जवाहिरीचा खात्मा

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
6 May 2011 - 11:27 am

लादेनचा खात्मा झाला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आता कधी एकदा त्या नं. २ ला संपवतो असे झाले होते. त्यांनी लगेच सुरक्षा समितीची बैठक बोलावली. परत तीच युक्ति वापरता येणार नाही यावर एकमत झाले. मग पर्यायी उपायांचा विचार सुरु झाला. बाँबिंग, ड्रोन हल्ला, कमांडो हे सगळे मार्ग आता परिचयाचे झाले होते, त्यामुळे शत्रु आता जास्त सावध असणार हे नक्कीच होते. नवीन काय करावे याचा उहापोह सुरु झाला. सीआयए च्या प्रमुखाने सुचवले की याबाबत भारताची मदत घ्यावी. राष्ट्राध्यक्षांसह सर्वांनीच विरोध केला. आधीच ते एकमेकांचे शत्रु आहेत, असे काही केले तर युध्दच भडकेल असे सर्वांचे मत होते.त्यावर सीआयए प्रमुख म्हणाले, माझी योजना वेगळी आहे. भारतीय लष्कराची मदत घ्यायची नाही. भारतातल्या बॉलिवुडची मदत घ्यायची. सगळे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. प्रमुख म्हणाले, बॉलिवुड मधे जय आणि वीरु ही जोडी आहे, ते करतील हे काम! यावर एका सदस्याने विचारले, पण वीरु तर क्रिकेटमधला बेभरवशाचा फलंदाज आहे. दहातून एकवेळा चांगला खेळतो आणि इतर वेळेस प्रतिस्पर्धी संघाला कॅचिंग प्रॅक्टिस देत असतो.
तो वीरु नव्हे, हा शोलेतला वीरु. त्या दोघांना त्यांच्या पसंतीची टीम ठरवु दे, काम फत्ते होण्याची खात्रीच समजा. राष्ट्राध्यक्षांना यातले काहीच समजले नाही. ते त्यांना व्यवस्थित समजावून देण्यात आले. ठराव पक्का झाला. भारतीय नेत्यांना याची चाहूलही लागू न देता अमिताभ, धर्मेंद्र यांना गुप्त योजना सांगण्यात आली. त्यांनी जोडीला विनोद खन्ना, नीतू सिंग, हेमा वगैरे खास व्यक्तिंना निवडले.गुप्तपणे सर्वांना पाकिस्तानात पोचवण्यात आले.
तिथे पोचताच त्या सर्वांनी वेषांतर केले, त्यामुळे हिंदी सिनेमाचे प्रेक्षक सोडुन ते कुणालाही ओळखता येणार नाहीत याची खात्री झाली. आधी त्यांनी रस्त्यातून महारोग्यांचा वेश घालून गाणे म्हणत एक प्रभातफेरी काढली. त्यातल्या ढकलगाडीवर झाकून एक यंत्र ठेवले होते त्याकडे बसलेला धर्मेंद्र मधेमधे लक्ष ठेवून होता. थोड्याच वेळात त्या जादुई यंत्रामुळे त्यांना अल जवाहिरी कुठल्या बंगल्यात लपून रहात होता ते समजले. आणखी माहिती काढल्यावर जवाहिरीला गाणेबजावण्याचा शौक आहे आणि त्याच्या सालगिराहला त्याने मोठी पार्टी ठेवली आहे हे या सर्वांना समजले. अर्थातच त्या पार्टीला ज्या गाणार्‍या पार्टीला बोलावले होते त्यांच्या मुसक्या बांधुन त्याजागी हेच सर्व यशस्वी कलाकार कव्वाली म्हणायला गेले. नीतू व हेमाच्या नाचावर जय वीरु यांनी 'हम कातिलोंके कातिल है, सबका काम तमाम करने आये है' अशी अक्कडबाज कव्वाली म्हणायला सुरवात केली. जवाहिरी, त्याचे सहकारी आणि आयएसआयचे तमाम अधिकारी डोलू लागले. नाचता नाचता अनेक वेळा नीतू व हेमा जवाहिरीच्या अगदी जवळ जाउन खंजिर दाखवत होत्या तरी कोणालाच संशय येत नव्हता. तिकडे हे सगळे लाईव्ह बघणार्‍या अमेरिकन नेत्यांना हे काय चालले आहे हेच कळत नव्हते.
नाच संपत आलेला असताना कोणीतरी एक जवाहिरीच्या कानाशी कुजबुजून गेला. नाच संपताक्षणी या सर्व मंडळींच्या कानाशी बंदुका रोखल्या गेल्या. राष्ट्राध्यक्षांनी निराशेनी मान हलवली. जवाहिरी गडगडाटी हसला. तेवढ्यात हा समारंभ तिसर्‍या मजल्यावर चाललेला असताना सुध्दा हवेतून एक मोटरसायकलस्वार रोरावत टपकला आणि हा कोण हे समजण्याच्या आत हातातली पिस्तुले गरागरा फिरवत रजनीकांतने सगळ्यांच्या छातीचा वेध घेतला. तुफान गोळीबार दोन्हीकडून झाला पण आपल्या हिरोंपैकी कुणालाच गोळी लागली नाही. त्यांची माणसे मात्र गोळी लागण्याआधीच 'आ दगा' म्हणून पडत होती. शेवटी प्रकरण हातघाईवर आले. जवाहिरीला दोन्ही बाजूनी जय व वीरु गुद्दे मारु लागले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कावून म्हणाले, अरे पटकन गोळी घालायची सोडून हे हाताने मारामारी का करताहेत ? त्यावर सीआयए प्रमुख हंसून म्हणाले, ते असंच असतं , त्या दोघांचं समाधान झाल्याशिवाय हा खेळ संपणार नाही, शिवाय त्या साळिंदराला पण मनसोक्त मोटरसायकल चालवायची आहे. अमेरिकन नेते डोकं धरुन बसले. सर्वांचा धीर सुटत चालला होता. बाहेर वाट पहाणार्‍या हेलिकॉप्टरचालकांचा रक्तदाबही बर्‍यापैकी वाढला होता. पण शेवटी एकदाचे सर्व संपले आणि हेलिकॉप्टरमधून सगळ्यांनी यशस्वी पलायन केले. भारतीयांचे शौर्य बघून सार्‍या जगाचे डोळे दिपले!!!

कलानृत्यसंगीतकथासंस्कृतीमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

6 May 2011 - 12:01 pm | जयंत कुलकर्णी

//अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कावून म्हणाले, अरे पटकन गोळी घालायची सोडून हे हाताने मारामारी का करताहेत ? त्यावर सीआयए प्रमुख हंसून म्हणाले, ते असंच असतं , त्या दोघांचं समाधान झाल्याशिवाय हा खेळ संपणार नाही, शिवाय त्या साळिंदराला पण मनसोक्त मोटरसायकल चालवायची आहे////

हा हा हा :-)

स्वानन्द's picture

6 May 2011 - 12:14 pm | स्वानन्द

जवाहिरी ने हिरोंच्या आईला बांधून ठेवले नव्हते हे बघून जवाहिरी हा अमजद खान पेक्षा निर्बुद्ध होता असे स्पष्ट मत बनले आहे.

जयंत कुलकर्णी's picture

6 May 2011 - 12:38 pm | जयंत कुलकर्णी

//परत तीच युक्ति वापरता येणार नाही यावर एकमत झाले. मग पर्यायी उपायांचा विचार सुरु झाला. बाँबिंग, ड्रोन हल्ला, कमांडो हे सगळे मार्ग आता परिचयाचे झाले होते, त्यामुळे शत्रु आता जास्त सावध असणार हे नक्कीच होते. नवीन काय करावे याचा उहापोह सुरु झाला. सीआयए च्या प्रमुखाने सुचवले की याबाबत भारताची मदत घ्यावी. राष्ट्राध्यक्षांसह सर्वांनीच विरोध केला. आधीच ते एकमेकांचे शत्रु आहेत, असे काही केले तर युध्दच भडकेल असे सर्वांचे मत होते.//

मला वाटते त्यांना जवाहिरीला हसवून हसवून मारायचे असेल. पण शेवटी तोही हसायचा थांबल्यावर शेवटी त्याला गोळ्या घातल्या असाव्यात. !

नरेशकुमार's picture

6 May 2011 - 1:34 pm | नरेशकुमार

जवाहिरच्या लोकांनी कितितरि वेळा जय आनि विरुला गोळ्या मारल्या पन त्यांनि त्या इकडे-तिकडे उड्या माउन चुकविल्या. पन जय विरुचि एकेक गोळि शत्रुंचा वेध घेत होति. काय तो निशाना. काय वर्नावे.
आजु बाजुला ड्रम वगेरे ठेवलेले होते, आनि त्यावरुन जय विरु सर्कस सुद्धा करुन दाखवित होते. एकाच तिकिटात पिच्चर आन सर्कस. हाय का नाय मज्जा.

लेखन एकदम कडक. तुफान हास्याचा फवारा !

नरेशकुमार's picture

6 May 2011 - 1:35 pm | नरेशकुमार

जवाहिरच्या लोकांनी कितितरि वेळा जय आनि विरुला गोळ्या मारल्या पन त्यांनि त्या इकडे-तिकडे उड्या माउन चुकविल्या. पन जय विरुचि एकेक गोळि शत्रुंचा वेध घेत होति. काय तो निशाना. काय वर्नावे.
आजु बाजुला ड्रम वगेरे ठेवलेले होते, आनि त्यावरुन जय विरु सर्कस सुद्धा करुन दाखवित होते. एकाच तिकिटात पिच्चर आन सर्कस. हाय का नाय मज्जा.

लेखन एकदम कडक. तुफान हास्याचा फवारा !

llपुण्याचे पेशवेll's picture

6 May 2011 - 1:37 pm | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.. मस्तंच. :)

नगरीनिरंजन's picture

6 May 2011 - 2:03 pm | नगरीनिरंजन

मस्त!

डावखुरा's picture

6 May 2011 - 4:33 pm | डावखुरा

तुमच्या नावाचा सद्उपयोग झालाय...
ओसामामुळे तवा गरम असतानाच ...जवाहिरीच्या खातम्याची बातमी येक्दम सिरियस मूड मध्ये उघडुन वाचायला बसलो पण लेखकाचे नाव वाचायचे राहुन गेले होते....
भारताची मदत घेउ तिथपर्यंत बातमी सीरीयसली वाचली हो...
भारी....येकदम झकास...
जवाहिरी चा मेल आयडी असेल तर द्या हो पाथवुन त्याला.....स्साला परत कधी भारताकडे तिरपी नजर करुन पाह्यचा नाय....
सलाम बॉलिवूड..सलाम फँटसीवीर 'ति..मा..'

जयंत कुलकर्णी's picture

6 May 2011 - 4:47 pm | जयंत कुलकर्णी

// थोड्याच वेळात त्या जादुई यंत्रामुळे त्यांना अल जवाहिरी कुठल्या बंगल्यात लपून रहात होता ते सम////

हे मात्र चुकले हा !

त्यांनी बोटे पसरून एकदम "दे दे देदे जवाहिरी के नाम दे दे" असे गाणे म्हटल्यावर एका खिडकीतून एक डॉलर पडल्यावर त्यांनी ओळखले की तेथेच तो रहात असणार.

खरच अजून हसू येते आहे. हा लेख मित्रांना पाठवायला परवानगी आहे का ?

तिमा's picture

7 May 2011 - 11:11 am | तिमा

जयंतराव,

जरुर पाठवा मित्रांना. सर्व वाचकांस धन्यवाद.

प्रास's picture

6 May 2011 - 5:34 pm | प्रास

.... हसून हसून मेलो! :-D

तिरसिंगराव, धमाल हिन्दी सिनेमाची पटकथा भारी लिहाल तुम्ही....

(नव्या चित्रपटाची जुळवाजुळव करावी म्हणतो ;-))

विनायक बेलापुरे's picture

6 May 2011 - 5:50 pm | विनायक बेलापुरे

बंगला कम गोदामातील ड्र्म , बॅरल्स, टांगलेले दोर , ट्रकची टायरे , मुक्री, जीवन, टकलू शेट्टी, शाकाल वगैरे राहून गेले.

आनंदयात्री's picture

6 May 2011 - 6:23 pm | आनंदयात्री

उपहासात्मक लेख चांगला झाला आहे. काही वाक्यांवर हसायला देखिल आले. बहुदा घरात कोणीतरी बळजबरी हिंदी पिक्चर पहायला लावलाय .. ;)

माझीही शॅम्पेन's picture

6 May 2011 - 11:27 pm | माझीही शॅम्पेन

फुटलो :) अजुन यवद्यात , पार्ट २ काढून दाऊद ला सम्पवा !

त्यांच्यासोबत, बादल, धन्नो, अल्लारखा सारखे कोणी प्राणी-पक्षी नव्हते का?

ज्ञानेश...'s picture

7 May 2011 - 12:36 am | ज्ञानेश...

"शिवाय त्या साळिंदराला पण मनसोक्त मोटरसायकल चालवायची आहे..."

=))

मी अशा सिनेमांना फार मिस करतो सध्या.
लिखाण एक नंबर्स ! :)

किशोरअहिरे's picture

7 May 2011 - 12:44 am | किशोरअहिरे

अशक्य हसलो :)
लै भारी

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2011 - 6:23 am | निनाद मुक्काम प...

पण ह्यात कथेत जय हा स्वतःच्या प्राणाची आहुती विरूसाठी का देत नाही? .( त्याग ,समर्पण , ) ह्या भावना कथेत नाहीत तुम्ही जोहर सारखा सुखद शेवट केला आहे .तरीही हसलो .
पण सी आय ए प्रमुखाने रेम्बो किंवा ब्रिटीश जेम्स बॉंड ला का बरे जवहारी ची सुपारी दिली नाही .त्यांना शत्रूंच्या गोळ्याच काय क्षेपणास्त्रे सुद्धा लागत नाहीत .
गेला बाजारभाव केलीफोर्नियाचे गवर्नर. आमचे लाडके कमांडो .ह्यांना बरे पाचारण केले नाही .गेलाबाजार भाव मिशन इम्पोसिबल( मूर्ती लहान पण कीर्ती महान ) टोम्याला तरी धाडायचे
.( त्याला तरी कुठे लागतात गोळ्या .)

नरेशकुमार's picture

8 May 2011 - 7:55 am | नरेशकुमार

कमांडो ने लयी वेळेला मार खाल्लेला पाहीले आहे.
अवांतर : इंटरनेट्वर पन अशेच काही बहाद्दुर असतात त्यांना कोनतेच लेख आनि कोनत्याच प्रतिक्रिया मारु शकत नाही. ओळखा पाहू कोन ते. मंजे भविश्यात त्यांच्या नाड्या आवळायला सोपे जाईल.

पद्माकर टिल्लु's picture

8 May 2011 - 10:00 am | पद्माकर टिल्लु

लई भारी !!!! पार्ट -२ कधी

अरे त्या धन्नो, बसंती चे काय झाले ?
तुमच्या कथेत डायलोग पण घालायचे ना ...
"अरे ओ ओसामा के शागिर्द, जवाहिरी (अरे ओ सांबा चा ऐवजी) .." ;-)
"तेरा क्या होगा, जवाहीरी ??"
"कितने आदमी थे ?"
"इतना अंधेरा क्यूं है भाई ? "
"जो डर गया सो मर गया"
"बसंती इन कुत्तोंके सामने मत नाचना"
"आधे इधर जाओ , आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ"
"हम अंग्रेंजोंके जमाने के जेलर हैं"
"यह लग गया निशाना"
"येह हाथ हमको देदे .."

दीप्स's picture

22 Aug 2011 - 2:42 pm | दीप्स

सही तिमाजी, अहो हसून हसून पोट दुखायची वेळ आली आहे. (अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कावून म्हणाले, अरे पटकन गोळी घालायची सोडून हे हाताने मारामारी का करताहेत ? त्यावर सीआयए प्रमुख हंसून म्हणाले, ते असंच असतं , त्या दोघांचं समाधान झाल्याशिवाय हा खेळ संपणार नाही, शिवाय त्या साळिंदराला पण मनसोक्त मोटरसायकल चालवायची आहे. अमेरिकन नेते डोकं धरुन बसले. सर्वांचा धीर सुटत चालला होता. बाहेर वाट पहाणार्‍या हेलिकॉप्टरचालकांचा रक्तदाबही बर्‍यापैकी वाढला होता. ). त्याना कदाचित माहित नसेल नायक हा खलनायकाला मारून चून चून के बदला घेतो. ऑन द स्पॉट गोळी घातली तर काय मज्जा येणार कप्पाळ?? अहो खरी मज्जा यातच मिळते म्हणव त्यांना.

विजुभाऊ's picture

22 Aug 2011 - 6:07 pm | विजुभाऊ

अरे ....... त्या जवाहिरीची पार्टी त्याच्या गोडावून मध्ये होती हे ल्ह्यायचे र्‍हाईले की
आणि गोडाऊन मध्ये खोकी भरून ठेवलेली होती
अवंतरः व्हीलनचा व्यवसाय हिरे विक्रीचा असला तरिही त्याला गोडावून कशाला लागते?