जेवणाऐवजी मिल्क शेक?

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in जनातलं, मनातलं
26 Apr 2011 - 12:01 am

गेल्या आठवड्यात माझे एक क्लायन्ट, श्री जोशी, एका नवीन कंपनीचे 'वेट लॉस प्रोटीन शेक' त्यांच्या मित्राकडून (विकत) घेऊन आले. मी विचारल्यावर, 'मॅडम, ते माझे अगदी बालपणा पासूनचे मित्र आहेत. ते आणि त्यांची बायको, गेल्या ५ वर्षांपासून हे प्रोटीन (प्रथिन) शेक घेत आहेत. त्यांचे १२ किलो वजन कमी झालंय! त्यांच्या आग्रहाला मी बळी पडलो. तुमचं डाएट तर करतोच आणि शिवाय हे प्रोटीन शेक पण घेऊन बघतो. काही पण करून वजन कमी झालं, तर माझा फायदाच आहे न!' जोशी साहेबांच्या मित्राने समजावल्या प्रमाणे- त्यांनी दिवस भरात तीनदा त्या प्रोटीन शेक चं एक पाकीट २५० मिली दुधात घालून प्यायचा होतं. त्या व्यतिरिक्त काहीच खायचं नाही. त्या शेक मधेच शरीराला लागणारे सर्व पोषण होते. माझ्या मनात आलं, चला आपल्या देशातला कुपोषणाचा प्रश्नच सुटला की! (जोकिंग हो!) असो. ते शेक, असंच ४ महिने घेतलं तर ८-१० किलो वजन कमी होण्याची गॅरन्टी (वॉरन्टी नाही बरं का!) सुद्धा दिली होती. एवढे वायदे ऐकल्या वर मोहात पडणं स्वाभाविक होतं.

जोशी साहेबांचा ह्यात अजिबात दोष नव्हता. वर्षानुवर्ष वेग-वेगळी डाएट, जीम, वेट लॉस प्रोग्रॅम करून पण परत वजन वाढलेल्या व्यक्तींपैकी ते आहेत. अश्या लोकांची एक ठाम (पण चुकीची) समजूत असते- रोजच्या आहारापेक्षा काही खूप वेगळं केल्या शिवाय 'डाएट करणं' होत नाही. दुसरं म्हणजे सॉलिड रिझल्ट बघायची त्यांना प्रचंड घाई असते. त्यामुळे, आपल्या राहणी मानाला अनुरूप असं डाएट, की ज्याने महिन्याला २-३ किलो वजन कमी होतं, ते त्यांना पटत नाही. जोश्यांच त्या प्रोटीन शेक चं विज्ञापन ऐकल्या वर मी त्यांना एकाच प्रश्न विचारला- 'तुमचे मित्र एवढं वजन कमी करून पण अजून तेच प्रोटीन शेक का पीतायेत?' जोशी म्हणाले- 'आहो, नाहीतर मग परत त्यांचं वजन नाही का वाढणार?' अगदी बरोबर.

अ‍ॅट्कीन्स डाएट, साउथ बीच डाएट, जनरल मोटर्स डाएट किंवा असे हाय प्रोटीन शेक डाएट केल्याने वजन कमी तर होतं, पण (आधीच्या लेखात समजावल्या प्रमाणे) ते डाएट बंद करून, आपल्या नेहमीचा आहार सुरु केला की त्याहून दुप्पट वजन वाढतं. आपलं शरीर, एकदम खूप प्रमाणात आलेल्या प्रोटीन चे 'डी-अमाय्नेशन' करून, त्याला सुद्धा फॅट (चरबी) चा रूपात साठवून ठेवतं. हाय प्रोटीन शेक बरोबर इतर काहीच न खाल्ल्यामुळे शरीरातल्या पाण्याचा आणि स्नायूंचा घटक कमी होऊन, वजन कमी होते. असं वजन कमी केलेल्या लोकांना बरेचदा 'स्ट्रेच मार्क्स', 'निस्तेज चेहरा', 'केस गळणे', 'इतर काही पण खाल्लं की पोट बिघडणे' असे अनुभव येतात. ह्या व्यतिरिक्त शरीरात होणारे इतर सुप्त बदल म्हणजे आतडी शिथिल होणे, सांधे दुखणे, वारंवार आजारी पडणे, ई.

असं होण्या मागचं कारण अगदी स्पष्ट आहे- अन्न हे प्राकृतिक असून आपल्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं आहे. अन्नातले सगळे घटक शरीरात काही विशिष्ठ काम करत असतात. रोज वेळेवर संतुलित आहार खाऊन शरीरातले इतर उपयोगी सूक्ष्मजीव पण जपले जातात व त्यानी आपली प्रतिकारशक्ती पण वाढते. शरीरातल्या सर्व अवयवांना पचनक्रिये नी प्राकृतिक शक्ती आणि व्यायाम मिळतो. तर असं असताना, अन्न वगळून नुसतं दूध आणि रासायनिक पूड घेऊन स्वास्थ्य लाभेल का? पेट्रोल इंजिन च्या गाडीत डीझेल टाकून ती व्यवस्थित दीर्घ काळ चालेल का? कायम लक्षात ठेवा- आपले आरोग्य जपून वजन वाढवणे (वाढणे) किंवा कमी करणे ह्याला 'इन्स्टन्ट' उपाय कधीच नसतो. म्हणून व्यवस्थित खाऊन पिऊनच वजन कमी (किंवा जास्त) करा.

जीवनमानराहणीमतशिफारससल्लाअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

मला नेमकं हेच म्हणायचं होतं.

खादाड अमिता's picture

27 Apr 2011 - 8:48 am | खादाड अमिता

:)

शन्वारी सामनात रामदासांचा लेख, मग तुमचा आणि टारूसाहेबांचा वाचायची सवय झालीये.

शुचि's picture

26 Apr 2011 - 12:47 am | शुचि

लेख आवडला.

अर्यन's picture

26 Apr 2011 - 1:51 am | अर्यन

पारम्परिक मसैले जशे हल्दि, हिन्ग, आले, कधि पत्ता, तमल पत्रा, कोथिम्बिर हे अनि धाल, गहु ह्यात जे कहि गुन्धर्म अहेत. अनि ते स्थुल्ता, मदुमेह, अर्त्रैस्स वगेरे नैसर्गिक रित्या बरोबर कर्ते. ते अपन सग्ले जन विस्रुन जाउन नको त्यआ गोश्तिन्च्या शोधत लग्तो अनि शरिरिक समतोल धल्तो. हे जे अवश्यक अहारचे महिति सथि लिन्क्सः http://www.dietivity.com/the-numerous-benefits-of-indian-herbs-and-spices/
http://www.livestrong.com/article/363262-indian-foods-for-weight-loss/#i...

आनि मि पुर्नपने सहमत अहे कि य्हआ बरओबर व्यायम हा पहिजेच.

योगी९००'s picture

26 Apr 2011 - 1:57 am | योगी९००

तुम्ही जे काय लिहिले आहे ते वाचतानाच मला थोडे वजन कमी झाल्यासारखे वाटले..

मराठी टंकणे इतके काही अवघड नाही आहे...जरा प्रयत्न केला तर सगळे जमेल..

अर्यन's picture

26 Apr 2011 - 3:35 am | अर्यन

नक्किच

कौशी's picture

26 Apr 2011 - 2:28 am | कौशी

उपयुक्त माहिती आहे . आणि वाचायला आवडेल.

दीविरा's picture

26 Apr 2011 - 12:42 pm | दीविरा

माहिती आवडली .माझ्या ओळखीतल्या एका काकूनी हे मला खपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

अजून वाचायला आवडेल :)

प्रोटीन शेक घेतल्याने वजन वाढते असे आईकून होतो ;)

बऱ्याच प्रकारची प्रोटीन शेक मिळतात... वजन वाढवणारी अमायनो acid शेक, वजन कमी करणारी फायबर व प्रोटीन शेक, शुगर कंट्रोल करणारी शेक.. ई. पण ह्यातील कुठलंच स्वास्थ्य मिळवण्याचा आरोग्यपूर्ण उपाय नसतो.

स्पा's picture

26 Apr 2011 - 2:18 pm | स्पा

ह्म्म्म्म्म्म्म्म

मदनबाण's picture

28 Apr 2011 - 9:58 am | मदनबाण

छान माहिती... :)
चला मिल्क शेक प्यायला अजुन एक नविन कारण मिळाले. :)
चिकु चॉकलेट मिल्क शेक माझा आवडता पेय प्रकार आहे...बाकी माझ्या आवडत्या मिल्क शेकची यादी मोठी आहे, ती नंतर केव्हा तरी देइन, तुर्तास इथेच थाबतो. ;)

(खादाड) ;)

गवि's picture

28 Apr 2011 - 2:41 pm | गवि

छान माहिती...
चला मिल्क शेक प्यायला अजुन एक नविन कारण मिळाले.

अँ.. ? अहो मबा.. ते शेक्स घेऊ नये असं म्हटलंय की..

मदनबाण's picture

29 Apr 2011 - 8:05 am | मदनबाण

अँ.. ? अहो मबा.. ते शेक्स घेऊ नये असं म्हटलंय की.
ओ विहारी, फकस्त मिल्क शेक पिउनशान माझं पोटु भरेल असं तुम्हाला वाट्ट काय ? ;)
असो... केव्हा वेळ मिळाला तर अंजिर मिल्क शेक पिउन बघा. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Apr 2011 - 5:40 pm | llपुण्याचे पेशवेll

छान माहीती आहे. आम्ही देखील बर्‍यापैकी वजनदार व्यक्तिमत्व असलो तरी वजन कमी करायची वेळ आलीच तरी असले शेक बिक पिऊन वजन कमी करायच्या भानगडीत काही पडणार नाही हे नक्की. आमच्या आईला वजन कमी करण्यासाठी असे काहीतरी करण्याचा सल्ला कोणीतरी दिला होता. मोठ मोठ्या किमती असलेल्या मिल्कशेक पेक्षा मर्यादित आहाराने वजन कमी करण्याची गोष्ट सहज साध्य होऊ शकते असे वाटते.

अवांतरः जोश्यांच त्या प्रोटीन शेक चं विज्ञापन ऐकल्या
विज्ञापन हा शब्द मराठी वाटत नाही. हिंदी आहे. मराठीत जाहीरात म्हणतात. हिंदीच्या सवयीमुळे इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करताना अनाहूतपणे सर्वजण तिथे चांगले मराठी शब्द असताना हिंदी शब्द वापरतात याचा खेद वाटतो.

पंगा's picture

29 Apr 2011 - 10:02 am | पंगा

अवांतरः जोश्यांच त्या प्रोटीन शेक चं विज्ञापन ऐकल्या
विज्ञापन हा शब्द मराठी वाटत नाही. हिंदी आहे. मराठीत जाहीरात म्हणतात. हिंदीच्या सवयीमुळे इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करताना अनाहूतपणे सर्वजण तिथे चांगले मराठी शब्द असताना हिंदी शब्द वापरतात याचा खेद वाटतो.

पण... पण... पण 'जाहिरात' (मराठीत लिहिताना 'हि' र्‍हस्व) हा यावनी (अचूकपणे सांगायचे झाले तर अरबी) शब्द आहे हो! उलट 'विज्ञापन' संस्कृतोद्भव आहे. सावरकरांना 'विज्ञापन' हा शब्द निस्संदेह आवडला असता. 'जाहिरात'सारख्या म्लेच्छांच्या भाषेतील शब्दांच्या भेसळीचे उच्चाटन करून त्याऐवजी 'विज्ञापन'सारख्या शुद्ध संस्कृतोद्भव शब्दांची प्रतिष्ठापना करण्याचा आग्रह - नव्हे, अट्टाहास - त्यांनी निश्चित धरला असता.

आणि त्याच सावरकरांच्या महाराष्ट्रात आज "'विज्ञापन' हा शब्द परकीय आहे, त्याऐवजी 'जाहिरात' हा 'मराठी' शब्द वापरावा" अशी सूचना ऐकायला मिळावी - केवढा हा दैवदुर्विलास! सावरकरांच्या आत्म्याला आज किती यातना होत असतील!! हा हन्त हन्त!!! हाय हा!!!! धिक्!!!!!

श्रावण मोडक's picture

29 Apr 2011 - 10:07 am | श्रावण मोडक

पक्का संधीसाधू! ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Apr 2011 - 10:52 am | llपुण्याचे पेशवेll

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.. वडाची साल पिंपळाला लावणारा आपला प्रतिसाद अपेक्षित होताच. :)
असो. अमिताताईपर्यंत आमचा प्रतिसाद पोचला आणि त्यांनी दखल घेतली यात आम्हाला आनंद आहे.

खादाड अमिता's picture

29 Apr 2011 - 10:02 am | खादाड अमिता

अगदी बरोबर. मराठी लिहायची सवय नसल्याने अशी चूक झालीये असे वाटते. एवढी वर्ष गुजराथ मधे राहून आणि कधीच मराठी -हा विषय, शाळेत नसल्या कारणाने, मराठीत लिहिणे मला बरेच आव्हानात्मक वाटते. असेच माझे मार्गदर्शन करा अशी विनंती!

पंगा's picture

29 Apr 2011 - 10:06 am | पंगा

असेच माझे मार्गदर्शन करा अशी विनंती!

"असेच मला मार्गदर्शन करा अशी विनंती!"

बाकी चालू द्या.

प्राजु's picture

29 Apr 2011 - 1:14 am | प्राजु

मस्त लेख. :)

गेल्या महिन्यात माझं वजन पाच किलोंनी कमी झालं . आकडा अजूनही लाजिरवाणा आहे त्यामुळे तो आत्ता इथे देत नाही . मनासारख्या आकड्यावर काटा पोचला कि इथे परत कमेंट करून सांगेन . व्यायाम शून्य , घरकाम जवळजवळ शून्य , चालणं - फिरणं शून्य .... म्हणजे मुद्दाम व्यायाम म्हणून किंवा कामावर वगैरे जाताना धावपळ असं काही नाही . जे काही घरातल्या घरात चालणं होईल तेवढंच . . नॉन वेज या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पूर्ण बंद केलं , अंडं सुद्धा खाल्लेलं नाही :( पण नॉनव्हेज बंद केलं तरी जानेवारी ते मे या काळात फक्त ५ - ७ किलो वजन कमी झालं ; जानेवारी ते मार्च २ - ३ महिने रोज एक तास फिरायला जाऊनही . पण गेल्या एकाच महिन्यात ५ किलो कमी झाल्याने सध्या मला आस्मान ठेंगणं झालेलं आहे . गेल्या महिन्यात चहा आणि त्याबरोबरचं खाणं पूर्ण बंद केलं . दुपारी एकवेळ जेवण . त्यातही ८ - १० दिवस तरी मेदुवडे , पुरीभाजी , साबुदाणा खिचडी , स्टफ्ड पुऱ्या , पावभाजी , केक असे तेलकट आणि कॅलरी रिच पदार्थ झाले . आणि संध्याकाळी एक ग्लास दूध - बोर्नव्हिटा किंवा एखादी प्रोटीन पावडर घालून . सुरुवातीचे ४ - ५ दिवस रात्री जरा उशिरापर्यंत भुकेने कळवळायला झालं . मग सवय झाली . रात्री चांगली झोप लागू लागली . विनासायास वेटलॉस हे डॉ . जगन्नाथ दिक्षित यांचं पुस्तक खरेदी केलं त्यात हा उपाय सापडला - दिवसातून दोन वेळा व्यवस्थित जेवायचं . दोन वेळा सोडून दिवसभरात अन्य काही खाद्यपदार्थ तोंडात टाकायचा नाही . फारच भूक लागली तर टोमॅटो काकडी असे नगण्य कॅलरीज असलेले पदार्थ खाता येतील . माझ्यापुरता मी त्यात थोडासा बदल केला - एक वेळ जेवण आणि एक वेळ दूध . कारण माझे काहीच श्रम होत नाहीत , उगाच भरपूर कॅलरीज तेवढ्या जातात . तब्येतीवर अजिबात वाईट परिणाम झाला नाही , म्हणजे हाडं / सांधे दुखणं , अशक्तपणा , चिडचिड असे कोणतेही साईड इफेक्ट्स झाले नाहीत . हलकं हलकं वाटत आहे , न होणारे कपडे होऊ लागले आहेत आणि ऍक्टीव्हनेस वाढला आहे , घरातली थोडीफार कामं करायचा उत्साह वाढला आहे . या महिन्यात जेवणाऐवजी दोन्ही वेळा दूध असं सुरु केलं आहे . वडेबिडे खाऊन जर गेल्या महिन्यात ५ किलो वजन कमी झालं तर या महिन्याच्या एन्डपर्यंत नुसतं दूध पिऊन ७ - ८ किलो तरी कमी होईल अशी आशा आहे .