आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली.
जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला. ते जम्मूत पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात ओमर बोलत होते. "" श्रीनगरमध्ये शासकीय कार्यक्रमात अधिकृतरित्या राष्ट्रध्वज लावण्यात येणार असताना स्वतंत्र कार्यक्रमाची गरजच काय?'' असा प्रश्न ओमर यांनी उपस्थित केला. ""काश्मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले.
ओमर यांचे वडिल आणि केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी देखील भाजपला इशारा दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीसाठी भाजपने आपल्याला जबाबदार धरू नये, निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी त्यांनी ठेवावी अशा शब्दात फारूक यांनी ओमर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ओमर यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे.
भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल ते काश्मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने श्रीनगरच्या लाल चौकात प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
" जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून राष्ट्रध्वजाची यात्रा केवळ एकाच नाही तर अनेक राज्यांतून प्रवास करणार आहे. हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठी नाही तर देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी ती आयोजित करण्यात आली आहे,'' असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी नवी दिल्लीत सांगितले.
http://72.78.249.107/esakal/20110105/5309626091301734432.htm
(बातमी खालच्या प्रतिक्रीयासुध्दा वाचण्यासारख्या आहेत)
बातमी वाचुन मन विषण्ण झाले. मला हे वाचल्यावर समजले नाही की विरोध नक्की कशाला आहे. तिरंगा फडकवायला की भा.ज.प.ला?
हा अब्दुला पिता-पुत्रांचा पळपुटेपणा की दिल्लीश्वरांच्या (अर्थातच हाय कमांड) इशा-यावर बोलत आहेत?
बाकी हे वाचल्यावर पुन्हा एकदा सुधीर काळ्यांच्या "इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?" ची आठवण झाली.
प्रतिक्रिया
5 Jan 2011 - 11:49 pm | सुहास..
बेस्ट ऑफ लक !!
6 Jan 2011 - 12:12 am | आत्मशून्य
राजकारण चालू आहे.
6 Jan 2011 - 8:33 am | अवलिया
महाराष्ट्रात १५ ऑगस्ट/२६ जानेवारी अशा दिवशी सरकारी ध्वजारोहणाव्यतिरिक्त, जनतेतर्फे चौका चौकात उत्स्फुर्तरित्या तिरंगा फडकावला जातो.
निदान महाराष्ट्रात अशी वेळ न येवो ही इच्छा !
6 Jan 2011 - 8:58 am | चिंतामणी
काश्मीर समस्येचे मुळ यात आहे हे अनेकजण लक्षात घेत नाहीत.
हे असे होउ नये म्हणून डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५३ साली काश्मीरमधे देह ठेवला. परन्तु अजून पर्यन्त काश्मीर समस्येचा शेवट करता येत नाही याचे वाईट वाटाते.
26 Jan 2011 - 2:35 am | विकास
गेल्यावर्षी पाकचा ध्वज त्याच लाल चौकात फडकवला गेला या संदर्भातील तेहलका मधील लेख "वाचनीय" आहे.
26 Jan 2011 - 9:37 am | चिंतामणी
http://www.misalpav.com/node/16180#comment-281317
>
26 Jan 2011 - 11:49 pm | चिंतामणी
6 Jan 2011 - 8:58 am | सुधीर काळे
हर हर हर! काय दिवस आलेत भारतावर!!
गिलानी बोलले असते तर पटले नाहीं तरी ते समजू शकलो असतो. पण एका राज्याचा मुख्यमंत्रीच असं बोलायला लागला कीं मग काय म्हणायचं?
ओमरसाहेब एक तर भित्रे आहेत किंवा आतून सामील आहेत.
6 Jan 2011 - 9:16 am | शिल्पा ब
ओमार हे नक्की कुणाचा संदेश देताहेत? हाय कमांड का चीन? का पाकीस्तान?
काय बोलणार? :( नेते षंढ आहेत यावर शिक्कामोर्तब पुन्हा एकदा यापलिकडे काय अजुन?
6 Jan 2011 - 10:31 am | सुधीर काळे
शिल्पाताई, शेवटी आपणच गाढव ठरतो कारण या राज्यकर्त्यांना आपणच निवडून देतो.
यावेळी शपथ घ्या कीं काँग्रेसला, सोनियाताईंना किवा राहुलबाळाला मते देणार नाहीं.
मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!
17 Jan 2011 - 10:08 pm | पंगा
हा नेमका कोणता विरोधी पक्ष?
ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाचे सरकार असताना त्यात श्री. ओमर अबदुल्लाह यांची नॅशनल कॉन्फरन्स ही त्या पक्षाची युतीभागीदार होती (आणि ज्या सरकारात स्वतः श्री. ओमर अब्दुल्लाह हे परराष्ट्रखात्याचे राज्यमंत्री होते), तो विरोधी पक्ष?
की ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या कारकीर्दीत एक विमान अपहरण झाले असता, ओलिसांच्या सुटकेसाठी तडजोड म्हणून मुक्त केलेल्या काही दहशतवाद्यांना त्याच (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या एका मंत्र्यांनी जातीने कंदाहारपर्यंत सोबत केली, तो विरोधी पक्ष?
बाकी, काही अपहरणाची घटना घडून गेल्यानंतर (after the fact) त्यात सापडलेल्या ओलिसांचा जीव वाचावा म्हणून जर काही दहशतवाद्यांना मुक्त केलेले चालू शकते*, तर मग 'आग भडकण्याची खात्री आहे, तेव्हा मुद्दाम ठिणगी पाडू नका, अन्यथा परिणामांची जबाबदारी तुमची!' या घटनेपूर्वीच्या (before the fact) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या (preventive measure) स्वरूपातील इशार्यात नेमके काय गैर आहे?
* दहशतवाद्यांना मुक्त केले यात नेमके काही गैर होतेच, असे मी येथे बसून छातीठोकपणे सांगू शकत नाही. परिस्थिती हाताळणार्या जबाबदार व्यक्तींनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि संभाव्य परिणाम, आपले आणि शत्रूचे तौलनिक सामर्थ्य, शत्रूची संभाव्य प्रतिक्रिया, आपल्या कोणत्याही कृतीतून (आणि त्यावर शत्रूच्या होऊ शकणार्या कोणत्याही प्रतिक्रियेतून) होऊ शकणारे आपले आणि शत्रूचे संभाव्य तौलनिक फायदेतोटे वगैरे सर्व बाबींची योग्य ती गणना (calculation) करून घेण्याचा हा निर्णय आहे. ('ज्याचे जळते, त्यालाच कळते' किंवा 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' वगैरे वगैरे.) अन्यथा, "द्या साल्यांना उडवून!" वगैरे घरबसल्या म्हणण्याने माझ्या दिवंगत तीर्थरूपांचे काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारच्या तत्कालीन कृतीबद्दल नावे ठेवण्याचा कोणताही मानस नाही. विरोध आहे तो केवळ 'आम्ही केले तर ठीक, काँग्रेसने केले तर तो भित्रेपणा/पळपुटेपणा/धार्जिणेपणा/अनुनय' छापाच्या दुटप्पी धोरणाला आहे.
18 Jan 2011 - 7:44 am | सुधीर काळे
प्रश्न चांगला आहे. विकल्प कमीच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं काँग्रेसने जशी एकछत्री सत्ता उपभोगली तशी 'भाजपा'ने भोगली नाहीं. राज्यावर एकदाच आले ते कडबोळ्याचा भाग म्हणून. (भोगली असती तर काय केले हा विषय 'आत्याबाईला मिशा असत्या तर...." सारखा आहे हेही खरे!)
पण लोकसभेची निवडणूक येईपर्यंत आडवाणी जाऊन सुषमा स्वराज किंवा नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व जर उदयास आले तर विकल्प दिसेल.
पण काँग्रेसला मत मात्र देणार नाहीं.
6 Jan 2011 - 9:34 am | आशिष सुर्वे
तिरंगा!
ज्या तिरंग्यासाठी रक्ताचे पाट वाहिलेत, त्या तिरंग्याचे राजकारण करताहेत हे हरामखोर्र!!
6 Jan 2011 - 10:20 am | गवि
नाही पटले.
संदर्भ नीट बघूया..
१. "भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. "
२. "काश्मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले.
३. "भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल ते काश्मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे."
>>>
वरील काही वाक्यांतूनच संदर्भ स्पष्ट होतो आहे असं दिसतंय.
प. बंगाल (बांग्लादेश रेफर करण्यासाठी प.बंगाल हे आरंभस्थान निवडले असणार. )ते काश्मीर खोरे. "
.."राष्ट्रध्वज यात्रा"
"'चलो काश्मीर' ची हाक"
या सर्व ठळक शब्दांमधून काय व्यक्त होते आहे याचा शांतपणे विचार करावा. काश्मीर हे सेन्सेटिव्ह आहेच ही फॅक्ट मुळात अमान्य करून काय होणार?
भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम.
केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे.
पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं.
6 Jan 2011 - 10:20 am | पंगा
फक्त कश्मीरी जनता?
6 Jan 2011 - 10:29 am | गवि
हो..
थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते.
(गृहीतकः काश्मिरी जनता म्हणजे प्रत्यक्ष भौगोलिक दृष्ट्या काश्मीरमधे राहणारे भारतीय सर्वधर्मीय असे मी समजतो. आणि या प्रतिसादात भारतात आणि काश्मीरमधे मी कोणताही फरक करत नाहीये. हेच अन्य कुठेही , कोणत्याही राज्यात "चलो" करुन काही भडकू शकत असेल तर तिथेही लागू आहेच.)
17 Jan 2011 - 9:09 pm | पंगा
पटण्यासारखे आहे.
6 Jan 2011 - 10:59 am | मी_ओंकार
गविंशी सहमत.
राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे. उगाच डोके भडकावून घेण्यात काही अर्थ नाही. उगाच मारूतीच्या बेंबीत बोट घालून मग भुंगा चावला म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही. ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. माध्यमांनीही सबुरी दाखवली पाहिजे.
- ओंकार.
25 Jan 2011 - 10:09 am | चिंतामणी
भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम.
केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे.
पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं.
स्वराज, जेटली, अनंतकुमार यांना अटक
http://www.esakal.com/esakal/20110125/4709043530602923099.htm
श्रीनगर - भारतीय जनता पक्षाची "तिरंगा यात्रा' रोखण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने कंबर कसली आहे. सर्व सीमा बंद करतानाच राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या लखमापूरजवळ पोलिस आणि सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीहून विमानाने आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुरवातीला विमानतळावरच रोखण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली. रेल्वेने दाखल झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे अठराशे कार्यकर्त्यांना सक्तीने स्वगृही परत धाडण्यात आले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाजप कार्यकर्त्यांना दाखविला परतीचा रस्ता
http://www.esakal.com/esakal/20110123/4957367794433620389.htm
पुणे - प्रजासत्ताक दिनी जम्मू येथील लाल चौकात तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटकातून निघालेले भाजप जनता युवा मार्चाचे कार्यकर्ते २३ बोगींची एक विशेष रेल्वे करून बंगळूरहून श्रीनगरकडे निघाले होते. मनमाडजवळ आल्यानंतर रात्री अडीच वाजता पोलिसांनी रेल्वे थांबविली आणि गाडीचे इंजिन बदलून व पोलिसांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडून गाडीला परत बंगळुरला रवाना करण्यात आली.
रात्री झोपेत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या प्रकाराचा माहितीच होऊ दिली नाही. पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान (एसआरपीएफ) व रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी गाडीतील सर्व दिवे घालविण्यात आले, त्यानंतर पुढील इंजिन काढून मागच्या बाजूला बसविण्यात आले, शिवाय पोलीस जवानांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडण्यात आले व गाडी परत बंगळुरूकडे रवाना करण्यात आली.
.
.
.
.
प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगा यात्रेसाठी इतर कोणत्याही राज्यातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर सरकारने जाहीर केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
दोन नमुने परिस्थीतीचे चित्रण दाखवायला पुरेसे असावेत.
25 Jan 2011 - 10:18 am | गवि
अहो हे सर्व त्यांना तिथे पोहोचूच न देण्याबद्दल झालं..
चालू पॉलिसीनुसार हे ठीकच आहे की. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणांहून जमा होत आहेत लोक, तेव्हा अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे होतंय.
वर केलेला उल्लेख हा भडका उडाल्यावर परत निघण्याविषयीचा होता. अयोध्या, करसेवा ,रथयात्रा या वेळी हे दिसलंय हो.
"भाजप"च नाही, एकूण कोणताही पक्ष जर जागी पोहोचला आणि रक्कस करण्यात यशस्वी झाला तर स्फोटक परिस्थिती होताक्षणीच काढता पाय घेतोच हो.
म्हणून तिथे मॉबिंग होऊ दिले जात नाहीये ही प्रिव्हेंटिव्ह कारवाई बरीच की.
एकटा मनुष्य गेला तिथे आणि लावला झेंडा, किंवा राहिला उपस्थित तिथल्या एका कार्यक्रमाला तर कोण अडवणार आहे.
विरोध झुंडशाहीला आहे.
25 Jan 2011 - 10:47 am | llपुण्याचे पेशवेll
>> विरोध झुंडशाहीला आहे.
जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात. :)
25 Jan 2011 - 11:11 am | पंगा
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच.
25 Jan 2011 - 11:27 am | llपुण्याचे पेशवेll
आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग मानत असल्याने भारतीयाने भारतात तिरंगा फडकवणे असा विचार करतो आहोत. अन्यथा ६० टक्के काश्मिरी जनता एवढाच विषय असल्यास त्याच न्यायाने राज ठाकरेची म्हटली जाणारी झुंडशाही ही बहुमताची सुरुवातच म्हटली पाहीजे. (म्हणजे त्याच्या विचारांच्या लोकांचे बहुमत होईल की नाही हे माहीत नाही पण बहुमताला सुरुवात झाली असे नक्की म्हणता येईल. नाही का!)
अन्यथा काश्मिर सोडून देऊन द्यावा (त्यांना स्वातंत्र्य द्यावे) आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्याशी मैत्रीही ठेऊ नये.
25 Jan 2011 - 11:33 am | पंगा
उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय?
25 Jan 2011 - 11:39 am | llपुण्याचे पेशवेll
उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय?
मोडत असावेत असे वाटते म्हणूनच महाराष्ट्रवाद आणि काश्मिरवाद यांची तुलना करणे आले. जर असा न्याय काश्मिरवादाला असेल तर महाराष्ट्रवादालाही मिळणार का? म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का?
(डिस्क्लेमरः वरील महाराष्ट्रवाद कुठेही अस्तित्वात नाही केवळ तुलनात्मक उदाहरण म्हणून वापरला आहे. )
25 Jan 2011 - 11:45 am | गवि
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का?
अगदी जरूर.
कोणी जर कुरापतखोर रितीने एकजूट करून एका प्रदेशात जाऊन भडका करणार असतील तर जरुर अटक, रेल्वेचे डबे वळवणे (बादवे, अत्यंत बालिश उपाय वाटला), आणि इतर कारवाई करावी. मग ते राज्य काश्मीर असो वा महाराष्ट्र..किंवा अंदमान निकोबार देखील.
25 Jan 2011 - 11:49 am | पंगा
महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते.
तूर्तास महाराष्ट्रातील परिस्थिती महाराष्ट्रातच नियंत्रणात ठेवण्याचा प्रशासनाचा बेत असावा किंवा कसे?
25 Jan 2011 - 11:59 am | llपुण्याचे पेशवेll
>>महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते.
सहमत. प्रशासन अन्य गोष्टीत कदाचित राखून ठेवण्याचा हक्क वापरण्यात मष्गुल दिसते आहे. जेव्हा बिहारी सर्वपक्षीय दल पंतप्रधानांना भेटले तेव्हा "आत्ता शांत रहा आम्ही परिस्थिती हाताळत आहोत. भडकाऊ विधाने करून परिस्थिती अजून भडकऊ नका." असा सामोपचाराचा जाहीर उपदेश पंतप्रधानांनी केल्याचे स्मरणात नाही.
25 Jan 2011 - 12:10 pm | पंगा
...अगदी आख्ख्या जम्मू आणि कश्मीरच्या जनतेने झेंडावंदन जरी नाही केले, तरी उर्वरित भारताची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सहासष्ट टक्क्यांहून अधिक भरत असावी, असे वाटते. (खात्री नाही.) त्यामुळे (झेंडावंदनासाठी) कोरमचाच जर प्रश्न असेल, तर तशी अडचण बहुधा येऊ नये. संपूर्ण भारताच्या सहासष्टाहून अधिक टक्के जनतेकडून तरीही झेंडावंदन व्हावेच.
हं, आता उर्वरित भारतातील जनता झेंडावंदनात विशेष रस दाखवत नाही (आणि म्हणून कोरमपूर्ती होत नाही) ही जर अडचण असेल, आणि म्हणून कोरमपूर्तीकरिता रिक्रूटभरतीसाठी श्रीनगरकडे कूच करण्याची (नामी) कल्पना असेल, तर प्रश्न वेगळा. मात्र सद्यपरिस्थितीत त्याला यश येण्याची शक्यता बरीच कमी वाटते, याची पूर्वसूचना देण्याची कर्तव्यपूर्ती करू इच्छितो, इतकेच. बाकी ज्याचीत्याची मर्जी.
25 Jan 2011 - 1:47 pm | चिंतामणी
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच.
पुन्हा तेच सांगतो. काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रजेतील ज्यांना तिरंगा फडकवायची इच्छा असेल त्यांना कुठले सरकार पाठिंबा देणार???????? भारताचे की पाकिस्तानचे?
(तुमचे पंडितांच्या हकालपट्टीबद्दलचे मौन बरेच काही सांगुन जात आहे.)
25 Jan 2011 - 2:04 pm | नितिन थत्ते
>>काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे.
काश्मीरात एवढे पंडित (२० व्या शतकात) कधी होते?
he US Department of State reports that, according to the Indian National Human Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001
(१९४१ ते १९४७ या काळात किती जणांचे स्थलांतर झाले ते माहिती नाही).
खरोखरच ३५-४० टक्के असते तर त्यांना हाकलणे शक्य झालेच नसते.
दुसरी एक रोचक बाब म्हणजे हे हाकलणे १९८९ च्या शेवटी आणि १९९० च्या सुरुवातीस झाले जेव्हा केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर नव्हता. उलट भाजपचा बाहेरून पाठिंबा असलेला जनता दल पक्ष सत्तेवर होता. तेव्हा तो एक्झोडस थांबवण्याचा दबाव (पाठिंब्यासाठी अवलंबून असलेल्या) सरकारवर भाजपने आणल्याचे स्मरत नाही.
Exodus (1985-1995)
In late 1989 and early 1990, islamic terrorism in Kashmir led to the pandits leaving the Valley. These families intended to return to the Valley after restoration of normalcy.
25 Jan 2011 - 5:29 pm | चिंतामणी
Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001
टक्केवारी हा गमतीशीर प्रकार असतो. मला एक सांगा
१९४१ला काश्मीरची लोकसंख्या किती होती?
१९८९ला काश्मीरची लोकसंख्या किती होती?
२००१ ला काश्मीरची लोकसंख्या किती आहे?
(मी काश्मीरबद्दल बोलत आहे. जम्मु काश्मीरबद्दल नाही)
आता हे वाचा.
400,000 Kashmiri Pandits, constituting 99% of the total population of Hindus living in Muslim majority area of the Kashmir Valley, were forcibly pushed out of the Valley by Muslim terrorists, trained in Pakistan, since the end of 1989. They have been forced to live the life of exiles in their own country, outside their homeland, by unleashing a systematic campaign of terror, murder, loot and arson.
मानवी अधीकारवाले जे जमखी अथवा मृत झालेल्या दगडफेक करणारे असतात त्यांच्या बाजुन धाय मोकलुन रडतात त्यांचे कडे याचे काय उत्तर आहे????
Failure of Human Rights Organisations:
*
Leading International Human Rights Organisations like Amnesty International, Asia Watch and others have yet to take proper cognisance of the genocide perpetrated on Kashmiri Pandits.
*
Their representatives have so far failed to visit the camps in Jammu, Delhi and other parts of India were thousands of families are puting up for the last five years.
*
Gradual extinction of a civilised community with an ancient culture is yet to shake the conscience of the world.
25 Jan 2011 - 7:00 pm | चिंतामणी
National Human Rights Commission, New Delhi, India
Archive Search
Keywords Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir
Release Date From (dd/mm/yyyy) TO
Searched the NHRC Database. No Aricle with above information was found.
Note: For further details kindly contact National Human Rights Commission, Faridkot House, Copernicus Marg, New Delhi, PIN 110001 Tel.No. 23384012 Fax No. 23384863 E-Mail: covdnhrc@nic.in, ionhrc@nic.in
Disclaimer: Neither NHRC nor NIC is responsible for any inadvertent error that may have crept in the Information being published on NET.
National Human Rights Commission, New Delhi, Indiaच्या वेबसाईटवर Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir याबद्द्लचा कोणताही रिपोर्ट मिळाला नाही.
http://www.nhrc.nic.in/
येथे जाउन खात्री करू शकता.
25 Jan 2011 - 7:38 pm | सुनील
काश्मिरींत पंडितांची एकूण संख्या ५ टक्क्याच्या आत-बाहेर आहे. सध्या पुरावा शोधायला वेळ नाही. मिळाल्यावर पाठवून देईन.
26 Jan 2011 - 12:19 am | चिंतामणी
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.
27 Jan 2011 - 8:17 am | पंगा
'मेनस्ट्रीम' पाकिस्तानातून? की पाकव्याप्त (किंवा तथाकथित 'आज़ाद') कश्मीरमधून? (म्हणजे 'पलीकडच्या' पण तरीही कश्मीरीच जनतेची टक्केवारी?)
आणि याला जर इतकाच विरोध आहे, तर मग दोन्ही कश्मीरांमधील जनतेच्या परस्परसंपर्कासाठी आणि आवकजावकीसाठी आंतरकश्मीर बससेवा नेमकी भाजपच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत कशी काय सुरू झाली? (टीपः त्या बससेवेस विरोध करण्याचा उद्देश नाही. 'त्या' सरकारने केलेल्या फार थोड्या चांगल्या आणि 'सेन्सिबल' कामांपैकी ते मी एक मानतो.)
दुसरे म्हणजे, कश्मीरच्या 'त्या' भागावर भारत जर आपला हक्क सांगतो, तर मग कश्मीरच्या (पर्यायाने भारताच्या) 'त्या' भागातील प्रजेस (पर्यायाने: भारताच्या घटनेनुसार जन्मसिद्ध आणि रहिवाससिद्ध नागरिकांस, मग भले ते स्वतः तसे मानोत अथवा न मानोत) - भारताच्या (आणि खुद्द कश्मीरच्या) दुसर्या भागात जाण्यास आक्षेप का असावा? आणि तोही 'भारताच्या जम्मू आणि कश्मीरव्यतिरिक्त भागातील रहिवासी नागरिकांस जम्मू आणि कश्मीरमध्ये (पर्यायाने: भारताच्याच एका भागात) रहिवासास आणि मालमत्ता राखण्यास परवानगी नाही' या कारणास्तव ३७०व्या कलमाचा विरोध करणार्या पक्षाकडून?
(टीपः कश्मीरच्या 'त्या' भागातील रहिवाशांचा भारताच्या ताब्यात असलेल्या ज. आणि क. मध्ये किंवा उर्वरित भारतात प्रवेश आणि संचार हा सद्यपरिस्थितीत पूर्णपणे अनिर्बंध असावा असे मुळीच म्हणणे नाही. आहे त्या परिस्थितीत सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी असे निर्बंध असणे किंवा घालणे हे केवळ समर्थनीयच नव्हे, तर आवश्यक आहे. पण मग नेमक्या त्याच सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी, बाहेरून प्रचंड जमावाने येऊ पाहणार्या (म्हणजेच स्थानिक नसलेल्या) चिथावणीखोर एलेमेंटांवर काही निर्बंध जर स्थानिक प्रशासनाने घातले, तर त्यात नेमके काय चुकले?
एकट्या श्रीमती सुषमा स्वराज यांनी (किंवा भाजपच्या कोणत्याही एका - किंवा दोघातिघा - नेत्यांनी) येऊन शांतपणे जर झेंडावंदन केले असते - श्री. ओमर अबदुल्लाह यांच्या बरोबरीने किंवा स्वतंत्रपणे - तर त्यात आक्षेप घेण्यासारखे असे बहुधा काही नसते. आणि त्या परिस्थितीत कदाचित असे निर्बंध हे निषेधार्ह ठरू शकले असते. आणि हे कृत्य एक प्रभावी 'पोलिटिकल स्टेटमेंट'ही ठरू शकते. पण जमावासहित?
अशा वेळी, अशा भारलेल्या वातावरणात आणि एवढा जमाव असताना काय होऊ शकते, एवढे न समजण्याइतके आपण बाळबोध झालो आहोत काय? सहा डिसेंबर एकोणीसशेब्याण्णवची घटना आपण इतक्या लवकर विसरून गेलो आहोत काय?)
6 Jan 2011 - 11:06 am | रणजित चितळे
आपल्याच देशात आपण आपला राष्ट्रीय सण साजारा करु शकत नाही.
पहिल्यांदा हिंदुंना काश्मिर मधुन बाहेर काढले.
आता ओमर चे हे व्यक्तव्य म्हणजे मग काही झाले तर जबाबदारी झटकण्यासारखे झाले.
खरे तर भाजप ने झेंडा फडकवण्याने एवढे होणार नाही तेवढे ओमर ह्यांच्या व्यक्तव्याने होईल कारण अतिरेक्यांना आता ईशारा मिळाल्या सारखा झाला. ओमर हेच अशी विधाने करुन लोकांना भडकवत आहेत.
एक तर ओमर किती बिनकामी मनुष्य आहे ते त्याने दाखवुन दिले मध्ये कश्मिरमध्ये जे झाले त्याने. राजकारण्यांची मुले एकदम मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ लागली म्हणजे असेच होणार.
काळे साहेब म्हणतात ते बरोबर आहे आपण जागरुक होण्याची वेळ आली आहे.
6 Jan 2011 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार
ते झेंड्याच्या चड्डीचे काय झाले ?
6 Jan 2011 - 12:16 pm | सुनील
@ गवि
पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं.
@मी_ओंकार
राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे
ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते.
दोघांशीही सहमत.
असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही.
बाकी चालू दे...
6 Jan 2011 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
विजुभौंचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे.
6 Jan 2011 - 12:53 pm | सुधीर काळे
राजकारण्यांना द्या सोडून! आम्हाला काय देणं-घेणं आहे 'भाजपा'शी किंवा 'रास्वसं'शी? मी केवळ एक भारतीय या नात्याने ओमार यांच्या वक्तव्यावर खेद आणि शोक व्यक्त करीत आहे कारण त्यांचे विधान मला तरी समर्थनीय वाटत नाहीं.
आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? मागच्या राज्यकर्त्यांनी काय केले त्यात कशाला जायचे?
दुसरे म्हणजे मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? (खरे-खोटे जरूर सांगावे)
बाकी चालू द्या! (चालू आहेच!)
6 Jan 2011 - 1:23 pm | गवि
"राजकारण्यांना द्या सोडून", असं कसं?
एक राजकीय पक्ष "चलो काश्मिर" आणि "राष्ट्रध्वज यात्रा" (रथ यात्रा शी साम्य साधणारा शब्द) वापरुन तिथे झेंडा फडकवण्यामागचा आपला राजकीय हेतू ढळढळीत व्यक्त करत असतानाही केवळ
आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता?
या आपल्या म्हणण्यासोबत त्या "झेंडा फडकवण्या"मागची मानसिकताही पहा ना.
"आम्हाला काय देणं-घेणं आहे" असं म्हणून मूळ उद्देश / परिस्थिती नाहीशी होईल का?
डोळे मिटून घेण्याचा प्रकार होईल ना तो?
6 Jan 2011 - 2:56 pm | सुधीर काळे
मी राजकीय पक्षांना सोडून द्या म्हणालो कारण काँग्रेस काय किंवा भाजप काय, त्यांची वागणूक अशीच धरसोडवृत्तीची आहे.
पण देशाचे हित पाहिलेच पाहिजे.
पण १४ ऑगस्टच्या मुख्य प्रश्नाचे उत्तर राहिलेच कीं! खरे आहे काय मी वाचलेले? कोणी जाणकार सांगेल काय?
आणि पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याने कांहीं आपल्या हातातले काश्मीर जात नाहींच!
अवांतरः सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे.....
दरम्यान "शेख अब्दुल्लाकी जय"!
7 Jan 2011 - 8:14 am | चिंतामणी
सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे.....
बेत नका करू. लिहा. तुमच्या लिखाणाची अनेकजन वाट पहात आहेत. लौकर येउ द्यात.
6 Jan 2011 - 12:16 pm | आदिजोशी
रथयात्रेमुळे झाले ते नुकसान खूप झाले. आता त्याची पुनरावॄती नको.
भाजपा इथे खाजवून खरूज काढून झेंड्याचे राजकारण करत आहे. काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. त्यात पुन्हा भाजपाच्या ह्या आचरट प्रकारामुळे वातावरण पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. सत्तेच्या राजकारणासाठी भाजपा खूप खालच्या पातळीवर उतरत आहे. ह्यांच्या अशा दळभद्री कार्यांमुळे हकनाक सामान्य माणूस भरडला जाईल. समाजकंटकांना कारणच हवे आहे. ते भाजपा देते आहे.
6 Jan 2011 - 12:46 pm | चिंतामणी
आपण असे विधान करताना ईतीहास विसरत असावेत किंवा आपणाला माहीत नसावा असे दिसते. आपणास डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांचे बद्दल काय माहिती हे सांगा. माहीत नसेल तर ती माहिती करून घ्या आणि मग परत आपला प्रतीसाद बघावा.
आता अब्दुला पिता-पुत्रांबद्दल बोलु. जिकडे सरशी तीकडे पारशी असली यांची वृत्ती आहे. सत्तेत असल्याचीए तळी उचलायची आणि जम्मु काश्मीरमधे आपली पोळी भाजायची असले यांचे उद्योग. ह्यापेक्षा जास्त बोलायची जरूरी नाही.
6 Jan 2011 - 12:54 pm | रणजित चितळे
काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे.
परिस्थिती आटोक्यात नाहीये कधीच नव्हती. १९४८ मध्ये पाकिस्तान ने चढाई केली. पुढे ६५, ७१ चे युद्धाने पाकिस्तानला समजले की युद्धाने त्याची आर्थीक हानी जास्त होते. मग झिया उल हक चा फॉम्यला - अतिरेकी कारवाया करुन पोखरुन टाकायचा कट शिजला व त्याच कटा प्रमाणे सध्या पण चालले आहे.
हिंदुना विस्थापित करुन तेथली डेमोग्राफी (मराठी शब्द आठवत नाही - महाराष्ट्राबाहेर राहण्याचे धोके) व्यवस्थीत पणे बदलली जात आहे.
त्या मुळे कश्मिर शांत आहे व त्या शांतीत भंग होईल असे नाही.
हा प्रश्न (खाजवुन खरुज काढायचा) अरुंधती रॉय व तत्सम लोकांना विचारला तर बरे होईल त्यांना तर कश्मिर सारखे वातावरण सगळ्या भारतात करायचे आहे. त्यांच्या विरुद्ध एकत्रीत आवाज उठवायची गरज आहे.
त्यांना वाईट वाटेल म्हणुन ध्वजारोहण नको करायला म्हणजे किती हतबल पणा आहे.
रक्त आटते,
मन सुकते,
आपल्या राष्ट्रात
आपणच स्वस्त।
त्यांच्या सांभाळा संवेदना,
झाकुन आपल्या वेदना।
वंदेमातरम् नको,
गुरुला फाशी नको।
समान कायदा नको,
काश्मिरात पंडीत नको।
तरीही तोंडे ह्यांची’,
मक्के कडे सदाची।
6 Jan 2011 - 1:14 pm | आदिजोशी
अब्दुल्ला पिता-पुत्र, स्वातंत्र्यप्राप्तीपासून धगधगत असलेले काश्मीर, तिथून हिंदूंना पद्धतशीरपणे हुसकावणे, अरुंधती रॉय सारखे थर्डक्लास समाजवादी, शेपूटघाले राजकारणी ह्या विषयावर काहीच बोलायचे नाही. ह्या समस्या निर्विवादपणे आहेतच. त्याबद्दल दुमत असायचे कारणच नाही.
पण काश्मीरमधे बसलेली माकडं कुराण जाळण्याच्या प्रकरणानंतर अजून एखादे कोलीत सापडायची वाट बघत आहेत. ते त्यांना ह्या उद्योगांमुळे मिळणार आहे.
रथयात्रेचे मॉडेल भाजपा सत्तेसाठी पुन्हा रिप्लीकेट करत आहे. लोकांच्या भावना भडकावून आपली पोळी भाजायचाच हा प्रयत्न आहे.
भाजपा देशप्रेमापोटी तिथे झेंडा फडकवायला जात आहे असं मानण्याइतका मी तरी नक्कीचा भाबडा नाही.
6 Jan 2011 - 1:27 pm | चिंतामणी
या घटनेचा निषेध फक्त तिथे तिरंगा फडकवुन च होव्वो शकतो ...
कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो ....
(फोटो- सौजन्य मंगेश जोशी)
6 Jan 2011 - 1:34 pm | गवि
आगीवर पाणी फवारतात की पेट्रोल ?
6 Jan 2011 - 1:59 pm | चिंतामणी
का ते पुन्हा आग लावतील म्हणून गप्प बसायचे??????
आणि पाणी फरावयचे म्हणजे नक्की काय करायचे आणि कोणी करायचे हे जरा सवीस्त सांगा.
6 Jan 2011 - 2:18 pm | गवि
कारवाई काय केली हा प्रश्न रास्त.
नसेल केली तर ती चूक.
पण या फोटोला उत्तर म्हणून भाजपप्रणित मॉबने तिथे जायचे आणि झेंडा फडकवण्याच्या नावाने वातावरण तापवायचे याने हा भडका विझेल असं तुम्हाला खरंच वाटतं का?
सोल्यूशन सापडत नाही / उपरिफोटोनिर्दिष्ट दुरित लोकांवर कारवाई झाली नाही म्हणून तो उपाय मिळेपर्यंत "कुछ करिये कुछ करिये" अशा इम्पल्सिव्ह वृत्तीने प्रॉब्लेमचा गुंता वाढवत ठेवेल असे काही करायचे का?
एंड टू एंड उपाय कोणाकडेही असेल तर अगदी जरुर करावा..पण हे जे काही करण्याचा प्लॅन आहे त्याने पेट्रोल ओतणे हाच इफेक्ट होणार.
तिढा सोडवायचाय की पिळायचाय?
7 Jan 2011 - 8:26 am | चिंतामणी
मी तेच वेगळ्या शब्दात वर लिहीले आहे. पाणी फवारायचे म्हणजे काय? ते कोणी करायचे?
काही मुद्दे मांडले तर पुन्हा तेच तेच बोलु नका असा गलका होणार. पण रथयात्रेचे उदाहरण देणा-यांना आपल्या देशात निर्वासीत होण्याची पाळी आलेल्या काश्मीरी पंडीताचे हाल कधी दिसणार? त्याबद्दल कधी आवाज उठवणार?
दगडफेकीसाठी पैसे देणा-या आणि मग गोळीबारात जमखी अथवा मेलेल्यांच्या नावाने गळे काढणा-या तथाकथीत नेत्यांवर आणि मानव अधिकाराच्या नावाने गळा काढणा-यांवर काय कारवाई झाली?
कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो ....
6 Jan 2011 - 2:16 pm | आदिजोशी
रथयात्रेतून उद्भवलेल्या दंगलींचे भावना भडकवणारे फोटो मी सुद्धा देऊ शकतो. पण ते सगळे पुन्हा घडायला हवे का? झेंडा फडकवायचा तर तिथे जा आणि फडकवा. देशभर वातावरण तापवत तिथे जायची काय गरज आहे? भाजपा सरळ सरळ लोकांच्या भावनांना हात घालून त्यांना *त्या बनवत आहे आणि आपण बनतो आहोत.
राजकारण्यांचा सत्तेच खेळ होतो, आणि मधल्यामधे *ड आपली लागते.
6 Jan 2011 - 2:57 pm | सिद्धार्थ ४
सन्पादकाना विनती आहे, की हा फोटो ईथून काढावा.
7 Jan 2011 - 7:54 am | सुधीर काळे
सिद्धार्थ-जी, बघवत नाहीं ना? नाहींच बघवत. पण ते एक विदारक सत्य आहे.
आणि त्यातल्या त्या गुबगुबीत व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला हवीच, पण झाली कीं नाहीं हे मला तरी माहीत नाहीं! कुणाला माहीत असल्यास इथे लिहावे.
या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे. तो झाकायचीही त्याला गरज वाटत नाहीं. कारण स्पष्ट आहे, नाहीं कां?
आणि आपला ध्वज कुणी जाळला तर काय झालं? काश्मीर तर आहेच ना आपल्याचकडे?
पण तेच काम एकाद्या 'रास्वसं'वाल्याने केले कीं आपल्या सरकारचे बाहू स्फुरण पावू लागतात. एरवी "त्यात काय झालं"च्या तर्कशास्त्राचा वापर होतो!
(टीपः 'रास्वसं'बद्दल राजकीय किंवा वैचारिक जवळीक नाहीं पण ते १०० टक्के देशभक्त आहेत, गद्दार नाहींत यात मला शंका वाटत नाहीं.)
7 Jan 2011 - 8:32 am | नितिन थत्ते
हा फोटो गेली कित्येक वर्षे सर्क्युलेशनमध्ये आहे. ही एकमेव घटना घडली आहे असे समजावे का?
या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी.
7 Jan 2011 - 9:46 am | सुनील
या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही.
7 Jan 2011 - 10:04 am | चिंतामणी
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही.
क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद?
या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो.
एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते.
"पण हे पाकीस्तानातील कशावरून" असे विचारून मी विषयाला फाटा फोडु इच्छीत नाही.
7 Jan 2011 - 10:15 am | सुनील
पाकिस्तानातील काही मंडळी भारतीय ध्वज जाळत असतील तर त्याला भारतातील काहींनी कसे प्रत्युत्तर द्यावे? मुळात असे काही प्रत्युत्तर देण्याची गरज आहेच का?
7 Jan 2011 - 12:12 pm | चिंतामणी
ही प्रतिक्रीया म्हणजे "वेड पांघरुन पेडगावला जाणे" या म्हणीचा प्रत्यंतर देणारा आहे. किंवा मी काय म्हणले हे आपल्याला समजले नसावे.
माझी प्रतिक्रीया "खो खो खो"ला होती. पुन्हा एकदा वाचा.
क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद?
या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो.
एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते.
7 Jan 2011 - 4:02 pm | सुधीर काळे
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. हे विधान कुठल्या माहितीवर आधारित आहे हे कळले तर बरे वाटेल!
मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? या प्रश्नाचे उत्तर अद्याप बाकी आहे. (खोटे असल्यास बरे वाटेल)
26 Jan 2011 - 9:38 am | चिंतामणी
हा १४ ऑगस्टला गेला आहे की नाही हे माहीत नाही. पण लाल चौकात फडकावला आहे हे नक्की.
(तो इद उल फित्रच्या नमाजानंतर फडकवण्यत आला होता. तारीख लक्षात नाही)
[Kashmiri protesters cheer as others climb the landmark clock tower and hoist the flag of Pakistan during a protest rally after Eid Ul-Fitr prayers in Srinagar]
7 Jan 2011 - 11:14 am | सुधीर काळे
आपल्या काश्मीरमधील फुटीरवादी नागरिक 'कंडेम समझौता' असे लिहू शकत नाहींत काय? आणि "कधी जाळला" याला काय महत्व आहे?
6 Jan 2011 - 1:32 pm | निनाद मुक्काम प...
मुळात प्रश्न असा आहे कि ओमार ह्यांच्याकडे काश्मीरचे नावापुरेते दायित्व आहे .फुटीरवादी किंवा सामान्य जनता जर त्यांना भिक घालत असती
.तर मुळात सध्याच्या काळात काश्मीर प्रश्न चिघळला नसता .
भाजपच्या झेंडा वादनामुळे कदाचित परिस्थिती चिघळेल. पण मूळ मुद्दा असा आहे कि ह्याप्रशनी सामान्य जनता व फुटीर वादी काय भूमिका घेतात हे तरी स्पष्ट होईल
.सध्याची काश्मिरातील शांतता हि तात्पुरती आहे .सध्या पाकिस्तानात राजकीय अस्थिरता कळसावर पोहचली आहे त्यामुळे सत्ता प्राप्तीसाठी मुल्ला व लष्कर मोठी भूमिका त्यांचा राजकारणात निभावणार
.मग भले अमेरिका बाहेरून काहीही सांगाव .त्यामुळे काश्मिरात सीमेपलीकडून हल्ले किंवा इतर उपद्रव अटल आहे
.भारत द्वेष हे पाकिस्तानला एकत्र ठेवण्याचे एकमात्र साधन तेथील सर्व स्तरीय दबाव गटांना वाटते .अश्यावेळी एक कणखर भूमिका भारतीय सरकारने घेतली पाहिजे
.भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू
कोणत्याही परिस्थितीत
.बाकी झेंडा वंदन करण्यात गैर काहीच नाही मात्र ते करताना .त्यांना धार्मिक रंग चढू देता कामा नये .बाकी तेल अलीव वरून गुरुमंत्र चांगलाच मिळाला आहे .असे दिसून येते .
अर्थात भाजपच्या ह्या सडेतोड भूमिकेचे स्वागत आहे .
6 Jan 2011 - 2:02 pm | नितिन थत्ते
>>भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू
कोणत्याही परिस्थितीत
यात भाजपच्या निमित्ताने दाखवून काय द्यायचे आहे? ते तर ६० वर्षे काश्मीर ठेवलेच आहे की अविभाज्य अंग म्हणून....
6 Jan 2011 - 2:39 pm | आजानुकर्ण
थत्ते यांच्याशी सहमत.
भाजपा इतक्या खालच्या थराला जाणार याची खात्रीच होती
6 Jan 2011 - 2:53 pm | निनाद मुक्काम प...
गिलानी ला ज्या प्रकारे आपले सरकार हाताळत आहे .व सध्या झालेल्या काश्मिरातील हिंसाचारामुळे तेथील भूभाग हा केवळ लष्कराच्या उपस्थितीमुळे भारतात टिकून आहे .सामान्य लोक वॉर ऑफ डिस इन्फोर्मेशन ची बळी पडत आहेत .त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्नाला गाझा प्रश्नाची जोडण्याचे पर्यंत पाकडे करत आहेत. बेरोजगारी व सतत सीमेपार होणारे हिरवे ब्रेन वॉश ह्यामुळे काश्मीर तरुण हा हिंसक होऊ लागला आहे .पाकिस्तानमधील अराजकता पाहून त्यांना पाकिस्तान व भारतात न येत स्वताचे स्वतंत्र अस्तित्व हवे आहे .हि भावना तेथे प्रबळ होऊ नये ह्यासाठी लष्कराचा विशेष अधिकार काढून घेणे हा उपाय अनेक विचारवंत सांगत असले तरी तो भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे .
एक साधे उदाहरण वेस्ट बेंक च्या पट्यात ज्यू लोकांच्या वसाहती उभारणी नुकतीच सुरु झाली .ओबामा ह्यांनी हे कृत्य शांती प्रकियेवर बोला फिरवू शकेन असे म्हणून ह्याला विरोध दाखवला तरीही वसाहत बांधण्याचे काम काही थांबले नाही .जग आपली भूमिका काश्मिरात नक्की काय आहे ह्यावरून स्वताची भूमिका सोयीनुसार ठरवणार ( आपले विचारवंत अचानक उगाच नाही काश्मीर प्रश्नी तेथे जाऊन उगाच वक्तव्ये करत आहेत .)
ह्या निम्मिताने वेस्टन वल्ड मधील थिंक टेंक भारतीय जनमानसाचा कानोसा घेत आहे. कि भारतीय जनतेत काश्मीर विषयी नक्की काय भूमिका आहे .
भारताला जगाशी व्यापार हवा आहे पण त्यासाठी काश्मीर प्रसंगी तडजोड मान्य नाही हे जगाला विशेतः अमेरिकेला दाखवून देणे आपल्याला भाग आहे .
इराणशी दिवसेन दिवस आपले संबंध खराब होण्यामागे अमेरिका आहे हे कुणीही सांगेन ,
नुकतेच आपल्या एकूण तेल पुरवठ्या पैकी १४ % इराण आपल्याला पुरवते जो पुरवठा शाश्वत आहे दीर्घकाळापासून .
पण रिझर्व बेन्केने चलनाची जाचक अट समोर आणली आहे जेने करून हा पुरवठा धोक्यात आला आहे .नुकतेच युन मध्ये इराणविरुद्ध आपण मत दिले आहे
अमेरिकेशी सहकार्य आवश्यक आहे पण त्यांचे बाहुले बनणे अजिबात योग्य ठरणार नाही .म्हणूनच त्यांना व जगाला काश्मिरात कोणत्याही परीस्थित तडजोड नाही हे विविध सिंबोलिक कृतीतून दाखवणे आवश्यक आहे . तू नळीवर इंडिया व काश्मीर २०१० एवढे तैप करा नि मग आपल्या विरुध्ध विखारी प्रचार तुम्हाला कळून येईन
6 Jan 2011 - 4:00 pm | क्लिंटन
भाजपाने रामजन्मभूमीसारख्या मुद्द्याचे राजकारण करून स्वत:च्या स्वार्थासाठी वापरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक कृतीविषयी शंका उत्पन्न होतेच. काश्मीरात तिरंगा फडकावायचा ही कृती त्यातीलच एक.काश्मीरात झेंडा फडकाविण्याच्या निमित्ताने पाकिस्तान कशी चिथावणी देत आहे, हुरियतचे नेते कसे हलकट आहेत आणि भारतात राहण्यातच जनतेचे कसे हित आहे हे काश्मीरातील लोकांना परत एकदा सांगणे हा भाजपचा उद्देश नाही हे कोणीही सांगू शकेल.श्रीनगरच्या मार्गावर त्यांच्यावर हल्ले झाले,काही शहरांमध्ये दंगली झाल्या आणि त्या कारणाने झेंडावंदनाला परवानगी नाकारली गेली तर त्याचे भांडवल करून गेलेला जनाधार परत मिळवायचा प्रयत्न करणे हाच त्यांचा प्रयत्न आहे हे न कळण्याइतकी भारतीय जनता दुधखुळी राहिली नाही.किंबहुना त्यांचा झेंडा फडकावायचा कार्यक्रम सुरळीत पार पडला तरच त्यांना त्याचे दु:ख होईल कारण त्यात भांडवल करण्यासारखे काही राहणार नाही.याउलट यात विघ्ने आली तर भाजप नेत्यांना आनंदच होईल कारण त्याचे भांडवल त्यांना करता येईल.
भाजप नेत्यांना एकच सांगावेसे वाटते: तुम्ही रामजन्मभूमी प्रश्नी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकलीत.त्याला माझ्यासारखे अनेक लोक बळी पडले.पण यापुढे तुमचे असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.
क्लिंटन
6 Jan 2011 - 2:49 pm | इन्द्र्राज पवार
ओमार पितापुत्रांबद्दल कितीही डावे मत असले तरी त्यांची भाजपच्या (युवा मोर्चा) आगामी तिरंगा फडकविण्याच्या कार्यक्रमाबाबत होऊ घातलेली वा चिघळू शकणारी भीती अनाठायी म्हणता येणार नाही. दहशतवादी माकडाला आवरता आवरता होत असलेली राज्य आणि केन्द्र सरकारची दमछाक पाहता आता परत त्याच्या हाती कोलीत दिल्यासारखे होणार हे सांगण्यासाठी अगदी १ रुपयावाला पोपट ज्योतिषीदेखील पुरेसा आहे. बीजेपीचे दोन्ही भिष्माचार्य यानी या यात्रेबद्दल अद्यापि काही मत व्यक्त केले नसले तरी 'थिंक टॅन्क मेम्बर अरुण जेटली' सारख्याने ही 'ध्वजयात्रा म्हणजे काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे आम्ही मानतो हे सिद्ध होते आणि यामुळे राष्ट्रीय बंधुत्वाची भावना वाढीला लागेल.." असे जे म्हटले आहे यात नव्याने काय सांगितले आहे? काश्मिर अविभाज्य आहे हे उर्वरित पक्षातीत भारतही मानतो, म्हणून उद्या प्रत्येक राज्यपातळीवरील पक्षाने उठायचे 'झेलम एक्स्प्रेस' पकडायची आणि श्रीनगरच्या सचिवालयावर झेंडा फडकवून आले तर या देशाला तसेच तिथल्या निरपराध जनतेला ते परवडेल किंवा चालेल काय...याचा विचार सर्वप्रथम भाजपसारख्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या धुरिणांनी करणे फार फार गरजेचे आहे.
"अनेक राज्यातून झेंडा लावत जाणार आहे..." ठीक आहे. पण त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत असे कुठले राज्य आहे की जे यात्रेच्या या कार्यक्रमाला विरोध करणार आहे? आणि जर विरोधच नसेल तर भाजपच्या तयारीला वा उद्देशाला तरी काय अर्थ राहणार आहे....त्यासाठी मूळ पत्रिका 'काश्मिर' च असेल आणि तेथे यामुळे होणारा उद्रेकच जेटली अॅण्ड को.ला अभिप्रेत असेल तर बाकीचे सारे युक्तीवाद विफलच ठरणार.
कधी नव्हे ते ओमार प्रथमच सुसूत्ररित्या बोलल्याचे दिसत आहे..."२६ जानेवारीला काश्मिरच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयात रितीनुसार तिरंगा जर फडकाविला जाणारच आहे तर एखाद्या पक्षाने आपला असा वेगळा ध्वजवंदन कार्यक्रम करण्याने काय साधणार?"
याचे उत्तर बीजेपीकडेच असेल.
इन्द्रा
7 Jan 2011 - 10:53 am | सुधीर काळे
इंद्रा-जी,
एक परिस्थिती अशी येते कीं तर्कशास्त्र (logic) बाजूला ठेवून भावनेला प्रधान्य देऊन कांहीं पावले टाकावी लागतात. असे केले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच नसते. काश्मीरमध्ये भीत-भीत पावले टाकण्याचेच आपले धोरण राहिले आहे. भय सोडून ठाम पावले टाकायला आपण जितका जास्त वेळ लावू तितके आपले मूठभर फुटीरवादी शत्रू माजत जातील आणि वाढत जातील!
धोका कशात नाहीं? पण धोक्याला घाबरत घाबरत कधीपर्यंत आपले हे धोरण राबवायचे?
अशी ठाम पावले एकदाच टाकावी लागतात. जिंकलो तर वाद संपतो, हरलो तर मुद्दा सोडून द्यावा लागतो, पण हे सारे एकदाच करावे लागते व तसे करावे अशा विचाराचा मी आहे! (हे माझे मत कदाचित् माझ्या अज्ञानामुळेही असेल!!)
7 Jan 2011 - 12:51 pm | रणजित चितळे
मी आपल्या मताशी सहमत आहे.
7 Jan 2011 - 4:08 pm | चिंतामणी
मी सुद्धा आपण व्यक्त केलेल्या मताशी सहमत आहे.
6 Jan 2011 - 7:16 pm | चिंतामणी
वरील बातमीच्या पार्श्वभुमीवर एक भन्नाट व्यंगचीत्र फेसबुकवर पाहण्यात आले.
सदर फ्यक्तीने व्यंगचीत्र कुठुन घेतले याचा तपशील जरी माहीत नसला तरी या व्यंगचीत्राद्वारे केलेली "कॉमेंट" मात्र छान आहे.
6 Jan 2011 - 7:39 pm | विद्याधर३१
पण ओमर पिता पुत्र राजकारणच करत नाहीत का?
कायदा सुव्यव्स्था या बाबत वेळ पाहून निर्णय करता आला असता. आत्ता पासून साप साप ओरडायची काय गरज होती?
पण ओमर पिता पुत्र व काँग्रेसला यात राजकारण करायचे आहे हे दिसत आहे.
7 Jan 2011 - 12:32 pm | विजुभाऊ
भाजपला सध्या खरेतर विरोध करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. भाजप मध्ये त्या मुद्द्यांचा अभ्यास असणारी काही मम्डळी आहेत. पन सवम्ग प्रसिद्धी मिलवून लोकांच्या भावना हात घालता येतो असे त्याना वाटते.
सोनियाना विरोध , त्यासाठी मुंडण करायची घोषणा वगैरे सवंगपणाच्या अनेक क्लुप्त्या वापरून झाल्या. अर्थकारणावरून , भ्रष्टाचारावरून सरकारला विरोध केला तर ते स्वतःच्याच अंगलट येते आहे असे भाजपच्या लक्षात आले असावे.
स्पेक्ट्रम घोटाळ्याचे धागे थेट भाजप सरकारातील काही दिवंगत नेत्यापर्यन्त जात आहेत हे लक्षात येताच भाजप ने दुसरा मुद्दा पुढे आणला.
काँग्रेस चे नेते भ्रष्टाचारी नाहेत असे नाही पण कर्नाटक मुळे भाजपचे पाय त्याच मातीचे आहेत हे स्पष्ट झाले. हेच जर मनमोहन सिम्गानी कर्नाटक सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बरखास्त केले असते तर भाजपने रान माजवले असते.
फारुख अब्दुलांचे सरकार इंदीरा गांधीनी जेंव्ह्या बरखास्त केले होते तेंव्हा हेच लोक फारुख ना डोक्यावर बसवत होते.
भाजपचे दाखवायचे दात वेगळे आहेत
कांद्याच्या किमती हा मुद्दा सरकारला अडचणीत आणू शकतो. भाजपला तो मुद्दा बीनमहत्वाचा वाटतो.
स्पेक्ट्रम मुद्दा हा भाजपला बीन महत्वाचा वाटतो.
बीहार मध्ये भाजपच्या आमदाराची हत्या झाली. पण आमदाराची हत्या करण्यास एक महीला का प्रवृत्त झाली याचा विचार करण्यास कोणीच भाजप चे नेते तयार नाहीत.
लोकांची विस्मरण शक्ती दांडगी असते....पण भाजपला वाटते इतकी देखील नाही
8 Jan 2011 - 6:38 am | गांधीवादी
तिरंगा फडकाविल्याने काही राष्ट्र मजबूत होत नाही. कुठेही असो. 'काश्मीर' मध्ये असो कि 'लाल किल्ल्यावर' कि आमच्या गल्लीत.............
त्यामुळे कोणीही कुठेही तिरंगा फडकावू नये, इतकंच बिचारे बापडे सांगतायेत.(आणि सद्य सरकार ऐकून घेतंय)
श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून भाजप काय मिळवणार आहे?
आणि लाल किल्ल्यावर फडकावून देखील काय साध्य होते म्हणा ?
आमच्या मते, लाल चौकात तिरंगा फडकावून काहीही साध्य होत नाही, तसेच अनुक्रमे लाल किल्ल्यावर आणि देशातील प्रत्येक शहरात, शहरातील प्रत्येक गल्लीत तिरंगा फडकावून देखील काहीच साध्य होत नाही.
त्यामुळे तिरंगा कुठेच फडकवला जाऊ नये.
17 Jan 2011 - 2:11 pm | चिंतामणी
मिडडेमधे प्रसिध्द झाले आहे हे.
(It could be Indian army vs Indian govt as the govt is planning to reduce troops in Kashmir while army doesn't agree with Govt's assessment of the situation.
Midday cartoon)
17 Jan 2011 - 9:53 pm | सुधीर काळे
(१) मी सध्या य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य" हे पुस्तक वाचत आहे. त्यात शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते फरूक अब्दुल्ला व आता ओमार अब्दुल्लापर्यंत अब्दुल्ला घराण्याच्या ३ पिढ्यांनी ज्या कारवाया (किंवा लीला) गेली ६० वर्षे चालवल्या आहेत-किंवा त्यांना चालवू दिल्या गेल्या आहेत असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल-त्या वाचून मी अगदी धन्य-धन्य झालो! आतापर्यंत फक्त २५ टक्केच पुस्तक वाचून झाले आहे. निम्म्याहून जास्त वाचून झाल्यावर त्यावर आधारित एक धागा सुरू करायचा विचार आहे. सावधान!!
(२) ही ध्वजयात्रा बंगालपासून सुरू व्हायची होती व २६ जानेवारी २०११ला श्रीनगरच्या लाल चौकात पोचायची होती व तिथे आपला तिरंगा फडकवला जाणार होता. ती एव्हाना सुरू व्हायला हवी. ती तशी सुरू झाली आहे काय?
(३) फोटोतील तिरंगा ध्वज पाकिस्तानात जाळला गेला आहे याला काय आधार आहे या माझ्या प्रश्नाला अद्याप उत्तर आलेले नाहीं.
(४) १४ ऑगस्टला लाल चौकात पाकिस्तानचा ध्वज फडकवला जातो ही माझी ऐकीव/वाचलेली माहिती चुकीची आहे काय हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे.
उत्तर जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.
18 Jan 2011 - 8:01 am | सुनील
१) जरूर. वाचण्यास उत्सुक.
२) कल्पना नाही. ह्या बाबतीत अद्याप काही वाचले नाही. जाणून घेण्याची अर्थातच काही गरज वाटत नाही.
३) माझ्या मते, ज्यांनी हा फोटो डकवला त्यांची जबाबदारी आहे हे सिद्ध करण्याची की, हा ध्वज काश्मिरातच जाळला गेला.
४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे.
(पहलगाम, काश्मिर येथे राष्ट्रगीत गायलेला) सुनील
18 Jan 2011 - 7:07 pm | सुधीर काळे
तसे नव्हे, पण तुम्हीच तो पाकिस्तानात जाळला असे ठामपणे सांगितलेत म्हणून मला वाटले तुम्हाला खात्रीची माहिती आहे. केवळ म्हणून(च) तुम्हाला विचारले इतकेच.
नसेल तर राहू द्या.....
18 Jan 2011 - 9:21 pm | सुनील
नाही!
ज्यांनी हा फोटो काश्मिरातीलच म्हणून डकवला त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो पाकिस्तानातीलच असे गृहित धरता येते.
असो, हा फोटो बर्याचदा जालावर फिरला आहे आणि तो समझौता एक्स्प्रेसच्या अपघातानंतर पाकिस्तानात जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.
18 Jan 2011 - 9:31 pm | सुधीर काळे
झकास!
18 Jan 2011 - 9:47 pm | सुनील
अजून एक कारण...
उर्वरीत भारतात घडणार्या (विशेषतः भारतीय मुस्लिमांबाबत) घटनांवर काश्मिरी मुस्लिमांकडून फारशा प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. बाबरी-कांड असो वा गुजरात-कांड, काश्मिरमध्ये त्याबाबत उग्र प्रतिक्रिया वगैरे कधिच झाल्या नाहीत. तेव्हा समझौता प्रकरणात एवढी उग्र प्रतिक्रिया काश्मिरात होईल हेच मुळी संभवत नाही.
हेच उलटदेखिल होते. भारतीय लष्कराकडून काश्मिरी मुस्लिमांवर होणार्या कथित्-तथाकथित अत्याचाराबाबत उर्वरीत भारतातील मुस्लिम फार प्रतिक्रिया देत नाहीत.
तेव्हा असले कसलाही आगापिछा नसलेले निव्वळ भडकाऊ फोटो डकवून काय साध्य होते?
18 Jan 2011 - 11:07 pm | चिंतामणी
आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.
ज्यांनी हा फोटो पाकीस्तानातील आहे असे म्हणले त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो काश्मीरातीलच आहे असे गृहित धरता येते.
सुधीर काळ्यांनी (आणि मी )डकवलेला फोटो (मी डकवलेला उडवलेला दिसत आहे) तिरंगा काश्मीरमधेच जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.
19 Jan 2011 - 1:33 am | सुनील
सदर घटना पाकिस्तानात मुलतान येथे घडली हे दर्शविणारा पुरावा तुम्हाला व्यनिने पाठवला आहे. यापुढे फोटो डकवताना काळजी घ्यावी.
आणि हो, हे शोधण्यात माझा एक तास फुकट गेला तो वसूल करायला एक बियरची सोय करून ठेवा. (ह्.घ्या)
19 Jan 2011 - 12:22 pm | सुधीर काळे
सुनिल-जी,
" " alt="" />
फोटोच्या मुळाबद्दलचा दुवा दिल्याबद्दल आभारी आहे. पण मी असे पाच फोटो "इंच-इंच"वर अपलोड केले होते त्यावेळी तुम्ही कांहीं लिहिले नव्हते. नाहीं तर तेंव्हाच उलगडा झाला असता.
अर्थातच मला हे आधी माहीत असतं तर मी ते नक्कीच वापरले नसते!
आपल्या श्रमाचा मोबदला म्हणून (तूर्तास) एक 'ब्लॅक लेबल' पाठवत आहे. स्वीकार व्हावा.
पण एक गोष्ट लक्षात असू द्या कीं भडकविण्यासाठी मी कधीच लिहीत नाहीं. किंबहुना मी जेंव्हा स्वतः भडकतो तेंव्हांच लिहितो. आणि आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते!
अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते.
बलवान लोकांच्यापुढे गोगलगाय आणि शक्तीहीन लोकांच्यापुढे मात्र बाहू फुरफुरणार्यांबद्दल मला खरंच शून्य आदर आहे!
या उलट कुणाही भारतीयाने पराक्रम केला तर मला तसाचा अभिमानही वाटतो. 'सिटी'चे विक्रम पंडित, 'पेप्सी'च्या इंद्रा नूयी, लूझियाना राज्याचा राज्यपाल बॉबी जिंदल आणि नुकताच ज्यांचा शपथविधी झाला त्या दक्षिण कॅरोलीनाच्या राज्यपाल नम्रता रंधवा हेली (निकी हेली). आजच्या "जकार्ता पोस्ट"मधील निकी हेली यांच्याबद्दलचे माझे हे पत्र वाचा!
http://www.thejakartapost.com/news/2011/01/19/letter-nikki-haley%E2%80%9...
असो. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद.....
19 Jan 2011 - 4:22 pm | चिंतामणी
सुधीरजींच्या शब्दातच सांगतो की "आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते!
अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते."
याच प्रमाणे ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यानेसुद्धा सणक आली. भारतातल्या इतर भागात सरकारी इमारतींबरोबरच सार्वजनीक ठिकाणीसुध्दा ध्वज फडवतात ना. मग तेथे का मनाई? किती दिवस शेपुट घालून बसायचे. कोणीतरी मान वर काढत असेल तर पाठींबा द्यायलाच हवा. मग भले श्री.राहूल गांधीनी तिरंगा फडकवावा.
सुधीरजींनी ब्लॅक लेबल पाठविली आहेच. पण मी बीअर देइन.
25 Jan 2011 - 11:12 am | सहज
योग्य पुरावे - दिलदारपणे दुरुस्ती याबद्दल श्री सुधीर काळे, श्री चिंतामणी तसेच श्री सुनील यांचे हार्दीक अभिनंदन!
अशी चर्चा वाचायला मजा येते.
26 Jan 2011 - 2:39 am | विकास
४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे.
१४ ऑगस्टचे ऐकलेले आहे. खालील छायाचित्र हे गेल्या वर्षीच्या ईदला पाकध्वज त्याच लाल चौकात उभारला गेला त्याचे आहे.
http://www.tehelka.com/channels/News/2010/Sep/25/images/pakistan.jpg