थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी!
मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल? तिच्या सान्निध्यात लाभणारी ती मोरपिशी तुर्यावस्था, ते आसमानात मंदपणे विहरणं, ती निर्विकार शीतल समाधी, ती मनोवांछित मंजुळ शांतता अन् ते दुनियेच्या क्षितिजापार जाऊन आपल्या कोणे एके काळच्या प्रियेला मिठीत घेऊन हितगुज करायला लावणारी भावुक अवस्था... या गुजगोष्टी कोणाला तरी विसराव्याशा वाटतील का? किँवा कोणाला अशी प्रसन्न भावसमाधी मोडून जावेसे वाटेल?
ती जवळ आल्यावर शांतपणे त्याच त्या समेवर तरंगत रहावेसे वाटतेच ना? तिच्या प्राशनाने उमटणारा मोहक लाटांचा अंगभर गुदगुल्या करणारा स्पर्श हवा असतोच ना? या सर्वाँतच तिचं उन्मादक सौँदर्य लपलेलं असतं. म्हणून तर ती आपल्याला हवीहवीशी वाटत असते.
तिला अंजारत गोंजारत एक एक चुंबन देत घेत हळूहळू अंगभर चढवून घेण्यात जी मौज लाभते, ती एका दमात तिला ढसाढसा ओरबाडण्यात खचितच मिळत नाही.
आमच्या बैठकीतले परमस्नेही म्हणायचे एकदा का तिला उचलून ओठांत दाबली की रिकामी करेपर्यँत सोडायची नाही. आमच्यासह काहीँना हे लॉजिक काडीमात्र पटत नसे. गप्पा रंगतांना एकेका स्पर्शासह ती कशी अलवार रोमरोमात भिनत जाते याचा आगळाला अनुभव घेत आम्ही चार चार तास तरी तिला सोडत नसायचो. त्यावेळी आम्ही काही पक्के बेवडे नव्हतो, आजही नाही. पण कळीचं अलगद पाकळ्या उलगडून हळुवार फुलत जाणं आम्हांला भावायचं, आजही त्याच कृतीचे आम्ही भोक्ते आहोत. कळी अर्धवट फुलतांनाच खुडून टाकायची हे आम्हांस नामंजूर आहे.
आता आता तिचे बरेच आकार प्रकार उपलब्ध असतात. तरीही प्रत्येकाची खास आपली आवडती असतेच की! तिची नावं वेगवेगळी असली तरी जात मात्र एकच- मदिरा!
हरेक ब्रँडप्रमाणे तिचा अंमल कमी अधिक जाणवू शकतो इतकाच काय तो फरक.
स्कॉच कितीही महाग असली तरी फव्वारे उडविण्याच्याच लायकीची आहे. दोन खंबे जरी ओढले तरी तसूभरही फेकीत नाही. त्याउलट पाच रुपयांची खोपडी! एका ग्लासात उचलू उचलू फेकते, मग आपण कोठे धूळखात पडलो होतो याचा तपास रामप्रहरीच लागतो. इतका तिचा जालीम कार्यक्रम असतो.
व्हिस्की ब्रँडी किँवा रमचा सुगंध लपता लपत नाही. आपल्याला त्या सुवासिकतेची ओढ वाटत असली तरी सुवासिनीला आवडतेच असे नाही. अर्थात एकाच मेजावर सिक्टी नाईन्टी करुन रिचवणारी जोडपीदेखील दुनियेत आहेतच की!
परंतु या क्षेत्रात जो खरोखरच एकटा जीव सदाशिव असतो, किँवा ज्याला हे तिचं व्यसन झाकून ठेवायचं असतं त्यानं काही पथ्ये पाळायची असतात- तिला जास्त डोक्यावर चढवून घ्यायची नाही. यदाकदाचित जास्त झालीच तर व्यवस्थितपणे घर शोधता येईल इतकी उतरल्यावरच पाऊल उचलावे. तिच्या अंमलाखाली बेलगाम बोलू तर नयेच तसे वागूही नये. अन्यथा मार खाण्याजोगी परिस्थिती उद्भवून खाडकन् उतरल्याची नामुष्की येईल. काहीँचा अनुभव सांगतो की घरी जाण्यापूर्वी दोन चार क्लोरोमिँट किँवा एकशेवीस तीनशेचा बार धरावा. काही म्हणतात पेग तयार करतांना ढेकरा आणणाऱ्या थम्सअप सारख्या क्लोरीनेटेड कोल्डड्रिँक्स ऐवजी लिमका फायदेशीर ठरतो. ढेकर न आल्याने तिचं अस्तित्व इतरांना कळत नाही. काहीजण लिँबूपाण्याचा दि एन्ड पेग मारतात तर काहीजण पुदीनहरा गोळ्या पाण्यात पिळून सांगता करतात. ज्याच्या त्याच्या क्लृप्त्या ज्यानं त्यानं योजाव्यात.
तरीही शक्यतो व्होडका-जीन सारखी विगंधी सुरा नजिक ठेवावी. या दोघी गंधाच्या बाबतीत जवळ जवळ न्युट्रल असल्याने तिसरीच्या तोंडाला लागले तरी दोघीँचा सहवास उपभोगून आल्याची तिळमात्र शंका मिठीत असलेल्या तिसरीला येत नाही!
तुमची आवडती पट्टराणी कोणतीही असली तरी एक नियम ठेवायचाच, तिला एकेका घोटाने घोटीत जायचं. मग ती वाटीत निजलेली असो वा पाटीत. तिला जरा दमादमाने आत घेतले की अंगावरच्या घामाची चिँता उरत नाही. कामाची अनिवार ओढ मात्र लागते! अशा उत्साहाच्या वेळी नेमक्या 'कोणतीला' धरायचं हे समजण्या इतपत आपलं ध्यान 'ओक्के' असावं लागतं. नाहीतर आपण 'आऊट' झालो की घरवाली सुद्धा गेट दाखवून आऊट म्हणायला कचरणार नाही याचं भान असू द्या. बेभान होऊन जमेल का? तिला जर तुम्ही तिच्या अंगा अंगाने घेतलं तर ती अशी रंगेल की तुमचा रसभंग कदापि करणार नाही! तेव्हा जरा बेताचीच घ्या अन् घरी जाऊन 'सोताचीच' पहा!
प्रतिक्रिया
8 May 2011 - 7:28 am | गोगोल
की नुसतच ईकडच तिकडच ऐकून लिहित आहात?
> स्कॉच कितीही महाग असली तरी फव्वारे उडविण्याच्याच लायकीची आहे.
त्याला शॅम्पेन म्हणतात.
> दोन खंबे जरी ओढले तरी तसूभरही फेकीत नाही.
खरच?
एकदा दोन खम्बे ओढून दोन पायावर उभे राहून दाखवा.
> त्याउलट पाच रुपयांची खोपडी! एका ग्लासात उचलू उचलू फेकते, मग आपण कोठे धूळखात पडलो होतो याचा तपास रामप्रहरीच लागतो. इतका तिचा जालीम कार्यक्रम असतो.
कधी कधी तिचा कार्य्क्रम ईतका जालीम असतो की पुढे आयुष्यभर काहीच दिसत नाही.
8 May 2011 - 7:44 am | नरेशकुमार
व्हाईट्नर बद्दल काय ?
8 May 2011 - 3:30 pm | प्यारे१
आपला ब्रॅण्ड काय?
हलके घेणे ;)
9 May 2011 - 7:03 am | नरेशकुमार
I am unbranded.
बघा, मी घेतलं का नाही हलकं!