२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते. एकंदरीत तरूणाईची मजा चालली होती म्हणा ना.
अशा गंमतीत, थोड्याफार कंटाळ्यात संध्याकाळचे ७/७:३० वाजले असतील. आमच्या २र्या वर्गाच्या स्लीपर डब्यात गर्दी वाढत चाललेली. इकडून तिकडे फिरायला जागा नाही. डब्यात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे लोक बसलेले. लोकांची कुजबुज वाढू लागली. "अरे, ही लोकं जनरल डब्यातील तिकिटे काढून ह्या डब्यात का आलीत?","कोणी काही बोलत का नाही?", "आपले सामान कसे सांभाळून ठेवणार आता." वगैरे वगैरे.
संध्याकाळचे खाणे खाऊन झाल्यावर ते सर्व मित्र गप्पा मारत बसले होते. पुन्हा लोकांची कुजबुज ऐकू आली. तेवढ्यात एक स्टेशन आले. आणखी लोक आत चढू लागले.
अचानक, त्याला काय वाटले कोणास ठाउक. तो तडक उठला. त्याच्या जवळ खाली बसलेल्या माणसांना म्हणाला,"तिकिट दाखवा". त्यांनी जनरल डब्याचे तिकिट दाखवल्यावर तो म्हणाला, "हा डबा रिजर्वेशन वाल्यांचा आहे. ज्यांचे कोणाचे रिजर्वेशन नाही त्यांनी इथून बाहेर जावे". कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा त्याने डब्याच्या दरवाज्याजवळ असणार्यांना बाहेर जाण्यास सांगितले. कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. त्याने आपल्या मित्रांना सांगितले," ह्या लोकांना बाहेर जायला सांगा, मी आता खूप रागात आहे."
पुन्हा तो मागे गेला. त्याच्या बसण्याच्या जागेपासून दरवाज्यापर्यंत जेवढे साध्या तिकिटावरचे लोक खाली बसले होते, त्यांना एक एक करून बाहेर जाण्यास सांगू लागला. आम्ही बाकीचे लोक, त्याचे मित्र बघतच राहिले हा काय करत आहे म्हणून. आम्ही कोणी त्याला अडवायचा प्रयत्न केला नाही. पण त्याचे मित्र तयारीत होते की काही धांदल होऊ नये, पुढे त्यांनीही हातभार लावला. ते ही आरडाओरडा करत मग लोकांना बाहेर काढू लागले. एक माणूस म्हणाला, "अरे, राहू दे आम्हाला." पण तो कोणाचे ऐकत नव्हता. दरवाज्यापर्यंतची जागा हळू हळू रिकामी होऊ लागली. लोक उतरून दुसर्या डब्यात चढू लागले. तो संडासाच्या जवळ गेला. तिकडे दोन डब्यांना जोडण्याची जी जागा होती तिथल्या लोकांना म्हणाला, "एक तर दरवाज्याच्या ह्या बाजूला रहा किंवा त्या बाजूला." एक दोन जण ह्या डब्यात आले तर म्हणाला, "इथे यायचे तर खाली उतरावे लागेल." ते लोक लगेच डब्यांच्या जोडणीवरून दुसर्या डब्याकडे गेले. तिकडील सर्व जागा रिकामी झाल्यावर त्याने ते पत्र्याचे शटर खाली ओढून बंद केले. डब्याच्या त्या बाजूचे दोन्ही दरवाजे बंद केले. व डब्याच्या दुसर्या बाजूकडे जाऊ लागला. तिकडे आधीच सर्व रिकामे झाले होते. त्याने लोकांना विचारले, "तो दरवाजा बंद आहे का?" उत्तर मिळाले," हो, ते शटर ही बंद केले आहे."
मग डब्यातील इतर लोकांना तो म्हणाला," तुम्हाला त्या लोकांना बाहेर काढायला काय झाले होते." वास्तविक आमच्या त्या दुसर्या कंपार्टमेंट मध्येही लोक म्हणत होते की त्यांना रिजर्वेशनच्या डब्यात जागा नाही द्यायला पाहिजे. त्यांना बाहेर काढल्यावर सर्वांना थोडे बरे वाटले होते.
आम्हाला वाटले "चला, एक कार्यकर्ता मिळाला", आणि मग डबा शांत झाला.
पण नंतर वाटत होते, त्याने जे केले ते किती बरोबर होते?
नव्हती तेव्हा जागा म्हणून आलेत लोक रिजर्वेशनच्या डब्यात. गर्दीच्या दिवसांत करायचे सहन थोडे. आम्ही नव्हतो का सहन करत? त्याच्या सोबतीचे कोणी त्यांत असते तर त्याने हे केले असते का?
जर त्या लोकांनी मारामारी सुरू केली असती तर ? कारण आजकाल मारामारी व्हायला लहानशे कारणही पुरेशे असते.
पुन्हा तो होता रेल्वेमध्ये, स्वत:च्या घरापासून/राहत्या जागेपासून दूर. का घ्यायची ही जोखीम?
असो, ही होती मी पाहिलेली एक क्रांती. एका क्षणात झालेली. एक क्षण चाललेली.
प्रतिक्रिया
15 May 2008 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवदत्ता,
अशा क्रांत्या म्हणजे मारामारीला आमंत्रण असते असे वाटते. खरे तर आरक्षण असलेल्या डब्यात सामान्य टीकीट असलेल्या प्रवाश्यांनी बसूच नये.
रेल्वेत प्रवास करतांना आरक्षण असणा-यांना दादागिरीने उठवून बसणारी मंडळीही आपल्या पाहाण्यात असते. आणि संबधीत प्रवासी मारामारी होणार या भितीने आपली आरक्षण असलेली सीट सोडून देतो. रेल्वे आरक्षणाचा गोंधळही आपणास माहित असेलच, तेव्हा आम्हाला तरी ही काही क्रांती वाटली नाही. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते.
15 May 2008 - 10:29 am | देवदत्त
ही क्रांती नसावी
मान्य.. ही क्रांती नव्हतीच.
क्रांती ती लोकांच्या भल्याकरीता, योग्य कारणाकरीता होते, लोक खरोखर ज्याचा उपयोग करून घेतील.
हा शब्द मला त्या क्षणापुरता वाटला, आणि लेखनाला तेच नाव सुचले म्हणून लिहिले. :)
15 May 2008 - 11:00 am | मनस्वी
सर्व प्रवासी मॅनेज करणे म्हणजे फक्त रिझर्वेशन असलेले रिझर्वेशनच्या डब्यात, लेडिज डब्यात फक्त लेडिज, जनरल डब्यात जनरल.. विनातिकीटवाल्यांना हकलणे.. हे खरं रेल्वे कर्मचार्यांचे काम आहे.
त्यांच्या कामचुकारपणामुळे आपल्याला ताप होतो.
जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मवर येते, तेव्हाच एक अधिकारी दारावर तैनात करून फक्त रिजर्वेशनवाल्यांना आत सोडेल, असे केले पाहिजे.
मी एकदा मुंबई-पुणे प्रवास लेडिज डब्यात पूर्ण उभा राहून केला. लेडिज डब्यात वरच्या बर्थ वर एक १८-२० वर्षांचा मुलगा बसलेला. उतरताना त्याला लई शिव्या घातल्या. हातात बांगड्या भर म्हटलं. तो म्हणे मी माझ्या बहिणीला (वय वर्षे साधारण ३० ते ३५) सोबत म्हणून इथे बसलोय! शेवटी चिडचिड,मनस्ताप मलाच झाला.
तसेच ट्रेन्समध्ये अवाढव्य तृतियपंथी पाहिले की बिथरल्यासारखे होते. माझ्यामते ते ते नसतातच. बेरोजगार पुरुषांनीच तो नवीन धंदा शोधला आहे.
जर आपण आटोकाट प्रयत्न करून रिझर्वेशन मिळवतो.. का? आपला, आपल्या कुटुंबाच प्रवास सुखावह / बरा व्हावा.. अन् त्यात आरक्षित डबा असा विना आरक्षण वाल्यांनी असा खचाखच भरला.. प्रत्येकालाच वाटते सगळ्यांना हकलावे.. पण जोखीम कोणी सहसा घेत नाही. कारण आपल्यावरच धावा झाला तर 'आरक्षित' पांढरपेशे नुसतेच बघत रहाणार.
जर घुसखोरांवर येवढा कणव असेल तर त्यांना स्वतःची जागा द्यावी किंवा स्वतः जनरलचेच तिकिट काढावे.
अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्यांना कळणार कधी?
15 May 2008 - 12:13 pm | ईश्वरी
जरी गाडीला गर्दी असली तरी डब्याचे आरक्षण केलेल्या लोकांना त्या डब्यात व्यवस्थित , comfortably बसण्याचा आणि प्रवासाचा आनंद घेण्याचा पूर्ण हक्क आहे. कारण त्यांनी तिकीटासाठी पैसे ही जास्त मोजलेले असतात. जनरलवाल्यांनी आरक्षित डब्यात गर्दी केली तर प्रवास निश्चितच सुखावह होणार नाही. त्यामुळे त्या मुलाने काही चुकीचे केले असे म्हणता येणार नाही. तसे असते तर ते लोक (आरक्षण नसलेले) त्याचे ओरडणे निमूटपणे ऐकून घेऊन खाली उतरले नसते. इतर आरक्षण असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका न घेता उलट त्या मुलाला साथ द्यायला हवी होती.
अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्यांना कळणार कधी?
हे मनस्वीचे म्हणणे पटले.
-- ईश्वरी
15 May 2008 - 4:56 pm | प्राजु
मनस्वी आणी ईश्वरीशी १००% सहमत आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 May 2008 - 12:30 pm | स्वाती दिनेश
एकदा आम्ही पुण्याहून ठाण्याला डेक्कन एक्स्प्रेसने येण्यासाठी आरक्षण केले होते.आमच्या जागेवर दुसरेच एक पोक्त जोडपे बसले होते,त्यांना सांगितले आमचे येथे आरक्षण आहे,त्यातील बाई म्हणाल्या अहो,"तुमच्या समोरच्या जागेवर आमचे रिझर्वेशन आहे पण पहाना तिथे बसलेल्या बाई हे ऐकूनच घेत नाहीत आणि उठत तर नाहीतच..काय करु हो?"हे सांगणार्या बाई अगदी अजिजीने सांगत होत्या.म्हटलं," अहो काकू तुमचे रिझर्वेशन आहे तर त्या बाईला इथे बसून कसे देता?" ती बाई हे सर्व ऐकून न ऐकल्यासारखे करत होती. मी तिला म्हटलं,"मावशी उठा,त्या आजींचं इथे रिझर्वेशन आहे,त्यांची जागा आहे ही.."बाई आडदांड होती,म्हणाली "म्या बी तिकट काढलया,फुकाट नाही प्रवास करत.." हुज्जत घालू लागली आणि उठेनाच.. गाडी सुटायची वेळ झाली होती.आजू बाजूचे प्रवासी कुजबुजत सारे पाहत होते.मदतीला कोणी पुढे येईना..पोलिस गायब होतेच.. पण प्लॅटर्मवर एक टीसी होता,त्याला हे सर्व सांगितले टीसी वैतागून एकदाचा माझ्याबरोबर आला,त्याने बाईंना सांगितले तरी बाई काही उठेनात.मग आम्हालाच तो "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" असे म्हणायला लागला..मग मी चिडले आणि म्हटलं, ती जागा त्या आजींना नाही मिळाली तर मी साखळी खेचणार आणि गाडी पुढे जाऊ देणार नाही..शेवटी त्याने कुठूनसे पोलिस पैदा करून आणले.दोन हवालदारांनाही बाई ऐकेना..तिचं एकच टुमणं "म्या तिकट काढून बसलीया..लवकर येऊनशान जागा पकडलीया..म्या हतून उटणार न्हाय".. शेवटी गाडीने शिटी दिली..माझा हात साखळीकडे जायला लागला..ते पाहून त्यातील एक पोलिस म्हणाला,"ताई दमानं घ्या..आम्ही करतो बरोबर काय ते,आत्ता आमच्या बरोबर इथे लेडी पोलिस नाहीये ना,बाईंच्या अंगाला हात नाही लावता येत.."गाडी हलली आणि हवालदारांनी दंडु़क्यांनी त्या बाईला दोन दणके दिले आणि मुकाट्याने जागा खाली कर,नाहीतर शिवाजी नगरला बाई पोलिसाला बोलावतो असे खास पोलिसी आवाजात खडसावले.ती बाई अत्यंत घाणेरड्या शिव्या देत उठून गँग वे त बसली..पोलिसांना म्हटलं ,पुढे धुडगूस घातला तर? मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..
15 May 2008 - 12:35 pm | मनस्वी
छान केलंस स्वातीताई!
काम रेल्वेवाल्यांचे आणि मनस्ताप आपल्याला!
15 May 2008 - 12:42 pm | आनंदयात्री
एकदम मस्त केलेस स्वाती, स्वतःला काहिही त्रास नसतांना दुसर्याचा त्रास पाहुन मदत करणारे विरळाच !
यात मला थोडीफार तरी क्रांती दिसली :)
15 May 2008 - 12:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं तर साखळीऐवजी, त्या बाईचं बखोटं धरुन तिच्या सिटवरुन तिला खेचायला पाहिजे होतं
पोलिसांची, टीसीची गरज पडू नये :)
"जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" खरं तर असे बोलणा-या लोकांची जमातच वेगळी असते. आपण मारे ऐसपैस बसलेले असतात आणि जागेवरुन भांडणा-यांना, घ्या, ना राव ! ऍडजस्ट करुन.......असे म्हणतात. स्वतः मात्र कोणालाच ऍडजस्ट करुन घेत नाही. धरुन ठोकलं पाहिजे अशा लोकांना !!!!
17 May 2008 - 5:08 pm | भडकमकर मास्तर
गोष्टीतील हा भाग फारच आवडला..
16 May 2008 - 8:19 am | विसोबा खेचर
मी त्या डब्यातला एक असतो तर त्या माणसाला माझे तिकिट मी मुळीच दाखवले नसते! तिकिट विचारायचा हक्क फक्त टी सी ला असतो, अन्य सहप्रवाशंना हा हक्क नाही!
मी त्या माणसाला म्हटले असते की 'बाबारे, मला तिकिट विचारणारा तू कोण?? तू टी सी आहेस? तुझ्याकडे टीसीचा बॅच, ओळखपत्र आहे? जा भोसडिच्या, जाऊन पहिले टीसी ला बोलावून आण, मग या डब्यातून उतरायचं किंवा नाही ते मी ठरवीन! तू रागात असलास तरी मलाही राग येतो हे लक्षात ठेव!
मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! :)
आपला,
(कॉलेज जीवनात भरपूर मारामार्या केलेला!) तात्या.
17 May 2008 - 6:41 am | झंप्या
तात्याशी सहमत आहे. आम्हीही अशीच प्रतिकक्रिया दिली असती.
16 May 2008 - 8:45 am | विसोबा खेचर
कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला.
हा हा हा! पोलिसांना बोलावून काय उपयोग होणार? तिकिट विचारायचा हक्क टीसी व्यतिरिक्त कुणालाही नाही! :)
आपला,
(कायदेशीररित्या योग्य ऑथॉरिटीकडून सजा भोगण्यास सदैव तयार!) तात्या.
16 May 2008 - 8:05 pm | देवदत्त
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.
फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते.
सहमत.
पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला.तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्यांना कळणार कधी?
मनस्वींच्या मुद्द्यांशीही सहमत. पण अहो मॅनेजमेंटच खराब झाले आहे हो आता. गर्दीच्या दिवसांत काही वेळा टी सी येतच नाही तिकिट बघायला हाही अनुभव आहे.
स्वातीताई, तुम्ही केलेलेही पटले. ह्याची गरज पडते मध्ये मध्ये :)
मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की!
मी ही प्रश्नांत तेच विचारले आहे हो तात्या. :) आजकाल खरे तर हेच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचे नशीब चांगले होते त्यादिवशी असेच वाटते.
बाकी क्रांती हा शब्द जरा अतिशयोक्ती झाला माझ्याकडून असे वाटते. गेल्या २ वर्षांत मला असे कधी नाही वाटले की ती काही क्रांती होती. मागील आठवड्यात 'डोंबिवली फास्ट' बघताना हा प्रसंग आठवला. लोक जेव्हा नुसते बोलत असतात तेव्हा असे काही तरी क्वचितच होताना पाहिले. म्हणून वाटले इथे लिहुया.
ह्यावरूनच वपुंची जेपी ही कथा आठवली. भांडणाचे क्लास घेणारे. त्यात आहे की त्यांनी दोन भांडणे लिहिली असतात. तुम्ही आरक्षित जागेवर आहात. उभा असलेला माणूस तुम्हाला जागा मागतोय, कसे भांडाल. तर दुसर्या पानावर नेमके ह्याच्या उलट लिहिले असते, तुम्ही उभे आहात, सीटवर बसलेल्या माणसाशी कसे भांडाल :)