जकार्तामध्ये सादर झालेला "लावणी दर्शना"चा अफलातून कार्यक्रम!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
30 Nov 2010 - 6:02 pm


जकार्तामध्ये सादर झालेला "लावणी दर्शना"चा अफलातून कार्यक्रम!
('मिसळ्पाव' व 'मी मराठी' दोन्हीवसंस्थळाचे सभासद असलेल्यांसाठी माहिती कीं हा लेख याआधी 'मी मराठी' या संस्थळावर प्रकाशित झालेला आहे.)
१९ नोव्हेंबर रोजी येथील "इंडिया क्लब जकार्ता"च्या विद्यमाने "लावणी दर्शन" हा एक बहारदार मराठी कार्यक्रम पहायची संधी सर्व जकार्ताकरांना मिळाली. अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. ('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!)
"इंडिया क्लब जकार्ता"च्या कार्यकारिणीवरील एकमेव मराठी सदस्य श्री. विनय पराडकर यांच्या पुढाकाराने आणि ICCR, जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर (JNICC) आणि भारत सरकार यांच्या वतीने हे पथक इथे आले होते. पण टेलिव्हिजनच्या माध्यमातून त्यांची कीर्ती तर त्या आधीच आमच्या कानावर पडली होती. जकार्तामध्ये जेमतेम ७०-८० मराठी कुटुंबे आहेत, प्रौढांची संख्या असेल जेमतेम १२५! कदाचित् त्यामुळे असेल पण "तमन इस्माइल मार्झुकी" या नाट्यगृहसंकुलातील छोटे नाट्यगृह या कार्यक्रमासाठी योजण्यात आले होते. पण बिगरमराठी लोकांचासुद्धा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला कीं एकादा तंग कपडा शिवणीवर उसवावा तसे हे नाट्यगृह "हाऊसफुल" तर भरलेच पण त्यानंतर आलेल्या गर्दीला सामावून घेण्यासाठी मिळेल तिथे खुर्च्या टाकून प्रेक्षकांची सोय करावी लागली होती.
इथले राजदूत श्री. बिरेन नंदा प्रकृती बरी नसल्याने येऊ शकले नाहींत व त्यांच्या अनुपस्थितील त्यांच्या सौभाग्यवतींच्या व सुरीनामच्या राजदूता श्रीमती अंजलिका यांच्या हस्ते समई प्रज्वलित केल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला.
"कलिका कला केंद्र"च्या प्रमुख आहेत नृत्यांगना श्रीमती राजश्री काळे नगरकर! सोबत त्यांच्या नृत्यांगना भगिनी श्रीमती आरती काळे नगरकर आल्या होत्या. दोघीच्या मातोश्री श्रीमती काळेसुद्धा-त्यांनी भाग घेतला नसला तरी-मुलींचे कौतुक करण्यासाठी व्यासपीठावर हजर होत्या.

(पुढे राजश्री व मागे आरती काळे नगरकर "जेजूरीच्या खंडेराया" भंडारा उडवून सादर करताना)
या संघटनेचे वैशिष्ट्य हे कीं त्यांचे सर्व साथीदार स्वतः व्यासपीठावर हजर होते. (म्हणजे हल्ली ज्याला "ट्रॅक्स" म्हणतात अशी कांहीं कृत्रिम तजवीज नव्हती.) ढोलकी, ऑर्गन व गायन सारे अगदी LIVE होते. आणि या साथ करणार्‍या पथकाचे प्राविण्य फारच उच्च प्रतीचे होते. त्यात ढोलकीसम्राट श्री पांडुरंग घोटकर यांच्या बरोबरीने त्यांचे सुपुत्र श्री कृष्णा मुसळेही ढोलकी वाजवत होते, श्रीमती कीर्ती बने दीड-दोन तास तर्‍हेतर्‍हेची गाणी गायल्या-अगदी गणगौळणमधील शालीन भजनापासून ते "इचार काय हाय तुमचा, पावणं?" किंवा "मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा"सारख्या नखरेल गाण्यातले लाडिक, शृंगारपूर्ण स्वरही त्यांनी तितक्याच सहजतेने आणि झकास काढले, ऑर्गनवरचे श्री. सुधीर जवळकर यांनी आपल्या वादनकौशल्याने सार्‍यांची मने जिंकली आणि श्री. नरेंद्र बेडेकर यांनी निवेदनाची बाजू सुरेख सांभाळली. त्यांच्या निवेदनात भरपूर माहिती, नर्मविनोदाची झालर आणि आवाजातील गोडवा, आदब आणि ढंग यांचा सुरेख संगम झाला होता.


(कलिका कला केंद्राचे संपूर्ण पथक. चित्रात श्री व सौ. पराडकर उजवीकडून चौथे व पाचवे)
(पुढे बसलेले ऑर्गनवादक सुधीर जवळकर, मधोमध राजश्रीच्या मातोश्री, त्यांच्या उजवीकडे निवेदक नरेंद्र बेडेकर, अगदी उजवीकडे 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर व अगदी डावीकडे त्यांचे सुपुत्र मुसळे)

मुख्य नृत्यांगना राजश्री आणि आरती यांनी तर आपल्या नृत्यकौशल्याने व विभ्रम, नखरे व सूचक इशारे यांचा वापर करून सारे सभागृह डोक्यावरच घेतले. दीड-दोन तास शिट्ट्या आणि टाळ्या थांबल्याच नाहींत. जकार्तातील उच्चभ्रू लोकांना इतक्या भन्नाट शिट्या वाजविता येतात याची मला कल्पनाच नव्हती! पण काळे भगिनींचा कार्यक्रमच इतका अफलातून झाला कीं न येणार्‍यांनाही तिथल्या-तिथे शिट्टी वाजवायला येऊ लागली असावी असा मला संशय आहे. यातल्या बर्‍याच लोकांनी आयुष्यातली पहिली शिट्टी इथेच वाजविली असल्यास आश्चर्य वाटायला नको.

(वर राजश्री काळे नगरकर "किती थाटाने घोड्यावर बसतो" आणि खाली आरती काळे नगरकर "कवडसा चांदाचा पडला" सादर करताना)

(ऑर्गनवर सुधीर जवळकर)
कार्यक्रमाची सुरुवात गण-गौळण आणि मुजरा यांनी झाली तर शेवट "जेजूरीच्या खंडेराया"ने. गण म्हणजे गणेशपूजन (या नाचात रंगुनि गणपति हो), मुजरा म्हणजे हजर असलेल्या प्रेक्षकांना अभिवादन आणि गौळण म्हणजे राधाकृष्णांच्या नृत्यातून भारतीय संस्कृतीतील आध्यात्म व तत्वज्ञान यांची ओळख करून देणे (तुम्ही ऐका नंदाच्या नारी).
त्यानंतर एका पाठोपाठ नृत्ये सादर करण्यात आली. मुख्य नृत्यांगना आहेत राजश्री आणि आरती. त्यात राजश्री जास्त नृत्यनिपुण वाटली तर आरती खूपच खट्याळ, नटखट नर्तिका आहे. अगदी एक लता तर दुसरी आशा! राजश्रीने सादर केलेली मराठा वीरावरची लावणी (किती थाटाने घोड्यावर बसतो) तर सुरेख वठली. त्यात त्या मराठा योध्याची ऐट, रुबाब आणि त्याच्या घोड्यावर बसायच्या कौशल्याची नक्कल राजश्रीने सुंदररीत्या सादर केली, इतकेच नाहीं तर घोडा कसा दिमाखात धावतो, त्याची शेपूट कशी ऐटीत हलते हेसुद्धा घोड्यासारखे वाकून व आपला नऊ-वारीचा पदर फडकवून राजश्रीने दाखविले.

(राजश्री काळे नगरकर विटी-दांडू नृत्य "स्नेह तुजशी केला" सादर करताना)
आरतीने खिडाकीतून आलेल्या चंद्रप्रकाशाच्या कवडशाची आणि "इचार काय हाय तुमचा, पावणं, इचार काय हाय तुमचा" ही लावणी अशा कांहीं ठसक्यात, नखर्‍यात आणि लाडिकपणाने सादर केली कीं त्यांच्या नृत्यकौशल्याइतकेच त्यांचं चेहर्‍यावरील भावदर्शन, डोळ्यांनी आणि मानेच्या झटक्याने केलेले इशारे सारेच प्रेक्षकांच्या पसंतीची दाद घेऊन गेले.

("इचार काय हाय तुमचा" सादर करताना आरती काळे नगरकर)
राजश्रीने सादर केलेली सदा हरित "बुगडी माझी सांडली गं"लासुद्धा लोकांनी तुफान 'दाद' दिली तर "पिंजरा" या चित्रपटातील "छबीदार छबी, मी तोर्‍यात उभी" आणि "दिसला गं बाई दिसला" या लावण्यातून आरतीने लोकांची मनं जिंकली.

(चुगलि नका सांगु गंsssss, कुणि हिच्या म्हातार्‍याला ग हिच्या म्हातार्‍यालाssss)
सगळ्यात निराळी लावणी (स्नेह तुजशी केला) राजश्रीने सादरी केली विटी-दांडू खेळणार्‍या व्रात्य मुलीची! त्यात खेळण्यातला जोश, विटी दांडूवर पेलण्याची क्रिया, कुणी कुठे उभे रहायचे याबद्दल हुकूम वगैरे सर्व अगदी कप्तानाच्या आवेशाने तिने केले, जणू धोनीच शिरला होता तिच्या अंगात! विटी-दांडूसारख्या खेळावर आधारित इतकी चांगली लावणी असू शकेल यावर विश्वासच बसेना माझा!


(ढोलकीवर 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर)
आमच्यासारख्या परदेशस्थ मराठी मंडळींना असले श्रवणसुख आणि नेत्रसुख क्वचित् आणि तेही खूप वर्षांनंतर अनुभवायला मिळत असल्याने अजीबात अतिशयोक्ती न करता मी सांगतो हा कार्यक्रम पहाताना कित्येकदा माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.

("पिंजरा"मधील "छबिदार छबी मी तोर्‍यात उभी" ही लावणी सादर करताना)

(मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कीं बारा" ही "नटरंग"मधील लावणी साजरी करताना राजश्री आणि आरती काळे)
"मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कीं बारा" ही "नटरंग"मधील लावणीची घोषणा होताच सर्व मराठी मंडळींनी-विशेषतः तरुण मंडळींनी-विक्रमी शिट्ट्या व टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या गाण्यातील शृंगार, नखरा व आर्जव या सर्व भावना गाऊन दाखविताना कीर्ती बने यांनी आपले अप्रतिम कलाकौशल्य दाखवत आशाताई भोसलेंची आठवण करून दिली!
छबीदार छबी या गाण्यातली "काय रे बत्ताशा, कशास पिळतोस मिशा?" ही ओळ मला पार माझ्या गावी-जमखंडीला-घेऊन गेली. तिथं लहानपणी पाडव्याच्या गुढीबरोबर लहान-लहान मुलांच्या गळ्यात बत्ताशाच्या माळा घालायची प्रथा होती. कदाचित् ग्रामीण महाराष्ट्रात आजही ही प्रथा असेलही.
नृत्यकौशल्यात व संगीतामधील वैविध्यात इतका श्रेष्ठ असलेला आणि मुख्यतः ग्रामीण असलेला व तिथे खूप लोकप्रिय असलेला "लावणी" हा मराठी नृत्यप्रकार त्या मानाने साचेबंद व वैविध्य नसलेल्या, अभिनयाला आणि गायनाला फारसा वाव न देणार्‍या व केवळ ठेक्यावर आधारलेल्या पंजाबी भांगड्यापेक्षा किंवा गुजराती दांडियापेक्षा कमी लोकप्रिय कां असावा हा विचार हा कर्यक्रम पहाताना पुन्हा डोक्यात आला. मला वाटते कीं यातले पहिले आणि महत्वाचे कारण हे असावे कीं महाराष्ट्रात लावणीसारख्या ग्रामीण नृत्यात (इतर नृत्यातही म्हणा) पुरुष कधी फारसा भाग घेत नाहींत त्यामुळे या नृत्याला "सामूहिक" स्वरूप कधीच येत नाहीं. शिवाय अभिनय, नृत्य, गायन, वादन, अर्थपूर्ण काव्य यांचा सुरेख संगम असलेला, भारतीय परंपरेचा (गण/गौळण) अंर्तभाव असलेला हा वैविध्यपूर्ण "लावणी" नृत्यप्रकार "एक शृंगारीक (चावट) नृत्यप्रकार" अशा चुकीच्या कलंकामुळे (जुनाट विचारांवर आधारित) मागे पडला असावा कीं काय असेही मनात येऊन गेले. तसेच इथे मराठी लोकांची "मार्केटिंग"मधील कमतरताही याला कारणीभूत असावी काय असेही मनात आले. कारण दिग्गज गायक तर सोडाच, पण अगदी उदयोन्मुख असलेले सारे पंजाबी गायक जेंव्हां जकार्ताला कार्यक्रम करतात तेंव्हां एकाच ढंगाची भांगडा गाणी तर गातातच पण वर सोबत प्रक्षकांनाही गायचे आवाहन करत वायरलेस माईक घेऊन प्रेक्षकांत हिंडतात. तसे आपण मराठी लोक फारसे करत नाहीं. हेही या तौलनिक पीछेहाटीचे कारण असावे. कुठल्याही कार्यक्रमात प्रेक्षकांशी केलेला सुखसंवादामुळे व प्रेक्षकांना त्यात सहभागी करून घेण्यातील पुढाकारामुळे अशा कलांची व अशा कार्यक्रमांची लोकप्रियता अनेक पटींनी वाढते. तसेच 'लावणी'चे थोडेसे "शहरीकरण"ही व्हायला हवे!
कार्यक्रमाच्या शेवटी राजश्री, आरती व त्यांच्या मातोश्री असलेल्या माझ्या आडनावभगिनींना आणि नावबंधूंना (सुधीर जवळकर) व इतर कलाकारांना शाबासकी देऊन आम्ही घरी परतलो!
(एक ऋणनिर्देशः 'मिपा'कर पुनेरी यांनी एक बारकाईचा मुद्दा आपल्या प्रतिसादात सांगितला. तो जर मला १०० टक्के कळला असेल तर ते म्हणतात कीं 'लावणी' हा 'तमाशा'चा एक भाग असतो. तमाशात गण-गौळण असते, 'लावणी'त नसते. म्हणून या समारंभाला "तमाशा दर्शन" हे नांव जास्त उचित ठरले असते. पण कां कुणास ठाऊक, पण हा कार्यक्रम "लावणी दर्शन" याच (कदाचित् चुकीच्या) नावाने सादर झाला. पुनेरीसाहेब, समजण्यात चूक झाली असेल तर सांगावे. दुरुस्ती करेन)
एक पूरक वाचन म्हणून द मेकिंग ऑफ 'सांगत्ये ऐका' हा ई-सकाळमध्ये प्रकाशित झालेला मनोरंजक लेख जरूर वाचा http://www.esakal.com/esakal/20101117/4625380670850015419.htm या दुव्यावर!

कलानृत्यसंगीतअनुभवमाहितीसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

30 Nov 2010 - 6:24 pm | अविनाशकुलकर्णी

लावणीचा कार्यक्रम असल्याने "एकादा तंग कपडा शिवणीवर उसवावा " उपमा फिट्ट आहे

टारझन's picture

7 Dec 2010 - 1:25 pm | टारझन

खालुन पाचव्या फोटुत नर्तिकेचे ट्रायसेप कसे चमकत आहेत .. वा वा वा !!
धन्यवाद जकार्ताकाका !
बाकी पुण्यातल्या बालगंधर्व मधे होणार्‍या "चौफुला" ,"नाद करायचा नाय" वगैरे मधे जो माहोल तयार होतो तो तिकडे झाला असेल ह्या बाबद सांशक .

-(णटराज)

विजुभाऊ's picture

7 Dec 2010 - 4:54 pm | विजुभाऊ

एक चूक आहे
(ढोलकीवर 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर)

या चित्रात ते वाजवीत असलेल्या वाद्याचे नाव सम्बळ असे आहे. ती ढोलकी नाहिय्ये गोंधळ वगरे गाताना संबळ वाजवतात.

सुधीर काळे's picture

7 Dec 2010 - 9:42 pm | सुधीर काळे

विजूभाऊ, सर्वात प्रथम धन्यवाद.
त्या कार्यक्रमात ढोलकीचंच नांव घेतलं गेलें. पण माझी ऐकण्यातही चूक झाली असू शकते. कारण हीच दुरुस्ती आणखी एका वाचकाने सुचविली होती.
सुदैवाने ढोलकीसम्राट घोटकरसाहेबांनी मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले आहे. त्यांनाच फोन करून विचारतो आणि चूक असल्यास दुरुस्त करणासाठी सकाळच्या संपादकांना विनंती करतो.
पुनश्च धन्यवाद!

विजूभाऊ,
आज सकाळीच 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकरांशी बोलणे झाले. त्या 'ताशा'सारख्या दिसणार्‍या वाद्याचे नांव 'संबळ'च आहे! आता ते बरोबर करण्यासाठी संपादकांना लिहितो.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

हाहाहा! मलाही ती उपमा 'त्या'च कारणास्तव भावली होती!

विलासराव's picture

30 Nov 2010 - 6:39 pm | विलासराव

मला तरी लावणी हा प्रकार फार आवडतो.

>>अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते.

सुपे हे पारनेर तालुक्यात येते. पारनेर हे माझे गाव.

>>('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!)

मला वाटते ते सुपे दुसरे असावे.
ह्या सुप्याला लढाई झाली असे मला वाटत नाही.
ही माझी माहिती आहे.
चुकीचीही असु शकते

सुधीर काळे .. आपला लेख उत्तम जमला आहे ..
लावणी मला पण खुप आवडते ..

..सांगते ऐका चे मेकींग आधीच वाचले होते .. मस्त आहे .. एकदम नक्की सर्वांनी वाचावे असे..

----------

अवांतर :
विलास राव आपण पारनेर चे असल्याने आनंद वाटला , शिरुर ला ३-४ वर्षे होतो तेंव्हा पारनेर चे मित्र मैत्रीणींची आठवण झाली ..

बारामती जवळील 'सुपा' ही शहाजीराजेंची सर्वात पहिली जहागीरी होती. कदाचीत ते हे सुपा असेल असे वाटते ..
आणि ते माझे गाव आहे .[:)]

या सुप्या जवळ केडगाव असे गाव आहे .. जसे पारनेर च्या सुप्या जवळ केडगाव आहे तसेच त्यामुळे ही बराच गोंधळ होतो काही जणांचा..
आणि या सुप्याजवळ ही चौफुला (केडगाव) हे ठिकाण आहे .. त्यामुळे हे पथक पहिल्यांदा तेथलेच वआटले मला पण नगरकर वाचुन कळाले हे तिकडच्या सुप्याचे ते ..

विलासराव's picture

30 Nov 2010 - 7:50 pm | विलासराव

>>शिरुर ला ३-४ वर्षे होतो तेंव्हा पारनेर चे मित्र मैत्रीणींची आठवण झाली ..

हे शिरुर (घोडनदी) माझे आजोळ आहे.

माझ्या आठवणीप्रमाणे सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली आणि हे सुपे पुण्याजवळ आहे.
पण या दोन काळे भगिनी (राजश्री आणि आरती) "काळे नगरकर" असे आडनाव लावतात व त्यांच्याशी परिचय असलेल्याने त्या अहमदनगरमुळे नगरकर असे नाव लावतात असे सांगितले.
अजून थोडा शोध घेतो.
काळे

चिंतामणी's picture

1 Dec 2010 - 12:39 am | चिंतामणी

माझ्या आठवणीप्रमाणे सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली आणि हे सुपे पुण्याजवळ आहे.
पण या दोन काळे भगिनी (राजश्री आणि आरती) "काळे नगरकर" असे आडनाव लावतात व त्यांच्याशी परिचय असलेल्याने त्या अहमदनगरमुळे नगरकर असे नाव लावतात असे सांगितले.
अजून थोडा शोध घेतो.

काळे साहेब. बरोबर आहे. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे पण हे सुपा मोरगावजवळ (बारामती तालुका) आहे.

विलासराव,
ढोलकीसम्राटांनी सांगितले कीं हे सुपे गाव पारनेर तालुक्यातलेच असून ते गांव शिरूर-नगर रस्त्यावर आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Nov 2010 - 6:41 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच हो साहेब... मजा आली वाचताना.

ब्राऊझर मधे आणखी कसलासा टॅबु उप्प्स सॉरी .. टॅब ओपन असल्याची शंका येते. मजा आली म्हणे =))

-(मजेशीर)

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 7:42 pm | नगरीनिरंजन

छान वाटले वृत्तांत वाचून! मराठी कलासंस्कृती अशीच सर्वदूर जाऊन प्रसिद्ध होवो हीच शुभेच्छा.

सुधीर काळे's picture

30 Nov 2010 - 9:10 pm | सुधीर काळे

इथे पहा सुपे कुठे आहे ते!

विलासराव's picture

30 Nov 2010 - 9:17 pm | विलासराव

>>अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. ('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!)

अहमदनगर जवळचे सुपे असा उल्लेख आल्याने मला असे वाटले.

बाकी ते मॅपमधले सुपे वेगळे आहे.
असो.

मी म्हणतो ते सुपा हेच. पण तुमच्या कलाकारांचे सुपे हे रांजणगावच्या पुढे आहे. हा नकाशा वरती ओढा म्हणजे दिसेल. शिरुर नंतर दिसेल.

सुधीर काळे's picture

30 Nov 2010 - 9:18 pm | सुधीर काळे

इथे पहा सुपे कुठे आहे ते!

आणि हा क्लोजप

विलासराव's picture

30 Nov 2010 - 9:27 pm | विलासराव

पारनेर जवळचे सुपे हे पूणे- नगर हायवेवर शिरुरच्या पुढे २० -२५ किमी असेल.
पुण्यावरुन साधारण ७५-८० किमी.
हे बारामतीचे सुपे वेगळे आहे. बहुतेक चौफुला म्हणतात ते हेच किंवा जवळच असावे.
चौफुला म्हणजे ते मुंडेंचे बरखा प्रकरण.
ति़कडे असे खुप कलाकेंद्र आहेत.
आता तिथे कुठली कला चालते ते धमालराव प्रकाश टाकु शकतील.

सुधीर काळे's picture

30 Nov 2010 - 9:38 pm | सुधीर काळे

पारनेर जवळचे सुपे हे पूणे- नगर हायवेवर शिरुरच्या पुढे २० -२५ किमी असेल. पुण्यावरुन साधारण ७५-८० किमी.
शिरूर-नगर अंतर ५०-६० किमी आहे असे आठवते. म्हणजे सुपे-नगर २५ किमी?
म्हणजे नगरच्या जवळच, नाहीं कां?
असो. मुख्य लेख "सुपे कुठे आहे" याबद्दल नसून "लावणी-दर्शन या कार्यक्रमाबद्दल आहे" तरी तिकडे जास्त लक्ष असू द्या.
त्या ग्रूपमधील एका कलाकाराचे कार्ड माझ्याकडे आहे. त्यालाच फोन करून विचारतो आणि कळवतो.
दरम्यान Back to "Lavani Darshan"

विलासराव's picture

30 Nov 2010 - 9:48 pm | विलासराव

ही आमची एक आवडती लावणी:
" title="LAWANI">

चिंतामणी's picture

1 Dec 2010 - 12:47 am | चिंतामणी

चौफुला म्हणजे ते मुंडेंचे बरखा प्रकरण.
ति़कडे असे खुप कलाकेंद्र आहेत.

चौफुल्याला कलाकेंद्र आहेतच. पण वरील कलाकारांचे सुपे/सुपा हे शिरुरच्यापुढे नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात येते. तेथेसुध्दा घाटाच्या पायथाशी कला केंद्रे आहेत.

चौफुल्यापासुन सुपा आत मोरगाव मार्गावर आहे.

उगीचच पिंका टाकायाची सवय मिपाकरांनी सोडावे असे मला वाटते.

मदनबाण's picture

30 Nov 2010 - 9:28 pm | मदनबाण

लावणी वॄतांत आवडला... :)
लावणीची मजा काही औरच असते हे मात्र खरंच आहे. :)
सध्या मला आवडणारी लावणी :--- ;)

गोगोल's picture

1 Dec 2010 - 1:22 am | गोगोल

कसली जाडी फोदी बाई आहे .. नीट नाचता पण येत नाहिये तिला.

आमोद शिंदे's picture

30 Nov 2010 - 9:41 pm | आमोद शिंदे

छान लेख

त्यात खेळण्यातला जोश, विटी दांडूवर पेलण्याची क्रिया, कुणी कुठे उभे रहायचे याबद्दल हुकूम वगैरे सर्व अगदी कप्तानाच्या आवेशाने तिने केले

टारू, वुई मिस यू!!

इन्द्र्राज पवार's picture

30 Nov 2010 - 10:24 pm | इन्द्र्राज पवार

"..."लावणी" नृत्यप्रकार "एक शृंगारीक (चावट) नृत्यप्रकार" अशा चुकीच्या कलंकामुळे (जुनाट विचारांवर आधारित) मागे पडला असावा कीं काय असेही मनात येऊन गेले....."

श्री.सुधीर काळे यांच्या उत्स्फूर्त लिखाणावरून ते त्या कार्यक्रमाच्या प्रेमात किती गुंफले गेले होते ते स्पष्ट दिसून येते. 'लावणी' हा प्रकारच मराठी माणसाला मोहित करणारा आहे, भले त्या कलेविषयी सर्वसाधारणपणे डावेच मत मांडले जात असले तरी. वर उदधृत केलेल्या अवतरणातही श्री.काळे यानी हीच भावना प्रकट केली आहे, तीबद्दल मी थोडा खुलासा करतो.

इथे मी 'चुकीच्या कलंकावर' असा शब्दप्रयोग न वापरता "चुकीच्या समजुतीमुळे" हा नृत्यप्रकार मागे पडला असे म्हणतो. कारण या परंपरेत वाढलेली 'मुलगी' ही पुरुषसेवेसाठीच जन्माला आली आहे अशी खुद्द त्या समाजाचीच (कोल्हाटी) धारणा असून तसे एखाद्या मुलीने केले नाही तर खंडेरायाचा उग्र कोप पुर्‍या छाटीवर [छाटी = समाज] पडतो. तमासगिरीण आणि शरीरअर्पण याची वीण अशी काही दाट आहे तिथे की, त्या समाजातील एखादी सुशिक्षित (तसे पाहिले तर मुलींना अतिशय अल्प शिक्षण दिले गेलेले असते...वयाच्या ८ व्या वर्षीच चाळ पायात बांधले जातात) नृत्यांगणा आपणदेखील चारचौघीसारखे लग्न करून सुखाने संसार करावा का हा विचारच करू शकत नाही.

"बामना घरी लिवणं, कुणब्या घरी दाणं, महारा घरी गाणं, कोल्हाटी घरी नाचणं...." ही शिकवण देवाची असून तिथे जन्मजात आहे असे मानले जाते आणि त्याच मार्गाने यांची वाटचाल चालू असते. "पिंजरा" चित्रपटातील ते एक दृश्य फार बोलके आहे की, जिथे मास्तर आणि पाटील त्या तमाशावाल्यांचा फड गावी येऊ न देता त्याची नदीपलिकडे (म्हणजेच गावकुसाबाहेर) हकालपट्टी करतो. तो प्रसंग बिलकुल काल्पनिक नसून कोल्हाटी समाजाची ती वर्षानुवर्षाची तिडीक आहे. पांढरपेशा वर्गही या समाजातील मुलांमुलीकडे फार आपुलकीने पाहतो असे बिलकुल नाही. रोशन सातारकर, मधु कांबिकर, सुरेखा पुणेकर, तसेच या धाग्यातील काळे भगिनींना या क्षेत्रात चार पैसे मिळाले म्हणून त्यांना कोणत्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सहजगत्या सदनिका मिळते असे होत नाही. मेट्रोमध्येही यांच्याबाबतीत हा भेदभाव होतोच होतो.

याला दुसरेही कारण म्हणजे कोल्हाटी जातीतील मुलीना नसलेली लग्नाची परवानगी. "पाट" लावून घेणे हा एक प्रकार सर्रास (आजही) चालू असल्याने एखाद्या बारीच्या वेळी "दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला, गं बाई हसला..." असा कुणी तालेवर "पाटील, इनामदार, सावकार" दिसतो का ते पाहणे हे यांचे विधिलिखितच असते. कोल्हाटी समाजाच्या "माळी कोल्हाटी" आणि "भातू कोल्हाटी" अशा दोन पोटजाती आहेत. माळीकरीण रितसर तमासगिरीण (मी करीत असलेला हा उल्लेख अपमानस्पद नाही, हे इथल्या वाचक-सदस्यांनी समजून घ्यावे, तर हे लेबल खुद्द कोल्हाट्यांनी त्या मुलींना लावलेले असल्याने शासन दरबारी गॅझेटियरमध्येही हेच नाम नोंदीत झालेले आहे) झाल्यावर लग्न करू शकते....पण कुणाशी? तर तिच्याच बारीतील एका पुरूषाशी....जो सहसा ठेकेदारांसमवेत व्यवहाराला पुढे असतो....तर भातू कोल्हाटीणीच्या पायात घुंगरू आल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारच्या लग्नाचा 'अधिकार' नाही....ती खंडोबाचीच पत्नी...पण शरीरभुकेसाठी आणि उतार आयुष्यासाठी "योग्य" वयातच 'पाट' लावून घेते....तालेवाराची रखेल होते...आणि एकदा का जवानीचा मोहोर गळाला की, त्याच तालेवाराच्या घरातील 'पायपुसण्याची' अवकळा येते त्या एकेकाळच्या सुंदरीला !!

फार वाईट जगणे आहे....पण तरीही श्री.सुधीर काळे यानी इथे दिलेल्या फोटोमधून अपरिहार्यपणे त्याना समाजाच्या चार घटका मनोरंजनासाठी आणि स्वतःच्या पोटापाण्यासाठी तो शृंगाररस नृत्यरूपात बोर्डावर सांडावाच लागतो.

इन्द्रा

चिंतामणी's picture

1 Dec 2010 - 12:50 am | चिंतामणी

रोशन सातारकर, मधु कांबिकर, सुरेखा पुणेकर, तसेच या धाग्यातील काळे भगिनींना या क्षेत्रात चार पैसे मिळाले म्हणून त्यांना कोणत्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सहजगत्या सदनिका मिळते असे होत नाही.

वाह वा. खरच छान लिहीले आहेत. हेच इम्रान हाश्मी, शबाना आजमीलासुध्दा सांगाय्ला पाहीजे असे वाटते.

सुधीर काळे's picture

1 Dec 2010 - 8:04 am | सुधीर काळे

इंद्रा-जी, सुरेख प्रतिसाद. मला माहीत नसलेली बरीच नवी माहिती या प्रतिसादामुळे समजली.
धन्यवाद!

सुंदर प्रतिसाद .. छान माहिती

अतिशय सुन्दर झाला असला पाहिजे कार्यक्रम! मध्ये एकदा कोल्हापुरला एक दिवस खास महिलांसाठी या कर्यक्रमाच सादरी करण केले गेल होत. त्यातली एक नर्तिका पी एस आय म्हणुन रुजु होणार होती. या मुले व्यवस्थित शिकलेल्या असतात.

काका एकच चुकलय अस मला वाटतय, ते फोटो मध्ये ढोलकी सम्राट ढोलकी वाजवत नसुन ' संबळ ' वाजवताहेत. खंडोबाच गाण असाव ते.

मी खुप दिवसा पासुन ' कवडसा कवडसा चांदाचा पडला ' गाण शोधते आहे. कुठे मिळेल का?

स्पंदना's picture

1 Dec 2010 - 8:29 am | स्पंदना

धन्यवाद नरेशजी!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Dec 2010 - 7:23 am | निनाद मुक्काम प...

अप्रतिम लेख
जर्मनीत व युरोपात दक्षिणात्य नृत्य शैलीचे कायर्क्रम खूप गर्दी खेचतात .माझ्या मते आपली लावणी असो कि भांगडा हे सुरवातीपासून नुसत्या वाद्याच्या आवाजाने रसिकांचे मनमोहून घेतात .तेव्हा आपली लोककलेचे युरोपात कार्यक्रम का करत नाहीत असा प्रश्न मला नेहमीच पडतो .युरोपातील मराठी माणूस संमेलन भरवू शकतो .अमेरिकेत सुरेखा पुणेकर जाऊन येतात .युरोपात आम्हाला शिट्या कधी वाजवायला मिळणार ह्या प्रतीक्षेत सध्या आहोत .

धन्यवाद, निनाद. आजच हा लेख 'ई-सकाळ'ने प्रकाशित केला.