6:43 pm | निशान्त

अतिशय सुन्दर लेख. पण लेखाचे नाव चुकले.

तरीही विचार करायला लावणारा लेख...

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2011 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

विचारात टाकणारा.. तरीही क्रांति कारक लेख...हा संपुर्ण लेख गावोगाव भित्ती पत्रक स्वरुपात लावला जावा...ईतका परिणामकारक आहे....

llपुण्याचे पेशवेll's picture

31 May 2011 - 7:43 pm | llपुण्याचे पेशवेll

लेखातील काही काही विचार फार चांगले व पटणारे आहेत. निती ही पायरी केवळ श्रमिक वर्गाच्याच नव्हे तर सर्वांच्याच शिक्षणातून गेली आहे असे वाटते.
परंतु मला एक सांगा मुटे साहेब शेतकरी काय फक्त शेतीसाठीच कर्ज घेतात का हो? मला नाही असे वाटत. गाडगेबाबांच्या चरित्रात एक उल्लेख येतो तो असा की "हाताशी पिक आलं की शेतकरी अगदी जवान घोड्यासारखा फुरफुरेल पण ते तेवढ्याच काळात. मधल्या अधल्या काळात जर पैशाची गरज पडली तर सावकारासमोरच हात पसरावे लागायचे". म्हणजे ही परिस्थिती ८०-९० वर्षांपूर्वीची असेल. पण अजूनही ती जर बदलत नसेल तर दोष शेतकर्‍याचा नाही का? म्हणजे सगळं खापर शेतकर्‍याच्या डोक्यावर नाही फोडायचं पण परिस्थितीने इतके पोळल्यावरही आमचा शेतकरी बंधू शिकणार का नाही.

गंगाधर मुटे's picture

31 May 2011 - 8:06 pm | गंगाधर मुटे

जो मनुष्य निव्वळ शेतीच करतो, त्याला असनारे सर्व खर्च हे शेतीचेच मानावे लागेल.
उदा. त्याचे जेवणे, त्याचे राहणे, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कामानिमित्त होणारे प्रवासखर्च, आरोग्य-दवाखाना, हे सर्व खर्च शेतीचेच आहेत.
कारण
उद्योग, व्यापार, नोकरी मध्ये सुद्धा असाच हिशेब केला जातो.
कामगाराला - कर्मचार्‍याला मिळणारे पगार सुद्धा याच हिशेबाने निश्चित केले जातात. :)

तिमा's picture

31 May 2011 - 8:18 pm | तिमा

शेतकर्‍यांवर अन्याय होतोय असे सरसकट विधान करण्यापेक्षा, गरीब शेतकर्‍यावर अन्याय होतोय या देशात, असे म्हणणे जास्त योग्य वाटते. पण तरी त्याला 'हत्या करायला शीक' असे म्हणणे चुकीचे आहे असे वाटते. हिंसेने कुठला प्रश्न सुटला आहे आजवर ? वर पेशव्यांनी म्हटल्याप्रमाणे, नीतिमत्ता हा प्रकार बहुसंख्य भारतीयांच्या शब्दकोशातून गेला आहे.
ज्याला शक्य आहे तो दुसर्‍याला जमेल तेवढे लुटत आहे.
सत्ताधारी सरकारी खजिन्यावर आणि मालमत्तेवर डल्ला मारत आहेत. सरकारी अधिकारी जनतेच्या खिशात हात घालत आहेत. उद्योजक जास्त नफा कमवत आहेत कारण त्यांनाही कुठेनाकुठे खिरापत वाटावीच लागते. सामान्य जनता देखील भोळीसांब राहिलेली नाही. ज्यांना शक्य आहे ते हात मारतातच. खरे प्रामाणिक अगदी अल्पसंख्य उरले आहेत आणि त्यांचे मात्र या देशात खरे हाल चालले आहेत, मग ते खेड्यात रहात असोत वा शहरात.

मुटेसाहेब पहिल्यांदा आपलं अभिनंदन.

ह्या लेखामागील परिस्थितीचं भीषण गांभीर्य फार जवळुन बघितलं असल्यानं अक्षरशः वाक्यावाक्याशी सहमत. एकुणच जगात जिकडे जावं तिकडे प्रत्येक एथिनिसिटीचे मानवजातीला हेच (उलट अर्थाने) योगदान आहे. आपल्याच लोकांना साम, दाम, दंड अथवा भेद करुन वापरुन घ्यायचं आणि नंतर होणार्‍या परिणामांपासुन हात झटकायचे. मग ते आफ्रिकन लोक असु देत की जे आपल्याच लोकांचं नृशंस हत्याकांड करतात किंवा आपले लातुर, बीड भागातले धनदांडगे असोत की जे अशी सिस्टीम बसवतात की त्यामुळे आपल्याच गोरगरीब शेतकर्‍यांना शेवटी लुटुन, त्यांच्या परिस्थीतीचा फायदा घेऊन आत्महत्या करायला प्रवृत्त करतात.

यामुळं एक मात्र होणार नक्की. आज हे पोळलेले लोक जेव्हा हातात चाकु सुरे,छोटी छोटी शस्त्रं घेऊन निघतील (किंवा निघतात) तेव्हा सामान्य माणसांचे अक्षरशः मुडदे पडतात. म्हणुन कदाचित शहरातला शिकला सवरलेला एखादा आपापला मार्ग शोधतो आणि ह्या सगळ्या परिस्थितीला एका परीसिमेपलिकडे विटुन भारताबाहेर आपला मार्ग शोधतो. त्यात त्यांच काय चुकलं? सगळंच छान किंवा नीट असेल तर कोण बाहेर निघेल...

- वाटाड्या...

अविनाशकुलकर्णी's picture

1 Jun 2011 - 12:12 am | अविनाशकुलकर्णी

जो मनुष्य निव्वळ शेतीच करतो, त्याला असनारे सर्व खर्च हे शेतीचेच मानावे लागेल.
उदा. त्याचे जेवणे, त्याचे राहणे, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कामानिमित्त होणारे प्रवासखर्च, आरोग्य-दवाखाना, हे सर्व खर्च शेतीचेच आहेत.
उद्योग, व्यापार, नोकरी मध्ये सुद्धा असाच हिशेब केला जातो.
कामगाराला - कर्मचार्‍याला मिळणारे पगार सुद्धा याच हिशेबाने निश्चित केले जातात.

+१११११११११११११११११११११११

अगदी बरोबर..

<<पण दुर्दैव हे की, बळीराजाला पाताळात गाडल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व व्यवस्थांमध्ये शेतकरी केंद्रस्थानी कधीच नव्हता. त्याला कधी शूद्र म्हणून हीनतेची वागणूक दिली तर कधी औद्योगीकरणाच्या उत्कर्षासाठी कच्चा माल म्हणून त्याची पिळवणूक केली गेली. पण हे आता थांबायला हवे.>>

मुटेजी,
सगळा लेख पटण्यासारखा झाला आहे, पण वरील ओळी खटकल्या.

बळीराजाला पाताळात गाडले, असल्या भाकड पुराणकथांना इतिहास मानायला लागलात तर तुमच्याही डोळ्यावर पूर्वग्रहांचा चष्मा चढेल आणि हा चष्मा लवकरच जातीयवादी रंग धारण करतो, हे लक्षात असू द्या.

भारत हा अगदी आजही कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक पशुधन असणारा देश भारत आहे. इथल्या सामाजिक व्यवस्थेत शेतकरीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. स्वयंपूर्ण खेड्यातील बलुतेदारी व व्यवसाय शेतकर्‍याच्या गरजेतून निर्माण झाले आहेत आणि या सेवादात्यांचा पोशिंदा शेतकरीच राहिला आहे. वस्तू/सेवा यांच्या विनिमयात या शेतकर्‍याने पिकवलेले धान्यच चलनाची भूमिका बजावत होते.

परकी आक्रमणापासून या देशाचे रक्षण करण्यासाठी इथल्या शेतकर्‍यांनीच वेळप्रसंगी शस्त्र हाती घेतले आहे. मराठा, शीख आणि जाट या शेतकर्‍यांचा इतिहास वाचला तर त्यात समानता आढळते. मराठ्यांचा इतिहास पाहिला तर ते शेतकर्‍यांचेच सैन्य होते. आठ महिने मुलूखगिरी आणि पावसाळ्याचे चार महिने शेतीच्या कामासाठी अशी सरळसोट वाटणी होती. घरटी एक तरुण शिपाईगिरीत असला तरी उरलेले कुटूंब शेतीतच राबत असे. शेतकर्‍यांनी धान्य पिकवले आणि पुरवले नसते तर समाजच चालला नसता. त्यामुळे शेतकरी केंद्रस्थानी नव्हता, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

भारतातील बळीराजाला खरे मातीत गाडले ते ब्रिटीशांनी आणि औद्योगिकरणाने. स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था मोडून लोक रोजगारासाठी शहरांकडे आणि कारखान्यांकडे धाऊ लागले तेव्हा 'उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती' ही नवी म्हण रुढ झाली.शेतकर्‍याची परवड थांबायला हवी हे खरेच, पण त्यासाठी व्यावहारिक/विज्ञानवादी विचार नको का करायला?

गंगाधर मुटे's picture

1 Jun 2011 - 4:24 pm | गंगाधर मुटे

योगप्रभुजी,
भुमीकन्या म्हटले की जसे एकमेव नाव सीतेचे येते,
तसेच
शेतकर्‍यांचा राजा म्हटले की एकमेव बळीराजाचे नाव येते, नुसतेच नाव येत नाही तर अजूनही शेतकरी महिला "इडापिडा टळो बळीचे राज्य येवो" असेच म्हणतात. अर्थात बळीराजा हा शेतकर्‍यांचे हित जोपासणारा एकमेव राजा होऊन गेला, याला आम शेतकरी समाजात मान्यता आहे.

त्यात जातीयवादी रंग येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

...............
शेतकरी केंद्रस्थानी होता हे सांगायला तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत, त्यात आणखी भर घालता येईल.
पुढार्‍याच्या भाषणामध्ये शेतकरी केंद्रस्थानी असतो.
अन्नधान्य पिकविण्यामध्ये शेतकरी केंद्रस्थानी असतो.
पण
अर्थसंकल्पिय तरतुदीत शेतकरी केंद्रस्थानी असतो.?
शैक्षणिक व्यवस्थेत शेतकरी केंद्रस्थानी असतो.?
संसदेच्या नियोजनात्मक धोरणामध्ये शेतकरी केंद्रस्थानी असतो.?
.............
व्यावहारिक/विज्ञानवादी विचार म्हणजे नेमके काय?

योगप्रभू's picture

1 Jun 2011 - 6:44 pm | योगप्रभू

बळीचे महत्त्व फक्त शेतकर्‍यांना आहे आणि इतरांना नाही, अशी विभागणी करणे हेच चुकीचे आहे.
आपण सगळेच दिपावलीला बळीप्रतिपदा साजरी करतो ती कशासाठी?

आपले सण, प्रथा, संगीत अशा अनेक गोष्टी कृषीसंस्कृतीच्या अनुषंगानेच विकसित झाले आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्वीपासून केंद्रस्थानीच होता. औद्योगिक क्रांती, ब्रिटीशांची शेतकरीविरोधी धोरणे आणि स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्थेची मोडतोड यामुळे शेतकरी वर्ग दुय्यम ठरला, एवढेच मी नमूद केले. (आज शेतकर्‍यांना मातीत घालण्याचे काम आपलेच लोक करत आहेत, ते वेगळेच)

व्यावहारिक विचार = शेती हा व्यवसाय/उद्योग समजून चालवणे. व्यवसायातील जोखमीचा आणि परताव्याचा (रिस्क अँड रिटर्न्स) काटेकोर विचार करणे.

विज्ञानवादी विचार = जो शेतीला प्रयोगशाळा मानतो त्याला विज्ञानवादी विचार म्हणजे काय, हे समजाऊन सांगण्याची गरज नाही. 'आले देवाजीच्या मना' म्हणत हतबल होऊन बसण्यापेक्षा पाण्याचे/जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे, परदेशात कोणते अत्याधुनिक तंत्र विकसित होत आहे, त्यावर लक्ष ठेवणे, स्वदेशी तंत्रज्ञान आणि कृषिउपकरणे निरंतर विकसित करणे यासारख्या गोष्टी विज्ञानवादी विचारसरणीत मोडतात.

काटेकोर विचार
योगप्रभूंशी प्रचंड सहमत.
आज आपल्याकडचा शेतकरी हा विकसीत तंत्रज्ञानापासून बराच लांब आहे.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटेकोर विचार अत्यंत आवश्यक आहे.
सुधारीत तंत्रज्ञानाची आवश्यकता फक्त शेतीलाच नाही तर सगळ्या क्षेत्रात आवश्यक असते.
सगळेचजण ज्ञानवर्धनाचा प्रयत्न करत असतात. शेतकरी बांधवांनीही तो करणे जरूरीचे आहे.
मुटेसाहेब,
तुमच्या लेखनाने वाईट वाटते. सर्वसामान्य जनतेने शेतकर्‍यांचे प्रचंड वाईट काही चिंतलेले नाही.
शेवटी ज्याच्यात्याच्या क्षेत्रातल्या सुधारणा ज्या त्या माणसालाच कराव्या लागतात.
हिंसा, हत्या असले शब्द वाचून शे दोनशे मुडदे पडतीलही पण त्याने शेतकर्‍यांचे प्रश्न सुटणार आहेत काय?
विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन न बाळगणे तसेच राजकीय पक्षांची या बाबतीतली उदासीन वृत्ती याला सामान्य जनता जबाबदार कशी?

गंगाधर मुटे's picture

7 Jun 2011 - 9:46 am | गंगाधर मुटे

<<< बळीचे महत्त्व फक्त शेतकर्‍यांना आहे आणि इतरांना नाही, अशी विभागणी करणे हेच चुकीचे आहे.>>>
अशी विभागणी मी केलेली नाही. "इडापिडा टळो बळीचे राज्य येवो" असे शेतकरी महिला म्हणत असतील आणि इतर महिला (कदाचित) म्हणत नसतील तर तो काय माझा दोष आहे. :D
आणि सर्वच महिला तशाच म्हणत असतील तर विभागणी करणे या म्हणणाला अर्थच उरत नाही.

बळीचे महत्व आम्हालाही आहे असे म्हणायचे आणि त्याला पाताळात गाडणार्‍या वामनाचीही भक्तीभावाने पूजा करायची, या दोन्ही भूमिका एकत्र कशा काय नांदू शकतात?

<<< आपण सगळेच दिपावलीला बळीप्रतिपदा साजरी करतो ती कशासाठी? >>>
बहूतेक बळीराजाचा नि:पात केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी.

<<< व्यावहारिक विचार = शेती हा व्यवसाय/उद्योग समजून चालवणे. व्यवसायातील जोखमीचा आणि परताव्याचा (रिस्क अँड रिटर्न्स) काटेकोर विचार करणे.
विज्ञानवादी विचार = जो शेतीला प्रयोगशाळा मानतो त्याला विज्ञानवादी विचार म्हणजे काय, हे समजाऊन सांगण्याची गरज नाही. 'आले देवाजीच्या मना' म्हणत हतबल होऊन बसण्यापेक्षा पाण्याचे/जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे, परदेशात कोणते अत्याधुनिक तंत्र विकसित होत आहे, त्यावर लक्ष ठेवणे, स्वदेशी तंत्रज्ञान आणि कृषिउपकरणे निरंतर विकसित करणे यासारख्या गोष्टी विज्ञानवादी विचारसरणीत मोडतात. >>>

शेतकरी हे सर्व करतच नाही, त्याला अशा तर्‍हेचा विचार करताच येत नाही. सत्तर कोटीपेक्षा जास्त शेतकरी केवळ बेअक्कल आणि मुर्ख आहे. त्यांना नवे तंत्रज्ञान समजत नाही.

अशा तर्‍हेचे गृहितक गृहित धरले तर तुम्ही म्हणता हे बरोबर ठरते.

पुराणकथांचा अन्वयार्थ कसा लावायचा, यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल, पण अशा कथांच्या उजेडात आजचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, हेही तितकेच खरे.

पुराणांत काय सांगितले आहे त्यापेक्षा विज्ञान काय सांगते त्याकडे लक्ष द्या ना. त्यातून पुन्हा पुन्हा बळी आणि वामन हाच विषय चघळायचा असेल तर एका प्रश्नाचे उत्तर द्या. बळी हा दानव होता आणि वामनाच्या रुपात आलेला विष्णू हा देव होता. त्यांच्यातील संघर्ष/राजकारणाशी आपला खरोखर संबंध आहे का? आपण तर या दोन्ही वर्गात न मोडणारे मर्त्य मानव आहोत. इडापीडा टळो आणि बळीचे राज्य येओ, असे म्हणून ना तो बळी येणार आहे आणि 'संभवामि युगे युगे'चा दाखला देत तो विष्णू येणार आहे. मानवाचे प्रश्न मानवालाच सोडवायचे आहेत. इतके तरी मान्य करणार का? की बळी केव्हा जन्म घेणार आणि शेतकर्‍यांची इडापीडा टळणार याची वाट बघत बसणार?

बळीचे महत्त्व आम्हाला आहे म्हणून वामनाची पूजाही भक्तीभावाने करायची, या दोन्ही भूमिका एकत्र कशा नांदू शकतात? या प्रश्नाला उत्तर इतकेच आहे, की भारतीय पुराणांत असे अनेक दाखले आढळतात. देव असुरांचा वध करताना त्या असुराने आपल्या कृत्याची क्षमा मागून आपली स्मृती राहावी, अशी मागणी केलेली आढळते. महिषासुराचा वध केल्यावर त्याने देवीकडे हेच वरदान मागितले होते. त्रिपुरासुराचा वध शंकराने केल्यावर त्यानेही हेच मागणे मागितले होते. नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केल्यावर त्याने हेच मागणे मागितले होते. बळीचा वामनाने वध केलेला नाही. त्याला पाताळाच्या राज्याचे अधिपत्य दिले आहे. पण जाताना त्याने हेच मागणे मागितले आहे. आपले काही सण हे देवांचा (सुष्ट) दानवांवर (दुष्ट) विजय म्हणूनच साजरे केले जातात. त्यामुळे हे दिवस त्रिपुरी पौर्णिमा, नरक चतुर्दशी, बळीप्रतिपदा, विजयादशमी म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतीय संस्कृती ही सम्यक आहे म्हणूनच तिने पराभूतालाही आदर दिला आहे. याचे उदाहरण बघा. रामाने रावणाचा वध केला. आपण दसर्‍याला रावणाचा पुतळा जाळतो. सूडाच्या भरात दुसर्‍याच्या पत्नीचे हरण करणे, अहंकार व उन्मत्तपणा, बळाचा गैरवापर या दुर्गुणामुळे रावणाने मृत्यू ओढवून घेतला, पण त्याच्या चांगल्या बाजूही याच पुराणांत नोंदवल्या आहेत. रावण वेदज्ञानी ब्राह्मण होता. वेद हे अपौरुषेय मानतात, पण रावणाने चक्क पाचव्या वेदाची निर्मिती केली होती. (हा संगीतविषयक उपवेद होता, ही बाब निराळी, पण वेदाची रचना करणे, हेच क्रांतिकारक होते.) रावण संगीताचा ज्ञानी होता. त्याने स्वतंत्र वीणा तयार केली होती. युद्धात सैनिकांच्या जखमा त्वरित भरतील, असे मलम रावणाने शोधले होते. रावण हा उत्तम राजनीतिज्ञ होता. रावण मरणासन्न असताना रामाने लक्ष्मणाला रावणाकडे जाऊन राजनीती शिकायला सांगितले होते आणि रावणाने ती शिकवलीसुद्धा.

असो. तुम्हाला पुराण सांगत बसणे हा माझा उद्देश नाही. मी पुराणकथांकडे इतिहास म्हणून न बघता मनोरंजन म्हणून बघतो. म्हणून त्याबाबतची चर्चाही मर्यादित ठेवतो.

शेतकर्‍याना कुणी काही शहाणपणाचे सांगितले तर त्यांची संभावना उंटावरचे शहाणे म्हणून करायची किंवा ७० कोटी शेतकरी बेअक्कल आहेत का? असे विचारायचे यातून फाजील अभिमान दिसून येतो. भारतीयांच्या मागासलेपणात 'व्यवस्थापनाचा अभाव' हा एक दुर्गुण आहे. ते वास्तव आहे. त्याचा राग कशाला यायला हवा? बळी आणि वामनाच्या तद्दन निरुपयोगी कथांपेक्षा शेतकर्‍यांनी जॉर्ज कार्व्हर, डॉ. पांडुरंग खानखोजे, डॉ. स्वामिनाथन, डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची प्रेरणादायी चरित्रे आणि उपदेश वाचावा. इस्राईलच्या शेतकर्‍यांनी वाळवंटात नंदनवन कसे फुलवले. त्याचे प्रयोग वाचावेत. सेंद्रीय शेतीचे महत्त्व जाणून घ्यावे, जमीन खोल न नांगरता सुंदर पीक कसे घेता येते, याचे जपानी शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग वाचावेत. मातीविना शेती, हा काय प्रकार आहे, याची माहिती घ्यावी. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व समजून घ्यावे. हरितगृह ही प्रयोगशाळा करावी.

७० कोटींहून अधिक शेतकर्‍यांनी हे सगळे करुन बघितले असेल तर मग जगच आपल्यापेक्षा मागे आहे, असे म्हणावे का?

गंगाधर मुटे's picture

7 Jun 2011 - 5:53 pm | गंगाधर मुटे

<<< अरेरे! मला तुम्ही अभ्यासक आहात असे वाटले होते.>>>
तुम्हाला चुकिचे वाटले होते. मी शेतीतज्ज्ञ, महान,थोर,महात्मा किंवा अभ्यासक यापैकी काहीच नाही.
मला शेती करताना काही प्रश्न पडलेत त्याचे केवळ उत्तर शोधायचा प्रयत्न करणारा एक साधासुधा शेतकरी आहे. आणि दुर्दैवाने तेच मिळत नाही. मुळ मुद्द्याला बगल देऊन अवांतर खूप काही सांगणारेच मला भेटतात.

मी केव़ळ बळी आणि वामन एवढेच म्हटले कारण त्यांचा संबध शेतीशी आढळला. बळीचे राज्य शेतकर्‍याच्या हिताचे होते, असा एक पारंपारिक समज आहे म्हणून. आणि तुम्ही मला थेट पुराणशास्त्रामध्ये घेऊन गेलेत.

माझा मुळ मुद्दा "बळीराजाला पाताळात गाडल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व व्यवस्थांमध्ये शेतकरी केंद्रस्थानी कधीच नव्हता. त्याला कधी शूद्र म्हणून हीनतेची वागणूक दिली तर कधी औद्योगीकरणाच्या उत्कर्षासाठी कच्चा माल म्हणून त्याची पिळवणूक केली गेली." असा आहे.

बळीराज्याच्या पतनानंतर आजतागायतच्या काळापर्यंत अशी कुणाची/कोणती राज्यव्यवस्था आणि राज्यकारभार होता की त्या व्यवस्थेमध्ये शेतीव्यवसाय प्रथमस्थानी माणून त्यानुरूप त्या राज्याची धोरणे आखली गेलीत. असा कोणता राजा/सुलतान होऊन गेला की त्याने शेतीव्यवसायाच्या उत्थानासाठी त्या राज्याची ७०/८० टक्के तिजोरी खर्च केली?
ही उत्तरे मात्र अनुत्तरीतच राहिली.

<<<७० कोटींहून अधिक शेतकर्‍यांनी हे सगळे करुन बघितले असेल तर मग जगच आपल्यापेक्षा मागे आहे, असे म्हणावे का?>>>

याचे उत्तर होय असे आहे. शेतीमध्ये खूप कर्तुत्वमान/कर्तबगार माणसे आहेत. त्यांनी घेतलेली झेपही दैदिप्यमान आहे. आयुष्यपणाला लावून मातीतून सोने पिकविणारेही आहेत. जेथे १० किलो पिकत नव्हते तेथे १०० क्विंटल पिकविणारेही आहेत. पण कष्टाने मिळविलेल्या शेतीउत्पादनाची या देशात माती होते म्हणून त्यांची माती झाली, आणि होत असते.

आणि त्यापेक्षाही कर्तबगारी/श्रेष्टत्व शोधताना ते विदेशी माणसातच शोधायची या देशातल्या काही लोकांना फाजिल सवय जडली आहे त्यामुळे त्यांना भारतीय मनुष्य मागासला आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे.

मुटेसाहेब,
मी वर दिलेला प्रतिसाद बारकाईने वाचणार का?

ब्रिटीश येण्यापूर्वी भारतात जेव्हा स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था होती तेव्हा शेतकरी हा घटक कायम केंद्रस्थानी होता. गावातील बलुतेदारी ही शेतकर्‍याला सेवा पुरवण्यातून विकसित झालेली आहे. शेतकरी जे धान्य पिकवत असे तेच सामान्य पातळीवर विनिमयाचे साधन म्हणून वापरले जात असे. एक उदाहरण बघा. गावातील न्हाव्याने सर्वांची हजामत करावी. त्या बदल्यात त्याला घरप्रपंच चालवण्यासाठी अमुक एक खंडी धान्य गावातर्फे दिले जात असे. अगदी पुजारी, भिक्षुक, वैद्य यांची सेवा घेतली तरी त्यांना मोबदला धान्य रुपात दिला जात असे. तीच बाब लोहार, शिंपी, सुतार, राखणदार अशा बलुतेदारांची. ही सिस्टिम गावाने स्वीकारली होती.

शेतकर्‍याला शूद्राचे जीवन जगावे लागले, हे बरोबर वाटत नाही. आपल्या देशावर परकी आक्रमण झाल्यावर याच शेतकर्‍यांनी नांगर सोडून तलवार हाती घेतली आहे. मराठा सैन्यात घरटी एक जवान पोरगा लष्करात असे आणि उर्वरित कुटूंब शेतीवर गुजराण करत असे. ( शीख व जाटांमध्येही हेच दिसून येते). आपले राज्यकर्ते शेतकर्‍यांकडे सहानुभूतीने बघत. शिवाजी महाराजांचे राज्यच शेतकर्‍यांच्या कल्याणाचे होते. विजयनगरच्या सम्राटांनी शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी कालवे खणून त्यांचे जाळे पसरवण्याकडे लक्ष दिले. दादोजी कोंडदेवाने तर दुष्काळ आणि कमी पीक येण्याच्या वर्षांपुरता सारा माफ केला होता. ज्यावर्षी धान्य महामूर येईल त्यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या खुशीने सरकारला धान्याच्या रुपात थकबाकी द्यावी, असा प्रघात पाडला होता. शिवाजीच्या राज्यात गरीब शेतकर्‍याला बैलजोडी आणि नांगर सरकारातून मोफत दिला जाई. शेतकर्‍यांना महत्त्व देण्यातूनच शिवाजी राजांनी अमात्य अण्णाजी दत्तो यांच्याकरवी धारावसुलीची सुटसुटीत पद्धत विकसित केली होती.

ब्रिटीश येण्यापूर्वी गावात कुणाही शेतकर्‍याला मनमानीने स्वतःची जमीन बाहेरच्या व्यक्तीला विकता येत नसे. जमीन विकायची झाल्यास गावाची (पंचमंडळींची) संमती गरजेची असे. ब्रिटीशांनी ही व्यवस्था मोडली. जे व्यवहार नैतिकतेवर चालत त्याऐवजी कागदाला महत्त्व आले. कलेक्टर हा सारावसुली अधिकारी महत्त्वाचा ठरला. गावातील पाटील-कुलकर्णी हे अधिकारी प्रभावहीन झाले.सावकारांचे फावले आणि त्यांनी कागदी पुरावे कलेक्टरला दाखवून जमिनी लंपास करण्यास सुरवात केली. ब्रिटीशांचे शेतकरीविरोधी कायदे व सावकारांचा जाच यातून १८७२ साली मुंबई प्रांतात 'सावकारविरोधी दंगा' झाला.

ब्रिटीशांनी आपल्या अमलाखालील शहरांचे महत्त्व वाढवण्यास प्राधान्य दिले. औद्योगिक क्रांतीमुळे कारखान्यात काम करणारा कामगारवर्ग उदयाला आला. इथे शेतकरी या घटकाचे महत्त्व प्रथम कमी झाले. अनेक लोक शहरांकडे वळू लागले (आजही तो ओघ सुरुच आहे.) आजही आपल्याकडचे 'काळे इंग्रज' शेतकर्‍यांच्या जमिनी हडप करण्याचे उद्योग करतच आहेत.

शेतकर्‍यांचा विकास हा अनेक पैलू आणि संदर्भ असणारा विषय आहे. हा गुंता विचारपूर्वकच सोडवावा लागेल. 'हत्या करायला शीक' म्हणणे सोपे आहे. पण हत्या कुणाची करणार?

योगप्रभूसाहेब,
माझा मुद्दा काय आहे, मला नेमके काय म्हणायचे आहे ते बारकाईने समजून घेणार काय?

माझा मुळ मुद्दा बळीराज्याच्या पतनानंतर निर्माण झालेल्या राज्यकर्त्या यंत्रणेच्या धोरणात्मक निर्णयामध्ये किंवा त्या त्या राज्याच्या एकूण खर्चाच्या बजेटमध्ये शेतकरी केंद्रस्थानी नव्हता असा आहे.
याउलट प्रत्येक व्यवस्थेमध्ये- अगदी डाकूंच्या टोळ्यांनीसुद्धा- शेती आणि शेतकर्‍याकडे महसूल देणारी दुभती गाय म्हणूनच पाहिल्याच्या इतिहासात नोंदी आढळतात.
शेतकर्‍यांकडून गाढाभर लुटायचं आणि त्यातूनच मुठभर त्याच्या पदरात घालायचं-वरून उपकार केल्याचा आभास निर्माण करायचा- हेच सदासर्वकाळ चालत आलेय ना? आजही तेच चालतेय ना?
याचा अर्थ लुटण्यासाठी शेतकर्‍याला केंद्रबिंदू मानले गेले, असाही काढता येईल.

पण तुम्ही शेतकरी केंद्रस्थानीच आहे, हे ठासवण्यासाठी जी उदाहरणे ठेवलीत त्याने माझे समाधान होऊ शकत नाही कारण...

<<<आपल्या देशावर परकी आक्रमण झाल्यावर याच शेतकर्‍यांनी नांगर सोडून तलवार हाती घेतली आहे. मराठा सैन्यात घरटी एक जवान पोरगा लष्करात असे >>>

म्हणजे मरण्यासाठीच ना? कदाचित जिंकल्यानंतर सत्ताप्राप्तीत, धोरणात्मक निर्णयात किंवा पदे भोगण्यात तो नव्हताच ना?
उर्वरित कुटूंब शेतीवर गुजराण करत असे, असे तुम्ही म्हणताय म्हणजे त्याला मोबदला सुद्दा एवढा अत्यल्प दिला जात असावा की त्यामुळे संपूर्ण कुटूंबाची गुजराण सुद्धा होत नसावी.

शिवाजी राजे शेतकर्‍यांचे राजे होते, हे मीही मानतो. पण त्याला जनमान्यता कुठे आहे? ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते एवढीच त्यांची दखल इतिहासाने घेतलीय ना?

'हत्या करायला शीक' हे म्हणणे वाईटच आहे. हिंसेने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत, उलट प्रश्नांची मालिका वाढत जाते, हेही सत्य आहे.
मी आजवर एखादी मुंगी जाणिवपूर्वक मारण्याइतपतही हिंसा केलेली नाही. भविष्यात करण्याची शक्यता दिसत नाही.
मला व्यक्तिगत पातळीवर कोणी हिंसा करावी का? असे विचारले तर मी होकारार्थी उत्तर किंवा प्रोत्साहन देऊ शकणार नाही.
पण एक लक्षात घ्या...
हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात पण राजसत्तेला घाम फुटलेला नाही.
पण आत्महत्या करून मरणार्‍या हजारो शेतकर्‍यापैकी एखादा शेतकरी जरी 'विक्षिप्त' असता आणि त्याने स्वतः तर मरायचे आहेच मग सोबत पाचपंचेविस जनांना घेउन का मरू नये असा विचार केला असता तर राजसत्तेसह सारा देश हादरला असता, हे खोटे आहे काय?
जरा थोडासा विचार असाही करा.

पण हत्या कुणाची करणार? याची चिंता आपण करून उपयोगाचे नाही. ज्याच्यावर आत्महत्या करायची वेळ येते त्याला त्याच्यावर आत्महत्त्या करायची वेळ कुणी आणली याचीही पक्की जाणिव असते.

आणि तरीही मी हिंसेचे समर्थन करीत नाही. फक्त एक बाजू मांडण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला.